गणपती बाप्पा मोरया!

Submitted by इन्ना on 27 August, 2014 - 03:05

गणपती बाप्पा मोरया!

काल गप्पांच्या पानावर सहज कोकणातल्या गणेशोत्सवाचा विषय निघाला , आणि मी एक सैर करून आले मनातल्या मनातच. ह्या वेळी घरच्या गणापतीला कोकणात हजेरी लावता येणार नाहीये ह्याचा सल होताच मनात , तो ह्या सफरीनी जरा हलका झाला.
कोकणातल्या गणपती बद्दल ऐकल बरच होतं पण अनुभवल ते लग्न करून मालवणकरीण झाल्यावरच . आम्ही चाकरमानी गटातले, शहरात वावरलो तरी हॄदय कोकाणातल्या वाडीत तिथल्या लाल मातीत सांभाळून ठेवायला दिलेल. दसरा दिवाळी च नाही एवढ महत्व कोकणातल्या लोकाना गणपतीचं ( गणेशोत्सव इथे पुण्यामुंबैकडे असतो , कोकणात गणपती च Happy )
चाकरमान्याना जेष्ठापासून वेध लागतात . कोकणकन्या, लाल डबे, बुकिंग केल की पहिली थाप पडते ढोलावर.

कोकणातल्या मुळ घरी पण लगबग असतेच. कारखान्यात/रंगशाळेत घरचा पाट विधीवत नेउन द्यायचा. रवळानाथाच्या मंडपात . ह्या खेपेचा गणोबा कस हवाय त्याच वर्णान , बाल गणेश हवाय का लवंडलेला, का सिंहासनावर बसलेला, मुकुट कसा हवाय? सोवळ्याचा रंग कसा? उपरण्याचा कसा? सिहासन सोन्याच का लोड तक्के वाल? एक ना दोन . उपस्थित बाल्गोपाळ मग येता जाता हजेरी लावत कामकाजाची पहाणी करणार . आपला आणि शेजारच्या वाडीतल्याची तुलना करणार, ओ मी जरा शिंवासनाला रंग मारू का चा लकडा लावणार. रंगार्‍याच्या मागे गुडघ्यावर हात ठेउन त्याच्याच एकाग्रतेत जणू सामील होत डोळे रंगवताना पाहणार.

इकडे चाकरमान्यानी सणाची तयारी सुरू केलेली असते. कोकणात रोजचे अपडेट देत घेत ठरवाठरवी चालू असते. ह्या खेपेला दागिना कोणता ? येणारी मंडाळी कोण कोण, शहरातून न्यायच्या अप्रूपाच्या गोष्टी कोणत्या ? रिझर्वेशन असेल तर वेटिंग वर पुढे सरकलात का नै? गाडीघोडे वाले असाल तर ' कुठे हातान उचलून न्यायचय, गाडीत काय ओझं' म्हणत झालेली डिक्कीभर बोचकी . एक एक सामान गोळाअ करताना ढोलाचा रिदम वेग घ्यायला लागतो. आणि गाडीसमोर नारळ फोडून गणापती बाप्पा SS मोsssरया चा गजर करत निघालात की बाप्पा फिवर पूर्ण चढलेला असतो. Happy

चाकरमानी एक एक करून 'घरी ' यायला लागतात. कोप्भर चहा मारून , माटवी, त्याला टांगायची फळ, लोकल रानफुलं , फळ्भाज्या यांची जमवाजमव सुरू होते. शुद्ध मराठी पुणेरी बोलणारे , हेल काढून मायबोलीत बोलायला लागतात. बायकांची फराळ , पुढच्या काही दिवसांचे मेन्यु, त्यासाठी लागणारी पुर्वतयारी, पुजेच्या उपकरणींची घासपुस अशी लगबग सुरू होते.

चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणूच्या आईची पुजा. परसातुन गोळा केलेली पिवळी धम्म फुलं आणि त्याला बांधलेली काळी पोत! ही आमची पार्वती. तिच्या नावानी उपास तिला पातोळ्यांचा अन पाच भाज्यांचा नैवेद्य अन तोवर शेवटाच्या मिनीटापर्यंत चालू असलेली मखराची सजावट. ह्या खेपेक माळ आणूक नाय ? झुरमुळ्या बर्‍या दिसतायत! मागच्या पडाद्यावर पण दोन लावा रे! चौरंग ठेवलात काय? त्यावर अंथरायला ही रेशमी घडी घ्या! ढोल घुमायला लागलेला असतो.

आमच्या घरात देवाची शेपरेट खोली आहे. तिला स्वैपाक घरातून एक अन बाहेरच्या खोलीतून असे दोन दरवाजे आहेत. गुरुजींच बुकिंग , मग ते यायच्या आधी घरातले थोर अन चाकर्मानी हौशीनी गाडी घेउन रवळ्नाथाच्या देवळात जातात. आपला बाप्पा , घेउन येतात, बाप्पाच्या नावाचा गजर बाल गोपाळांच्या उत्साहावर अवलंबून . घरी सगळ्या मालवणकर्णी, रेशमी साड्यांत तैय्यार. आधी बाप्पा येउन समोरच्या खोलीत टेकतो. मग ताम्हणात हळद अन चुन्यानी लाल केलेल्या पाण्यात पहायच बाप्पाला. मग औक्षण करून बाप्पा चौरंगावर . तेवढ्यात एका काका ना आठवत अरे उंदीर खंय गेला, का आणलातच नाय? मग पळत जाउन कोनीतरी उंदीर आणणार .

मग त्याला सालागणीक घडवले गेलेले दागिने घालायचे , तोवर भटजी येतातच, 'हातात काकणां नाय काय गो तुझ्या?' म्हणून शहरातल्या सुनेला दटावणार.
साग्रसंगीत पुजा होईपर्यंत , सिनियर मालवण्कर्णींची फळी नैवेद्याच्या स्वैपाकात. केळी ची पान मांडून पंगत. त्या आधी पाच पानं कुलदेवता, गणुची आई , ते परसातली गाय सगळ्यांच्या नावानी बाजूला काढायची , उजवी डावी बाजू नीटच वाढली आहे ना ह्या बद्दल पाहणी करून कोणीतरी सिनियर काकी ओक्के म्हणाल्या की नैवेद्य दाखवायचा.

तेवढ्यात हळूच आम्च्या मोठ्या काकी सांगणार , ते रायत्यातले चार अंबाडे सलीलाक (घरातला एखादा फेवरेट नातु/पुतण्या Happy )काढून ठेवा हां, तुमच्या पुण्यात कैय्येक मिळणत नाय, आमच्या सुन्बाय्नी केलेले मोदक ग णपती समोर ठेवा हां , वेंगुर्ल्याच्या काकींना कोरीव काम जमत नै , आमची सुन्बाय काय सुबक एक साssर्खे करते मोदक. ( थोडीफार उणीदुणी , शालजोडीतले नसतील तर स्वैपाकघरात मजा नै Wink ) इथे स्वैपाकघरातली काम सिनियॉरीटीनी वाटालेली असतात. नविन सुना चिरणे ,कातणे, मदत करणे, त्यांच्या वरच्या रायती, भाज्याना फोडण्या वगैरे, आणि संगितीकेच सुत्र संचालन करणार्‍या सगळ्यात जेष्ठ !! उकड, तीच प्रमाण, वाटपातल प्रमाण, काम करतानाची क्रमवारी, शेजारून देवघरातून येणार्‍या मागण्या ( अहो पंचामृत पाठवा!! नैवेद्याला किती वेळ आहे अजून?भटाला कोपभर चा आणि फराळ !!) पुरवण . एखाद्या चुकार सुनेला दटावण, हे करत असतानाच खाउन पिउन घेतलय ना सगळ्या कामकर्‍यांनी, पोरांची खाण्याची व्यवस्था झालीये ना? चौफेर लक्ष. भल्या मोठ्या स्वैपाकघरात त्या एखाद्या स्टूलावर नाहीतर खुर्चीवर बसून रितसर काम करवून घेणार Happy

नैवेध्य! मग जेवण ३-४ पंगती आटोपल्या की संध्याकाळाच्या आरती आधी रांगोळ्या! , जमेल तसे /तिथे डुलक्या काढत नैतर पसरून , चाकर्मानी , जेवण मस्तच होतं याची साक्ष देतात. बायका , लग्नाळू मुल मुली, नवीन सुन, कर्तॄत्ववान (?) भौबंद, लेकरं, झालस तर गार्‍हाण काय घालायच याच्या चर्चा करत टेकतात.

फुलांच्या रांगोळ्या घालून देवघर आणि माटवी खालचा बाप्पा रिसेप्शन्ला रेडी. Happy
आवाठातल्या सामंतीण, कामतीण, कुठाळे, जवळपासच्या गावांतून येणारे नातलग, मित्र मंडळी ! चहाचे टोपच्या टोप अन बश्यांमधून प्रेमाने दिलेला फराळ. मग गप्पा, तु कुठे असतोस? लेक? लग्न करून कुठे गेली आता?झील काय करतो? तब्येती, न आलेल्या ज्ये नांची चौकशी , फार शीक असलेल्यां च्या बद्दल कळवळून बाप्पाला हात जोडणे. तेवढ्यातून आतून आवाज, ओ धडमाकडून वस्तू हव्यात , जा कोण तरी( धडाम हा स्टॅन्ड जवळचा वाणसामान / दुध/ पुजे निमीत्त लागणार्‍या सामानाच दुकान)
सगळी चिल्लत पार्टी त्या दादा बरोबर बाजारात. ( लिंबू सोडा नैतर दुध कोड्रींक वसूली !!) झालच तर येताना फटाक्यांची तजवीज ही .

तोवर दिवे लागणीची वेळ झाली की आरती, त्यात टिपेला सुर लाउन तास दिड तास १५-२० आरत्या. मग गार्‍हाणी, हा एपिसोड एकदम इंट्रेस्टिंग असतो ,महाराजा!
तोवर भजनी मंडळ / ढोल ताशे मंडळ वाडीत आल्याच दुरून ऐकायला यायला लागत. सगळे अंगणात जमा होउन , तोही एक कार्यक्रम पार पडतो .

रात्रीची जेवण आटोपली की आजचा दिवस कसा पार पडला, स्वैपाकाच्या चवी याचा आढावा घेत , उद्याची तयारी ,कामाची वाटणी करत मंडळी पाठ टेकतात.

दुसर्‍या दिवशीच स्पेशल म्हणजे काळ्या वाटाण्याची शिवराक आमटी, वडे, आणि कंदमुळ. गोड आमच्या घरी साखरभात करतात. सकाळ्ची आरती , अन फुलांची आरास. सोनटक्का अन जास्वंदाचे हार. आणि मुळातच एक प्रकारच प्रसन्न वातावरण या स्पेशल पाहुण्यामुळे. मनातल्या मनात माझ त्याच्याशी हितगुज चालू असत. वर्षाच्या सणाला आलेली लेक , बाबाशी बोलेल तस. Happy

कंदमुळातली फक्त कणस मिळाणाअर नाहीत हां, सगळ खायच म्हणत कौतुक भरला दम बालगोपाळाना देत, आग्रहानी साखर्भात खा अजून थोडासा, तुमच डायट अन फायट पुण्याला ठेवायच हां अस म्हणत खायला लावणार्‍या काकी .

परत एक संथ दुपार. अर्धवट निजानिज, कालच्या उरलेल्या गप्पा , बाहेर बागेत एक फेरफटाका, नवीन रोपं, पायाला मातीचा लाल रंग , लेक लहान असताना त्याला घेउन शोधलेली लाजाळूची पानं, तबक भरून गोळा केलेल्या पत्री, फुलं , झुपकन पळालेला सरडा, खारू ताई शंखातली शेंबडी गोगल गाय.

उशिरा दुपारी आरती आणि बाप्पा च्या विसर्जनाची तयारी, पंचखाद्य, मोदकाच्या आकाराचे पेढे, नेवर्‍या, रव्याचे लाडू. आरती झाली की हुरहुर वाटायला सुरवात होते अगदी. मंत्रपुष्पांजली म्हटली की , चाल्लास तु ? इतक्यातच ? अस वाटायला लागत. बाप्पा चौरंगावरून परत पुढच्या खोलीत येतो. ह्या वेळी तोंड बाहेरच्या दिशेनी. घरातले सगळे त्याच्या हातावर दही घालून , ये हो परत, वाट पाहतो अस सांगतात. दागिने उतरवून फुलांचे हार लेउन बाप्प्पा घरी जायला निघतो . नदीवर जाइपर्यंत , पोरानो आवाज मोठा काढा रे , पुजेची पिशवी कोणाकडे आहे? मोठ्या काकी अन आजीला गाडीतुन आण रे तू, फटाक्यांच बघतोयस ना रे, करत मिरवणूक नदिवर पोचते देखिल.

तिथे एक आरती अन मंत्रपुष्पांजली झाली की नेहेमीचा गडी पाट नेउ का विचारत येतो, डोळे ओलसर झालेलेच असतात तोवर. थोड आतपर्यंत, खोल पाण्यात नेउन गणपतीला पाण्याखाली नेउन परत वर काढून दाखवतात. एकटक पापणी ही न लवता त्याच्याकडे पहात एकजात सगळ्यांचे डोळे झरतात .
आला आला म्हणता हा गेलाही ?

मी फार देवभोळी आस्तिक नाही, हा गणोबा देवधर्म वाटतच नाही मला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्ना मस्त... वेग्स्ळच पन फार छान लिहिलय गं. << हा गणोबा देवधर्म वाटतच नाही मला.>> जगण्याचा भाग असल्यासारखेच वाटते.

वॉव इन्ना! मस्स्त लिहिलं आहेस. डोळ्यासमोर सगळं एकेक नाचायला लागलं.

ते शेवटचं वाक्य जसंच्या तसं मलाही लागू होतं.

वा इन्ना, जीयो! Happy खुप रसाळ लिहिलंयस गं..
चित्रदर्शी वर्णन.. चढत्या ढोलाची बॅकग्राऊंड अगदी झकास..
भारावून जायला झालं एकदम.

अर्रे व्वा! मला हे वातावरण फक्त लेखातुन/ऐकुनच माहिती होतं...पण तुमच्या ह्या सफरीमुळे अगदी खरखुरं जगल्याचा फील आलाय... खुप छान ओघवतं लिहिलयत तुम्ही Happy आणि आत्ता इथेही शेवटच्या काही ओळी वाचुन डोळे ओलसर झालेत. अप्रतिम!!!

इन्ना खुपच सुंदर लेख ..अगदि गावी आमच्या घरात नेलस..... फक्त हे गौरी गणपती पर्यत चालु असत..

त्याच्याकडे पहात एकजात सगळ्यांचे डोळे झरतात .
आला आला म्हणता हा गेलाही ? >>> डोळ्यात पाणी आल वाचतानाच..

मस्त्च लिहिलंय.
मी पण ( नावापुरता ) मालवणचाच, पण अजून एकदाही गणपतीत जायला जमले नाही. आमच्या घरी पण असेच वातावरण असणार. फक्त आमचा गणपती १० दिवसांचा असतो.

खूप मस्त, बारीक सारीक तपशीलांमुळे अगदी नखशिखांत उभा केलंस गणपतीला....

आमच्याकडे पण आज येऊन लगेचच जातो दुसर्‍या दिवशी..

इन्ना तु लिहिलेलं हे वर्णन काल कोपुवर तुकड्यात वाचलं होतं. पण आज आख्खं वाचताना सगळा गणेशोत्स्व अगदी आगमनापासून विसर्जनापर्यंत डोळ्यांसमोर तरळून गेला. तु गुलाबी कोटा साडीत जमेल ती लगबग करते आहेस ते ही दिसलं.
बाकी सगळ्या बाया नाकात नथ आणि नऊवारीवाल्या. असा उत्सव म्हणजे वर्षभराचं उत्साहाचं टॉनिकच. दिड दिवसाचा डोस झालाच पाहिजे. Happy

बाकी लेखातले 'बाल्गोपल, शिंवासन, झुरमुळ्या हे शब्द खूपच आवडले.

एक वेगळा गणेशोत्सव शब्दरूपाने इथे जिवंत केलास तू.

धन्यवाद सगळ्याना, Happy
एका पोस्ट ला उत्तर म्हणून लिहीत गेले अन तंद्री लागली काल. बर्याच गोष्टी राहिल्याच की अस परत वाचल्यावर जाणवल. पण ह्या मनातल्या सफरी फार भारी असतात. यु ऑलमोस्ट रिच Happy
गेली १६-१७ वर्ष मी अनुभवल आहे हे,कालपरत्वे बरेच बदल झालेत,स्टूल आता रिकामं असतं, माझी मधल्या फळीत बढती झालीये , लाजाळूच्या पानामागे धावणारा लेक आता धाकल्याना लिंबु सोडा प्यायला नेतो. पण उत्सव्मुर्ती मात्र तोच आणि तसाच आहे.
दक्षे माझ्या कडे इतरही बर्‍या साड्या हैत. Wink

काल वाचले होतेच. पण आज सलग वाचले. मस्तच.. आम्हाला खरेखुरे नाही मिळणार पण तु पुर्ण सैर करुन आणलिस. Happy

सुरेख लिहिलंयस. पुणेकरणीच्या नजरेतून कोकणी गणपती.

तुला त्या लगबगीतल्या मधल्या फळीत पदर खोचून काम करताना इम्याजिनलं Wink

छान लिहिलंयस. Happy मोठाच उत्सव असतो गणरायांचा!
हा गणोबा देवधर्म वाटतच नाही मला. >> खासच Happy

आमच्याकडे गणपतीचं नाही एवढं प्रस्थ पण गणपती असतो मात्र पूर्ण १० दिवस. त्यात महाललक्ष्म्यांचा मात्र मोठा सण होतो. ही माझी रिक्शा - माहेरवाशीण महालक्ष्मी

कद्धीपासून मला अशी रिक्शा फिरवायची होती, आज लागला मुहूर्त. :p

वॉव इन्ना खूप गोड, सॉलिड, मस्त. क्या बात है. सर्व माहोल उभा केलास डोळ्यासमोर.

ती माटवी मस्त, माझ्या सासरी पण करतात, छान वाटतं बघायला.

मालवण साईडला तर दिवाळीपेक्षापण गणपतीला जास्त महत्व असते, आमच्या देवगडपेक्षापण जास्त.

इन्ना....

"चित्रमय जगत" नामक एक मॅगेझिन येत असे पूर्वी....त्यातील चित्रे पाहून देशातील विविध ठिकाणाच्या विविध देवतांच्या पूजाअर्चनाच्या पद्धतीवर चित्रासोबत आवश्यक ती थोडक्यात माहिती असायची. तुम्ही केलेले वर्णन अगदी चित्रमय जगताचाच अंक समोर ठेवून मी बसलो आहे आणि कुडाळ-सावंतवाडी भागातील एखाद्या आळीत अंतूशेठ बर्वे यांच्यासोबतीने, चाकरमान्यांना ओळख दाखवित फिरत आहे असा भास होऊ लागला. इतके अस्सल वर्णन सध्या फार दुर्मिळ झाले आहे....

देशावरही आहे गणपती, पण तुम्ही म्हणता तसे त्याला रुप प्राप्त झाले आहे ते गणेशोत्सवाचे, त्यात काही गैर नाही तरीही कोकणात "गणपती आला" म्हटले की जी झिम्मड उडते घरटी, त्यामध्ये जो आपुलकीपणा आहे त्याला तोड नाही. कोकणातील हा उत्सव फक्त एकदाच पाहायला मिळाला होता तोही विसर्जनाच्या सायंकाळचा....आणि पेडणेकर नामक कुटुंबियांच्या (त्यांच्या घरी मी गेलो होतो) डोळ्यातून नीर चमकत होते ते पाहून निरोपाचे काही बोलणेही सुचेनासे होते. फार कौटुंबिक कार्यक्रम आहे हे तुमच्या वर्णनावरून स्पष्टच होते.

"....चाल्लास तु ? इतक्यातच ?....." यात सारे आले, इन्ना.

व्वा! इन्ना, काय सुरेख वर्ण केलेस ग! बालपणात फिरून आले मी. अगदी जसच्या तसं वातावरण उभं केलसं बघ. आणि निरोपाला तर डोळे खरचं भरून आले. खूपच छान वर्णन! Happy

Pages