दर्शनी माझी गझल ओठात आहे!

Submitted by profspd on 2 July, 2014 - 07:27

दर्शनी माझी गझल ओठात आहे!
ती अरे, रक्तात अन् श्वासात आहे!!

तू दिलेल्या वेदनेची एकतारी....
घेउनी मी गझल माझी गात आहे!

केवढा कल्लोळ अन् गोंगाट भवती.....
मात्र पाझर शांततेचा आत आहे!

झोप डोळ्याला विचारू लागली की,
का तुझे मन आज तुजला खात आहे?

थांबली दारात किरणे ही कधीची....
वेंधळा मी आत अंधारात आहे!

रोज मरतो, रोज जगतो जीवनी या....
या खटाटोपात आनंदात आहे!

कोठुनी येते वजन मिस-यास माझ्या?
तेच या ओठात जे पोटात आहे!

लाट देते हात तुजला हरघडीला....
हात तो घेणे तुझ्या हातात आहे!

गाव पूर्वीचे न आता राहिले हे....
वेगळी आता हवा गावात आहे!

काय चालाखी, शिताफी भामट्यांची....
फसविले मज काय हातोहात आहे!

सोसली नाही गझल माझीच त्यांना....
गझल माझी एक झंजावात आहे!

जाहली मैफील रोमांचित किती ती....
आर्तता हृदयातली गाण्यात आहे!

ती न काही बोलली पण मी समजलो....
तेज बुद्धीचे तिच्या डोळ्यात आहे!

मानले आभार विद्युतदाहिनीचे....
वेदनांचा अंत या मसणात आहे!

मी न कुटले टाळ, ना वारीत गेलो....
खुद्द विठ्ठल माझिया हृदयात आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users