आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १३

Submitted by स्पार्टाकस on 6 October, 2014 - 23:53

३ फेब्रुवारी १९०६ ला अ‍ॅमंडसेनने ईगल सिटीतून पुन्हा उत्तरेचा मार्ग धरला. नॉर्वेतून आणि अमेरीकेच्या इतर भागातून सर्वांच्या नावाने आलेली पत्रं आणि विविध वृत्तपत्रं त्याच्यापाशी होती! फोर्ट युकून इथे पोहोचल्यावर जॅक कारने त्याला तीन दिवस आपल्या घरी ठेवून घेतलं. फोर्ट युकूनलाच अ‍ॅमंडसेनची जिमी आणि कापा यांच्याशी पुन्हा गाठ पडली. पोर्क्युपाईन नदीवरील वसाहतीत इंग्लिश व्यापारी डॅनीयल कॅडझॉव्ह याच्याशी अ‍ॅमंडसेनची गाठ पडली. तिथे आठवडाभर विश्रांती घेऊन अ‍ॅमंडसेनने पुढची वाट धरली आणि मजल - दरमजल करीत अखेर २८ फेब्रुवारीला अ‍ॅमंडसेन हर्शेल बेटावर येऊन पोहोचला!

अ‍ॅमंडसेन फोर्ट युकून इथे गेल्यावर ग्जो ची सर्व जबाबदारी लेफ्टनंट गॉडफ्रे हॅन्सनवर होती. स्टेनने आपला एस्कीमो कुनक याला मॅकेंझी नदीच्या परिसरात मुबलक आढळणार्‍या एल्कच्या शिकारीसाठी पाठवलं होतं. दर तीन दिवसांनी तो एल्कच्या मांसाने भरलेली स्लेज किंग पॉईंटला पाठवत असे. स्टेनकडून अर्थात ग्जो वरील सर्वांना याचा वाटा मिळत असे. किंग पॉईंट इथे आलेल्या इतर एस्कीमोंकडूनही अनेकदा हॅन्सन एल्कचं मांस विकत घेत असे.

डिसेंबरच्या आसपास आलेल्या जोरदार हिमवादळाने सर्वांची दाणादाण उडवली होती. सुदैवानेच कोणालाही प्राणघातक अपाय झाला नाही, तरी वाट चुकून भलत्याच दिशेला पोहोचण्याचे अनेक प्रकार घडले होते! एका रात्री ग्जो जहाजावरुन निघालेला मन्नी आपल्या सहकार्‍यांच्या घरी जाण्याऐवजी स्टेनच्या घरी जाऊन पोहोचला होता! स्वतः हॅन्सन ग्जो वर परत येण्याऐवजी बोनान्झावर जाऊन धडकला! विल्कचं चुंबकीय निरीक्षणांच्या नोंदीचं काम मात्रं कोणत्याही अडथळ्याविना सुरु होतं!

१ मार्च १९०६ च्या सकाळी किंग पॉईंट इथे एक स्लेज येऊन धडकली. या स्लेजवर दोन एस्कीमो होते. ही स्लेज सर्वांसाठी पत्रव्यवहार घेऊन आली होती!

पत्रं!

प्रत्येकाने हातातलं काम टाकून स्लेजच्या दिशेने धाव घेतली. रॉयल नॉर्थ वेस्ट माऊंटेड पोलीसांच्या तुकडीबरोबर अ‍ॅमंडसेनने ही सर्व पत्रं लवकर पुढे पाठवण्याची व्यवस्था केली होती! त्याचबरोबर आपल्या सहकार्‍यांना चिठ्ठी लिहीण्यास अ‍ॅमंडसेन विसरला नव्हता. नॉर्वेतील आपल्या घरुन आलेली पत्रं कुठे ठेऊ आणि कुठे नाही असंच सर्वांना झालं होतं!

१२ मार्चला संध्याकाळी ६ वाजता अ‍ॅमंडसेन ग्जो वर पोहोचला!
फोर्ट युकून इथली आपली टपालमोहीम यशस्वीपणे पार पाडून तो परतला होता!

काही दिवसांपासून रिझवेल्टच्या डोळ्यात धुळीचा एक कण शिरला होता. हरप्रयत्नाने तो कण निघत नव्हता. सतत डोळ्यात खुपणार्‍या त्या कणावर इलाज करण्यासाठी अखेर रिझवेल्टने एस्कीमो जिमीसह हर्शेल बेटाची वाट धरली. कॅप्टन टिल्टॉनच्या अलेक्झांडर जहाजावर असलेल्या डॉक्टरकडून या समस्येवर उपचार करुन घेण्याचा रिझवेल्टचा बेत होता. १८ मार्चला तो ग्जो वर परतला तेव्हा डोळ्याच्या त्रासापासून त्याची सुटका झालेली होती!

वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच अ‍ॅमंडसेनने आपल्याजवळ असलेले सर्व जीवशास्त्रीय नमुने आणि वेगवेगळ्या प्राण्यांची कातडी बाहेर काढली. सूर्यप्रकाशात हे सर्व पुन्हा वाळवण्याचा त्याचा बेत होता. त्या दृष्टीने किंग पॉईंट इथे असलेल्या टेकडीच्या माथ्यावर एक प्रशस्तं घर बांधण्याची तयारी सुरु होती. २२ मार्चला प्रथमच तापमान ० अंश सेल्सीयसपार गेल्यावर ही सर्व सामग्री टेकडीच्या माथ्यावर नेण्यात आली!

हॅन्सन जोडगोळी शिकारीच्या मोहीमेवर निघाली. आर्क्टीक सोडेपर्यंत मांस पुरेल इतक्या संख्येने प्राण्यांची शिकार करण्याचा त्यांचा इरादा होता! त्यांच्या बरोबर दोन एस्कीमोही होते!

काही दिवसांपासून विल्कची तब्येत बिघडली होती. आपलं पोट बिघडल्याची तो वारंवार तक्रार करत होता. २६ मार्चला त्याला पोटात उजव्या बाजूला जोरात कळा येऊ लागल्या! अ‍ॅमंडसेनने दिलेल्या औषधाने त्याला काही वेळ उतार पडला असला तरी दुसर्‍या दिवशी पुन्हा त्याला त्रास होऊ लागला. आपल्याला पूर्वी प्लूरसी झाल्याचं त्याने अ‍ॅमंडसेनला सांगितल्यावर त्याने प्लूरसीवरील उपचारांना सुरवात केली. विल्कच्या पोटाभोवती त्याने शरीर गार ठेवणारं बँडेज गुंडाळलं. याचा परिणाम म्हणून विल्कला रात्रभर गाढ झोप लागली!

२८ मार्चच्या सकाळी विल्क नेहमीसारखाच ताजातवाना आणि हसतमुख असल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु त्यांचा हा आनंद अल्पायुषीच ठरला! दुपारी पुन्हा विल्कच्या पोटातून कळा येऊ लागल्या. अ‍ॅमंडसेनने बँडेज काढून त्या जागी मोहरीचं प्लॅस्टर लावलं. एव्हाना विल्कला १०३ ताप चढला होता!

ग्जो जहाज आणि किनार्‍यावरील आपल्या सहकार्‍यांमध्ये संदेशवहनासाठी अ‍ॅमंडसेनने इलेक्ट्रीक बेल बसवली होती. २९ मार्चच्या पहाटे चार वाजता ही बेल वाजल्यावर अ‍ॅमंडसेन शक्य तितक्या घाईने किनार्‍यावर गेला. कळांची तीव्रता आणखीनच वाढीस लागली होती! त्यातच विल्कच्या पोटाचा उजवा भाग आता सुजला होता! अ‍ॅमंडसेनने प्लास्टर काढून आता त्याजागी मोहरी एका पिशवीत भरुन विल्कच्या पोटाला बांधली. विल्कचा ताप अद्यापही १०३ च होता!

सकाळी दहाच्या सुमारास विल्कची तब्येत बरीच सुधारली होती. त्याला शांत झोप लागली होती. पोटात उसळणार्‍या कळा शांत झाल्या होत्या. अ‍ॅमंडसेनने त्याला तापाचं औषध दिलं. दुपारी त्याचा ताप १०२ पर्यंत खाली आला. जेवण करुन तो शांतपणे विश्रांती घेत पडून होता. रात्री ९ च्या सुमाराला त्याचा ताप १०१ पर्यंत खाली आला होता!

३० मार्चला विल्कची तब्येत अधिक सुधारत असल्याचं अ‍ॅमंडसेनला आढळून आलं. संध्याकाळपर्यंत त्याचा ताप १०० च्याही खाली आला होता. रात्रीचं जेवण घेऊन विल्क लवकरच झोपेच्या अधीन झाला होता.

३१ मार्चच्या सकाळी अ‍ॅमंडसेन विल्कला तपासण्यासाठी किनार्‍यावर गेला तेव्हा विल्क पूर्वीपेक्षा तंदुरुस्त आढळेल अशी त्याची अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने त्याची ही अपेक्षा फोल ठरली!

आदल्या रात्री उशीरा विल्कला अचानक हीव भरलं होतं! जोरदार थंडीने तो थडथड उडत होता. त्याच्याबरोबर असलेल्या लिंडस्ट्रॉमने उपलब्धं असलेली सर्व कातडी विल्कच्या अंगावर पांघरली. परंतु विल्कची थंडी काही केल्या कमी होईना! अखेर लिंडस्ट्रॉम स्वतः विल्कच्या देहावर झोपला तेव्हा त्याची थंडी कमी झाली. लिंडस्ट्रॉमने मग सरळ शेकोटी पेटवली. खोलीतील हवामान उबदार राहण्यास त्यामुळे मदत होणार होती.

विल्कची ही अवस्था असताना बाहेर जोरदार हिमवादळ सुरु होतं! त्यामुळे इलेक्ट्रीक बेल न वाजवण्याचा लिंडस्ट्रॉमने निर्णय घेतला होता. त्या परिस्थितीत त्याचा हा निर्णय योग्यच होता!

विल्कचा ताप १०२ पर्यंत वाढला होता. सकाळी ११ च्या सुमाराला त्याचा ताप १०१.५ पर्यंत खाली उतरला परंतु एका गोष्टीने मात्रं अ‍ॅमंडसेन सतर्क झाला.

विल्कच्या हाताच्या नाडीचे ठोके अनियमीत झाले होते!

अ‍ॅमंडसेनने ताबडतोब एस्कीमो जिमीला हर्शेल बेटावर असलेल्या अलेक्झांडर जहाजावरील डॉक्टरला घेऊन येण्यासाठी निघण्याची सूचना केली. परंतु बाहेर हिमवादळाचं थैमान इतकं जोरात सुरु होतं, की हर्शेल बेटाच्या दिशेने प्रस्थान करणं म्हणजे आत्महत्याच होती. जिमीने पहाटे २ वाजेपर्यंत वादळाचा जोर कमी होण्याची वाट पाहण्याचं ठरवलं. अ‍ॅमंडसेनने कॅप्टन टिल्टॉनच्या नावाने एक चिठ्ठी लिहीली. त्यात त्याने विल्कची अवस्था तपशीलवारपणे नमूद केली. डॉक्टरला ताबडतोब पाठवून देण्याची सूचना करण्यास अ‍ॅमंडसेन विसरला नाही!

अ‍ॅमंडसेन ग्जो वर परतला. जिमीच्या पहाटेच्या मोहीमेची तयारी करत असतानाच संध्याकाळी पाचच्या सुमाराला जहाजावरील बेल जोरात खणखणली.

अ‍ॅमंडसेनने किनार्‍यावर धाव घेतली. तो दारातून आत शिरत असतानाच त्याच्या नजरेसमोर...

विल्कने अखेरचा श्वास घेतला!

अ‍ॅमंडसेनने विल्कचे अद्यापही उघडे असलेले डोळे आपल्या हातानी मिटले.

"आमचा लाडका मित्रं आम्हाला सोडून गेला होता!" त्या प्रसंगाचं वर्णन करताना अ‍ॅमंडसेन म्हणतो, "या दु:खाचं शब्दात वर्णन करणं निव्वळ अशक्यं आहे. काही क्षण आम्ही त्याच्या मृतदेहाभोवती तसेच बसून राहीलो होतो. कोणापाशीही बोलण्यासाठी शब्दच नव्हते!"

३१ मार्च १९०६ संध्याकाळी ५ वाजता गुस्ताव जूल विल्क मरण पावला.

विल्कच्या मृत्यूचा धक्का जबरदस्तं होता. या धक्क्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नं करण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे जास्तीत जास्तं कामात गुंतवून घेणे. काळ हे सर्व रोगावरील औषध आहे याची अर्थातच अ‍ॅमंडसेनला कल्पना होतीच.

विल्क

विल्कच्या मृत्यूनंतर त्या घरात राहण्याची कोणाचीही इच्छा उरली नव्हती. स्टेनने आपल्या घरात राहण्याची केलेली सूचना सर्वांनी ताबडतोब स्वीकारली. लिंडस्ट्रॉम आणि लुंड यांनी मात्रं किनार्‍यावर राहण्यऐवजी ग्जो वर आश्रय घेतला. किनार्‍यावरील घर पूर्णपणे रिकामं करण्यात आलं.

दोन दिवसांनी स्टेन हर्शेल बेटावर गेला. विल्कच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी कळल्यावर सर्वांनाच दु:ख झालं. अर्थात जिमीने हर्शेल बेट गाठलं असतं, तरीही डॉक्टरला त्याच्याबरोबर किंग पॉईंटला येणं अशक्यंच होतं. हर्शेल बेटावर विषबाधा झालेली दोन माणसं गंभीर अवस्थेत होती आणि त्यांच्यामध्ये तो पूर्णपणे गुंतलेला होता!

३ एप्रिलला लुंडने विल्कसाठी शवपेटी तयार केली. या शवपेटीला त्याने काळा रंग दिला होता. विल्कचा मृतदेह त्यात ठेवण्यात आला. घरातील बाहेरच्या खोलीत दोन लाकडी ठोकळ्यांवर विल्कची शवपेटी ठेवण्यात आली. शवपेटीचं झाकण लावण्यात आलं आणि नॉर्वेच्या ध्वजात शवपेटी गुंडाळण्यात आली. उन्हाळ्याच्या सुरवातीला बर्फ पुरेसा भुसभुशीत झाल्याशिवाय त्यांना विल्कचं दफन करता येणार नव्हतं. घर पूर्णपणे बंद करुन सर्वजण आपापल्या उद्योगाला लागले. विल्क तर गेला होता, परंतु इतरांना आपला रोजचा दिनक्रम सुरू ठेवणं आवश्यक होतं.

हॅन्सन जोडगोळी ५ एप्रिलला आपल्या शिकारमोहीमेवरुन परतली. विल्कच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी त्यांना एस्कीमोंकडून कळली होती. त्यांच्या स्लेजवर तब्बल २३७ शिकार केलेल ससे होते! एका सशाचं मांस दोन माणसांना एका वेळेस पुरेल इतकं होतं!

विल्कच्या मृत्यूनंतर ग्जो जहाजावर आलेला लिंडस्ट्रॉम काही काळातच पुन्हा स्टेनच्या घरी परतला. स्टेन त्याचा जिवलग मित्रं झाला होताच आणि विल्कच्या मृत्यूनंतर त्यांचं स्वयंपाकघर स्टेनच्या घरी हलवण्यात आल्याने त्याच्या दृष्टीने तिथे राहणंच जास्तं संयुक्तीक ठरणार होतं.

१४ एप्रिलला रॉयल नॉर्थवेस्ट माऊंटेड पोलीसांचा इन्स्पे़क्टर हॉवर्ड एका सार्जंटसह अ‍ॅमंडसेनच्या भेटीला आला. त्याच्या जोडीला एक रेड इंडीयन आणि एस्कीमोही होते. हॉवर्ड फोर्ट मॅकफर्सनहून हर्शेल बेटावर निघाला होता. त्याच दिवशी हर्शेल बेटावरुन मिशनरी व्हिटेकरची एक स्लेज तिथे येऊन धडकली. ही स्लेज केप पॉईंटच्या पूर्वेला असलेल्या १५ मैलांवरील सिंगल पॉईंटला निघाली होती.

दुसर्‍याच दिवशी सकाळी आणखीन एक स्लेज किंग पॉईंट इथे आली. या स्लेजवर चार्ली नावाचा एक अमेरीकन होता. त्याच्या पायाच्या एका बोटाला फ्रॉस्टबाईट झाल्याची चिन्हं दिसून येत होती. त्याच्या पायाला जेमतेम एक मोजा घातलेला होता. त्या प्रदेशातील थंडीचा विचार करता हे अगदीच अपुरं होतं. आपण आपल्या एका सहकार्‍यासह कॅप्टन मॅकेनाच्या चार्ल्स हॅन्सनवरुन आल्याचं त्याने अ‍ॅमंडसेनला सांगितलं. आपला सहकारी पुढे जाण्यास असमर्थ ठरल्याने त्याला वाटेत मागे ठेवल्याचं त्याच्याकडून कळल्यावर अ‍ॅमंडसेन चकीतच झाला. बरोबरच्या दोन एस्कीमोंसह तो हर्शेल बेटाच्या दिशेने निघून गेला!

आठवड्याभराने हेल्मर हॅन्सन आणि रिझवेल्ट हर्शेल बेटावरुन परतल्यावर त्याना चार्लीने मारलेली थाप कळून चुकली. चार्ली आणि त्याच्या सहकार्‍याने चार्ल्स हॅन्सन बोटीवरुन पलायन केलं होतं. चार्लीचा सहकारी वाटेत अतीथंड हवामानामुळे मरण पावला होता! केवळ योगायोगानेच त्याची एस्कीमोंशी गाठ पडली होती! दरम्यान हॅन्सन एस्कीमोंच्या तुकडीसह पुन्हा शिकारमोहीमेवर बाहेर पडला होता. जवळच्या परिसरात रेनडीयर दिसल्याची त्याला एस्कीमोंकडून बातमी मिळाली होती!

२२ एप्रिलला हर्शेल बेटावरचा मिशनरी व्हिटेकर आपल्या पत्नी आणि मुलीसह किंग पॉईंटवर पोहोचला. व्हिटेकरची लहान मुलगी दुर्दैवाने मरण पावली होती! दुसर्‍या दिवशी त्याने फोर्ट मॅकफर्सनचा मार्ग धरला. आठवडाभराने रेनडीयरच्या शिकारीसाठी गेलेला हॅन्सन परतला. त्याला १४ रेनडीयरची शिकार मिळाली होती!

२९ एप्रिलला डॅरेल नावाचा एक अमेरीकन किंग पॉईंटला आला. आपल्या टपालमोहीमेवर अ‍ॅमंडसेनची फोर्ट युकून इथे त्याच्याशी गाठ पडली होती. फोर्ड मॅकफर्सन इथून एकट्याने पत्रव्यवहार घेऊन भर थंडीत त्याने अलास्कातील इगल सिटी गाठली होती! हा प्रवास म्हणजे निव्वळ आत्मघाती होता! पील नदी आणि पोर्क्युपाईन नदीच्या दरम्यानच्या पर्वतराजीवर त्याचे कुत्रे पुढे जाण्यास असमर्थ ठरल्यावर त्याने पुढचा सर्व प्रवास पदयात्रा करुन पूर्ण केला होता! आता इगल सिटीहून निघाल्यावर हर्शेल बेटांवर मुक्काम करुन तो पुन्हा फोर्ट मॅकफर्सनला निघाला होता!

२ मे ला एक एस्कीमो धडपडतच ग्जो जहाजावर पोहोचला. तो हर्शेल बेटावरुन आला होता. त्याच्यापाशी गॉडफ्रे हॅन्सन आणि अ‍ॅमंडसेन यांच्यासाठी दोन पत्रं होती! त्याच्यापाठोपाठ ६ मे ला हर्शेल बेटावरुन फोर्ट मॅकफर्सनला पत्रवाहतूक करणारी तुकडी किंग पॉईंटला येऊन पोहोचली. अ‍ॅमंडसेनने विल्कच्या मृत्यूची बातमी देणारा संदेश त्यांच्याबरोबर फोर्ट मॅकफर्सनला पाठवला. विल्कच्या आईला त्याच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी तारेद्वारे कळवण्याची अ‍ॅमंडसेनने सूचना केली होती.

अ‍ॅमंडसेनने कॅप्टन टिल्टॉनला आपल्या मदतीसाठी दोन माणसांना पाठवण्याची विनंती केली होती. ही दोन्ही माणसं १ जूनला पोहोचतील असं टिल्टॉनने त्याला कळवलं होतं. त्यामुळे ८ मे लाच दोन माणसं किंग पॉईंटला येऊन पोहोचल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. दोघांपैकी एकजण ओल फॉस हा नॉर्वेजियनच होता. त्याची अ‍ॅमंडसेनने इंजिनरुममध्ये नेमणूक केली. दुसरा ब्युव्हेस नावाचा अमेरीकन होता. लिंडस्ट्रॉमच्या मदतीला त्याची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याबरोबर अलेक्झांडर जहाजाचा डॉक्टर विट याची चिठ्ठी होती. विटच्या कुटुंबात कोणीतरी गंभीर आजारी असल्याने त्याला घरी परतण्याची घाई होती. इतर कोणत्याही अमेरीकन जहाजांपूर्वी ग्जो अमेरीकेला जाण्याची शक्यता असल्याने या जहाजावरुन परतण्याची त्याने अ‍ॅमंडसेनकडे परवानगी मागितली होती. अ‍ॅमंडसेनने त्याला ताबडतोब होकार दिला.

विल्कने बांधलेल्या ऑब्झर्वेटरीत त्याचं दफन करण्याचा अ‍ॅमंडसेनने निश्चय केला होता. या ऑब्झर्वेटरीचं बांधकाम विल्कने स्वतः केलं होतं. बराच काळ त्याने त्याचा वापरही केला होता. आर्क्टीक समुद्राकडे तोंड करुन उभ्या असलेल्या ऑब्झर्वेटरीपेक्षा त्याच्या स्मारकासाठी त्यापेक्षा योग्य जागा शोधूनही सापडली नसती. ८ मे ला विल्कच्या दफनाची सर्व तयारी पूर्ण झाली होती.

९ मे ला सकाळी साडेदहाच्या सुमाराला विल्कची शवपेटी ऑब्झर्वेटरीमध्ये नेण्यात आली. जहाजावरील आणि आजूबाचूचा प्रत्येक ध्वज विल्कच्या स्मरणार्थ अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. विल्कची शवपेटी ऑब्झर्वेटरीत आणल्यावर दोन ठोकळ्यांवर ठेवण्यात आली. नॉर्वेजियन ध्वजात शवपेटी गुंडाळण्यात आली. विल्कसाठी शेवटची प्रार्थना करण्यात आली. सर्व ऑब्झर्वेटरी लाकडाच्या तुकड्यांनी भरुन टाकण्यात आली. हे काम आटपल्यावर ऑब्झर्वेटरीच्या सर्व भिंती बाहेरून सील करण्यात आल्या. विल्कच्या स्मरणार्थ ऑब्झर्वेटरीवर एक मोठा क्रॉसही उभारण्यात आला.

विक्लची चिरविश्रांती - किंग पॉईंट

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीतील एस्कीमो मन्नी किंग पॉईंट इथल्या एस्कीमोंमध्ये बराच मिसळून गेला होता. अ‍ॅमंडसेनने त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने इतर एस्कीमोंबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली. अ‍ॅमंडसेनने त्याला अर्थातच होकार दिला. एस्कीमोंच्या तुकडीबरोबर तो सीलच्या शिकारीसाठी पश्चिमेला गेला खरा, परंतु परतल्यावर मात्रं त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचं सर्वांना आढळून आलं. अ‍ॅमंडसेनने त्याला पुन्हा बोटीवर येण्याविषयी विचारणा करताच तो आनंदाने तयार झाला.

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाळ्यातील सफरीच्या दृष्टीने ग्जो ची दुरुस्ती करण्यास सुरवात झाली. हे काम सुरु असतानाच २८ जूनपासून अनेक प्रकारच्या किड्यांनी तिथे आक्रमण केलं! सुदैवाने अ‍ॅमंडसेनच्या तुकडीकडे अनेक प्रकारची जाळी असल्याने या कीटकांपासून त्यांचा बचाव झाला होता!

३० जूनला चुंबकीय निरीक्षणांसाठी वापरण्यात येणारी सर्व उपकरणं जहाजावर आणण्यात आली. ग्जो जहाज किंग पॉईंट इथे ज्या ठिकाणावर उभं होतं, तिथे बाजूलाच अ‍ॅमंडसेनने एक लाकडी फळी उभारली. त्यावर ग्जो १९०५-०६ एवढंच लिहीलेलं होतं!

२ जुलैला दक्षिणेकडून येणार्‍या जोराच्या वार्‍यामुळे हिमखंडाची हालचाल होण्यास सुरवात झाली. अ‍ॅमंडसेन आणि इतर उत्सुकतेने बर्फातून मार्ग मोकळा होण्याची वाट पाहत होते. शक्यं तितक्या लवकर किंग पॉईंट सोडण्याची त्यांची योजना होती.

१० जुलैच्या संध्याकाळी व्हेलच्या शिकारीसाठी निघालेली तीन जहाजं अखेर किंग पॉईंटला पोहोचली. ही जहाजं बर्फातून पार होण्याची शक्यता कमीच वाटत होती, परंतु त्यांच्यापैकी एक जहाज सहजच खाडीत शिरुन ग्जो च्या जवळ पोहोचलं! हे जहाज होतं कॅप्टन कू़क याचं बोहेड! हर्शेल बेटाजवळ बर्फात अडकलेल्या पाच जहाजांपैकीच हे एक जहाज होतं!

किंग पॉईंट इथून निघण्याचा क्षण येऊन ठेपला होता!

अ‍ॅमंडसेन कॅप्टन टिल्टॉनच्या अलेक्झांडर जहाजाची वाट पाहत होता. अलेक्झांडरवरील डॉ. विट याला आपल्याबरोबर सॅन फ्रॅन्सिस्कोला नेण्याचं त्याने कबूल केलं होतं. खाडीच्या मुखाशी अलेक्झांडर दिसताच अ‍ॅमंडसेनने गॉडफ्रे हॅन्सनला निघण्याची सूचना केली. खाडीच्या मुखाशी अलेक्झांडरला गाठण्याचा त्याचा बेत होता. स्टेनही ग्जो वर होता. अलेक्झांडरवरुन किंग पॉईंटला परतण्याचा त्याचा विचार होता. किनार्‍यावर जमलेल्या एस्कीमो मित्रांचा निरोप घेऊन ग्जो ने नांगर उचलला.

जहाजावरील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला होता!
गुस्ताव विल्कला त्याच्या सहकार्‍यांनी वाहीलेली ही अखेरची श्रद्धांजली होती!

विल्कच्या समाधीची देखभाल करण्याची अ‍ॅमंडसेनची विनंती सर्व अमेरीकन जहाजांच्या कॅप्टननी आनंदाने मान्य केली होती!

ग्जो खाडीच्या मुखाशी पोहोचलं, परंतु खाडीच्या मुखाशी असलेल्या अलेक्झांडरने मात्रं न थांबता किंग पॉईंटची वाट धरली होती! अलेक्झांडरच्या डेकवर टिल्टॉन मोठमोठ्याने ओरडून ग्जोवरील सर्वांना सूचना देत होता, परंतु वार्‍याच्या आवाजापुढे कोणालाही काहीच ऐकायला आलं नव्हतं! अखेर निरुपायाने हॅन्सनने पुन्हा खाडीत शिरुन किंग पॉईंट गाठला आणि अलेक्झांडर आणि जेनेट या दोन जहाजांना गाठलं. डॉ. विटला ग्जो वर घेऊन आणि स्टेनला किनार्‍यावर सोडून अखेर ग्जो ने पश्चिमेचा मार्ग धरला!

११ जुलै १९०६!

किंग पॉईंट सोडून अवघे दोन तास झालेले असतानाच इंजिनरुम मध्ये पाणी भरत असल्याचं रिझवेल्टच्या ध्यानात आलं! सगळी तपासणी केल्यानंतर एका न वितळलेल्या बर्फाच्या तुकड्यामुळे हा प्रकार झाल्याचं निष्पन्न झाल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला!

हर्शेल बेटाच्या परिसरात अद्यापही बर्फाचं साम्राज्यं होतं. अनुभवी अमेरीकन कॅप्टननी आणखीन आठवडाभर हर्शेल बेटावर मुक्काम करुन मग पश्चिमेला कूच करण्याचा अ‍ॅमंडसेनला सल्ला दिला होता, परंतु अ‍ॅमंडसेनने तो न मानता हर्शेल बेटाला वळसा घालून पश्चिमेचा मार्ग धरण्याचा बेत केला. पश्चिमेला जाणार्‍या एका लहानशा खाडीतून जाताना आपला हा बेत बरोबर असल्याबद्दल अ‍ॅमंडसेन स्वतःची पाठ थोपटत असतानाच ती खाडी म्हणजे एका भल्यामोठ्या हिमखंडाचं प्रवेशद्वार आहे असं त्याच्या दृष्टीस पडलं! अखेर मागे फिरुन १३ जुलैच्या पहाटे २.३० च्या सुमाराला त्याने हर्शेल बेटाच्या किनार्‍याला नांगर टाकला!

१८२६ मधील आपल्या मोहीमेत जॉन फ्रँकलीनने हर्शेल बेटाचं सर्वेक्षण केलं नव्हतं, त्यामुळे या बेटाच्या पूर्वेला असलेल्या नैसर्गिक बंदरावर त्याची नजर पडली नव्हती. हर्शेल बेट आणि कॅनडाचा मुख्य भूभाग यांना विभागणार्‍या खाडीतच जहाजं उभी करण्याला पर्याय नाही असं त्याने नमूद केलं होतं!

हर्शेल बेटावरील यच्चयावत एस्कीमो किनार्‍यावर हजर होते. व्हेलच्या शिकारीसाठी आलेली आणि बर्फात अडकलेली अमेरीकन जहाजं पूर्वेच्या दिशेने गेल्यामुळे ग्जो हे एकमेव जहाज आता हर्शेल बेटाच्या किनार्‍यावर आलं होतं!

काही तासांच्या विश्रांतीनंतर अ‍ॅमंडसेन, लुंड आणि हॅन्सन यांनी बेटावरील टेकडीचा माथा गाठून पश्चिमेला नजर टाकली. सर्वत्रं बर्फाचं साम्राज्यं पसरलेलं दिसत होतं. मात्रं किनार्‍याला लागूनच एक लहानशी खाडी त्यांच्या दृष्टीस पडली. अर्थात ही खाडी ग्जो जाण्यास कितपत योग्य आहे हे प्रत्यक्ष तिथे गेल्याविना समजणार नव्हतं! हर्शेल बेट आणि कॅनडाचा मुख्य भूभाग यांना विभागणार्‍या खाडीचा भूभागही अतिशय उथळ असल्याचं आणि त्याची खोली दर पाच फुटांनी बदलत असल्याचं हॅन्सन जोडगोळी, फॉस आणि विट यांनी बोटीतून केलेल्या एका मोहीमेतून आढळून आलं होतं. तिथे ग्जो सारखं छोटं जहाजही तळावर आदळण्याची अथवा गाळात रुतण्याची शक्यता होती! त्यांच्यापुढे आता एकच मार्ग होता..

पश्चिमेला असलेले हिमखंड दूर् होण्याची वाट पाहणं!

बेटावरील टेकडीच्या माथ्यावरुन रोज पश्चिमेच्या दिशेला बर्फावर नजर ठेवणं आणि उरलेल्या वेळात बेटावर इकडे-तिकडे भटकत वाट पाहणं एवढंच त्यांच्या हाती होतं!

२० जुलैच्या रात्री उत्तर-पश्चिमेच्या दिशेने वारा वाहू लागला. अमेरीकन कॅप्टनच्या मते हिमखंड वाहून जाण्यास हा वारा अनुकूल होता. २१ जुलैला अ‍ॅमंडसेन, रिझवेल्ट, लुंड आणि डॉ. विट यांनी एका बोटीने कॅनडाचा किनारा गाठला. वाटेत त्यांची गाठ मन्नीशी पडली. आपल्या लहानशा होडीतून तो बदकांच्या शिकारीसाठी निघाला होता! या किनार्‍यावर असलेल्या टेकडीच्या माथ्यावरुन पशिमेला असलेल्या बर्फाचा अंदाज घेण्याचा अ‍ॅमंडसेनचा बेत होता. टेकडीवर चढण्यासाठी सोपी वाट शोधत पूर्वेच्या दिशेने सुमारे मैलभर अंतर त्यांनी पार केलं. किनार्‍यावर बोट बांधून त्यांनी टेकडीचा माथा गाठून पश्चिमेकडे नजर टाकली.

हिमखंडांच्या हालचालीस सुरवात झाली होती!
अमेरीकन कॅप्टन्सच्या अनुभवाचा अ‍ॅमंडसेनला पुन्हा एकदा प्रत्यय आला!

टेकडीच्या माथ्यवरुन सर्वजण खाली उतरत असतानाच लुंडच्या तीक्ष्ण नजरेने ग्जो वरील एक गोष्टं अचूक हेरली.

"जहाजावर ध्वज उभारला आहे! तो देखील अर्ध्यावर!"

लुंडच्या या आरोळीबरोबर सर्वांच्या छातीत धस्सं झालं! अ‍ॅमंडसेनने आपल्या टेलीस्कोपमधून ग्जो वर नजर टाकली. लुंडच्या तीक्ष्ण नजरेने अचूक दृष्य टिपल्याचं त्याच्या ध्यानात आलं. जहाजावरील ध्वज अर्ध्यावर फडकत होता!

याचा अर्थ एकच होता... मृत्यू!
जहाजावरील कोणाचा तरी मृत्यू झाला होता!

चौघंही किनार्‍याच्या दिशेने धावत टेकडी उतरु लागले. किनार्‍यावर पोहोचल्यावर आपल्या बोटीची पर्वा न करता त्यांनी जहाजाच्या दिशेने धाव घेतली. एव्हाना त्यांना धावत येताना पाहून ग्जो वरुन एक बोट त्यांना घेण्यासाठी किनार्‍यावर आली होती. बोटीत पाऊल ठेवताच त्यांना त्या दुर्दैवी व्यक्तीचं नाव कळलं.

मन्नी!

ग्जो वर पोहोचल्यावर सर्वांना त्या दुर्दैवी घटनेची इत्यंभूत हकीकत समजली. मन्नी आपल्या बोटीतून बदकांच्या शिकारीसाठी निघालेला गॉडफ्रे हॅन्सन, हेल्मर हॅन्सन आणि फॉस यांच्या नजरेस पडला होता. आपल्या लहानशा बोटीत उभा राहून तो बदकांवर नेम धरत होता. अर्थात हे नेहमीचंच असल्याने कोणी खास लक्षं दिलं नाही. मात्रं काही क्षणांनीच तिकडे लक्ष गेल्यावर मात्रं त्यांना धक्का बसला. मन्नी नाहीसा झाला होता. त्याची बोट एका लाटेवर स्वार होऊन अचानक दिसेनाशी झाली होती!

हेल्मर हॅन्सन आणि फॉस यांनी दुसर्‍या बोटीत उडी टाकली आणि शक्यं तितक्या वेगाने ते मन्नीच्या बोटीच्या दिशेने निघाले. गॉडफ्रे हॅन्सनने त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी टेहळणीच्या जागेकडे धाव घेतली. अवघ्या पाच मिनीटांत ते मन्नीच्या बोटीशी पोहोचले. मन्नीची कॅन्व्हासची बोट एका बाजूवर आडवी होऊन तरंगत होती. त्याची वल्ही समुद्राच्या पाण्यावर तरंगत होती. मन्नी आणि त्याची बंदूक यांचा मात्रं पत्ता नव्हता!

निराश मनस्थितीत हॅन्सन - फॉस ग्जो वर परतले. गॉडफ्रे हॅन्सनने अर्ध्यावर ध्वज उभारला.

सगळी हकीकत ऐकल्यावर अ‍ॅमंडसेनने हर्शेल बेटावरील पोलीस अधिकार्‍याला मन्नीच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती दिली. मन्नीचा मृतदेह मिळाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी काही रक्कमही त्याने अधिकार्‍याच्या सुपुर्द केली. एस्कीमोंच्या मते मात्रं मन्नीचा मृतदेह मिळण्याची अजिबात शक्यता नव्हती. जोरदार प्रवाहाने त्याचा मृतदेह समुद्रात ओढून नेला असावा अशी एस्कीमोंची पक्की खात्री होती.

मन्नीच्या मृत्यूने सर्वांनाच दु:ख झालं. अल्पावधीतच सर्वांची त्याच्याशी चांगली मैत्री झालेली होती. त्याच्या मृत्यूबरोबरच एक विचित्र गोष्ट त्यांच्या ध्यानात आली, ती म्हणजे आर्क्टीकमध्ये सफाईदारपणे वावरणार्‍या आणि आपल्या बोटीतून सील आणि माशांची शिकार करणार्‍या एस्कीमोंना पोहण्याची कला अवगत नव्हती!

२२ जुलैच्या संध्याकाळी वार्‍याचा जोर वाढला. या वार्‍याचा फायदा करुन हर्शेल बेटावरुन निसटण्याचा अ‍ॅमंडसेनचा बेत होता.

२३ जुलै रात्री १.०० वाजता ग्जो ने हर्शेल बेटाचा किनारा सोडला!

क्रमश

Group content visibility: 
Public - accessible to all site users