लेखनस्पर्धा २०१४ -- विषय कमांक २ - व्यक्तिचित्रण -- " जानकीका़कू "

Submitted by मनीमोहोर on 1 July, 2014 - 10:13

" औक्षवंत व्हा, सुखाने संसार करा. " ....... जानकी काकू आम्हाला आशीर्वाद देत होत्या.

"लग्नाला काही मी येऊ शकले नाही , बरं झालं हो दाखवायला आणलीस ते "...... हे त्यांच्या पुतण्याला उद्देशुन.

त्याच असं झालं आमच्या लग्नाला आमच्या गावचे सगळे नातेवाईक येऊ शकले नव्हते. कारण आम्ही आमचं गावचं घर कधीही बंद करत नाही, त्यामुळे काहीही असलं तरी कोणीतरी दोघं तिघं जणं घरी रहातातच. मजेची बाब म्हणजे त्या घराच्या दरवाजाला बाहेरुन कडीच नाहीये कुलुप लावायला. म्हणून मग लग्न झाल्यानंतर आम्ही कुठे दुसरीकडे न जाता गावालाच जायचं ठरवलं. तशी त्या वेळेस बंगलोरला जायची फार टुम होती पण पतीदेवांच्या मते जगातले सर्वात सुंदर ठिकाण त्यांच गावचं आहे. ते ही त्यांना मला दाखवायच होतं. नंतर इतक्या वर्षात खूप ठि़काणं फिरुन झाली पण ते त्यांच्या ह्या मतावर अजूनही ठाम आहेत. संगती संग दोषेण ( ? ) ....... मला ही आता तसचं वाटु लागलयं. हं तर काय सांगत होते, लग्नानंतर आम्ही गावालाच गेलो. सासरच्या माणसांना भेटायला. देवाला नमस्कार करायला आणि फिरायला सगळं मिळुन एकच ठिकाण. ते म्हणजे आमचं गाव.

जानकीकाकूना म्हणूनच मी प्रथम बघितलं ते लग्न झाल्यानंतरच. त्या माझ्या यजमानांच्या चुलत काकू म्हणजे माझ्या चुलत सासूबाई, पण आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे हे चुलतपण कधी जाणवलं नाही. मला एकंदर पाच सासूबाई असल्याने नावापुढे काकू लावूनच प्रत्येकीला संबोधलं जाई. मी प्रथम पाहिलं जानकीकाकूना तेंव्हा त्या साधारण साठीच्या घरात असतील. उंची बेताची, अंगकाठी लहानखोर, नितळ गोरा वर्ण, पण काळे डोळे, केस पांढरेपणाकडे झुकलेले, मधोमध भांग आणि तेल लावलेल्या केसांचा मागे छोटासा अंबाडा, प्रिंटेड नऊवारी लुगड अगदी व्यवस्थित नेसलेलं, कपाळावर छोटसं गोंदण, गळ्यात सोन्याची चेन आणि हातात सोन्याचाच दोन दोन बांगड्या, सासर आणि माहेर दोन्ही कोकणातलच असल्याने बोलणं अनुनासिक , पण मृदु आणि सर्वात सुखावणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या चेहर्‍यावरील शांत आणि प्रसन्न भाव. पहाता क्षणीच मला त्या आवडल्या.

"बसा हो त्या घडवंचीवर, चहा करत्ये तुम्हाला. प्रवासाचा त्रास कितपत गो SSss....... काकू मला विचारत होत्या. माझा अवघडलेपणा, बुजरेपणा घालवायचा प्रयत्न करत होत्या. बोलताना ग ऐवजी गो SS असं अगदी हेल काढून म्हणण्याची त्यांची लकब मला लगेचच जाणवली. आमच्या घरातली नवीनच इंगजी शिकू लागलेली शाळकरी मुलं त्यावरुन " सारखं सारखं ' जा ' काय ग सांगतेस "...... असा बालिश विनोद ही करीत असत त्यावर हे मला नंतर समजले. पहिल्यांदा मी गावाला गेले ती चार पाच दिवसच रहिले पण जसजशी सासरी रुळत गेले तसतसे गावाला जाण्याचं प्रमाण आणि कालावधी दोन्ही वाढू लागले.

शहरातल्या फटाक्यांना कंटाळून एकदा दिवाळीसाठी आम्ही गावी गेलो होतो. दुपारचा चहा झाल्यावर मी सहज मागच्या पडवीत डोकावले तर काकू बसलेल्या दिसल्या. संध्याकाळी खळ्यात लावायच्या पणत्यांची त्या तयारी करत होत्या. तीन सुपं भरुन पणत्या होत्या. लागणारच होत्या तेवढ्या पणत्या कारण आमचं खळं खूप मोठ आहे. मीही त्यांच्या मदतीला लागले पण नवल म्हणजे वाती कापसाच्या नव्हत्या आणि तेल ही गोडतेल नसून कडूतेल होतं खास पणत्यांसाठी आणलेलं. एका अगदी जीर्ण झालेल्या धोतराच्या तुकड्यापासून त्या वातेरं ( वाती ) करत होत्या. माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्हं पाहून त्या म्हणाल्या ....
"तुला नवल वाटेल हे असं करताना बघून पण पूर्वीच्या काळी एवढा कापूस नसे गो...... एकच कापशीण होती आगरात, तिचा कापूस जेमतेम देवांपुरता निघे...... कापूस विकत आणायचा तर पैसा नसे रोख आणि दुकान म्हणशील तर सहा मैल दूर चालतच जायचं. ..... मग पणत्यांच्या वातींसाठी अशी अगदी जीर्ण झालेली धोतरचं उपयोगात आणतो. तुझ्या मुंबईच्या आणि इथल्या सासर्‍यांनी काबाडकष्ट केले म्हणून परिस्थिती पालटलीय हो आता...... कापूस आणि गोडतेल आणणं कठीण नाही गो SSS ....... पण ही सवय झालीय ना, एवढ्या वरसांची म्हणून हो ......... "
मग वाती करता करता त्या मला खूप काही सांगत राहिल्या त्यांच्या कठीण काळातलं. मे महिना सोडून घरी गेलं तर त्यांना थोडी सवड सापडे. रात्री जेवणं झाली की खूप काय काय सांगत असत मला. त्यातूनच तर उलगडत गेलं मला माझ्या सासरचं घर. आमच अनेक पिढ्यांचं एकत्र कुटुंब एकत्रच राखण्याचं त्यांच गुपित. कशी प्रसंगी आपल्या मनाला मुरड घालावी लागते पण कसं आपण एकत्र आहोत याच समाधान खूप मोठ असतं वगैरे.

मे महिन्यात मात्र त्यांना जराही सवड नसे. मी कितीही लवकर उठून काकूना चकित करु या असं ठरवल तरी प्रत्येक वेळी मीच हरत असे. त्या कायम माझ्या आधीच उठलेल्या असत. पहाटेच्या वेळी स्वयंपाक घरात मंद पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात त्यांच काम सुरू होई. मे महिन्यात आंब्याफणसांची कामं असतं. घरात मुंबईची मंडळी, पै पाव्हणे आणि तिथली घरची अशी मिळून तीस पस्तीस जणं सहज जमत असू आम्ही. भरीस भर म्हणून गडी माणसांचं चहा पाणी, न्याहरी वगैरे असेच. म्हणून त्या खूप लवकर उठत. सगळ्यांचा चहा करायचं काम त्यांच्याकडे असे. डायनिंग टेबलावर एका थर्मास मध्ये कोरा चहा, शेजारी तांब्यात निरसं दूध आणि एका ट्रे मधे चहासाठी कप असा सरंजाम असे. सगळ्यांना ताजा चहा मिळावा म्हणून त्या थोडा थोडा चहा करत असत. त्यांच कोण चहा घेऊन गेल आणि कोण नाही ह्याकडे बारीक लक्ष असे. कुणी खास पाव्हणा असेल तर त्याला घडवंचीवर बसवून स्पेशल कपबशीतून चहा द्यायचा असे त्तर एखाद्या परक्या पाव्हण्याला ओटीवर नेऊन द्यायचा असे. मागच्या पडवीतून एखादी कामवाली " वैनीनु, धा कोप चाय घाला ह्यात "....... असं म्हणून किटली पायरीवर ठेवून जाई. तेवढ्यात कोणी नातवंड " बाबीआजी, दूध संपलय तांब्यातलं "........ म्हणून हाकारा देई. तुम्हाला वाटेल की त्यांच टोपण नाव 'बाबी' होतं म्हणून. पण तस नाहीये हं. त्याच काय आहे, त्या सगळ्या नातवंडाना बाबी अशी हाक मारीत असत कौतुकानी, म्हणून कुण्या एका नातवंडाने त्यानांच " बाबीआजी " करुन टाकलं होतं. ह्या सगळ्या चहा कार्यक्रमात आम्ही असायचो त्यांच्या हाताखाली पण प्रमुख त्याच असत. कोणाचा पहिला तर कोणाचा दुसरा अस करत करत पहाटे पाच साडेपाचला सुरु झालेला हा चहा कार्यक्रम चांगला साडेसात आठ वाजेपर्यंत चाले.

त्यानंतर त्या जरा मोकळ्या होत स्वतःच आवरण्यसाठी. माजघरात जिथे प्रकाशाचा कवडसा येई तिथे त्या त्यांची फणेरपेटी आणि तेलाची झारी घेऊन केस विंचरण्यासाठी बसत असत. ती फणेरपेटी त्यांना त्यांच्या माहेराहून मिळाली होती म्हणून तिच्यावर त्यांचा फार जीव होता . फणेरपेटी म्हणजे हलीच्या भाषेत मेकअपबॉक्स. ही एक लाकडाची छोटीसी बॉक्स असते आणि तिच्या झाकणाला आतील बाजूने आरसा फिक्स केलेला असतो, जो पेटीत असलेल्या खाचेमुळे पेटी उघडली की ४५ अंशात फिट होतो. त्यामुळे आरसा धरुन न ठेवता आपल्याला आरशात बघता येते. या पेटीत स्त्रिया कंगवे, फण्या, आगवळ, पिंजर इ. प्रसाधनाच्या वस्तू ठेवीत असत. त्यांनी फणेरपेटी आणि तेलाची झारी काढली रे काढली की सगळी नातवंड त्यांच्याभोवती गोळा होत कारण सगळ्या मुलांना या दोन्हीबद्दल प्रचंड कुतुहल. काम झाल्यवर ती पेटी आणि झारी काकू फळीवर ठेऊन देत त्यामुळे मुलांना एरवी ती मिळत नसे. एखादी चिमुरडी मी तेल लावते म्हणून झारीतून इवल्याशा हातावर तेल घेई आणि त्यांना लावून देई. एखादा मुलगा त्या पेटीची उघडझाप करण्याचाच चाळा करी. तर एखादी थोडी मोठी मुलगी " बाबीआजी मी " म्हणून त्यांना बाजुला सरकवून त्यांच्या आरशाचा आणि फण्यांचा ताबा घेत स्वतःच प्रसाधन सुरु करी. काकू मुलांना खोट खोटं रागावत पण मनातून हे सगळं त्यांना खूप आवडत असे.

रोजचा स्वयंपाक काकू फारशा करीत नसत. माझ्या सर्वात मोठ्या सासूबाई हे काम करीत. पण कढी, डाळींबी उसळ, सांदण, अळवाची देठी, घारगे, केशरी भात, मोदकाची उकड ह्यात त्यांचा हातखंडा होता. दुपारी पुरषांची पंगत माजघरात जेवायला बसली की का़कू स्वयंपाकघरात ( बॅक ऑफिसला) त्यांना थोडा पायदुखीचा त्रास असून सुद्धा जातीने उभ्या असत. पदार्थ गरम करणे, वाढपीणीना तो मोट्या पातेल्यातून वाढण्याच्या छोट्या पातेल्यात काढून देणे, काय वाढायला न्या ते सांगणे इ. पहात असत. वाढप चांगल असलं की माणसं समाधानाने जेवतात असं त्या आम्हाला नेहमी सांगत. मला वाढायला देण्याचे काम मात्र त्या शिताफीने टाळत. ह्याचे कारण मी डावखुरी आणि त्यांना डाव्या हाताने वाढलेले आवडत नसे. पण योगायोगाने माझ्या नंतर घरात आलेल्या सूनाही डावखुर्‍याच निघाल्याने डावखुर्‍याच जास्त झाल्या घरात आणि मग काकूंना आम्हाला वाढायला न देण्याचा आग्रह मोडावाच लागला.

काकूंचं किंवा माझ्या कोणत्याच सासूबाईंचं पूजा-अर्चा , जप- तप, पोथ्या-पुराण, भजन-कीर्तन यात मन रमत असे असं मला नाही वाटत. कुटुंब मोठ असल्याने घरात कामं ही खूप असत आणि सतत काम करत रहाण हीच त्यांची देवपूजा होती. पहाटे उठल्यावर का़कू देवघरातला अंधार दूर व्हावा म्हणून देवांजवळ निरांजन लावत आणि स्नान वगैरे झाल्यावर देवांवर गंध फूल वाहून हात जोडत !! बस्स. एवढच करीत त्या. म्हणूनच दुपारी थोडी विश्रांती झाली की परत त्यांचे काम सुरु होई. कधी दुसर्‍या दिवशी करायच्या सांदणांसाठी जातीणीवर कण्या काढत. सामान्यतः दळणाच काम पहाटे करतात पण काकू दुपारीच दळत असत. कधीतरी क्वचित एखादी ओवी म्हणत दळताना. कधी दुपारी लाडवांचा घाट घालीत. धान्य निवडणं, फडताळं नीट लावून ठेवणं अशी काम त्या दुपारच्याच वेळेत करीत असत. टापटीपीची अत्यंत आवड असल्याने फडताळं लावणे हे त्यांच आवडत काम होतं.
" फडताळं बेणणे " हा त्यासाठीचा त्यांचा खास शब्द्प्रयोग होता.

सतत कष्ट केल्याने म्हणा नाहीतर वयोमानामुळे म्हणा काकूंचा पायदुखीचा आजार हळूहळू वाढत होता. त्यात कोकणात म्हणजे सारखे चढ उतार आणि पावठण्या. म्हणून मी त्यांना म्हटलं ...... " का़कू , तुम्ही मुंबईला चला आमच्याकडे. तिथे तुमच्या पायाला आराम मिळेल."
"नको ग बाई तुमची मुंबई , एकदा काय झालं तुला माहित आहे ना ? ......
असं म्हणून त्यांनी मला किमान चार वेळा तरी सांगितलेली कहाणी जणु काही प्रथमच सांगतेय अशा उत्साहात सांगायला सुरवात केली. त्या खूप वर्षांपूर्वी एकदा मुंबईला आल्या होत्या. कोणाबरोबर तरी दुसर्‍या एका नातेवाईकांकडे ट्रेनने निघाल्या होत्या. त्यांच स्टेशन आल्यावर त्यांच्याबरोबरची व्यक्ती उतरली पण ह्या उतरण्या आधीच ट्रेन सुरु झाली. मग काय त्या बरोबरच्या व्यक्तीच्या तोंडचं पाणीच पळालं. स्टेशनवर अनाउंसमेंट केली, सगळीकडे शोधाशोध केली तरी संध्याकाळ पर्यंत काही शोध लागला नाही. ती व्यक्ती निराश होऊन घरी आली आणि थोड्या वेळाने एका गृहस्थांबरोबर का़कू घरी आल्या. स्टेशनवर चुकामूक झाल्यावर त्या खूपच घाबरल्या. भीतीने घरचा पत्ता आठवेना, हुंदक्यांमुळे तोंडातून शब्द फुटेना अशी स्थिती झाली त्यांची. ह्या सदगृहस्थानीच त्यांची विचारपूस केली आणि कोणताही गैरफायदा न घेता त्यांना घरी आणून सोडले. सगळ्यांनीच मग सुटकेचा निश्वास टाकला. पण ह्या प्रसंगाचा काकूनी एवढा धसका घेतला की नंतर विशेष कधी त्या मुंबईला आल्याच नाहीत.

एकदा मे महिन्यात अशीच गावाला गेले होते. स्वयंपाकघरात मला का़कू दिसल्या नाहीत म्हणून जाऊबाईंकडे चौकशी केली तर त्या म्हणाल्या, आताशा पायदुखीमुळे काकूंना चालणं फिरणं कठीणच झालयं. खोलीत माच्यावर झोपूनच असतात, म्हणून त्यांना भेटायला खोलीत गेले. त्यानी नेहमीप्रमाणेच हसून माझं स्वागत केलं. त्यांच्या चेहर्‍यावर निराशेचा गंध ही नव्हता. खर तर त्यांच संपूर्ण आयुष्य काम करण्यातच गेलं होतं. काम करीत रहाणं हा तर त्यांचा श्वास होता. रिकामं बसलेलं मी त्यांना कधी पाहिलेलचं नव्हतं. त्यांना असं सकाळच्या वेळी माच्यावर आडवं रहिलेलं बघणं माझ्यासाठी सुद्धा खूप कठीण होतं तर ही सक्तीची विश्रांती त्यांना किती कठीण जात असेल? पण आता आपल्याला चालता फिरता येत नाही हे त्यांनी फार चांगल्या रीतीने स्वीकारलं होतं. कुठुन शिकल्या असतील त्या हे सारं ? शिक्षण तर त्यांच जेमतेम लिहिण्यावाचण्या एवढचं झालं होत. एक अगदी सामान्य आयुष्य होतं त्यांच. कायम चार भिंतींआडच रहिलेलं . मग त्यांच्याकडे हा दॄष्टीकोन कुठुन आला असेल ? मला मनातून काकूंच खूप कौतुक वाटलं. आपल्या रिकामपणावर आपल्या परीने त्यांनी तोडगा ही शोधून काढला होता. वेळ घालवण्यासाठी रोज "श्रीराम जयराम जय जय राम" सारखा एखादा देवाचा मंत्र लिहिण्यास त्यांनी सुरवात केली होती. भाऊबीजेच्या मनीऑर्डर वर करावी लागणारी सही एवढाच त्यांचा उभ्या आयुष्यात आलेला पेनाशी संबंध. हस्ताक्षर म्हणजे दोरीवर वेगवेगळ्या आकाराचे कपडे वाळत घातल्यावर जसं दिसेल तसं. पण ह्या मंत्र लिहिण्यामुळे त्यांच हस्ताक्षर खूपच सुधारलं होतं. त्यांचा वेळही यात छान जात असे. एक दिवस मी त्यांना " गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा " हा मंत्र दिला लिहायला. त्या म्हणाल्या " हा नको, दुसरा दे." कारण विचारल्यावर पुढे म्हणाल्या " अग, ह्यांच नाव कसं लिहू? म्हणून दुसर काहीतरी सांग. " माझ्या त्या सासर्‍यांचं नाव गोपाळ होतं. Happy Happy :स्मित

कालचक्र फिरत होतं. दिवसेंदिवस वार्धक्य आणि पायदुखी यामुळे काकूंची शक्ती कमी होत होती. जेवण कमी कमी झालं होतं . जाऊबाईंचा " येऊन जा " असा फोन आला म्हणून यजमान काकूंना भेटायला तातडीने गावाला गेले . मी मुलांच्या परीक्षांमुळे जाऊ शकले नाही. ते भेटुन आले आणि दोन दिवसातच सगळं संपल्याचा जाऊबाईंचा फोन आला. आम्ही खूप उदास झालो. मुलंही बाबीआजी आता परत भेटणार नाही म्हणून हिरमुसली झाली. कधीही न रागावणारी म्हणून बाबीआजी त्यांची सर्वात लाडकी आजी होती. काळ पुढे सरकत होता. तीन चार महिन्यांनी जाऊबाई मुंबईला आमच्याकडे आल्या होत्या. गप्पांचा विषय अर्थातच काकू होता. खूप आठवणी निघाल्या. बोलता बोलता जाऊबाई उठल्या आणि त्यांनी माझ्या हातात एक पाकीट आणि एक छोटीसी डबी ठेवली. पा़कीटात आम्हा सर्वांना उद्देशून लिहिलेलं काकूंचं सुवाच्च अक्षरातलं मनोगत होतं. त्यात त्यांनी आमचं कुटूंब येणार्‍या अनेक पिढया असचं अभंग राहो अशी प्रार्थना परमेश्वराजवळ केली होती आणि विशेष म्हणजे त्यांच स्त्रीधन फक्त त्यांच्या सूनानांच न देता आम्हा सगळ्यांनाच ते दिलं जाव अशी इच्छा व्यक्त केली होती... या त्यांच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी, काकूंच्या स्त्रीधनातून जाऊबाईंनी माझ्यासाठी सोन्याच वळं केलं होतं, ते त्या छोट्या डबीत होतं. पुतण्या- मुलगा, सख्ख - चुलत ह्यात कोणताही भेदभाव न करण्याचं आयुष्यभर पाळलेलं व्रत त्यांनी अशा रीतीने नंतर ही पाळलं होतं. त्यांच स्त्रीधन आम्हाला सुध्दा देऊन आमच्या येणार्‍या पुढील पिढ्यांसाठी त्यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला होता . म्हणूनच वळं जरी छोटसं असलं तरी माझ्यासाठी ते अनमोल होतं. ते वळं बोटात घालताना काकूंबद्दलचा माझा आदर कैकपटीने वाढला आणि पहिल्यांदा त्यांनी दिलेला आशीर्वाद का़कू मला पुन्हा देत आहेत असा भास मला झाला.........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिले आहे. या जानकीकाकू प्रत्येकाच्याच ओळखीच्या असतील. आमच्या कोकणाकडेही दर दुसर्‍या घरात सापडावी..

आणि हो, माझी आजी मोठ्या काकांना "बाबी" या नावाने हाक मारायची म्हणून ती "बाबीची आई" करत ओळखली जायची. माझा जन्म झाला तेव्हा मोठे काका वेगळे राहत असल्याने आपल्या आजीला काही बायका बाबीची आई का हाक मारतात हे मला कोडेच पडायचे. किंबहुना ते झाशी की राणी टाईप मानसन्मान दिल्यासारखे वाटायचे. कारण ती होतीही तशीच. खरे तर या स्पर्धेसाठी म्हणून मी तिच्यावरही लिहायचा विचार करत होतो. असो, पण हा लेखही बराच रिलेट झाला, आपल्याच ओळखीच्या माणसाबद्दल लिहिल्यासारखा Happy

एखाद्या स्निग्ध, नितळ निरांजनासारखे तेवणारे हे व्यक्तिचित्रण खूपच भावणारे असे आहे.

जे सांगायचे आहे ते नेमक्या शब्दात, अगदी टापटिपीने लिहिले आहे.>>> अनुमोदन. Happy

काय छान लिहिल आहे....थोर आहेत जानकीकाकु.
अस निरपेक्ष प्रेम आणी आपलेपणा तुम्हाला मिळाला...खूप नशीबवान आहात तुम्हि Happy

Pages