कविता१९७८ - मलाही कोतबो - सुरेश कुडाळकर

Submitted by कविता१९७८ on 2 September, 2014 - 02:23

नमस्कार मंडळींनो , कसे आहात ??? आँ मला ओळखलं नाही म्हणता ?? अर बापरे ... लक्ष असु द्या बाबाजी लक्ष असु द्या .. ही मंडळी काय म्हणतायत त्यांचं त्यांनाच माहीत नाहीये बाबाजी त्यांना माफ करा.. लक्ष असु द्या बाबाजी... अरे आता ओळखलं की नाही??? बरोबर ! रोज झी मराठी वर रात्री ८.३० वाजता तुम्हाला जागेवर खिळ्वुन ठेवणार्‍या "जुळुन येती रेशीम गाठी " मधला मेघनाचा बाबा सुरेश कुडाळकर. अहो तुम्हाला सांगतो माझ्या हा डायलॉग इतका फेमस झाला की आख्खी सीरीयल सुरुवातीला मीच खेचुन धरली होती. पण कुणाला माझे कौतुक असेल तर शपथ , सर्वांना मी मनोरुग्ण वाटतो. मेघनाच्या सासरचे तर माझ्या मागे माझी टींगल टवाळी करतात, काय हे संस्कार म्हणायचे का? अहो मला बोलतात ते बोलतात पण प्रत्यक्ष बाबाजींना ही सोडत नाहीत?? पण मी सतत बाबाजींना विनवणी करत असतो की त्यांना माफ करा , काय आहे की शेवटी माझ्या मुलीचं सासर आहे ना , ते कष्टात असतील तर आमची मेघना ही कष्टात असेल ना , म्हणुन हे सगळं.

मेघना माझी एकुलती एक मुलगी पण काय सांगु पोरीनं नाक कापलं हो माझं , अहो तुम्हाला सांगतो आयुष्यभर कष्ट केले ह्या पोरीसाठी , कधी कुठली हौसमौज केली नाही , सरकारी खात्यात लाच वर लाच घेउन पैसा उभा केल्या हिच्या लग्नासाठी , अहो लाच घेणं आणि ती साळ्सुदपणे पचवणं काही सोप्पं काम नाही पण बाबाजीच्या कृपेने काही सापडले गेलो नव्हतो रीटायर्मेंट पर्यंत, बाबाजींचीच कृपा... "लक्ष असु द्या बाबाजी लक्ष असु द्या. पण पोरीने प्रेम केलं ते ही फाटक्या चड्डीवाल्याबरोबर?? घरात लहान पणापासुन मी तिला माझ्या धाकात ठेवली, सतत चेहरा पाडुन असायची , अहो वाटलं नव्हतं हो कधी असं करेल, त्या फाटक्या चड्डीवाल्याच्या ना आई वडीलांचा पत्ता ना घरादाराचा , एका आश्रिताबरोबर कसं लग्न लावुन दिलं असतं. मग आदित्य देसायाच्या गळ्यात बांधली , हो पण ते सहज शक्य नव्हतं हो , मेघनानं त्या फाटक्या चड्डीवाल्याबरोबर पळुन जायचा प्रयत्न केलाच पण बाबाजी धावुन आले.. त्यांनी सगळं सुरळीत केलं हो "लक्ष असु द्या बाबाजी लक्ष असु द्या".

बरं मुलीचं लग्न तर झालं पण तिचा संसार पण व्यवस्थित सुरु झाला पाहीजे ना की ती लग्नानंतर फाटक्या चड्डीवाल्यालाच भेटते हे पहायला नको? म्हणुन मी तिच्या मागे एक गुप्तहेर लावला नाही तसं बाबाजींच सतत लक्ष असतंच की हो पण
त्यांना उगाच त्रास नको म्हणुन मी खाजगी गुप्तहेर नेमला तर जावयाने मलाच झापलं, आता बोला , नाही तसा जावई देव माणुस हो , पण त्याच्या घरचे एक से एक नमुने. त्याचे वडील सारखे उपदेशाचे ज्ञानामृत पाजत असतात आणी आई जेव्हा
पाहावं तेव्हा डोळे मोठ्ठे करुन बोलत असते, तिला पाहुन धसकाच बसतो एवढी अवाढव्य बाई !! सारखं आपलं गोड गोड बोलणं , अहो तुम्हाला म्हणुन सांगतो घरात कुणाला ना कुणाला तरी मधुमेह झालाच असेल इतकं गोड वातावरण. जावयाचा भाउ आणी वहीनी ठीकठाक आहेत पण बहीणी बद्द्ल तर विचारुच नका सारखी कुठ्ल्या ना कुठ्ल्या बाबतीत तोंड खुपसत असते , चोंबडी कुठली. नुसती नावालाच वेगळी राहते खाणंपिणं सर्व माझ्या मुलीच्याच सासरी हो. आणी जावयाच्या बहीणीचा नवरा तर अतिहुशार , अक्कल वापरुन काही खर्च न करता मेघनाच्या सासरी राहतो ,घर जावई कुठला ,तो पण फाटक्या चड्डीवाल्याच्याच कॅटेगरीतला. मला तर संशय आहे की तोच माझा दुश्मन आहे. माझं वाईट पाह्तो हो मला सारखं पाण्यात पाहतो. हो पण बाबाजींपुढे कुणाचीच डाळ शिजत नाही बरं का..बाबाजी मला संकेत देउ लागले आणि मला ह्याचा सुगावा लागला.. लक्ष असु द्या बाबाजी लक्ष असु द्या.

आता मला सांगा बाबाजी कधी चुकीचं सांगतील का? त्यांनी निरोप पाठवला की एका वर्षाच्या आत जर मेघना आणि आदित्य (देसाई) ला मुल झालं नाही तर काही वाईट घडेल, पण ह्या लोकांनी मलाच वेड्यात काढलं , माझ्या बाबाजींना नाही नाही ते बोलतात हो हे लोकं . बाबाजी ह्यांना माफ करा ह्या लोकांना कळत नाही हे काय करतात .. लक्ष असु द्या बाबाजी लक्ष असु द्या. इथे मी पाहतोय की मेघनाला लवकर होउदे आणि मेघनाचं घोडं गंगेत न्हाउ दे तर ह्यांचं आपलं वेगळंच , तीला कॉलेजात काय पाठवलं आणि काय काय. आणि माझ्या तर मागेच लागले आहेत , माझ्या नकळत मला मानसोपचार तज्ञा कडे काय घेउन जातात. पण तुम्हाला माहीतीये का? तो मानसोपचार तज्ञ बाबाजींचाच शिष्य हो तोही बाबाजींचे संदेश माझ्या पर्यंत पोहोचवत असतो. अहो माझ्या बाबाजींची महतीच अशी आहे त्यांचे भक्त चारही बाजुला पसरलेले आहेत.

बाबाजींचे संकेत मिळुनही ते न पाळल्यामुळे माझ्यावर अरीष्ट ओढवले, अहो घरात नसताना माझ्या घरात चोरी झाली. पाहीलंत ना बाबाजींना कमी लेखल्याचे दुष्परीणाम?? मेघनाचं ते फाटक्या चड्डीवाल्याचे प्रकरण सासरी उघडकीस आले. काय राग राग केला त्या लठ्ठ आणि मठ्ठ सासुने , आणी त्या आगाउ नणंदेने. पण बाबाजींची कृपा शेवटी जावयाने सगळे सुरळीत केले हो.. "लक्ष असु द्या बाबाजी लक्ष असु द्या".आता काय तर ह्यांना चांगुलपणाची हुक्की आलीये, सर्वांच्या मनात त्या फाटक्या चड्डीवाल्याबद्द्ल दया उत्पन्न झालीये, आता माझ्या मेघनाचं काय होणार? सीरीयल वाल्यांनी जर आदित्य देसायाला गायब करुन फाटक्या चड्डीवाल्याला मेघनाच्या आयुष्यात आणलं आणी देसाई कुटुंबाने ते मान्य केलं तर माझी आतापर्यंतची मेहनत जाईल की हो पाण्यात. अरे बापरे... बाबाजी लक्ष असु द्या बाबाजी..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता,
अफलातुन पात्र निवडलयसं.. खुप मजा आली वाचताना... हातवार्‍यांसह बाबा कुडाळकर डोळ्यसमोर आले... नी ते पण म्हणताहेत... बाबाजी.. लक्श असु द्या कविता वर.... Happy

लय भारी......
आवडेश.......पुलेशु...

मस्त !