निष्पाप

Submitted by अमेय२८०८०७ on 24 September, 2014 - 11:01

मायेच्या विश्वामध्ये
प्राजक्त फुले हसण्याचा
प्राणांशी बिलगुन राहे
विश्वास तुझ्या असण्याचा

हक्काच्या कुशीत यावे
जखमांनी व्याकुळ रडता
निष्प्रभशी होई भीती
पदराच्या मागे दडता

देवाच्या मंद दिव्यासम
देहाची ज्योत प्रभावी
अंधाराशी अडखळता
स्मरणाने वाट दिसावी

ना उमजे तुटली कोठे
मग नाळ निळ्या नात्याची
भासे का अनाथ मजला
ओवी इथल्या जात्याची

मन काचपात्र, जगण्याच्या
खडकाशी फुटून विरते
निष्पाप जगाची कविता
आईच्या भवती फिरते

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवाच्या मंद दिव्यासम
देहाची ज्योत प्रभावी
अंधाराशी अडखळता
स्मरणाने वाट दिसावी >>>> ह्या ओळी आवडल्या . छान कविता

___/\___.

वा, खुप सुरेख!
मन काचपात्र, जगण्याच्या
खडकाशी फुटून विरते>> काय ओळ आहे! हे असं काही अफाट अगदीच किमान शब्दात सुचण्याची कवीलोकांना सिद्धी असते बघ..