मावळसृष्टी (व. वि. २००९) च्या निमित्ताने...

Submitted by ललिता-प्रीति on 21 July, 2009 - 23:55

रूढ अर्थाने हा व.वि.चा वृत्तांत नाही. (म्हणून तो त्या बीबी वर टाकला नाही.) यापूर्वीच काहीजणांनी अतिशय चुरचुरीत, खुसखुशीत भाषेत तो लिहिलेला आहे. मात्र यंदा इतर काहीजणां आणि जणींसारखीच मी ही वविची पहिलटकरीण होते. त्या दृष्टीकोनातून हे माझं मनोगत...

-------------------------------------------

अगदी दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत ‘सोशल नेटवर्किंग’ म्हटलं की माझा चेहरा ‘म्हंजे काय रे, भौ?’ असा व्हायचा. जुन्या मित्रमंडळींच्या आठवणी काढत, ‘आता तसे मित्रमैत्रिणी पुन्हा भेटतील का?’ या प्रश्नाला बहुतेकवेळेला नकारार्थी उत्तर देत, ‘गेले ते दिवस...’ असे सुस्कारे टाकत आणि जवळच्या नातेवाईकांना काही-बाही मेल्स फॉरवर्ड करत, वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत माझं नेट-आयुष्य चालू होतं. एखादी चांगली वेबसाईट दिसली तर पहायची, फोटो पहायचे, क्वचित एखाददुसरं गाणं डाऊनलोड करायचं आणि रेल्वे-रिझर्वेशन करायचं यापलिकडेही नेटवर करण्याजोगं काही असू शकेल हे माझ्या गावीही नव्हतं. दरम्यान ‘ऑर्कुट’ नामक वैश्विक चव्हाट्याचं पीक फोफावलं होतं. ते पाहून माझ्यासारख्या समस्तांस अचंबा जाहला होता. सोशल नेटवर्किंग, सोशल नेटवर्किंग म्हणतात ते हेच - हे हळूहळू लक्षात यायला लागलं. तरीही ऑर्कुटवरच्या माझ्या फ्रेंड्स लिस्टमध्ये (पुन्हा एकदा) बहुतेक सर्वजण हे माझे नातेवाईक, भावंडं, शेजारीपाजारी असेच होते. एका विशिष्ट मर्यादेपलिकडे कुणा अनोळखी व्यक्तीशी बोलावं, आपल्याबद्दल सांगावं असं कधी वाटलंच नाही. फोन नं. , ई-मेल आयडी इ. ची देवाणघेवाण तर दूरचीच गोष्ट होती. (शिवाय तिथल्या इंग्लिश-मिंग्लिश भाषेमुळे म्हणावी तशी मजाही येत नव्हती.) सोशल नेटवर्किंग, सोशल नेटवर्किंग म्हणतात ते हेऽऽ?? अशी मूर्खात काढणारी (कुणाला कोण जाणे!) शंकाही मनात यायची. याहू-रीडिफ सारख्या इंग्लिश चॅटरुम्समध्येही मी फारशी रमले नाही.
अश्यातच दीड वर्षांपूर्वी मी मायबोलीचं सभासदत्त्व घेतलं. तरी, ‘मायबोलीचे ओळख आणि अनुभव’ इथे लिहिल्याप्रमाणे माबोवर स्वतःचं लेखन प्रसिध्द करण्याव्यतिरिक्त अजूनही काही करता येतं याचा मला अनेक दिवस पत्ताच नव्हता! मग हळूहळू विपूतून, निरनिराळ्या बीबींवरून, प्रतिक्रिया-प्रतिसादांतून आणि ‘कट्ट्या’मुळे एक निराळंच दालन पुढ्यात उघडलं... एकच का एकदम अनेक दालनं उघडली, खरं म्हणजे! (माईनस्वीपर गेममध्ये कधीकधी कसा आकड्यांचा एक मोठ्ठा गठ्ठा ओपन-अप होतो, तशी...!)

गप्पाटप्पा, टवाळक्या (जो माझा स्थायीभाव आहे) यांतून अनेक आयडीज्‌शी एक छान मैत्रीचं नातं निर्माण होऊ पाहत होतं. रोज त्यांच्याशी गप्पा मारल्याशिवाय चैन पडेनासं झालं.
मातृभाषेतून संवाद हा सर्वांना धरून ठेवणारा सगळ्यात महत्त्वाचा धागा होता आणि कवे, आश्वे, दिप्या, केड्या अश्या संबोधनांतून ई-मैत्री विणली जात होती. (‘ललिता’ हे माझ्या आजीनं ठेवलेलं माझं नाव मला इतकी वर्षं मुळ्ळीच आवडायचं नाही. पण माबोवर त्याचं लली, लले असे शॉर्टफॉर्म्स्‌ झाल्यापासून कानांना ते कसं गोऽऽड वाटायला लागलं!)
दरम्यान मुंबईकर कट्टेकर्‍यांच्या एका गटगला दिवस, जागा ठरवण्यापासून सगळ्या चर्चेत भाग घेऊनसुध्दा आयत्या वेळेला मी जाऊ शकले नव्हते. एकदा वाटायचं - गरज काय प्रत्यक्षात कुणाला भेटायची... ऑनलाईन मैत्री ऑनलाईनच राहू दे! मग रस्त्यातल्या, रेल्वे स्टेशनवरच्या गर्दीत वाटायचं - अरे, ज्यांच्याशी आपण माबोवर रोज बोलतो ते यांच्यापैकी कुणी तर नसतील? भेटलं पाहिजे एकदा सगळ्यांना...!

अश्यातच एक दिवस ववि-२००९ ची दवंडी दिसली. १९ जुलै ही तारीख तेव्हा बरीच लांब होती. तरीही ‘मी येणार’ असं तेव्हापासून कट्ट्यावर ठामपणे सांगणारी बहुतेक मी एकटीच होते. हळूहळू ववि-ज्वर चढायला लागला होता. हो-नाही करणार्‍या कट्ट्यावरच्या सर्व ई-मित्रमंडळींच्या ‘नक्की करा, फायनल ठरवा’ म्हणून मीच मागे लागले होते...
... आणि १९ जुलैला मावळसृष्टीला पुणे-मुंबई माबोकरांचं माझ्यादृष्टीनं अभूतपूर्व असं संमेलन पार पडलं! त्याच्या अभूतपूर्व असण्यातच खरी मजा होती! संमेलनाचं ठिकाण कुठलं हा मुद्दा माझ्यासाठी दुय्यम होता. (‘मावळसृष्टी’ऐवजी ते ‘तलावपाळी’ला जरी ठेवलं असतं तरी मला फारसा फरक पडला नसता!)
आधी कधीही न पाहिलेल्या व्यक्तिंशी आमोरासमोर ओळख करून घेताना खरं नाव सांगितल्यानंतर कोर्‍या राहिलेल्या चेहर्‍यावर त्या व्यक्तिचा माबो आयडी कळल्यावर एकदम ७० एम्‌.एम्‌. हास्य पसरायचं. त्या हास्यातच खरी मजा होती! तिथल्या प्रत्येकाला मी म्हटलं तर ओळखत होते, म्हटलं तर अजिबात ओळखत नव्हते. ‘ओळख’ या शब्दाचा रूढ अर्थ बदलायला लावणारा तो दिवस होता!
मला त्यादिवशी सर्वात जास्त काय आवडलं असेल तर सगळेजण एकमेकांना माबो आयडीनीच हाका मारत होते! तीच सर्वांची ओळख बनली होती! (‘ललिता’ हे संबोधन कानावर पडायची मला जन्मात सवय नव्हती. पण त्यादिवशी मागून ती हाक ऐकू आली की झटक्यात माझी मान वळत होती...!) माबोकरांव्यतिरिक्त तिथे इतर जे कुणी तुरळक दहा-पाच लोक होते त्यांना अर्भाऽऽट, दक्षेऽऽ, घारूअण्णाऽऽ, अल्टेऽऽ, साजिर्‍याऽऽ, आर्फ्याऽऽ असल्या हाका ऐकून ‘हा फौजफाटा नक्की आलाय तरी कुठून?’ अशी शंका आली असणार! पण त्या `फौजफाट्या'चा हाच तर वेगळेपणा होता! नाहीतर कोण कुठला अंकूर पळसुले... इंग्लंडला गेला काय, परत आला काय, मला काय फरक पडणार होता... पण त्यादिवशी समोर दिसल्यावर आणि ‘अँकी क्र.१’ची ओळख पटल्यावर अनेक वर्षांनी एखादा जिवाभावाचा दोस्त भेटल्यासारखा आनंद झाला!
प्रश्नमंजूषा, अंताक्षरी तर धमाल झालीच पण ती धमाल उडवून देणार्‍यांपैकी अनेकजण एकमेकांना प्रथमच भेटत होते हे सांगूनही कुणाला खरं वाटलं नसतं!
सकाळी घरातून निघताना मनात एक शंकेची पाल चुकचुकली होती की तिथे वेगवेगळे गृप्स्‌ तर नाही पडणार... पुणेकर-मुंबईकर याव्यतिरिक्त तिथे अजून उपगट बनले तर... पण माझी ही शंका साफ खोटी ठरली! उपगट तर दूरचीच गोष्ट, उशीरा पोहोचलेले मुंबईकर आणि आधीच चहा-नाश्ता उरकून ताजेतवाने झालेले पुणेकर हे नंतर दिवसभर एकमेकांत इतके बेमालूम मिसळले की शेवटी संध्याकाळी निघायच्या वेळेस आपापल्या बसमध्ये पुन्हा चढण्यासाठी म्हणूनच वेगळे झाले... तो संपूर्ण दिवस माझ्यासाठी वेगळा ठरला तो याचसाठी!

२००३ साली वविंची सुरूवात झाल्यापासून दरवर्षीच हा वेगळेपणा कुणी ना कुणीतरी अनुभवला असेल... यंदा त्यांत मी पण होते.
त्यादिवशी झालेल्या ‘ओळखीं’पैकी काही ई-मैत्रीपुरत्याच मर्यादित राहतील, काहींचं घट्ट मैत्रीत रुपांतर होईलही कदाचित, ते सगळं नंतर... (अजूनही बर्‍याच आयडी आणि चेहरे यांच्या जोड्या माझ्या लक्षात नाहीयेत!)... पण आत्ता याक्षणी मी सर्वांना इतकं मात्र नक्कीच सांगू शकते की सोशल नेटवर्किंग-सोशल नेटवर्किंग म्हणतात ते हेच...!!!

गुलमोहर: 

ए, मस्त लिहिलं आहेस, मनापासून- सगळ्यांच्याच मनातलं Happy
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

लले, मस्त लेख लिहिलायंस... Happy खूप आवडला... Happy

ललु मस्तच लिहिइलयस ग Happy ये हुई ना बात

लले छानच गं. खुप आवडला लेख.
अरे पण किती किती ते जळविणार आम्हा पामरांना. Sad

पुढच्या वर्षी मी नक्कीच येणार.

`ववि'च्या आनंदाचा पुरेपूर अनुभव देणारी, खुमासदार वर्णने... मस्त!
वाचताना, `हम भी कभी ऐसेईच थे', या आठवणीनं हुरहुरायला होतं, आणि मग, जिथे कुठे `ववि' अशी अक्षरं दिसतील, तिथे झडप घालून आधाशासारखं वाचलं जातं... मग पुन्हा तीच हुरहुर.
...पण त्यातही मजा आहे.
हे धागे अगदी पुढच्या वविपर्यंत असेच गुंफले जात राहोत.
`सोशल नेटवर्किंग'च्या कल्पनेला सुंदर वळण देणार्‍या `मायबोली'वरच्या जगभराच्या पाऊलखुणांनी आता महाजालावर आपली अशी एक वळणदार वाटच तयार केली आहे...

झुलेलाल,
तुमच्यासारख्यांची उपस्थिती असेल एखाद्या/ सगळ्याच वर्षी तर दुधात साखर...

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

ललिता, छान जमलाय लेख.
<<तिथल्या प्रत्येकाला मी म्हटलं तर ओळखत होते, म्हटलं तर अजिबात ओळखत नव्हते. ‘ओळख’ या शब्दाचा रूढ अर्थ बदलायला लावणारा तो दिवस होता>>
असं असतं तर ववि Happy

मस्तच लिहिलय आणि मनापासुन.
मी नविनच सभासद आहे मायबोलिची. माझ्या मनात खुप होत वर्षाविहाराला यायचे पण अशाच शंका होत्या. ईथे सगळेजण एकमेकांना ईतक्या चांगल्याप्रकारे ओळखतात, जवळकी साधणारे नावाचे अपभ्रंश (स्लार्ट्या, लले, चाफ्या वैगेरे), कट्ट्यावरच्या गप्पा, हितगुज आणि एकमेकांना दिलेली मनापसुन दाद सगळच कस छान.
मला खुप वाईट वाटतय न आल्याच. मी खुप काही मिस् केलय, असो.
पुढ्च्या वर्षी नक्की येईन मनात कुठलिही शंका न ठेवता.

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
शुभांगी

हर्पेन, आपण मला इथे लिहिण्यास पात्र अशा व्यक्तींत समाविष्ट केल्याबद्दल आभार. पण माझा या (किंवा कुठल्याही) विषयाचा सखोल अभ्यास अथवा व्यासंग नाही. शिवाय मांडी ठोकून बैठक मारून लिहिणेही जमत नाही. तेव्हा क्षमस्व.
आणि पुन्हा आभार.

Pages