कचरा

Submitted by बेफ़िकीर on 18 October, 2014 - 11:10

"मिहिर, तुझे वडील म्हणून मला त्यांच्याबद्दल आदरच आहे. विपरीत परिस्थितीत त्यांनी तुला शिकवले आणि तूही मन लावून शिकलास! गव्हर्नमेंट ऑफीसर झाला आहेस. तुझी आई तुझ्या लहानपणीच गेली. तुझ्या वडिलांनीच तुला वाढवले. सगळं मान्य! इतकंच काय, आम्ही जातपातही पाळत नाही. आम्ही शहा! तू वाघोले! आपले समाजच वेगळे! पण त्याचंही काही नाही. पण...... लग्नासारख्या बाबतीत काही संकेत पाळायचेच असतात मिहिर! ते आपल्यासाठी नसतात. ते इतरांसाठी पाळावे लागतात."

बानू शहांच्या घरी सगळे बसलेले होते. स्वतः सत्तरीचे बानू शहा! त्यांचे एक दुकान होते होलसेल धान्याचे! बर्‍यापैकी पैसा येत होता. फार काही श्रीमंत नाही म्हणता येणार, पण मिहिरच्या घरच्यांच्या तुलनेत कुठल्याकुठे! बानूंची पत्नी शैला शहा तिथेच जमीनीकडे पाहात बसली होती. त्यांच्या चेहर्‍यावर ताण होता. बानूंचा मुलगा नरेश तसा लहान होता. अठरा वर्षाम्चा! पण ह्या चर्चेत त्याला कोणी 'तू बाहेर जा' असे म्हणालेले नव्हते.

बानूंची मुलगी सेजल आईशेजारी बसली होती. तिच्याही चेहर्‍यावर ताण होता. पण तो ताण वेगळ्या कारणाने होता. बाबांच्या बोलण्याने मिहिर दुखावला तर जाणार नाही ना असे तिला वाटत होते. पण मिहिर शांत वाटत होता. खरे तर त्याला बानूंचे म्हणणे पटत असावे असेच दिसत होते.

प्रश्न शेवटी मिहिर आणि सेजलच्या लग्नाचा होता. लग्न ठरलेलेच होते. पण लग्न रजिस्टर्ड करावे असे बानूंचे म्हणणे होते. मिहिरचे म्हणणे होते की त्याच्या वडिलांनी आजवर खूप माणसे जोडली. त्या त्या माणसांनी वडिलांच्या पडत्या काळात खूप मदत केलेली होती. आता अचानक मिहिर शासकीय अधिकारी होऊन एका चांगल्या आर्थिक परिस्थितीतील घराचा जावई होणार म्हंटल्यावर मिहिरच्या वडिलांनी ठरवले होते की जमवलेला पै पैका लग्नात उधळून टाकायचा. सगळ्या मदतकर्‍यांना बोलवायचे. गोडधोड खाऊ घालायचे आग्रहाने! प्रत्येकाच्या पाया पडायचे. नवदांपत्याला प्रत्येकाच्या पाया पडायला लावायचे. प्रत्येकाने काय काय केले हे सगळ्यांसमोर सांगायचे.

पण!

पण ह्या सगळ्याला बानू शहा व कुटुंबियांचा विरोध होता. विरोध ह्यासाठी नव्हता की खर्च करायची तयारी नव्हती. दसपट खर्च केला असता. विरोध ह्यासाठीही नव्हता की लग्नात केलेला असा वायफळ खर्च कोणाच्याच फायद्याचा नसतो.

विरोध ह्यासाठी होता की मिहिरचे वडील एक...... एक कचरा उचलणारे व्यक्तीमत्व होते.

ज्या भागात त्यांना कचरापेटीतील कचरा फावड्याने उचलून डंपरमध्ये टाकण्याचे काम मिळालेले होते त्याच भागात एक खोपटे बांधून ते कैक वर्षे राहात होते. आजूबाजूच्या लोकांना आठवत होते तेव्हापासून त्यांची पत्नी त्या खोपट्यात एक दोन वर्षे राहून परलोकवासी झाली होती. तेव्हा मिहिर खूप लहान होता. हा मनुष्य येथे राहायला आल्याला दोन वर्षे झाली आणि आता त्याची बायको गेली इतकेच आजूबाजूच्यांना समजलेले होते. कपाळाला हात लावून बसलेल्या मिहिरच्या वडिलांकडे आणि रडक्या मिहिरकडे बघून कोणीतरी पैसे जमा केले, अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली आणि मिहिरच्या आईचा देह स्मशानात नेला. तेव्हाही मिहिरचे वडील रडले नाहीत. तो माणूस स्मशानातसुद्धा गेला नाही. त्याला स्मशानात जायचा आग्रह करणार्‍यांना म्हणाला माझ्या बायकोच्या प्रेताला मी प्रेत मानू लागलो हे कसे आवडेल? अवाक झालेले लोक स्वतःच त्याच्या बायकोचा अंतिम संस्कार करून परतले तेव्हा मिहिरचे वडील मिहिरला मांडीत घेऊन बाटलीने दूध पाजत होते. जणू काही घडलेच नाही.

शिक्षणाचा गंधही नसलेल्या त्या माणसाची स्वप्नेही कचर्‍याशीच संबंधीत होती. उद्या कचरा जरा कमी पडावा, उद्याच्या कचर्‍यात चुकून एखादा फाटका शर्ट मिळावा, उद्याच्या कचर्‍यात फारशी घाण असू नये! असली स्वप्ने! आजूबाजूच्या सोसायट्यांमधील अनेक उदार नागरिकांनी त्यांना भरीस पाडून आणि आर्थिक मदत करून मिहिरला शिकवायला लावले होते. मिहिरचे शिक्षण इतरांच्या सहाय्याने का होईनात पण होऊ देणे हा एक भाग सोडला तर मिहिरच्या वडिलांनी आयुष्यात कोणतेही भरीव कार्य केलेले नव्हते. मिहिरचा ना जन्मदाखला होता ना जन्मतारीख ज्ञात होती. कोणाच्यातरी किरकोळ वशिल्याने किरकोळ शाळेत शिकलेला मिहिर नंतर किरकोळ कामे करून किरकोळ कमाई करत पुढचे शिक्षण घेत राहू लागला.

मिहिरच्या वडिलांचे विश्व अजब होते.

सकाळी मिहिर उठायच्या आधी ते उठलेले असायचे. देव ह्या संज्ञेवर त्यांचा विश्वास नव्हता. उठल्यावर तांब्याभर पाणी पोटात ढकलायचे आणि दुसरा तांब्या घेऊन मागच्या आवारात जायचे. प्रातर्विधी उरकून आले की बिनदुधाचा चहा! एकीकडे मिहिरला हाका! तो आळसटून उठला की त्याचा चहा! त्याचे तोच आवरायचा आणि शाळेला पळायचा! एकदाचा तो शाळेला गेला की मिहिरच्या वडिलांना कचर्‍याचे विश्व खुणावू लागायचे. पटकन् पायजमा बनियन घालून फावडे घेऊन ते कचरापेटीपाशी जायचे. डंपर साडे आठ वाजता येणार असला तरी मिहिरचे वडील सात वाजताच कचरापेटीपाशी असायचे. झोपडपट्टीतल्या बायका काहीबाही आणून त्या कचरापेटीत अजूनही टाकत असायच्या. मिहिरच्या वडिलांना आश्चर्य ह्याचे वाटायचे की ह्या वस्तीतून एवढा कचरा निर्माण तरी कसा होतो? मटणाचे तुकडे, कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या, भाजीची देठं हे नेहमीचंच! पण अनेक वस्तू, जुने कपडे, काय काय! आपल्या घरात विशेष कचरा कसा काय निर्माण होत नाही ह्याचे त्यांना आश्चर्य वाटायचे. मग तो सगळा काल सायंकाळपासूनचा कचरा ते अभ्यासू नजरेने फावड्याने फिस्कटायचे.

काय नसायचे त्यात?

एक अख्खी संस्कृती मिळायची त्या कचर्‍यात! जग कुठे पोचलेले आहे हे कळायचे. काल हव्याश्या असलेल्या वस्तू आज नकोश्या होतात हे तत्वज्ञान अंगी मुरायचे. आजूबाजूने कुत्री आणि वरून कावळे घोंघावत असायचे. मिहिरचे वडील आणि त्या सगळ्यांच्यात कोणालाच फरक जाणवायचा नाही. नको असलेल्या गोष्टींची संख्याच जर इतकी असेल तर हव्या असलेल्या गोष्टींची संख्या किती असेल असा विचार करत मिहिरचे वडील कचर्‍यात उलथापालथ करत बसायचे. दहा पंधरा मिनिटांनंतर एका बाजूला एक अश्या वस्तूंचा ढीग जमा व्हायचा, ज्यांच्यावर थोडासा खर्च केला तर त्या वस्तू वापरताही येतील. मिहिरच्या शाळेची दोन दप्तरे, तीन वॉटरबॅग्ज, एक पाठकोरी वही, दहा रंगीबेरंगी शर्ट, सहा हाफचड्ड्या, स्वतःसाठी एक चांगली काठी, दोन घाणेरड्या अंडरवेअर्स, अनेक लिंबू मिरचीचे जोड, दारूचे थेंब उरलेल्या बाटल्या आणि तीनवेळा तुटक्या चपला, इतके सगळे निव्वळ वर्षभरात मिळाले होते.

मिहिरचे वडील मिश्कील होते. मिहिर घरी आला की म्हणायचे. 'लय दमून आलास रं, घ्ये, पानी पी ह्या बाल्टीतून'! हरखलेला मिहिर कोणीतरी फेकलेल्या आणि आता स्वच्छ धुतलेल्या वॉटरबॅगमधले पाणी पिऊन त्यातल्यात्यात बर्‍या भाषेत बोलायचा. "बाबा, लई करतोस तू, मोठ्ठा झालो ना, की काम न्हाय करू द्येनार तुला"!

दोघेही खदाखदा हसायचे. 'मोठा झालो की'! आपण मोठे झाल्यावर काय होणार, काय करणार ह्याच्या अनंत योजना असतात! मिहिरची योजना होती बापाला कचरा ह्या क्षेत्रापासून दूर न्यायचे. आणि नशीब असे होते की मिहिरच्या बापाला आता अजिबात त्या क्षेत्रात जायची गरज नसली तरी रोज सकाळी मिहिरचा बाप उगाचच कचरापेटीपाशी जाऊन उभा राहायचा. मिहिरचे आणि त्याचे वाद झाले की म्हणायचा. "आरं सम्द जग कचरा हाये, हितं उभार्लो कायन् थितं उभार्लो काय"! पुन्हा दोघे खदाखदा हसायचे.

मिहिरला मिळालेली नोकरी हे जगातले एक आश्चर्य होते. आरक्षणाशिवाय मिळाली नव्हती, आरक्षणाचा फायदा घेतला होता, पण वकूबही सिद्ध केला होता.

एकदा मात्र गंभीर वाद झाले. सेजलला मिहिर आवडला, मिहिरला ती आवडली. घरच्यांचा विरोध उडवून लावत सेजलने पळून जाऊन लग्न करेन अशी धमकी दिली. परिणामतः बानूंनी लग्नाला परवानगी दिली आणि एक अट घातली. मिहिरच्या वडिलांचा लग्नावर कोणताही प्रभाव असता कामा नये. ही अट सेजलने मिहिरला सांगितली. मिहिरला काही वेळ वाईट वाटले पण ते त्याने बापाच्या कानावर घातले. मिहिरचा बाप विरळा निघाला! म्हणाला......

"आई घाल म्हनाव त्याला तुझ्या प्वारीला घ्यून! मी नगं आसंन तर झाट लगन होयाचं नाय"

मग मात्र पेटलं! मिहिरने बापाला आईबहिणीवरून शिव्या घातल्या. इतकी वेळ आली की घर सोडून जातो म्हणाला. अर्थात ते घर मिहिरने स्वतःच घेतलेले होते, त्यामुळे घर सोडून जायची वेळ आलीच तर ती आपल्यावर येणार हे बापाला समजले. तरी बाप नरमेना! शेवटी मिहिर म्हणाला संबंधच सोडेन! मग त्याचा बाप त्याला म्हणाला......

"आई घाल त्या प्वारीसंगं! तू माझा प्वारगा हाय्स, तुझ्या लगनात काय धिंगाना घालायचा तो मी घालंन"

ही बातमी घेऊन मिहिर सासुरवाडीला पोचला आणि मग ही मीटिंग झाली. मीटिंगमध्ये बानूंनी मिहिरला सगळे नीट समजावून सांगितले. मिहिरला ते न पटणे शक्यच नव्हते. निव्वळ एकमेकांना आवडणे ह्या निकषावर दोन विरुद्ध धृवांचे लग्न मान्य झालेले होते. फक्त अट इतकीच होती की लग्न रजिस्टर्ड करायचे आणि रिसेप्शनला सगळ्यांना बोलवायचे पण......

...... मिहिरच्या वडिलांना नाही!

मिहिरला कल्पनाही नव्हती की असा काही प्रकार होईल हे सगळे बापाला सांगितल्यावर!

बापाने सगळे काही शांतपणे ऐकून घेतले. मग पडताळावरच्या डब्यातून थोडी कॅश हाताला लागली ती बंडीत सारली. बाहेर पडला आणि गुत्त्यावर गेला. परत आलाच नाही. मिहिर दार कलते ठेवूनच निजला. चोराचिलटाचे भय नव्हतेच.

इकडे मिहिरचा बाप शहांच्या घरासमोर आला आणि त्या वस्तीत कोणी सात पिढ्यांत ऐकल्या नसतील त्या शिव्या घातल्या. सेजलचा मुलगा काठी हातात घेऊन बाहेर आला तर मिहिरच्या बापाने त्याच्या पोटात एकच लाथ घातली. ते पोरगं उन्मळून पडलं जागच्याजागी! ही धावाधाव! पोलिस कंप्लेंट! तिकडे मिहिरला फोनवर फोन! तोही धावला. शासकीय कर्मचारी म्हणून त्याचे म्हणणे आधी ऐकून घेण्यात आले.

पण व्हायचे तेच झाले.

कोणतेही रेकॉर्ड दाखल न करून चौकीवरच्यांनी सेटलमेंटचे बक्षीस मागीतले. मिहिरने ते देऊ केले. बापाला म्हणाला चल घरी, तर बाप म्हणतो मस्नात ग्येलं तुझं घर! निघाला एकटाच रस्त्याने! बानूंनी त्याच्यादेखत मिहिरला सांगितलं!

"मिहिर, तुझे वडील हे असे नसते ना? तर मीहून लाख्खो रुपये खर्चून तुमचं लग्न लावून दिलं असतं! पण काय आहे ना? कचर्‍यात काम केलेल्या माणसाची नीयत आहे ती! ज्यामुळे आमच्या सात पिढ्यांचा उद्धार आम्हाला आज पहिल्यांदाच ऐकून घ्यावा लागला. अरे अश्या माणसाचे मी काहीही घेतले नसते मिहिर? काहीही घेतले नसते? जो माणूस कचर्‍यात राहून कचर्‍यापेक्षाही किळसवाणा झाला आहे ना, त्याचे मी काहीही घेतले नसते! फक्त ही......ही सेजल म्हणाली म्हणून"

मिहिरचा बाप शिव्या देत मागे वळला आणि म्हणाला......

"मग लगन बी करू नकोस रं दोघांचं! ह्यं प्वारगं बी कचर्‍यातच घावलव्तं! "

=======================================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलीय गोष्ट. शेवटचा ट्वीस्ट अन्प्रेडीक्टेबल होता.

सेजलचा मुलगा काठी हातात घेऊन बाहेर आला >> सेजल ही मिहीरची होणारी बायको ना? मग 'सेजलचा मुलगा' ही काय भानगड? ते सेजलचा बाप असे पाहिजे ना? दुरुस्ती झाल्यावर माझा प्रतिसाद संपादित करेन.

"बानूंचा मुलगा नरेश तसा लहान होता. अठरा वर्षाम्चा! पण ह्या चर्चेत त्याला कोणी 'तू बाहेर जा' असे म्हणालेले नव्हते. "
हा शेजल चा भाऊ असावा

कथा एकदम सुरेख बेफि..
"नको असलेल्या गोष्टींची संख्याच जर इतकी असेल तर हव्या असलेल्या गोष्टींची संख्या किती असेल असा विचार करत मिहिरचे वडील कचर्‍यात उलथापालथ करत बसायचे."
एकदम मस्त!

टोचा | 28 October, 2014 - 12:23 नवीन
बाप कचरा वेचत होता हे कळल्यावरच मिहीर त्याला कचर्‍यात सापडला हे कळले होते.

>> +१