राधेचा बापू- १

Submitted by बागेश्री on 29 October, 2014 - 02:14

"......बापू, पुरे रे, अजून किती चालायचंय? .. मी दमले बापू"

"इतक्यात दमलीस, राधे?"

"खरंच दमले"

"आणि हे काय, खाली काय बसत्येस... अजून थोडे चाल, पोहोचू बघ, डोंगराचा कडा पार केलास ना की लागलीच येत्ये ती जागा"

ती हातातल्या वाळक्या काड्या फिरवीत म्हणाली, "बैस रे थोडा, मग जाऊ"

"राधे, अंधाराच्या आत पोहोचू गं"

"का रे, वाघराची भिती वाटत्ये"
इतकं बोलून ती खळाळ हसली, तो तिची शुभ्र दंतपंक्ती पहात राहिला...
तिची कित्येक रुपं त्याला भूरळ घालायची.
हे ही दमलं, भागलं, गवताच्या काडीशी उगाच चाळा करणारं रूप तो पहात राहिला.

राधेच्या येण्यानं किती बदलला होता बापू!
स्वतःच्या जीवनाबद्दल बेदरकार असणारा, जीवाचं काही मोल न करणारा बापू, राधा आल्यापासून स्वतःला जपू लागला होता.

दोघांची जीवन कहाणी खरेतर किती भिन्न.
तिचं एक प्रतल.
त्याचं निराळं!
दोन प्रतलावरचे दोन समांतर जीव.
एकमेकांसोबत असले की मोहरून जात,
जगाची तमा उरत नसे,
भूतकाळाची नसे.
तसाही बापू जगाला फाट्यावर मारतो
तिला जमत नाही त्याच्यासारखं. समाजाच्या धास्तीनं ती जमेल तसं त्याच्या प्रेमात जगते, तिला त्याच्याशिवाय हक्काचं कुणी नाही, त्याला सगळे आहेत पण जवळ कुणी करत नाही

"काय बघतोस बापू, अंधार पडेल बघ, सूर्य निघाला त्याच्या गावी, मला परतायला खूप उशीर करून जमणार नाही, चल. सपाटीवर जाऊन लवकर परतूया"

बापूने तिला हाताचा आधार दिला, तसे ते पुढे निघाले

कधीतरी न जानो, बापूने डोंगर कड्यापलीकडली एक जागा हेरून ठेवली होती, थोडी सपाट जागा, तिथून समुद्र थेट दिसतो.
बापूनं ती जागा सारवून घेतली होती. त्या सपाटीवर एकच झाड आहे. जगाला विटला की बापू तिथे जातो, ते झाड त्याच्यावर माया धरतं, राधेला भेट्णं शक्य नसतं तेव्हा बापू एकटा इथे येतो. झाडाखाली आडवा होतो..
रणरण उन्हातला चकाकता समुद्र त्यानं कित्येक वेळा इथून पाहिलाय. कधी पालथा पडून. कधी डोक्याला डाव्या हाताचा आधार देत एका कुशीवर वळून...
...समुद्राच्या खळाळ लाटांत त्याला राधेचं हसणं ऐकू येत राहतं.

"बापू, आलो की काय आपण, सूर्यपण टेकत आला!"

सपाटीची जागा जरा उंचावर होती, तिथे चढल्याशिवाय समुद्र दिसणारही नव्हता.
लाटांची गाज सर्वत्र भरून राहिली होती, पाणी अजून दिसलं नव्हतं. आज भरती होती.

एका ढांगेत तो वर चढला
त्याने हात देऊन तिला सपाटीवर घेतलं, ती पाण्याचं ते विशाल दर्शन घेऊन विश्रांत होत होती.

बापू त्या झगमगत्या पाण्याच्या लाटांवर लवलवणार्या बिंबाकडे एकटक पहात होता.
ती त्याच्याकडे पहात होती.
ह्याच्या मनाचा काहीच थांग लागत नाही, नेहमीसारखाच विचार करीत होती.
ही जागा किती सुंदर आहे, बापूला कशी सापडली असेल. इथे येईस्तोवर कुठूनच कसा समुद्र दिसत नाही? शेणानं किती एकसारखं सारवली आहे जागा, झाड किती बाळसेदार आहे इथलं!
आकाशाला टेकलेला समुद्र!
आकाशात घुसलेलं झाड!
आकाशाएवढा बापू!

कोण आपण! बापूनं जीव टाकला म्हणून जगणं जगणारे.. नाहीतर काय अर्थ होता?
म्हातार्‍या नवर्‍याच्या गळ्यात मारून माय बापानी पैसा केला...
काय हे? समोर अस्ताला जाणारा सूर्य, शेजारी बापू उभा असता कुठलं दु:ख घोळीत बसलो आहोत?
आताचं केशरी, गुलाबी आकाश काळसर दिसतंय!
पाण्यावर गडद रंग उतरतोय.

"आठवतं राधे?, फार पूर्वी तात्यापाशी बोलली होतीस, तुला अंधारातला समुद्र पहायचाय. दुसर्‍यादिवशी तुझं अंग सुजलं होतं!"

राधा काही बोलली नाही.
ती हे तात्याशी बोलताना बापू आसपास असावा, हे तिला ध्यानीही नव्हतं, ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची होती. आज तिची इच्छा पूर्ण करायला बापू तिला इथे घेऊन आला होता!!
ती फक्त स्तिमीत होऊन समोर उधाणणारा समुद्र पहात उभी होती.

आपल्यापेक्षा कमी यत्ता शिकलेला बापू, मनानं किती सुधारलेला आहे. प्रेम करण्याची ही कला त्याला जमली कशी. तात्याच्या तावडीत बापू अडकला त्याच्या बापामूळे, त्यानं तात्याकडून कर्ज घेतलं नि बापू आपल्या घरी राबून कर्ज फेडतो.. सगळंच अजीब आहे.
तात्या अंथरूणाला खिळलाय.
मी समुद्र बघतेय.

जोवर तात्या हिंडत फिरत होता, बेदम मारलंय त्यानं आपल्याला. अंगात रग होती, तोवर भोगलं. वयानं ताकद नेली तेव्हापासून अस्सा झोडतो, बापूनं वाचवलंय कितीदा. आता जगायला शिकवतोय.

"राधा, ते जहाज बघ, व्यापारी अहे, उद्या मीही असा जाईन, पैसा पैसा कशाला म्हणतात राधा? बापामूळं अडकलो, ह्यावर्षी पीक भारी आलंय, तात्याचं कर्ज फेडीन, स्वतःच्या जीवावर पैसा करीन"

त्याचा त्वेषानं फुललेला चेहरा तिनं पाहिला....
सूर्य कधीच परगावी गेला होता, लख्ख चादणं, पूर्ण बिंबाखाली बापूचा निर्धारी चेहरा तिला मोहक वाटला.
त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं!
चंद्र आकर्षक की राधा, त्याला कळेना.
तिकडे सागर उचंबळत होता
इथे बापू!
ती निर्विकार...
तिच्या चेहर्‍यावर प्रेम, करूणा, उपकृत असल्याच्या भावनेनं गोंधळ घातला होता

"राधे, बघ... हाच समुद्र तुला पहायचा होता ना... त्याचं चकाकणं बघ... फक्त लाटा फुटताना दिसतील, ती चमक बघ, नको जाणायचा प्रयत्न करूस, आत खोल काय काय आहे... आत तो शांत असेल, वरची तगमग दिसत्ये आपल्याला, पोटात गूढ असतो तो"

राधा एकटक लाटांची चमक निरखीत होती.
ही शांतता, हे समाधान तिने कित्येक वर्षांत पाहिलं नव्हतं!

दोघं आपापल्या विचारात गढली होती.
समुद्राचा खारा वारा आसपास वाहत होता.
मन शांत होत होती

बापूचं विचारचक्र वेगानं फिरत होतं! भविष्य त्याला साद घालत होत!
राधा ह्या क्षणाने तृप्त झाली होती.

"राधे, जाऊया. उशीर होतोय. वैद्याकडून तात्याचं औषध न्यायचंय"

"तू खरेच जाशील बापू? कर्ज फिटलं की?"

"जाईन राधे, कुणाची चाकरी करायला हा बापू जन्माला आला नाहीए, काळजी फक्त तुझी वाटत्ये. खूप पैसा करीन, तेव्हा तुला घेऊन जाईन, तोवर तू तग धर"

"मला नको कुठली श्रीमंती बापू, भाकरी घाऊन सुखी राहीन, पण आता सोसवत नाही"

"असं कसं म्हणतेस राधा, पोटाला प्रेम पुरत नसतं"

त्याने आधार देऊन तिला सपाटीवरून खाली उतरवून घेतलं!

दोघेही डोंगर उतरून जात राहिली.
शांत!

तिच्या सौभाग्यकांकणांचा वगळता कुठलाच आवाज त्या परिसरात नव्हता.

-बागेश्री

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!!

शलाका
तुमची कमेंट म्हणजे दिलखुश! Happy

Actually ही सलग कथा लिहीणार नाही आहे
अनेक गोष्टी प्रसंगांची मालिका लिहून ते सांधेन

Trying something different Happy

प्रतिसादासाठी धन्यवाद दोस्तांनो!

Chaan
Bhaavanache chitran chaan zaley... wyaktirekhanchi background masta utaraliye ata prasang yeu dyaa..

अतिशय सुंदर सुरवात झाली आहे कादंबरीला. राधेची वेदना हृदय पिळवटून टाकते. पुढे काय होणार याची उत्सुकता मोठी आहे.