यमू आजी

Submitted by बेफ़िकीर on 12 September, 2014 - 05:40

यमू आजी म्हणजे आईची सख्खी मावशी! आजी, म्हणजे आईच्या आईची सर्वात लहान बहिण यमू! त्या एकूण आठ बहिणी आणि एक भाऊ! त्यापैकी आजी दोन नंबरची! पण तिच्याहून मोठ्या बहिणीला लग्नानंतरच सासरच्यांनी विहिरीत ढकलून दिले व मारले होते. त्यामुळे आजीच मोठी मानली गेली! आमचे आजोबा संत माणूस! पगार आजीकडे आणून दिला की दिवसभर जप करत बसायचे. आजीने संसार मोठ्या कर्तबगारीने चालवला. तिलाही चार मुली आणि दोन मुले! त्यापैकीच एक मुलगी माझी आई! पण आजीवर इतर सर्व बहिणींचीही जबाबदारी पडली आण इ बहुतेकींची लग्ने आजीनेच लावून दिली. यमूना, म्हणजे यमू आजी सर्वात लहान! इतकी लहान की माझी सर्वात मोठी मावशी तिच्याहून सहा महिन्यांनी मोठी! तर ही यमू आजी कायम आजीकडेच राहायची. तिचे आणि मोठ्या मावशीचे लग्न आजीने एकाच घरातील काका-पुतण्याशी लावून दिले होते. दोघेही कर्तृत्वशून्य व प्रसंगी चोर्‍या करणारे निघाले म्हणून दोघीही, मावशी आणि यमू आजी माहेरी परतल्या व परित्यक्तेप्रमाणे राहू लागल्या. पुढे मावशी शिकून व दुसरे लग्न करून परदेशी गेली आणि यमूआजीवर आजोबांच्या एका चुलतभावाचे प्रेम बसले व त्या दोघांचे लग्न लावून देण्यात आले. दुसर्‍या लग्नानंतर यमू आजी कसबा पेठेतील एका वाड्यातील एकाच खोलीत अत्यंत गरिबीतला संसार थाटून राहू लागली.

अजिबात शिक्षण नसलेली यमू आजी अत्यंत खोडकर व मिश्कील होती. तिने केलेले पदार्थ खावेसे वाटावेत पण सुलभपणे खाता येऊ नयेत असे काहीतरी ती मुद्दाम करायची आणि मजा बघत बसायची. पैसेच नसले की माणूस फुकटातली करमणूकीची साधने शोधतो. ही साधने पैसेवाल्यांच्या दृष्टीने मूर्खपणाची लक्षणे ठरतात.

लहानपणी मला जेवायला बसल्यानंतर समोरच्या पातेल्यातील एखादा डाव वगैरे माझ्या पानावर आलेला अजिबात आवडायचा नाही. मी तो डाव्या हाताने दुसर्‍या दिशेला ढकलत असे. आईने मी नसताना हे घरातील सगळ्यांना सांगितले. शाळेतून मी आजीकडे गेलो तर मला जेवायला वाढायला यमू आजी कधी नव्हे इतकी उत्साही! अगदी माझ्यासमोर बसून माझे कोडकौतुक करून तिने मला वाढले आणि सगळेजण बाजूला जमलेले पाहून मला वाटू लागले की आपण शाळेतून आलो म्हणजे कोण पराक्रम केला. मीही जेवू लागलो आणि सगळे खुसखुसू लागले. पहिल्यांदा मला समजले नाही की काय चालले आहे. नंतर बर्‍याच वेळाने हास्यस्फोट झाला तेव्हा कळले की दोन तीन मिनिटांत यमू आजीने किमान दहावेळा आमटीचा डाव माझ्या पानावर येईल असे पातेले फिरवले होते आणि तितक्याच वेळा मी तो डाव ढकललेला होता. शेवटी मी उचकलो आणि पानावरून उठलो, हे पाहून सगळे अधिकच हसू लागले आणि मी वरच्या खोलीत चिडून निघून गेलो.

कसबा पेठेतील तो वाडा अख्खाच्या अख्खा डुगडुगायचा. त्यात यमू आजीची एक खोली अगदीच एका कोपर्‍यात पहिल्या मजल्यावर! आठ बाय आठच्या त्या खोलीत किचनचा ओटा, थोडी भांडी, एक पलंग, एक लोखंडी कपाट आणि एक शेल्फ इतकेच सामान होते. जिन्याला ना कठडा ना धड पायर्‍या! आमचे लहानपणी तेथे कारणाकारणाने वारंवार जाणे व्हायचे. एकदा असेच गेलो असताना यमूआजीने चहा टाकला आणि खूप उत्साहात आईला आणि दुसरी एक मावशी बरोबर होती तिला म्हणाली.

"ए हे बघा मी ह्या खोलीत पार्टिशन करून दुसरी खोली तयार केली आहे"

तिच्या चेहर्‍यावर महाल घेतल्याचा आनंद होता पण आम्हाला तिघांना नवल वाटले की मुळात पार्टिशनच कुठे आहे?

तर तिने लोखंडी कपाटाची एक बाजू आणि एक भिंत ह्यातील त्रिकोण एका साडीने झाकलेला होता आणि ती पटकन त्याच्या आत गेली आणि पुन्हा बाहेर येत म्हणाली की मस्त आहे की नाही खोली? कोणी बाहेरचे आले आणि साडी वगैरे बदलायची झाली तर त्यांना बाहेर जायला सांगावे लागणार नाही आता!

मी लहान असल्याने मला त्या खोलीची गंमत वाटली व मी आत जाऊन पाहिले. आतून बाहेरचे दृष्य बर्‍यापैकी दिसत होते पण बाहेरून आतले नव्हते दिसत. तिथून निघाल्यावर रस्त्यात आई मावशीला म्हणताना मी ऐकले......

"यमू मावशीची कमाल आहे नाही? इतकेही दु:ख नाही आहे गरीबीचे"

मग पुढचा प्रवास अबोलपणे झाला. मलाही जाणवले की आपल्याला जो प्रकार गंमतीशीर वाटला होता तो एका वेदनेच्या जमीनीवर वसवलेल्या दिलदारपणे पराजय स्वीकारण्याच्या वृत्तीचा प्रासाद होता.

असाच एकदा सगळ्यांमध्ये तिचा विषय निघाला तेव्हा ती खुद्द तिथे नव्हती. ती दाण्याचे लाडू करून ते दहा दहा पैशाला विकण्यासाठी लक्ष्मी रोडवरच्या दुकानांमध्ये डबा घेऊन फिरत होती. घरातले सगळे जण तिच्या गरीबीतही आनंदी राहण्याचे कौतुक करत असताना मला यमू आजी हे व्यक्तिमत्व अधिकाधिक समजू लागले होते. तेवढ्यात मामी म्हणाली......

"यमू मावशी नुसत्या आनंदात असतात असे नव्हे, त्या दुसर्‍यांनाही आनंद देतात. काल मी त्यांच्याकडून निघाले तर स्टीलचा एक डबा माझ्या पिशवीत घालत म्हणाल्या की ह्यात पोह्यांचा चिवडा आहे तो तुम्ही तिघे खा. मी आपला डबा घेऊन घरी आले आणि उघडून बघते तर काय? त्यात एक कापसाची जुनाट बाहुली दाबून बसवली होती. झाकण उघडताच ती टुणकन उडून बाहेर पडली. मी इतकी हासत बसले होते"

माझी आई पण अशीच होती स्वभावाने! तिने यमू आजीची तीच गंमत करायचे ठरवले. दाण्याचे लाडू संपवून ती पुन्हा घरी आली आणि थोड्या वेळाने निघाली तेव्हा आईने एक प्लॅस्टिकचा डबा तिला दिला आणि म्हणाली

"मावशी, ह्यात लोकरीचे दोन गुंडे आहेत, तुला मी शिकवले आहे तसे विणायला घेशील का? माझ्याकडे आत्ता चारजणांचे स्वेटर्स सुरू आहेत"

यमू आजी आनंदाने हो म्हणाली आणि डबा घेऊन गेली. सगळे हासत बसले. हे स्वेटर्सचे प्रकरण हौशीचा प्रकार होता, पण यमू आजीने स्वेटर्स विणले तर आईने काहीतरी देऊ केले असते. मग सगळ्यांच्या लक्षात आले की लोकरीच्या गुंड्यांऐवजी टुणकन् बाहुली उडून बाहेर पडली तर यमू आजीला वाईट वाटेल. आईच्या डोळ्यात पाणी आले आणि ती मला आणि दुसर्‍या मावशीला घेऊन तशीच चालत कसबा पेठेत निघाली.

आम्ही तिच्या घरी पोचलो तर आम्हाला पाहून यमू आजी अक्षरशः सातमजली हसू लागली. ती हसायची तेव्हा तिचे गोरेपान गाल लालबुंद व्हायचे आणि डोळ्यांमधून पाणी यायचे. आता मला असे वाटते की 'आपण कोणत्याही कारणाने का होईनात हसू शकलो' ह्याचाच आनंद वाटून तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत असतील.

"ए थांबा आता पोहे करते"

असे आम्हाला म्हणून यमू आजी पटकन वाड्यात सटकली. पाच मिनिटांनी आली तेव्ह तिच्या हातात एका लहान पातेल्यात थोडे कच्चे पोहे होते. ते पाहून आईने विचारले की काय ग, पोहे कुठून आणलेस?

तर म्हणाली......

"निलेशच्या आईकडून! संपलेले होते ना? आणायचेच होते, पण दुकानात गेले असते तर वेळ गेला असता"

दुकानातून पोहे आणण्याचे पैसेच नव्हते तिच्याकडे! आणि हे एकद अनाही, कित्येकदा व्हायचे. दुकानदारापेक्षा वाड्यातल्यांची उधारी फिटवणे तुलनेने सोपे असल्यामुळे यमू आजी तो मार्ग स्वीकारायची, पण दारात आलेल्याला तसेच परत पाठवायची नाही. तिच्या हाताची चवही भन्नाट होती. मस्त पोहे आणि चहा घेऊन आम्ही परतू लागलो.

आईने मला गहिवरल्या स्वरात शिकवले होते.

"भूषण, काय वाट्टेल ते झाले तरी घरी आलेल्याला कधीही काहीतरी विचारल्याशिवाय आणि दिल्याशिवाय जाऊ द्यायचे नाही हां?"

मी मान डोलावली होती.

घरी येऊन आईने पर्समधून घराची किल्ली काढण्यासाठी हात आत घातला आणि टुणकन् ती कापसाची बाहुली बाहेर पडली. तसा मात्र आईने कपाळालाच हात लावला. 'यमूमावशी सुधरायची नाही' असे म्हणत हासत हासत आई घरात गेली.

जानेवारी महिना लागला की यमू आजी हलव्याचे दागिने करून विकायची. मला हा हलवा आवडायचा नाही. पण घरातल्या यच्चयावत बायका त्या काळात यमूआजीला आर्थिक मदत व्हावी म्हणून हलव्याचे दागिनेच करत बसायच्या. हे दागिने विकण्यासाठी वापरल्या गेलेल्या डब्यांमधून त्या बाहुलीने सर्व घरांमध्ये कित्येक चकरा मारलेल्या होत्या. ते एक मोठेच हासण्याचे कारण झालेले आठवते तेव्हा!

मला घरात भिंतीवर बॉल टाकून हातातल्या बॅटने तो मारायचा नाद लागला होता. आई बाबा असताना ते करता यायचे नाही कारण त्यांना आवाजाच त्रास व्हायचा. पण ते बाहेर गेलेले असले तर मला तो खेळ खेळता यायचा. त्यामुळे ते बाहेर गेल्यावरचा वेळ मी सर्वाधिक त्या खेळाच आनंद लुटण्यासाठी वापरायचो. असाच एकदा खेळात रमलेलो असताना बेल वाजली आणि वैतागून दार उघडले तर दारात यमू आजी! मला म्हणाली आई कुठे आहे? म्हंटले आजीकडे आहे, सदाशिव पेठेत! तर म्हणाली बरं मग मी तिकडेच जाऊन तिला भेटते. मी बरं म्हणालो आणि जास्त वेळ गेला नाही ह्या आनंदात पुन्हा खेळू लागलो.

संध्याकाळी आईने मला झाप झाप झापले. माझ्या लक्षातच राहिले नव्हते की आपण तिला निदान पाणी आणि चहा तरी विचारायला हवा होता. खूप शरमल्यासारखे वाटू लागले.

नवरात्रात अष्टमीच्या दिवशी यमू आजीच्या अंगात यायचे. मग ती घागर फुंकत घरातल्या आणि बाहेरच्या सगळ्यांना सल्ले द्यायची, उपाय सांगायची. मग रात्री थकून भागून आडवी झाली की स्वतःच विचारायची की 'देवी काय काय म्हणाली'! आम्हाला लहानपणी त्या प्रकाराची थोडी भीती आणि बरेच कुतुहल वाटत असे. आता वाटते की सगळ्यांवर एकदातरी वैचरीक कुरघोडी हक्काने करता यावी म्हणून कदाचित तिने वापरलेला तो एकमेव हुकुमी उपाय असावा.

आजीच्या बाकीच्या सर्व बहिणी कॅन्सरने गेल्या. आजी तेवढी ९६ वर्षांची होऊन वृद्धापकाळाने गेली. आम्हाला बातम्या समजायच्या. तारा मावशीला कॅन्सर झाला. गंगू मावशी कॅन्सरने गेली. सिंधू मावशी कॅन्सरमुळे अ‍ॅडमीट झालेली आहे.

शेवटी एक दिवस बातमी आली.

यमू मावशीला अ‍ॅडमीट केले आहे. सगळे धावले तर डॉक्टर म्हणाले पोटाचे ऑपरेशन करावे लागेल आणि मगच काय ते समजेल. त्या ऑपरेशनचा खर्च माझ्या मोठ्या मावशीने केला. यमू आजीला हॉस्पीटल वगैरे लाड परवडणारे नव्हतेच.

ती थोडी बरी झाली. ऑपरेशनमधून रोगाचे निदान काही समजले नाही आम्हाला!

मग ती पूर्ववत वागू लागली. असेच एकदा सकाळी समजले की पुन्हा तिच्या पोटात दुखत आहे. मामी आणि आई तिला बघायला गेल्या तेव्हा ती निजूनच होती. दवाखान्यात जायला नको म्हणत होती. दोन दिवसांनी बरे वाटेल म्हणत होती. त्यातही उठून तिने चहा करायचा प्रयत्न केला आणि तो असफल ठरवला गेला. आई आणि मामीने विचारले की काही हवे आहे का? त्यावर म्हणाली वाण्याचे चौतीस रुपये द्यायचे राहिले आहेत. तेवढे देऊन या. यमू आजीचे मिस्टर म्हणजे विनू काका वाण्याचे दुकान दाखवायला बरोबर गेले आणि पुन्हा सगळे घरी आले तेव्हा ......

...... यमू आजी गेलेली होती. डॉक्टरांना कोणीतरी नंतर विचारले तेव्हा समजले की तिला कॅन्सरच झालेला होता... आणि ते तिला माहीतही होते...

ढसढसा रडल्या त्यावेळी घरातल्या बायका! आणि रडण्याचे आणखीही एक करण होते...... घरी आल्यावर समजले होते की मामीच्या पिशवीत टुणकन् उडनारी कापसाची बाहुली लपलेली होती......

==============

(संपूर्ण सत्यकथा)

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी नेहमीप्रमाणेच फार छान लेखन केलं आहे. यमू आज्जी अगदी डोळ्यासमोर उभी राहिली; पातेल्यात कच्चे पोहे घेऊन येणारी तर तंतोतंत.
काही माणसं गेल्यावरच त्यांची किंमत समजते.
मनाला चटका लावून गेली यमू आजी.

घरी आल्यावर समजले होते की मामीच्या पिशवीत टुणकन् उडनारी कापसाची बाहुली लपलेली होती...... >> हे जग सोडून जातानाही सर्वांनी हसत रहावं हा उद्देश असवा यमू आजीचा.

खूप छान उतरलंय व्यक्तिचित्रण- अगदी भिडलं.

किसी की मुस्कुरहटों पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है!

सुन्दर व्यक्तीचित्रण.........! खूप आवड्ले.......!

सुंदर.

Pages