विषय क्र. २ - 'भोळ्या सांबाचा हरफनमौला पीर..'

Submitted by सई. on 1 July, 2014 - 02:25

आई-वडिल, दोन भाऊ, पाच बहिणी, वडिलांच्या बहिणीचं त्याच आकाराचं कुटुंब. सगळे जेवायला बसलेत. कशावरून तरी विषय निघतो आणि कुटुंबातला ८ वर्षे वयाचा मुलगा उठून उभा रहातो. 'प्रेम हीच जगातली एकमेव श्रेष्ठ भावना आहे' यावर जवळपास अर्धा तास एकटा बोलत रहातो आणि अख्खं कुटुंब मंत्रमुग्ध होऊन चिडीचुप्प ऐकत रहातं. मुलाचं बोलणं ऐकून वडिलांना भरून येतं, त्याला जवळ घेऊन सगळ्यांना म्हणतात, बघा बघा, माझं पोरगं कसं बोलतंय.. प्रसंग १९५२-५३सालच्या सुमाराचा. कुटुंब मुस्लिम.

'जित्याSSS, कुत्तरड्या, टिवल्या बावल्या करायला येतोस काय इथं? मी काय सक्काळी सक्काळी टाईमपास करायला बोलावलंय काय रे इथं तुला? बसायचं तर बस नाईतर ऊठ आणि ज्जा!' या तार स्वरातल्या, दात-ओठ खाऊन आणि डोळे फिरवत फेकलेल्या प्रसिद्ध वाक्याच्या आधी, मुलिंच्या रांगांच्या मागे मुलांच्या रांगेत बसलेल्या, खरोखरच शेजारच्याशी कुजबुजत, सदासर्वदा चुळबुळत असलेल्या जितेंद्र पुळेकरच्या अंगावर अचूकपणे भिरकावलेला खडू नेमकाच पोचलेला असतो. वेळ सकाळची, ७-९ मधली, साधारण १९८७ ते ८९ दरम्यानचं एखादं वर्ष.. दोन-तीन वर्षे हेच प्रसंग आणि हेच संवाद.. फक्त 'जित्या'च्या जागी 'चैत्री', 'संत्याSS लंब्या', 'राजा', 'मधे', 'पश्या', 'दिपडे-खापडे' यायचे, कुत्तरडी मात्र फक्त मुलंच, मुलींच्या नावांची नुसती चिरफाड... बाकी शेम टू शेम! इतकं होऊनही पुढच्या १५ मिनिटांनी पुळेकरची खुसपुस आणि चुळबुळ पुन्हा चालूच!

हसिनाच्या लग्नाचा स्वागतसमारंभ. वार सोमवार. रात्रीचे दहा-साडेदहा वाजून गेलेले. पै-पाहुणे, मित्रमंडळी, अगणित स्नेही, सगळे सामिष-निरामिषाचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्त होऊन परतीच्या वाटेवर. हसीनाचे पपा मात्र फक्त एका चहाच्या कपावर. सगळ्यांचे यथायोग्य आदरातिथ्य उरकून घरी परतल्यावर हसीनाच्या मम्मीनं बनवलेला वरण-भात खाऊन पपांनी उपास सोडला..

कोल्हापुरातली न्यु हायस्कुलची स्टाफरूम. दोन शिक्षक नित्याच्या काहीतरी कामात. शाळेतल्या एका विद्यार्थ्याला अचानक कसंतरी व्हायला लागलंय. शिपाई त्याला धरून स्टाफरूममधे आणतो आणि तिथल्या गादीवर बसवतो. मुलाला भयंकर मळमळ सुटलीये आणि कोणत्याही क्षणी उमळून येईल अशी अवस्था आहे. अशा वेळी त्या दोघांमधला एक शिक्षक चटकन उठून त्या विद्यार्थ्यापाशी जातो आणि उमाळा येता क्षणी त्याच्या तोंडाशी आपली ओंजळ धरतो. हात स्वच्छ धुऊन मुलाच्या पाठीवरून हात फिरवतो आणि त्याला पाणी प्यायला देतो. तिथे उपस्थित दुसरे शिक्षक म्हणतात, च्यायला, मदन्या, मी तर माझ्या पोटच्या पोराचीही उलटी धरली नसती रे!

इयत्ता पहिलीच्या निकालाचा दिवस. मिरजकर तिकटीची नुतन मराठी शाळा. छोटा मदन पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात निकाल सांगायला उड्या मारत घरी आला. काही वेळातच शाळेचा शिपाई घरी निरोप घेऊन आला, हेडसरांनी बोलावलंय. वडिल मदनसोबत शाळेत पोचले. हेडमास्तर म्हणाले, गुणांच्या बेरजेत काहितरी घोळ झालाय, तुमच्या मुलाचा दुसरा नंबर आहे, किंकरांच्या मुलाचा पहिला आहे. वडिलांनी हरकत न घेता शांतपणे मुसमुसणा-या मुलाला घरी नेलं. त्यांना वस्तुस्थितीची कल्पना असते. निकाल पाहून किंकर शाळेत येऊन शंख करून गेले होते.. एवढी ब्राह्मणांची पोरं सोडून एका मुस्लिम मुलाला पहिला क्रमांक देताच कसा तुम्ही, काही धर्माची चाड आहे की नाही तुम्हाला, वगैरे वगैरे बरंच काही.. त्यानंतर मदनला पहिला क्रमांक सोडाच, पण कधीच साधं पासही केलं गेलं नाही. इयत्ता सातवीपर्यंत मदन वरच्या वर्गात 'चढवला' गेला. वडिल व्यथित होत पण हातात फारसं काही नसे. एके दिवशी शाहू दयानंद शाळेतल्या मित्राला जरा माझ्या लेकाकडे बघ रे म्हणाल्यावर मित्राने सोड त्याला माझ्याकडे असं सांगितलं. शाहू दयानंद जयप्रभा स्टूडिओमागे भरायची. तिथे गेल्यावर मग मदनने ८वी ते १०वी पहिला क्रमांक सोडला नाही! वडिलांचे मित्र थक्क झाले, कालपर्यंत 'चढवला'गेलेल्या मुलाची ही हुशारी पाहून!

मात्र आजुबाजूला सगळीच किंकरांसारखी मंडळी होती असं नाही. शेजारच्या सडोलीकरकाकु संध्याकाळी त्यांच्या घरच्या मुलांसोबत मदनलाही शुभं करोती म्हणायला बसवायच्या. मदन तिकडून येऊन घरी नमाज पढायचा. अशी मजा असायची.

वरचा ८ वर्षांचा मुलगा, जीव खाऊन पोरांवर ओरडणारे मास्तर, आधी दाबला गेलेला आणि नंतर झळकलेला मदन, घरी येऊन उपास सोडणारे पपा आणि विद्यार्थ्यापुढे अकृत्रिमपणे ओंजळ धरणारा शिक्षक, ही सगळी ज्या एकाच माणसाची बहूरुपं आहेत, त्या अवलियाचं नाव मदन उर्फ मेहबूब बाबूराव संकेश्वरकर ! माझ्या बाबांचे मित्र आणि न्यु हायस्कुलमधले सहकारी, माझे आणि माझ्या धाकट्या बहिणीचे इंग्रजी-गणिताचे ट्युटर, कोल्हापुरच्या स.म. लोहिया आणि न्यु हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी-गणित-संगित तिन्ही विषयांवर प्रभुत्व असलेले लाडके प्रिय सर, हसिना आणि शकीलचे बाबा, एक अत्यंत उत्कृष्ट हार्मोनियमवादक आणि संगीताचे दर्दी...

गो-यात मोडणारा वर्ण, मध्यम उंची आणि बांधा, तोंडात पान, तोंडभर हसत स्वतःवरच खुश होत आनंदाने बोलण्याची लकब.. घरी असले तर चौकड्याची लूंगी आणि बाह्यांचा बनियन, शाळेत किंवा बाहेर हाफ शर्ट आणि गडद रंगाची पँट असा पेहराव. बोलणं मोठ्या आवाजात, दिलखुलास. अगदी मोकळंढाकळं. समोर लहान-मोठं कुणीही असो, सारख्याच आपुलकीने, हसतमुखाने, हक्काने.

या सगळ्याला शोभणारा अगदी उमदा स्वभाव. प्रेमळ आणि हळवाही. अनेकांकडून फसगत झालेला, होणारा आणि तरीही त्याची फिकीरही नसणारा. वेळ पडली तर अंगचे कपडेही देऊन टाकतील ही बाईंना पडणारी भ्रांत सहज खरी होईल असा. डोळ्यात तेल घालून व्यवहार आणि संसार समर्थपणे सांभाळणा-या बाई. शहनाझ संकेश्वरकर. मुलखाच्या देखण्या आणि सुगरण. सरांना शोभणा-या.

सर शंकराचे नि:स्सीम उपासक आणि गारगोटीजवळच्या बाळूमामांचे अनुयायी. जन्माने मुस्लिम असूनही सर्व धर्मांबद्दल मनात आत्यंतिक आदर असणारे आणि सर्व धर्मांपेक्षाही मानवधर्म हाच सर्वश्रेष्ठ ही ठाम विचारसरणी आपल्या बोलण्या-आचरणातून नैसर्गिकपणे आजीवन व्यक्त करणारे आमचे संकेश्वरकरसर....

आत्मा स्त्रीच्या पोटात ही ब्राह्मण, ती ख्रिस्त, ती मुस्लिम असं बघून शिरत नाही, मग जन्मानंतर त्या अर्भकाला ब्राह्मण, ख्रिस्त, मुस्लिम धर्म लावणारे तुम्ही कोण.. हा त्यांचा परखड सवाल. त्यांच्या वयाच्याच काय माझ्या वयाच्याही कोण्या व्यक्तीला मी अशा त-हेचं आयुष्य जगताना पाहिलेलं नाही..

त्यांच्या घरात गाण्याचं वातावरण होतं. सरांचा संगिताचा ओढा घरातूनच आलेला, पोसलाही गेलेला. हार्मोनियमवर त्यांची बोटं जादूसारखी फिरतात. एक काळ असा होता की कोल्हापुरातल्या त्यावेळच्या मोजक्या ३-४ कॉलेजेसची स्नेहसंमेलनं सरांवरती अवलंबून असत. तारखा सरांना विचारूनच ठरवल्या जात आणि सर ती सारी संमेलनं गाजवत. मुलांची स्केल्स बघून गाणी निवडून मुलांकडून बसवून घेत, त्यामुळे मुलं स्वतःही ती गाणी एन्जॉय करत आणि कार्यक्रम उठावदार होत. स. म. लोहिया आणि न्यु हायस्कुलला वर्षानुवर्षे सरांनी बसवलेलं 'जयोस्तुते श्री महन्मंगले' गायलं जात होतं, आज म्हणतात की नाही कल्पना नाही. मला मात्र आजही तो अख्ख्या शाळेचा कोरसचा सुरेल, धीरगंभीर आवाज आठवतो आणि अंगावर काटा येतो.

पदवीनंतर एक वर्षं वेंगुर्ल्याला नोकरी करून तिथल्या प्रशस्तीपत्राच्या बळावर सर ६६ साली स. म. लोहियाला शिक्षक म्हणुन रुजू झाले. नेमणूक पद्माराजेला झाली होती पण मुलिंच्या शाळेत हा १९-२० वर्षांचा पोरगेला शिक्षक कसा ठेवायचा म्हणुन ऐनवेळी स. म. ला रवानगी केली गेली. या सगळ्या गंमतीजमती सरांच्या तोंडून ऐकण्यात आणखी चम्मतग आहे. मजा म्हणजे वेंगुर्ल्याच्या शाळेत त्या वर्षीचं स्नेहसंमेलन बघायला अख्खं वेगुर्ले लोटलेलं.. तीच कथा इस्लामपूरची. केवळ एक वर्ष सर बदलीवर गेलेले, परत कोल्हापुरला परतायच्या वेळी निरोप समारंभात मुलं रडली. मुलांनी इतक्या भेटवस्तु दिल्या की त्या न्यायला खास गाडी करावी लागली.

सर घरी ट्युशन्स घेत. मलग हायस्कुलसमोरच्या गल्लीत रहायचे ते तेव्हा.. मी ७वी ते ९वी सरांकडे इंग्रजी गणितासाठी जात असे त्यांच्याकडे. नंतर काही वर्षांनी माझी बहिण दीप्तीही. सरांची मुलगी हसिना आणि मी बरोबरीच्या. माझ्या ब-याच मैत्रिणी आणि हसिनाही ट्युशनला असे. स्वतःच्या मुलीत आणि आमच्यात भेदभाव नसे. तिच्याही नावाने सर आरडाओरड करत. मुलं बहुतेक सगळी न्यु हायस्कुलचीच असत. शिकवणं सहज-सोपं आणि हसत खेळत चाले. मी इंग्रजीत चांगली होते, पण गणितात ढंच्या चँपिअन्सची ढ चँपिअन! बाकी सर्व विषयात चांगली असूनही गणितानं मला गटांगळी खायला लावली असती, केवळ त्यांनी शिकवलं म्हणुन दहावीच्या अडथळ्यातनं पार झाले!

शिकवताना ओरडले तरी मुलांना लागेल असा भाव नसे त्यात. एकदा दीप्ती ट्युशनला गेली नव्हती. त्यादिवशी 'because'चा वापर शिकवला त्यांनी. दुस-या दिवशी दीप्तीला आदल्या दिवशीचं काही माहिती नसल्यामुळे तिनं काहीतरी चुकीचं स्पेलिंग लिहिलं. ते बघितल्यावर म्हणाले, 'तुझ्या बानं केलेलं काय because चं असं स्पेलिंग?' ती म्हणाली, 'मी काल आले नव्हते सर.' त्यावर 'मी सांगितलेलं काय येऊ नकोस म्हणुन?'!! सगळा वर्ग हसून बेजार, जिला बोलतायत तिच्यासकट! आम्ही दोघी अजुनही खो खो हसतो यावर..

वर्गात फक्त अभ्यासाचे विषय नसत. कधीतरी एखाद्या सुंदरशा मराठी कवितेचं रसग्रहण होई तर एखाद्या दिवशी एखादं वाचलेलं सुरेख पुस्तक चर्चेला असे. मीरा नायरचा 'सलाम बॉम्बे' त्याच सुमारास कधीतरी प्रदर्शित झालेला. एका सकाळी आल्या आल्या संतोष देशपांडेनं बघून आलो म्हणुन सांगितलं आणि त्यादिवशी सर फक्त त्या चित्रपटाबद्दलच बोलत राहिले होते. दिग्दर्शिका, विषय, आम्ही तो कसा आणि का पहायला हवा, त्या निमित्ताने काही समांतर चित्रपटांबद्दलही.. मी तो चित्रपट अजूनही पाहिलेला नाही, पण माझ्या मनात सलाम बॉम्बे, सर आणि संतोष देशपांडे ही सांगड आजही घट्टपणे बसलेली आहे. बरोबरीने धर्म, सणवार, परंपरांचीही चर्चा चालेच. आम्ही ज्या वयात होतो त्या वयात असे संवेदनशील विषय आमच्याशी बोलणं सरांना तेव्हा महत्वाचं वाटत असावं, असं आज जेव्हा मी त्या दिवसांबद्दल विचार करते तेव्हा ठळकपणे जाणवतं.

सर फक्त बोलत नसत, जे बोलत ते स्वतः जगत होते. तेव्हाही आणि आजही. लिंगायत मित्राच्या घरी ८ दिवस गेल्यावर रोज सकाळ-संध्याकाळी अंगाला भस्म लावल्याशिवाय जेवायला बसले नाहीत. नुतन मराठीजवळच्या स्त्रिया गुरुजी उपलब्ध नसतील तर सत्यनारायणाच्या किंवा व्रतांच्या कहाण्या सरांकडून वाचून घेत. अलिकडेच एका गणपती मंडळांने सरांना सन्मानाने बोलावून गणपतीत सरांच्या हस्ते आरती करवून घेतली. देवावर असीम श्रद्धा. दर वेळेस मित्रमंडळींच्या अडचणीत शंकरापाशी किंवा बाळूमामांपाशी काही ना काही मागतील. सरांच्या सांगण्यानुसार मागितलेलं सगळं आजवर कायम पूर्ण झालेलं आहे, मग मनोभावे ते संकल्प पूर्णही करतात. आयुष्यभर सोमवारचे उपास करून अलिकडे मोठा यज्ञ करून यथासांग उद्यापन करून ते उपास सोडले. हे सगळं सुरू असताना मशिदीत जाणे, नमाज पढणे, रोजे करणेही सुरू असते. पण त्याचं अवडंबर नाही, कधी मुलांवरही कसली सक्ती केली नाही. गेली काही वर्षे ते कोल्हापुरातल्या २१ महादेवांना २१ दिवस जाण्याचं व्रत करतायत. सगळ्या मारुतीच्या मंदिरांमधे 'भीमरूपी महारुद्रा'च्या ठळक पाट्या लावणारेत, का तर ब-याचशा भाविकांना मारुतीस्तोत्र अख्खं तर येत नाही, पण देवळात आल्यावर म्हणायचं तर असतं, त्यांच्या सोयीसाठी. मी हातच जोडले, अर्थात आदराने.

आज बाई आणि सर कोल्हापुरात निवृत्तीचं जीवन समाधानाने जगत आहेत. मुलगा न्यु जर्सीत तर मुलगी दुबईत स्थिरस्थावर आहेत, वर्षातून एकदा मुलांकडे तर एरवी सहलींसाठी अशी सतत भ्रमंती सुरू असते. रोजची सकाळची अंबाबाईची फेरी चुकत नाही. सोडलेले संकल्प पुरे करणे, मित्रमंडळींच्या भेटी-गाठी, नित्याची कामे यात दिवस व्यस्त असतो. तब्येत सांभाळून आहेत. वृत्ती मुळात आनंदाची, शांतताप्रिय, सहकार्याची असल्यामुळे मित्रांचा गोतावळा मोठा आहे. त्यांच्यात मनापासून रमलेले असतात.

शिक्षक कसे आहेत हे त्यांच्या हाताखालून गेलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगलं आणखी कोण सांगणार? सरांनी आम्हाला समृद्ध केलं, सर्वार्थाने. इतर शिक्षकांपेक्षा त्यांचा पगडा आमच्यावर जास्त आहे असं आम्ही विद्यार्थी ठामपणे म्हणतो. आमचा अभ्यास तर त्यांनी घेतलाच, पण आम्हाला माणूसकी शिकवली, मानवधर्म ख-या अर्थाने प्रत्यक्ष दाखवला. मी आजवर कधीही सरांना दुर्मुखलेलं, निराश पाहिलं नाही. आयुष्यात अनेक अवघड प्रसंग आले, पण त्यांना तोंड देताना जगण्याचा आनंद झाकोळू दिला नाही त्यांनी, ना विद्यार्थ्यांवरचं प्रेम कमी होऊ दिलं. मी आठवतेय तसा त्यांचा माझ्या बाबांसोबतचा 'जोश्या-मदन्या' स्नेहदेखिल आजही जसाच्या तसा अबाधित आहे. तीच गत इतर मित्रांबद्दलही. त्यांच्या या स्वभावामुळे सगळ्या मित्रांनाही त्यांच्याबद्दल खुप आत्मियता आहे. तुमच्यावर निबंध लिहिणारे म्हणुन सांगितल्यावर माझ्याशी अतिशय उत्साहाने बोलले, मनमोकळ्या गप्पा मारल्या.

आमच्या ह्या प्रेमळ पीराला उदंड आणि निरामय आयुष्य लाभो, ही माझ्यासह त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांची त्यांच्या भोळ्या सांबाचरणी मनःपुर्वक प्रार्थना...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट, ग्रेट - असं जगावेगळं व्यक्तिमत्व आत्ता याकाळात आपल्यात वावरत आहे हेच केवळ आश्चर्य ...

सई - फार सुंदर लिहिलंस तू ... Happy
तू काय दिप्ती काय खरोखरच भाग्यवान आहात कि असे "गुरुवर्य" तुम्हाला लाभले ...

छान लिहिलंयस सई.

शिक्षक कसे आहेत हे त्यांच्या हाताखालून गेलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगलं आणखी कोण सांगणार? >>> अगदी खरं

ग्रेट, ग्रेट - असं जगावेगळं व्यक्तिमत्व आत्ता याकाळात आपल्यात वावरत आहे हेच केवळ आश्चर्य ... >>+1 Happy
आवडलं.

ग्रेट, ग्रेट - असं जगावेगळं व्यक्तिमत्व आत्ता याकाळात आपल्यात वावरत आहे हेच केवळ आश्चर्य ... >>+1

खुप छान लिहिलेय, अतिशय आवडलं. Happy

मस्तच.
खरंच असे लोक होते आणि आहेत असा विश्वास देणारं व्यक्तिचित्रं.
तसेच असे लोक अधिकाधिक निर्माण व्हावेत अशी आशा वाटायला लावणारे व्यक्तिचित्रं.

सई ,मस्त लिहिले आहेस.. खुप आवडलं..

ग्रेट, ग्रेट - असं जगावेगळं व्यक्तिमत्व आत्ता याकाळात आपल्यात वावरत आहे हेच केवळ आश्चर्य ...>>++११

सई....

तुला एक योगायोग सांगू ? इतके सुंदररित्या चितारलेले तुझे संकेश्वरकरसर आमच्या "गिरीराज अपार्टमेन्ट" मध्ये राहायला आले होते....रीटायरमेन्टनंतर...सोबत वहिनी. पहिल्या मजल्यावरील फ्लॅट त्याना मिळाला होता. ज्यानी भाड्याने दिला त्यानी आमच्या सेक्रेटरीला फोनवरून सांगितले...."माझ्या फ्लॅटमध्ये १ तारखेपासून मदन संकेश्वरकर राह्यला येतील..." विषय संपला.....ज्या दिवशी ते दोघे आले, त्याच्या दुसर्‍या संध्याकाळी माझ्या दारावर त्यानी टकटक केले....मी दार उघडले, "नमस्कार...मी संकेश्वरकर...तुम्ही अशोक पाटील ना ?" मी होय म्हटल्यावर ते म्हणाले "तुम्हाला भेटा असे जोशीनी सांगितले म्हणून आलोय..." त्याना आत बोलावून घेतले...विविध विषयावर एक तास गप्पा झाल्या....स.म., न्यू...पद्माराजे हे विषय निघाले...माझ्याविषयी बोलले....आई होती, आत जाऊन माझ्या आईना नमस्कारही त्यानी केला....मलाही असे पहिल्याच ओळखीत दिलखुलास बोलनारी व्यक्ती भेटल्यावर किती समाधान झाले असेल याची कल्पना तू करू शकतेस...... पण विशेष म्हणजे त्या पूर्ण तासात हा गृहस्थ मुस्लिम आहे याची पुसटशीदेखील कल्पना मला आली नाही.... ना त्यानी करून दिली....."मदन संकेश्वरकर" हे नावच असे आहे की बाकी काही विचारायची गरज भासलीच नाही. त्यांनी इथला फ्लॅट अशा काळासाठी घेतला होता की रंकाळ्यासमोरील सोसायटीच त्यांनी बुक केलेल्या फ्लॅटचे बांधकाम सुरू झाले होते. पुढे हसिना आणि जावई दुबईहून इथे आले....त्यांचीही सरांनी आमच्याशी ओळख करून दिली....हसिना तर सौंदर्याची खाणच जणू....मुलगा मात्र कधी आला नाही.

माझी आई देवाघरी गेल्यावर त्यानंतर हिंदूधर्माप्रमाणे जी काही कृत्ये करावी लागतात ती करण्यासाठीही सर आणि वहिनी अग्रेसर होते. वहिनीनी माझ्या घरी सलत तीन दिवस जेवण करून दिले तेही मी कधी विसरू शकत नाही. अखेर सरांनी इथून जाण्याचा दिवस आला...जो येणे अपरिहार्य होतेच. रंकाळ्यासमोरची देखणी इमारत त्याना आता बोलावत होती....मला अगत्यपूर्वक त्यानी निमंत्रणपत्रिका दिली....घरी येण्याचा आग्रहही केला.

भाषा, आचारविचार, सर्वांशी मिळूनमिसळून वागण्याची त्यांची पद्धत....याहीपेक्षा सतत हसरा चेहरा ही त्यांची मिळकत किती मोलाची होती हे ते बिल्डिंग सोडून गेल्यावर मला प्रकर्षाने जाणवले.

अशा व्यक्तीचा सहवास शिक्षक या नात्याने तुला दिप्तीला लाभला ही गोष्ट तुमच्यासाठी किती महत्त्वाची आणि आपुलकीची ठरली आहे हे तुझ्या चित्रमय शब्दातून जाणवत राहिले.

सर्वांचे मनापासून आभार.
दिनेश, कोल्हापुरला गेल्यावर जरूर जा सरांना भेटायला.
साती, तुझे विशेष आभार.
सर्वांचे अभिप्राय सरांना आवर्जून पोहोचते करणार आहे.

मामा, खरोखरीच अपूर्व योगायोग _/\_ Happy आणि हसिना खरंच शब्दशः हसिना!

सई छान लिहिलस. विद्यार्थ्यंच्या मनात स्थान मिळणे हा शिक्षकासाठी सर्वात मोठ्ठा सन्मान असतो.

संकेश्वरकर सरांना सलाम आणि _____/\_____.

लकी आहात सई आणि दक्षि तुम्ही दोघी, अशा ऋषीतुल्य माणसाच्या तुम्ही विद्यार्थिनी.

सई इतक्या ग्रेट माणसाची ओळख पण तू ग्रेट करून दिलीस, hats off तुला. लेखाचे शीर्षकपण सुंदर.

सई छान लिहिलस. विद्यार्थ्यांच्या मनात स्थान मिळणे हा शिक्षकासाठी सर्वात मोठ्ठा सन्मान असतो.असे शिक्षक मिळाले तुम्ही बहिणी नशिबवान आहात.

Pages