राजकारणातील माझ्या आवडत्या स्त्री नेत्या (सार्वजनिक धागा)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 14 August, 2014 - 03:35

world women leaders2.jpg

छायाचित्र - विकीपिडियावरून साभार.

छायाचित्रातील स्त्री नेत्या डावीकडून उजवीकडे - हेलेन थॉर्निंग श्मिड्ट (डेन्मार्कच्या प्रेसिडेन्ट), इंदिरा गांधी, मिशेल बाशेलेट (चिलीच्या प्रेसिडेन्ट ) , चंद्रिका कुमारतुंगा , सिरिमाओ बंदरनायके, हिलरी क्लिंटन, गोल्डा मायर, विवेका एरिकसन, अँजेला मेर्कल.

उद्या भारताचा ६८ वा स्वातंत्र्यदिन. ह्या निमित्ताने संयुक्तातर्फे तुमच्या समोर एक नवीन विषय चर्चेसाठी आणला आहे. "राजकारणातील माझ्या आवडत्या स्त्री नेत्या".

राजकारण हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. राजकारण मग ते भारतातील असो अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील असो , ह्या क्षेत्रात अजूनही पुरुष नेतेच बहुसंख्य प्रमाणात आढळतात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्त्रियांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. राणी लक्ष्मीबाई, कॅप्टन लक्ष्मी, सरोजिनी नायडू, मॅडम कामा, अरूणा असफ अली, उषा मेहता ह्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय इतिहासावर आपला ठसा उमटवला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राजकारणातील स्त्री नेत्या म्हणून इंदिरा गांधी, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, जयललिता, प्रतिभा पाटील, सुषमा स्वराज, शालिनीताई पाटील, सुप्रिया सुळे, शीला दिक्षीत , वसुंधराराजे सिंदिया ही नावे सर्व भारतीयांना सुपरिचित आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्त्री नेत्या म्हटलं की इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, गोल्डा मायर, सिरिमाओ बंदरनायके, चंद्रिका कुमारतुंगे, अँजेला मेर्केल, बेनझीर भुत्तो, हिलरी क्लिंटन इतकीच नावे पटकन आठवतात. पण आजच्या घडीला बांग्लादेश, डेन्मार्क, ब्राझील , चिली अशा साधारण २१ देशांच्या पंतप्रधान / राष्ट्रपती स्त्रिया आहेत. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांबद्दल थोडंसं जाणून घेऊया.

लिहिण्यासाठी तुम्ही खालील मुद्द्यांचा आधार घेऊ शकता :-

१. कार्यक्षेत्र - देशांतर्गत / आंतरराष्ट्रीय.

२. कारकीर्द - त्या स्त्री पुढार्‍याची एखाद्या विषयाची जाण, त्यावरची पकड, आंतरराष्ट्रीय राजकारणाची उत्तम जाण, धोरणी परराष्ट्रसंबंध.

३. आवडणारे गुण - वक्तृत्व, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, दूरदृष्टी, हजरजबाबीपणा, लोकांचे प्रश्न मुळापासून जाणून घेऊन त्यांवर काम करण्याची वृत्ती.

४. ती स्त्री नेता राजकारणात यशस्वी होण्यामागची कारणे.

इथे फक्त गेल्या ५० वर्षांतील अथवा सध्याच्या स्त्री नेत्यांबद्दल लिहिणे अपेक्षित आहे. ती स्त्री नेता भारतातील अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची असू शकते. कृपया पुनरुक्ती टाळावी. आधी ज्या स्त्री नेत्यांबद्दल लिहिले गेले नाही अशा एखाद्या स्त्री नेत्याबद्दल तुम्ही वाचन / गूगलच्या आधाराने काही शोधून लिहिलंत तरी हरकत नाही, मात्र ती माहिती खात्रीशीर असावी. विकीपीडीयावरील माहिती उतरवून इथे चिकटवू नये.

कृपया सभासदांवर वैयक्तिक टीका, राजकीय पक्षांबद्दलची चर्चा तसेच एखाद्या स्त्री नेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची चर्चा टाळावी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कट्यार, बिदर नव्हे बेल्लारी.

१९६२ ते २००८ बिदर अनुसुचित जाती साठी राखीव मतदारसंघ होता आणि आलटून पालटून बीजेपी काँग्रेसचे तेच ते घिसेपीटे खासदार येत असत.
Happy

१.इंदिरा गांधी
२. मार्गारेट थॅचर
३. गोल्डा मायर

अन तिघी आवडायचे एकच कारण, ते सुद्धा एकाच वाक्यात

" ह्या तिघी बायका भयानक खमक्या होत्या हो! "

नक्की कधीचा आठवत नाही, पण योम किप्पुर युद्धाच्या वेळचा किस्सा असावा

अरब राजपुत्राने गोल्डा मायर ह्यांस फोन करुन मजेत

"बाई आम्ही तर आता मदिना ते तेल अविव राजमार्ग बांधायला घेतला आहे" असा खवचट टोमणा मारला होता

शेवटी गोल्डा मायरच ती,

"तोच राजमार्ग आम्ही तेल अविव ते मदिना उलट्या प्रवासाला उत्तम वापरु शकु" असे रोखठोक उत्तर देऊन बाईंनी फोन ठेवला होता!!!! नंतर इस्राएल ने समस्त अरब फौजांस हाग्यामार दिला होता वगैरे इतिहास अनुषंघाने आलाच!!! Happy

कट्यार....

लेखासाठी अगदी अनपेक्षित....तरीही निवडीबद्दल समाधान व्यक्त करावे.....अशी निवड करून तुम्ही सुषमा स्वराज यांचा प्रभावी असा प्रवास इथे रेखाटला त्याबद्दल तुमचे अभिनंदन. राजकारणातील स्त्री म्हणजे केवळ देशाचे सर्वोच्च पद भूषविलेली स्त्रीच पटलावर आणायला हवी असा काही कुठे दंडक नसतो. सत्ताधारी पक्षाकडे तशी स्त्री असेल तर त्याचवेळी विरोध गटातही अशीच विलक्षण व्यक्तिमत्त्वाची आणि राजकारणाची सखोल जाण असणारी स्त्री असेल तर राज्यकर्त्यांनाही संसद पातळीवर कार्य करताना बेलगाम वागता येत नाही.

योगायोग म्हणजे मला स्वतःला सुषमा स्वराज यांच्याविषयी प्रथम माहिती झाली ती त्यांचे पती अ‍ॅड.स्वराज कौशल यांच्यामुळे. आणीबाणीच्या कालखंडात जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बडोदा डायनामाईट कांड प्रकरणी केस चालू होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टातील एक वकील स्वराज कौशल यानी फर्नांडिस यांच्या बाजूने वकीलपत्र घेतल्याची बातमी आली होती. त्या काळात "साधना" चे अंक खाजगी पातळीवर वितरीत होत असत. अशा एका अंकात स्वराज कौशल यांच्याविषयी लेख आला होता. त्यांचा सुषमा यांच्याशी त्याच दरम्यान विवाह झाला. आणीबाणीचा इतिहास तर सर्वांना माहीत आहेच आणि अद्यापि वयाची २५ वर्षे गाठलेली नसतानासुद्धा सुषमा स्वराजचे नाव हरियाणा, पंजाबच्या राजकारणात गाजू लागले होते. १९७७ च्या हरियाणा विधानसभा निवडणूकीत तर इंदिरा गांधींचे उजवे हात समजलेले आणि आणीबाणी काळातील चौकडी प्रमुखाचे नेते म्हटले गेलेल्या मुख्यमंत्री पदावरील बंसीलाल यांच्या दणदणीत पराभव करणार्‍या सुषमा स्वराज यानी त्यानंतर कधीही देशाच्या राजकारणातील आपले आघाडीचे स्थान गमाविलेले नाही. उलट त्यांच्या वक्तृत्व आणि सांसदीय अभ्यासावर तर विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही गट आदरपूर्वक बोलत असतात. मीडियाच्या तर त्या नेहमीच लाडक्या नेत्या आहेत...त्याला कारण सुषमा स्वराज यांच्या अभ्यासाविषयी मानला जात असलेला आदर होय.

आता तर त्या स्वतःच सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्या तर आहेतच शिवाय त्याना मिळालेले खातेही तितकेच महत्त्वाचे. विरोधी पक्षनेत्या म्हणून मिळविलेले नाव आता सत्ताधारी झाल्यावर त्यात भर त्या घालतील इतपत खात्री वाटते.

कट्यार यानी छान आढावा घेतला आहे.

मो , अरु धन्यवाद !
अरु इंदिरा गांधीबद्दल मस्त लिहिलस

सगळ्यांनीच
मी लिहिले असते तर 'आन सान
स्यू की' यांच्याबद्दल पण ते
काम आधीच जाई. यांनी केले
असल्यामुळे वाचनमात्र >>>>>>> हर्पेन , तुम्ही लिहायला काहीच हरकत नाही . तुमच्या दृष्टीकोनातून स्यू की यांची ओळख वाचायला नक्की आवडेल Happy

अशोकमामा,

मनापासून आभार.

सकाळी मायबोलीवर टाईप करत असतांना एक एक अक्षर टाईप होण्यासाठी भरपूर वेळ लागत होता. नव्या सिस्टीममधे मराठी एडिटर नसल्याने कसंबसं सेव्ह केलं. नंतर बाकीचं* लिहुयात असा विचार केला होता. पण आता वाचताना त्याची गरज नसल्याचे जाणवले, त्यावर तुमचा प्रतिसाद पाहून अत्यंत आनंद झाला.

प्रोत्साहन देता देता अभ्यासपूर्ण विवेचन, दिलेली महत्वाची माहीती यामुळे वाचायला ही मजा येतेय आणि इतरांनाही लिहावंसं वाटतंय.

* सुषमाजींच्या समाजवादी ते भाजपा या प्रवासावर लिहायचं राहून गेलं होतं.

@ साती

बळ्ळारी. हो बरोबर. माझ्याकडून चुकीची माहीती दिली गेली. अचूक माहीतीबद्दल आभार. Happy

१२३४ या आयडीचं आज दुपारपर्यंत नाव कट्यार होतं. त्यांनी आयडीचं नाव बदललं.

सगळ्यांनीच छान माहितीपूर्ण प्रतिसाद दिलेत. Happy

सोनिया गांधी हे माझ्या मते सध्याच्या काळातले प्रभावशील स्त्री राजकीय नेतृत्व आहे. इंदिराजी नि राजीवजी ह्यांच्या निधनानंतर कॉंग्रेस पक्ष खचला होता.कॉंग्रेस पक्षाची दुर्दशा झाली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान देणारा धर्मनिरपेक्ष असा कॉंग्रेस पक्ष अस्ताकडे जातो कि काय अशी भीती निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाटू लागली होती. सोनियाजींना राजकारणात रस नव्हता. परंतु आपल्या पतीने व सासूने देशासाठी केलेले बलिदान आणि ते ज्या कॉंग्रेस चे नेतृत्व करत त्याची झालेली दुर्दशा पाहून त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा निर्णय म्हणजे मृत प्राय झालेल्या कॉंग्रेसला नवसंजीवनीच ठरली पक्षाने जणू कात् टाकली. कार्यकर्त्यात उत्साह संचारला व कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यात सोनियाजी यशस्वी झाल्या.पतीची झालेली क्रूर हत्या तीही इतकी क्रूर कि त्यांना व मुलांना त्यांचे अंत्यदर्शन हि मिळू शकले नाही. एखादी स्त्री अशा आघाताने खचली असती पण राखेतून झेप घेणाऱ्या फीनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी भारतीय राजकारणात अशी काही भरारी मारली कि भल्या भल्या नेत्यांचे पाय लटपटले.
सोनियाजी राजकारणात आलेल्या पाहून विरोधकांच्या तोंडचे पाणी खरे तर पळाले होते. पण राजकारणात आपण घाबरलोय असे दाखवून चालत नाही म्हणून घाबरलेल्या विरोधी पक्षाने सोनियाजींची बदनामी करण्याची मोहीम उघडली त्यांचा कॉंग्रेस द्वेष हा व्यक्तीद्वेष कधी झाला हेही त्यांना कळले नाही. सोनियांवर खालच्या पातळीवर उतरून टीका झाली सभ्य असभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या पण हे एका भीतीपोटी होत आहे.जन्मजात सुसंस्कृत पणा अंगी असलेल्या सोनियाजींनी कधी टीकाकारांना भिक घातली नाही सर्व टीकाकारांना गाडून त्यावर कॉंग्रेस चा झेंडा लावून त्यांनी UPA मार्फत कॉंग्रेसची सत्ता आणली.

टाइम्स मैगजीनने हि त्यांच्या कर्तुत्वाची दखल घेत २००७ व २००८ साली जगातील १०० प्रभावी महिला मध्ये त्यांना स्थान दिले तर फोर्ब्स ने जगातल्या सर्वात प्रभावशाली अशा ३ महिलांमध्ये त्यांची गणना केली.

Iron Lady..मार्गारेट थॅचर..ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान.
मुळात पहिली महिला पंतप्रधान होण्यासाठीच किती मोठया glass ceiling ला तोडावं लागलं त्या बाईला!
पुढे मग विसाव्या शतकातली युकेची longest serving PM बनणं हाही अजून एक रेकॉर्ड.
धाडसी निर्णय घेण्याची हिंमत दाखवणं, प्रसंगी युध्दाचाही मार्ग अवलंबणं (मी स्त्री आहे- मी कसं युध्द करु असा विचार न करणं) आणि युद्ध जिंकून दाखवणं, विरोधक सतत समोर असताना खचून न जाता आपल्या मार्गावर पुढे जात राहाणं, शेवटी राजीनामा दयायची वेळ आल्यावर तेही वास्तव स्वीकारणे- या सगळ्याला लागणारा मनाचा कणखरपणा मार्गारेटकडे पुरेपुर होता. नवरा व मुलांचा सपोर्ट होता पण तरी राजकारणात आल्यावर घर व करीयर दोन्ही सांभाळताना संसाराला पुरेसा वेळ देता येणं शक्य नव्हतं. पण त्याबद्दल अपराधी वाटू न घेता आपल्यापरीने दोन्ही आघाडया उत्तम सांभाळल्या तिने! तिने घेतलेले काही निर्णय त्यावेळी लोकांना आवडले नाहीत पण आज त्याच निर्णयांचं कौतुक होतं. Short-term मध्ये लोकांना खूष ठेवून निवडणुका जिंकत राहायचं असा विचार तिने केला नाही. उलट देशासाठी जे योग्य आहे ते मी करणार- त्यासाठी आत्ता मला शिव्या खाव्या लागल्या तरी चालेल- पण मी पुढच्या पिढयांचा विचार करते आहे- असा तिचा परखड विचार होता. राजकारण हे वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी न करता देशाबद्दलचं कर्तव्य म्हणून करण्याचं तिचं व्रत होतं. म्हणूनच आज विसाव्या शतकातील ब्रिटनच्या सर्वात कर्तबगार दोन पंतप्रधानांपैकी एक नाव विन्स्टन चर्चिल यांचं घेतलं जातं आणि दुसरं मार्गारेट थॅचर यांचं.
कोणत्याही यशस्वी स्त्रीच्या यशामागे तिच्या आयुष्यातल्या पुरुषांचा वाटा असतोच. मार्गारेटवर सर्वात जास्त प्रभाव तिच्या वडिलांचा होता. आपल्या मुलीने शिकावं, काहीतरी करुन दाखवावं, नुसतंच चूल-मूल करत बसू नये- या त्यांच्या विचारांमुळे तिच्या कारकिर्दीचा पाया भक्कम बनला. तिने कायम स्वत:ला 'Grocer's daughter' हे हेटाळणीने नव्हे तर अभिमानाने म्हणवून घेतले.
राजकारणात कितीही रस असला तरी कोणत्याही तरुण मुलीला प्रेमात पडावसं वाटणारच! मार्गारेटसारखी सुपरवुमन प्रेमात कोणाच्या पडणार? अर्थातच एका खऱ्याखुऱ्या वॉर हिरोच्या! मेजर डेनिस थॅचर दुसऱ्या महायुध्दात पराक्रम गाजवून आला होता व आता फॅमिली बिझनेस जॉईन करुन एक यशस्वी उदयोगपती बनला होता. मार्गारेटचं या खानदानी श्रीमंत तरुणाशी शुभमंगल झालं. मार्क आणि कॅरोल या मुलांच्या जन्मानंतर संसाराची चौकट पूर्ण झाली. थॅचरबाईंच्या यशात श्रीयुत थॅचरांचा वाटा खूप मोठा आहे. बायकोला ’तू घरी बस..मी कमावतोय ना भरपूर’ असं न सुनावता तिला तिच्या राजकारणाच्या क्षेत्रात पुढे जायला डेनिसने हरकत घेतली नाही, तसंच तिच्या कामात फारशी ढवळाढवळही केली नाही- पण गरज पडेल तेव्हा सल्ले देणं आणि कायमच आश्वासक साथ देणं- हे मात्र नक्कीच केलं.
संकटांनी भरलेल्या वाटेवरुन युकेला पुढे नेतानाच जागतिक राजकारणावरही मार्गारेट थॅचर यांनी आपला ठसा उमटवला. तत्कालिन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यासोबत त्यांचा चांगला rapport होता. कोल्ड वॉरमध्ये या जोडगोळीने चांगलीच कामगिरी करुन दाखवली. बर्लिन वॉल पडली ती थॅचर यांच्या कारकिर्दीतच. भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींशी मार्गारेट थॅचर यांची मैत्री होती. एक महिला म्हणून पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात कणखरपणे काम करणे, सीमेपलीकडील युध्द तसेच देशांतर्गत हिंसाचार व अशांततेचा समाचार घेणे आणि बदलत्या सामजिक व राजकीय परिस्थितीसाठी आपापल्या देशाला तयार करणे हे या दोघींसाठीही समान आव्हान होते. त्यामध्ये त्यांनी एकमेकींची कायम साथ दिली.

छान लिहिलं आहे, वेदिका२१.

मार्गारेट थॅचर बाईंच्या कारकीर्दीत त्यांनी लेबर युनियन्सचं यूकेमध्ये वाढलेलं अतोनात प्रस्थ मोडून काढलं आणि त्याचबरोबर राजे, सरदार वर्गातील लोकांची निष्क्रियता झटकायलाही मदत केली असं मानलं जातं. थॅचरबाईंच्या काळात ब्रिटनमधला मध्यमवर्ग खर्‍या अर्थाने पुढे आला आणि सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरीबरोबरच व्यवसाय करण्याकडे वळू लागला. थॅचरबाईंनी सरकारवरील खर्चाचा बोजा कमी केला आणि देशाने मुक्त किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रोत्साहन दिले. मंदावलेली अर्थव्यवस्था त्यामुळे सावरण्यास मदत झाली. या सर्व प्रवासात त्यांना भरपूर टीका, हेटाळणी सहन करावी लागली. त्यांचे निर्णय देशाच्या भवितव्यासाठी योग्य आहेत हे त्यांना वारंवार सिद्ध करावे लागले.

कुणी वाजवी इंदिरेचा डंका
कुणी गाठली लंका
आमच्या मते एकच नाव
युवराज्ञी प्रियांका!

भारताच्या अनभिषिक्त राजघराण्याच्या अनभिषिक्त युवराज्ञी, सार्या देशाची बिटिया प्रियांका ही माझ्या मते आजवर झालेली सर्वश्रेष्ठ, बुद्धीवान, नीतीमान, शक्तीमान नेता आहे. राजघराण्याचा वारसा आहेच, शिवाय देशाचा, त्याच्या इतिहासाचा, भूगोलाचा, संस्कृतीचा प्रचंड व्यासंग त्यांचाकडे आहे.
त्यांनी मनावर घ्यायचाच अवकाश, त्या सगळ्या विरोधकांना वावटळीत सापडलेल्या पाचोळ्याप्रमाणे दूर भिरकावतील आणि मग ह्या देशाचे तारू पुन्हा सुवर्णयुगाकडे पिटाळतील ह्याबद्दल मला तरी शंकाच नाही.
भाऊरायावरील प्रेमापोटी त्यांनी आपल्या नेतृत्व गुणाला मुरड घातली पण गुलाब टोपलीखाली झाकला तरी त्याचा सुगंध लपत नाही.
जय सोनिया! जय प्रियांकाजी! आगे बढो. हम आपके है कोन, आय मीन हम आपके साथ है!

दयाघना, सुषमा स्वराज वरची पोस्ट का उडवली? चांगली वाटली होती पटकन एकदा वाचली तेव्हा.

सुरूवातीपासून वाचतोय. छान माहिती.

फारएण्ड.... सहमत.

काल मी या पानावर आलो त्यावेळी त्या पोस्टच्या जागी फक्त एक बिंदू दिसला. सुषमा स्वराज यांच्याविषयी खूप चांगले आणि प्रभावीरित्या लिहिले होते. मी तात्काळ प्रतिसादही दिला होता.

प्रश्न असा आहे की लेखकाने तो मजकूर काढला की धागा संपादकांनी त्यावर काही कार्यवाही केली आहे ? तसे संपादन वा पूर्ण काढून टाकण्याचे काहीच कारण नव्हते. मूळ विषयच पानावरून गेल्यामुळे आता त्यावरील प्रतिक्रियाही निरर्थक ठरत आहेत.

लेखक वा धागासंचालक यांच्याकडून त्या मागील कारण समजणे संयुक्तिक ठरेल....अन्यथा नूतन प्रतिसाद तसेच त्यावरील अभिप्राय याना काही अर्थ राहाणार.

संपदा, अँजेला (की अँगेला) मर्केल चा परिचय चांगला आहे. पण सुरूवातीचे थोडे अजून डीटेल्स दे जमले तर. कारणः

अँजेला मेर्कल ह्यांनी १९९० मध्ये CDU पक्षात प्रवेश केला. १९९८ साली हेल्मट कोह्ल निवडणूक हरल्यानंतर मेर्कल ह्यांना पक्षाचा सेक्रेटरी बनवण्यात आले. २००५ मध्ये निवडणूक जिंकल्यावर बहुमत नसल्याने SPD पक्षाबरोबर युती करून मेर्कल ह्यांनी सरकार स्थापन केले.
>>> हे जरा थोडे पुलंच्या दामले मास्तरांच्या "शहाजीचा मुलगा शिवाजी याने..." सारखे थोडक्यात झाले Happy त्यांची त्याआधीची पार्श्वभूमी काय होती, राजकारणात कशा आल्या वगैरे वाचायला आवडेल.

आन सान स्यू की यांच्याबद्दल चा लेख आवडला. २०१२ नंतर आता त्यांच्या राजवटीत म्यानमार ची लोकशाही कशी चालू आहे वगैरे सुद्धा माहिती असेल तर द्या जरूर.

मो - गोल्डा मायर ची ओळख छान जमली आहे. तिच्या अमेरिकन बॅकग्राउंड बद्दल काहीच माहिती नव्हती. म्युनिक मधल्या हल्ल्यानंतर तिनेच ती टीम तयार करून बदला घेतला होता ना? म्युनिक चित्रपटात ते बघितल्याचे आठवते.

अरूंधती, इंदिरा गांधींबद्दलचा लेख एकदम 'रिलेट' झाला. कारण आमच्याकडेही त्यांच्या बद्दल कायम कौतुक व आदर होता माझ्या लहानपणी. त्यांच्याबद्दलच्या घटना बहुतेकांना (वरच्या इतर व्यक्तिमत्त्वांच्या तुलनेत) माहीत आहे, त्यामुळे तुला त्या का आवडायच्या यावर लेखाचा भर आहे तो योग्य आहे.

नुकतेच "ब्लड टेलेग्राम" नावाचे बांगला देश युद्धाबद्दलचे पुस्तक वाचले. त्यावरून इंदिरा गांधी काय जबरदस्त व्यक्ती होत्या हे आणखी जाणवते. निक्सन सारख्या प्रचंड ताकदवान व किसींजर सारख्या प्रचंड पाताळयंत्री राजकारण्यांना, व पाकच्या सर्व डावपेचांना त्या पुरून उरल्या. त्यांच्या देशांतर्गत राजकारणावर तितके कौतुकाने बोलता येणार नाही. मात्र वरती अशोकमामांनी म्हंटल्याप्रमाणे इतकी वर्षे कारकीर्द असलेल्या कोणाचीही उजवी व डावी बाजू असणारच.

थॅचरबाईंबद्दल थोडीफार माहिती होती. आणखी वेदिका यांच्या त्या लेखाने मिळाली. खुद्द इंग्लंड मधे त्यांच्यावर खूप टीका अजूनही केली जाते हे खरे आहे का?

सचिन पगारे, सोनिया गांधींबद्दलचा लेख मात्र जरा त्रोटक व वरवर लिहीलेला वाटला. या वरच्या सर्व स्त्रियांमधे त्याच एक अशा आहेत (बहुधा.) की ज्यांचा प्रवास एका वेट्रेस पासून ते (प्रॅक्टिकली) एका महाकाय देशातील सर्वेसर्वा असलेल्या पदापर्यंत झाला आहे. ३०-३५ वर्षांपूर्वी जर कोणी भाकित केले असते की इटलीतील एक कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली महिला नंतर भारताच्या राजकारणाची, प्रगतीची दिशा ठरवणार आहे, तर कोणीही त्यावर विश्वास ठेवला नसता. त्यांच्या हा जो प्रवास आहे त्याची माहिती तुम्हाला असेल तर जरूर द्या, आम्ही वाचू.

एरव्ही तुमच्या मतांना सहसा माझा विरोध असतो, पण सोनिया गांधींबद्दल मलाही आदर, कुतूहल आहे. त्यामुळे आणखी वाचायला आवडेल. आणि टाईम, फोर्ब्ज ने दखल घेणे हे आता त्या ज्या लेव्हल ला आहेत त्याच्यासमोर आवर्जून उल्लेख करण्यासारखे वाटत नाही. टाईम, फोर्ब्ज यांचे महत्त्व कमी करण्याचा उद्देश नाही, पण सोनिया गांधी कॉंग्रेस च्या अध्यक्ष्या, पंतप्रधान होण्याची पूर्ण शक्यता पूर्वी व यापुढेही असलेल्या - त्यामुळे या साप्ताहिक/मासिकांतील उल्लेख त्यापुढे काही विशेष नाहीत (म्हणजे अ‍ॅटली ची केसरी ने दखल घेतली म्हणण्यासारखे आहे. केसरी महत्त्वाचा होताच पण अ‍ॅटली राष्ट्रप्रमुख होता).

खुद्द इंग्लंड मधे त्यांच्यावर खूप टीका अजूनही केली जाते हे खरे आहे का? >> हो फारएन्ड. मार्गारेट थॅचर बाईंनी सत्तेवर आल्यावर अनेक निर्णयांपैकी एक निर्णय घेतला... तो म्हणजे, शाळेतील मुलांना मोफत दूध दिले जायचे ते त्यांनी बंद केले. त्यामागे त्यांचा उद्देश सरकारवरील खर्चाचा बोजा दूर करणे हा होता. पण त्यांच्या या निर्णयावर सर्वसामान्य ब्रिटिश जनतेकडून कडाडून टीका झाली. (अर्थात तरी त्यांनी आपला निर्णय मागे घेतला नाहीच!) तेच मजूर संघटनांचे इंग्लंडमधील वर्चस्व त्यांनी मोडून काढल्यावर त्याबाबतीतही घडले. त्यांनी अनेक राष्ट्रीय उद्योगांचे खाजगीकरण केले. कामगार संघटनांचा त्याला प्रखर विरोध झाला तरी त्या बधल्या नाहीत. निदर्शकांनी त्यांच्यावर झडझडून टीका केली व आजही होते. त्यांचे निर्णय खंबीर, ठाम असत आणि त्याबाबतीत त्यांचे 'पोलादी स्त्री' (आयर्न लेडी) हे नाव अगदी सार्थ होते. ब्रिटिशांच्या राजेशाही, सरदारशाहीच्या परंपरेत एका सर्वसामान्य स्त्रीला सत्ताकारणात इतके पुढे जाताना पाहून झालेला द्वेषही ह्यात काही अंशी समाविष्ट होता असे म्हणता येईल. इंग्लंडचा युरोपियन युनियनमध्ये समावेश करण्यासही त्यांचा खूप विरोध होता. या सर्वामुळे त्यांना ब्रिटिश जनतेच्या कडव्या टीकेला सामोरे जावे लागले.

अकु,
इंदिरा गांधी आणि मार्गारेट थॅचर.. दोघी माझ्याही अत्यंत आवडत्या नेत्या. इंदिरा गांधीना मी प्रत्यक्ष जवळून बघितले आहे. त्या काळात त्या अजिबात सिक्यूरिटी बाळगत नसत...

मेरील स्ट्रीप अभिनीत आयर्न लेडी बघितला का ? थॅचर बाई राजकारणातून निवृत्त झाल्यावरचेही चित्रण हृदयस्पर्शी आहे. पहिल्याच प्रसंगात वृद्ध थॅचर बाई, दूध आणण्यासाठी स्वतः पायी चालत दुकानात जातात, असे दाखवलेय.

थॅचर बाईंनी एका बाँड पटात छोटीशी भुमिका केली होती, तशीच दुसर्‍या बाँडपटात इंदिरा गांधी करतील असा कयास होता. पण ते नाही झाले.

त्यांच्या मृत्यूच्या दुसर्‍या दिवशीच आमची सी. ए. फायनल परिक्षा होती. पण इतिहासात पहिल्यांदा ती पुढे ढकलली गेली.

अरुंधती- खूपच चांगली माहिती...धन्यवाद!

फारएन्ड, अरुंधतीने सविस्तर लिहिलेच आहे त्याप्रमाणे थॅचर यांच्या काही स्पेसिफिक धोरणांवर व निर्णयांवर टीका होते. पण त्यांच्या personal character बद्दल अगदी विरोधकही आदरानेच बोलतात. आणि स्वत:च्या कर्तबगारीवर पहिली महिला पीएम बनून त्यांनी युकेच्या महिलांसमोर जे उदाहरण घालून दिले ते अनमोल आहे. राजकारणी पुरुषांच्या मुली, सुना, पत्नी किंवा mistresses राजकारणात त्यांचा राजकीय वारसा चालवायला उतरताना दिसतात. पण थॅचरबाईंचे पिता किंवा पती मोठे राजकारणी नव्हते. त्यांनी स्वत:साठी वाट स्वत: तयार केली तीही तत्वांशी तडजोड न करता.

दिनेशजी- Iron Lady पाहिला आहे. मेरील स्ट्रीप थॅचरच्या भूमिकेत काय घुसली होती...तिला बेस्ट ॲक्ट्रेस ऑस्कर या रोलसाठी मिळालं नसतं तरच नवल होतं Happy (कोणाला बघायचा असलास नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करा.)
पण मला स्वत:ला असं वाटलं की ते थॅचरबाईंच्या निवृत्तीनंतरच्या लाईफवर फार वेळ खर्च केला. ते थोडक्यात दाखवून जास्त वेळ त्यांच्या ॲक्टिव्ह काळावर फोकस करता आलं असतं.

Pages