विषय क्र. २ - विठोबाकाका

Submitted by महेश on 6 July, 2014 - 14:04

महेश NEWS शब्द कसा तयार झाला ? सांग. आता पाचवीपासुन तुम्हाला इंग्रजी विषय चालू झाला आहे ना मग सांग पाहू. आता नुकताच ABCD शिकून जेमतेम एक वर्ष झालेल्या मला हे कळणे शक्यच नव्हते, आणि तेव्हा गुगल सोडाच पण कॉम्प्युटर, सेलफोन तर नाहीच पण साधा लॅन्डलाईनचा फोन पण नव्हता, म्हणजे फोन ओ फ्रेन्ड ऑप्शन पण नाही अजिबात. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनाच साकडे घालायचे आम्ही, मग आमचे विठोबा काका अगदी खुशीत येऊन सांगणार अरे सोपे आहे North, East, West, South मधले सुरूवातीचे अक्षर घ्यायचे की झाला NEWS, बातम्या कशा चोहो बाजुंनी येत असतात. हे असे सांगितले की आम्ही खुश. काकांकडे अशा गंमतीदार गोष्टींचा खजिनाच होता जणू, आणि आम्हा मुलांना वाटण्यात त्यांना कोण आनंद !

आमचे लहानपण वाडा संस्कृतीत गेले, त्यामुळे आमच्या आजुबाजुला असलेल्या अनेक व्यक्तींचा आमच्या जीवनात खोलवर ठसा उमटलेला आहे. त्यातले प्रमुख आणि महत्वाचे नाव म्हणजे विठोबा काका. हे माझ्या वडिलांचे सख्खे काका, त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांना आजोबा न म्हणता काकाच म्हणत असू.

आमच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजुला एक शिवणकामाचे दुकान होते. तसा हा आजुबाजुच्या लोकांनी येऊन गप्पा मारण्याचा एक अड्डाच होता. एकदा आम्ही तिकडे बसलो होतो तेव्हा एक पोलिस हवालदार, जो त्या अड्ड्यात कधी कधी सामिल असे, त्याने आमच्या सर्वांना शूSSS अशी बोटाने खुण केली आणि हळूच काकांच्या शर्टच्या वरच्या खिशात हात घालून त्यामधे असलेली प्लॅस्टिक बॅग काढून घेऊ लागला. त्यामधे दुनिया होती म्हणजे पैसे, अनेक कागदपत्रे, इ. ताबडतोब काकांनी त्याचा हात खिशात असतानाच धरला आणि जोरात गरजले कोण आहे रे ? त्या गर्जनेने खुद्द पोलिसच घाबरला आणि म्हणाला अहो गम्मत केली, तुम्हाला कळतय की नाही ते पहायला.

ही अशी गम्मत करण्यामागे एक मोठे कारण होते ते म्हणजे आमचे हे काका अंध होते. होय हे आमचे काका आजोबा जवळ जवळ १९५४/५५ सालापासुन अंध होते. जन्म १९१४ च्या सुमारास म्हणजे साधारण ३५/४० वया पर्यंत डोळे होते, पण तेव्हा खुप जाड भिंगाचा चष्मा होता आणि त्याचे कारण होते अतोनात वाचन. या वाचन वेडापायी त्यांच्या वडिलांनी त्यांना एक ग्रंथालयच चालू करून दिले होते जे कालांतराने बंद पडले. नंतर त्यांची पत्नी आजारी असताना रक्तगट जुळत असल्याने त्यांनी पत्नीला रक्तदान केले, या घटनेनंतर त्यांची दृष्टी गेली. पुढचे जवळ जवळ ४० वर्षांचे आयुष्य ते दृष्टीविहिन होते. पहिल्या अर्ध्या दृष्टी असलेल्या आयुष्यात जे काही वाचले होते, पाहिले होते, ऐकले होते ते सारे त्यांनाच नव्हे तर त्यांच्या जवळच्या सर्वांनाच खुप काही देऊन गेले. नंतर देखील चालू घडामोडी, नविन माहिती मिळविणे आणि मिळालेली माहिती रंजक पद्धतीने संपर्कात येणार्‍या लोकांना गरजेप्रमाणे पुरविणे अशी त्यांची ज्ञान साधना चालूच राहिली.

त्यांच्याकडे नेहेमीच सांगण्यासारखे खुप काही असायचे. आम्ही मुले कुतुहलाने विचारायचो की तुम्ही थोर नेत्यांना पाहिले आहे का ? त्यांनी बहुतेक सर्वांना पाहिले होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना पुण्यात काही काळ तुरूंगात ठेवण्यात आले होते तेव्हा आमची ही आजोबा मंडळी तरूण होती, त्यांनी काही खटपटी करून या त्रिकुटाला पाहिले होते. गांधी, नेहरू, सावरकर, आंबेडकर, सुभाषचंद्र, इ. नेत्यांच्या गोष्टी नेहेमी सांगायचे, यातल्या अनेक नेत्यांना पुण्यात झालेल्या सभांमधे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले होते, यामुळे मला त्यांचा नेहेमी हेवा वाटायचा. पण जेव्हा टिळकांचा विषय निघायचा तेव्हा ते जास्त हळवे व्हायचे, टिळक लवकर गेल्यामुळे कळत्या वयात त्यांना पाहू शकलो नाही हे त्यांचे दु:ख होते.

मी विचारले होते की तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष भाग का नाही घेतला, तर मला म्हणाले अरे आमच्या वडिलांची सरकारी नोकरी होती ब्रिटिशांच्या काळात आणि घरचा पसारा खुप मोठा, नोकरीवर गदा येऊ नये म्हणुन आम्हाला आमचे इरादे आवरते घ्यावे लागले. नाही म्हणायला हे काका आणि त्यांचे अजुन एक भाऊ (अण्णा) यांनी गणेशोत्सवात जे मेळे असायचे त्याला पदे लिहून दिलेली आहेत.

आम्हा मुलांना अनेकवेळा निबंध सांगायचे, विषयाची मांडणी कशी करावी, खुलवत कसा न्यावा, खंडन मंडन करणारे मुद्दे कसे असावेत असे अनेक शिकायला मिळायचे त्यांच्या सांगण्यातुन. मी पाचवीत असताना त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती "दिनूची सायकल" नावाची, आणि ही गोष्ट आमच्या शाळेच्या मासिकात छापून आली होती. तेव्हा मला जो आनंद वाटला होता तो शब्दात सांगता येणार नाही.

मी जेव्हापासुन पाहिले तेव्हा त्यांचे आधीच वय झालेले होते, मध्यम बांधा, उजळ रंग, वयाने पाठीत किंचित बाक आलेला, दृष्टी नसली तरी डोळ्यात एक प्रकारे कमालीचे तेज आणि कायमच्या जडलेल्या पोटाच्या तक्रारीमुळे अनेकवेळा मधुनच हुंकार देणे (ढेकर येत नसेल आणि त्यासाठी हुंकार देऊन प्रयत्न केल्यास जसा आवाज येईल तसा). हे उम्ह्ह्ह उम्ह्ह्ह ऐकायची आम्हाला सवय झालेली होती, नविन माणसाला चमत्कारिक वाटत असे. वेष म्हणजे धोतर, नेहरू शर्टसारखा शर्ट आणि डोक्याला काळी टोपी (संघाची), कधी कधी काठी वापरत अन्यथा अनेक वेळा आमच्या सारखी मुलेच त्यांची काठी असायची. आमच्या वाड्यामधे एक लक्ष्मीनारायणाचे देऊळ होते. काकांचा मुक्काम नेहेमी त्या देवळातच असायचा. जेमतेम ४ ते ५ फूटाच्या एका लाकडी बाकावरच झोपायचे. आणि रोज सकाळी वाड्यातल्या नळावर गार पाण्याने आंघोळ, बरेच वेळा कोणाला त्रास नको म्हणुन कपडेपण स्वतःच धुवून टाकत असत. त्यांचा मुलगा आणि सुन लांब रहात असत अनेकदा तिकडे बोलावले पण यांचे मन काही देवळाशिवाय कुठे रमायचे नाही. त्या देवळात त्यांना भेटायला असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे लोक यायचे. अगदी वकिलांपासुन ते हमालापर्यंत. अनेकांना काकांचा सल्ला हवा असे. पंचांग, पत्रिका, इ. ची माहिती असल्याने थोडे बहुत त्या प्रकारचे मार्गदर्शन देखील लोकांना करत असत. अर्थात कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेने नाही.

त्यांच्या अभिमानाच्या काही विषयांपैकी एक म्हणजे पुण्यात जेव्हा संघाच्या पहिल्या पहिल्या शाखा चालू झाल्या त्यामधे हे सामिल झाले होते. आंबेडकर जेव्हा गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला जायला निघाले होते तेव्हा संघाची एक तुकडी त्यांना भेटली होती विनंती करायला की परिषदेत भारतासाठी संपुर्ण स्वातंत्र्याची मागणी करा "वसाहतीच्या नाही". त्या तुकडीमधे आमचे हे काका पण होते.

खरे तर त्यांनी आम्हाला कोणाला कधीच पाहिले नाही. आमच्या वडिल, काका मंडळींना देखील ते जेव्हा १०/१२ वर्षांचे होते तेव्हाच जे काही पाहिले होते, तरी पण साधारण चाहूल लागली, किंचितसा आवाज झाला तरी त्यांना अंदाज यायचा कोण असेल याचा. स्पर्शज्ञान खुपच चांगले होते, नोटा सुद्धा कळायच्या. दिवस असताना उजेड जाणवतो असे म्हणायचे.

रोज सकाळी न चुकता रेडिओवर ७ वाजता बातम्या लागल्या की आमच्या घरी रेडिओच्या जवळ एका स्टूलवर येऊन बसलेले असायचे. अजुन त्यांची तशी मुर्ती डोळ्यापुढे येते. घड्याळ, गजर काही न वापरता देखील वेळेचे अचूक गणित कसे जमायचे हे त्या वयात कधी कळाले नाही आम्हाला. बातम्या झाल्या की माझे वडिल त्यांना पेपरमधल्या बातम्या वाचून दाखवित. वडिल जवळ नसले तर मी, माझी बहिण, आजोबा, काका, चुलतभावंडे जे कोणी जवळ असेल ते वाचून दाखवित असत. आणि त्यावर चर्चा पण रंगत असे.

त्यांचे अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य कोर्ट केसेसने व्यापलेले होते. रहात असलेल्या देऊळ आणि घराची केस अनेक वर्षे चालू होती. दिसत नसले तरी स्मरणशक्ती एवढी दांडगी की तारखा आणि कागदपत्रांची माहिती पटापट सांगायचे. वकिलांना सुद्धा सल्ले देत असत अनेकवेळा. या खटल्याच्या कामाकरता काही वेळा मुंबईला जावे लागले होते त्यांना, पण त्याव्यतिरिक्त अन्य कुठे मोठा प्रवास कधी केला नसावा. निदान माझ्या तरी माहितीमधे नाही.
जुन्या गोष्टी तर माझे आजोबा देखील सांगत आम्हाला, पण माझ्या आजोबांचा स्वभाव सौम्य आणि मवाळ होता. विठोबा काका स्वभावाने फार करारी आणि तापट होते. आवाज स्पष्ट, भांडणाला पण मागे सरणारे नव्हते. अर्थात गरज असेल तर घरातल्यांसाठी बाहेरील लोकांबरोबर भांडण.

त्यांना दिसत नसल्याने निवडणुकीच्या वेळेस त्यांना मदतनीसाची गरज लागत असे. मी अनेकवेळा त्यांच्या बरोबर गेलो होतो. निवडणुकीच्या दिवशी सकाळी आवरून झाले की न विसरता कमळाचे चित्र (बॅच) शर्टच्या खिशाला लावायचे. आम्ही निवडणुक केंद्रावर गेलो की मला मोठ्या मोठ्या आवाजात सुचना करायचे, महेश आपले मत भाजपला, कमळाच्याच चित्रावर शिक्का मार. कार्यकर्ते आम्हाला दटावायचे की अहो मतदान गुप्त असते, असे ओरडताय काय, वगैरे, पण काकांना त्याचे काही नाही. जेव्हा शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती झाले तेव्हा काका मला म्हणाले होते की आपण दिल्लीला जाऊ आणि त्यांना पुणेरी पगडी भेट देऊ, पण हे जाणे कधी झालेच नाही. आता जर असते तर मला खात्री आहे की मोदींना पुणेरी पगडी भेट देऊ असे म्हणाले असते.

आमच्या देवळात गोकुळ अष्टमीचा उत्सव होत असे, खरे तर तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. गोकुळ अष्टमीच्या आठवड्यात रोज रात्री आरती आणि अष्टमीच्या रात्री कृष्णजन्माचे किर्तन असायचे. माझे आजोबा हातात आरती घेऊन उभे आहेत, त्यांच्या उजव्या बाजुला बाकावर बसलेले विठोबा काका उठून उभे राहिले आहेत आणि आजोबांच्या मागे आम्ही घरातले सर्वजण आरती साठी हातात झांजा सरसावून उभे आहोत हे दृष्य अजुनही मला जसेच्या तसे आठवते. गम्मत म्हणजे विठोबा काकांची टाळ्या वाजविण्याची एक वेगळीच स्टाईल होती. ते आरतीच्या तालावर कधीच टाळ्या वाजवत नसत, तर जोरजोरात एकाच तालात वाजवायचे. देवे म्हणताना मजा यायची, मंत्र पुष्पांजलीच्या वेळेस मधेच एखादा स्वर लांबवला जायचा, त्यामधे आम्ही मुले आणि म्हातारे लोक यांची जणू स्पर्धाच असायची कोण जास्त वेळ लांबवलेला स्वर टिकवून ठेवू शकतो याची. मग शेवटी जयजयकाराच्या वेळेस सुद्धा माझे आजोबा आणि विठोबा काका आवर्जुन म्हणायचे "आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, धर्म की जय हो, अधर्म का विनाश हो, प्राणियोंमे सद्भावना हो".

आधी सांगितले तसे त्यांना वाचून दाखविणे या बरोबरच लिहून देणे हा पण एक भाग असायचा. अनेकवेळा आम्ही अनेकांनी असंख्य प्रकारची कागद-पत्रे लिहून द्यावीत असे चालायचे. या संदर्भात माझ्या कायम लक्षात राहील असा एक किस्सा आहे. आजोबांना भेटायला एक बाई यायच्या, खुप दिवस झाले त्या आल्या नव्हत्या, मग काका मला म्हणाले की एक पत्र लिहायचे आहे. मी पत्र लिहिले आणि पाठविले, त्याचे उत्तर देखील आले. उत्तर पाठविणार्‍या व्यक्तीचे वय त्यावेळी १०० पेक्षा जास्त होते. कोण व्यक्ती होती सांगू ! ते होते दि.ब.देवधर, होय क्रिकेट महर्षि देवधर. त्या बाई यांच्याकडे स्वयंपाकाचे काम करीत असत. काकांनी चक्क देवधरांना पत्रातुन विचारणा केली आणि त्यांनी देखील तत्परतेने उत्तर दिले ते सुद्धा वयाच्या शंभरीनंतर. खरेतर ते पत्र मी जपुन ठेवले होते, पण आम्ही जुनी जागा सोडली त्यावेळेस बहुतेक सर्वच जुनी पत्रे गहाळ झाली त्यामधे हे देखील गेले.

आमच्या परिवारात त्यावेळी तिन वृद्ध माणसे होती. माझे आजी, आजोबा आणि विठोबा काका. कुठेही लग्नकार्य, कार्यक्रम असला की हे तिघे एकाच रिक्षाने जात असत. एकाच पिढीतले असल्याने तिघांमधे विशेष स्नेह होता. १९९२ साली माझी आजी गेली तसे हे दोघे मनाने खचले. विठोबा काकांना रक्तदाबाचा त्रास होता, वयोमानामुळे तो जास्त वाढू लागला. आजी गेल्यावर एकदा मला म्हणाले, अरे आजकाल पुर्वी सारखी तुम्ही मुले भेटत नाही रे, त्यांच्या आवाजात एक खिन्नता जाणवत होती. झाले होते असे की बरीच मुले मोठी झालेली होती, कॉलेजमधे जाऊ लागली होती आणि त्यांचे विश्व विस्तारले होते.

मी एक दिवस कॉलेजमधुन आलो, घरासमोर असलेल्या गणपती मंडळाच्या इकडे पाहिले तर एक बोर्ड लिहिलेला दिसला, जवळ जाऊन वाचला तर धक्काच बसला, कारण त्यावर विठोबाकाकांच्याच निधनाची बातमी लिहिलेली होती. घरात जाऊन पहातो तर त्यांना देवळाच्या जागेत ठेवले होते आणि लोक येऊ लागले होते. ज्या देवळात त्यांनी पुर्ण आयुष्य काढले त्या देवळात त्यांना असे अखेरचे ठेवलेले पाहून गलबलून येत होते.
आम्ही जेव्हा वैकुंठात गेलो तेव्हा तिथे एके ठिकाणी पुष्पचक्र दिसले, आम्ही चौकशी केल्यावर कळाले की दि.ब.देवधर गेले त्यांना पुष्पचक्र वाहिले होते. दोघांचे अंत्यसंस्कार एकाच दिवशी व्हावेत हा योगायोगच. माझे आजोबा देखील पुढे लगेचच काही महिन्यातच गेले.

पुर्वी काकांनीच सांगितले होते की तसा तर अधिक महिना दर ३ वर्षांनी येतो, पण तोच अधिक महिना दर १९ वर्षांनी येतो. ते गेले तो अधिक महिनाच होता (अधिक - भाद्रपद). जर त्या जगातून संपर्काची सोय असती तर त्यांनी नक्की सांगितले असते की, अरे आता माझे पुण्यस्मरण तिथीनुसार दर १९ वर्षांनी बर का !

मला म्हणायचे आपल्या घराण्यात संन्यास घेण्याची परंपरा आहे. त्यांच्या आजोबांनी (माझे खापर पणजोबा) संन्यास घेतला होता आणि नंतर वडिलांना (माझे पणजोबा) घ्यायचा होता, पण घरातले लोक, नातेवाईक, मित्र मंडळी विरोध करू लागले म्हणुन त्यावेळच्या शंकराचार्यांच्या सल्ल्याने संन्यास न घेऊन ती परंपरा मोडली. पण विठोबाकाका म्हणायचे अरे परंपरा मोडली गेली असली तरी, मी आहे ना, मी संन्यासीच आहे. खरेच होते ते, पुर्ण आयुष्य देवळात राहिले, स्वतः अंध असुन कोणतीही तक्रार, कुरकुर न करता उत्साहाने जगले आणि अनेकांना तो उत्साह वाटला, ज्ञान वाटले. हे एकप्रकारे संन्यस्त आयुष्यच होते.

त्यांच्या स्वतःच्या परिवाराबद्दल सांगायचे तर एक मुलगा, एक मुलगी. मुलगा (म्हणजे आमचे बाळूकाका, आता त्यांचेच वय ७५ असेल) सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर होते. ते पण त्यांच्या वडिलांप्रमाणेच खुप ज्ञानी आणि हुशार आहेत. नोकरी करत असतानाच कायद्याचे शिक्षण देखील घेतले, आता त्यांच्या पुढच्या पिढ्या देखील हुशार आणि कर्तबगार आहेत.

माझ्या मुलीचे वाचन खुप चांगले आहे आणि तिला सर्वांना वाचून दाखवायला खुप आवडते. ती आम्हाला पकडून सारखे काही ना काही तरी ऐकवत असते. आमचीच सवय तिच्यात आली आहे असे वाटते. तिला गंमतीने म्हणतो की आम्ही काही विठोबाकाका नाही वाचून दाखवायला, ते असते तर तुझे आणि त्यांचे चांगले जमले असते. पण असे म्हणत असताना डोळ्यात पाणी येते.

पु.लं.च्या व्यक्ती आणि वल्ली प्रमाणे, काका हे आमचे हरीतात्याच होते. आमच्या पुढच्या पिढ्यांना असे अनुभव मिळणार नाहीत याचे वाईट वाटते.

आता जर विठोबाकाका असते तर शंभर वर्षांचे झाले असते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात माझ्या कडून त्यांना हा लेख भक्तीभावाने अर्पण करत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर भावना पोचवल्यात. कुणाकुणाचे प्रभाव असतात आपल्यावर ते अशा निमित्ताने लेखनबद्ध होतात. उगाच स्मरणरंजन म्हणून नाही तर प्रामाणिकपणे वाटते की ती पिढी वेगळीच होती. विठोबाकाका हेही त्या वेगळेपणाचे सुंदर उदाहरण!

छान लिहिले आहे..

"आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, धर्म की जय हो, अधर्म का विनाश हो, प्राणियोंमे सद्भावना हो".>>> ही घोषणा संघाची आहे का ? आमचे गुजराती मॅनेजर देखील पुजा संपताना हीच देतात..

अमेय, शशांक, अमा, हर्पेन, धन्यवाद ! Happy

@अमा - खरेतर लिहावेसे खुप वाटते पण ते नुसतेच वाटण्याच्या पातळीवर असते, एक तर काय लिहावे याचा प्रश्न पडतो आणि बराचसा वेळ इतरांनी लिहिलेले वाचण्यातच जातो.

यावेळेस विषय व्यक्तिचित्रणाचा होता, आणि प्रत्यक्ष जे अनुभवले, जगलो ते शब्दात उतरवायचे होते, त्यामुळे उत्साह जास्त वाढला. या संधीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, माबोचे मनापासुन आभार !

पुर्वी ब्लॉग लिहिणे चालू केले होते, पण ते एका लेखमालेनंतर पुढे सरकले नाही. लिन्क माझ्या "अवलोकन" मधे आहे.
पुढच्या वर्षीपासुन जरा वेळ काढून लिहायचा विचार आहे.

उदयन, धन्यवाद !
त्या घोषणेच्या उगमाची काही कल्पना नाही. कधी तसा विचारच केला नाही, पुर्वी नाही अन नंतरही नाही.

गुजराती लोक ही घोषणा देताना जास्त करुन बघितलेले आहेत.. "धर्म की जय हो, अधर्म का विनाश हो, प्राणियोंमे सद्भावना हो".>" खास करुन हे शब्द म्हणुन विचारले..

असू शकेल,
मी ही घोषणा पुर्वी लहानपणी आमच्या घरात ऐकलेली होती, ती सुद्धा त्या आजोबा मंडळींकडून. त्यानंतर आजपर्यंत कुठेच ऐकण्यात आली नाही.

खुप छान! माझे एक काकाही साधारण असेच होते. मी सहा वर्षाची असतानाच ते गेले. त्यांची आठवण झाली.

खुप छान लिहिलं आहे. आवडलं.
तुमचा त्यांच्याविषयीचा आदर सतत निथळतो आहे लिखाणातून. सुरेख आदरांजली वाहिलीत त्यांना.

माबोचे विशेष आभार मानले पाहिजेत, वाचकांना कितीकांची जिव्हाळ्याची बेटं (सौ. - दाद), आदराची स्थानं भेटताहेत, मनातले हळवे कोपरे उघड होताहेत.. _/\_

विशाल, रश्मी, सई धन्यवाद !

सई, प्रतिसाद फारच खास दिलात Happy

खरेतर आधी लिहिताना विचार पडला होता की जमेल का हे,
कारण आपल्याला कितीही जवळची व्यक्ती असली तरी वाचकांना शून्य माहिती असल्याने त्या भावनांची तिव्रता कितपत जाणवू शकेल असे वाटत होते..
पण सर्वांच्या प्रतिसादाने असे वाटत आहे की बर्‍यापैकी जमले आहे.

महेश,

अहो, बऱ्यापैकी कसलं म्हणता, फक्कडपैकी जमलाय लेख म्हणा! विठोबाकाका साक्षात उभे राहिले डोळ्यासमोर! अशी माणसं हल्ली भेटत नाहीत. म्हणजे लिखाणातून म्हणायचंय मला. प्रत्यक्षात केव्हाच अंतर्धान पावलीत! Sad

आ.न.,
-गा.पै.

Pages