राजकारणातील माझ्या आवडत्या स्त्री नेत्या (सार्वजनिक धागा)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 14 August, 2014 - 03:35

world women leaders2.jpg

छायाचित्र - विकीपिडियावरून साभार.

छायाचित्रातील स्त्री नेत्या डावीकडून उजवीकडे - हेलेन थॉर्निंग श्मिड्ट (डेन्मार्कच्या प्रेसिडेन्ट), इंदिरा गांधी, मिशेल बाशेलेट (चिलीच्या प्रेसिडेन्ट ) , चंद्रिका कुमारतुंगा , सिरिमाओ बंदरनायके, हिलरी क्लिंटन, गोल्डा मायर, विवेका एरिकसन, अँजेला मेर्कल.

उद्या भारताचा ६८ वा स्वातंत्र्यदिन. ह्या निमित्ताने संयुक्तातर्फे तुमच्या समोर एक नवीन विषय चर्चेसाठी आणला आहे. "राजकारणातील माझ्या आवडत्या स्त्री नेत्या".

राजकारण हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. राजकारण मग ते भारतातील असो अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील असो , ह्या क्षेत्रात अजूनही पुरुष नेतेच बहुसंख्य प्रमाणात आढळतात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्त्रियांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. राणी लक्ष्मीबाई, कॅप्टन लक्ष्मी, सरोजिनी नायडू, मॅडम कामा, अरूणा असफ अली, उषा मेहता ह्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय इतिहासावर आपला ठसा उमटवला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राजकारणातील स्त्री नेत्या म्हणून इंदिरा गांधी, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, जयललिता, प्रतिभा पाटील, सुषमा स्वराज, शालिनीताई पाटील, सुप्रिया सुळे, शीला दिक्षीत , वसुंधराराजे सिंदिया ही नावे सर्व भारतीयांना सुपरिचित आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्त्री नेत्या म्हटलं की इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, गोल्डा मायर, सिरिमाओ बंदरनायके, चंद्रिका कुमारतुंगे, अँजेला मेर्केल, बेनझीर भुत्तो, हिलरी क्लिंटन इतकीच नावे पटकन आठवतात. पण आजच्या घडीला बांग्लादेश, डेन्मार्क, ब्राझील , चिली अशा साधारण २१ देशांच्या पंतप्रधान / राष्ट्रपती स्त्रिया आहेत. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांबद्दल थोडंसं जाणून घेऊया.

लिहिण्यासाठी तुम्ही खालील मुद्द्यांचा आधार घेऊ शकता :-

१. कार्यक्षेत्र - देशांतर्गत / आंतरराष्ट्रीय.

२. कारकीर्द - त्या स्त्री पुढार्‍याची एखाद्या विषयाची जाण, त्यावरची पकड, आंतरराष्ट्रीय राजकारणाची उत्तम जाण, धोरणी परराष्ट्रसंबंध.

३. आवडणारे गुण - वक्तृत्व, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, दूरदृष्टी, हजरजबाबीपणा, लोकांचे प्रश्न मुळापासून जाणून घेऊन त्यांवर काम करण्याची वृत्ती.

४. ती स्त्री नेता राजकारणात यशस्वी होण्यामागची कारणे.

इथे फक्त गेल्या ५० वर्षांतील अथवा सध्याच्या स्त्री नेत्यांबद्दल लिहिणे अपेक्षित आहे. ती स्त्री नेता भारतातील अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची असू शकते. कृपया पुनरुक्ती टाळावी. आधी ज्या स्त्री नेत्यांबद्दल लिहिले गेले नाही अशा एखाद्या स्त्री नेत्याबद्दल तुम्ही वाचन / गूगलच्या आधाराने काही शोधून लिहिलंत तरी हरकत नाही, मात्र ती माहिती खात्रीशीर असावी. विकीपीडीयावरील माहिती उतरवून इथे चिकटवू नये.

कृपया सभासदांवर वैयक्तिक टीका, राजकीय पक्षांबद्दलची चर्चा तसेच एखाद्या स्त्री नेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची चर्चा टाळावी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे फक्त गेल्या ५० वर्षांतील अथवा सध्याच्या स्त्री नेत्यांबद्दल लिहिणे अपेक्षित आहे.
<<
एक शंका.
स्वातंत्र्यलढ्यातल्या व्यक्ती यामुळे बाद होतील ना? स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे झालीत, त्यामुळे ५० वर्षांची लिमिट चुकतेय की काय?

उद्बोधक चर्चा वाचण्याच्या प्रतिक्षेत.

या धाग्याचा उद्देश सांप्रत काळातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला ठसा उमटवणार्‍या आपल्या आवडत्या स्त्री-नेत्यांबद्दल, त्यांच्या कारकीर्दीबद्दल व त्यांच्या राजकीय आलेखांबद्दल जाणून घेणे हा आहे. त्या दृष्टीने कालमर्यादा दिली आहे. गेल्या पन्नास वर्षांमधील किंवा सध्याच्या राजकारणातील स्त्री-नेत्यांबद्दल आपण अवश्य लिहू शकता.

माझ्या सध्याच्या आवडत्या स्त्री राजकारणी नेत्या म्हणजे अँजेला मेर्कल.

अँजेला मेर्कल ह्या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर आहेत. २०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या सलग तिसर्‍यांदा चॅन्सेलर बनल्या आहेत. २००५ आणि २००९ नंतर २०१३ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने म्हणजे Christian Democratic Union (CDU) ने पुन्हा बहुमत प्राप्त केले. जर्मनी एकत्रीकरणानंतर CDU पक्षाने मिळवलेला २०१३ मधील विजय हा महत्वाचा विजय मानला जातो.

अँजेला मेर्कल ह्यांनी १९९० मध्ये CDU पक्षात प्रवेश केला. १९९८ साली हेल्मट कोह्ल निवडणूक हरल्यानंतर मेर्कल ह्यांना पक्षाचा सेक्रेटरी बनवण्यात आले. २००५ मध्ये निवडणूक जिंकल्यावर बहुमत नसल्याने SPD पक्षाबरोबर युती करून मेर्कल ह्यांनी सरकार स्थापन केले. २००९ मध्ये पूर्ण बहुमत मिळून त्यांनी FDP पक्षाबरोबर युती करून सरकार स्थापन केले. २०१३ मध्ये FDP पक्ष पार्लमेंटमध्ये बसण्यासाठी पात्र न ठरल्याने पुन्हा SPD पक्षाबरोबर युती करून त्यांनी सरकार स्थापन केले आहे.

CDU च्या विचारसरणीला अनुसरून मेर्कल ह्यांनी जर्मनीत काम करण्यासाठी बाहेरून आलेल्या सर्व लोकांना (immigrants ना ) जर्मन सोसायटीमध्ये integrate होणे आवश्यक असल्याचे सांगितल्याने बरेचसे राजकारणी व सामान्य लोक नाराज होते. जर्मन्सना त्यांच्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान असल्याने नवस्थलांतरितांसाठी भाषा शिकण्याचे नवीन कोर्सेस आणि विविध उपक्रम सरकारने राबवले.

चॅन्सेलर झाल्यापासून आत्तापर्यंत त्यांनी इस्रायलला ४ वेळा भेट दिलेली आहे. सध्याच्या काळातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांचे म्हणजे भारत आणि चीनचे महत्व लक्षात घेऊन जर्मनीने ह्या दोन देशांबरोबर गेल्या १० वर्षांत व्यापाराचे अनेक करार केले आहेत. मेर्कल त्यांच्या बोलण्यातून ह्या दोन अर्थव्यवस्थांबद्दलची त्यांची निरिक्षणे वेळोवेळी नोंदवत असतात.

बराक ओबामा ह्यांना पहिल्यांदा भेटायला जाताना त्यांच्या भूतकाळाबद्दलची सर्व माहिती त्यांनी जाणून घेतली होती :). ओबामाची बहीण हायडेलबर्गमध्ये असताना तिला आलेल्या अनुभवांचा उल्लेख मेर्कल ह्यांनी ओबामाकडे केला होता. त्याबद्दल काही मजेदार किस्से इथल्या मीडियाने छापले होते. सहसा हातचं राखून वागणार्‍या अँजेला मेर्कल ह्यांची ओबामांशी त्यानंतर चांगली मैत्री झाली. मात्र एडवर्ड स्नोडन प्रकरणात NSA ने अँजेला मेर्कल ह्यांचा फोन टॅप केल्याचे उघडकीस आल्यानंतर मेर्कल ह्यांनी त्यांची नाराजी ओबामांकडे तितक्याच तीव्र शब्दांत प्रकट केली.

युरो क्रायसिसमध्ये मेर्कल ह्यांची भूमिका फार महत्वाची मानली जाते. अँजेला मेर्कल ह्या अतिशय अभ्यासू आणि धोरणी आहेत. वाटाघाटी करून फक्त स्वतःच्याच देशासाठी नाहीतर संपूर्ण युरोपिअन युनिअनसाठी योग्य व उत्तम निर्णय घेण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी त्या सध्या युरोपातील प्रभावशाली व्यक्ती मानल्या जातात.

अँजेला मेर्कल ह्यांचे फूटबॉल आणि जर्मन फूटबॉल टीमवरचे प्रेम सर्वांनी पाहिले असेलच. जर्मनी फिफा २०१४ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोचल्याचे कळताच हा सामना बघण्यासाठी स्वतः रिओला जात असल्याचे त्यांनी लगेचच जाहीर केले होते. अंतिम सामना बघताना त्यांचे हावभाव हे एका सामान्य प्रेक्षकाप्रमाणेच होते Happy . So this is Germany´s mutti ( mommy ) :).

>>अतिशय अभ्यासू आणि धोरणी आहेत
वाटतात खर्‍या.
एकूण मला त्या जर्मन इंजिनियरिंगचे प्रतीक वाटतात.
नेमके, शिस्तबद्ध आणि मनःपूर्वक काम करत असतील असे वाटते.

संपदा .. मस्त ओळख ..
लोकसत्तामधे पण त्यांच्यावर एक पुर्ण लेख आला होता .. तारीख आठवत नाहीये

संपदा, मस्त लिहिलंयस. मी पॉलिटिक्स कधी फार डीपली फॉलो करत नाही. मार्केल यांना मी प्रथम नोटिस केलं ते स्नोडेन प्रकरणातच. आणि नंतर युरो क्रायसिस आणि फुटबॉल च्या बातम्यांमुळे एकदम स्टृआँग आणि इन्फ्लुएन्शियल व्यक्तिमत्त्व जाणवलं त्यांचं.

संपदा....

इंदिरा गांधी आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर गोल्डा मायर हे एकच नाव आमच्या पिढीला ज्ञात होते आणि त्यानी त्यांचा असा दबदबा देशातच नव्हे तर सार्‍या जगात उमटविला होता. त्यानंतर आजच्या क्षणी त्याच पातळीवर नाव घ्यावे लागेल ते अ‍ॅन्जेला मेर्केल यांचेच. दुसर्‍या महायुद्धानंतर तब्बल दहा वर्षांनी जन्माला आलेली ही मुलगी. तिचा प्रवास चॅन्सेलरच्या पदापर्यंत कसा झाला त्याचे चांगले वर्णन तुम्ही केले आहे....जर्मनी म्हटले की डोळ्यासमोर येते ती तेथील पुरुषप्रधान परंपरा आणि जगाच्या डोळ्यासमोर असलेली ती दोन महायुद्धे. अशा स्थितीत एका स्त्री ने खंबीरपणे देशाची सूत्रे आपल्या हाती घेऊन जर्मनीला जागतिक पातळीवर आघाडीवर पुन्हा आणून ठेवण्याचे कार्य केले आहे...करीत आहेत. ही बाब केवळ जर्मनीच्या स्त्रियांसाठीच नव्हे तर जगातील सर्वच स्त्री वर्गासाठी अभिमानस्पद अशीच वाटायला हवी.

युक्रेन प्रश्नावरून रशियन प्रेसिडेन्ट पुतिन याना उघडपणे विरोध दर्शविण्याचा कणखर बाणा त्यानी दाखविला आहे. आयर्न फ्राऊ ही पदवी किती सार्थपणे त्या सांभाळत आहेत हे त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनावरून समजते.

भारतासोबतही त्यानी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याला कारण हेही असू शकेल की दुसर्‍या महायुद्धानंतर जर्मनीने जणू काही शून्यातून नवा प्रवास सुरू केला होता. १९५१ मध्ये भारताने जर्मनीसोबत सहकार्याचा करार केला आणि त्यामुळे जर्मनीसोबत राजनैतिक संबंध सुरू करणार्‍या प्रथम काही देशात भारत आघाडीवर राहिला. त्यामुळेच आज या क्षणीही उद्योगधंद्यासंदर्भात युरोपात आपले जर्मनीशी आघाडीचा जोडीदार असे संबंध प्रस्थापित झालेले दिसतात. १९५१ ते २०११ अशा तब्बल साठ वर्षाच्या या मैत्रीचे स्मरण ठेवून आपण अ‍ॅन्जेला मेर्केल यांचा "आंतरराष्टीय सामंजस्या"बद्दल ३१ मे २०११ रोजी नवी दिल्ली इथे "जवाहरलाल नेहरू अवॉर्ड" देऊन गौरव केला ते उचीतच होते.

संयोजकांनी आपल्या लेखात "...पण आजच्या घडीला बांग्लादेश, डेन्मार्क, ब्राझील , चिली अशा साधारण २१ देशांच्या पंतप्रधान / राष्ट्रपती स्त्रिया आहेत....' असा केलेला उल्लेख रास्त आणि आनंददायी वाटावा असा आहे. तरीही या क्षणी "स्त्री राज्यकर्ती" असा उल्लेख कुठेही झाला तर प्रथमक्षणी अ‍ॅन्जेला मेर्केल हेच नाव येते. ही त्यांची फार मोठी अशी कमाई आहे.

महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाचे पालन केवळ भारतातच नव्हे तर परकीय देशातही केले गेलेले आहे. मार्टिन लूथर किंग सारख्या कृष्णवर्णी नेत्यानेही रंगभेदाविरुद्ध हा मार्ग चोखाळला. या परंपरेतील एक वीरांगना म्हणजे ब्रम्हदेश / म्यानमार नावाने ओळखल्या जाण्यार्या देशाची थोर सुपुत्री आन सान स्यू की

कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारण असणार्या स्यू की यांचा म्यानमारमधील राजकारणात प्रवेश उशिरा झाला. आजारी असलेल्या आईच्या देखभालीसाठी त्या देशात आल्या . आणि त्याच वेळी चालू असलेल्या लोकशाहीवादी चळवळित ओढ्ल्या गेल्या . या कामाची परिणिती स्यू की यांच्या नजरकैदेत , त्यांच्या पतीला विसा नाकारण्यात झाली .तेव्हापासून लोकशाहीसाठी लढा हेच त्यांच्या जीविताच ध्येय बनल .

गांधींजींच्या अहिंसा तत्वावर आणि बौद्ध धर्मातील मूल्यावर गाढा विश्वास असण्यार्या स्यू की यांनी National League of Democracy हा पक्ष स्थापला आणि लढ्याची औपचारिक सुरुवात केली..

स्यू की यांची निम्म्याहून अधिक कारकीर्द नजरकैदेतच गेली . देशातील हुकुमशाहीविरुद्ध लढा हा निश्चितच सोपा नव्हता. कुटुंबियाना भेटू न देण , आरोग्याच्या तपासाणी नाकारण , जगाशी संपर्क तोडण अशा नानाविध प्रकारे त्यांचा छळ चालू होता..

मात्र या विरोधाला न जुमानता त्यांनी आपला लढा चालूच ठेवला. अहिंसा तत्वानुसार वाटचाल सुरु ठेवतानाच नागरी विरोध हे ही आपल शस्त्र बनवल .

जगभराची लोकशाही हा जगातील सत्तास्थानाचा " जिव्हाळ्याचा" विषय असल्याने त्या पातळीवरही त्यांना लढा द्यावा लागला. यूएन मध्ये म्यानमारच्या दडपशाहीविरुद्ध ठराव संमत करण्यास चीनने केलेला विरोध हे याच ऊत्तम उदाहरण . याचबरोबर टैक्सचुकवेगिरीचा आरोप , होणारे हल्ले यानांही तोंड द्याव लागल . या विरुद्ध डगमगून न जाता त्यांनी आपला लढा चालूच ठेवला. या प्रयत्नाना जगभारातूनही पाठिंबा मिळू लागला. त्यामुळे केवळ म्यानमारमधील नव्हे तर जगभरातील लोकशाही चळवळिच्या प्रेरणास्थान बनल्या.

स्यू की यांच्या लढ्यामुळे तसेच जगभरातिल वाढत्या दबावामुळे म्यानमारमधील राजवट झुकली. नजरकैदेतून त्यांची सुटका झाली आणि तोंडदेखल का होईना त्यांना निवडणुका घ्यावा लागल्या. मात्र त्यातही स्यु की यांना अड़चणी येतील अशी व्यवस्था केली गेली . 2012 च्या पोटनिवडणुकित त्यांना विजय मिळाला आणि आणि आजवर केलेल्या संघर्षाला न्याय मिळाला

लोकशाही तत्वावर गाढा विश्वास , लोकान्च्या हक्काचे रक्षण , निर्बध असलेल्या कायद्यांना विरोध , निपक्ष न्यायव्यवस्थेवर भर ही स्यू की यांच्या लढ्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आपल्या सुप्रसिद्ध अश्या फ्रीडम फ्रॉम फियर या भाषणात त्या म्हणतात
"It is not
power that corrupts, but fear.
Fear of losing power corrupts
those who wield it and fear of
the scourge of power
corrupts those who are
subject to it."

केवळ म्यानमारमधीलच नव्हे तर जगभारातील लोकशाही चळवळिचा चेहरा बनलेल्या स्यू की यांना 1991 साली नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल.
स्यू की यांना व त्यांच्या लढयाला सलाम !

इंदिरा गांधी, हिलरी क्लिंटन, मार्गारेट थॅचर ह्या माझ्या राजकारणातल्या आवडत्या स्त्रिया. पण मी इथे माझ्या अजून एका आवडत्या आयर्न लेडी बद्दल लिहायचं ठरवलंय, इज्रायलची तिसरी पंतप्रधान गोल्डा मेयर/मायर (Golda Meir). इज्रायलची ही "आयर्न लेडी" ज्युईश धर्माभिमानी, कणखर देशभक्त, मुरलेली राजकारणी, लोकप्रिय व्यक्तिमत्व ह्या सर्व व्याख्यांनी ओळखली जाते. १९७० साली अमेरिकेत "सर्वात आवडती (admired) स्त्री" म्हणून निवडल्या गेलेल्या गोल्डाचा प्रवास चढ उतारांनी भरलेला होता. १९६९ ते १९७४ तिने इज्रायलचे पंतप्रधानपद भुषविले.

१८८९ साली तेंव्हाच्या रशियामध्ये (आता युक्रेन) गोल्डाचा जन्म झाला. ती लहान असताना वडील नोकरीधंद्यासाठी अमेरिकेला गेले आणि लवकरच त्यांनी आपल्या कुटुंबाला तिथे बोलवून घेतले. गोल्डा अमेरिकेतल्या मिलवॉकी शहरातील ज्युईश वसाहती मध्ये मोठी होऊ लागली. माध्यमिक शाळा संपल्यावर गोल्डाला उच्चमाध्यमिक शिक्षणाकरता मात्र आईवडीलांकडून विरोध व्हायला लागला. लग्न करुन मुलीनं घर वसवावं अशी आईवडीलांची इच्छा तर पुढे शिकून शिक्षक व्हावं ही गोल्डाची इच्छा! शेवटी कंटाळून ती आपल्या मोठ्या बहिणीकडे डेन्व्हरला पळून गेली. तिथे त्यांच्या कुटुंबाबरोबर राहून उच्च्माध्यमिक शिक्षण घ्यायला तिने सुरुवात केली. इथ पर्यंत गोल्डाचा राजकारणाशी, प्रखर ज्युईश धर्मियांशी फारसा संबंध आला नव्हता, पण बहिण आणि तिच्यानवर्‍याकडे ज्युईश अभ्यासक, धर्माभिमानी लोक येऊन चर्चांच्या, गप्पांच्या मोठ्या फैरी झडायच्या. त्यांचं बोलणं ऐकून, हळूहळू चर्चांमध्ये सहभागी होऊन गोल्डा झायऑनिझम कडे जास्त आकृष्ट होऊ लागली. डेन्व्हर मध्ये असताना ती तिच्या भावी नवर्‍याच्या, मॉरिसच्या, प्रेमात पडली. त्या काळात १९१७ मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या अंमलाखाली पॅलेस्टाईनची घोषणा केली. जगभरातील 'ज्यू लोकांसाठी त्यांची एक जागा/घर' अशी ह्या पॅलेस्टाईनची संकल्पना होती (National Home for the Jewish people). त्यानंतर महिन्याभरातच लग्न झाल्यावर पॅलेस्टाईनला रहायला जायचं ह्या अटीवर गोल्डाने मॉरिसाशी लग्न केले. १९२१ साली दोघही पॅलेस्टाईनला रवाना झाले आणि आयुष्याच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली. सुरुवातीचे आयुष्य अतिशय गरिबीमध्ये खडतर रितीने जात होते. गोल्डा हळू हळू छोट्या पातळीवर झायॉनिझम आणि त्यासंदर्भातील कामांमध्ये स्वतःला व्यस्त करत होती. पण मॉरीस मात्र तिथे कंटाळायला लागला. काम, दोन मुले, संसार ह्यामध्येहॉ गोल्डा पारंपारीक ज्युईश पद्धतीने घर चालवायचा प्रयत्न करत होती. मॉरिस आधीपासूनच फार पारंपारिक ज्यू नव्हता. खटके उडायला लागले. १९२८ मध्ये गोल्डा मुलांसकट कामाकरता तेल अविवला रवाना झाली आणि हळू हळू लग्न संपुष्टात आले. गोल्डाला अखेरपर्यंत ती एक चांगली पत्नी होऊ शकली नाही ह्याची खंत वाटत होती आणि ती ते बोलून दाखवायची.

ह्यापुढे मात्र गोल्डा ज्युईश कामकरी/कष्टकरी लोकांकरता काम करणार्‍या "Histadrut" ह्या संघटनेत झटपट एक एक पायरी चढत त्यांच्या पॉलिटीकल विभागची प्रमुख बनली. त्याकाळात दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. वर्ल्ड झायॉनिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये गोल्डाने अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या. ज्यूंच्या पुनर्वसनाकरता एकट्या अमेरिकेतून ५० मिलीयनपर्यंत देणग्या जमा केल्या. प्रखर धर्माभिमानी, देशभक्त आणि तेवढीच प्रभावी वक्ती अशी तिची प्रतिमा होती.

पुढे १९४८ साली इज्रायलची स्थापना झाली. पहिले पंतप्रधान बेन-गुरीयन यांच्या मंत्रिमंडळात 'मिनिस्टर ऑफ लेबर' म्हणून गोल्डाची निवड झाली. स्वतंत्र झाल्या झाल्या शेजारी अरब राष्ट्रांनी इज्रायल वर हल्ला चढवला. ह्या धामधुमीत स्वतःचा जीव धोक्यात घालून मुस्लीम स्त्रीच्या पेहेरावात वेशांतर करुन सरहदी पलिकडे जॉर्डनच्या किंग अब्दुल्लला युद्धात भात घेऊ नका म्हणून विनवणी करायला गोल्डा गेली. नवीन सैन्याला लढायला शस्त्रास्त्र आणि पैशांची गरज होती तेंव्हा ती मागणी करायला गोल्डा तडक अमेरिकेला पोहोचली. १९५६ साली परराष्ट्र मंत्री गोल्डाची नेमणूक झाली. इतर राष्ट्रांबरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे, औद्योगिक, तांत्रिक, मिलिटरी क्षेत्रात सहकार्याने काम करणे इत्यादी बाबींवर तिने विशेष भर दिला. १९६६ साली तिने निवृत्ती पत्करायचे ठरवले. शांत आयुष्य जगणे, कुटुंबियांबरोबर वेळ व्यतित करणे, तब्ब्येतीकडे लक्ष देणे इत्यादी गोष्टींकरता ही निवृत्ती आवश्यक होती. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होते. १९६९ झाली त्यावेळच्या पंतप्रधानांचे निधन झाले आणि राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून तिच्या पक्षाने पंतप्रधानपदाकरता तिची निवड केली. ही तिच्या राजकीय कारकिर्दीची परमावधी होती. ती लोकांची आवडती पंतप्रधान होती. देशात राजकीय स्थैर्य येत होते तेवढ्यात १९७३ मध्ये इजिप्त आणि सिरियाने इज्रायल वर अनपेक्षितपणे हल्ला चढवला (योम किप्पूर वॉर). निकराने प्रतिकार परत इज्रायलने हल्ला परतवला आणि शेवटी त्यांचा विजय झाला, परंतू त्यात २७०० इज्रायली सैनिक धारातिर्थी पडले. एका छोट्या राष्ट्रकरता ही जबर किंमत होती. स्वत:च्या मनचे ऐकण्यापेक्षा मिलिटरीचे ऐकून सैन्य आधीच सीमेपाशी न हलवल्याचा गोल्डाला प्रचंड पश्चाताप झाला पण वेळ गेली होती. सगळे देशवासी आता तिच्याविरुद्ध झाले होते. सैनिकांच्या मृत्यूंचे खापर तिच्यावर फोडले गेले आणि १९७४ साली गोल्डा मायर्सने राजीनामा दिला.

योम किप्पूरच्या युद्धमुळे झालेले सर्व दु:ख आणि पश्चाताप, लोकांनी नाकारल्यामुळे झालेला अपमान आणि उपमर्द ह्यामुळे खचलेली गोल्डा शेवटच्या काही वर्षात मात्र परत समाधानाने जगू शकली. काळ लोटला लोकांचा
प्रक्षोभ कमी झाला आणि आधीच अतिशय लोकप्रिय असलेल्या गोल्डाला लोकांचे उदंड प्रेम मिळले.
धर्माभिमानी, राष्ट्राभिमानी, मुरलेली राजकारणी, लोकप्रिय लोकप्रतिनिधी, २०व्या शतकातील प्रभावी स्त्री असलेली गोल्डा मेयर १९७८ साली मृत्यू पावली.

अरे वा, अशोक मामा, मी तुमचा प्रतिसाद पाहिलाही नव्हता आणि गोल्डा मायर्/मेयर बद्दल लिहित होते. आता तुमच्या प्रतिसादात तिचे नाव पाहून मस्तच वाटले. Happy
मागे इज्रायल्/पॅलेस्टाईन आणि जनरल मिडलइस्टची हिस्ट्री, जडण घडण, युद्ध ह्याबद्दल वाचायचा आणि डॉक्युमेंटरीज पहायचा सपाटा लावला होता तेंव्हा गोल्डा मायर बद्दल भरपूर वाचलं आणि प्रभावित झाले होते.

जाई, पोस्ट आवडलं. ज्यांच्याबद्दल लिहिताना अनेक पानं कमी पडतील अश्या एका व्यक्तीबद्दल इतक्या कमी ओळींमधे लिहिणं सोपं नाही.

भाषणातल्या ओळींमधले टायपो सुधारता आले तर वाचताना बरं वाटेल.

मो....जाई....

तुम्ही मुली जेव्हा अशा कर्तृत्ववान स्त्री विषयी दीर्घ म्हटले जाईल असे लिखाण करता त्यावेळी माझ्या मनी तुमच्याविषयी आदर निर्माण होतो. कारण तुमच्या नेहमीच्या दैनंदिन कामातूनही राजकारणासारख्या विषयात सखोल म्हणावे असे लक्ष देता. ते तर आहेच शिवाय तसे पाहिले तर राजकारण प्राधान्याने पुरुषांनी व्यापले असूनही काही विलक्षण प्रतिभेच्या जिद्दीच्या आणि अभ्यासात पारंगत अशा स्त्रियांनी राजकारणात आपला असा उमटविलेला ठसा नोंदवून अशा लेखन कामाच्यावेळी त्यांच्याविषयी भरभरून लिहायला पुढे येता. वास्तविक संयोजकांनी असा कोणताही आग्रह धरलेला नाही की केवळ स्त्री सभासदांनी या विषयावर लिहावे, तरीही मला वर फोटोतील तसेच फोटोत नसलेल्या स्त्रियांविषयी स्त्री सदस्येनेच लिहिण्यास पुढे यावे असे राहूनराहून वाटत होते.

संपदाने छान सुरुवात केल्यावर मी प्रतिसाद दिला आणि उत्सुकतेने वाट पाहात होतो....पुढील व्यक्तीची आणि ती देणार्‍या सदस्याची......जाई आणि मो...दोघींनी सादर केलेले दोन नावाजलेल्या स्त्रियांचे चित्रण आणि त्यांची शैली वाचता मला दुहेरी आनंद झाला.

स्यू की हे नावही आपल्या भारतीयांच्या तोंडी झाले आणि त्यानी दिलेला झगडा हा अभ्यासाचा विषय. २०१५ मध्ये म्यानमार इथे पुन्हा निवडणुका होणार आहेत शक्यता आता अशीही वर्तविली जाऊ लागली आहे की स्यू की राष्ट्रपतीच्या निवडीसाठी लढा देतील. त्या यशस्वी होतील अशी आशा आपण जरूर करू शकतो.

मो यानी गोल्डा मेयरचा लढा आणि त्यांची इस्त्रायलच्या जडणघडणीतील योगदान यांची सविस्तर माहिती दिली आहे. "आयर्न लेडी" असा प्रथम उल्लेख गोल्डा मेयरच्या संदर्भात केला गेला होता, जो नंतर मार्गारेट थॅचर यांच्यासाठीही वापरण्यात येऊ लागला. योम कोप्पूर युद्धामुळे गोल्डा मेयर यांची प्रतिमा काळवंडली गेली हे इतिहास नाकारत नाही; पण सुरुवातीच्या माघारीनंतर परत इस्त्रायलने जीवाची बाजी लावून इजिप्त आणि सिरिया या दोघांनाही मागे सारले. तरीही मेयर याना जनतेच्या रोषाला तोंड द्यावे लागले कारण इस्त्रायलच्या मिलिटरीचा दबदबा काहीसा कमी झाला होता. हा एकच मुद्दा सोडला तर गोल्डा मेयर यानी इस्त्रायलला जगाच्या नकाशात महत्त्वाचे स्थान दिले आहे असे जो मो यांच्या लेखाचा सूर आहे त्याला सहमती आहे.

मामा , सुरेख धन्यवाद !

स्त्री राजकारण्यांविषयी आजही तेवढी जागरूकता नाही . आरक्षण आलेच तरच स्त्री उमेदवारीविषयी विचार केला जातो .
सध्याच्या लोकसभेत स्त्री ख़ासदारांचे प्रमाण किती हा ही एक चर्चेचा विषय आहे .

अधिकाधिक स्त्रिया राजकारणात आल्या तर चांगलच होईल . इथे मार्गारेट थाचर यांच एक वाक्य उधृत करावस वाटत

“ In politics, If you
want anything said, ask
a man. If you want
anything done, ask a
woman."

हा विषय चर्चेला घेतल्याबद्दल संयुक्ता व्यवस्थापनाचे आभार ..

जाई....

जागरूकता नाही....हा विचार करू नकोस. स्त्रीच जर अशी उदासिनता दाखवू लागली म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीची छबी राजकारणावर पडलेली राहणारच. शासन कोणत्याही पक्षाचे असले तरी सध्या सारेच पक्ष स्त्री हा घटक राजकारणात आला पाहिजे असे मानणार्‍या प्रवृत्तीचे झाले आहेत. तलाठी पातळीपासून ते पुढे आयएएस पर्यंत (मिलिटरीही आलीच) स्त्रियांना देवू केलेल्या सवलतीचे स्वागत झाल्याचे आपण पाहतो आहोतच. तोच वारा राजकारणातही येत आहेच. आज या घडीलासुद्धा देशातील कित्येक मोठ्या राज्यात स्त्री मुख्यमंत्री पदावरून राज्य चालवित आहे हे तर तुलाही माहीत आहेच. मग विधानसभेत आमदार किती वा लोकसभेत खासदार किती स्त्रिया आहेत हा हिशोब आता करूच नकोस. जितक्या आहेत त्या समर्थ आहेत असे मला तरी वाटते.

कुणी सांगावे कदाचित यांच्यातूनच दुसरी स्यू की, गोल्डा, मार्गारेट निर्माण होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

मस्त लिहिले आहे सर्वांनी!

माझ्या आवडत्या दोन स्त्री नेत्या म्हणजे इंदिरा गांधी व मार्गारेट थॅचर. पण त्या केवळ त्यांच्या राजकीय कारकीर्द अथवा कर्तबगारीमुळे आवडत्या झाल्या असे मी म्हणू शकणार नाही.

इंदिरा गांधी कधी आवडू लागल्या ते आठवत नाही. पण आमच्या घरात त्यांच्याबद्दल कायम कौतुकाने बोलले जायचे हे एक महत्त्वाचे कारण त्यामागे असावे असे वाटते. माझ्या आजी - आजोबांना व आई-वडिलांना इंदिरा गांधींबद्दल कौतुक होते. अभिमान होता. आपल्या भारताचे पंतप्रधानपद एक स्त्री भूषविते आहे, जे अमेरिकेसारख्या एका प्रगत देशालाही अद्याप जमलेले नाही, असे ते अनेकदा बोलून दाखवत. त्यात इंदिरा ही नेहरूंची एकुलती एक लाडकी कन्या, गांधीजींची लाडकी, स्वातंत्र्य-लढ्यात भाग घेतलेली, अनेक थोर नेत्यांचा व प्रभृतींचा सहवास लाभलेली, लहानपणापासून देशभक्ती व राजकारणाच्या वातावरणात वाढलेली.... या व अशा अनेक गोष्टी आमच्या घरी त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना आवडण्यामागे आहेत व होत्या हे मान्य करावेच लागेल.

इंदिरा गांधींबद्दल बरेच काही चांगले-वाईट लिहिले गेले आहे. माध्यमांतून खूप चर्चाही झाली आहे. माझ्याकडे त्यात भर घालण्यासारखे विशेष काही नाही. पण त्यांच्या काळात झालेलं बँकाचं राष्ट्रीयीकरण, भारत-पाक युद्धात त्यांनी घेतलेला निर्णायक पवित्रा, त्यांनी दूरदृष्टीने राबविलेला परमाणू कार्यक्रम, त्यांची परराष्ट्र नीती व आंतरराष्ट्रीय संबंधांची त्यांना असलेली जाण अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल आजही आवडतात असे सांगता येईल. अंतर्गत राजकारणात मात्र माझे मत त्यांच्याबद्दल फारसे अनुकूल नाही. तिथे त्या कमी पडल्या व त्यांनी ज्या प्रकारचे राजकारण केले त्याची झळ हजारो - लाखो लोकांना बसली असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरू नये.

मला त्यांच्या व्यक्तिमत्वातील धारदारपणा, त्यांचे वक्तृत्व, सर्व प्रकारच्या लोकांमध्ये मिसळण्याचे त्यांचे सहज कौशल्य, चौकस वृत्ती आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य हे खूप आवडायचे. त्यांचे काही निर्णय निर्विवादपणे धाडसी व धोरणी होते. सोविएत युनियनशी भारताने त्यांच्या कारकीर्दीत विकसित केलेले मैत्रीपूर्ण संबंध हेही उल्लेखनीय म्हणावे लागतील.

इंदिरा गांधींची बोलण्याची शैलीही प्रभावी होती. दूरदर्शनच्या जमान्यात त्यांचे भाषण टी.व्ही. वर लागले की ते शांतपणे ऐकले जायचे असे आठवते.

त्यांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात त्यांची अकस्मात हत्या होणे व त्यानंतर उसळलेला शोकसागर, त्याबद्दलची वर्तमानपत्रे व टीव्हीवरची वृत्ते, दंगली, अस्वस्थता.... आणि त्याचबरोबर अगदी जनसामान्यांनी आपल्या लाडक्या पंतप्रधानांच्या हत्येबद्दल व्यक्त केलेली हळहळ, चीड आणि शोक.... हेही सारे आठवते.

वाचतोय, सुंदर लिहिलंय सगळ्यांनीच

मी लिहिले असते तर 'आन सान स्यू की' यांच्याबद्दल पण ते काम आधीच जाई. यांनी केले असल्यामुळे वाचनमात्र.

फिलिपिन्सच्या 'अक्विनो' यांच्या बद्दलही वाचायला आवडेल.

अरुंधती....

लिखाणासाठी ज्या स्त्री ची तुम्ही निवड केली आहेस तिच इतकी प्रभावी आहे की ते नाव उच्चारताच एक कर्तबगार मूर्ती नजरेसमोर येते. आता त्यांच्या हत्येला उद्यापरवा ३० वर्षे पूर्ण होणार असल्याने त्यांच्या कारकिर्दीच्या पाटीवर नजर टाकताना जिथे उजव्या बाजू सापडतील तशाच डाव्याही. हे नैसर्गिक असते. पण म्हणून त्यांच्याविषयी एक भारतीय या नात्याने मनी वसत असलेला आदर यत्किंचितही कमी होऊ देवू नये. कारकिर्दीच्या काळात संपूर्ण मंत्रीमंडळात त्या एकमेव पुरुष होत्या असे जर म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. केलेल्या कामाची सविस्तर अशी जंत्री तुम्ही दिलेली आहेच, फक्त शक्य झाल्यास संस्थानिकांचे तनखे बंद करून त्यांची राजेशाही राजवटही इंदिरा गांधीही संपवून टाकली आणि देशाकडून कौतुकाची पावतीही घेतली असा उल्लेख असायला हवा होता तो करावा.

मृत्यू या विषयावर आता चर्चा नकोच कारण तो मुद्दा वादग्रस्त आहे....किंबहुना आता त्याची गरजही नाही. त्यांची चूक झाली असल्यास आपला प्राण देवून त्यानी त्या कारवाईची भरपाई केली असेही म्हटले तर ते वावगे होणार नाही.

त्यांच्या बाजूने वा विरोधात लिहिले बोलले तरीही इंदिरा गांधीनी भारताच्या पंतप्रधान या पदावर मिळविलेले नाव आपल्या मनावरून कधीही पुसले जाणार नाही.

लोकहो,

मेघावती सुकर्णपुत्री (इंडोनेशिया) आणि तान्सु चिलर (तुर्कस्थान) ही अल्पस्मृत दोन नावे आठवली.

आ.न.,
-गा.पै.

संपदा, जाई, अकु, पोस्ट्स आवडल्या.

अशोकमामा, तुमच्या सगळ्याच पोस्ट्स वाचनीय!

मी लिहिले असते तर 'आन सान स्यू की' यांच्याबद्दल पण ते काम आधीच जाई. यांनी केले असल्यामुळे वाचनमात्र. >> हर्पेन, तुला काही अ‍ॅडिशन लिहायचं असेल तर लिही ना!

मेघावती सुकर्णपुत्री (इंडोनेशिया) आणि तान्सु चिलर (तुर्कस्थान) ही अल्पस्मृत दोन नावे आठवली. >> गापै, तुम्हीही लिहा. तान्सु चिलरबद्दल ऐकल्याचं आठवत नव्हतं. तुम्ही नाव लिहिल्यावर शोधून वाचलं. तुर्कस्तानसारख्या (जरी ऑफिशीअली धर्मनिरपेक्ष असला तरी) मुस्लीम मॅजॉरिटी देशात ४७व्या वर्षी पंतप्रधान म्हणजे उल्लेखनीय आहे.

Pages