एक्स्ट्रा टाईमची पेनल्टी किक (Movie Review - Kick)

Submitted by रसप on 28 July, 2014 - 00:25

'माझं पोरगं कसलं व्रात्य आहे, उपद्व्यापी आहे ! जराही शांत बसत नाही आणि बसूही देत नाही.
प्रवासात तर डब्यातल्या प्रत्येकाला जाऊन छळायचं असतं ! एका जागी थांबत नाही.
शाळेतून रोजच तक्रार असते !
मनासारखं झालं नाही तर सगळं घर डोक्यावर घेतं.
हातात काहीही आलं की आधी ते फेकणारच !
आयटम सॉंग्स भारी आवडतात.. 'झंडू बाम'वर तर कसलं नाचतंय !'

- कशाचंही कौतुक असतं लोकांना. ज्यासाठी एक धपाटा द्यायला हवा, त्यासाठी एक गालगुच्चा घेतला जातो आजकाल. ह्या लाडोबांनी काहीही केलेलं चालतं आई-बापाला. ह्यांचा आनंद आणि बाकीच्यांना वैताग !
असंच काहीसं आपल्या फॅन मंडळींचं आहे. त्यांच्या लाडोबांनी काहीही केलं तरी चालतं. चालतं कसलं, ते 'लै भारी' असतं. मग तो 'किक'च्या सुरुवातीचा जवळजवळ तासभराचा वात आणणारा अस्सल मूर्खपणा का असेना !

मागे एकदा मोठ्या अपेक्षेने पंकज कपूर दिग्दर्शित 'मौसम' बघायला गेलो होतो. असह्य होऊन मध्यंतराला बाहेर पडलो. 'किक'च्या मध्यंतरापर्यंत तश्याच निर्णयाला पोहोचत होतो. एक तर 'टायटल्स'मध्ये 'म्युझिक - हिमेश रेशमिया' दिसलं होतं, तेव्हापासून पाचावर धारण बसली होती की त्याची काही तरी भूमिका असणारच. मी सश्याच्या बावरलेपणाने बरोबरच्या मित्राला माझी भीती कुठलाही आडपडदा न ठेवता बोलून दाखवली. तेव्हा समजलं की हिमेश दिसणार नाहीये. मध्यंतरानंतर तग धरण्याचं बळ त्या तीन-चार शब्दांत होतं आणि मी बाहेर न पडता तिथेच बसून राहिलो.

तर कहाणी अशी आहे की.....
'देवी लाल सिंग' (सलमान) हा एक सटकलेल्या डोक्याचा चाळीशीचा तरुण असतो. (चाळीशीचा तरुण म्हणजे 'गरमागरम बियर' म्हटल्यासारखं वाटत असेल. पण ते तसंच आहे.) हुशार व सुशिक्षित असूनही त्याच्या सतत काही तरी 'थ्रिलिंग' करण्याच्या चसक्यामुळे त्याने आत्तापर्यंत ३२ नोकऱ्या सोडलेल्या असतात. गावात देवाच्या नावाने जसा एखादा वळू सोडलेला असतो, तसा हा स्वत:च्या 'किक'साठी गावभर उधळत फिरत असतो. त्याला काय केल्याने 'किक' मिळेल, हे सांगता येत नसतं. एकीकडे मैत्रिणीच्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध तिचं लग्न करवून देत असतानाच दुसरीकडे त्याच लग्नाबद्दलचे अपडेट्ससुद्धा त्याच घरच्यांना देऊन, त्यांना लग्नाच्या ठिकाणी आणून, त्यांच्यासमोर लग्न लावून देतो, कारण त्यातून 'किक' मिळते !
एक बथ्थड चेहऱ्याची मानसोपचार तज्ञ 'शायना' (जॅकलिन फर्नांडीस) त्याला भेटते आणि त्याला एक वेगळीच 'किक' बसते. प्रेमाची. त्या प्रेमाखातर तो पुन्हा एकदा नोकरी करण्याचा प्रयत्न करतो. तो न जमल्याने नाराज झालेल्या शायनावर नाराज होऊन 'आजसे 'पैसा कमाना' यही मेरी नयी 'किक' है' असं ऐकवून देवी अंतर्धान पावतो. वर्षभर त्याची वाट पाहून अजून थोराड होत चाललेली शायना कदाचित गाल भरून येतील ह्या आशेने असेल, थेट पोलंडची राजधानी 'वॉर्सो'ला आई-वडील, बहिणीसह शिफ्ट होते ! (च्यायला ! मी ३ ब्रेक अप्स केले. कधी वर्सोव्यालाही जाऊ शकलो नाही. माझ्या प्रेमात 'किक'च नव्हती बहुतेक!)

इथपर्यंत थेटरात बसलेले सगळे पकलेले असतात. थेटरात जांभयांची साथ आलेली असते. पण कोमात गेलेला पेशंट शुद्धीत यावा, तसे अचानक लेखक, दिग्दर्शक शुद्धीत आल्याची लक्षणं दाखवायला लागतात.

कुठल्याही कर्तव्यदक्ष पालकांना असते, तशी शायनाच्या घरच्यांनाही तिच्या लग्नाची काळजी असतेच. त्यामुळे वडिलांच्या मित्राचा मुलगा 'हिमांशु' (रणदीप हुडा) कहाणीत येतो. सुपरकॉप हिमांशु एका 'डेव्हिल' नावाच्या चोराच्या करामतींनी बेजार झालेला असतो. पुढची चोरी 'वॉर्सो'मध्ये होणार असा एक खत्तरनाक डोकेबाज शोध लावून तो इथे आलेला असतो. 'डेव्हिल' म्हणजे पूर्वीचा 'देवी' असणारच असतो. अश्याप्रकारे कहाणीची 'त्रिकोणीय' गरज पूर्ण होते.
ह्यानंतर नेहमीची थरारनाट्यं यथासांग पार पडतात. कहाणी आणखी पुढेही उलगडत जाते. 'नवाझुद्दिन सिद्दिकी'ने जबरदस्त साकारलेला खलनायक 'शिव' येतो. आणि इतर कुठल्याही सलमानपटाच्या ठराविक वळणावर चित्रपट 'इतिश्री' करतो.

kickposter1_650_052314011334.jpg

चित्रण, छायाचित्रण तर आजकाल सुंदर असतंच. इथेही ते सफाईदार आहे. मध्यंतराच्या जरा आधीपासून कहाणी चांगला वेगही पकडते. पण हिमेश रेशमियाची गाणी वेगाला बाधा आणायचं काम सतत करत राहतात. खासकरून 'नर्गिस फाक्री' असलेलं एक गाणं तर पराकोटीचा अत्याचार करतं.

'जॅकलिन फर्नांडीस' खप्पड चेहरा आणि विझलेल्या डोळ्यांनी अख्ख्या चित्रपटभर अभिनयाचा अत्यंत केविलवाणा अयशस्वी प्रयत्न करते.

सौरभ शुक्ला, रजित कपूर व मिथुन चक्रवर्ती ह्यांना फारसं काही काम नसल्याने ते वायाच गेले आहेत. नवाझुद्दिनच्या भूमिकेचीही लांबी तशी कमीच आहे. पण महत्वाची तरी आहे. त्याचं ते 'ट्टॉक्' करून विकृत हसणं जबराट आहे. पण म्हणून 'मै १५ मिनिट तक अपनी सांस रोक सकता हूँ' हे काही पटत नाही.

रणदीप हुडा हा मला नेहमी एक गुणी अभिनेता वाटतो. त्याचा वावर अगदी सहज आहे. कोणत्याही खानपटात दुसऱ्या कुठल्या नटाने छाप सोडणे म्हणजे दुसऱ्याच्या बगीच्यात शिरून तिथलं गुलाबाचं फूल डोळ्यांदेखत तोडून आणण्यासारखं आहे.

खरं तर तेलुगु सिनेमाचा रिमेक असल्याने सगळा मसाला मिला-मिलाया आणि बना-बनायाच होता. फक्त चकाचक भांड्यांत सजवून समोर ठेवायचं होतं. ते ठेवलंच आहे. त्यामुळे एकदा बघायला हरकत नसावी.
असं करा.... खणखणीत एसी असलेल्या चित्रपटगृहात, पोट मस्तपैकी टम्म फुगेस्तोवर खादाडी करून जा आणि पहिला एक तास झक्कपैकी झोप काढा. मग मध्यंतरात गरमागरम चहा-कॉफी घेऊन पॉपकॉर्न चिवडत उर्वरित अर्धा भागच पहा. मज्जा नि लाईफ !

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2014/07/movie-review-kick.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटाचे परीक्षण लिहणे आणि खिल्ली उडवणे यातला फरक लक्षात न आल्याने रसप यांची परिक्षणं फारच पोरकट वाटतात ,प्रत्येक चित्रपटाची खिल्लि उडवणारी शिर्षकं(, उदा- लय सॉरी,) टाकून फार मोठे परीक्षक होता येत नाही.पुलेशु.

>> चित्रपटाचे परीक्षण लिहणे आणि खिल्ली उडवणे यातला फरक लक्षात न आल्याने <<

वाचत रहा. येईल हळूहळू ! इतकं कठीण नाहीये ते. प्रयत्न करूनही न जमल्यास मी मदत करीन लक्षात आणून देण्यासाठी. Happy

वाचत रहा >>>तुम्हीही इतर ठिकाणची परीक्षणं वाचत रहा व पोरकटपणातून बाहेर या ,वरती लाडोबाचा मेटाफोर तुमाला फारच शोभतोय, काहीही खरडलं कि चारदोन लोकांनी चांगलं म्हण्टले कि लाडावले Proud ,मग कुणीतरी क्रिटीकल लिहून या लोकांना किक द्यायची गरज असते ,नायतर हे लोक फुकट मिळतयं म्हणून काहीही खरडून स्वतःला व मायबोलीलाही 'लै सॉरी' करुन टाकतात... Biggrin

अगदीच काही सुमार नाही पिच्च्रर . एंटरटेंटमेन्ट छान होते . थेटरचं तिकिट १०० ते १५० असेल तर पैसे वसूल आहे पिच्चर . सलमान ने कथेवर जरा बरं लक्ष दिलय . दबंग-१ नंतर भुमीकेचा एक कॅरेक्टर म्हणून प्रभाव पाडेल असा सलमान यात आहे . चित्रपटाला सामाजिक संदेशही दिला आहे .
सलमाननं म्हटलेली गाणी हे देखील आकर्षण आहे चित्रपटात .

नर्गिस फक्री मात्र खरच अत्याचार करते .

जितू तू हल्ली ठोकळाछाप परिक्षणे लिहितोय्स . अगदीच २ स्टार द्यावेत इतकाही वाईट नाही पिच्चर तो पुढच्यावेळी जरा मोकळ्या मनाने आणि जराश्या रिकाम्या डोक्याने पिच्चर बघत जा किंवा १०० एक रुपये जेमतेम खर्च होतील असेच काही करत जा

मी ह्या पिच्चरला ३ . १\२ स्तर्स आरामात देइन मध्यंतरापर्यंत जरा डिंग्या मारल्यात त्या न पटल्याने अजून १\२ मार्क कमी करता येवू शकतो .

जितु Rofl

सलमान फॅन्सनी वात आणलाय अगदी Uhoh
भाई की फिल्म है एक बार तो देखनी बनती है वगैरे वगैरे.... एक बार देखोगे तो फिरसे देखने का मन करेगा वगैरे वगैरे पण Wink

पण असो! तरीही गर्दी होतेय इथेच तो स्टार म्हणून जिंकला म्हणायचं आणि सलमान न आवडणार्‍यांनी अशा फॅन्सचा आणि सिनेमांचा अनुल्लेख करायचा Wink

सलमानचा सिनेमा म्हणल्यावरच पहाण्यात काही इंटरेस्ट नव्हता... तो आणि त्याचे माकडचाळे असणारचं याची खात्री होती Happy ट्रेलर वरचा सायकल स्टंटपाहुन तो निर्णय पक्का झाला. परिक्षणं (अनेक परिक्षण्स ;)) वाचुन उरली सुरली इच्छा पण संपली Happy

सलमानच्या चित्रपटाला स्टोरी नसणे हे बाय डिफॉल्ट आले.

स्टोरीविरीवर मेहनत आमीर सारखे लोक्स घेतात, ज्यांनी ती घेतली तरच त्यांचे चित्रपट चालू शकतात अन्यथा त्यांचे नुसते नाव तो जलवा दाखवू शकत नाहीत.

सलमानसारखे बस्स स्टारडमवर आपला चित्रपट चालवतात.

आणि यात काही गैर नाही, जर नाव आणि पैसा तुम्हाला असा सहजगत्या मिळत असेल तर तुम्ही एक्स्ट्राचे एफर्ट कश्याला घ्याल.

जर आपण लॉजिक वगैरेची अपेक्षा ठेऊन जाल आणि त्यामुळे निराश व्हाल तर ती आपली स्वताचीच चुकी.

दोन्ही परीक्षणांच्या मते सेकंड हाल्फ जबराट वा सलमान स्टाईल आहे, मग बस्स पहिल्या हाल्फचे कोणाला काही पडले नाही, लोक्स दिड तासाचा सिनेमा समजून ते एंजॉय करतील.

मॉरल ऑफ द स्टॉरी - सलमान रॉक्स. मग त्याला तुमचे ५ स्टार नकोत की तुमचा फिक्सिंग असलेला फिल्मफेअर अ‍ॅवार्ड नको. यहा पे जो बिकता है वही टिकता है !

सलमान रॉक्स. मग त्याला तुमचे ५ स्टार नकोत की तुमचा फिक्सिंग असलेला फिल्मफेअर अ‍ॅवार्ड नको. यहा पे जो बिकता है वही टिकता है !>>> बास्स!!! सोला आने सच बात....

सलमान खान... बस नामही काफी है. भाई की पिक्चर बोले तो भाई की पिक्चर. और कुछ जरूरी नही! (सिनेमा वाईट असलाच तरी लोक बघायला जातात यातच भाईपुराण आलं!)

हिमेश रेशमियाच्या मुझिकला एवढे का घाबरताय.... तो वाईट्ट सिंगर अ‍ॅक्टर आहे, पण म्युझिक कायम मस्त देतो.

आम्ही आज रात्री होपफुली बघणार. (मग परीक्षण लिहिणार!!!!)

सलमान रॉक्स. मग त्याला तुमचे ५ स्टार नकोत की तुमचा फिक्सिंग असलेला फिल्मफेअर अ‍ॅवार्ड नको. यहा पे जो बिकता है वही टिकता है !>>>>>>>>>>>> आयशप्पथ ऋ. क्या बात है. बासच आता कयच वाचायला नको. Happy

सलमान ऑल्वेज रॉक्स.

सलमान बस नामही काफी है Wink

काही इतकाही वाईट नाही. सलमानच्या चित्रपटांकडुन ज्या अपेक्षा असतात त्या पुर्ण करणारा चित्रपट आहे.
आमच्या पोरांनी खुप एंजॉय केला.

एकच वाईट गोष्टः
चाळीस प्लस असुनही त्याचे जे दिसणे आहे त्याने चाळीस प्लस असणार्‍या आमच्यासारख्याना न्युनगंड येतो.. एवढेच Happy

हिमेश रेशमियाच्या मुझिकला एवढे का घाबरताय.... तो वाईट्ट सिंगर अ‍ॅक्टर आहे, पण म्युझिक कायम मस्त देतो.

>> माझंही हेच मत आहे, नंदिनी. मी म्युझिकला नाही, त्याने पडद्यावर येण्याच्या कल्पनेला घाबरतो !

त्याने पडद्यावर येण्याच्या कल्पनेला घाबरतो !>>>> सलमान असताना त्याच्याकडेन कशाला बघावं?

चाळीस प्लस असुनही त्याचे जे दिसणे आहे त्याने चाळीस प्लस असणार्‍या आमच्यासारख्याना न्युनगंड येतो.. एवढेच >> पन्नाशी जवळ आली की.

काल पाह्यला नाही. टिकीटं मिळाली नाहीत आज मिळण्याचे चान्सेस नाहीत. उद्याच बघावा लागेल.

मी म्युझिकला नाही, त्याने पडद्यावर येण्याच्या कल्पनेला घाबरतो !
>>>>>>>>
मग तर रिलॅक्स रसप,
सलमान हा हिमेशचा गॉडफादर आहे, त्यामुळे तो सलमानचा पिक्चर खराब करण्याचे कुठलेही कृत्य करणार नाही Wink

त्याने पडद्यावर येण्याच्या कल्पनेला घाबरतो !>>>> सलमान असताना त्याच्याकडेन कशाला बघावं?
.
.
सलमान हा हिमेशचा गॉडफादर आहे, त्यामुळे तो सलमानचा पिक्चर खराब करण्याचे कुठलेही कृत्य करणार नाही डोळा मारा
.
.
>> हेच ते धीराचे शब्द होते, जे सोबतच्या मित्राने मला ऐकवले होते..!! Wink

वैभव,

तुझा प्रतिसाद दिसलाच नाही ! तुला उत्तर देणं आवश्यक आहे, तुला तितकी किंमत देतो मी म्हणून.......

----------------------------------------------------

>> अगदीच काही सुमार नाही पिच्च्रर . एंटरटेंटमेन्ट छान होते . थेटरचं तिकिट १०० ते १५० असेल तर पैसे वसूल आहे पिच्चर . सलमान ने कथेवर जरा बरं लक्ष दिलय . दबंग-१ नंतर भुमीकेचा एक कॅरेक्टर म्हणून प्रभाव पाडेल असा सलमान यात आहे . चित्रपटाला सामाजिक संदेशही दिला आहे . <<

पहिला जवळजवळ एक तास सुमारच आहे, बरं का ? अगदी अस्सल सलमानपूजकसुद्धा शिव्या घालत आहेत..!! पुढचा भाग फुल्ल एन्टरटेन करतो, ते मी मान्य केलंच आहे. मी जाणीवपूर्वक सलमानच्या अभिनयाबद्दल लिहिले नाही. कारण 'अतिसुमार'पासून तो ह्या लेव्हलला आल्यासारखा वाटला की किमान काही नावं तरी ठेवता येणार नाहीत ! Wink
सामाजिक संदेश....!! हम्म्म् !

>> सलमाननं म्हटलेली गाणी हे देखील आकर्षण आहे चित्रपटात . <<

गाणी एक नंबरची भिकारडी आहेत, ह्यावर मी आयुष्यभर ठाम राहीन. सलमानने गायलेली असोत की त्या वाकड्या 'हानी' सिंगने.

>> नर्गिस फक्री मात्र खरच अत्याचार करते . <<

जन्मत:च !! Wink

>> जितू तू हल्ली ठोकळाछाप परिक्षणे लिहितोय्स . अगदीच २ स्टार द्यावेत इतकाही वाईट नाही पिच्चर तो पुढच्यावेळी जरा मोकळ्या मनाने आणि जराश्या रिकाम्या डोक्याने पिच्चर बघत जा किंवा १०० एक रुपये जेमतेम खर्च होतील असेच काही करत जा <<

हल्ली मी लिहीतच नाही रे फारसा ! 'लय भारी'वर लिहिलेलं, अनेक दिवसांनी लिहिलं होतं. ठोकळाछाप परीक्षणं पेपरांत असतात. त्यासाठी पैसे मिळतात. मला कुणी देत नाहीये, त्यामुळे कुणाला पटो अथवा न पटो, मी माझ्या मनात आलेलंच लिहित असतो. आणि बादवे, १००/- सुद्धा खर्च करत नाही मी. ६४/- रु. ला एक तिकीट पडलं मला ! Happy

>> मी ह्या पिच्चरला ३ . १\२ स्तर्स आरामात देइन मध्यंतरापर्यंत जरा डिंग्या मारल्यात त्या न पटल्याने अजून १\२ मार्क कमी करता येवू शकतो . <<

चालायचंच !

काल रात्री पाहीला, अगोदर परिक्षण वाचल नव्हत, वाचायला हव होत अस वाटतय आता.
नेहमीचाच चोर-पोलीस खेळ.
थिएटर जवळपास रिकामचं होतं.

धन्यवाद रणजीतजी किंमत केल्याबद्दल (काढल्याबद्दल )

एवढीतर पातळी मी गाठली आहे
की जगाच्या पातळीचा राहिलो नाही

..हा आपलाच शेर आठवला