कुसुमाग्रजांच्या स्मृतीप्रित्यर्थ

Submitted by लाल्या on 26 July, 2014 - 10:12

जागतीक मराठी दिनाच्या प्रसंगी २-३ वर्षांपूर्वी केलेलं हे गाणं. सहज कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना आदरांजली म्हणून त्यांची ही कविता संगीतबद्ध केली, प्रोग्राम केली, रेकॉर्ड केली, आणि माझ्या पार्टनर लहु पांचाळला गायला सांगितली.

ऐकून नक्की प्रतिसाद द्या!

http://www.youtube.com/watch?v=6_X2AVW82lo

- माधव.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाल्या,
गाणे ऐकले. प्रयत्न खूपच चांगला आहे. मी तुमच्या चालीवर/ संगीतावर काही प्रतिसाद देणे इतकी माझी पात्रता नाही, पण ऐकताना एक श्रोता म्हणून जे वाटले ते लिहितो आहे. अति-स्पष्ट झाले असेल तर माफ करा.

हा कुसुमाग्रजांनी लिहिलेला 'फटका' आहे. त्याचा बाज/ जोश चालीत तितकासा प्रभावीपणे उतरलाय असे वाटले नाही.
तुम्ही संपूर्ण कविता संगीतबद्ध केलेली दिसते आहे. तिच्या लांबीमुळे अनेक कडव्यात तुम्हाला सलग गायन योजावे लागले आहे. त्यामुळे एकाच चालीत फार वेळ काहीतरी ऐकतोय असा फील येतोय.
त्या ऐवजी, काही मोजकीच कडवी संगीतबद्ध केली असती तर तुम्हाला चालीतले वैविध्य वापरता आले असते असे वाटते.
काहीसा 'महेंद्र कपूर' यांनी गायलेली मराठी गाणी ऐकताना येतो तसा फीलही आला उच्चारांच्या बाबतीत/ आवाजाच्या बाबतीत(नका... या शब्दावर आवाजाचं कंपन अगदी महेंद्र कपूर यांच्यासारखे वाटले)

चू.भू.दे.घे.

-चैतन्य

धन्यवाद चैतन्य. स्पष्ट फीडबॅक नेहमीच हवा असतो. माझ्या बाजूने स्पष्टीकरण देत आहे. अर्थात बाजू मांडत नसून बाजू सांगतोय!

ही कविता करताना चाल बनवण्यापेक्षा कविता पूर्णपणे लोकांपर्यंत पोचवावी हा एकमेव उद्देश्य होता. म्हणून कवितेचे कोणतेही शब्द अथवा कडवी वगळण्याचा प्रश्नच नव्हता! ही एक आदरांजली कविवर्य कुसुमाग्रजांना वाहीलेली असून त्याच्यात काव्यामध्ये कसलंही एडिटींग करणं मूळ उद्देश्यालाच डिफीट करणारं ठरलं असतं. चाल साधी आणि रीपीटेटिव्ह ठेवण्यामागेही काव्याला प्राधान्य हाच उद्देश्य होता!

एक संगीतकार म्हणून माझं एक प्रामाणिक मत आहे कि शब्द जर ताकदवान असतील आणि त्यांचाच जर प्रभाव दाखवायचा असेल तर गाण्यात संगीत दिग्दर्शनाची पेहेलवानी करण्यात अर्थ नसतो! उच्चतम शब्दांना साध्या चालीचीच जोडी उठून दिसते!

अर्थात हे माझं वैयक्तीक मत आहे!

या गाण्याचा शुद्ध हेतू हा शब्दांना आदरांजली देणं हाच आहे!

- माधव.

प्रयत्न उत्तम आहे.
चाल जुनी आहे.
फिल्मी वाटले.
या कवितेत जोश अन आज्ञा आहे - आर्जव नव्हे
तुमच्या भावात आर्जव आहे.
काव्यावर काय भाष्य करणार? ते अजरामर आहे.

लाल्या,
खुल्या दिलाने प्रतिसाद स्वीकारलात त्याबद्दल धन्यवाद Happy
तुमचे स्पष्टीकरणही पटण्याजोगेच आहे.

रेव्यु,

प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा. मला यात जोशापेक्षा आर्जवच जास्त दिसले. कवितेचं नावही "स्वातंत्र्यदेवतेची विनवणी" असं आहे.

पण प्रत्येक व्यक्ती यातनं वेगळा अर्थ काढू शकते! Happy

"चाल जूनी आहे" याचा अर्थ नाही कळला!

प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद!

- माधव.

वा! लाल्या,
प्रथमतः एका सुंदर कवितेची सुरेख ओळख करून दिल्याखातर तुमचे हार्दिक अभिनंदन.
लहू ह्यांचेही अभिनंदन!!

कविता, चाल, गायन सर्वच उत्तम झाले आहे आवडले.
चित्रदर्शन आणि कवितेतील आशय ह्यांच्या सुसंगतीस आणखीही वाव आहे.

>>>>>'एकवीसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका'

>>>>>>>उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरु नका।

खूप सुंदर!
-----------------------------------------------------------------

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करु नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरु नका।।
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरु नका।।

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालु नका।
अंध प्रथांच्या कुजट कोटरी दिवाभितासम दडू नका।।
जुनाट पाने गळुन पालवी नवी फुटे हे ध्यानि धरा।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका।।

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतिल दुसरे बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका।।
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा।
मेजाखालुन मेजावरतुन द्रव्य कुणाचे लुटू नका।।

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका।।
सत्ता तारक सुधा असे पण सुराहि मादक सहज बने।
करिन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेउ नका।।

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे।
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकु नका।।
पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकु नका।।

गोरगरिबा छळू नका । पिंड फुकाचे गिळू नका।
गुणीजनांवर जळू नका।
उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरु नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरु नका।।

परभाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।।
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका।।

कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणु नका।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडु नका।।
पुत्र पशूसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया।
परवित्ताचे असे लुटारु नाते त्याशी जोडु नका।।

स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे।
सदन आपुले करा सुशोभित दुसर्याचे पण जाळु नका।।
तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी।
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका।।

सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामधे धरा।
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालुन पळू नका।।
करा कायदे परंतु हटवा जहर जातिचे मनातुनी ।
एकपणाच्या मारुन बाता ऐन घडीला चळू नका।।

समान मानव माना स्त्री तिची अस्मिता खुडू नका।
दासी म्हणुनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका।।
नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा।
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका।।

माणुस म्हणजे पशू नसे। हे ज्याच्या हृदयात ठसे।

नर नारायण तोच असे।लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरु नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरु नका।।
– कुसुमाग्रज

वाह! छान.