नरहर कुरुंदकर, द्रष्टा विचारवंत

Submitted by अतुल ठाकुर on 14 September, 2014 - 13:22

kurundkar01.jpg

नरहर कुरुंदकरांवर कुणी लिहावं? माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने लिहावं की लिहू नये? खरंतर असे प्रश्न पडण्याची मुळात गरजच नाही. कृतज्ञता व्यक्त करायला असले उपचार हवेतच कशाला? कुरुंदकरांनी मला जे भरभरुन दिलं त्याचं ऋण तर मानता येईल. ते फेडणं तर केवळ अशक्य आहे. वैचारीक वाचनाची आवड निर्माण झाल्यावर कुरुंदकरांच्या लिखाणाकडे मन झुकलं. त्यांचं पहीलं पुस्तक कुठलं वाचलं ते आठवत नाही मात्र रणजित देसाईंच्या “श्रीमान योगी” ला लिहीलेल्या प्रस्तावनेचा ठसा खोल उमटला होता. त्यानंतर कुरुंदकरांचं व्यसनच जडलं. मिळतील ती पुस्तकं वाचत गेलो. सर्वच कळली नाहीत. काही पुस्तकं कालांतराने कळु लागली. बरीचशी पुस्तकं उपलब्ध नव्हती. मिळाली ती विकत घेतली. पुन्हा पुन्हा वाचण्याचा परिपाठ ठेवला. सर्वप्रथम काही जाणवलं असेल तर ती धारदार, शुचिर्भूत शैली, निळ्या धारेच्या सुरीसारखी, आणि तरीही सुंदर. सत्य सत्य म्हणतात त्याचं स्वरुप हेच असावं. निर्भयतेचा साक्षात्कार घडवणारी लेखणी.

कुरुंदकरांवरचा मार्क्सवादाचा प्रभाव, तरीही त्यांची लोकशाहीवरील अढळ श्रद्धा या बाबी मी फारशा विचारात घेतल्या नाहीत. त्यांचे बिनतोड तर्क वापरुन काढलेले निष्कर्ष मला जास्त महत्त्वाचे वाटले. आजही वाटतात. विचारसरणी कुठलीही असो जर पुरावे पक्के असतील, युक्तीवाद भक्कम असेल तर समोर आलेलं सत्य कितीही कडवट असो मान्य करायला हवं हीच गोष्ट मी सर्वप्रथम कुरुंदकरांकडून शिकलो. माझ्या अनेक श्रद्धास्थानांना कुरुंदकरांच्या लिखाणामुळे धक्का बसला. काहीवेळा तो पचवणं जडही गेलं पण दुसरा इलाज नव्हता. कुरुंदकर प्रत्येक मुद्दा आपल्या असामान्य बुद्धीने क्ष किरणाप्रमाणे भेदूना आरपार विवेचन करतात तेव्हा त्यांनी काढलेल्या निष्कर्षाशिवाय दुसरा काही निष्कर्ष निघूच शकणार नाही असं वाटत राहतं.

कुरुंदकरांच्या प्रत्येक विधानाला तर्क, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्म आणि कित्येक महत्त्वाच्या गोष्टींचा आधार असतो. कुठेही सैलसरपणा, चलाखी, दडपुन नेण्याची वृत्ती नाही, पुराव्याचा अभाव नाही, कुठलाही पुर्वग्रह नाही. ज्यांच्यावर कुरुंदकर प्रेम करतात त्यांच्या लेखनाचा परमर्ष घेतानाही ते झुकतं माप देत नाहीत. जिज्ञासूंनी यासाठी कुरुंदकरांचं गांधींवरील लेखन जरुर अभ्यासावं. डॉ. नांदापूरकर तर त्यांचे मामाच. त्यांच्या “मुक्त मयुरांची भारते” या प्रबंधावर लिहीताना अनेकदा कुरुंदकर हळवे झालेले दिसतात. मात्र तेथेही जी गोष्ट पटत नाही ती स्वच्छपणे लिहीण्यात कुरुंदकर चुकत नाहीत. मला कुरुंदकरांचा हा सर्वात मोठा, विलोभनीय गुण वाटतो. आणि त्यासाठी ते मला अक्षरशः प्रातस्मरणीय वाटतात हे सांगण्यात कसलीही अतिशयोक्ती नाही.

जागर, मागोवा, आकलन, भजन यांसारखी कुरुंदकरांची अनेक पुस्तके म्हणजे बुद्धीला प्रचंड खाद्यंच. त्यातलं बरचसं लिखाण आणि “रुपवेध” सारखी पुस्तकं मला अजुनही नीट कळलेली नाहीत. मात्र जे उमगलं त्याचं मोल करता येणार नाही. नेहरु, पटेल, गांधी, विनोबा, आंबेडकर, आ़झाद यांचं कुरुंदकरांनी केलेलं व्यक्तीचित्रण हे राजकीय निरीक्षण म्हणून तर अजोड आहेच पण भाषाशैलीच्या दृष्टीनेही अप्रतिम. कुरुंदकरांचं महाभारतावरील लिखाण हे आणखी एक सोन्याचं पान. डॉ. ईरावती कर्वेंच्या “युगान्त” वर लिहीताना कुरुंदकर अनेक मार्मिक मुद्यांचा उल्लेख करतात. महाभारतातील व्यक्तीरेखांवर लिहीताना त्यांचं भीष्मासंदर्भातील विवेचन वाचताना मूलगामी, स्वतंत्र प्रज्ञा म्हणजे काय याचा प्रत्यय येतो.

मला कुरुंदकरांच्या चौफेर पांडित्याबद्दल लिहीणं जमणार नाही. ती माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. तेव्हा कुरुंदकरांनी मला काय दिलं याचा उल्लेख करुन हे कृतज्ञतेचं पान पूर्ण करतो. कुरुंदकरांमुळे मला स्वच्छपणे उमगलं असेल ते हे की महान म्हणुन गणल्या गेलेल्या व्यक्तींच्याही जीवनाला एक क्रम असतो. त्यांचाही विकास होत असतो. त्याही बरेचदा जन्मजात महान नसतात. त्यांचेही आडाखे चुकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्ती या त्या विशिष्ठ काळाचं अपत्य असतात. त्यांनाही मर्यादा असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल अफाट आदर बाळगुनही आपले त्यांच्याशी मतभेद असु शकतात. कुरुंदकरांनी आपल्या लिखाणातुन हे नीट समजावून सांगीतल्याने माझा वैचारिक गोंधळ कमी झाला. स्वभावातला सनातनीपणा, कडवेपणा दूर झाला. आता मी बर्‍याच गोष्टींकडे उदारपणे पाहू शकतो. धर्माकडे चिकीत्सक दृष्टीने पाहण्याची सवय लागली. एखाद्या विचाराच्या चटकन प्रभावाखाली येणं बंद झालं. हे सारं कुरुंदकरांनी मला दिलं. त्याचं ऋण हे न फिटणारं आहे. माझ्यासारख्याला मात्र या ऋणातच राहण्यात आनंद आहे.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय.

मी देखिल कॉलेजच्या दिवसांत नरहर कुरुंद्करांची अनेक पुस्तके वाचली होती. आता त्यातील डिटेल्स आठवत नाहीत पण त्यावेळी त्यांच्या अत्यंत तर्कनिष्ठ आणि प्रांजळ लेखनाने पूर्ण भारावले गेले होते.

अत्यंत लॉजिकल आणि सरळसोट, थेट विचार.____/\____

पुन्हा मिळवून वाचायची आहेत. मायबोली खरेदीवर उपलब्ध होतील का?

तर्कनिष्ठ हा शब्द योग्य आहे खरंतर, पण कुरुंदकरांच्या बाबतीत तर्कदुष्ट हा अचूक ठरतो.
सामान्य माणसाचा मेंदू गिरमिटासारखा खरवडून काढणारे अनेक विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेले ही अभिमानाची गोष्ट आहे.

चांगलं लिहिलंय, शेवटचा परिच्छेद जणू माझीच मनोगत.

कुरुंदकर वाचून बरेच दिवस झाले, आता परत वाचायला हवे

अतुल अभिनंदन या श्रेष्ठ प्रतिभेची आठवण जागवल्याबद्दल, तीही अगदी सुयोग्य शब्दात.
एक आठवतं, ते गेले तेव्हा त्या दिवशी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये एक लहानशी बातमी कोपऱ्यात छापून आली होती . हा जवळजवळ अनुल्लेख घायाळ करून गेला होता..

खुप सुरेख परिचय करून दिलात.
श्रीमान योगीची प्रस्तावना वगळता इतर काही वाचलेले नाही.
त्यांच्या लेखनाची पातळी लक्षात घेता नवख्यांनी वाचायला कुठून सुरुवात करावी तेही सुचवा.

नरहर कुरुंदकरांबद्दल अनेक उल्लेख विविध लेख/पुस्तकातून वाचले पण कुरुंदकरांची पुस्तके मात्र कधी वाचली नाहीत. थोडी त्याबद्दल अधिक ओळख करून द्यायला पाहिजे होती असे वाचले.
स. ह. देशपांडे, शेषराव मोरे इत्यादी मराठी विचारवंतांच्या पुस्तकातून व विशेषतः प्रस्तावनांमधून कुरुंदकरांचा उल्लेख असतोच असतो.

सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार.

कुरुंदकर वाचायला सुरुवात महाभारताच्या लेखांपासुन करायला हरकत नाही. त्याचा संदर्भ बहुतेकांना माहित असतो. "व्यासांचे शिल्प" नावाच्या पुस्तकात कुरुंदकरांचे महाभारतविषयक लिखाण एकत्रित केले गेले आहे.

धारदार, शुचिर्भूत शैली, निळ्या धारेच्या सुरीसारखी, आणि तरीही सुंदर. सत्य सत्य म्हणतात त्याचं स्वरुप हेच असावं. निर्भयतेचा साक्षात्कार घडवणारी लेखणी.>>> अगदी अगदी.

महान म्हणुन गणल्या गेलेल्या व्यक्तींच्याही जीवनाला एक क्रम असतो. त्यांचाही विकास होत असतो. त्याही बरेचदा जन्मजात महान नसतात. त्यांचेही आडाखे चुकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्ती या त्या विशिष्ठ काळाचं अपत्य असतात. त्यांनाही मर्यादा असतात.>>> आणि तरीहि त्या महानच असतात.

खूपच सुंदर लेख.

त्याबद्दल अधिक ओळख करून द्यायला पाहिजे होती असे वाचले.<<< अनुमोदन

तरीही, लेख आवडला व मनापासून लिहिल्याचे जाणवत राहिले. धन्यवाद!

छान लिहिलय. Happy
मलाही त्यांची ओळख श्रीमान योगीतल्या प्रस्तावनेतच झाली. मी पण पुढे त्यांची पुस्तकं वगैरे वाचली नाहीतच पण त्या प्रस्तावनेतच त्यांनी शिवकालीन इतिहासाबद्दल उपलब्ध असलेल्या माहितीला लॉजिकली किंवा मी तर म्हणेन कॉमन सेन्स वापरुन "इंटरप्रेट" कसे करावे ह्या बद्दल जे लिहिले आहे त्याचा माझ्यावर खुप प्रभाव पडला.

कोणाला कशामधून काय मिळेल हे सांगता येत नाही पण ती प्रस्तावना वाचल्यानंतर माझ्या विचारसरणीत कायमचा बदल झाला. आता मी कधीही काहीही माहितीपर वाचन केलं तर मी ते नुसतं वाचण्यापेक्षा "इंटरप्रेट" करायला बघतो.
ह्याचा फायदा मला असा झाला की माझी कुठल्याही बहुतकरुन कॉम्प्लिकेटेड असा दबदबा असलेल्या विषयांवर वाचन करण्याची भीड चेपली.
वाचन म्हणजे फक्त आपण काहीतरी जबरी गहन वाचलं ह्याचं समाधान किंवा ढीगभर पुस्तकं वाचली असं समीकरण न राहता वाचत असताना इंटरप्रेट करत जात शेवटी वाचून संपल्यावर त्या पुस्तकातल्या किंवा लेखनातल्या मुख्य मुद्द्याच्या गोष्टींच्या नोंदी डोक्यात होत राहतात आणि पुढे कधी एखादा ह्या विषयासंदर्भात काही प्रॅक्टिकल प्रश्न समोर आला की ह्या नोंदी लगेच उपयोगाला येतात. आपण केलेल्या वाचनाचा आपल्या जगण्यात जर काही प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिकेशन नसेल तर काय खरं त्या वाचनाचा उपयोग?
आपण विरंगुळा म्हणून वाचत जरी असलो तर कुठेतरी आपण स्वतःची किंवा स्वतःच्या आयुष्यातल्या अनुभवांची तार त्या लेखनातल्या विषयाशी जोडत असतोच. त्या शिवाय आपल्याला एखाद्या लिखाणात रस येणच शक्य नाहीये.

सुरेख लिहिलंय अतुल. मनाचा कोपरा व्यापून राहिलेला विषय असल्याने थोडासा दीर्घ प्रतिसाद देतो.

तुमच्याएवढ्या विचक्षण बुद्धीने नसले तरी जमेल तशा आकलनाने जितके कुरुंदकर वाचले, उमजले त्यातून वैचारिक समृद्धीचे मौल्यवान आत्मभान मिळाले आहे. पाश्चात्य विचारवंताच्या तोडीचे अर्थगर्भ लिखाण अजून कुठल्या इतर मराठी लेखकाने केलेले वाचनात नाही (लेखनाची तुलना म्हणून नव्हे तर आवाक्याच्या संदर्भाने!) त्यातही पाश्चात्य विचारवंतांपैकी अगदी एका दोघांचीच शैली प्रथम लेखक म्हणून भावली (मूळ जर्मन अथवा फ्रेंच भाषेतून इंग्रजीत अनुवादीत झाले हेही कारण असेल बहुधा), पण बरेचदा फार नेट लावून लेखन गळी उतरवावे लागले.
कुरुंदकरांबाबत असे होत नाही, श्रम पडतात ते लेखन स्वीकारायला नव्हे तर लेखनाच्या अनुषंगाने स्वत:च्या विचारपद्धतीला तर्काच्या निकषावर घासून पाहायला.
गुरुने शिकवता शिकवता शिष्याला शिक्षणातूनही मोकळे करणे अपेक्षित असते जेणेकरून शिष्याचा स्वत:चा दिवा जळू लागेल आणि तो शिक्षणाच्या पायावरच पण आपली स्वावलंबी वैचारिक इमारत उभी करेल. कुरुंदकर वाचल्यावर, मनापासून वाचल्यावर, अनेक विषयांत असे होते हा अनुभव आहे. त्या विषयांचा आपल्यापरीने वेध घ्यायची ओढ लागते आणि विचार निर्माण होतात-बळकट होतात. उण्यापुऱ्या आयुष्यात त्यांनी इतकी शिदोरी निर्मिली आहे की रंजक वाचना-लिखाणापासून वेगळी वाट काढू पाहणाऱ्या सर्वांसाठी त्यांना वाचणे अपरिहार्य ठरावे.
सुयोग्य स्मरणांजली!

अतुल.....

तुमच्यासारख्या समाजशास्त्राच्या अभ्यासकाला....त्यातही चौफर वाचन असलेल्या आणि स्वतःला विद्यार्थी समजणार्‍या...व्यक्तीच्या विचारआचारावर, प्रज्ञेवर नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या प्रकांड पंडिताच्या विचारधारेचा परिणाम असणे मी साहजिकच मानतो. कुरुंदकर हे शिक्षक होते; पण म्हणून ज्यानी त्यांच्याकडे प्रत्यक्ष शिक्षण घेतले तेच त्याना जास्त ओळखत होते असे मानण्यात अर्थ नाही, तर सरांच्या वैचारिक परंपरेचा साधकबाधक विचार करून त्याच्या अनुषंगाने स्वतःचीही शैली विकसित करण्यामध्ये जी व्यक्ती लिखाण आणि व्याख्यानाद्वारे योगदान देते त्याही व्यक्तीने कुरुंदकरसरांच्या शिकवणीने प्रभावित झाल्याचा तो पुरावाच मानला पाहिजे. तुम्ही सुरुवातीला लिहिले आहे..."...माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने लिहावं की लिहू नये?..." मी तर असे म्हणेन की तुमच्या लेखनाचा दर्जा अन्यांनी ठरवायचा असल्याने सरांच्यावर तुम्ही जे लिहाल ते निरलसपणे लिहावेच आणि त्याचे मूल्यमापन करायचे असेल तर ते वाचकाच्या वैचारिक क्षमतेवर सोपवून द्यावे. तुम्ही याच विषयावर नव्हे जर जो विषय समोर घ्याल त्यावर पहिले अक्षर लिहिण्यापूर्वीच तुम्ही त्याबाबत किती अध्ययन केले आहे हा विचार माझ्या मनी प्रकर्षाने उमटणार इतकी माझी खात्री आहे. विषयावर लिहिण्या बोलण्याची जी एक क्षमता तुमच्यात असायला हवी याची शक्यता मी अजमावेन आणि त्यामुळे तुमच्या मताच्या दर्जाविषयीची रास्त भावना माझी मनी उमटली असेलच.

एरिक फ्रॉम ह्या जर्मन मानसोपचार तज्ज्ञाच्या विचाराला/अभ्यासाला नरहर कुरुंदकर खूप मानत असत. त्यांची काही व्याख्याने मी ऐकली आहेत. त्यापैकी कित्येक ठिकाणी फ्रॉमच्या वचनांचा उल्लेख ते आवर्जुन करत. लोकशाहीवादाचे ते तर कट्टर पुरस्कर्ते होते. याच फ्रॉमचे एक मत त्यानी जागरमध्येही उल्लेखिले आहे. फ्रॉम म्हणतो, "आपल्या स्वतःजवळ विचार करण्याची क्षमता असेल, तरच मतस्वातंत्र्याच्या हक्काला काही तरी अर्थ असतो..." किती योग्य आहे हा विचार ! मतस्वातंत्र्याचा डंका आपण आपल्या देशात मिरवितो; पण आपण व्यक्त केलेले मत वा त्याचा पाया आपल्या विचाराची पैदास आहे का ? गल्लीतल्या नेत्याने सांगितले म्हणून मी मताचे बटन दाबत आहे की माझ्या क्षमतेचा तो परिपाक आहे ? असा विचार किती मतदारांच्या मनी येत असेल ? हा अभ्यासाचा प्रश्न आहे. तुमच्याजवळ ही क्षमता आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा नरहर कुरुंदकर हे नाव घेऊन या लेखाचे शीर्षक तयार केले, ते वाचता क्षणीच मला पटले होते की अतुल ठाकुर यानी एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीविषयी इथे जे विचार मांडले असणार त्याची पार्श्वभूमी म्हणजे त्यांचा या विषयावरील गाढ अभ्यासच कारणीभूत असणार. आता माझ्या "गाढ अभ्यास" या संज्ञेला तुमच्यातील विद्यार्थी कदाचित विरोधही करेल. पण तो तुमचा विनयशील स्वभाव असेल.

अवघे ५० वर्षे आयुष्य लाभलेल्या ह्या ऋषितुल्य लेखकाचे साहित्य म्हणजे वैचारिक लिखाणाचे लखलखीत नमुने आहेत. माझे भाग्य थोर की मला सरांची काही व्याख्याने प्रत्यक्ष ऐकायला मिळाली. कोल्हापूरातील गुलमोहोर चर्चा मंडळाद्वारे खुल्या आणि खाजगी पातळीवर आयोजित केलेल्या विचारगप्पांमध्ये सहभागी....म्हणजे केवळ श्रवण करण्याचे भाग्य....होता आले आणि जाणवत गेले की केवळ श्रीमान योगीला लिहिलेली विलक्षण प्रतिभेची प्रस्तावना लिहिणारा लेखक म्हणजेच नरहर कुरुंदवर नव्हेत असे मानू नये. तर राजकीय, इतिहास, साहित्य समीक्षा, सौंदर्यशास्त्र, ललित कला आदी विविध क्षेत्रात थक्क करणारे अभ्यासू लेख लिहिणारे ते पंडित होत. प्रेषित महंमद आणि त्याच्या अनुययांच्या प्रवासावर त्यानी लिहिलेला "धर्मग्रंथ - अनुयायी - जीवन" हा लेख म्हणजे तर त्यांच्या अभ्यासाची पातळी किती गाढ आहे हेच दर्शवितो.

"...विचारसरणी कुठलीही असो जर पुरावे पक्के असतील, युक्तीवाद भक्कम असेल तर समोर आलेलं सत्य कितीही कडवट असो मान्य करायला हवं...." ~ तुमच्या लेखातील हे वाक्य मला फार भावले. प्रज्ञावंताच्या बुद्धीचा कस दर्शविणारी ही जाहीर कबुली ठरते. अट्टाहासाने विद्येचा विकास होत नाही तर ती संकोचते. कुरुंदकर आपल्या लिखाणाला "साधना" आणि यदुनाथ थत्ते यानी दिलेले प्रोत्साहन फार मौल्यवान मानतात. त्यांच्यातील अभ्यासक कधीच शांत बसलेला नव्हता.....नरहर कुरुंदकर म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले साहित्याचे हे देदीप्यमान लेणेच होय.

सरांच्या लिखाणाचे वाचन कुणी किंवा का करावे हे सांगण्याचा माझा अधिकार बिलकुल नाहीच. पण तुमच्या या लेखामुळे जर कुणाला नरहर कुरुंद्करांच्या साहित्याचा पाठपुरावा करावा आणि त्यांचे विचार आत्मसात करावेसे वाटले तर तो या लेखाचा विजय मानावा लागेल.

उत्तम लेख.

श्री. कुरुंदकर यांची जवळपास सगळी उपलब्ध पुस्तके मी खूप वर्षापूर्वी वाचली आहेत. ढवळे आणि इतर पुस्तक-प्रदर्शने आली की मी पहिल्यांदा त्यांची (व इतर काही लेखकांची) नवीन काही पुस्तके आहेत का हे बघायला जात असे. आणि त्यांचेच विचार-तर्क वापरून त्यांची जी "श्रद्धा"स्थाने आहेत ती माझी का नाहीत हे मी ठरवू शकलो. मराठीमधेतरी त्यांच्यासारखे दुसरे लेखन गेल्या ३०-४० वर्षामधे झाले नाही असे माझे मत आहे.

@ गण्या. | 15 September, 2014 - 10:20 नवीन <<तर्कनिष्ठ हा शब्द योग्य आहे खरंतर, पण कुरुंदकरांच्या बाबतीत तर्कदुष्ट हा अचूक ठरतो.>> हेही मत कधीतरी पटते.

अशोकराव, सविस्तर प्रतिसादासाठी आभार. नेहेमीप्रमाणेच आपली प्रतिक्रिया ही आणखि विचार करायला भाग पाडते हा अनुभव येथेही आला. एरीक फ्रॉम आणि जागरमधील उल्लेखाबद्दल दंडवत.

खरं तर त्यामुळे फार खोलवर काहीतरी पुन्हा ढवळले गेले. अच्युतराव पटवर्धनांशी बोलताना कुरुंदकरांनी लोकशाहीबद्दलची ही बाब उल्लेखिली आहे. "विचार करण्याची क्षमता असेल तर..." अच्युतरावांनी कुरुंदकरांजवळ मान्य केले कि जनतेच्या श्रद्धेविषयी आणि तिच्या चिवटपणाविषयीचे आमचे म्ह्णजे तत्कालिन समाजवाद्यांचे आकलन चुकले. संस्थानिकांच्या दडपशाहीखाली पिढ्यानपिढ्या गांजलेली जनता स्वतंत्र भारतात निवडणुकीला उभ्या राहीलेल्या संस्थानिकांना पाडेल या भ्रमात समाजवादी राहिले. पण संस्थानिक प्रचंड मताने निवडून आले. दुसरे मत प्रसिद्ध कम्युनल ट्रँगल बद्दलचे. हिंदु आणि मुस्लिम या त्रिकोणाच्या दोन बाजु आणि मधली तिसरी बाजु म्हणजे इंग्रज. ते निघुन गेले म्ह्णजे दोन्ही बाजु आपोआपच एकत्र येतील. तसेही झाले नाही. प्रचंड रक्तरंजित फाळणी पदरात पडली.

कुरुंदकर कट्टर मार्क्सवादी असले तरी त्या एका पोथीत जगातल्या सार्‍या प्रश्नांची उत्तरे सापडतात या भ्रमात ते कधीही नव्हते. चिवट संस्कार आणि धार्मिक श्रद्धा यांचे महत्त्व त्यांनी अचुक ओळखले होते. धर्म हे एक अत्यंत प्रभावी शक्ती आहे हे देखिल त्यांना मान्य होते. मार्क्सवाद ही विचार अकरण्याची एक पद्धती आहे असे ते मानीत. मात्र धर्म ही अफुची गोळी आहे किंवा क्लास नाहीसे झाले म्हणजे कास्ट आपोआपच नाहीशी होईल असला युक्तीवाद त्यांनी कधीही केला नाही.

खरं म्हणजे गांधींबद्दल फार वेगळ्या तर्‍हेने विचार करणारे नरहर कुरुंदकर हे मला एकुणच मार्क्सवाद्यांमधले अतिशय दुर्मिळ व्यक्तीमत्व वाटते. गांधी, नेहरु आणि पटेल या अगदी वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या व्यक्ती आपदधर्म म्हणुन आपल्या तत्त्वांना काहीवेळा मुरड घालुन सर्वप्रथम देशाच्या कल्याणाला कसे महत्त्व देत, त्यासाठी आपापसातले मतभेद कसे बाजुला ठेवीत याचे अत्यंत मूलगामी विश्लेषण गुरुवर्य कुरुंदकरांनी आपल्या पुस्तकात केले आहे. गांधी आंबेडकर वाद आणि पुणे कराराची आठवण तर अपरिहार्यच आहे. पण त्यात दलितांना जास्त जागा गेल्या हा गांधींनी आपला पराभव मानला नाही. उलट दलितांनी विभक्त मतदार संघाची मागणी मागे घेतली हा त्यांनी आपला विजय मानला असे कुरुंदकर नमुद करतात. आजच्या वोटबँकेच्या उकळत्या वातावरणात गांधी आंबेडकरांच्या कार्यातील एकमेकांना पुरक झालेल्या जागा शोधणे म्हणजे अब्राह्मण्यम. त्यापेक्षा संघर्ष कसा जास्तीत जास्त चिघळत ठेवता येईल हेच अलिकडे महत्त्वाचे. माझ्या पाहण्यात विद्यापिठात आलेले एकमेव दलित पुढारी अविनाश महातेकर हे असे होते ज्यांना गांधी आंबेडकर संबंधांचा पुनर्विचार करावासा वाटला होता. बाकि सर्व आनंदच. आम्हाला शिकवणार्‍या प्रोफेसरांमध्ये तर आनंदी आनंदच.

कुरुंदकरांच्या वाचनामुळे विद्यापिठातील मार्क्सवाद्यांबद्दल मला अत्यंत तिटकारा वाटु लागला हे मी येथेच नमुद करतो. एकदा कधीतरी केलेल्या संशोधनाच्या धनुकलीवर आयुष्यभर पिंजण काढीत हे विद्वान वर्गात पाट्या टाकत असतात.

बाकी कुरुंदकर म्हटलं की मला वाहवत जायला होतं म्हणुन येथेच थांबतो Happy

ठाकुर साहेब, छान पोस्ट. मला कुरुंदकरांच्या विचारांबद्दल बाकी काहीच माहित नसल्यामुळे खुप छान वाटतय ही सगळी माहिती वाचायला. अजून (बरच) काही लिहलत तर फार बरं होईल. Happy

काल तुमच्या लेखावरून घरात वडिलांशी चर्चा करताना कुरुंदकरांबद्दलचा एक किस्सा ऐकला.

माझे वडिल काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. ते ज्या दिवशी सह्याद्री एक्स्प्रेसने परत येणार होते त्याच गाडीने कुरुंदकरदेखील मिरजेच्या वसंत व्याख्यानमालेत व्याख्यान द्यायला येणार होते. व्याख्यानमालेच्या संयोजकांनी माझ्या वडलांना तिकिट वगैरे दिले आणि कुरुंदकरांना स्टेशनवर गाठून, त्यांची व्यवस्था लावून देण्याचे काम दिले. गाडी पुणे स्टेशनवरून रात्री १२च्या आसपास निघत असे. बाबा आणि कुरुंदकरांचे फोनवर असे ठरले की प्लॅटफॉर्मवरील घड्याळ्याच्या खाली उभे राहायचे. ही गोष्ट असेल ऐंशीच्या आधीची. मोबाइलवगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता.
बाबा घड्याळाखाली जावून उभे राहिले. गर्दी होती. मुंबईवरून वेळेवर गाडीदेखील आली (गाडी मुंबई-कोल्हापूर अशी असते). कुरुंदकरांचा पत्ता नाही. लोकं गाडीत चढली. सुटायची वेळ झाली. प्लॅटफॉर्मवरची गर्दी हटली. आणि प्लॅटफॉर्मच्या दुसर्‍या टोकाला कुरुंदकर उभे असलेले बाबांना दिसले. घड्याळाखाली! प्लॅटफॉर्मच्या दोन्ही टोकांना एक एक घड्याळ होते.
बाबा पळत पळत दुसर्‍या टोकाला गेले. कुरूंदकर चिडून 'अहो ही काय वेळ आहे? गाडी सुटली असती' असे म्हणाले. बाबांना दुसर्‍या टोकाच्या घड्याळाकडे बोट दाखवले. कुरुंदकर सौम्य हसले आणि पुढे जे वाक्य म्हणाले ते या माणसाचे द्रष्टेपण / समज दाखवते. ते म्हणाले, 'बघा, असं असतं सगळं'.
माझ्या वडिलांच्या मते त्या एका वाक्यात आणि ज्या पद्धतीने कुरुंदकर ते म्हणाले त्यात 'एकाच विषयाला अनेक पदर असतात, अनेक बाजू असतात, बघणार्‍याच्या रेफरन्सनुसार निष्कर्ष बदलतात' वगैरे अनेक बाबी ते बोलून गेले.

या लेखावरून हा किस्सा ऐकला म्हणून इथे लिहितो आहे इतकेच.

अतुल __/\__ तसेच अशोकजी पण __/\__

कुरूंदकरांचे आजवर नावच ऐकले आहे, वाचणे काहीच झालेले नाहीये, आता उर्वरित आयुष्यात लवकरात लवकर वाचावे लागणार. "वाचाल तर वाचाल"

अशोकजी तुमचे म्हणणे खरे ठरेल बहुतेक Happy

>>सरांच्या लिखाणाचे वाचन कुणी किंवा का करावे हे सांगण्याचा माझा अधिकार बिलकुल नाहीच. पण तुमच्या या
>>लेखामुळे जर कुणाला नरहर कुरुंद्करांच्या साहित्याचा पाठपुरावा करावा आणि त्यांचे विचार आत्मसात करावेसे
>>वाटले तर तो या लेखाचा विजय मानावा लागेल.

महेश.....

खूप धन्यवाद. तुम्ही सरांचे लेखन अद्यापि वाचले नाही अशी कबुली देऊनसुद्धा श्री.अतुल ठाकुर यांच्या त्या विषयावरील लिखाणाचे इतके कौतुक करता ही बाब मला विशेष महत्त्वाची वाटते. या निमित्ताने श्री.नरहर कुरुंदकर हे नाव आणि त्यांचे विचार तुमच्या हृदयी वसो ही माझी प्रामाणिक इच्छा राहील. भाषेवरील असामान्य प्रभुत्व, वैचारिक खोली, प्रश्नांचा उहापोह करण्याची त्यांची शैली....त्यातून उलगडत जाणारा त्यांचा वाचन प्रवास, विषयाची मांडणी आणि त्यावरील संतुलित विचार......या सार्‍यांचे विलक्षण असे चित्र प्रत्येक पानावर तुम्हाला दिसत जाईल आणि त्यातून साधेल तुम्हाला असे एक समाधान की ज्याच्या आधारे साहित्याकडे पाहाण्याची दृष्टी विस्तारत जाईल.

"...जर कुणाला नरहर कुरुंद्करांच्या साहित्याचा पाठपुरावा करावा....." हा विचार मी याच हेतूने मांडला होतो. त्यामुळे जर तुम्हाला कुरुंदकर साहित्याची आस लागली असेल तर त्याचा उलटपक्षी मलाच जास्त आनंद होईल.

अशोकजी, धन्यवाद Happy

तसे तर कुरूंदकरांचे नाव महाविद्यालयीन काळापासुन माहिती आहे, पण अद्याप कधीच काही वाचणे झाले नाही. कारण काहीच नाही. पण नाही झाले.

काही वर्षांपुर्वी प्रा. राम शेवाळकर यांच्या व्याख्यानांच्या ध्वनिफिती ऐकण्यात आल्या आणि ऐकून खुप भारावून गेलो. मग शेवाळकरांबद्दल अजुन शोध घेतला तेव्हा आंतरजालावर त्यांच्या मुलाखतीचे भाग सापडले (वागळे यांनी घेतलेली त्यांची अखेरची मुलाखत)
त्यामधे शेवाळकरांनी कुरूंदकरांचा आवर्जुन उल्लेख केलेला आहे. त्यामुळे तेव्हापासुन उत्सुकता लागून राहिलेली आहेच की स्वतः शेवाळकर एवढे भारी तर ते ज्यांना मानतात ते कुरूंदकर (साहित्य) कसे असतील ?

शेवाळकरांमुळे मला ज्यांच्या बद्दल खुप जास्त उत्सुकता निर्माण झाली ते म्हणजे विनोबा आणि कुरूंदकर.
त्यांचे विनोबांवरील व्याख्यान अनेकवेळा ऐकले आहे, आणि प्रत्येक वेळी डोळे पाणावलेले आहेत.

महेश...

तुमच्यात उत्सुकता निर्माण करण्याचे कार्य श्री.अतुल ठाकुर यांच्या लेखाने केले ही स्वागतार्ह बाब होय. ललित लेखांचे हेच तर खरे वैशिष्ठ्य मानावे लागेल....ज्यामुळे आपल्याला ज्ञानगंगेच्या डोहात प्रवेश करावासा वाटणे ही देखील प्रगल्भतेची खूणच होय. श्री.राम शेवाळकर यांची व्याख्याने मी अगदी पहिल्या रांगेत बसून ऐकली आहेत. त्यांची वाणी जितकी स्पष्ट तितकेच कौतुकाचे शब्दही. ज्यावेळी ते विनोबा, साने गुरुजी, प्रधानसर, कुरुंदकर यांच्याविषयी (अगदी चहापानाच्यावेळीसुद्धा) बोलत असत त्यावेळी साक्षात सरस्वतीदेवी त्यांच्या जिव्हेवर अवतरत असे. किंबहुना मी तर असेच म्हणेन की शेवाळकरसर, शिवाजीराव भोसले, अनिल अवचट अशा व्याख्यात्यांनी सर्वसामान्य श्रोत्यांच्या मनात अशा व्यक्तींच्या अभ्यासाविषयी अधिकचे आपण काहीतरी मिळवावे अशी भावना जागृत केली हेच तर खरे फलीत होय अशा व्याख्यानमालेंचे. मी स्वतः नरहर कुरुंदकरांना ऐकताना स्वतःशीच म्हणत गेलो होतो "देवा, अजूनी किती वाचायचे आहे आपल्याला ह्या जगात....!" आयुष्य किती याहीपेक्षा आपण ते वाचनाने किती समृद्ध केले पाहिजे ही ज्योत अंतरी पेटत गेली सरांची व्याख्याने ऐकून. शेवटी संपत्ती संपत्ती म्हणतात ती दुसरी काय असू शकते ?

रणजित देसाई यांची "श्रीमान योगी" कादंबरी तुम्ही मिळवा आणि त्यावरील श्री.नरहर कुरुंदकरांची अतिशय गाजलेली प्रस्तावना वाचा....तुम्हाला आश्चर्य वाटेल की श्रीमान योगी ही एकमेव कादंबरी अशी असेल की कादंबरीपेक्षाही तिला लाभलेल्या प्रस्तावनेवर व्याख्याने घडली आहेत....आणि माझ्यासारखे अनेक प्रेमी दोन दोन तास त्यावरील व्याख्याने ऐकायला जमत असत. कुरुंदकरांची ती प्रस्तावना वाचणे म्हणजे अभ्यासपूर्ण वाचन काय असते याचा दाखला तुम्हाला मिळेल.

ओह, श्रीमान योगी पुर्वी वाचलेले आहे, प्रस्तावना वाचली पाहिजे.
आणि आमच्या श्रद्धास्थानांना तुम्ही जर एवढ्या जवळून ऐकले आहे तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटणे मस्ट आहे Happy

विनोबा आणि साने गुरूजींबद्दल जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा असे वाटत राहते की त्या काळात का नाही जन्माला आलो. जर टाईम मशीनने मागे जाता आले तर मला १९३१ च्या सुमारास धुळ्याच्या तुरूंगात जायला आवडेल. विनोबांनी गीतेबद्दलचे त्यांचे विचार सांगितले आणि लेखक झाले होते साने गुरूजी. फार भारी योग जमला होता. Happy

आज श्री. नरहर कुरुंदकर ह्यांचा ८५ वा जन्म दिवस.

प्रा. नरहर कुरुंदकर ह्या व्यक्तीने जीवनावर जो प्रभाव टाकला त्याची तोड दुसरया कशालाही आणि कधीही येऊ शकणार नाही. गुरुजींच्या विचारप्रवर्तक लिखाणाने बुद्धीला सातत्याने एक खाद्य दिले. त्यांच्या धारदार, बिनतोड आणि तर्कयुक्त मांडणीमुळे कुठल्याही गोष्टीला तावून सुलाखून घेण्याची सवय लावली. त्यांचे विद्यार्थी होण्याचे किंवा त्यांचा सहवास लाभण्याचे भाग्य आमच्या पिढीला मिळाले नाही. किती दुर्दैवी आम्ही?

ह्या बुद्धिमत्तेच्या महासागरास विनम्र प्रणाम.

Irregular होण्याने होणारे नुकसान.

आज वाचण्यात आले .

दैवत आहेत गुरुजी , सविस्तर लिहीन नन्तर .

Pages