मावळसृष्टी (व. वि. २००९) च्या निमित्ताने...

Submitted by ललिता-प्रीति on 21 July, 2009 - 23:55

रूढ अर्थाने हा व.वि.चा वृत्तांत नाही. (म्हणून तो त्या बीबी वर टाकला नाही.) यापूर्वीच काहीजणांनी अतिशय चुरचुरीत, खुसखुशीत भाषेत तो लिहिलेला आहे. मात्र यंदा इतर काहीजणां आणि जणींसारखीच मी ही वविची पहिलटकरीण होते. त्या दृष्टीकोनातून हे माझं मनोगत...

-------------------------------------------

अगदी दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत ‘सोशल नेटवर्किंग’ म्हटलं की माझा चेहरा ‘म्हंजे काय रे, भौ?’ असा व्हायचा. जुन्या मित्रमंडळींच्या आठवणी काढत, ‘आता तसे मित्रमैत्रिणी पुन्हा भेटतील का?’ या प्रश्नाला बहुतेकवेळेला नकारार्थी उत्तर देत, ‘गेले ते दिवस...’ असे सुस्कारे टाकत आणि जवळच्या नातेवाईकांना काही-बाही मेल्स फॉरवर्ड करत, वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत माझं नेट-आयुष्य चालू होतं. एखादी चांगली वेबसाईट दिसली तर पहायची, फोटो पहायचे, क्वचित एखाददुसरं गाणं डाऊनलोड करायचं आणि रेल्वे-रिझर्वेशन करायचं यापलिकडेही नेटवर करण्याजोगं काही असू शकेल हे माझ्या गावीही नव्हतं. दरम्यान ‘ऑर्कुट’ नामक वैश्विक चव्हाट्याचं पीक फोफावलं होतं. ते पाहून माझ्यासारख्या समस्तांस अचंबा जाहला होता. सोशल नेटवर्किंग, सोशल नेटवर्किंग म्हणतात ते हेच - हे हळूहळू लक्षात यायला लागलं. तरीही ऑर्कुटवरच्या माझ्या फ्रेंड्स लिस्टमध्ये (पुन्हा एकदा) बहुतेक सर्वजण हे माझे नातेवाईक, भावंडं, शेजारीपाजारी असेच होते. एका विशिष्ट मर्यादेपलिकडे कुणा अनोळखी व्यक्तीशी बोलावं, आपल्याबद्दल सांगावं असं कधी वाटलंच नाही. फोन नं. , ई-मेल आयडी इ. ची देवाणघेवाण तर दूरचीच गोष्ट होती. (शिवाय तिथल्या इंग्लिश-मिंग्लिश भाषेमुळे म्हणावी तशी मजाही येत नव्हती.) सोशल नेटवर्किंग, सोशल नेटवर्किंग म्हणतात ते हेऽऽ?? अशी मूर्खात काढणारी (कुणाला कोण जाणे!) शंकाही मनात यायची. याहू-रीडिफ सारख्या इंग्लिश चॅटरुम्समध्येही मी फारशी रमले नाही.
अश्यातच दीड वर्षांपूर्वी मी मायबोलीचं सभासदत्त्व घेतलं. तरी, ‘मायबोलीचे ओळख आणि अनुभव’ इथे लिहिल्याप्रमाणे माबोवर स्वतःचं लेखन प्रसिध्द करण्याव्यतिरिक्त अजूनही काही करता येतं याचा मला अनेक दिवस पत्ताच नव्हता! मग हळूहळू विपूतून, निरनिराळ्या बीबींवरून, प्रतिक्रिया-प्रतिसादांतून आणि ‘कट्ट्या’मुळे एक निराळंच दालन पुढ्यात उघडलं... एकच का एकदम अनेक दालनं उघडली, खरं म्हणजे! (माईनस्वीपर गेममध्ये कधीकधी कसा आकड्यांचा एक मोठ्ठा गठ्ठा ओपन-अप होतो, तशी...!)

गप्पाटप्पा, टवाळक्या (जो माझा स्थायीभाव आहे) यांतून अनेक आयडीज्‌शी एक छान मैत्रीचं नातं निर्माण होऊ पाहत होतं. रोज त्यांच्याशी गप्पा मारल्याशिवाय चैन पडेनासं झालं.
मातृभाषेतून संवाद हा सर्वांना धरून ठेवणारा सगळ्यात महत्त्वाचा धागा होता आणि कवे, आश्वे, दिप्या, केड्या अश्या संबोधनांतून ई-मैत्री विणली जात होती. (‘ललिता’ हे माझ्या आजीनं ठेवलेलं माझं नाव मला इतकी वर्षं मुळ्ळीच आवडायचं नाही. पण माबोवर त्याचं लली, लले असे शॉर्टफॉर्म्स्‌ झाल्यापासून कानांना ते कसं गोऽऽड वाटायला लागलं!)
दरम्यान मुंबईकर कट्टेकर्‍यांच्या एका गटगला दिवस, जागा ठरवण्यापासून सगळ्या चर्चेत भाग घेऊनसुध्दा आयत्या वेळेला मी जाऊ शकले नव्हते. एकदा वाटायचं - गरज काय प्रत्यक्षात कुणाला भेटायची... ऑनलाईन मैत्री ऑनलाईनच राहू दे! मग रस्त्यातल्या, रेल्वे स्टेशनवरच्या गर्दीत वाटायचं - अरे, ज्यांच्याशी आपण माबोवर रोज बोलतो ते यांच्यापैकी कुणी तर नसतील? भेटलं पाहिजे एकदा सगळ्यांना...!

अश्यातच एक दिवस ववि-२००९ ची दवंडी दिसली. १९ जुलै ही तारीख तेव्हा बरीच लांब होती. तरीही ‘मी येणार’ असं तेव्हापासून कट्ट्यावर ठामपणे सांगणारी बहुतेक मी एकटीच होते. हळूहळू ववि-ज्वर चढायला लागला होता. हो-नाही करणार्‍या कट्ट्यावरच्या सर्व ई-मित्रमंडळींच्या ‘नक्की करा, फायनल ठरवा’ म्हणून मीच मागे लागले होते...
... आणि १९ जुलैला मावळसृष्टीला पुणे-मुंबई माबोकरांचं माझ्यादृष्टीनं अभूतपूर्व असं संमेलन पार पडलं! त्याच्या अभूतपूर्व असण्यातच खरी मजा होती! संमेलनाचं ठिकाण कुठलं हा मुद्दा माझ्यासाठी दुय्यम होता. (‘मावळसृष्टी’ऐवजी ते ‘तलावपाळी’ला जरी ठेवलं असतं तरी मला फारसा फरक पडला नसता!)
आधी कधीही न पाहिलेल्या व्यक्तिंशी आमोरासमोर ओळख करून घेताना खरं नाव सांगितल्यानंतर कोर्‍या राहिलेल्या चेहर्‍यावर त्या व्यक्तिचा माबो आयडी कळल्यावर एकदम ७० एम्‌.एम्‌. हास्य पसरायचं. त्या हास्यातच खरी मजा होती! तिथल्या प्रत्येकाला मी म्हटलं तर ओळखत होते, म्हटलं तर अजिबात ओळखत नव्हते. ‘ओळख’ या शब्दाचा रूढ अर्थ बदलायला लावणारा तो दिवस होता!
मला त्यादिवशी सर्वात जास्त काय आवडलं असेल तर सगळेजण एकमेकांना माबो आयडीनीच हाका मारत होते! तीच सर्वांची ओळख बनली होती! (‘ललिता’ हे संबोधन कानावर पडायची मला जन्मात सवय नव्हती. पण त्यादिवशी मागून ती हाक ऐकू आली की झटक्यात माझी मान वळत होती...!) माबोकरांव्यतिरिक्त तिथे इतर जे कुणी तुरळक दहा-पाच लोक होते त्यांना अर्भाऽऽट, दक्षेऽऽ, घारूअण्णाऽऽ, अल्टेऽऽ, साजिर्‍याऽऽ, आर्फ्याऽऽ असल्या हाका ऐकून ‘हा फौजफाटा नक्की आलाय तरी कुठून?’ अशी शंका आली असणार! पण त्या `फौजफाट्या'चा हाच तर वेगळेपणा होता! नाहीतर कोण कुठला अंकूर पळसुले... इंग्लंडला गेला काय, परत आला काय, मला काय फरक पडणार होता... पण त्यादिवशी समोर दिसल्यावर आणि ‘अँकी क्र.१’ची ओळख पटल्यावर अनेक वर्षांनी एखादा जिवाभावाचा दोस्त भेटल्यासारखा आनंद झाला!
प्रश्नमंजूषा, अंताक्षरी तर धमाल झालीच पण ती धमाल उडवून देणार्‍यांपैकी अनेकजण एकमेकांना प्रथमच भेटत होते हे सांगूनही कुणाला खरं वाटलं नसतं!
सकाळी घरातून निघताना मनात एक शंकेची पाल चुकचुकली होती की तिथे वेगवेगळे गृप्स्‌ तर नाही पडणार... पुणेकर-मुंबईकर याव्यतिरिक्त तिथे अजून उपगट बनले तर... पण माझी ही शंका साफ खोटी ठरली! उपगट तर दूरचीच गोष्ट, उशीरा पोहोचलेले मुंबईकर आणि आधीच चहा-नाश्ता उरकून ताजेतवाने झालेले पुणेकर हे नंतर दिवसभर एकमेकांत इतके बेमालूम मिसळले की शेवटी संध्याकाळी निघायच्या वेळेस आपापल्या बसमध्ये पुन्हा चढण्यासाठी म्हणूनच वेगळे झाले... तो संपूर्ण दिवस माझ्यासाठी वेगळा ठरला तो याचसाठी!

२००३ साली वविंची सुरूवात झाल्यापासून दरवर्षीच हा वेगळेपणा कुणी ना कुणीतरी अनुभवला असेल... यंदा त्यांत मी पण होते.
त्यादिवशी झालेल्या ‘ओळखीं’पैकी काही ई-मैत्रीपुरत्याच मर्यादित राहतील, काहींचं घट्ट मैत्रीत रुपांतर होईलही कदाचित, ते सगळं नंतर... (अजूनही बर्‍याच आयडी आणि चेहरे यांच्या जोड्या माझ्या लक्षात नाहीयेत!)... पण आत्ता याक्षणी मी सर्वांना इतकं मात्र नक्कीच सांगू शकते की सोशल नेटवर्किंग-सोशल नेटवर्किंग म्हणतात ते हेच...!!!

गुलमोहर: 

अरे छान लिहिलयस. मला पण आधी ललिता म्हटल्यावर काकूबाई असशील असं वाटलंच होत.. Proud

हे तिकडे वृत्तांताच्या बीबीवर पण पेस्ट कर. Happy
--------------
नंदिनी
--------------

सही ए...
एकदम...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

लले Happy , नाही नाही म्हणत वृत्तांत लिहून मोकळी झालीस की. चल आता लवकर हे उचलून टाकून दे पाहू योग्य बीबी वर. आणि हो, पहिलटकरणीचं पुल्लींग सांगून ठेव, मी काही खरडलच तर लागेल मला ते. Wink

छान लिहिलयस Happy

आवडलं,तिकडंही टाक.

छानच लिहीले आहेस. आखो देखा हालपेक्षा जरा वेगळे असले तरी ववि वृत्तांतामधेच लिहायला हवे होते हे असे माझे मत. Happy

नावात ललित आल्याने झाले असेल. Wink

लले, मस्तच गं. मला देखिल अंकुरला प्रत्यक्ष पाहिल्यावर काय वाटलं ते शब्दात सांगता येणार नाही गं. मी त्याच्याशी ऑनलाईन खूप गप्पा मारल्यात आणि हळूहळु माझ्या छोट्या भावाबद्दल जे वाटते तेच त्याच्याबद्दल वाटू लागले होते Happy

***************
ॐ नमश्चण्डिकायै |

<<< हळूहळु माझ्या छोट्या भावाबद्दल जे वाटते तेच त्याच्याबद्दल वाटू लागले होते >> म्हंजे ज्याम बदडावासा वाटला ? Light 1

म्हंजे ज्याम बदडावासा वाटला ? >> नको रे ! जरा कुठे तब्बेत सुधारतेय त्याची इथे आल्यावर. तुटलेले दात पण आत्ताच नीट करुन घेतलेत त्याने.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

माझ्या छोट्या भावाबद्दल जे वाटते तेच त्याच्याबद्दल वाटू लागले होते

अंक्या, दिवाळीला खड्डा रे मोठ्ठा.. Wink

जरा कुठे तब्बेत सुधारतेय त्याची इथे आल्यावर
>> जावळ पण करून झालय नुकतंच त्याचं. Happy
--------------
नंदिनी
--------------

Proud
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

लले अगदी अगदी शिट्टी मारता येत नाही मला म्हणुन अगदी शिट्टी मारण्या सारखा झालाय
(संदिप खरेच्या आयुष्यावर बोलु काही च्या वेळी सलील कुलकर्णीने अशा शिट्टी मारण्यामागच व्याकरण सांगितल होत ते अस "आपल्याला जे सांगायचय तेच नेमक समोरच्या कवितेतून ऐकल्यावर अशी शिट्टी येते त्याचा अर्थ हेच तर म्हणायच होत" तशीच माझी ही शिट्टी) Happy

-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार Happy

लले लई खास,
सोशल नेटवर्किंग ते हेच अग ही सुरवात आहे , या वेळेस टी शर्ट ची चॅरीटी बघता आपण आपल्या आनंदाबरोबरच काही समाजाच ही देण लागतो ते ही आपण दिलंय.
कुठेतरी दुरवर एकांगीपणे, पाड्यावर शिक्शणाच व्रत चालु ठेवणार्या या सर्वांना ही खारीची मदत असते,

सध्या चर्चा नको .....
पुढच्या सभेला अजेंड्यावर घ्या हा विषय, काय.....

सकाळी घरातून निघताना मनात एक शंकेची पाल चुकचुकली होती की तिथे वेगवेगळे गृप्स्‌ तर नाही पडणार... पुणेकर-मुंबईकर याव्यतिरिक्त तिथे अजून उपगट बनले तर... पण माझी ही शंका साफ खोटी ठरली! उपगट तर दूरचीच गोष्ट, उशीरा पोहोचलेले मुंबईकर आणि आधीच चहा-नाश्ता उरकून ताजेतवाने झालेले पुणेकर हे नंतर दिवसभर एकमेकांत इतके बेमालूम मिसळले की शेवटी संध्याकाळी निघायच्या वेळेस आपापल्या बसमध्ये पुन्हा चढण्यासाठी म्हणूनच वेगळे झाले... तो संपूर्ण दिवस माझ्यासाठी वेगळा ठरला तो याचसाठी!>>>>> लले,संपूर्ण लेख मस्तच आहे पण यातला हा पॅरा सगळ्यात मह्त्वाचा आहे... मायबोलीवर नविन आल्यावर प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार आपापले बाफ निवड्तो आणि तिथेच वावरु लागतो... तेच बाफ हे त्याचे मायबोलीवरचे विश्व बनते.. आणि जेव्हा वविसारख्या सर्व बाफवाल्यांना एकत्रित आणणार्‍या कार्यक्रमाची वेळ येते तेव्हा या नविन लोकांना अशी शंका येणे सहाजिकच असते... पण ७ ववितले ६ ववि अनुभवलेल्या आणि गेल्या ४ वविंचे संयोजन केलेल्या मला हे अभिमानाने सांगावेसे वाटते की दरवर्षी नविन लोकांची ही शंका खोटीच ठरलेली आहे.. वविला येताना कुणी गडकर बनुन येत असतील ,कुणी कट्टेकर बनुन तर कुणी अजुन कोणी बनुन पण वविच्या ठिकाणी ह्या सगळ्याचा विसर पडुन सगळे एकत्र येतात,धमाल करतात आणि जाताना एक मायबोलीकर म्हणुन परत जातात.. हेच मायबोलीच्या नेमस्तकांनाही अपेक्षित असते.. आणि यातच वविच्या यशाचे गमक आहे :).

ओओ कविताला शिट्ट्यानंद झालाय तर.

खूप मस्त वाटलं वाचुन. फार धमाल केलीत छान.

लले... सोशल नेटवर्किंगचा छंद तर इथल्या सगळ्यांनाच जडला आहे... Happy

छान उतरलाय लेख... अगदी मनापासून... Happy

मस्त लेख...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

तरीच मला उचक्यांवर उचक्या लागत होत्या सकाळी...

पण मस्त वाटलं सगळ्यांना भेटून...
आजारी नसतो तर आणखी धमाल करता आली असती...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

माईनस्वीपर गेममध्ये कधीकधी कसा आकड्यांचा एक मोठ्ठा गठ्ठा ओपन-अप होतो, तशी...! >>

हा हा हा .. सही आहे.. मस्त लिहिलेय.. Happy

०-----------------------------०
खगोलशास्त्रावरील मराठी संकेतस्थळ

सुंदर! सुंदर!!

हेच, हेच ते अगदी. शब्दांत सहज न सांगता येणारं. सगळे भेद विसरायला लावणारा उत्स्फुर्त आनंदाचे धबधबे अंगावर घेतल्यावर लक्षात येतं, की अरे, कामाच्या धबडग्यात गेले कित्येक दिवस आपण मनमोकळे हसलेलो देखील नव्हतो!!

मयूरेश, सही बोला रे भाय..!! मोठ्यांना लहान करता करताच समज-उमजेची अनोखी भेट देऊन पुन्हा नकळत मोठं करणारा वर्षाविहार अजून दहा हजार वर्षे साजरा होवो.. Happy

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..

ललिता : छान लिहिलं आहेस. आवडलं ......... Happy

मया : तुला १०० मोदक .......... Happy

~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

मस्त लिहीलेय...
खरं सांगू? जळफळाट झाला हो! ववि चे वृत्तांत याच कारणासाठी टाळत होते मी.. Lol
मेरा नंबर कब आयेगा कोण जाणे !!

www.bhagyashree.co.cc/

ललिता,
एकदम ब्येष्ट. मस्त लिहिलय. मला मायबोलीवर सर्वात काय आवड्त असेल तर हे एकमेकांना हाका मारणं . ( लली,नंदे, दक्षी, अश्वे, स्लार्ट्या, केद्या, एल्टी, ई.ई.ई. ) मला खुप आवडत ते वाचायला. हि सगळी माणसं कशी असतील खरोखरची कशी बोलत असतील? याच उत्तर अर्थातच वविला मिळालं असतं. ( पण मी कोणालाच ओळखत नसल्याने तो प्रश्नच नव्हता. :स्मित:)
पण मला नुसता वृत्तांत वाचायला पण आवडतो. कोणि मला ओळखत नाही तरी माझ्या मनात सगळ्यांचे चेहरे तयार झालेत. ( जस पिक्चर बघायला आलेल्या पब्लिकला सगळे स्टारस् ओळखीचे वाटतात तसे. :स्मित:) हे मी उगीच झाडावर वगैरे चढवत नाहिये मनापासुन सांगतेय.
धनु.

वा लले!! मस्तच गं..

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

ललिता, मस्त लिहिलय! Happy म्हणजे मी बरच काही मिस केलय तर... Sad Sad

*********************

My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.

Pages