मासिक भविष्य नोव्हेंबर २०१४

Submitted by पशुपति on 1 November, 2014 - 00:20

राशिभविष्य
नोव्हेंबर २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ नवम स्थानी, केतू बाराव्या स्थानी आणि बुध षष्ठ स्थानी असे ग्रहयोग आहेत. ह्यामुळे अनेक लोकांना परदेशगमन होण्याचे योग आहेत. शरीर प्रकृतीच्या दृष्टीने फारशी काळजी करण्याचे कारण नाही. धनस्थानाचा स्वामी शुक्र सप्तमात व राहू अष्टमात असल्याने ह्या महिन्यात खर्चाचे प्रमाण वाढते राहील असे दिसते. ह्याचा अर्थ असा की वर उल्लेखल्याप्रमाणे प्रवास हा मुख्यत्वे पर्यटन स्वरूपाचा राहील. तृतीय भावाचा स्वामी बुध षष्ठात उच्चीचा आणि नवम स्थानी मंगळ असल्याने लेखकांना हा काळ खूप चांगला नसला तरी बऱ्यापैकी आहे. तसेच पुस्तक विक्रेते, एजंट इ. व्यावसायिकांना उत्तम विक्रीचे समाधान मिळेल. चतुर्थात गुरु, बाराव्या स्थानी चंद्र आणि अष्टमात शनि ह्यामुळे घरासंबंधी बराच खर्च होण्याची शक्यता आहे. मुलांसंबंधी थोडीफार तक्रार राहण्याची शक्यता आहे. तसेच शेअर अगर तत्सम व्यवहार सध्यातरी लांबणीवर टाकावेत. सप्तमातील रवि-शुक्र कुटुंबात थोडीफार कुरबुर घडवून आणतील असे दिसते. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांबरोबर मिळतेजुळते घेणे श्रेयस्कर! एकंदरीत हा महिना संमिश्र असला तरी तणावपूर्ण न जाता हलकाफुलका जाईल.
वृषभ : वृषभ राशीचा शुक्र षष्ठात आणि राहू पंचमात असल्यामुळे शरीर प्रकृती उत्तम राहील, छोट्या छोट्या तक्रारींबद्दल काळजी करण्याचे कारण नाही. आर्थिक दृष्ट्या व्यवहार जपून करावेत. द्वितीयेश बुध पंचमात आणि मंगळ अष्टमात त्यामुळे अनाठायी खर्च होण्याची शक्यता बरीच आहे. महिन्याच्या सुरुवातीला चंद्र लाभात असल्याने जवळच्या नातेवाईकांची गाठभेट होईल. तृतीय स्थानातील गुरु आणि बुध पंचमात ह्यामुळे थोडेफार लिखाण होण्याची शक्यता आहे व ते प्रसिद्ध देखील होईल. ज्या लोकांना लिखाणाची आवड आहे, अश्यांनी कामाला लागायला हरकत नाही. मुलांच्या दृष्टीने घरगुती वातावरण उत्तम राहील असे दिसते. प्रथम, पंचम आणि नवम स्थानांचा जवळचा संबंध आल्यामुळे थोडीफार अध्यात्मिक प्रगती साधता येईल असे दिसते. सप्तमात शनि आणि तृतीयात गुरु कौटुंबिक बाबतीत थोडेफार चहाच्या पेल्यातील वादळाचे प्रसंग आणतील. (काही दिवस हॉट-टी ऐवजी आईस-टी प्यायल्यास वादळाला शमवता येऊ शकेल!!) नोकरी-व्यवसायात थोडेफार नमते घेणे सध्या उत्तम! एकुणात महिना संमिश्र स्वरूपाचा राहील.
मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध चतुर्थात, मंगळ सप्तमात आणि शनि षष्ठात हे योग शरीर प्रकृतीच्या दृष्टीने अस्वस्थता निर्माण करणारे आहेत. प्रत्यक्षात काहीही होत नसताना सतत आपल्याला काहीतरी होतेय असा मानसिक त्रास होण्याची शक्यता दिसते. द्वितीयातील गुरु आर्थिक परिस्थिती समाधानकारक ठेवेल. पंचम भावातील रवि-शुक्र मुलाबाळांच्या दृष्टीने समाधान देतील. काहींच्या बाबतीत जुन्या आजारांबाबत थोडीफार काळजी घ्यावी लागेल. सप्तमातील मंगळ कौटुंबिक बाबतीत वातावरण गरमागरम ठेवेल असे दिसते, त्यामुळे ‘मौनं सर्वार्थ साधनं!’ ही पॉलिसी ठेवणे उत्तम! अष्टमेश शनि षष्ठात आणि गुरु द्वितीयात काहींच्या बाबतीत आर्थिक चिंता ठेवतील, तरी पण वर लिहील्याप्रमाणे आवक मात्र समाधानकारक राहील. महिन्याच्या सुरुवातीला चंद्र दशमात व नंतर एकादशात गेला असताना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील.

कर्क : गुरु कर्क राशीतच असून तृतीयात बुध आहे. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांची भेट होण्याची बरीच शक्यता आहे. चतुर्थातील रवि आणि तृतीयातील राहू तुम्हाला छोटेमोठे प्रवास घडवून आणतील. चतुर्थातील रवि-शुक्र घरगुती बाबतीत बरेच लक्ष घालायला लावेल आणि ते तुम्ही आनंदाने कराल. लग्न स्थानात गुरु, त्याची दृष्टी पंचम भावावर आणि तिथेच शनि, ह्यामुळे ज्यांना धार्मिक गोष्टींमध्ये विशेष रस आहे, अश्यांना उत्तम काळ आहे. मुलाबाळांच्या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला आहे. षष्ठेश गुरु लग्नी, षष्ठात मंगळ हे ग्रहयोग प्रकृतीदृष्ट्या तितकेसे चांगले नाहीत, विशेषत: ज्यांना डायबेटीस किंवा उष्णतेचे त्रास आहेत, अश्यांनी विशेष काळजी घ्यावी. सप्तमेश शनि पंचमात आणि गुरु लग्नात त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. दशमेश मंगळ षष्ठात, केतू नवमात आणि बुध तृतीयात ह्यामुळे नोकरी अगर व्यवसाय असणाऱ्यांना ह्या महिन्यात छोटेमोठे बरेच प्रवास करावे लागतील. आर्थिक आवक सर्वसाधारणपणे ठीक राहील. एकुणात हा महिना बराच चांगला आहे.

सिंह : सिंह राशीच्या काही लोकांना ह्या महिन्यात प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार असे दिसते, कारण सिंह राशीचा रवि तृतीय स्थानी, राहू आणि बुध द्वितीय स्थानी आणि चंद्र अष्टम स्थानी अशी ग्रहस्थिती पहिल्या आठवड्यात त्रासदायक होईल असे दिसते. द्वितीय स्थानातील राहू-बुध, पंचमात मंगळ आर्थिक स्थिती सर्वसाधारण ठेवतील असे दिसते. ज्यांनी घर नवीन घेण्याचे ठरवले असेल अश्यांना काही बाबतीत विलंब होणे अगर त्रास होणे ह्या गोष्टींना चतुर्थातील शनि कारणीभूत होईल. विद्यार्थ्यांना अभ्यास बराच करावा लागेल अन्यथा परीक्षा अवघड जाण्याची शक्यता आहे. षष्ठेश शनि चतुर्थात, गुरु बाराव्या स्थानी आणि चंद्र अष्टमात कौटुंबिक स्वास्थ्य नरमगरम ठेवतील. दशमेश शुक्र तृतीयात आणि गुरु बाराव्या स्थानी नोकरी-व्यवसाय करणाऱ्या लोकांना कामासंबंधी प्रवास घडवून आणतील. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील असे दिसते.

कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध तुमच्या राशीतच आहे. मंगळ चतुर्थात आणि शनि तृतीयात त्यामुळे तुमचे सर्व लक्ष घरासंबंधी गोष्टींकडे आणि जवळचे नातेवाईक ह्यावर राहील. द्वितीय स्थानातील रवि-शुक्र आर्थिक आवक बऱ्यापैकी ठेवेल. तरीही घरगुती बाबी आणि नातेवाईक ह्यावर खर्चाचे प्रमाण वाढते राहील. मुलाबाळांची प्रकृती, शैक्षणिक प्रगती इ. समाधानकारक राहील. प्रकृतीची काळजी करण्याचे विशेष कारण राहणार नाही. कौटुंबिक समाधान मनासारखे राहील, वातावरण आनंदी राहील. दशमेश बुध लग्नी, मंगळ चतुर्थात व शनि तृतीयात ही ग्रहस्थिती नोकरी-व्यवसायात विशेष घडामोडी दाखवत नाही. लाभातील गुरु तुम्हाला आर्थिक आवक ह्यापेक्षा इतर समाधान जास्त मिळवून देईल. एकंदरीत हा महिना उत्तम राहील.
तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र तुळेतच आहे व रवि देखील तिथेच आहे. काही व्यक्तींना लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतील. शरीर प्रकृती देखील उत्तम राहील. शनि द्वितीयात, गुरु दशमात ह्या ग्रहस्थितीमुळे व्यवसायाच्या दृष्टीने चढ-उतार बघायला मिळतील. विशेषत: दुसरा आठवडा आवकेच्या दृष्टीने उत्तम राहील. तृतीयातील मंगळामुळे पुस्तक विक्रेते, पुस्तक लेखक इ. व्यावसायिकांसाठी उत्तम काळ आहे, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनाही हा काळ उत्तम आहे. मुलाबाळांच्या दृष्टीने काळजी करण्याचे कारण नाही. कौटुंबिक बाबतीत थोडीफार कुरबुर होण्याची शक्यता आहे. दशमातील गुरु नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम आहे. एकंदरीत महिना उत्तम राहील.

वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ द्वितीय स्थानी, केतू पंचम स्थानी व बुध लाभ स्थानी...हे ग्रहयोग ज्यांचा शेअर अगर तत्सम स्वरूपाचा आहे, त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या उत्तम आहेत. शनि लग्नी व गुरु नवम स्थानी काहींना लांबच्या प्रवासाचे योग घडवून आणणार असे दिसते. शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सर्व ग्रहयोग उत्तम आहेत. मुलाबाळांची एकंदर प्रगती समाधानकारक राहील. षष्ठेश मंगळ द्वितीयात असल्याने आर्थिक आवक चांगली राहील. कौटुंबिक दृष्ट्या ग्रहमान चांगले राहील. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. शनि लग्नी, केतू पंचमात आणि गुरु नवम स्थानी हे ग्रहयोग धार्मिक दृष्ट्या अतिशय उत्तम असल्याने धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. त्यामुळे मानसिक शांती मिळणार आहे. दशम भावात सिंह रास व त्याचा स्वामी रवि बाराव्या स्थानात व राहू लाभ स्थानी हे ग्रहयोग ज्यांची नोकरी परदेशात आहे अश्यांना उत्तम काळ आहे. इतर लोकांना देखील थोड्याफार फरकाने ह्या ग्रहस्थितीचे फायदे मिळतील. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.

धनु : धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात, बुध दशमात आणि केतू चतुर्थात त्यामुळे प्रकृतीच्या दृष्टीने थोडी काळजी घ्यावी लागेल. द्वितीयेश शनि बाराव्या स्थानी व गुरु अष्टम स्थानी त्यामुळे ह्या महिन्यात खर्चाचे प्रमाण जास्त राहील असे दिसते. लग्नी मंगळ, चतुर्थात केतू आणि दशमात बुध घरासंबंधी काही घडामोडी दाखवत आहे, ह्या घडामोडी तुमच्या दृष्टीने अनुकूल राहतील. मुलाबाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ समाधानकारक राहील. षष्ठेश शुक्र लाभात, राहू दशमात आणि मंगळ लग्नी त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या हा काळ लाभदायक आहे. कौटुंबिक दृष्ट्या हा महिना समाधानकारक राहील. दशमेश बुध दशमातच, मंगळ लग्नी व शनि बाराव्या स्थानी ह्या ग्रहस्थितीमुळे कामातील ताण बराच जाणवेल. लाभातील दोन ग्रह, रवि व शुक्र, हे तुम्हाला सर्व बाबतीत मनासारखे लाभ मिळवून देतील असे योग आहेत. एकंदरीत हा महिना सर्व बाबतीत उत्तम आहे.

मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात आणि गुरु सप्तमात त्यामुळे वैवाहिक जोडीदारामार्फत बरेच लाभ होण्याची शक्यता आहे. शरीर प्रकृती उत्तम राहील. द्वितीय स्थानातील स्वामी शनिच असल्यामुळे वरील विधानास पुष्टी मिळते. तृतीय स्थानातील चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात छोटे-मोठे प्रवास दाखवत आहे. पंचमेश शुक्र दशमात आणि गुरु सप्तमात, ह्या ग्रहस्थितीमुळे शेअर ब्रोकर असणाऱ्यांना उत्तम काळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी व खेळीमेळीचे राहील. दशमेश शिक्र दशमातच व रवि पण दशमात त्यामुळे नोकरी अगर व्यवसायाच्या दृष्टीने काळ उत्तम आहे. नोकरी करणाऱ्यांपैकी काहींना प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे. एकंदरीत हा महिना उत्तम आहे, मात्र वाहन चालवताना विशेष काळजी घेणे श्रेयस्कर!

कुंभ : कुंभेचा स्वामी शनि दशम स्थानी व गुरु षष्ठ स्थानी आहे. त्यामुळे नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. द्वितीयेश गुरु षष्ठात आणि बुध अष्टमात त्यामुळे प्रकृतीसंबंधी काही तक्रारी राहतील. तसेच खर्चाचे प्रमाण देखील जास्त होईल असे दिसते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ अभ्यास अगर अॅडमिशनच्या दृष्टीने चांगला आहे. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक दृष्ट्या थोड्याफार कुरबुरींना सामोरे जावे लागेल अशी शक्यता दिसते. दशमातील शनि व लाभातील मंगळ अनेक प्रकारचे लाभ मिळवून देतील. पण वर लिहिल्याप्रमाणे पैसे गुंतवताना अगर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे.

मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात असल्याने प्रकृती उत्तम राहील. तसेच बुध सप्तमात असल्याने ज्या तरुण मुला-मुलींचे प्रेमसंबंध असतील, त्यांचे लग्न जमण्याची शक्यता आहे. “आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” हा ग्रहांचा संदेश आहे. द्वितीयेश मंगळ दशमात, गुरु पंचमात आणि केतू लग्न स्थानी ही ग्रहस्थिती तुमच्या हाती काहीतरी चांगले काम घडवून आणणार असे दिसते, निदान पाया तरी रचला जाईल. व्यावसायिकांच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारण आहे. विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम आहे. षष्ठेश रवि अष्टमात व राहू सप्तमात त्यामुळे प्रकृतीच्या दृष्टीने काही किरकोळ कुरबुरी राहू शकतील, पण पंचमातील गुरु त्यांना आटोक्यात ठेवेल. सप्तमातील बुध कौटुंबिक वातावरण चांगले ठेवील असे सांगते, मात्र सप्तमातील राहू थोड्या कुरबुरी दाखवत आहे. त्यामुळे परिस्थिती संमिश्र राहील असे दिसते. लग्नातील केतू, पंचमातील गुरु आणि नवमातील शनि हे तीन ग्रह धार्मिक दृष्ट्या उत्तम आहेत. तरी ज्यांना ह्या गोष्टीची आवड आहे त्यांनी ह्या संधीचा जरूर लाभ घ्यावा. एकंदरीत हा महिना काही दृष्टीने उत्तम तर काही दृष्टीने संमिश्र आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नित्यनेमाने एक तारखेला मासिक भविष्याचा धागा पाहावयास मिळतो. धन्यवाद.

माझ्यासाठी बहुदा हे संपूर्ण वर्षच संमिश्र आहे Happy

MY Name is Minakshee jairaj Pillai before marriage Minakshee Prabhaker Vichare

Date of Birth 06/12/1975

Place: Ratnagiri

Now stay at Miraroad Thane

Can you suggest me some thing for better future

कर्क रशिचे भविश्य साडेसाती नसूनही साडेसाती असल्यासारखाच असत नेहमी,
Sad

नेहमी आपले प्रकृतीचे प्रॉब्लेम सुरूच असतात Proud