मी अनुभवलेली प्रार्थना...

Submitted by फूल on 6 November, 2014 - 17:26

आईबाबांनी सांगितलंय म्हणून, अळम-टळम करत, पुढे-मागे हालत, मधले मधले शब्द सहजि गाळत, जेव्हढ्या लवकर संपेल तेव्हढ्या लवकर किंबहुना आटपत म्हटलेल्या अनेक प्रार्थनांपैकी एक म्हणजे प.पू. कलावती देवींनी लिहिलेली बालोपासना! "बाळगोपाळांस सूचना" इथपासून जे धावायला सुरूवात व्हायची ते अगदी शेवटचं "गोपालकृष्ण महाराज की जय"... इथेच पूर्ण श्वास घ्यायचा... संपली एकदाची...

आपण म्हणत आहोत त्याचा अर्थ काय? त्यात स्वार्थ साधतोय का परमार्थ? लिहिणाऱ्याने ती प्रार्थना असंच वेळ जात नव्हता, काहितरी लिहावं म्हणून लिहिली की त्यात खरंच काही अर्थ दडलाय...? काही एक ना दोन... हा देव, हे आई-बाबा... ते सांगतात म्हणून आणि देव-बिव नावाचा कुणी असलाच तर त्याला जरा बरं वाटावं म्हणून केलेला हा सगळा खटाटोप... ती प्रार्थना माझ्या आत जराशीही उतरली नाही मग त्या लांब कुठेतरी वर बसलेल्यापाशी कशी पोचायची..?? (हा प्रश्न तेव्हा पडत नव्हता आता पडतोय. आयुष्यातली पंचवीसेक वर्षं संपल्यावर)

ही प्रार्थना दैनंदिनीत नि:श्वासासारखी उतरली... कुठल्याही आणीबाणीच्या प्रसंगी तोंडातून ती उद्गारासारखी बाहेर यायला लागली... संकट आणि प्रार्थना, मेंदूने समीकरण मांडून टाकलं... त्याचा संबंध त्या प्रार्थनेतल्या शब्दांच्या अर्थाशी मुळीच नव्हता... पण ती प्रार्थना म्हटली की बरं वाटतं एव्हढंच... बरं वाटतं म्हणजे काय होतं? ते पुन्हा तो देवच जाणे... शब्दांच्या अर्थाकडे मीही कधी लक्ष दिलं नाही आणि देवानेही दिलं नसावं... माझ्या आर्जवाला भुलून त्याने माझ्यासकट माझं आयुष्य मार्गी लावलंय... मी त्याला स्मरून काहीतरी म्हणणं हेच पुरेसं होतं त्याला...

पण एका अपूर्व प्रसंगाने मला ही प्रार्थना सगुण रूपाने दिसली, कळली आणि रुजली... आयुष्यात जमेस धरण्यासारखे हेच क्षण... बाकी सगळेच दिवस पृथ्वी स्वत:भोवती फिरतेय म्हणून येतात आणि जातात...

ती प्रार्थना काय होती?
श्री गणपते, विघ्ननाशना ।
मंगलमूरूते, मूषकवाहना ॥
तिमिर नाशीसी, निजज्ञान देऊनी ।
रक्षिसी सदा, सुभक्तालागुनी ॥
खडग दे मला, प्रेमरूपी हे ।
मारीन षड्रिपु, दुष्टदैत्य हे ॥
बालकापरी, जवळी घे मज ।
ईश जगाचा तू, मी तव पदरज ॥
मनोहर तुझी, मूर्ती पहावया ।
लागी दिव्यदृष्टी, देई मोरया ॥
पुरवी हेतुला, करूनी करुणा ।
रमवी भजनी, कलिमलदहना ॥

(मूळ बालोपासनेतील हे फक्त गणेशस्तवन आहे.)

अतिशय साधी, सरळ, सोपी लहान मुलांसाठी लिहिलेली प्रार्थना... आता लहान मूल याचा संदर्भ ज्याने त्याने आपापल्या गति आणि मतिप्रमाणे लावावा... माझ्यापुरतं सांगायचं तर मी सदैव लहान मूलच आहे... या प्रार्थनेत उत्खनन करून काही गर्भितार्थ शोधावा एव्हढी काही ही प्रार्थना वरपांगी तरी अवघड दिसत नाही... असो.

दोनेक महिन्यांपूर्वी मेलबर्न शहरी जाण्याचा योग जुळून आला... आणि काय बघायला जावं असं ठरवता ठरवता पेग्विन आयलंड (फिलीप आयलंड) ला भेट देण्याचं ठरलं...

आयुष्यात पहिल्यांदाच मी पेग्विन्सना आणि पेग्विन्स मला पहाणार... हा अपूर्व योग... त्यामुळे भयंकर उत्सुकता, आनंद आणि त्या सगळ्याचं कौतुक वगैरे ते सगळं आलंच ओघाने... पण या सगळ्यात एक मेख अशी होती की ते पेग्विन्स संध्याकाळच्या वेळी समुद्रातून त्यांच्या बिळाकडे परतताना बघायचे...

प्राणी संग्रहालयाव्यतिरिक्त एवढ्या मोठ्या संख्येवर कुठल्याही प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अवस्थेत बघण्याची आणि त्याच्या दिनचर्येतला एक भाग जवळून अनुभवण्याची ही पहिली-वहिलीच वेळ... कारण तुमची-आमची झेप "मांजर घरात व्याली" इथवरच... मुंबईत आयुष्य गेल्यामुळे तेही नाही... क्वचित कधी चिमण्यांना घरांच्या वळचणीला घरटं बांधताना बघितलंय किंवा कबुतरांची जी काय प्रेमप्रकरणं बघितलीयेत... हेच काय ते माणसाव्यतिरीक्त इतर प्राण्यांच्या आयुष्यात डोकावणं...

माणसाच्या कल्पनाशक्तीचं कौतुक करावं तितकं थोडं... आम्ही त्या सफरीची चिक्कार स्वप्न रंगवून मोकळे झालो... मोठ्ठेच्या मोठ्ठे चांगले ३-४ फूट उंच पेग्विन्स असतील... त्यांची झुंडच्या झुंड पाण्यातून येताना दिसणार म्हणजे एक पांढरी भिंतच चालत येतेय असं वाटणार... इथपासून ते पेग्विन बर्फाळ प्रदेशात वगैरे असतात त्यामुळे तिथे आसपास थोडं बर्फही असावं इथपर्यंत समजूत करून घेऊन झाली होती... म्हणजे तिथे जायला निघेस्तोवर अगदी खात्रीच...

मग एक एक गोष्टी कळत कळत आम्ही जरा जमिनीवर यायला लागलो... बर्फ कुठेच दिसलं नाही... "अरे वा, म्हणजे बिना बर्फाळ प्रदेशातही पेग्विन्स असतात तर... आज आपण काहितरी अजूनच वेगळं बघणार..." पुन्हा त्या दिशेने स्वप्नप्रवास... जमिनीवर यायचं नाहीच मुळी...

मग कळलं की ही पेग्विन्स ची सगळ्यात छोटी जमात आहे... संपूर्ण वाढ झालेला पेग्विनही फारतर फार "१ फूट" एव्हढ्याच उंचीचा असतो... हा दुसरा भ्रमनिरास... इथेतरी शहाणं व्हावं पण नाही "अरे वा आपण जगातले सगळ्यात छोटे पेग्विन्स बघणार... क्या बात है!" मन नावाचं जे काही आतमध्ये असतं त्याचं समाधान... बाकी काही नाही...

मग अजून एक साक्षात्कार झाला की सूर्य मावळल्या नंतर ते समुद्रातून बाहेर येतात... आता सूर्य मावळल्यावर किलकिले डोळे करून बघताना त्या १ फूटाच्या पेग्विन्सची भिंत लांबच राहिली पण रेघ जरी समुद्रातून येताना दिसली तरी विधात्याचे आभार... इथे नाही म्हटलं तरी पत्त्याच्या मनोऱ्याचे दोन तीन बुरूज तरी कोसळलेच... असो

हे झालं आमच्याबद्दल आता प्रमुख पाहुण्यांबद्दल थोडंसं... हे पेग्विन्स पहाटे सूर्य उगवण्याआधी समुद्राकडे प्रयाण करतात... ते ४-५ दिवसांनी घरी परत येतात. सूर्य मावळल्यानंतर... सूर्य म्हणजे कसा तो अगदी नाहीच आवडत यांना... येताना घरात एकट्या-दुकट्या रहाणाऱ्या पिल्लांसाठी पोटात मासे भरून आणतात... बिळात जाऊन ते पोटातले मासे त्या पिल्लांना भरवतात... त्यांच्या घरी जाण्याच्या वाटा ठरलेल्या असतात... याच कारणासाठी "येथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे." कॅमेऱ्याच्या फ्लॅश मुळे त्यांची दिशाभूल हॊऊन ते घराची वाट चुकू शकतात...

समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या टेकड्यांवर यांची असंख्य बिळं आहेत... हा प्रवास पेग्विनच्या पावलाने... आणि त्याही एक फूटी इवल्याश्या जिवाच्या पावलाने तर कमालीचा जोखमीचा आहे... जर भरती असेल तर चाल कमी होते पण ओहोटी असेल तर अजून त्रास... काय नव्हेच ते...

त्यांचा हा परतीचा प्रवास बघायला आम्ही आणि आमच्या सारखे शेकडो पर्यटक त्या समुद्रकिनारी तिष्ठत उभे असतात...

आम्ही साधारण संध्याकाळी ५.५० ला त्या सेंटरला पोहोचलो... सेंटर समुद्र किनाऱ्यापासून बऱ्याच उंचीवर होतं... खाली किनाऱ्यावर अनेक माणसं दाटीवाटीने अगदी पुढच्या जागा पकडून तेव्हापासूनच बसली होती. तिथे लोकांना बसून बघायला स्टेडियमवर असतात तसले स्टँड केले होते... आमच्या टुर गाईडने मात्र आम्हाला बजावलं... त्या मूर्खासारख्या लवकर खाली जाऊन बसणाऱ्या माणसांकडे बघून तुम्ही मुळीच खाली जायची घाई करू नका... सूर्यास्त झाल्याशिवाय एकही पेग्विन समुद्रातून बाहेर यायचा नाही... (अगदी आलाच तर मी माझं नाव बदलेन अशा आवेशात) तुम्ही ६.२०-२५ ला समुद्रकिनारी जा... काल सूर्यास्त ६.३० ला झाला होता...

खाली फोटो काढता यायचे नाहीत म्हणून आम्ही अगदी हौसेने त्या सेंटरवर पेग्विन्सबरोबर मॉर्फ केलेले फोटो काढून घेतले... पण नाही म्हटलं तरी ६.००-६.०५ ला आमची खाली जाण्यासाठी चुळबूळ सुरू झालीच... आम्ही निघालो... बर्फ नसलं तरी थंडी प्रचंड होती... "३-४ फूट उंच पेग्विनची भिंत" इथपासून आमच्या मनाची अवस्था "आता काय बघायला मिळणारे कुणास ठाऊक?" इथवर येऊन ठेपली...

पण...

किनाऱ्यापाशी येऊन उभे राहिलो... आणि ती कातरवेळ मनाला निराळयाच अवस्थेत घेऊन गेली... सूर्यही परतायच्या तयारीत त्यामुळे आसपासचा सारा पसाराच परतीच्या वाटेवर... घरट्याची अनामिक ओढ... शेकडो माणसातही एकटेपणाची जाणीव... कातरवेळीची हुर हुर, सगळंच विचार, कल्पना, जाणीवा, संवेदना, सगळ्याच्या पलिकडचं... फक्त असहाय निव्वळ पोरकेपण...

थंडी वाजत होती... सख्याचा हात गच्च पकडून उभी होते... परतणाऱ्या पेग्विन्सची वाट बघत... तेव्हाच अजून एक गोष्ट जाणवली आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला... किनाऱ्यावर त्यांची वाट बघणारे फक्त आम्हीच नव्हतो तर सिगल्स चे थवे च्या थवे होते... बिळाकडे परतणाऱ्या या पेग्विन्सना त्यांची पिल्लं मायेच्या ओढीने शोधत जेव्हा बाहेर येतात तेव्हा हे सिगल्स त्या पिल्लांना खातात...

चार- पाच दिवसांनी खोल समुद्रातून परतलेल्या या माय-लेकांची भेट घडायची आणि तीही या सैतान गनिमाच्या साक्षीने... नकळत डोळे पाणावले... आपलं आयुष्य किती म्हणून सुकर असावं?

अंधार पडला आणि किनाऱ्यावरचे अंधूक लाईट्स लागले... त्या प्रकाशात आम्ही डोळ्यांत प्राण आणून उभे होतो. परतणाऱ्या त्या इवल्या पेग्विन्सचा तो दिनक्रम होता पण माझ्यासाठी, तो म्हणजे... निसर्ग, विधाता, परमेश्वर, जगन्नियंता काहीही म्हणा ... त्याच्या आणि माझ्यातला संवाद होता...

किनाऱ्यावर उभी राहिलेली ती सिगल्स ची झुंड बघताना माझ्या नकळत माझे ओठ ती प्रार्थना (बालोपासना) पुटपुटायला लागले... माझ्या नव्हे तर त्या पेग्विन्सच्या रक्षणासाठी... घरी पोचव बाबा सुखाने त्या इवल्या जिवाला हा एकच धावा सुरू होता... जणू ते माझ्यावरलंच संकट आहे असा...

इतक्यात कुणीतरी एका ठिकाणी बोट दाखवत चिनी भाषेत किंचाळलं... सगळ्यांचंच लक्ष तिकडे गेलं... एक पेग्विन्सची रेघ समुद्रातून बाहेर पडत होती... आणि त्याच्या पाठोपाठच दुसरी... किनाऱ्यावर दबा धरून बसलेले सिगल्स आणि आम्ही यापैकी कुणालाही न जुमानता ते इवले इवले जीव अगदी इवली इवली पावलं टाकत, एकमेकांचा हात हातात धरून येत असल्यासारखे चालत येत होते... "पेग्विन परेड" हे नाव सार्थ करत होते... त्यांच्यासाठी माझा जीव तुटत होता... पण त्यांना पर्वा नव्हती... ओहोटी असल्यामुळे किनाऱ्यापासून टेकडी पर्यंतचं अंतर वाढलं होतं...

इवल्या पावलांनी हे आमच्यापर्यंत कधी पोचायचे असं म्हणता म्हणता पाच-सात मिनिटात पहिल्या तुकडीतले दोन जवान आमच्या पायाशी होते... एकदा टेकडीवरल्या झुडुपात शिरल्यावर सिगल्स ची काय भिती...? मग एकटं दुकटं जायला हरकत नाही...

दोन चाकरमाने संध्याकाळी ऑफिसातून घरी जावेत आणि जाताना एका चौकात "चला, भेटू उद्या" म्हणून एकमेकांना अच्छा करून चालू लागावं... अगदी तस्सं सगळं चालू होतं... मधेच एखादा त्यातला तरूण जवान कुतूहलाने आमच्याकडे बघून मग पुन्हा पायी चालू लागायचा... थोराड अनुभवी पेग्विन्सना मात्र माणूस इथे असणं हे नेहमीचंच झालं होतं... पाठीमागे हात घेऊन पायाखालची वाट बघत एखादे आजोबा झुलत-झुलत चालावेत अगदी तस्से हे पेग्विन्स चालतात... काय दिसणार? किती दिसणार? कुठे दिसणार? हे सगळे प्रश्न आता उरलेच नाहीत... चिक्कार जवान बिनदिक्कत आमच्यासमोर येऊन उभे ठाकत होते...

तो क्षण साक्षात्कारी ठरला... मी कोण त्यांच्यासाठी प्रार्थना करणारी...? त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करणारी? तो वर बसलाय... त्यांच्यासकट सगळ्यांचाच योगक्षेम वहायला तो समर्थ आहे... सिगल्स त्यांचं काम करतायत... पेग्विन्स त्यांचं घरी परतण्याचं... मी मात्र नगण्य, सूक्ष्म, खुजी... तो दाखवेल ते बघण्यापलिकडे काय आहे माझ्या हातात... ?

या क्षणी त्या प्रार्थनेतल्या ओळी आठवल्या "ईश जगाचा तू मी तव पदरज... मनोहर तुझी मूर्ती पहावया, लागी दिव्य दृष्टी देई मोरया..." डोळ्यांवाटे घळा घळा पाणी आणि ओठावर त्याचं नाव... ती प्रार्थना सगुणरूपाने माझ्या समोर ठाकली होती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! मस्त लिहीलय. प्रार्थनेचा साक्षात्कार आणि penguin परेड मधील अनुभव अगदी पोहोचला.
पहिल्यांदा penguin परेड बघायला गेलो होतों ते क्षण आठवले. अगदी अशीच घालमेल झाली होती.

फुला, अतिशय भिडलं हे. प्रार्थना म्हणणं रोजचं गं... पण अशी तुझ्याच भाषेत सांगायचं तर 'सगुण रुपाने' भेटणं, अनुभवणं हे दिवस सोनियाचा करून जातं...
गंमत म्हणजे एअक्दा का 'तो' दिवा लागला... की विझवता येत नाही.
हे असेच दिवे तुझ्या आयुष्यात लागोत... अगदी दिवाळी.

वा ! सुरेख . इतक मनोज्ञपणे लिहिलेय तुम्ही की हे ललित न राहता मनाला आरपार स्पर्शणार अस लिखाण झालेय. प्रत्यक्ष आपणच याचि देहि याचि डोळा हा अनुभव घेतला आहे अस फिलिंग आल वाचून .

फूल, सोमवारीच माझ्या घरमालकिण बाई आणि त्यांचा लेक मेलबोर्नवरुन परत आलेत. आणि तू जे काही लिहिले ते सांगत होते. पण, त्यांच्या सांगण्यापेक्षा तुझ्या लिहिण्यातून त्यांना काय म्हणायचे होते हे कळले.

खूप सुरेख लिहिले आहेस. अगदी तरल!!!

किती सुरेख लिहिलयस ग.....
खुप आवडलं

मी पण सेम सेम तुझ्यासारखीच बालोपासनेला जायचे....आज्ज्जी मागे लागायची म्हणून...आणि खाउ काय असेल असा विचार करत करत बालोपासना संपायची....

त्यानंतर कित्येक वर्षानी मला बाळ झाल्यावर...एक दिवस तिला झोके देताना अचानक मला बालोपासनेची आठवण झाली....सहज एक ओळ गुणगुणायला घेतली...आणि बघता बघता सगळी बालोपासना मनाच्या कप्प्यातुन अलगद बाहेर आली...

ज्ञानभास्करा शंतीसागरा, भक्तमनोहर मुकुण्दा,
परमौदारा भवभय्हारा,रखुमाईवरा ससुखकंदा
पाप ताप दुरीतादी हराया,तुची समर्थ यदुराया.
म्हणोनी तुजसी एकोभावे,शरण मी आलो यदुराया
कंठी निशिदिनी नाम वसो,चित्ते अखंड प्रेम ठसो.
शामसुंदरा सर्वकाळ मज्,तुझे सगुण रुप दिसो.
तु माउली मी लेकरु देवा,तु स्वामी मी चाकरु
तु पान मी तरुवरु देवा,तु धेनु मी वासरु.
तु पावन मी पतित देवा,तु दाता मी याचक.
तु फुल मी सुवास देवा,तु मालक मी सेवक.
तु गुळ मी गोडी देवा,तु धनुष्य मी बाण.
तु डोंगर मी चारा देवा,तु चंदन मी सहाण.
तु चंद्रमा मी चकोर देवा,मी कला तु पौर्णिमा.
तुझ्या वर्णनासी नाही सीमा,असा अगाध तुझा महिमा.
तु जल मी बर्फ देवातु सागर मी लहरी.
तुजवीण क्षण मज युगसम वाटो,हेची मागणे श्रीहरी.
वत्सा गाय बाळा माय, तेवी मजला तु आई.
काया वाचा मने सदोदित, तवपदी सेवा मज देइ.
ध्यास नसु दे विषयांचा मज, तुझ्या पाई मन सतत रमो.
द्रुढतर भावे तव गुण गाता, कोठे माझे मन न गमो.
अनण्त रुपा एकोभावे , करीतो अनंत नमस्कार.
दासपणाचे सुखसोहाळे, भोगवी प्रभो निरंतर.
नको मजवरी राहु उदास, धावत येइ यदुराया.
तव दर्शनेवीण दुजी न आस, धावत येइ यदुराय.

हा काय चमत्कार असेल....?
बालपणी मनात रुजलेल्या प्रार्थना कधी पुसुन जात नाहीत मनातुन...अशा कधीतरी नकळत बाहेर येतात...

खूप सुरेख लिहिलेय. मायलेकांच्या भेटीचा उल्लेख करताच पाणी तरळले ..

सगळ्यांचे मनापासून आभार... !! स्मिता... खरंच आहे गं... यालाच संस्कार म्हणायचे का? होच बहुतेक... त्यात माझा पिंडच सगळंच भिडवून घ्यायचा... त्यामुळे हे असं अचिंत्य, अव्यक्त, अमूर्त भेटत रहायचंच... हा पर्यायाने चमत्कारच... स्वत:च स्वत:ला भेटणं... निराळ्या अर्थाने... तुझ्या-माझ्या बाबतीत हे घडणं म्हणजेच दाद आत्ता सहज जाता जाता सांगून गेली... तशी दिवाळीच... मायबोली करांचे मनापासून आभार... ही दिवाळी माझ्यापुरती न राहता तुम्हा सगळ्यांसोबत साजरी करता येते...

खूप सुरेख लिहिलं आहेस. कुठल्या निसर्ग निर्मित वा मानव निर्मित प्रसंगांतही आपलं मन 'त्या'च्या अस्तित्वाची जाणिव राखतं तेव्हा समजून जावं की आपलं अनुसंधान 'त्या'च्याशी जोडलेलंच आहे, आईच्या गर्भात आपली नाळ आईशी जोडलेली असते तसं.

चिंतन अगदी मनस्वी Happy

Pages