विषय क्र. २ - "क्षणोक्षणी तापणारी समई….संजूमावशी"

Submitted by चेतन.. on 3 July, 2014 - 03:36

"चेतन…. ए चेतन…" आईनं हाक दिली.
मी माझे जवळपास कपडे आवरले होते. एल.एल एम, ला पुण्यात अ‍ॅडमिशन घेतली होती. त्यासाठीच्या सामानाची आवराआवर चालू होती. तीन-चार हाका देऊनही मी अगदी अपेक्षितपणे उत्तर दिले नव्हते. आणि ह्याचीही सवय असल्याने अगदी शांतपणे तिनं पुन्हा हाक मारली.
"आलो गं" मी.
आमच्या घराच्या बाहेरच्या खोलीत आई माझं सगळं व्यवस्थित आवरून ठेवत होती. माझी बॅग भरत असताना ती म्हणाली.
"हे बघ… हे आहेत भूकलाडू… नाश्त्याच्या वेळी खात जा. उजव्या कप्प्यात ठेवतीये. खव्याच्या पोळ्या पण देतीये, आठवडाभर चांगल्या राहतात. खूप भूक लागली असेल आणि जवळपास काही नसेल तेंव्हा खात जा…. चारीमुरीला तुला आवडतो तो ……. अरे… चेतSSSSन … आणि तो मोबाईल ठेव जरा बाजूला … मी काय म्हणतीये???"
"अगं हो…. माझं लक्ष आहे तुझ्याकडे…. बोल" मी मोबाईल चाजिंगला लावत म्हणालो.
"चारीमुरीला तुला आवडतो तो पोह्याचा चिवडा हा इथे ठेवलाय … पेपर मध्ये गुंडाळून…. आणि ह्या इथे… ह्या कोपर्यात चॉकलेट ठेवलंय…. अधूनमधून खात जा… आणि थोडं थोडं खात जा… नाहीतर पोट बिघडेल…."
"व्वा…. म्हातारे…. व्वा… पण ह्या पिशवीत काय दिलंय?? आणि ही पिशवी पण नवी दिसतीये…" मी एक रंगीबेरंगी पिशवी बाहेर काढत तिला विचारलं…
"अरे हो… ते तुला सांगायचंच रहिलं… त्या पिशवीत तुला आज रात्रीसाठी पोळीभाजी दिलीये… हॉटेल मध्ये नकोस खाऊ…"
"बंर…. पण ही पिशवी??" पिशवी जरा विचित्रच शिवल्यासारखी वाटत होती. आणि आई असं शिवणं शक्य नाही.
"छानै ना??"
"हो … पण … ना…. "
"अरे… ती पिशवी संजूच्या आनंदानं केलीये…." आई माझं वाक्य तोडत म्हणाली… आणि मी लगेचंच म्हणालो…
"व्वा …. आई फारच सुंदर शिवलीये गं…. "
"हम्म …. अशात तो शाळेमध्ये शिवणकामाच्या नादाला लागलाय…." आई ती पिशवी आत ठेवत म्हणाली.
"चांगलंय… तेव्हढंच संजूमावशीला आराम… "
"आराम??? आणि तिला?? ह्ह…" असं म्हणून आई उठली.

लहानपणापासून आपल्या सर्वांच्या मनावर ठसवलेली एक गोष्ट म्हणजे… आत्तापर्यंत सगळ्यात दानशूर हा कर्ण होता. त्याला जर कोणी काही मागितलं तर त्यानं काही कोणाला कधीच 'नाही' म्हटलं नाही. हाच त्याचा स्वभाव नंतर त्याच्या जीवावर उठला. आपलं आयुष्य हेही एका अत्यंत विचित्र दानशुरतेचं प्रतिक आहे असं मला बर्याचदा वाटतं. म्हणजे बघा ना… तुम्हाला जे काही मागायचंय ते तुम्ही मागा, पण काय आणि कसं द्यायचं हे आयुष्यं स्वतःच ठरवतं. आणि त्याने दिलेलं दान स्विकारण्यावाचून आपल्याकडे कोणताच पर्याय नसतो मग भलेही ते दान आपल्याच जीवावर उठो…. असंच आयुष्यानं दिलेलं अत्यंत विचित्र दान संजूमावशी अगदी मनापासून सांभाळतिये.…. आनंदाच्या रुपानं….

संजूमावशी म्हणजे माझ्या आईची बालमैत्रीण. मी खूप लहान असताना आईसोबत संजूमावशीकडे गेलो होतो. साधारणपणे दुसरी-तिसरीत असताना. तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा आनंदाला भेटलो. स्वतःच्याच नादात दिसला तो. वाटेल तेंव्हा हसेल… मोठ्याने ओरडेल.… उगंच "याSSSSयी …. याSSSSयी " चा गजर चालू ठेवेल…. हातातलं खेळणं मोडून फेकेल किंवा फेकून मोडेल… आणि मोडलेलं खेळणं घेऊन वर कोणाला तरी दाखवत बसेल.… तोंडामधून मुखरस अखंड पाझरत असलेला. त्याची त्याला जाणीव नसायची… संजूमावशीला लक्षात आलं कि ती लगेच पुसायची. तो तिला मारायचा. ती त्याला जवळ घ्यायची. तो तिला चावायचा… ती काहीच बोलायची नाही…. आईनं मला आधी सांगितलं होतं कि तो आजारी असतो पण हा असला काही आजार असतो हे मला तेंव्हा कोठे माहित होतं?… तो खूपच अस्वस्थ दिसत होता.
"काय गं?? का अस्वस्थ दिसतोय आनंद आज?" आईनं विचारलं.
"आता काय सांगू गं तुला?? एक तर …. बर्याचदा…" नंतर संजूमावशीला काही बोलवलंच नाही… आईच्या मांडीत डोकं ठेवून ती बराच वेळ पडून राहिली…
"अशात जर काही त्याच्या मनाविरुद्ध घडलं ना… तापंच चढतो गं… आणि अजून..... सगळंच नाही…. गं…. समजत…. त्याला काय हवंय ते…" तिनं परत डोळ्याला पदर लावला.

'आनंद' तिचा हा पहिला मुलगा… जेंव्हा ह्याचा जन्म झाला तेंव्हा अगदी राजबिंडं आणि गोंडस रूप होतं. कोणीही बघितलं कि लगेच उचलून पापे घ्यावेत इतकं गोड…. पण एका तापाचं काय निमित्त झालं…तो डोक्यात काय गेला…… डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला आणि आयुष्यभराचं अतीमतीमंदत्व त्याला चिटकून बसलं …… आणि संजूमावशीचं आयुष्य त्याला….

आनंदा वयानं, शरीरानं, वाढतोय. पण त्याच्या जाणीवा अजून वर्ष दीड वर्षाच्या मुलासारख्याच आहेत. त्या समृद्ध कधीच होणार नाहीयेत. त्याला कधीच कळत नाही, आपण काय करतोय?, कसं करतोय?, कसं करायला हवं? कसं वागायला हवं? मी आईसोबत जेंव्हा संजूमावशीकडे गेलो होतो तेंव्हा बाथरूम मधून दाराला हात लावून मी बाहेर येत असताना त्यानं जोरात दार लावलं आणि माझ्या डाव्या हाताचं मधलं बोट त्यात अडकलं. मी कळवळून ओरडू लागलो. तोही कावराबावरा झाला पण ते दार उघडायचं त्याच्या काही लक्षात आलं नाही. ते दार उघडलं गेलं अर्थातच आई आणि मावशी पळत आल्यानंतर. मावशीला खूप मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. पण कोणाला बोलणार? आणि काय बोलणार? पण मला खूप राग आला होता त्याचा… आणि सगळ्यात म्हणजे साधं सॉरी पण नाही… मी शेवटपर्यंत बोलायचंच नाही असं ठरवलं होतं पण नंतर मावशीनं मला रंगीबेरंगी पेन्सिलचा बॉक्स दिल्यावर मी त्यासोबत खेळू लागलो.…

आनंदाचं असं झाल्यापासून संजूमावशीचं जग चार भिंतीत सीमित झालं. जवळपास तिनं बाहेर जाणं तसं बंदच केलं.

फार हौशीनं त्यांचं नाव आनंद ठेवलं गेलं. पण त्याच्यामुळे कधीच आनंद मिळाला नाही. उलट आयुष्यभर भळभळत राहणारी जखम मात्र बनून राहिला. पण संजूमावशी त्याला कधीच लोढणं म्हणून वागवत नाही. अश्वत्थाम्याचा हा भळभळता वारसा सांभाळत असताना ती कधीही आनंदाला दूर लोटत नाही. स्वाभाविकच ह्या सगळ्यात तिला स्वतःच्या आशा, आकांक्षा ह्या सार्यांना क्षणोक्षणी तिलांजली द्यावी लागतेच आणि ही वस्तुस्थितिसुद्धा संजूमावशी आनंदाने स्वीकारते. आजही तिचा दिवस आनंदासोबतच सुरु होतो आणि संपतोही त्याला झोपवल्यानंतरच.

आनंदाचे बाबा शिफ्टमध्ये काम करतात. जेंव्हा जेंव्हा त्यांची नाईट शिफ्ट असते तेंव्हा मात्र संजूमावशीचं काम फारच अवघड होतं. रात्र ही आजारी माणसासाठी बर्याचदा वैर्याचीच का असते? मला खरंच नाही कळत. जर कोणी आजारी असेल त्याला जास्त त्रास रात्रीच होतो. वैयक्तिक अजूनही मला आजारी असताना रात्रीची प्रचंड भीती वाटते. आनंदातर रात्री खूपच हिंस्त्र होतो. एक तर ह्या अश्या रुग्णांमध्ये शक्ती खूप असते जी कि एका धडधाकट माणसालाही भारी पडते. संजूमावशी कशी त्याला सांभाळायची आणि तीही एकट्याने? मला आजही प्रश्न पडतो.

संजूमावशी फारशी कुठल्या कार्यक्रमात हजेरीही लावत नाही. मुळात तिलाच रस नसतो कारण तिच्याबाबतीत "रोजचेच मढे त्याला कोण रडे" ही म्हण लागू होत नाही. तिच्यासाठी 'वेदनेची सवय होणे' ही अवस्थाच नाही. खरंतर अशा वेदनेची सवय होणे आणि काही काळानंतर काहीच नं वाटणे ही वस्तुस्थिती असूच शकत नाही. ती जेंव्हा जेंव्हा आईला भेटते, तेंव्हा तेंव्हा दोघींच्या पदराची कड ओली होतेच होते. फारच जवळचं जर कार्य असेल तर आनंदाच्या बाबांना रजा काढावी लागते. मग ते आनंदाला सांभाळायला घरी थांबतात. तेंव्हाच ती जाते.

तोच प्रवास करणं सुसह्य असतं जिथं जाण्याचं ठिकाण निश्चित असतं. त्याच वेदनेची कल्पना करता येते जिला एक्सपायरी डेट असते. पण जर एखाद्या वेदनेला अशी डेटच नसेल तर??? मग अश्या वेळेस काळ नावाचं औषधसुद्धा हतबल ठरतं. काळ जसाजसा बदलत जातो तसतसं ह्या गोष्टीचं गांभीर्य अधिकच गडद होत जातं. तसं पहायला गेलं तर अश्या वेदनेत औषधच जास्त धोकादायक ठरतं. बदलता काळ ह्या अश्या जखमेची परिमाणं नक्कीच बदलू शकतो किंबहुना बदलतोच. वाढत्या वयात जाणीवा जरी नाही समृद्ध झाल्या तरी निसर्ग थोडंच ऐकणारे?? आता आनंदानं तिशी पार केली असेल. आणि आता त्याचं वागणं कसं झालं असेल?… कशी कल्पना करू?? करतंच नाही.

मला आधी प्रश्न पडायचा, कधी संजूमावशीला असं वाटत असेल का? की कशाला हे पोरगं जन्माला आलं? आल्या आल्याच का नाही मेलं? ही कसली ब्याद आयुष्याभरासाठी आपल्याला चिटकलीये? कधी सुटणारे? वगैरे वगैरे…. कारण जर कुठलं दुखणं थोड्याकाळासाठी असेल तर सहन करता येतं झेलता येतं. पण हे असलं नं बरं होणारं दुखणं?? पोटचा मुलगा जरी असला तरी असं वाटणं स्वाभाविक आहे. पण नंतर लक्षात आलं कि जर संजूमावशीला तसं वाटलं असतं तर तिनं त्याला स्वतः कशाला सांभाळलं असतं? बर्याच संस्था आहेतच कि अश्यांना सांभाळायला. पण तिनं कोण्या संस्थेच्या दारात जाण्यापेक्षा स्वतःच एक संस्था व्हायचं ठरवलं…… तिच्या आनंदासाठी… आज ती आनंदाला अधूनमधून मतीमंद मुलांसाठी चालवल्या जाणार्या कार्यशाळेत घेऊन जाते. तिथे त्याला त्याच्यासारखी असंख्य मुलं दिसतात. तो तिथे काही काळ रमतोही आणि संजूमावशीलाही जरा बरं वाटतं कारण तिच्यासमोर आनंदापेक्षाही अवघड अवस्थेतली मुलं असतात. समदु:खी माणसांची मैत्री फार लवकर होते. तिथे आनंदा आता पिशव्या, खडू, पतंग, कागदाची पाकीटं अश्या गोष्टी करायला शिकतोय. मग अश्या वस्तूंच्या विक्रीची सोय मावशी बघते. त्यातून आलेले पैसे ती आनंदासाठी काढलेल्या बॅंकेच्या अकाउंटमध्ये टाकते.

खरंतर संजूमावशीच्या पदरात जे काही दान पडलं तश्या कित्येक अभागी आया आपल्याला आजूबाजूला दिसतात. अशा मुलांना कधी चालत, कधी व्हीलचेअरवरून तर प्रसंगी कडेवरून सुद्धा त्यांचे आईबाबा घेऊन जाताना दिसतात. ह्या मुलांच्या डोळ्यात जेव्हढे कुतुहुलाचे भाव असतात तेव्हढेच अगतिकतेचे भाव त्यांच्या आई- बाबांच्या डोळ्यात दिसतात. आणि बर्याचदा समाज त्यांची खिल्ली उडवताना दिसतो. खरंतर समाज हा राजहंसासारखा असायला हवा ना?. असं म्हणतात कि राजहंसासमोर जर आपण दुध ठेवलं तर तो फक्त दूधंच पितो आणि त्यातलं पाणी तसंच त्या भांड्यात ठेवतो. आता हे कितपत खरं ते मला माहित नाही पण समाजानं असं वागायला काय हरकत आहे? चांगलंच स्वीकारायला काय हरकत आहे? निदान अशा मुलांच्या बाबतीत तरी… ज्यात त्यांचा काहीच दोष नाहीये. समाज त्यांच्याबाबतीत कावळ्यासारखा वागताना बर्याचदा दिसतो. कावळ्याला जखम विद्रूप करायची सवय असते. ही अशी मतीमंद मुलं ही सुद्धा आपल्या समाजातली एक मोठी जखमच आहे जिची बरी व्हायची शक्यता खूप कमी किंवा बर्याचदा नसतेच. मग अश्या मुलांना उगाच दगडं मारणं, चिडवणं, ती चिडली कि हसणं, त्यांच्याकडे विचित्र नजरेनं बघणं… असं केलं जातंच. मग ती मुलं जास्त अस्वस्थ होतात… जास्त हिंस्त्र होतात. अश्यांना आवरणं खूप अवघड होऊन बसतं. आणि ह्या सगळ्यात जेव्हढा त्रास त्यांना होतो त्यापेक्षा जास्त त्रास मला वाटतं त्यांच्या आईबाबांना होतो. आपल्या समोर आपल्याच काळजाच्या तुकड्याची अशी थट्टा उडवलेली पाहताना, जिथे त्यांची काहीच चूक नाहीये, त्यांच्या आईबाबांना काय आणि कशा यातना होत असतील?? वपु म्हणतात तसं, ज्योतीपेक्षा समईच जास्त तापत असेल. असं तापणं आणि तापवणं नकोच म्हणून संजूमावशी शक्यतो त्याला घेऊन बाहेर जाणं टाळते.

तिला दुसरा मुलगा झाला. गोविंदा…. तोही दिसायला खूप गोड. पण सुदैवाने त्याच्या बाबतीत दुर्दैव आड आलं नाही. गोविंदा जन्मतःच कुशाग्र बुद्धीचा उपजला. आज तो सी. ए. झालाय. जी काही उणीव आनंदामध्ये देवांनं दिली होती ती सगळी गोविंदामध्ये भरून निघाली खरी पण एकाच घरात ही अशी दोन टोकं संभाळणं म्हणजे …. खूपच अवघड. आनंदा म्हणजे तिची दुखरी नस आणि गोविंदा म्हणजे उजवी बाजू. साधारणपणे जे काही दुखरं असतं तेच जास्त हळवं असतं. स्वाभाविकच जास्त लक्ष त्याच्याकडेच जाणार त्यामुळे उजव्या बाजूला कदाचित डावललं जाण्याची भावना स्पर्शून जाऊ शकते. पण ते तिने गोविंदाला कधीच जाणवू दिलं नाही. मुळात ह्या गोविंदावर लहानपणी असे संस्कार झाले कि आजही त्याला स्वतःलाही काही घ्यायचं असेल तर त्यात आनंदाचा शेअर ठेवला ठेवतोच. अशात गोविंदाच्या लग्नाचं बघताहेत तेंव्हा आपण होऊन, जी मुलगी माझ्यासोबत आनंदालाही स्वीकारणार असेल तिच्याशीच मी लग्न करेन, असा पवित्रा गोविंदानं घेतलाय. अर्थात ह्या सार्याचं श्रेय जेव्हढं संजूमावशीला जातं, तेव्हढंच किंबहुना काकणभर जास्तच गोविंदाला द्यायला हवं. निदान देवानं दुसर्या वेळेला तरी चूक केली नाही म्हणून तेव्हढ्याच प्रेमाने संजूमावशी गोविंदाला जवळ घेते.

आई सांगते, संजूमावशीचं गणित खूप चांगलं होतं. आईला काही अडचण असेल तर ती संजूमावशीला विचारायची. भूमितीतली अवघड अवघड प्रमेयं ती चुटकीसरशी सोडवायची. वहीच्या कागदावरची गणितं अगदी सहज सोडवणार्या संजूमावशीच्या आयुष्याच्या कागदावर नियतीनं असं काही गणित सोडवायला दिलं, कि आयुष्याची पन्नाशी पार झाली असूनही तिला ते अजून सोडवता आलेलं नाही. आणि तिलाही ह्याची पूर्ण कल्पना आहे कि हे गणित नं सुटणारं आहे… निदान तिच्या शेवटच्या श्वासापर्यंततरी… तरीही रोज सकाळी ती ते गणित मांडीवर घेऊन बसते. त्याला थोपटते. त्याला भरवते. पुन्हा सगळ्या पायऱ्या मांडून बसते. कुठली ना कुठली पायरी चुकलेली असतेच. त्याची तिला पुन्हा जाणीव होते. तिच्या मांडीवरचं गणित तिची मांडी सोडून खाली उतरलेलं असतं. स्वतःच्याच नादात हरवलेलं असतं. पुन्हा सगळ्या खेळण्यांचं मोडणं सुरु होतं (कदाचित त्याचंही अंतर्मन कोठेतरी देवाला असं म्हणत असेल…. की तुही माझ्या आयुष्याचं खेळणं असंच मोडलंस ना रे…) संजूमावशी अगदी शांत उठते. देवघरासमोर जाऊन "त्या" देवासमोर हात जोडते. त्याला अगदी मनापासून कळवळून जगण्यासाठी बळ मागते. डोळे भरून आलेले असतातच. तेव्हढ्यात… "ये…. याSSSSSयीSSSSS" म्हणून आनंदा ओरडू लागतो. ती … "हां … आले रे" म्हणून मागे वळते तेंव्हा……
.
.
.
.
तिच्या डोळ्यातल्या अश्रुंचा पुरावासुद्धा मागे नं ठेवता तिच्या ओठावर स्मित फुललेलं असतं.

(ता. क.: प्रस्तुत व्यक्तिचित्रणातली फक्त नावेच काल्पनिक आहेत.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहेस रे मित्रा !!
हर्पेन म्हणताहेत त्या प्रमाणेच अशा अनेक संजूमावश्या माहीत असूनही, नि:शब्द झालो.

अंजली चित्रपटात एक वाक्य आहे... काही मुलांना खास आई व भावंडाची गरज असते म्हणून त्यांना अशा घरात जन्माला पाठवलं जातं ! संजूमावशी आणि गोविंदा दोघेही आवडले !

जवळच्या ओळखीत आहे अशी एक केस पण त्यात अशी संजूमावशी नाहीये. त्यामुळे एवढे नक्कीच सांगू शकतो की कोणतीही स्त्री फक्त आहे म्हणून असे वागेलच असे नाही सांगता येत.

लेख आवडलाच !


..... नि:शब्द ........

सुरेख लेखनशैली .... >>+१
समाजातल्या अनेक संजूमावशी आणि गोविंद यांना __/\__

तापणारी नव्हे तेवणारी. पण इथे बिचारी तिळ तिळ जळणारी हवीय. आपण लोक प्रॅक्टिकल वागु शकत नाही. आयुष्य भर परवड वाट्याला येते व सर्व स्रीलाच निस्तरावं लागतं.

> एका तापाचं काय निमित्त झालं…तो डोक्यात काय गेला…… डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला आणि आयुष्यभराचं अतीमतीमंदत्व त्याला चिटकून बसलं …… > हे असं होऊ शकतं का? मतिमंदत्व जन्मतःच असते ना?

===
> मला आधी प्रश्न पडायचा, कधी संजूमावशीला असं वाटत असेल का? की कशाला हे पोरगं जन्माला आलं? आल्या आल्याच का नाही मेलं? ही कसली ब्याद आयुष्याभरासाठी आपल्याला चिटकलीये? कधी सुटणारे? वगैरे वगैरे…. कारण जर कुठलं दुखणं थोड्याकाळासाठी असेल तर सहन करता येतं झेलता येतं. पण हे असलं नं बरं होणारं दुखणं?? पोटचा मुलगा जरी असला तरी असं वाटणं स्वाभाविक आहे. > स्वाभाविक आहे तसं वाटणं. फक्त ते कधी कुठे बोलून दाखवता येत नाही.

===
> पण नंतर लक्षात आलं कि जर संजूमावशीला तसं वाटलं असतं तर तिनं त्याला स्वतः कशाला सांभाळलं असतं? बर्याच संस्था आहेतच कि अश्यांना सांभाळायला. >
सामाजिक दबाव?
मतिमंदाची संख्या आणि सांभाळणाऱ्या संस्थाची संख्या यांचा ताळमेळ बसतो का?
खरंतर ऑटिझम गर्भावस्थेतच डिटेक्ट होतो; पण वेगवेगळ्या देशातील कायद्यानुसार किती आठवड्यानंतर गर्भपात करता येणार नाही हे ठरलेलं असल्याने हि मुलं जन्माला घालावी लागतात.

===
> जवळच्या ओळखीत आहे अशी एक केस पण त्यात अशी संजूमावशी नाहीये. त्यामुळे एवढे नक्कीच सांगू शकतो की कोणतीही स्त्री फक्त आहे म्हणून असे वागेलच असे नाही सांगता येत. > तसेच असणार, असायला हवे ना? कि प्रत्येक स्त्रीने तिला पुरुषने, समाजाने आखून दिलेल्या नियमानेच वागायला हवे.

===
> आपण लोक प्रॅक्टिकल वागु शकत नाही. आयुष्य भर परवड वाट्याला येते व सर्व स्रीलाच निस्तरावं लागतं. > + १