गणेशोत्सव २०१४: समारोप आणि आभारप्रदर्शन

Submitted by संयोजक on 9 September, 2014 - 00:42

मराठी माणसासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला गणेशोत्सव 'मायबोली.कॉम'ने सर्वप्रथम ऑनलाईन स्वरूपात सुरु केला. ह्या उत्सवाचे यंदाचे पंधरावे वर्ष होते! गणेशोत्सव पार पाडण्यासाठी पडद्यामागील अनेक जणांचा हातभार लागला. त्यांच्या योगदानाशिवाय उत्सव पार पडणे शक्य नव्हते. त्यामुळे मंडळी घरचीच असली तरीही त्यांचे आभार मानण्यासाठी हा आभारप्रदर्शनाचा गोड कार्यक्रम.

सर्वप्रथम गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा आणि उपक्रमांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे मन:पूर्वक आभार. सर्वांच्या सक्रिय सहभागाशिवाय हा उत्सव पार पडणे शक्य नव्हते. 'असाच उत्साह कायम राहू दे आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ दे' हीच गणरायाचरणी प्रार्थना!

आम्हां सर्वांना यंदाच्या गणेशोत्सव मंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल तसेच उत्सवादरम्यान वेळोवेळी तांत्रिक मदत केल्याबद्दल अ‍ॅडमिन आणि वेबमास्तर ह्यांचे आभार. प्रताधिकार तसेच इतर कायदेशीर बाबींबद्दल लागेल ती मदत केल्याबद्दल चिनूक्सचे आभार.

गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे वेगवेगळे कार्यक्रम सादर करून गणेशोत्सवाची रंगत वाढवल्याबद्दल खालील मायबोलीकरांचे संयोजक मंडळातर्फे विशेष आभार!

- गणेश प्रतिष्ठापनेवरील श्र्लोक गायन : कौस्तुभ परांजपे (रैना यांच्या विनंतीवरुन, त्यामुळे रैना यांचे ही आभार!)
- गणेश प्रतिष्ठापना व इतर प्रकाशचित्रे- इंद्रधनुष्य आणि जिप्सी
- गणेशाचे जलरंगातील चित्र : अजय पाटील
- ज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन व गणेशवंदन ह्याबद्दलचे लेखन : शशांक पुरंदरे
- गायन- ओंकार देशमुख
- वादन- केदार देशमुख (तबला), ओंकार दिवाण (सिंथेसायजर)
- बाप्पा माझ्या मनातला -फोटो फीचर : अनन्या
- विजया बाई आणि आपण : चिनूक्स
- आसनम् समर्पयामि : नीधप
- क्वीलिंगचा बाप्पा : प्राजक्ता शिरीन

ह्याचबरोबर :
- जाहिराती, चित्रफलक साहाय्य ह्याकरिता नीलू, नील वेदक आणि कविन ह्यांचे आभार.
- पाककृती स्पर्धा हा मायबोली गणेशोत्सवातला अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यांसाठी अतिशय जवळचा भाग. स्पर्धा ठरवताना नियमांमध्ये कसल्याही त्रुटी राहू नयेत ह्यासाठी यंदा आम्ही नियमांचा अंतिम मसुदा मंडाळाबाहेरील व्यक्तींकडून तपासून घेण्याचे ठरवले होते. ह्या कामात मदत केल्याबद्दल तसेच काही महत्त्वाच्या सुचवण्या केल्याबद्दल मायबोलीकर मृण्ययी ह्यांचे आभार.
- बालचमूंच्या उत्साही सहभागाचं खास आकर्षण असलेली चित्रं नीलू यांनी काढून दिली तसेच बच्चेकंपनीचं कौतुक करण्यासाठी दिलेली प्रशस्तिपत्रके तयार करण्यासाठी मायबोलीकर पेरू आणि कविन या सर्वांचे आभार.

सरते शेवटी विशेष आभार मानावेसे वाटतात ते 'सुरक्षेचा श्रीगणेशा' ह्या कार्यक्रमाची चित्रे काढून देण्यार्‍या गार्गी दत्ता ह्यांचे. ही संकल्पना सर्वात पहिली पक्की झाली असली तरी गणेशोत्सव तोंडावर आला तरी आम्हाला त्यासाठी समर्पक चित्रे काढून मिळेनात. अगदी अचानक चैतन्य दीक्षित यांच्या या सहकारी मैत्रिणीने मदतीची तयारी दर्शवली! गंमत म्हणजे, ती स्वतः बंगाली असल्याने तिला मजकूर, त्यातली मजा स्वतः वाचून समजत नव्हती. चैतन्य यांनी ती कामगिरी पार पाडली व योग्य अर्थच्छ्टा समजावून अतिशय समर्पक अशी सुंदर चित्रे आपल्या सर्वांसमोर मांडली. याबद्दल गार्गी यांचे आभार मानले असता -"भगवान के काम के लिए 'थँक्स' बोलके मुझे पाप मत लगाओ!" असं गोड उत्तर मिळाल्यावर आम्ही काय बोलणार! कोणतंही काम पूर्ण करताना हजारो अनाम हात त्यापाठी कसे लागलेले असतात याची प्रचिती इथे आली.

यंदाच्या गणेशोत्सव संयोजन मंडळात आम्ही सगळे अगदी योगायोगाने आलो. स्वयंसेवकांअभावी यंदा मायबोलीचा गणेशोत्सव होऊ शकणार नाही हे वाचताच मागचा पुढचा विचार न करता आम्ही सर्वांनी पाऊल पुढे टाकले. हातात अत्यंत कमी वेळ शिवाय प्रत्येकाला अनेक व्यवधानं - कुणाच्या शिफ्ट्स, तर कुणाच्या घरी बाळराजांचं आगमन, कुणाला अचानक ऑनसाईट व्हिजिट तर कुणाच्या घरी उद्भवलेलं संकट! परंतु मायबोली आणि व्हॉट्स अ‍ॅप यांच्या माध्यमातून हातात हात धरुन हा उपक्रम व्यवस्थितपणे पार पाडायचा प्रत्येकाने निश्चयच केला होता . कमी वेळात पण सर्वसमावेशक असे खेळ आणि स्पर्धा निवडणे, त्यांची जाहीरात करुन ते यशस्वीपणे अंमलात आणणे सोपे नव्हतेच. उत्सव सुरू झाल्यावर प्रत्येक उपक्रमाचं, स्पर्धेचं, संयोजनाचं मायबोलीकरांनी केलेलं कौतुक वाचताना मिळणारं समाधान शब्दांपलीकडचं आहे. नेमून दिलेला 'मुख्य संयोजक' आणि 'सल्लागार' नसतानाही गोष्टी पार पडलेल्या पाहून मायबोलीवरची मंडळे 'सेल्फ सफिशंट' किंवा 'स्वयंपूर्ण' होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत असं म्हणावसं वाटतं.

मायबोलीचे असे उपक्रम म्हणजे एक संघ म्हणून काम कसे करावे याची कार्यशाळाच असते. कधी न पाहिलेल्या, बोललेल्या लोकांशी जुळवून महिनाभर काम करत एखादे साध्य साधायचे ही गोष्टच मुळात दुर्मिळ आहे. मायबोली आपल्याला ही संधी देऊ करते. मायबोलीवरचे उपक्रम सुरू ठेवण्यासाठी मायबोलीकरांनी स्वयंसेवक म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. यंदा गणेशोत्सव संयोजन मंडळासाठीच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद आल्याने उत्सव रद्द होतो की काय अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे सर्व मायबोलीकरांना, विशेषतः नवीन मंडळींना, संयोजन मंडळातर्फे आवाहन की अश्या मंडळामध्ये नक्की भाग घ्या कारण हा अतिशय आनंददायी अनुभव असतो.

गणेशोत्सवाच्या संयोजनात काही त्रुटी राहून गेल्या असल्याची नम्र जाणीव आम्हाला आहे. तर त्याबद्दल तसेच तुम्हाला काय आवडलं,काय नाही, अजून काय करणं शक्य होतं ह्याबद्दलची आपली मते ह्या धाग्यावर नक्की मांडा. आगामी मंडळांना ह्या सूचनांचा निश्चित उपयोग होईल. स्पर्धांचे विजेते निवडण्यासाठी मतदानाची सोय लवकरच उपलब्ध करून देऊ. आपापल्या आवडत्या प्रवेशिकांना नक्की मत द्या.

अनेक उपक्रमांवर लोकांनी ही कल्पना कुणाची? असं विचारलं आहे. तेव्हा आम्ही सांगू इच्छितो की सर्व उपक्रम हे संपूर्ण संयोजक मंडळाच्या शब्दशः 'अहोरात्र' केलेल्या मेहनतीचं फलित आहे.

कसं जमेल, कसं होईल करता करता आता 'कार्यालय' आवरायची वेळ आली की आवंढा येतोच. गाठीशी आलेले अनेक नवे अनुभव, नवीन शिकलेल्या अनेक गोष्टी, मनभर आनंद आणि किंचित चुटपूट लागली की निरोपाची वेळ येते.

निरोप घेता घेता, आपण मायबोलीतर्फे आजवर जिथे जिथे असा आनंद पसरवला आहे त्या संस्थांची नावे गुंफून मायबोलीकर उदयन... यांनी हा अक्षर गणेश तयार केला आहे ज्यात रंग भरलेत नीलू यांनी. काही क्षणांसाठी का होईना मायबोलीने तिथे हसू फुलवले तोच आनंद आशीर्वादाच्या रूपात आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव राहील. गणपती बाप्पा मोरया!

धन्यवाद!
- २०१४ गणेशोत्सव संयोजन मंडळ
(आशूडी, उदयन.., चैतन्य दीक्षित, गजानन, जाई., पराग, रीया, स्नेहश्री)

संस्थांची नावे-
अस्तित्व, भागिरथ, मैत्री, सावली, शबरी, सुमति, स्नेहालय, स्नेहाधार, आदिनाथ, सुपंथ, लोकबिरादरी, वनवासी, ग्रीन अम्ब्रेला, मनोहर, एकलव्य, प्रगती.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१४ मधल्या स्पर्धासाठी मतदान सुरु झालेलं आहे. खालील दुव्यावर तुम्ही आपले मत नोंदवू शकता.

आता कशाला शिजायची बात

http://www.maayboli.com/node/50769

मलाही कोतबो

http://www.maayboli.com/node/50768

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच झाला हा गणेशोत्सव Happy अल्प वेळेत खूप सुंदर उपक्रम पार पडला.

मायबोलीचे असे उपक्रम म्हणजे एक संघ म्हणून काम कसे करावे याची कार्यशाळाच असते. कधी न पाहिलेल्या, बोललेल्या लोकांशी जुळवून महिनाभर काम करत एखादे साध्य साधायचे ही गोष्टच मुळात दुर्मिळ आहे. मायबोली आपल्याला ही संधी देऊ करते.

>>> अगदी!

मतदान चालू झाल आहे . माझ्या मते , कोण किती मतानी पूढे आहे , हे जाहीर करण्याची गरज नाही . मतदानावर कोणाचाही प्रभाव नको . फक्त मतदानाची सोय असावि , कोणाला किति मते हे शेवटी जाहीर व्हावे .

प्रिय जनहो, मतदान सुरू झालेले आहे. बोटाला शाई लावून घ्या आणि आपले कर्तव्य पार पाडा.

तुमच्या पसंतीच्या कलाकृतीस मत द्या.

एक पाऊल उचला.... तुमच्या मनासारख्या कलाकृतींना मायबोलीवर प्रोत्साहीत करण्यासाठी.

पाककृती स्पर्धा मतदानकेंद्राचा पत्ता: http://www.maayboli.com/node/50769
कोतबो स्पर्धा मतदानकेंद्राचा पत्ता: http://www.maayboli.com/node/50768

समारोप अतिशय गोड. गणेश उत्सवाच्या निमीत्यानी कीत्ती तरी नविन माहिती, लेख , पा. कृ. , वेगवेगळ्या शहरातले
गणपती पहायला मिळालेत... संयोजकांचे मनापासुन कौतुकः)

पडद्याआडच्या व पडद्यापुढे येऊन हा उपक्रम यशस्वी करणार्‍या सर्व संयोजक मंडळी व मदत चमूचे खास कौतुक व अभिनंदन! जोरदार झाला यावर्षीचा कार्यक्रम! उपक्रम नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक होते. संयोजकांनी घेतलेले कष्ट व उपक्रम यशस्वी व्हावा यासाठीची त्यांची धडपड, उत्साह हे सारे काही जाणवत होते. मंडळींची ती लगबग घरचे कार्य असल्यासारखी सुखावून जात होती. >>>> अगदी अगदी ... Happy

कोणतंही काम पूर्ण करताना हजारो अनाम हात त्यापाठी कसे लागलेले असतात याची प्रचिती इथे आली. >>>>> खरे आहे - अशा हजारो अनाम हातांमुळेच कार्य कसे सहज सिद्धीला जाते ... ____/\____

उदयन... यांचा अक्षर गणेश अतिशय आवडला.

गार्गी दत्ता - विशेष कौतुक... Happy

गणेशाचा जाहला सोहळा | सान-थोर जाहले गोळा |
उपक्रम, स्पर्धा, खेळां | पूर आला ||
त्यातही स्पर्धांचा भारी जोर | प्रवेशिका आल्या थोर थोर |
कोण फिके कोणासमोर? | कळेचि ना ||
कोतबो की आकशिबा? | यात कोणाचा दबदबा |
मायबोली वाचका बा | समजावी मज ||
करौनी मतदान पुण्यकर्म | पाळ आपला वाचकधर्म |
स्पर्धा-निकालाचे मर्म | मतदानी ||
आवडली जी प्रवेशिका | तयावरी तू मार शिक्का |
मतदानाच्या आपल्या हक्का | बजावी बा |
निर्णय कळेल सोमवासरी | धीर धरा सर्वांनी तोवरी |
अभिनंदन तदुत्तरी | करा विजेत्यांचे ||
सकळ पावेल सिद्धता | गणेशाची कृपा होता |
तोच सकळाचा कर्ता-धर्ता | आदि-अंती त्यांसी वंदन ||

- चैतन्य Happy

काही आठवड्यांपूर्वी , यावेळेस कुणीच स्वयंसेवक पुढे न आल्यामुळे यावेळचा आपला गणपती उत्सव होतो का नाही अशी वेळ आली होती. पण नुसता गणपती उत्सव झाला नाही तर अतिशय उत्तम झाला.

सगळ्या संयोजकांचे मनापासून आभार.

वेबमास्तर, Happy तुमचे 'अतिशय उत्तम' हे शब्द खूप मोलाचे आहेत. मोठ्यांकडून शाबासकी मिळाल्यावर धन्यवाद म्हणत नाहीत ना आपल्याकडे? Happy
सर्वांचे पुन्हा एकदा वैयक्तिकरीत्या आभार!

खुप मजा आली ह्या वर्षी

संयोजकांचं खूप कौतुक आणि धन्यवाद!

Pages