शुभ्र आभाळाचा एक तुकडा....

Submitted by रसप on 31 August, 2014 - 02:27

आदरपूर्वक, प्रेमपूर्वक एकेरी उल्लेख आपण सहसा मित्र, आई आणि देव ह्यांचा करत असतो. पण काही लोक असे असतात की त्यांच्यात कधी आपल्याला मित्राच्या खांद्याप्रमाणे आधार मिळतो. कधी आईच्या मायेचा ओलावा लाभतो. तर कधी एखाद्या दैवी अनुभूतीने प्रचंड बळही मिळतं. ह्या लोकांशी आपला वैयक्तिक परिचय नसतो. ते असतात कुणी खेळाडू, कलाकार, लेखक, नेते वगैरे. कदाचित, वैयक्तिक परिचय नसल्यामुळेच आपण त्यांना आपल्या नकळतच आपल्या मनात एक असं स्थान देऊन मोकळे होतो, जे आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असतं. कोंदणातील हिऱ्याप्रमाणे खास, सुरक्षित असतं. असे काही लोक माझ्यासाठीही आहेत. त्यांतील प्रत्येक जण अनोखा हीरा आहे. ज्याच्या तेजाने मी पुन्हा पुन्हा दिपून जातो आणि कधी त्या जादुई प्रभेपुढे अभावितपणे नतमस्तक होतो, हात जोडतो, तर कधी त्यांच्या इतक्या जवळ ओढला जातो की त्यांना स्वत:चा किंवा स्वत:ला त्यांचा एक भागही समजू लागतो. ह्या सर्वांचा उल्लेख मी नेहमी एकेरीच करत असतो. त्यात मला त्यांचा अवमान केल्यासारखं वाटत नाही आणि इतका विश्वासही वाटतो की त्यांनाही त्यात गैर असं काही वाटणार नाही. कारण मित्र मित्राचा, मूल आईचा आणि भक्त देवाचा उल्लेख एकेरीच करत असतो.

'चित्रपट' हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. मला त्यातलं तांत्रिक व ऐतिहासिक ज्ञान फारसं नाही. पण मला चित्रपट व्हिस्की प्यायल्याप्रमाणे बघता येतो आणि आवडतंही. व्हिस्कीप्रमाणे म्हणजे घोट-घोट. पानांपानांवरून दवाचे थेंब जसे ओघळतात तशी चांगली व्हिस्की जिभेवर क्षणभर रेंगाळून गळ्यातून पोटात उतरते आणि तसाच चांगला चित्रपट कान व डोळ्यांद्वारे एकेका दृश्यातून माझ्या मनात झिरपतो.
ह्या चित्रपटाच्या आभाळाचा एक तुकडा असा आहे की त्याने शिंपडलेल्या दवाने माझ्या अंतरांगणाचा एक मोठा भाग ओथंबलेला आहे.
हा आभाळाचा तुकडा कधी 'मुसाफिर' बनतो अन् माझा हात पकडून 'मुझे चलते जाना है..' म्हणून अश्या दुनियेत फिरवून आणतो, जिथे -
दिन ने हाथ थाम कर इधर बिठा लिया
रात ने इशारे से उधर बुला लिया
- अश्याप्रकारे त्याला दिवस-रात्र खुणावतात. तर कधी 'यादों पे बसर' करणारा तो मला 'बस्तियों तक आते आते रस्ते मुड़ गयें' म्हणत 'उजडे हुये आशियाने' दाखवतो. कधी 'इक पल रातभर नहीं गुजरा'च्या भयाण व्यथेसोबतच तो 'तुम अकेलेही नहीं हो, सभी अकेले है' असा 'हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से'चा दिलासा देतो, तर कधी 'सुस्तक़दम' रस्त्यांवरून 'पत्थर की हवेली से तिनको के नशेमन तक़' घेउन जातो. कधी तो एक मूक-बधीर अव्यक्त भावना कॅमेऱ्यात बांधतो, तर कधी रेल्वे स्टेशनच्या एका वेटिंग रूममध्ये भूतकाळाला उजळणी देतो. कधी रोगराईपुढे गुडघे टेकणाऱ्या मानव्याला हात देऊन उभं करणाऱ्या डॉक्टरची घुसमट दाखवतो, तर कधी राजकारण व सामाजिक आयुष्यामुळे वैयक्तिक आयुष्याची वाताहत करणारं वादळ दाखवतो.

कवी, गीतकार, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथालेखक अशी त्याची अनेक रूपं आहेत. मला मात्र 'कवी'पेक्षा त्याची इतर रूपं अधिक भावली. एक दिग्दर्शक म्हणून सत्तरच्या दशकापासून जवळजवळ ३० वर्षांत त्याने केलेल्या चित्रपटांना कधीच गल्लाभरू रूप नव्हतं. He was always ahead of his time. इजाजत, आंधी, कोशिश, मौसम, खुशबू सारख्या चित्रपटांद्वारे त्याने स्पर्श केलेले विषय कुणाही साध्या-सुध्याच्या कुवतीचे नव्हते. त्याच्यातला कवी त्याच्या दिग्दर्शनातून मला जास्त उत्कटतेने भेटला आहे.

शुभ्र, स्वच्छ कुडता-पायजमा आणि निर्विकार चेहऱ्यावर एक निर्मळ स्मितरेषा. एखाद्या योगी पुरुषाप्रमाणे वाटणारा 'गुलजार'. हाच तो आभाळाचा मूर्त तुकडा.
ती मूर्ती डोळ्यांसमोर आल्यावर असंच वाटतं की हा माणूस सुख-दु:खाच्या पुढे गेला असावा. कुठलंच दु:ख ह्याला तोडू, मोडू शकत नाही आणि कुठलंच सुख त्याला भुरळ पाडू शकत नाही. त्याची कविताही त्याच्या ह्या व्यक्तिमत्वासारखीच ! तटस्थ. भावनेच्या गुंत्यात शब्द गुरफटत नाहीत आणि शब्दांच्या विळख्यात भावना गुदमरत नाहीत. एखाद्या राजहंसाच्या नीर-क्षीर विवेकाप्रमाणे गुलजारसुद्धा स्वत:च्या कवितेतून शब्द आणि भावना वेगळ्या करू शकत असेल, इतकं ते लिखाण मला सुटसुटीत वाटतं. इथे 'कविता' म्हणजे, त्याच्या गीतांमधली कविता. पुस्तकांतला गुलजार मला -

=> इन उम्र से लम्बी सड़कों को मंज़िल पे पहुँचते देखा नहीं
=> रात की बात हैं और ज़िन्दगी, बाकी तो नहीं..
=> होठों पे लिए हुए दिल की बातें हम, जागतें रहेंगे और कितनी रातें हम
=> पास नहीं तो दूर ही होता, लेकिन कोई मेरा अपना
=> अपना किनारा नदिया की धारा हैं
=> नाम गुम जाएगा, चेहरा यह बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान हैं
=> आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं..
=> इक बार वक़्त से लम्हा गिरा कहीं, वहाँ दास्ताँ मिली लम्हा कहीं नहीं
=> मुस्कुराऊँ कभी तो लगता हैं, जैसे होठों पे क़र्ज़ रखा हैं
=> तुम्हारी पलकों से गिरके शबनम हमारी आँखों में रुक गयी है
=> गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो, वो भिजवा दो मेरा वो सामान लौटा दो
=> दिन का जो भी पहर गुजरता हैं, कोई एहसान सा उतरता हैं
=> आसमां के पार शायद और कोई आसमां होगा !

- ह्या गुलजारइतका भिडत नाही.

आज गुलजारचा वाढदिवस नाही. त्याला कुठला पुरस्कार जाहीर झाल्याची बातमीही नाही. पण, कधी कधी रात्री, अर्धवट झोपेत असतानाही एखादं गाणं आपल्याला आठवतं, कधी कधी काही कारण नसतानाही एखाद्या जुन्या मित्राची आठवण येते, अचानक कधी एखाद्या विचित्र वेळी चहा पिण्याची लहर येते किंवा एकदम हुक्की येते आणि बाईक काढून रिमझिम पावसात एक लांब फेरफटका मारावासा वाटतो, तसंच काहीसं झालं आणि झिरपलेला गुलजार पेरलेल्या बीने अंकुरावं, तसा मनातून उमलून येतो आहे असं वाटलं. आणि मग हळूहळू बरंच काही आठवलं. काहीच कारण नसताना 'आनंद, बावर्ची, चुपके चुपके, अंगूर, चाची ४२०' चे डायलॉग्स आठवले. 'मेरे अपने'मधले विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, 'परिचय'मधला जितेंद्र, 'मौसम'मधली शर्मिला, 'खुशबू'मधली हेमा मालिनी, 'आंधी'मधली सुचित्रा सेन, 'नमकीन', 'अंगूर'मधला संजीवकुमार, 'कोशिश'मधली जया भादुरी, 'इजाजत'मधले नसीर-रेखा सगळे आठवले. खास गुलजारसाठी चाली राखून ठेवणारा 'पंचम' आठवला आणि मग पुन्हा 'मैं अकेला हूँ धुंद में पंचम' म्हणणारा 'गुलजार' आठवला.

पावसाळ्यातल्या एका भल्या सकाळी घराबाहेर झाडं, घरं, रस्ते, माती, दगड सगळं काही पावसाने चिंब झालं होतं आणि मी माझ्यातच फार पूर्वीपासून साठवून ठेवलेल्या दवात....

छोटासा साया था, आँखों में आया था
हमने दो बूंदो से मन भर लिया
हमको किनारा मिल गया है ज़िंदगी

Lyricist_Gulzar.jpg

__/\__

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2014/08/blog-post_31.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुंदर.. त्यांच्या गाण्यात प्रत्येकवेळी नवा अर्थ गवसत राहतो. आज लोकसत्तामधे रुके रुकेसे कदम, आणि दिल ढूँढता है वर मृदुला दाढे जोशींनी छान लिहिले आहे.

नाम गुम जाएगा, चेहरा यह बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान हैं.... वाह गुलझार !

आनंदपाठोपाठ हा लेखही सुंदर रसप .. लेखणी फॉर्मला आहे .. गावस्कर म्हणतो तसे फॉर्ममध्ये असताना मिळतील तेवढ्या धावा कुटून घ्यायच्या तसे यातच न रमता येऊद्या आणखी ..

अप्रतिम लिहिलंय, रसप.

आनंदपाठोपाठ हा लेखही सुंदर रसप .. लेखणी फॉर्मला आहे .. गावस्कर म्हणतो तसे फॉर्ममध्ये असताना मिळतील तेवढ्या धावा कुटून घ्यायच्या तसे यातच न रमता येऊद्या आणखी ..>>>>अभिषेक, +१०००० Happy

दिलसे !
>> आणि मी माझ्यातच फार पूर्वीपासून साठवून ठेवलेल्या दवात....>>

भिजून गेलाय लेख आकाशीच्या आसवात.

रणजित अप्रतिम मनोगत. या लोकांची आणि त्यांच्या लिखाणाची आठवण काढायला कोणत्याही अवॉर्ड किंवा सत्काराची वगैरे गरज नाही. कुठेतरी कायम मनत रूंजी घालतच असतात. आणि कधीतरी असे पटकन वर येतात.

'तुम्हारे गम की डली उठाकर
जबाँ पे रख ली है मैंने देखो
ये कतरा कतरा पिघल रही है,
मैं कतरा कतरा ही जी रहा हूं

व्वा !

किती सहज सुंदर उतरलंय मनोगत !

गुलजारची कविता ही माझ्यासाठी तरी अनुभवण्याचीच गोष्ट आहे. फार कमी वेळेला तुमच्यासारखा असा आभाळाचा पारा पकडता येतो !

अजून लिहा..

सहज सुंदर लेख - अगदी मनाच्या मनातून उतरलेला - जणू रेशमी श्रावण शिडकावा ..... कोणाही रसिकाला चिंब भिजवणारा ...

रसप ,
माझ्या जीवनाचा एक कोपरा ह्या 'गुलजार'ने व्यापलाय.
ह्या लिंकवर गुलजारची एक तासाची मुलाखत आहे. त्यातून गुलजार मस्त उलगडत जातात....

गुलजार कसे घडले याचा तो एक दस्तावेज आहे. चरित्र नव्हे...

गुलजारच्या कविता वाचताना त्या "ऐकू" येतात Happy

https://www.youtube.com/watch?v=eJQ0sh-BU_8