विषय क्र. २ - 'हाऊस हजबंड.......बाबा'

Submitted by विनार्च on 14 July, 2014 - 14:10

बायकोने नोकरी करावी अन नवऱ्याने घर सांभाळावे हे हल्ली हल्ली क्वचित दिसू लागलय. भारतात तर अजूनही दुर्मिळच, पण आपल्या मागच्या पिढीत "हाऊस हजबंड"चा किताब गेसफुली व्हित डिग्नीटी सांभाळणारा माणूस म्हणजे "बाबा"......

बाबांना मी भेटले अकरावीला असताना, माझ्या बेस्ट फ्रेंडचे ते वडील. बटाटा व वाटाणा सोडल्यास कोणत्या भाज्या खाण्यालायक असतात यावर विश्वास नसलेली मी, कधी त्यांच्या हातच्या सगळ्या भाज्या मस्त चापून खाऊ लागले ते कळलच नाही.इतका चविष्ट स्वयंपाक ते करायचे."प्रत्येक भाजीची एक विशिष्ट चव असते, उगीच अती मसाले वापरुन ती मारुन टाकू नये." हे त्यांच वाक्य आजही मला स्वयंपाकघरात मसाल्याचा हात आखडता घ्यायला लावतं. एकच भाजी फक्त कापण्याची पद्धत बदलून कशी वेगळी लागू शकते हे त्यांच्याकडूनच शिकले मी (अर्थात फार नंतर उपयोगी पडल्या ह्या गोष्टी...... पण निदान कानांवर व जीभेवर हे संस्कार आधीच झाले असल्याने माझे मार्ग थोडे सोपे झाले)

बाबा तसे हरफन मौला. त्यांना सगळच येत असायचं, अगदी शिवणकामापासून इलेक्ट्रीकच्या कामापर्यंत. यासाठी त्यांनी कधी कोणता क्लास केला नव्हता की ट्रेनिंग घेतल नव्हत.दुपारच्या वेळात ते शिवणक्लास घ्यायचे. त्यांच्या हाताखाली शिकून कित्येक लोकांनी स्वतःची दुकानं टाकली.त्यांच्या सोबत 'फिट न टाईट' मध्ये काम केलेले लोक अजुनही त्यांना नावाजतात्, इतक स्किल होत या माणसात.....मानीही तितकाच ...नोकरीवर लाथ मारली तेंव्हा बॉस येऊन बोलवून गेला पण हे गेले नाही ते नाहीच. थोडी तडजोड केली असती तर आयुष्यात कुठच्या कुठे पोहचले असते ते, पण ती तर त्यांच्या स्वभावातच नव्हती इतके मनस्वी होते ते....

बाबांची चित्रकला पण उत्तम होती.त्यांनी रंगवलेले शिवसेनेचे वाघ लालबागमध्ये हल्ली हल्ली पर्यंत दिसायचे. परत हे सगळं लष्कराच्या भाकर्‍या अंतर्गत. बिल्डींगमधला पाण्याचा पंप बिघडला वा वायरींग जळाली हेच जाऊन पहाणार...ही सेवाही निशुल्कच. कुणाचं मुल काही चुकीच्या गोष्टी करताना सापडलं तर हे त्याला रोखणार, त्याचे आईबाप काय म्हणतील याची चिंता त्यांना कधीच भेडसावली नाही. "वसुधैव कुटुंम्बकम" हे बहुदा त्यांच ब्रीद वाक्य असावं. त्यानुसार ते जातील तेथे लोकांना हक्काने मदत करायचे, तसच जर चुकत असतील त्यांना रोखायचे.

साधारण उंची पण पिळदार शरीराच्या ह्या माणसाचा दराराही तसाच होता. अन्याय,खोटं बिलकूल सहन नाही व्हायचं त्यांना. एकदा ते ट्रेनने भाच्यासोबत जात असताना, एक माणूस ग्रुपचा फायदा घेत उगीच ह्यांना त्रास देत होता. त्या माणसाला कानफटवायला कमी नाही केले यांनी. तो भाचा अजुनही मोठ्या अभिमानाने ही गोष्ट सगळ्यांना सांगतो.असंच एकदा स्वतःच्या मेव्हण्याच्या मनात दाटून राहिलेली भूताखेतांची भिती कायमची काढून टाकण्यासाठी, ते त्याला रात्री फिरायला म्हणून जे घेऊन गेले ते थेट स्मशानातच नेऊन बसवलं .काही काळ तिथे घालवल्यावर जेव्हां त्याने कबुल केलं की भुत-बीत काही नसतात, तेंव्हा कुठे बिचार्‍याला घराचे दर्शन घडवले.

ह्या माणसाची सून व्हायचं भाग्य मला लाभलं पण दुर्दैवाने तेंव्हा ते ह्यात नव्हते. असते तर खूप खूष झाले असते, इतके लाड त्यांनी माझे केले होते. त्यांना दोन मुलगे पण त्यांना मुलीची भारी हौस.....ते ती माझ्यावर भागवून घ्यायचे. काय काय वस्तू बनवायचे, खास माझ्यासाठी. स्वतःच्या मुलांना मात्र त्यांनी अगदी मिलेट्री शिस्तीत वाढवल, त्यामुळेच तर आज दोघेही उत्तमरीत्या आपापल्या क्षेत्रात नाव कमवत आहेत.

सकाळी पाच वाजता ते त्यांना उठवून बसवायचे. आंघोळ करुन दोघांनी काय करावं? हा त्या दोघांचा प्रश्न असायचा...इतक्या सकाळी तर मित्र उठलेले नसायचे मग झक मारत अभ्यास करायचे दोघ नाहितर सायकल घेऊन भटकून यायचे. यावरही कसली पाबंदी नसायची, फक्त रस्ते समजावून द्यायचे ते. (इतकी हिम्मत माझ्यात तरी नाही आहे...लेक सायकल घेऊन रस्त्यावर निघालीच की माझ्या सतराशे साठ सुचना सुरु....मग नवरा नेहमी बाबांचं उदाहरण तोंडावर मारतो माझ्या)
घरात माझा नवरा कसले कसले इलेक्ट्रीक प्रयोग करत बसायचा त्याबद्द्लही त्यांनी त्याला हटकले नाही की शॉक लागेल म्हणून घाबरवले नाही. फक्त सुरुवातीलाच लाइव्ह न्युट्रलचे कन्सेप्ट क्लियर करुन दिले. (हे सगळं मुलं शाळेत होती तेंव्हाच बरं ) आज तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिनिअस आहे याचं सगळं श्रेय बाबांनाच.

एकदा एका लग्नात एक मध्यमवयीन बाई मला शोधत आली आणि विचारलं," 'ह्यांची' सून ना ग तू ?" मी हो म्हणताच तिला इतका आनंद झाला न ती भडाभडा बोलू लागली,"तुझ्या सासर्‍यांसारखा देवमाणूस मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पाहिला नाही". ती म्हणे नुकतीच लग्न होऊन ग्वाल्हेरला गेली होती. घरात फक्त ती आणि नवरा. एकदा तो तिला म्हणाला, "आज माझे ५-६ मित्र जेवायला येणार आहेत, मस्त बेत कर." आणि तो निघून गेला कामावर. ती टेंशनमध्ये, कधी इतक्या माणसांचं जेवण केलं नव्हतं, त्यातून अनोळखी शहर मदत कोणाची घेणार? इतक्यात बाबा तिथे पोहचले व तिला म्हणाले,"तुझ्या नवर्‍याने आम्हा सगळ्यांना घरी जेवायला बोलवताना विचारच केला नाही की तु कशी निभावणार, मी म्हटलं आपल्या महाराष्ट्राच्या पोरीची लाज जाता नये बाहेरच्या लोकांसमोर म्हणून मदतीला आलोय."त्यांनी तिला संपूर्ण स्वयंपाक तयार करण्यात मदत केली, वर हे कुणाला सांगू नकोस असं बजावून जे गेले ते जेवायला सगळ्यांसोबतच हजर झाले व सगळ्यांबरोबर जेवणाची भरभरुन तारीफ केली. त्यांना शब्द दिला होता म्हणून कुणाला बोलली नव्हती ती, पण मला मात्र शोधून काढून त्यांचे खूप आभार मानले.

बाबांची सहनशक्तीही कमालीची होती. एकदा त्यांना बैलाने शिंग मारले, पोटाला मोठी जखम होऊन त्यातून भरपूर रक्त वाहू लागले. ते तसेच के.इ.एम. हॉस्पिटलला गेले.तिथल्या गलथान कारभारामुळे कोणीच त्यांच्यावर उपचार करायला येइना. शेजार्‍या- पाजार्‍यानी तिथल्या नर्स , डॉक्टरांच्या मिन्नत्या करुन झाल्या पण उपयोग शुन्य. तोवर बाबांच्या रक्ताचं थारोळ जमिनीवर साचलं, ते तसेच उठले नी डॉक्टरला म्हणाले,"उपचार करताय की मी घरी जाऊन मरु". त्याबरोबर भराभर हालचाली झाल्या व त्यांच्यावर उपचार झाले. हिच सहनशक्ती शेवटी मात्र त्यांना प्राणघातक ठरली. सकाळपासून छातीत दुखतय म्हणून घरगुती उपाय केले. थोड जास्त वाटलं म्हणून दोन माळे उतरुन डॉक्टरकडे गेले...जाता येता लोकांची मस्करी करणे चालूच होते त्यामुळे डॉक्टरनेही जास्त सिरीयसली घेतले नाही. गॅस झाला असेल म्हणून गोळ्या दिल्या बस्स...दुपारी थोडं जास्त दुखतय म्हणून लेकासोबत हॉस्पीटलला गेले पण रस्त्यातच त्यांना कळलं की आता काही खरं नाही...तेंव्हाही शांतपणे लेकाला नजरेनेच खुणावले आणि ते गेले...तो म्हणतो ,"आजही मी ती नजर विसरु शकत नाही."

असा हा सामान्यातला असामान्य माणूस...जो जाऊन इतकी वर्ष झाली तरी अजुनही कोणा ना कोणाकडून त्यांच्या परोपकाराच्या न ऐकलेल्या गोष्टी कानावर येतच असतात. "मरावे परी किर्तीरुपे उरावे" ही उक्ती त्यांच्यासाठी मला खरोखरच सार्थ वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिले आहे. तुमच्या लिखाणावरून हे एकदम मनापासुन उतरल आहे हे वाचताना पदोपदी जाणवते. पण अजुन लिहिता आले असते असे राहून राहून वाटत आहे. स्पर्धेकरिता शुभेच्छा.

Pages