विषय क्रमांक २: ३ असामी.

Submitted by Priyanka Pathak on 14 July, 2014 - 11:03

कंपनीतून परत येताना तीन बस बदलत घरी पोचणं म्हणजे अनुभवांची एक नवी साखळी सुरु करण्यासारखं आहे. रोज एका नवीन कडीची त्यात भर पडतेय, अन तिच्या लांबीबरोबरच मीही थोडीफार का होईना पण खऱ्या अर्थाने वाढतेय...
आज एकाच पदावर भूषित असलेल्या ३ वेगवेगळ्या व्यक्तींच्या ३ वेगळ्या स्वभावांच्या मजेशीर अनुभवाची भोक्ती ठरल्यानंतर मी या प्रवासाच्या प्रेमात पडलेय ....
कंपनीतून बाहेर पडले, अन २० मिनिटानंतर अवतरलेल्या निगडीकडे जाणाऱ्या बस मध्ये अखेर कंटाळून काहीही विचार न करता चढले...शेवटी 'हि बस मला कुठवर साथ देऊ शकेल' हे तिकीट देताना बस वाहकाला (कंडक्टरला ) सांगावंच लागेल, या विचाराने स्थिरावले...काही क्षणातच काका माझ्याजवळ आले, "विद्यापीठ ला जायचंय, कुठे उतरावं लागेल?" असं विचारलं...त्यांनी काही क्षण माझ्याकडे निरखून बघितलं, अन " डांगे चौकात उतरा म्याडम " म्हणाले...त्यांच्या थांबण्यामागचं कारण नीट न कळूनही काहीसं दुर्लक्ष करत मी पैसे दिले... तरीही ते मात्र काहीशा असमाधानी नजरेने माझ्यासमोरच थांबले... शेवटी न रहावुन त्यांनी मला विचारलं, " पुणे स्टेशनची गाडी पकडाया फायजी होती तुमी.." मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं, अन जीभ चावत म्हणाले," मला फारसं माहित नाही अजून..." ते हसले, अन मग मी त्या बसने कशी १५ रुपयातच विद्यापीठात पोचले असते, आता वेळ अन पैसा कसा वाया जाणार, याचं गणित अगदी रसिकतेने त्यांनी मला शिकवायला घेतलं ... आपल्या दुसरीतल्या मुलाला, 'राजूने ५ पैकी ३ आंबे खाल्ल्यावर २ आंबे कसे उरतात ' हे बाबा जितक्या मनापासून शिकवतात, तितक्याच मनापासून ते मला इथले रस्ते शिकवण्यात व्यग्र झाले...
ती शिकवणी संपवून डांगे चौकात उतरले, अन विद्यापीठाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढले.... तर इथल्या काकांची तऱ्हाच निराळी... प्रत्येक थांब्याचं नाव त्या एका ठराविक सुरावटीत घेण्यात त्यांचा 'गळा' कोणीच धरू शकणार नाही... त्यांची खासियत बनलेल्या त्या आलापातील प्रत्येक तीव्र ,मंद्र,कोमल स्वर प्रत्येक वेळी ते तेवढ्याच बारकाईने घेत होते..हे सगळ्या छोट्या-बड्या ख्यालांचं मिश्रण त्यांना किती सुख देतंय, हे त्यांच्या चेहेऱ्यावर भरून वाहणारा उत्साह सांगत होताच...
हि मैफल संपली अन आता मी तिसऱ्या -पाषाण कडे जाणाऱ्या बस मध्ये चढले.. तिथे मात्र कंडक्टर काकाचं काय बिनसलं होतं, ते मला शेवटपर्यंत कळलं नाही.. "कुठे जायचंय ?" हे दोन शब्द उच्चारणं देखील त्यांच्या जीवावर आलं होतं .. समोर येउन त्यांनी माझ्याकडे केवळ एक कुत्सित कटाक्ष टाकला.. मग मीच काय ते समजून पाषाण म्हणाले...मग तर चेहेऱ्यावरचे विस्कटलेले भाव अजूनच खराब झाले.... माझ्या गळ्यातल्या ओळख पत्राकडे तर त्यांनी असं काही बघितलं, जणू त्यांच्या हक्काची ओळख मी बाळगतेय...किंवा त्यांच्या या त्रासाचा 'तो' कोणी एक जबाबदारही 'टाटा'चाच होता... पण हा सगळा नजरेचा खेळ मात्र मला आवडत होता ..
शेवटी एकदाचं पाषाण आलं, अन तेही त्याने मला एका जळजळीत कटाक्षानेच सांगितलं , पण त्याचवेळी डोक्यात या ३ असामींची तूलना चालू असल्याने मी मात्र या वागण्याचा आनंद घेत होते.. त्याच नादात मी त्या कटू कटाक्षाला अगदी गोड हसून उत्तर दिलं.. माझं हे अनपेक्षित उत्तर बघून तो मात्र चांगलाच गोंधळला..अन शेवटी थोडा का होईना पण हसलाच.......

15cbmpconductor_924956f.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे सर्व लेख फक्त गृप सभासदांसाठीच प्रकाशित झालेले दिसताहेत. संपादन मध्ये जाऊन ते सार्वजनिक करुन घ्या. लेखाच्या खाली जिथे सेव्ह चे बटण असते, त्याच्यापाशीच (वर अथवा खखाली)सार्वजनिक चा पर्याय दिसेल, तो चेक करुन घ्या म्हणजे लेख सर्वांना दिसू लागतील. असो..

सर्वच लेख आवडले. पुलेशु Happy

good

nice