उरली न बोच आता कुठल्या पराभवांची!

Submitted by profspd on 14 July, 2014 - 22:34

उरली न बोच आता कुठल्या पराभवांची!
तक्रार कोणतीही नाहीच या शवांची!!

आजन्म वेचले मी अश्रूच या जगाचे....
परडीत काळजाच्या सुमनेच आसवांची!

शाबासकी दिखाऊ, अन् बेगडी प्रशंसा...
मज कीव येत आहे दांभीक वाहवांची!

ढेपाळलीत सारी धेंडे सशांप्रमाणे...
भीती सशांस बसली भलतीच कासवांची!

आभाळ या मनाचे दाटून रोज येते...
होते सुरू कधीही बरसात आठवांची!

निवडून काय आले, कोलीत प्राप्त झाले....
लावीत आग सुटले चौफेर बोलवांची!

करतात ते महोत्सव त्यांच्या थिट्या यशांचे....
भलतीच हौस आहे नेत्यांस उत्सवांची!

त्यांचेच राज्य असते अवघ्याच सागरावर....
लाटांस गरज नसते कुठल्याच तारवांची!

सुख हे चकाकणा-या असते दवाप्रमाणे...
असते अशी कितीशी ती जिंदगी दवांची?

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे सर
ढेपाळलीत सारी धेंडे सशांप्रमाणे...
भीती सशांस बसली भलतीच कासवांची! + १००

उरली न बोच आता कुठल्या पराभवांची!
तक्रार कोणतीही नाहीच या शवांची!! ... वाह! क्या बात!!

त्यांचेच राज्य असते अवघ्याच सागरावर....
लाटांस गरज नसते कुठल्याच तारवांची! ..... ठीकठाक

उरलेले शेर भूछत्रीसमानच वाटले.