"बिछडे सभी बारी बारी.....!!" ५ अभिनेते, १ अभिनेत्री

Submitted by अशोक. on 13 August, 2014 - 01:00

माणसाचे आयुष्य अमर नाही हे अमान्य कुणीच करणार नाही. मृत्यू अटळ असतोच. तो कधी कुणाला गाठेल याचे निश्चित असे कुठले सूत्र नसते आणि आजारी पडलेल्या माणसाला देवदूत बनून आलेले डॉक्टर वाचविण्यात यशस्वी तर होतात पण तेच डॉक्टर त्या माणसाचा ज्यावेळी देवाघरी जायचा समय येतो त्यावेळी त्याला रोखू शकत नाही. हे झाले नैसर्गिकरित्या मरणक्रियेबाबत; पण असेही काही दुर्दैवी वा हताश जीव असतात या जगात जे स्वतः नैराश्येपोटी आपली जीवनयात्रा संपवितात. त्याचे कारण मग शोधले जाते. ते मिळते तर बहुधा असते एकाकीपणा, उदासीनता, ढळलेला मानसिक तोल, व्यवसायातून साचलेली अपयशमालिका आणि त्यातून निर्माण झालेली अस्थिर आर्थिक दुर्बलता. अन्यही कारणे असू शकतात विविध थरावरील लोकांची जी आत्महत्येला त्याना प्रवृत्त करतात. कलाकारही याला अपवाद नाहीत. अधुनमधून आपण अशाप्रकाराने जगाचा निरोप घेतलेल्या कलाकारांबाबत वाचतो, ऐकतो आणि ज्यावेळी रॉबिन विल्यम्ससारखा नेहमी हसर्‍या चेहर्‍याने सर्वत्र वावरणारा एक चांगला लोकप्रिय अभिनेता आत्महत्येद्वारे आपले जीवन संपवून टाकतो, त्यावेळी मात्र आपल्या मनाला हादरा बसतो. वाटते, अरे याला तर कालच मी मुलांसोबत एचबीओवर "जुमानजी" मध्ये पाहिला आणि आम्ही सर्वच दिलखुलास हसत होतो. हॉलिवूडच्या चंदेरी दुनियेतून अशा गुणी कलाकारांच्या मृत्यूची बातमी येणे हा काही नवीन प्रकार नाही. वयोमानामुळे, थकल्यामुळेही जगाला रामराम करणारे अनेक कलाकार आहे. पण आत्महत्त्येचा मार्ग स्वीकारून आपल्या चाहत्यांच्या मनावर ओरखडा निर्माण करण्याची परंपरा मेरिलिन मन्रो पासून जी चालत आली आहे ती खंडित होणारी नाही असेच दिसते.

२०१४ मधील हा आठवा महिना चालू आहे. रॉबिन विल्यम्सच्या निघून जाण्यामुळे मी सहज जानेवारीपासून हॉलिवूडचा कलाकार निधनाचा आढावा घेतला तर जी नावे समोर आली त्यांच्या कारकिर्दीकडे तसेच प्रेक्षकांच्या मनी असलेले त्यांचे स्थान पाहिल्यास ही मंडळी जरी आपल्या कुटुंबातील नसली तरीही यांच्या जाण्यामुळे रसिकांच्या मनी खरेच आपल्या घरातीलच कुणीतरी कमी झाले आहे अशीच भावना निर्माण झाली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अनेक कलाकारांच्याबाबतीत मी "बिछडे सभी बारी बारी...." म्हणतो....या लेखाद्वारे त्यांची आठवणही काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पाच अभिनेते आणि एक अभिनेत्री यांच्याचविषयी लिखाण मर्यादित ठेवले आहे, कारण ही सर्व नावे भारतीय प्रेक्षकांना माहीत आहेत. सुरुवात अर्थातच रॉबिन विल्यम्सपासूनच.

१. रॉबिन विल्यम्स : २१ जुलै १९५१ - ११ ऑगस्ट २०१४
ARobin.jpg
भारतीय प्रेक्षकांना "जुमानजी" आणि "मिसेस डाऊटफायर" या दोन चित्रपटांमुळे माहीत झालेला हा अभिनेता आपल्या कारुण्यपूर्ण विनोदी अभिनयशैलीने जगभर लोकप्रिय होता. जुलै १९५१ मध्ये जन्म आणि ऑगस्ट २०१४ मध्ये मृत्यू असे ६३ वर्षाचे आयुष्य लाभलेला विल्यम्स म्हणजे हॉलिवूडला लाभलेला एक गुणी कलाकार होता. तीन वेळा त्याला ऑस्कर पारितोषिकासाठी नामांकन मिळाले होते. मिळाले ते मॅट डेमॉनसोबत काम केलेल्या "गुड विल हंटिंग" चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी. फिशर किंग, अवेकनिंग्ज, मिसेस डाऊटफायर, नाईट अ‍ॅट द म्युझिअम ही आणखीन काही गाजलेले चित्रपट. डिस्नेच्या "अल्लादिन" या लोकप्रिय चित्रपतातील 'जेनी' साठी विल्यम्सने आवाज दिला होता.

अशा या अभिनेत्याला व्यसन लागले होते ते कोकेनचे, ते सुटले आणि मग जोडला गेला तो अल्कोहोलशी. यांच्या खाजगी जीवनात डोकावून पाहाण्यात तसा काही अर्थ नसल्याने अशा गुणी कलाकारांना व्यसनाधीन कसे व्हावे लागते हा विषय वेगळाच; पण सिद्ध झाले की विल्यम्स "डीप्रेशन" च्या गर्तेत जाऊन पडला होता. मागील काही महिन्यात तो हॅझेलडन फाऊंडेशनच्या 'अ‍ॅडिक्शन ट्रीटमेन्ट सेंटर" मध्ये दाखल झाला होता. तिथून घरी आल्यानंतरही तो एकाकी मनस्वी अवस्थेत दिवस काढत होता आणि ११ ऑगस्ट २०१४ रोजी त्याच्या सहाय्यकाने त्याची प्रकृती बिघडल्याचे संबंधित इस्पितळाला कळविले पण त्यांची टीम येण्यापूर्वीच अभिनेता विल्यम्सची एक्झिट झाली होती. पोलिस विभागाकडून तो मृत्यू आत्महत्त्या असल्याचा रीपोर्ट दिला गेला.

२. फिलिप सेमूर हॉफमन : २३ जुलै १९६७ - २ फेब्रुवारी २०१४
APhilip.jpg

न्यू यॉर्क इथे जन्मलेला हा विविध तर्‍हेच्या भूमिका करून जगभरातील प्रेक्षकांना पसंत पडलेला होता. "ट्रिपल बोगी" ह्या १९९१ मधील चित्रपटाने त्याने हॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता तर माय न्यू गन ह्या चित्रपटाद्वारे तो समीक्षकांना पसंत पडला होता. बहुतांशी सहाय्यक अभिनेता यातूनच त्याची चलतचित्राची प्रवासगाडी सुरू झाली होती आणि मुख्य अभिनेता कुणीही असला तरी फिलिपच्या वाट्याला आलेल्या भूमिका तो आपल्या खानदानी रुबाबाने प्रभावीरित्या सादर करीत असे. मॅट डेमॉन आणि ज्यूड लॉ या जोडीने गाजविलेल्या "टॅलेन्टेड मि.रिप्ले" ह्या रहस्यमय चित्रपटात फिलिप सेमूरची फ्रेडी माईल्सची मित्राची भूमिकाही तितकीच प्रभावी झाली होती. मॅट डेमॉनचा "टॉम रीप्ले" एका भांडणाच्या प्रसंगी फ्रेडीचा हॉटेलमध्ये खून करतो, तो प्रसंग अंगावर येतो. त्याला कारण या दोन अभिनेत्याचे कमालीचे सादरीकरण. "फ्लॉलेस", "मॅग्नोलिया" आणि "ऑलमोस्ट फेमस" हे फिलिपचे नावाजलेले आणखीन काही चित्रपट. "सायलेन्स ऑफ द लॅम्ब" अ‍ॅन्थोनी हॉपकिन्स आणि ज्योडी फॉस्टरने गाजविलेला हा चित्रपट. या कथानकाच्या पूर्वीच्या घडामोडीवर म्हणून 'रेड ड्रॅगन" आला होता. यातील फिलिप सेमूरने साकारलेली फ्रेडी लाऊंडस या पत्रकाराच्या भूमिकेचेही स्वागत झाले होते.

अशा प्रवासानंतर त्याच्या अभिनय कौशल्याला पूर्ण वाव देणारा चित्रपट त्याला मिळाला. तो होता "कपोत". ट्रुमन कपोत या पत्रकाराच्या जीवनातील घटनेवर आधारित या चित्रपटाची ही भूमिका अत्यंत गाजली आणि फिलिप सेमूरला २००६ चे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा "ऑस्कर" पुरस्कारही मिळाला.

कारकिर्दीच्या बहारात असताना आणि चाळीशीत असलेला या अभिनेत्याने अशाच एका मानसिक दडपणाच्या अवस्थेत असताना हेरॉईनचा डोस घेऊन २ फेब्रुवारी २०१४ रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

३) जेम्स गार्नर : ७ एप्रिल १९२८ - १९ जुलै २०१४
AJames.jpg
ज्यानी "द ग्रेट एस्केप" हा १९६३ मध्ये आलेला दुसर्‍या महायुद्धातील जर्मन युद्धकैद्यांच्या सुटकेच्या प्रयत्नावर आधारित गाजलेला चित्रपट पाहिला असेल त्याना मुख्य भूमिकेत असलेल्या स्टीव्ह मॅक्विन बरोबरच फ्लाईट लेफ्टनंट रॉबर्ट हेन्ड्लीच्या भूमिकेतील जेम्स गार्नर हा अभिनेता नक्कीच आठवत असणार. जुन्या जमान्यातील एक देखणा सशक्त अभिनेता म्हणून गाजलेला गार्नर वयाच्या सोळाव्या वर्षीत मर्चंट नेव्हीत भरती होऊन नंतर कोरिअन युद्धात प्रत्यक्ष सामील झाला होता व त्याला पर्पल हार्ट मेडलही मिळाले होते. जखमी झाल्यामुळे त्याला तिथून निवृत्ती घ्यावी लागली. त्यानंतर टेलिव्हिजनच्या विश्वात त्याने प्रवेश केला होता आणि तेथील त्याची कामाची तारीफ ऐकल्यानंतर वॉर्नर ब्रदर्स या स्टुडिओने त्याला चित्रपटांसाठी करारबद्ध केले. १९५७ मधील "मेव्हरिक" मालिकेने त्याचे नाव झाले आणि १९६० पर्यंत या मालिकेशी तो निगडित होता. यातील लोकप्रियतेच्या आधारावरच त्याला थ्रिल ऑफ इट ऑल, मूव्ह ओव्हर डार्लिंग आणि ग्रेट एस्केप सारखे गाजलेले चित्रपट मिळाले आणि हॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव झाले. ग्रेट एस्केपच्या बरोबरीनेच पुढे १९६६ मधील 'ग्रॅण्ड प्रिक्स' ह्या काररेसिंग जीवनावरील चित्रपटामुळेही गार्नरचे नाव घेण्यात येऊ लागले. तरीही त्याला लोकप्रियता मिळाली ती टेलिव्हिजनवर येत राहिलेल्या सीरियल्समुळेच...किंबहुना त्याचे नाव गाजावे असा चित्रपट त्याला सत्तरीनंतर मिळाला नाही. ८० च्या दशकात ब्रुस विलिससोबत सनसेट हा चित्रपट त्याने केला तर व्हिक्टर व्हिक्टोरिया आणि मर्फीज् रोमान्स हे आणखीन दोन चित्रपट. मर्फीज रोमान्समधील भूमिकेबद्दल त्याला ऑस्कर नामांकन मिळाले होते. मला स्वतःला त्याचा "३६ अवर्स" हा चित्रपट फार आवडला होता. यातही जर्मनानी पकडलेल्या युद्धकैद्याचीच, पण इस्पितळात पडून राहिलेल्या रुग्णाची, त्याने भूमिका केली होती.

हृदय विकाराने त्रस्त असलेला हा अभिनेत्याने वयाची ८० ओलांडली. १९ जुलै २०१४ या दिवशी घराचे दार कुणी उघडत नाही असा स्थानिक पोलिसांना कळविले गेल्यावर त्यांची रेस्क्यू टीम तिथे आली. दार उघडले गेले तर जेम्स गार्नर त्याना मृतावस्थेत आढळला. हृदयाच्या तीव्र धक्काने जेम्सचे निधन झाले असे पोलिस रीपोर्टमध्ये नमूद करण्यात आले.

४) एली वॅलेच : ७ डिसेंबर १९१५ - २४ जून २०१४
AEli.jpg

तब्बल ९९ वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या आणि अवघ्या जगतात लोकप्रिय असलेला हा चरित्र अभिनेता आपल्या भारतीय प्रेक्षकांच्या परिचयाचा झाला तो क्लिंट ईस्टवूडच्या अत्यंत लोकप्रिय झालेल्या "द गुड, द बॅड, द अग्ली" ह्या वेस्टर्न चित्रपटातील अफलातून भूमिकेमुळे. दहावीस वर्षे नव्हे तर तब्बल ६० वर्षे त्याने रुपेरी पडदा गाजवून सोडला. १९४९ मध्ये त्याने सुरू केलेल्या अभिनय क्षेत्रातील त्याची कामगिरी त्याने नव्वदी ओलांडली तरी तितक्याच उत्साहाने चालू होती. ज्यावेळी "टायटॅनिक" फेम केट विन्स्लेट जन्माला आली होती (१९७५) त्यावेळी एली वॅलेचने आपल्या वयाची साठी गाठली होती. तर अशा 'वृद्धा'ने चक्क २००६ मध्ये या केट विन्स्लेटसमवेत "द हॉलिडे" चित्रपटात तितक्याच उत्साहाने काम केले होते....यावेळी तो ९१ वर्षाचा होता. इतका उत्साह या हरहुन्नरी कलाकाराकडे कुठून आला असेल हा प्रश्न जगभरातील सिनेप्रेमींना पडलेला असेल. क्लार्क गेबल ते ज्यूड लॉ आणि मेरिलिन मन्रो ते केट विन्स्लेट अशा कितीतरी कलाकारांच्या पिढ्या या उत्साही अभिनेत्याने पाहिल्या आणि त्यांच्यासमवेत विविध भूमिकाही केल्या. याच्या चित्रापटांची निव्वळ यादी जरी द्यायची झाल्यास पान खर्ची पडेल. तरीही आपल्या प्रेक्षकांना माहीत असलेले एली वॅलेचच्या काही चित्रपटांचा उल्लेख करणे जरूरी आहे. अकिरा कुरोसावाच्या जगप्रसिद्ध "सेव्हन समुराई" वर बेतलेला "मॅग्निफिसंट सेव्हन" मध्ये यूल ब्रायनर, स्टीव्ह मॅक्विन, चार्ल्स ब्रॉन्सन, जेम्स कोबर्न आदी सात शूरांना सामोरा जाणारा खलनायक एलीने साकारला होता. मेरिलिन मन्रोसमवेत "मिसफिट्स", अमेरिकेचा इतिहास सांगणारा एपिक धर्तीवरचा "हाऊ द वेस्ट वॉज वन", "लॉर्ड जिम", ऑड्री हेपबर्नसोबतचा "हाऊ टु स्टील अ मिलिअन..." . कित्येक चित्रपट याने केले पण अर्थात यावरचा कळसाचा चित्रपट म्हणजेच सर्जेओ लीऑनचा "द गुड, द बॅड अ‍ॅन्ड द अग्ली" आणि त्यातील एलीचा टुको (खुद्द एली वॅलेचसुद्धा या चित्रपटाच्या प्रेमात इतका होता की २००५ मध्ये त्याने जेव्हा आपले आत्मचरित्र प्रकाशित केले, त्याला "द गुड, द बॅड अ‍ॅन्ड मी..." असेच नाव दिले). ग्रेगरी पेक व ओमर शरीफसमवेतचा "मॅकेन्नाज गोल्ड" हाही असाच गाजलेला. प्रत्येक दशकातील गाजलेल्या अभिनेत्यासमवेत चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत एली आपला हसरा चेहरा घेऊन वावरायचा. "गॉडफादर भाग-३" मध्येही अल पॅचिनोसमवेत त्याने काम केले तर २००३ मध्ये "मिस्टिक रिव्हर" मध्येही शॉन पेनसमवेत.

हॉलिवूड मधील कलाकारांच्या वैवाहिक जीवनाकडे लक्ष देवू नये असे मानले जाते कारण तो त्यांच्या खाजगी जीवनाचा भाग. तरीही एली वॅलेचच्याबाबतीत आगळे उदाहरण म्हणून सांगितले पाहिजे की या अभिनेत्याने एकच लग्न केले आणि ६६ वर्षे आपल्या पत्नीसोबत राहिला. तीन मुले, पाच नातू आणि अनेक पणतू त्याने पाहिले आणि त्यांच्यासमवेत जवळपास १०० वर्षाचे आपले खुशालीचे हसतमुख जीवन जगला.

५) मॅक्समिलन शेल : ८ डिसेंबर १९३० - १ फेब्रुवारी २०१४
AMax.jpg

जर्मनभाषिक पण ऑस्ट्रियामध्ये जन्म घेतलेला हॉलिवूडमधील असा अभिनेता ज्याने जर्मन ऑफिसरच्या भूमिकेत (जर्मन कैदी बचाव पक्षाचा वकील) आपली अभिनयक्षमता दाखवून १९६१ च्या "जजमेन्ट अ‍ॅट न्यूरेम्बर्ग" चित्रपटासाठी "सर्वोत्कृष्ट अभिनेता" म्हणून ऑस्कर मिळविले. वैशिष्ठ्य म्हणजे याच चित्रपटातील न्यायाधिशाची भूमिका करणार्‍या स्पेन्सर ट्रेसी या ज्येष्ठ अभिनेत्यालाही त्या वर्षी नामांकन मिळाले होते. तरीही शेलच्या अभिनयाची वाहवा झाली होती. मॉरिस शेव्हेलिअर आणि मार्सेल्लो मॅस्ट्रिओनी यांच्या पाठोपाठ मॅक्समिलन शेल या परदेशी अभिनेत्याने हॉलिवूडमध्ये आपले स्थान भक्कम केले होते. स्वीत्झर्लंडमध्ये वाढलेल्या या युवकाने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून शेक्सपिअरच्या नाटकातून भूमिका केल्या आणि हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. १९५८ मध्ये आलेल्या "द यंग लायन्स" या चित्रपटाद्वारे शेलची ओळख झाली. अतिशय देखणे व्यक्तिमत्व आणि संयत अभिनय ही त्याची वैशिष्ठ्ये होती. "जजमेन्ट अ‍ॅट न्यूरेम्बर्ग" पाठोपाठ नंतर त्याला द मॅन इन द ग्लास बूथ (१९७५) आणि ज्युलिया (१९७७) या दोन चित्रपटांसाठी पुन्हा ऑस्करची नामांकने मिळाली होती. शेलने पुढे अभिनयासमवेत चित्रपट दिग्दर्शनातही पदार्पण केले. १९७३ मध्ये त्याने दिग्दर्शित केलेला "पेडेस्ट्रिअन" ह्या जर्मन चित्रपटाला "बेस्ट फॉरेन लॅन्ग्वेज फिल्म" साठी ऑस्कर नामांकन लाभले तर गोल्डन ग्लोब पुरस्कार प्राप्त झाला होता. सुप्रसिद्ध जर्मन अभिनेत्री मार्लिन डिट्रिचवर त्याने "मार्लिन" नामक डॉक्युमेन्टरी तयार केली. यालाही ऑस्कर नॉमिनेशन प्राप्त झाले होते.

भारतीय प्रेक्षकांनी मॅक्समिलन शेलला पाहिले असेल ते प्रामुख्याने दुसरे महायुद्ध आणि तत्संबंधी कथानकावर आधारित चित्रपटातूनच. त्यापैकी प्रमुख म्हणजे "ओडेसा फाईल", "काऊंटरपॉईन्ट", "ब्रिज टू फार", "क्रॉस ऑफ आर्यन" आणि "ज्युलिया". १९९० नंतर शेलने प्रामुख्याने जर्मन टेलिव्हिजन निर्मिती आणि विविध मालिकांमधून कामे केली. अत्यंत सुखी आणि समाधानी आयुष्य या जर्मनभाषिक अभिनेत्याने व्यतीत केले. ऑस्ट्रियामध्ये ३१ जानेवारी २०१४ रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला.

६) शर्ली टेम्पल : २३ एप्रिल १९२८ - १० फेब्रुवारी २०१४
AShirley.jpg

वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षी हॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या ह्या छोट्या पोरीने जगभर अशी काही प्रसिद्धी मिळविली की आजही तिचे "जगातील सर्वात लोकप्रिय बालकलाकार" या उपाधीने शर्ली टेम्पल हे नाव घेतले जाते. विलक्षण लोकप्रियता मिळविणे म्हणजे काय हे या मुलीने दाखवून दिले होते. वयाच्या पाचव्याच वर्षी अभिनय, गायन आणि नृत्य यात ती चांगलीच पारंगत झाली होती. विलक्षण असे सौंदर्य, कामातील सहजता, सदैव हसरा चेहरा, अमेरिकन राष्ट्राध्यक्षापासून सामान्य कामगार यानी डोक्यावर घेतलेल्या ह्या मुलीने आपल्या चित्रपटाद्वारे स्टुडिओजना लक्षावधी डॉलर्सचे उत्पन्न मिळवून दिले होते. चित्रपटगृहाबाहेर तिच्या अनुषंगाने तयार झालेल्या बाहुल्या, खेळणी, रेकॉर्डस, चहापात्रे, पोषाख आदी अनेक माध्यमाद्वारेही उत्पन्नाचे विक्रम रचले गेले. १९३० ते १९४० या कालावधीत जन्माला आलेल्या मुलींचे नाव "शर्ली" ठेवण्याची लाटच आली होती. हॉलिवूडमध्ये नंतरच्या काळात अत्यंत नावारुपाला आलेल्या "शर्ली मॅक्लेन" चा जन्म १९३४ चा, तर तिच्या पालकांनी तिचे नाव शर्ली निवडले ते या बाहुलीमुळेच. क्लार्क गेबल, बिंग क्रॉस्बी, रॉबर्ट टेलर, गॅरी कूपर आदी अभिनेत्यांच्या चित्रपटांनी त्या वेळी जितका गल्ला गोळा केला त्यापेक्षा अधिकची कमाई शर्ली टेम्पल ह्या बालकलाकाराची होती. गॅरी कूपर तर प्रथम क्रमांकाचा अभिनेता पण असे म्हटले जाते की ज्यावेळी त्याने एका चित्रपटाच्या शूटिंग समयी शर्लीला पाहिले तेव्हा अगदी आतुरतेने तिच्याजवळ जाऊन आपल्या डायरीत तिची स्वाक्षरी मागितली होती. वाढत्या वयासोबत तिच्या कामात फरक पडत जाणे नैसर्गिकच होते. नायिकाचेही कामे तिने मिळविली तरीही तिच्यावरील "बालकलाकार" हा शिक्का प्रेक्षक विसरू शकले नाहीत. चित्रपटसृष्टीपासून जरी ती दूर झाली तरी लोकमानसातील तिची प्रतिमा पुसली गेली नाही. पुढे तिने अमेरिकन सरकारची प्रतिनिधी म्हणून 'राजदूता"चे कार्य केले. घाना आणि झेकोस्लाव्हाकिया या राष्ट्रात ती अमेरिकेन अ‍ॅम्बॅसिडर होती. कार्यरत राहिली अखेरपर्यंत आणि १० फेब्रुवारी २०१४ या दिवशी वयाच्या ८५ व्या वर्षी ही देखणी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली.

.....असे हे ५ अभिनेते आणि १ अभिनेत्री....ज्यानी २०१४ मध्ये या जगाचा कायमचा निरोप घेतला....त्यांच्या स्मृती जागवण्याचा हेतू या लिखाणामागे असल्याने कारकिर्दीचा सखोल पाठपुरावा केलेला नाही. रॉबिन विल्यम्स संदर्भात लिहावे असे मनी होतेच, पण त्याच्याविषयी वाचत असताना मग ही काही लोकप्रिय नावेही समोर आल्याने सर्वांना लेखात घ्यावे म्हणून तशी रचना केली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख... रॉबीन चे अनेक चित्रपट पाहिलेत... या माणसाला काही दु:ख असू शकेल अशी शंकाही आली नाही.

सुरेख लेख आणि माहिती!
तुमच्याकडे केवढी अचाट आणि अफाट माहिती आहे अशोकजी!!!!

अशोक राव , तुमचा धागा वाचून धक्काच बसला. मी फारसे चित्रपट पहात नाही पण माझ्या मुलाच्या नादाने जुने वेस्टर्न चित्रपट पाहण्यात आले. त्यातील माझे अत्यंत आवड्ते असे दोन अभिनेते या तुमच्या दुर्दैवी यादीत सापडले आणि मला याच्या बातम्या अशा वाचायला मिळाल्या नाहीत याचे माझे मलाच आश्चर्य वाटले !

त्यातला पहिला म्हणजे एली वॅलेक ..
अत्यंत व्हिम्जिकल... लोचट.. हलकट ..स्वार्थी पात्रे त्याने रंगविली. लोचटासारखे हसता हसता स्वार्थाने तो कधी क्रूर होईल हे सांगता यायचे नाही. हिन्दी शोले हा सेवन सामुराई , माग्निफिशन्ट सेवन या मार्गाने ढापलेला आहे हे आता सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यातील गब्बर देखील एली वॅलेकवरूनच बेतलेला आहे असे माझे वैयक्तिक मत आहे...
गब्बरचा तर्हेवाइक क्रूरपणा हा एली वॅलेकच्या अनेक भूमिकांशी जुळता आहे.... एली वॅलेक इम्पोसिबल स्पाय मध्येही त्या हेराचा बॉस म्हणून होता. पण ती भूमिका काही खास नव्हती.

दुसरा म्हणजे मॅक्समिलन शेल..
जजमेन्ट अ‍ॅट् न्यूरेम्बर्ग हा चित्रपटच अद्भुत आहे. (त्या वर तुम्ही लिहिणार आहात बरं...)
त्यात समर्थ अभिनेते खच्चून भरलेले आहेत . त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पहाणे हाच एक आनन्द आहेच. त्यात ओस्करलाही पुष्कळ स्पर्धा झाली आपसातच .. अगदी जुडी गारलॅन्ड , तो मनो रुग्ण असलेला अभिनेता. त्रेसी स्पेन्सर.इ. पण वकीलाने बाजी मारली. आणि त्याला तो पात्र होताच....
या संदर्भात अनिल अवचटांनी कुठेतरी लिहिल्याप्रमाणे स्व. निळूभाऊ फुले यांची त्यांचेशी एका गप्पाष्टकात गाठ प्रथम झाली . त्यात बोलता बोलता निळूभाऊनी (त्यावेळी ते स्ट्रगलर होते आणि कोणाला फारसे माहीतही नव्हते)
या जजमेन्ट ऑफ न्यूरेम्बर्ग मधील या वकीला चे हे शेवटचे भाषण साभिनय म्हणून दाखवले होते. तेव्हाच अवचटांना निळूभाऊंच्या क्शमतेची ओळख पटली होती....

आजही मी हा चित्रपट कोठूनही सुरू करून पहात बसतो. त्यातली वकीलांची भषणे तर पाठ झाली आहेत

धन्यवाद अशोक राव.....

ऱोबिन विल्यम्सचे जाण्याचे कारण खरेच चटका लाऊन गेले होते ..
आणि आता हि लिस्ट अन त्यातील इतर काही नावे बघून.. लेख अजून वाचलाच नाही.. वाचतो

धन्यवाद काकाश्री ! माहितीपुर्ण लेख...

रॉबिन विल्यम्सबद्दल लिहीताना महत्वाचा उल्लेख राहुन गेलाय. "डेड पोएट्स सोसायटी"चा प्रो. जॉन किटींग ! " Happy

रॉबीनहूड...

एली वॅलेच (मी असाच उच्चार ऐकला होता टीव्हीच्या बातम्यात) च्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर मला वाईट अर्थातच वाटले होते; पण धक्का बसला नव्हता. कारण वय ९९ म्हणजे तशी बातमी केव्हाही येणार होतीच. पण जवळपास ५०-६० वर्षे जी व्यक्ती हॉलिवूडमध्ये अगदी कामात गर्क आहे, तिने तब्येत राखण्याचा आदर्शवत असा नमुनाच पेश केला होता त्याबद्दल एलीची आठवण कायम राहिल यात संदेह नाही.

एली आणि मॅक्समिलन शेल ही दोन नावे सर्वानाच प्रिय....शेलचे व्यक्तिमत्व तर ग्रॅण्डच होते. यांच्याच बरोबरीने आणखीन एक असाच गाजलेला कलाकार ६ एप्रिल २०१४ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी गेला....मिकी रूनी. "नॅशनल व्हेल्वेट" मध्ये एलिझाबेथ टेलरला घोडेस्वारी शिकविणारा. त्याच्याविषयीही लिहावेसे वाटत होते, पण लेखाची लांबी वाढत गेली असती....शिवाय रुनी भारतीय प्रेक्षकाला किती माहीत असेल या शंकेमुळेही त्याचे नाव घेतले नाही लेखात.

"जजमेन्ट अ‍ॅट न्यूरेम्बर्ग" लेख डोक्यात आहेच.

विशाल...

""डेड पोएट्स सोसायटी"चा प्रो. जॉन किटींग....". मान्य, डोक्यात होते हे नाव, पण दुर्दैवाने हा चित्रपटच मला पाह्यला मिळाला नाही....कदाचित त्यामुळेही त्याचा उल्लेख झालेला नाही लेखात. मात्र आता नक्की हा चित्रपत पाहणार इतकेच म्हणू शकतो.

सुरेख लेख आणि माहिती!
तुमच्याकडे केवढी अचाट आणि अफाट माहिती आहे अशोकजी!!!! >>+१००

मामा लेख आवडला. रॉबिन सोडून एकही कलाकार मला माहिती नाही कारण मी फारसे इंग्रजी सिनेमे पहातच नाही.
लेखावरून कल्पना येते की तुमचं वाचन किती अफाट आहे.

होय जेम्स बाँड.....मिशन इम्पॉसिबल भाग-३ मध्ये फिलिप सेमूरची प्रमुख व्हिलन ओवेन डेव्हिएनची फार प्रभावी भूमिका आहे. टॉम क्रूझच्या तोडीस तोड त्याचे काम होते.

धन्यवाद शशांक जी....

माहिती असण्याचे कारण म्हणजे लेखात उल्लेख केलेल्या सर्व कलाकारांचे जवळपास सारे चित्रपट मी पाहिले आहेत. शिवाय एखादा चित्रपट आवडलाच तर त्या संदर्भातील विविध मॅगेझिन्समधून येत राहाणारी माहितीही मी टिपून ठेवत असे....एक प्रकारचा तो छंदच होता त्या वयातील असे म्हटले तरी चालेल.

अभिनेता असो वा अभिनेत्री....केव्हातरी आपल्यातून कायमचे निघून जात असतात आणि ते निसर्गमान्यही आहेच. पण अगदी शिखरावर असलेला तसेच पैशाकडूनही सधन अवस्थेत असलेला रॉबिन विल्यम्ससारखा प्रसन्न चेहर्‍याचा कलाकार आत्महत्त्या करतो तेव्हा मलाही एक प्रकारचे ते गूढ रहस्यच वाटत राहते. त्यामागील कारणमीमांसा पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाची नसते कारण तो खून नाही. मग तुमच्यामाझ्यासारख्या जनतेतील त्याच्या चाहत्यांना ते नेमके कोडे काय असेल जीवनासंबंधी याचेच कोडे पडते.

तुम्ही वर उल्लेख झालेला "मिशन इम्पॉसिबल-३" पाहिला नसल्यास जरूर पाहा...आणि त्यातील फिलिप सेमूर पाहा. अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारा एखाद्या उद्योगघराण्याचा सम्राटच वाटतो तो....इतका राजेशाही. प्रत्यक्षातही तो तसाच....तरीही आत्महत्त्या...चाळीशीत...काय कारण असेल....हेच गूढ.

सुरेख लेख आणी माहितीचा नवीन कन्गोरा. अशोकमामा धन्यवाद या माहिती आणी लेखा करता. एली वॅलेच कायम स्मरणात राहील.

मामा तुमच्या व्हर्सटॅलॅटीला सलाम. आजच सकाळी पेशव्यांच्या स्त्रीयांबद्दलचा लेख वाचला आणी आता हा. किती सखोल अभ्यास आहे तुमचा वेगवेगळ्या कितीतरी क्शेत्रात (कसं लिहायचं).

प्रत्येक वाक्याला अगदी अगदी. फ्लॉलेसबद्द्ल अनुमोदन. काय रंगवलाय ट्रांसवेस्टाईट सेमुरने. जजमेंट अ‍ॅट न्यूरेम्बर्ग मधला शेलीसुध्दा अविस्मरणीय. खरंतर प्रत्येक सिनेमा जेम कॅटेगरीत मोडतो.

तुमचे खासच धन्यवाद. खूप सुरेख माहीती देता आणी सुरेख आठवणी जागवता.

होय जेम्स बाँड.....मिशन इम्पॉसिबल भाग-३ मध्ये फिलिप सेमूरची प्रमुख व्हिलन ओवेन डेव्हिएनची फार प्रभावी भूमिका आहे. टॉम क्रूझच्या तोडीस तोड त्याचे काम होते.>>>>>>

अशोककाका - मला ही तसेच वाटत होते, पण फिलिप सेमूर गेल्यावरच्या कुठल्याही लेखात मिशन इम्पॉसिबल चा उल्लेख नव्हता. तुम्ही पण केला नाहीत उल्लेख. ह्याचे काही खास कारण आहे का?

अशोक जी
गतकाल विव्हल केलेत.
यातील प्रत्येक जण हिरा होता. शाळा कॉलेजात यांच्या साठी किती बंक केले आठवत नाही.
सर्वांना भावपूर्ण श्रध्दांजली अन तुमच्या सखोल अभ्यासा बद्दल ............. धन्यवाद. या क्षणी अभिनंदन हा शब्द लिहावासा वाटत नाही.... अस्थानी वाटतो.
Sad Sad

वेल टोचा.....आता तुमचा प्रतिसाद तसेच जेम्स बॉण्ड यानी केलेला उल्लेख वाचल्यावर मला नक्की वाटत आहे की मूळ लेखात मिशन इम्पॉसिबल-३ चे नाव हवे होते.

क्षमस्व.

रेव्यु सर....

मलाही अशा क्लासिक म्हटल्या जाणार्‍या सिनेमांसाठी प्रसंगी कॉलेज पिरिअड्स बंक करावे लागले आहेत...त्याची आता आठवण झाली.

"इन द हीट ऑफ द नाईट", "डॉक्टर झिवागो", "रायन्स डॉटर", "समर ऑफ ४२".....असे चित्रपट पाहून आलो की मन इतके अस्वस्थ होत असे....एवढ्यासाठी की आता सायंकाळी या चित्रपटाबद्दल मी कुणाशी आणि किती बोलू ? माझ्या किती मित्रांना हे चित्रपट समजतील ? त्या पातळीपर्यंतचे कुणी असेल का आजूबाजूला ? अशा विचारांनी डोके फिरून जायाचेही.....आज नशीब चांगले की नेटच्या उपलब्धततेमुळे रॉबिन विल्यम्सच्या आत्महत्तेमुळे मला झालेले दु:ख शब्दबद्द करता आले आणि केल्यानंतर ते तुमच्यासारखे अभ्यासू सदस्य वाचतात तरी याची जाणीव मग मनावर फुंकर घालत आहे.

सुरेख लेख आणि आढावा अशोकराव! अभिनयात प्रचंड ताकदीची ही माणसं होती.

इली वलाच सारखे दिग्गज अभिनेते वयोमानानुसार काळाच्या आड गेले तरी आम्हाला दु:ख होतं तिथे चाळीशीतच एक्झीट घेतलेल्या रॉबिन विल्यम्स आणि फिलिपसारख्यांबद्दल काय बोलणार? मला रॉबिन विल्यम्स खुप आवडला होता "पॅच अ‍ॅडॅम्स" मध्ये. अतिशय हुशार पण सनातनी नियमांना न जुमानणारा मेडिकल स्टुडन्ट त्याने सुरेख उभा केला होता. पण त्याच्यातली जबरदस्त क्षमता जाणवली ती "इन्सोम्निया" मधल्या नकारात्मक भुमिकेत. समोर अल पचिनोसारखा बाप माणुस असताना, नुसत्या नजर आणि हावभावांच्या आधारे प्रेक्षकांचा थरकाप उडवणारा खलनायक रॉबिन विल्यम्सने उभा केला आहे.

फिलिपचेही तसेच. चार्ली विल्सन्स वॉर मधला पहिलाच वरिष्ठाशी भांडण्याचा सीन आणि फिलिप पडदा व्यापुन टाकतो. पुन्हा चित्रपटात समोर टॉम हँक्ससारखा बाप माणुस.

जेम्स गार्नर म्हटल्यावर मला जुने गुड ओल्ड डेज आठवले तर अशोकराव तुम्हाला नवल वाटायला नको. सभ्य नायक. तगडे आणि देखणे. वेस्टर्न पटांची आवड असल्याने गार्नरने साकारलेला शेरीफ वायट अर्प खुप भावला होता. हा चित्रपट होता "अवर ऑफ गन" वायट अर्प आणि डॉक हॉलिडे या जोडगोळीवर अनेक चित्रपट निघाले त्यातला हा एक देखणा चित्रपट.

मॅक्समिलन शेल आणि "जजमेन्ट अ‍ॅट न्यूरेम्बर्ग" वेगळ काढताच येणार नाही. समोर एकसे एक तगडे अभिनेते. स्पेन्स स्ट्रेसी, रिचर्ड विडमार्क, बर्ट लॅंकास्टर, माँटगोमेरी क्लिफ आणि ती सीन खाऊन टाकणारी मेरलिन डिट्रीच. यांच्यासमोर या अभिनेत्याने ऑस्कर मिळवले.

इलि वलाचचा लव्हेबल टुको कोण विसरु शकेल? "द गुड द बॅड अँड द अग्ली" मधला टुको अजरामर आहे. त्यावर वेगळ्याने सविस्तरच लिहावे लागेल.

Pages