विषय क्रमांक २: ढवळ्याची गोष्ट

Submitted by Barcelona on 24 June, 2014 - 13:56

ढवळ्याची गोष्ट

दुनियेत कशी कशी माणसे असतात. त्याबद्दल माझं देवाशी काही भांडण नाही. पण ही माणस आपल्यालाच बरी येऊन भेटतात. का रे देवा? त्यातून मी कॉलम जर्नलिस्ट, साहित्यिक वगैरे तर सोडाच, साधी Blogger ही नाही. त्यामुळे ह्या अतरंगी लोकांबद्दल स्फुट, अनुभवविश्व समृद्ध करणारे लेख असल काही काही मी लिहलेले नसत. सबब अशी माणसे माझ्या आयुष्यात आली की मला काय कराव उमजत नाही. मी ठार गोंधळलेली असते. बर, अशा लोकांना वेळीच जरा दूरच ठेवावं नाहीतर “ढवळ्या शेजारी बांधला पवळा” घडत असले आडाखेही मला बांधता येत नाहीत. प्रत्येकाच्या नशिबात एक फायनाइट नंबर ऑफ ढवळे असतात. हे कधी भेटतील ह्यावर आपला फारसा कंट्रोल नसतो. आणि मी अमेरिकेत Grad School ला Admission घेतली तेव्हा मला हे माहित नव्हते.

पी.एचडी. प्रोग्रॅमस बैल बाजार असतात अस नाही पण तिथे अनेक ‘ढवळे’ भेटतात. पी.एचडी. साठी येणारे विद्यार्थी ज्ञानासाठी भुकेले असतात पण ह्यात ह्या मंडळीचा ‘ढवळेपणा’ फारसा दिसून येत नाही, त्यांच्यातला खरा शास्त्रज्ञ लंच अवरची भूक भागवताना उफाळून आलेला असतो. मुळात समाजाला मान्य असा दुपारी १२ ते १ लंच अवर ह्यांनी मोडीत काढलेला असतो. व्यक्तीविशेष वेळा तर असतात पण त्यावर सुपरइम्पोज्ड त्याचे पी.एचडी तील वयानुसार ठरलेल्या वेळा असतात. नवे कोरे पी.एचडी.विद्यार्थी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षक सहाय्यक म्हणून काम करतात. एका तासानंतर दुसरा तास आणि दुसऱ्या तासानंतर “आता कुठला तास?” ह्या गोंधळात त्यांचा ब्रेकफास्ट नाहीतर लंच हुकलेला असतो. जरा जुने “कॅन्डीड्सी” असणारे विद्यार्थी ऑफिसला येतातच बारा वाजता. दुपारी ३-४ वाजता प्रोफेसर घरी गेला कि ह्यांचा लंच अवर घडतो. एक तिसरा गट असतो पर्म- पोस्ट डॉक किंवा पर्म grad लोकांचा. ७ वर्षापेक्षा जास्त काळ lab मध्ये नांदले अशी मंडळी. दिवाभीताप्रमाणे ह्यांचे दिवस-रात्र उलटे असतात. (फक्त मिटींगच्या वेळी ही मंडळी दिसतात आणि तरी प्रोफेसरचे पान ह्यांच्यावाचून हलत नाही, हे मला न उलगडलेलं कोड आहे.) त्यामुळे दुनियेचा ब्रेकफास्ट हा ह्यांचा डिनर असतो. lab मध्ये प्रत्येकाचे लंच पहिली सेमिस्टर संपायचा आत एका विशिष्ट चाकोरीत अडकून जायचं. जेन नेहमी लंचला ४ केळी खायची. तिला वेळ झाला तर कधी केळ्याऐवजी चेरी-बेरिज अशी १६ औंस. फळ असायची. टिमला स्वतः ची फेलोशिप होती, तो रोज थाई नाहीतर इटालियन ‘टेक आउट’ घेऊन यायचा. सुजित्रा थाई मुलगी पण ‘बिग एम’ ची दिवानी. केव्हीन कायम एकच लंच स्वतः बनवायचा - मायक्रोवेव्ह मध्ये सूप. हे ढवळे तसे सगळे नॉर्मल - बेल कर्व्ह खाली मावणारे. सगळ्यात अतरंगी होती ती केट!

केटची आणि माझी ओळख पहिल्या lab मिटींग मध्ये झाली. किंबहुना मुद्दामून करून देण्यात आली कारण अख्ख्या lab मध्ये आम्ही दोघीच व्हेजिटेरियन होतो. केटचे खरे नाव यू जिन चांग (xiang) - मँडरिन मध्ये ह्याचा अर्थ बहुतेक ‘ट्युलिप’ असा आहे. लहान चणीची, नेहमी जीन्स आणि Gap स्वेटशर्ट घातलेली केट दिसायची पण ट्युलिपच्या फुलासारखी गुलाबी. पण “स्टारबक्स नेम” म्हणून तिने केट हे नाव ४ वर्षापूर्वी घेतले होते. केट मुळात इलेक्ट्रोनिक्स इंजिनियर. शांघायमध्ये लहानाची मोठी झाली आणि तिथेच कॉलेजला गेली. मग रोबोटिक्स मध्ये जायचं म्हणून ती अमेरिकेला आली. तिने न्यूरोसायन्स इलेक्टिव्ह घेतलं आणि मग न्यूरोसायन्स मध्येच रमली. व्हायलीन वाजवताना नवशिके विरुद्ध तज्ञ यांचा हात कसा हलतो असला काहीसा विचित्र विषय घेऊन ती रिसर्च करीत होती. पण तिला Grammy संस्थेने फेलोशिप दिली होती त्यामुळे ती प्रोफेसरची लाडकी होती. केट पदव्युत्तर वर्गांसाठी शिक्षक सहाय्यक होती. ती कॅन्डीड्सी करीत होती त्यामुळे तिचा आणि माझा दिवस ४-५ तासांनी ऑफसेट झालेला असायचा. केटच्या बाबतीत चीनी आणि व्हेजिटेरियन हे समीकरण माझ्या डोक्यात घोळ घालत होत. आमची जराशी ओळख झाल्यावर शेवटी मी तिला सरळ (पण जरा नजाकतीने ) विचारलच “मी ऐकलंय कि चीनी लोक मांसाहाराच्या बाबतीत अगदी ‘open to experiences’ असतात. तू कशी काय व्हेजिटेरियन झालीस?” त्यावर मिष्किलपणे हसत ती म्हणाली “मेघा, मला दोन मुले हवी आहेत. त्यामुळे मी इथेच राहणार आहे. मग इथे जे जे काही “कूल” असत ना ते ते सगळ मी करते. दिवसातून दोन तास टीव्ही बघते - accent बदलायला. टेनिस खेळते. आणि Halloween ला ड्रेस-अप पण करते. त्या भरात मी व्हेजिटेरियन झाले आणि आता मला ते आवडतंय ” भावंडांच्या गलक्यात वाढलेली मी, हे त्रांगड लॉजिक काही झेपेना. मी नुसतीच “कूल!” म्हणून मान डोलावली.

केटचा लंचअवर आणि माझी घरी जायची वेळ साधारण एक असायची त्यामुळे ती काय खाते हे मला सेमिस्टर संपेपर्यंत कळले नव्हते. सेमिस्टर संपायच्या शेवटी मी ग्रेडिंग साठी उशिरापर्यंत थांबले. तेव्हा मला कळले केट लंच बनवायला labचा कॉफीमेकर वापरते. तिने फ्रीजमधून ब्रोकोली काढली आणि सामान्य माणसे जिथे कॉफी ठेवतात त्या फिल्टर मध्ये ठेवली मग पाणी भरून जणू कॉफीच करतोय अस केल. मग तिच्या ड्रावर मधून ‘कुसकुस’ काढला. ब्रोकोली फिल्टर मध्येच ठेवून खाली पॉट मध्ये कुसकुस टाकला, पुन्हा पाणी भरायच्या कंटेनर मध्ये पाणी भरून कॉफीमेकर चालू केला. ५ मिनिटात तिचे गरम गरम जेवण - उकडलेली ब्रोकोली आणि कुसकुस तयार होते. तिखटजाळ "श्रीराचा" शिंपडला कि All izz well! तिने स्वच्छ धुतला तरी मला मात्र हिने कॉफीमेकर खरकटा केला हे चार वेळा मनात आलं. पुढच्या ८-१० दिवसात हि मुलगी काय काय त्या कॉफीमेकर मध्ये बनवते ते माझ्या लक्षात आलं. सूप, नूडल्स, वेज मीट बॉल. एकही दिवस तिने रेसिपी रिपीट मारली नाही. ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी मला ‘ए प्लस’ मिळाली म्हणून तिने डेझर्ट बनवले - बेरीज विथ चॉकलेट. चक्क कॉफीमेकरमध्ये क्रिम आणि कोको वड्या घालून चॉकोलेट sauce केला. केटच्या प्रेमाची मी ॠणाईत होते पण तरी खरकटी कॉफी मला चालणार नव्हती. मी गुपचूप पुढच्या सेमिस्टरला नेस्कोफीची सिंगल कप पाकीट आणि थर्मास अस माझ्या डेस्क वर ठेवायला लागले. अधून मधून केट कॉफीमेकर मध्ये काहीतरी खायला करायची. मग ते जेवण आणि माझी नेसकॉफी असं आम्ही शेयर करायचो. Coffemaker.jpg

एक दिवस टेनिसनंतर केटच्या घरी जाण्याचा योग आला. केट ऑफिसात डेस्क पसरून ठेवत असे पण घर मात्र तिचं अगदी टापटीप होते. एका अमेरिकन कुटुंबाच्या घराच्या मागील बाजूला हिच्या छोट्या दोन खोल्या होत्या. आल्या आल्या हात धुतल्यासारखे करून तिने फटकन एक वाईन कूलर काढले. मला पण देऊ केले. मी नको म्हणाले तर पटकन म्हणाली “अग, हे व्हेजिटेरियन आहे. आणि ह्यात अल्कोहोल म्हणशील तर ४% आहे.” मी हसून तिला चहा मागितला. ग्रीन टीबरोबर आमच्या गप्पा रंगल्या. केटला माझ्याबरोबर एक भारतीय सिनेमा बघायचा होता. तिने "एका माणसाला दोन मुली असतात” तो भारतीय सिनेमा बघितला होता. मी म्हणाले “केट, बऱ्याच भारतीय सिनेमात एका माणसाला दोन मुली असतात.” त्यावर केट पुढे म्हणाली “अग मोठीला नाच आणि प्रवासाची आवड असते तर धाकटी अभ्यासू असते.… “ असं सीन बाय सीन “दिलवाले दुल्हनिया”चे वर्णन मला ऐकवेना. सिमरन-राजची ती गोष्ट पण जिला सिमरन-छुटकी ह्या बहिणीच्या नात्याचं अप्रूप तिच्यापुढे शाहरुखची रोमान्सगीता काय वाचणार. वर्ल्ड सिनेमा बघणाऱ्या केटला चीनी सिनेमाची माझ्याइतकीच माहिती होती. त्यामुळे त्याबाबतीत माझ्या ज्ञानात काही भर पडली नाही. पण केट बरोबर असली की नेहमी काहीतरी नवीन कळायचं. केटच्या डायनिंग टेबलाला इस्त्री उलटी (सपाट बाजू वर) करून लावली होती. मी न राहवून तिला विचारलं “अग, हे असं काय? हे धोकादायक नाही?” केट हसून म्हणाली “नाही, आता प्लग केलेली नाहीये. पण हा माझा फूड वार्मर आहे समज. जिम (तिचा बॉयफ्रेंड) आला की गप्पांच्या नादात नेहमी आमचं सूप आणि चहा गार होतो. मला उठायचा कंटाळा येतो. शेवटी आम्ही इथे इस्त्री लावली.” केटमध्ये एक इंजिनियर, एक बाई आणि एक अतरंगी विद्यार्थी गुण्यागोविंदाने राहताना दिसले आणि मी हसून तिला दाद दिली.

केट ग्रॅज्युएट होवून न्यूयॉर्कला गेली. मोठ्या विद्यापीठाच्या मेडिकल सेंटर मध्ये तिला पोस्टडॉक मिळाले होते. केट माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठ्ठा ढवळ्या होती. ती गेली तरी अधून मधून अजूनही मी कॉफीमेकर मध्ये ‘कुसकुस’ करते.मग एक दोन वर्षात कळाले तिने एका डॉक्टरशी लग्न केलं. मी सुद्धा पुढे पोस्टडॉक - प्रोफेसर अशा मार्गाला लागले. जेन, टीम बरोबर माझा संपर्क होता पण केटच पुढे काय झालं हे कुणालाच कळल नाही. कदाचित इथेच असेल, कदाचित चीनला गेली असेल. कदाचित सी-फूड खायला लागली असेल, कदाचित दोन मुले असतील कदाचित एखादी इंजिनियरिंगची नोकरी करीत असेल. एक दिवस अशीच उगाच नोस्ताल्जिक मूडमध्ये मी तिचे रिसर्च पेपर ऑन लाईन शोधू लागले. आणि मला केट एका युनिव्हर्सिटीत प्रोफेसर झाली हे लक्षात आलं. तिची वेबसाईट बघितली तर तोच हसरा गुलाबी चेहरा, आखूड हेयरकट, लहान इयररिंग आणि गंमत म्हणजे तिच्या टेबलवर पुस्तके, डेस्कटॉपच्या पसाऱ्यात नेसकॉफी सिंगलची पाकीट! कबीराला जसा “मुझसे बुरा न कोय” साक्षात्कार झाला होता तसं काहीतरी लख्खंपणे माझ्या डोक्यात चमकल. शाबास! मी पण कुणाचीतरी ढवळ्या झाले होते!! न राहवून मी तिला ईमेल केली -तिचे कॉफीमेकर लंचेस मी कसे मिस करतीये म्हणून. लगेच तिचं उत्तर आलं - “डियर मेघा, तुमच्या सगळ्यांपेक्षा उशीरा ५ वर्षापूर्वी मी इथे रिसर्च प्रोग्रॅम सुरु केलाय. त्याआधी दोन मुले झाली. लिंकमध्ये त्यांचे आणि कुत्र्याचे फोटो आहेत. आता रिसर्च प्रोग्रॅम स्थिरावतोय. माझा पहिला student आता ग्राज्युएट होतोय. त्याला तुझ्याकडे अप्लाय करायला सांगीन. बीकर-फ्लास्क धुण्यासाठी lab मध्ये डिशवाशर घेतला होता. हा मुलगा त्यात साल्मन शिजवतो.” च्यामा$**, काही ढवळे सुपर-ढवळे असतात!

*********************
तळटीप : १) श्रीराचा हा एक प्रकारचा तिखट sauce आहे.
२) “बुरा जो देखन मैं चला, बुरा मिला न कोयI
जो मन खोजा अपना तो, मुझसे बुरा न कोयII”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'लेखनस्पर्धा २०१४' मध्ये आपला लेख पाठविल्याबद्दल धन्यवाद.
स्पर्धेच्या नियमांनुसार तुम्ही लेखांमध्ये केवळ शुद्धलेखनाचे बदल करू शकता आणि तसे बदल करताना संयोजकांना सांगणे आवश्यक आहे. तरी लेखात केलेले बदल कृपया कळवाल का?

भारी Happy

मस्तं!
एखादा आपला 'ढवळ्या' असणे किंवा आपण एखाद्याचा 'ढवळ्या ' होणे ही एकदम पेटंट घेण्यासारखी गोष्टं आहे.
वाचायला मजा आली.

टिपांमध्ये स्टारबक नेम म्हणजे काय ते पण टाका.
मला हल्लीच टिपापात हा शब्दं कळला , नाहीतर कळला नसता.

संयोजक,

१) “तिने एका माणसाला दोन मुली असतात” तो भारतीय सिनेमा - ऐवजी
तिने "एका माणसाला दोन मुली असतात” तो भारतीय सिनेमा
(चूक न दाखवता केवळ आनंद लुटला आणि उल्लेख केल्याबद्दल सावली यांना धन्यवाद Happy )
२) नाव बोल्ड केले.

३) कॉफीमेकरचे चित्र टाकता येत नाहीये. 'इन्ना' ह्यांना विचारपूस केली आहे.

मस्त लिहिलंय... खुसखुशीत.
शीर्षक वाचून मला आधी 'मिस्टर ढवळे' यांचं व्यक्तिचित्रण आहे की काय असे वाटले होते Wink

स्टारबक नेमचा खुलासा सिमन्तिनी करेलच. पण माझ्या तुटपुंज्या कारकिर्दीत जाणवलेलं म्हणजे चीनी नावं खूप गोड पण उच्चारायला अशक्य वाटणारे असतात, असं म्हणून की काय पण प्रत्येक चीनी टेस्ट कंन्सल्टंटला एक कॉमन अमेरिकन वाटणारं नाव असायचं. ईमेल किंवा ग्रूप डिस्कशन्स, कॉल्समध्ये ही नावं माझ्यासाठी तरी वरदान साबित झालेली. नायतर ती नावं व्यवस्थित उच्चारता उच्चारता दिवस जायचा Happy

पण प्रत्येक चीनी टेस्ट कंन्सल्टंटला एक कॉमन अमेरिकन वाटणारं नाव असायचं.>> +१

स्टारबकस ह्या कॉफीच्या दुकानात नेहमी नाव विचारतात, ते कागदी कपावर लिहतात आणि अगदी साध्या सोप्या अमेरिकन नावाचेसुद्धा स्पेलिंग चुकवतात. कॉमन अमेरिकन वाटणारं नाव आणि त्याच स्पेलिंग सोपे असणार ते "स्टारबक नेम". गुगलवर/तुनळीवर अनेक लोकांनी त्यांच्या नावाची कशी वाट लावली त्याचे इमेजेस दिलेल्या आहेत. कधी वेळ मिळाला तर मजा म्हणून जरूर बघा.

छान लिहिलंय! आता मी पवळयाच्या भूमिकेतून ढवळ्याच्या भूमिकेत शिरले आहे! त्यामुळे दोन्हीशी रिलेट करू शकले! graduate school ही एक वेगळीच दुनिया आहे! ती मध्यंतरी फेसबुक वर What others (friends, parents, boss) think I do and what I actually do अशी सिरीज viral होती त्यात फिट बसणारी!

Pages