नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी

Submitted by प्रसाद शिर on 18 February, 2008 - 12:50

नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी
जो तुम्हाला भेटला तो देव म्हटला शेटजी!

एक वाटी शेंदराची सांडली रस्त्यावरी
अन तिथे तुमच्यामुळे बाजार भरला शेटजी...

का जुन्या मालाप्रमाणे वापरोनी फेकता?
एवढा का माणसांचा भाव पडला शेटजी?

का उभारू पाहता हे कारखाने, मॉलही?
वेष्टने कोरी जरी ही, माल सडला शेटजी...

पाहुनी उसन्या सुखांच्या जाहिराती रोजच्या
नेत्र थकले, कान किटले, जीव विटला शेटजी

भाविकांच्या रोख रांगा अन लिलावी दर्शने
मंदिरी येऊन तुमच्या देव फसला शेटजी

भाकऱ्या लाखो कशाला, चार नोटा वाटल्या
तृप्त झाले सर्व नेते, संप मिटला शेटजी!

मुक्त आहे या जगी सर्वत्र पाणी अन हवा
त्यातही करता कशाला रोज गफला शेटजी!

चार आणे? आठ आणे? वाढवा बोली जरा...
एवढ्या स्वस्तात कोणी जीव विकला शेटजी?

- प्रसाद
www.sadha-sopa.com

गुलमोहर: 

>भाविकांच्या रोख रांगा अन लिलावी दर्शने
मंदिरी येऊन तुमच्या देव फसला शेटजी
वाह रे! क्या बात है!

प्रसाद वेगळी गजल..

भाविकांच्या रोख रांगा अन लिलावी दर्शने
मंदिरी येऊन तुमच्या देव फसला शेटजी

मुक्त आहे या जगी सर्वत्र पाणी अन हवा
त्यातही करता कशाला रोज गफला शेटजी!

आवडले

शेटजी च्या ऐवजी शेठजी जास्त वजनदार वाटतो का? हे आपले माझे वैयक्तिक मत.. तुझे जाणून घ्यायला आवडेल...

visit http://milindchhatre.blogspot.com

मस्त गजल प्रसाद.. वास्तवाला धरून आहे.. वाचता वाचताच सध्याचा जगातला खोटारडेपणा, सगळं 'विकत' घेण्याची वृत्ति आणि एकूणातच सगळ्याबद्दलची विफलता जाणवायला लागते.. जमलीये! Happy

हुं.... शेठजी जास्त वजनदार वाटत आहे खरं!

१०० मारुन १ मोजावं तशी आग दिसते एकेक शेरामधे, खरच शाब्दिक फटके कशाला म्हणतात ते जाणवतय या गझलेमधे.

शेवटचा शेर जास्ती आवडला.

प्रसाद

अगदी मनातलंच बोललास ....

कोणता एक कसा सांगणार?

एकुण एक शेर खासच.

सुधीर

शाब्बास..:)
मस्त आहेत एक एक शेर..:)

मुक्त आहे या जगी सर्वत्र पाणी अन हवा
त्यातही करता कशाला रोज गफला शेटजी!
>>>>>>>
मस्त... सर्वच आवडले पण हा वरचा शेर जास्त आवडला/

एकूण एक शेर भिडले..

मागच्या गझलेपेक्षा अधिक आवडलई! Happy

शेटजी मंडळी वर अगदी परफेक्ट......
अगदी मनापासुन दाद...

प्रसाद,
अतिशय सुरेख गझल अगदी काळजाला भिडणारी.
अन्जलि

नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी
जो तुम्हाला भेटला तो देव म्हटला शेटजी!

छानच...

भाकऱ्या लाखो कशाला, चार नोटा वाटल्या
तृप्त झाले सर्व नेते, संप मिटला शेटजी!

जबरदस्त शेर...

चार आणे? आठ आणे? वाढवा बोली जरा...
एवढ्या स्वस्तात कोणी जीव विकला शेटजी?

क्या बात है...!

तुमचं निरिक्षण आणि भाषेवरची पकड स्तुत्यच आहे.

भाकऱ्या लाखो कशाला, चार नोटा वाटल्या
तृप्त झाले सर्व नेते, संप मिटला शेटजी!

चार आणे? आठ आणे? वाढवा बोली जरा...
एवढ्या स्वस्तात कोणी जीव विकला शेटजी?

क्लास. फार दिवसांनी एक अप्रतीम रचना वाचली.

प्रसाद...
एकेक शेर सुंदर...कोणापेक्षा कोणता शेर अप्रतिम हे सांगणेच कठिण...सुंदर गज़ल वाचण्याचा आनंद मिळाला खूप दिवसांत.

दीपिका जोशी 'संध्या'

एकेक शेर जबरदस्त प्रसाद!
मॉलचा शेर तर अगदी अगदी अप्रतिम!!

एकदम झकास गझल प्रसाद! सुरेश भटांची परंपरा चालवणारी!!!