फारएण्ड - मलाही कोतबो - एक साईड व्हिलन

Submitted by फारएण्ड on 31 August, 2014 - 19:40

काय डोक्याला ताप राव! असले झंपट टीशर्ट आणि प्यांट घालून फाईट करायला लावतात. तो मेन व्हिलन राहतो बाजूला पिक्चर भर नुसत्या धमक्या देत आणि हीरो आला की फाईटला आम्ही. तरी बरं ष्टोरीत लौकर मेलो तर लगेच दुसरा पिक्चर शोधून तिथली फाईट करायला जाता येतं. नाहीतर उगाच चार महिने शूटिंग ला वेळेवर तयार राहावं लागतं. त्यात अर्ध्या वेळा शूटिंग कॅन्सल.

आता बच्चनकडून, धरमपाजींकडून मार खायला काय वाटायचं नाही. पहिलं म्हणजे ते खरंच मारतायत असं वाटायचं. दुसरं म्हणजे सीन टायमावर शूट होउन बच्चन मोकळा व आपण मोकळे दुसर्‍या स्टुडिओत जायला. नाहीतर एकेकाचे नखरे. "आज मूड नही है". फाईट केलीच, तर आजवर कधी डोक्याच्या वर हात उचलला होता का नाय असं वाटेल. आणि आम्ही आडवं व्हायचं. त्यात ग्रूप फाईट असली तर अजून कल्ला. हा हीरो समोरच्याला मारत असला तर मागून मारायचं नाही. थांबायचं. तो त्या समोरच्याला मारणार, आपण इकडं वाट बघायची. किक शॉट असेल तर मग हीरो कमरंला बाम बिम लावून दोन तासानी पुढचा शॉट. मग आम्ही हात उगारून यायचं या बाजूने. तोपर्यंत हा हीरो आराम करून येणार मग फाईट कंटिन्यू. त्यात कोणाचं डोकं चाललं, तर तो आधीचा मारलेला पुन्हा आडवा करतात समोर, नाहीतर कोणाला पत्ता नाही. आता बघा, शूटिंग दोन तासानं झालं तरी पिक्चर मधे हा तोच सीन आहे ना? हीरोने त्याला आडवा करून इकडं वळल्यावर तो पडलेला कुठं गायब झाला? जाउद्या. आपल्याला काय करायचं आहे. कधीकधी तर सेम पिक्चर मधे आधी मेलो असलो तरी नंतरच्या फाईटला परत आणतात. कोणाला कळण्याएवढं आपल्याला कोण लक्षात ठेवतो.

दुसरं, एकेक चिपाड हीरो. फाईट मधे सुद्धा आपली झुल्फं ठीक आहेत ना बघत बसणार. इकडून फाईट मार म्हंटलं तर म्हणतो नाय - कॅमेर्यापुढं फक्त उजव्या साईडने येणार. मग एक "ढिशूम" आणि आम्ही आडवं पडायचं खाली आणि पडून राहायचं 'कट' होईपर्यंत. आता याच्या फाईट ने जाहिरातीतला कट आउट सुद्धा खाली पडणार नाही. पण ठीक आहे, सीन आहे, पडलो. तर काय पुन्हा उठून बसणार नाही, त्याला पुन्हा मारणार नाही? सीन मधे पाहिलं तर हीरो तसाच पुढं.

सीन लिहीणारे पण कायपण लिहीतात. तो सर जॉन, जे के, ठुकराल नायतर असल्याच कोणाच्यातरी अड्ड्यावर आम्ही वॉचमन सारखे उभे सीनमधे. आता पंध्रा वर्षांपूर्वी हीरोच्या कोणालातरी मारलं म्हणून कधीतरी तो हीरो मारायला यील म्हणून हा जेके काय २४ तास आम्हाला दारात उभा करणार काय? आणि हा जेकेला मारायला आलाय, तर आम्ही कशाला त्याच्यावर एवढे चिडून त्याच्या अंगावर जाणार? डायरेक्टर म्हणतो एकदम फुल रागात दात काढून, हातपाय हलवत जायचं. उगाच कायच्या काय. नाहीतर तो दचकायचा सीन. आता हीरो फुल बाईक घेऊन भिंत फोडून आला तर तेव्हाच सगळे एकदमच दचकतील ना? तर तसं नाय दाखवायचं. हीरो जिकडं जसा बघेल तसा तिकडच्यांनी दचकायचं. कायपण कॉमेडी.

फाइटमास्तर पण कायपण फाईट करतो - फुल बँडेज मधला हीरो सलाईन काढतो, हॉस्पिटल मधून पळत येतो आणि आम्हाला एका फाईटमधे आडवा करतो. त्यात परत हेटाई - आपण रिअल मधे फाईट करताना मार खाईल पण पळून नाही जाणार. तर इथं, फाईटच्या शेवटी हीरो नुसता आमच्याकडे रागाने पाहतो तर आम्ही पळून जायचं, नाहीतर हीरॉइनकडून पण फाईट खायची. आपल्याला त्याचे काही नाही. आता तो चिपाड हीरो जर दहा जण आडवे करू शकत असेल तर हीरॉइनने काय घोडं मारलंय. पिक्चर मधल्या सगळ्या फाईटमधे असलो तरी आमचं नाव पिक्चर मधे येतच नाय. मेन व्हिलनने नाव घेतलं तर ते फितूर झालो समजून मारून टाकायला. हीरो तर डायरेक्ट "ये भाडे के टट्टू" म्हणूनच सांगतो. आता मेन व्हिलनचा नोकरच आहे ना? हीरो ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथला तो पण काय भाडे का तट्टू असतो काय?

त्या 'कुली' च्या फाईटमधे बच्चनला लागलं तेव्हा फुल हेडलाईन. सगळे नेते हॉस्पिटलात. ठीक आहे, आम्हाला पण वाईट वाटलं. लै लागलं होतं, त्यात बच्चन फेमस आहे. पण अशा फाईट मधे आमच्यासारखे जेव्हा जखमी होतात तेव्हा बातमीपण येत नाही. प्रोड्यूसर चांगला असेल तर भरपाई चांगली मिळते, नाहीतर काय खरं नाही. जाउ दे.

जरा रोल तर नीट लिहा राव. कालिया, सांबा, पीटर, नारंग सारखं काहीतरी. नाहीतर फुल मेन व्हिलनचा रोल कसा मिळेल? सूट घालून जेके म्हणून थेट पोलिस स्टेशन मधे जायचा सीन, नाहीतर मोठ्या हवेलीत हुक्का घेऊन बसायचा सीन करायचा आहे. "बाँध दो इसे" डायलॉग मारायचा आहे. कोणी आमच्यासारखे साईड व्हिलन असेल तर सांगा काय करता येइल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

खुपच छान.
जेव्हा पाव किलोचे हिरो 70-80 किलोच्या व्हिलनला लोळवतात तेव्हा डोके आउट होउन जाते.
Tollywood तर असह्य

मस्त लिहिलंय.. हल्लीच्या मॅट्रीक्स स्टाईलमधे फाईट मधे तर टांगून वगैरे घ्यावे लागत असेल ना ?

मस्त लिहिलं आहेस फा Happy
अगदी क्वचीत शोले मधल्या कालिया सारखे नशिबवान साईड व्हिलन " मैने आपका नमक खाया है सरदार" म्हणत कायम लक्षात राहणारे Happy

Happy छान! एक मॅक मोहन नावाचा साईड व्हिलन होता. एक दिवस कळले तो रविना टंडनचा मामा. उगीच धक्का बसला. शक्तीकपूर (अर्थात पुढे अनेक सिनेमात तो मेन व्हिलन होता) 'आपल्या' पद्मिनी कोल्हापुरेचा जिजा तेव्हा पण धक्का बसला होता. आवडता साईड व्हिलन पप्पू कन्घी.

>>>आणि हा जेकेला मारायला आलाय, तर आम्ही कशाला त्याच्यावर एवढे चिडून त्याच्या अंगावर जाणार?<<<

Lol

मस्त लिहीलय फारएण्ड Proud

क्वचित 'अंदाज अपना अपना' सारख्या पिक्चरनी एक सोडून तीन-तीन साईड व्हीलन्सला न्याय दिलाय.
तेजा मुख्य व्हीलन आणी रॉबर्ट, भल्ला अन गोगो साईड व्हीलन्स Happy