गझलेची जमीन (लेख)

Submitted by बेफ़िकीर on 17 June, 2014 - 00:11

मायबोलीवर गेल्या काही दिवसांत मराठी गझलकारांनी रचलेल्या गझलांच्या जमीनींवर इतरांनी गझला रचणे, त्यावर शाब्दिक टीका, थट्टा किंवा विडंबनकाव्य होणे व गझलशी विशेष नाते न ठेवणार्‍यांनीही हिरीरीने चर्चेत सहभागी होणे असे काही प्रकार घडले. हे सगळे एक प्रकारे जिवंतपणाचेच लक्षण आहे. ह्या लेखात आपण काही गंमतीशीर उदाहरणांसकट हे विचारात घेऊयात की गझलेची जमीन गझलकाराला महत्वाची का वाटते आणि असे काही झाल्यास त्याचे परिणाम काय होऊ शकतात.

आधी एक मजेशीर उदाहरण घेऊ:

हुस्ने-मह-गरचेब हंगामे कमाल अच्छा है
उससे मेरा महे-खुर्शीदो जमाल अच्छा है

उनको देखेसे जो आजाती है मुंहपे रौनक
वो समझते है के बीमारका हाल अच्छा है

बेतलब दे तो मजा और सिवा मिलता है
वो गदा जिसका न हो खूं-ए-सवाल अच्छा है

खिज्र सुलतान को रख्खे खल्के=अकबर सर सब्झ
शाहकी बागमे ये ताजा निहाल अच्छा है

- गालिब (१७९६ ते १८६९)

(तिथीनुसार बदलणार्‍या चंद्राच्या हंगामी सौंदर्याचे महत्व आहे हे ठीक आहे, पण त्यापेक्षा माझ्या प्रेयसीचा चंद्र आणि सूर्यासारखा - सतत उजळलेला- रंग अधिक चांगला आहे)

(मी आजारी आहे म्हणून ती भेटायला आली तर ती आलेली पाहून माझा चेहरा उजळतो आणि तिला वाटू लागते की हा तर बरा झालेला आहे, आजारी नाही आहे)

(न मागताच काही मिळाले तर त्याची लज्जत काही औरच असते. ज्या भिकार्‍याला काहीही मागायची सवय नाही तो चांगला!)

(बहादूरशहा जफरचा नवजात पूत्र खिज्र सुलतान ह्याला अल्लाह नेहमी भरभराटीस आणो, बादशहाच्या बागेतील हे ताजे रोपटे छान आहे)

आता ह्याच जमीनीतले दुसर्‍या एका उस्ताद कवीचे शेर पाहू:

नंग-हिम्मत है अगर दौलते कौनेन मिले
जो न पूरा हो किसीसे वो सवाल अच्छा है

बागे-आलममे कोई खाक फलेफुलेगा
बर्क गिरती है उसीपर जो निहाल अच्छा है

आप पछताये नही, जोरसे तौबा न करे
आप घबराये नही 'दाग' का हाल अच्छा है

- उस्ताद दाग देहलवी (१८३१ ते १९०५)

(जगातील सगळी दौलत मिळणे लांच्छनास्पद आहे, कोनीच पूर्ण करू शकत नाही अशी एक इच्छा असणे चांगले असते)

(ह्या बागेत थोडीच फळेफुले उगवणार? येथे तर नेमक्या त्याच रोपावर - झाडावर - वीज पडते जे चांगले आहे)

(तुम्ही पस्तावू नका, केल्या चुकांसाठी तौबा करू नका, तुम्ही घाबरू नका, दागची तब्येत बरी आहे)

आता मजा बघा! गालिब ची शेवटची अडतीस आणि दागची पहिली अडतीस वर्षे एकाच कालावधीत व साधारण एकाच भूप्रदेशात! दोघांची ख्याती एकमेकांपर्यंत नुसती पोचलेली नाही तर दोघांनी अनेक मुशायरे सोबतच गाजवलेले! त्यामुळे एका ठिकाणी असा संदर्भही आहे की वरील दोन्ही गझलांची जमीन तरही गझलचा मिसरा (एक ओळ) म्हणून दिली गेली होती आणि त्यावर दोघांनी वरीलप्रमाणे आपापल्या गझला रचल्या. (पण मग इतर कोणत्या समकालीन शायराची ह्या जमीनीतील गझल का आढळत नाही ते समजले नाही).

पण आज? आज जर एखाद्या वाचकाने योगायोगाने दोन्ही गझला वाचल्या तर त्यातून काय काय विचार मनात येण्याच्या शक्यता आहेत?

१. दोघांपैकी एकाने दुसर्‍याची कल्पना उचललेली आहे
२. एकापेक्षा दुसरा अधिक चांगले लिहितो पण तो मूळ लिहितो की कॉपी करतो ते माहीत नाही
३. पूर्वी गझलकारांमध्ये इतकी तीव्र स्पर्धा असायची एकसारखेच लिहून दोघे रसिकांना जिंकायला बघायचे
४. दोघांनीही कोणा तिसर्‍याच्याच गझलेवरून आपापल्या गझला रचलेल्या आहेत.

असे काय काय व इतरही काही! अर्थातच, दोन्ही गझलांपैकी गालिबची गझल (मत्ला व मक्ता धरून एकुण १० शेर) ही दागच्या गझलेपेक्षा (मत्ला व मक्ता धरून एकुण ९ शेर) खूपच उजवी आहे.

आता गझलेची जमीन म्हणजे काय ते पाहू:

गझलच्या सर्व ओळी एकाच वृत्तात असतात. दोन सुपरिचित ओळी उदाहरणार्थ घेऊ:

तुम इतना जो मुस्कुरारहे हो (लगा लगागा लगा लगागा)
क्या गम है जिसको छुपारहे हो (लगा लगागा लगा लगागा)
क्या हाल है क्या दिखारहे हो (लगा लगागा लगा लगागा)

ह्या ओळी पाहिल्या तर शेवटचे अक्षर 'हो' हे कॉमन अक्षर आहे हे तर लक्षात येईलच पण ते मुस्कुरारहे, छुपारहे, दिखारहे ह्या शब्दांचा भाग नसून वेगळे अक्षर आहे हेही समजेल. ती रदीफ आहे. त्याचप्रमाणे मुस्कुरारहे, छुपारहे, दिखारहे हे काफिये आहेत. (गझलेत दोन यमके असू शकतात, काफिया हे पहिले यमक व रदीफ हे अंत्ययमक किंवा दुसरे यमक)! त्याचप्रमाणे मुस्कुरा, छुपा, दिखा ह्या शब्दांंमधील शेवटचा 'आ' हा स्वर ही त्या गझलेची अलामत आहे. (अलामत = स्वरचिन्ह)!

तर जमीन म्हणजे:

वृत्त (लगा लगागा लगा लगागा)) + काफिया (मुस्कुरारहे, छुपारहे, दिखारहे) + (अलामत = आ) + रदीफ (हो)

ह्या सर्वांचे काँबिनेशन!

हे असेच्या असे काँबिनेशन जो कोण वापरेल तो नेमकी वरच्या गझलेसारखीच गझल रचेल. त्याची गझलही त्याच चालीत, त्याच लयीत, त्याच ठेक्यात म्हणता येईल.

आता गंमत अशी आहे की कोणाला काय सुचेल ह्यावर कोणी नियंत्रण ठेवूच शकत नाही. अजिबात मनात नसतानाही एखाद्याला दुसर्‍याची जमीन अगदी जशीच्यातशी सुचू शकते व ती त्याला नैसर्गीकपणे सुचली आहे ह्या त्याच्या दाव्याचा प्रतिवादही करता येणे शक्य नसते.

आपल्याला सुचलेल्या जमीनीचे आपण पेटंट घेऊ शकत नाही की ती कोठे रजिस्टर करू शकत नाही. तिला प्रताधिकार कायदा लागू होऊ शकत नाही. दुसर्‍याला तीच जमीन सुचणे नैसर्गीक होते की अनुकरण हे सिद्ध करू शकत नाही. त्यात पुन्हा इंटरनेट आणि फेसबूकच्या युगात तर आपण लिहिलेली कोणती गझल कोठे, कोणाच्या नावाने आणि कोणत्या स्वरुपात पोचेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे अलाहाबादला राहणार्‍या एखाद्या मराठी माणसाने त्याच जमीनीत दुसरी गझल रचली तर कोणी आता हेही म्हणू शकत नाही की एक कवी पुण्यात आणि दुसरा अलाहाबादला असतो, चोरी होईलच कशी?

पण मग जर कोणताच कायदा, कोणताच दावा, कोणताच ताशेरा ह्या प्रकाराला आळा घालू शकत नसेल किंवा ह्या प्रकाराचा पुरेसा प्रतिवाद करू शकत नसेल तर ही गझलेची जमीन नावाची कटकट गझलकाराला एवढी पझेसिव्ह का बनवते?

हे समजून घेण्यापूर्वी आणखीन एक मजेशीर उदाहरणः

एका उर्दू शायराचा जन्म आणि मृत्यू - १९२८ ते १९७४
दुसर्‍या उर्दू शायराचा जन्म आणि मृत्यू - १९०५ - (मृत्यूचे साल मिळाले नाही)

पहिल्या शायराचे नांव - मुहम्मद अख्तर
दुसर्‍या शायराचे नांव - मुहम्मद समद यार खाँ

पहिल्या शायराचे तखल्लुस (उपनाम) - 'सागर'
दुसर्‍या शायराचे तखल्लुस (उपनाम) - 'सागर'

पहिल्या शायराला म्हणायचे - सागर सिद्दीकी
दुसर्‍या शायराला म्हणायचे - सागर निजामी

आता काय करणार?

बरं ह्यांच्या गझलाही बघा:

मुहम्मद अख्तर 'सागर'चा मत्ला:

है दुवा याद मगर हर्फे-दुवा याद नही
मेरे नगमातको अंदाजे नवाँ याद नही

मुहम्मद समद यार खाँ 'सागर'चा मत्ला:

दश्तमे कैस नही, कोहपे फरहाद नही
है वहीं ईश्ककी दुनिया मगर आबाद नही

(वृत्त तेच, अलामत तीच, पहिल्याची रदीफ 'याद नही' आणि दुसर्‍याची रदीफ 'नही'. पहिल्याचे काफिये 'आ'कारान्त स्वरकाफिये तर दुसर्‍याचे आबाद, बरबाद असे)

(म्हणजे कानाला तर एकच गझल ऐकल्यासारखे वाटणार, जमीनीत तर फरक आहे, पण म्हणावा तितका खणखणीत फरकही नाही).

आता ह्याच गझलांचे मक्ते पाहा:

मुहम्मद अख्तर 'सागर'चा मक्ता:

आओ इक सज्दा करे आलमे मदहोशीमें
लोग कहते है के सागरको खुदा याद नही

मुहम्मद समद यार खाँ 'सागर'चा मक्ता:

लाओ! इक सज्दा करूं आलमे मदहोशीमे
लोग कहते है के सागरको खुदा याद नही

एकाच पुस्तकात ह्या दोन गझला पाठोपाठ छापल्या गेल्या आहेत कारण त्या पुस्तकात शायरांची नावे अल्फाबेटिकली घेतली गेली आहेत. मला तर वाटते की हा एकच शायर असावा बहुधा! पण दोन असले तर? त्यांचा बराचसा आयुष्यकाळही कॉमन असेल! १९०० नंतरचा काळ असल्याने एकमेकांना ते माहीतही झालेले असणारच!

दोघेही एकच असले तर काही प्रश्नच नाही.

आता जर एकाच्या समोर दुसर्‍याने रचलेली समान जमीनीतील गझल आली तर हृदयातून एक कळ जाणे, एक आवंढा गिळणे, उचकी लागणे असे अनेक प्रकार होऊ शकतात. कारण जमीन निर्माण करताना प्रसूतीवेदनांसारख्या वेदना होतात आणि जमीन निर्माण झाल्यानंतर अपत्याप्राप्तीचा आनंद होतो.

गझलेची जमीन ही अशी बाब असते जी गझलेला इतर सर्व काव्यप्रकारांपासून पूर्णतः वेगळे ठरवते. इतर बहुतांशी काव्यप्रकारांमध्ये आधी आशय आणि मग तो शब्दबद्ध करणे असाच क्रम असतो. पण गझलेच्या जमीनीत, थोडक्यात ताजाताजा गझला निर्माण करणार्‍या साच्यात अशी अद्भूत ताकद असते की ती कवीला चक्क नवनवे खयालच सुचवून जाते. माझ्या मनातील अनुभुतींना शब्दात बसवणे हे काम मी इतर कविता रचताना करतो, पण गझल रचताना कित्येकदा सुचलेल्या ओळींमध्ये माझ्या अनुभुती प्रामाणिकपणे आणि शक्य तितक्या सहजतेने बसवण्याचे गोड आव्हान पार पाडावे लागते. ह्या ओळी कोण सुचवते? तर मतल्यात किंवा एखाद्या शेरात तयार झालेली गझलेची जमीन! आपण आपल्या अपत्याप्रमाणेच ह्या जमीनीत उत्तमोत्तम खयाल पेरतो आणि ते कसकसे अधिक देखणेपणाने, अर्थपूर्णपणे उगवतील हे पाहतो. वरवर वाचताना हे विचित्र वाटेल की आधी साचा आणि मग आशय? पण हेच तर प्रमुख आव्हान आहे. अश्या अश्या विचारांना शब्दबद्ध करा म्हंटल्यावर कोणीही सोम्यागोम्या करू 'धजेल', पण अश्याअश्या साच्यात विचार शब्दबद्ध करा म्हंटल्यावर मनातच गुणगुणणे, जगात लक्ष न लागणे, निराळीच धुंद येणे, यशापशांचे हेलकावे सोसणे असे सगळे सुरू होते. आणि एखादा शेर परीपूर्ण झाला की होणारा आनंद अवर्णनीय असतो.

एक वेगळी माहिती म्हणून, गझलकार खरे तर गझल न रचणार्‍या कवींना कधीच कमी मानत नसतात, पण ते तसे मानतात असे बाकीचे मात्र मानतात. पण असे का मानले जाते? त्याचेही कारण गझलेची जमीनच असते. अत्यंत कडक अटींचे पालन करून आपले खयाल अजिबात वृत्तानुसारी वाटणार नाहीत अश्या नैसर्गीक प्रवाहीपणे गझलेत मांडणे ह्यासाठी जे कसब असते तेच कसब तर मिळवण्यात बाकीचे अनेक कवी अपयशी ठरलेले असतात,.जो खरी गझल रचतो त्याला 'आपण गझल रचतो' ह्याचा दुराभिमान नसतोच, पण जो रचू शकत नाही त्याला मात्र जो रचू शकतो त्याला दुराभिमान असेल असे वाटत राहते. हा प्रकार गझलेच्या जमीनीमुळे घडतो.

आता एकाच व्यासपीठावर बिनदिक्कतपणे दुसर्‍यांच्या गझलांच्या जमीनी अगदी सहज लक्षात येईल ह्याप्रमाणे स्वतः वापरताना, वर म्हंटल्याप्रमाणे, कोणीच प्रताधिकार कायदा लागू करू शकत नाही. पण जो माणूस असली, सच्चा गझलकार असतो, तो मुळात अतिशय दिलदार असावा लागतो. त्याच्यात नैसर्गीकरीत्याच ही वृत्ती असावी लागते जिच्यामुळे तो स्वतः आधी घोषित करेल की 'मला ह्यांच्या ह्या ह्या जमीनीत थोडे स्फुरले आहे, म्हणून त्यांची क्षमा मागून मी माझे धाडस सादर करतो'. ही एकमेकांना दिली जाणारी अदब, हा उर्दूचा थाट मराठीने नाहीच स्वीकारला. आपण धन्यता मानतो 'जमीनीवर कोनाची मालकी थोडीच असते' असे ठणकावून म्हणण्यात!

ह्या लेखाद्वारे कोणावरच वैयक्तीक टीका करायचा मुळीच हेतू नाही. पण मराठीने उर्दूची ती अदब स्वीकारली तर किती माहौल बनेल नाही गझलेचा?

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__!

>> ही एकमेकांना दिली जाणारी अदब, हा उर्दूचा थाट मराठीने नाहीच स्वीकारला. आपण धन्यता मानतो 'जमीनीवर कोनाची मालकी थोडीच असते' असे ठणकावून म्हणण्यात! <<

sums it up !

गझलकार गझलेतर कविता लिहिणाऱ्या कवींना कमी लेखतात हा मात्र मला गैरसमज वाटत नाही. ह्याचा मला स्वत:लाही व्यवस्थित अनुभव आहे आणि म्हणूनच मी अजूनही गझलेत रमू शकत नाहीये. तुमच्या ह्या विषयीच्या परिच्छेदात -

"गझलकार खरे तर गझल न रचणार्‍या कवींना कधीच कमी मानत नसतात, पण ते तसे मानतात असे बाकीचे मात्र मानतात. पण असे का मानले जाते? त्याचेही कारण गझलेची जमीनच असते. अत्यंत कडक अटींचे पालन करून आपले खयाल अजिबात वृत्तानुसारी वाटणार नाहीत अश्या नैसर्गीक प्रवाहीपणे गझलेत मांडणे ह्यासाठी जे कसब असते तेच कसब तर मिळवण्यात बाकीचे अनेक कवी अपयशी ठरलेले असतात"

ह्या वाक्यांतही मला विरोधाभास जाणवला. सुरुवातीस 'कमी मानत नसतात' असे विधान केल्यावर, बाकीचे कवी गझलकारांच्या तुलनेत कुठे कमी पडतात/ अपयशी ठरलेले असतात, हे तुम्ही लिहित आहात, हा तो विरोधाभास.

गझल, हझल, पझल सगळ्या डोक्यावरुन उड्या मारत जातात. पण तुम्ही अतीशय सोप्या आणी मुख्य म्हणजे डोक्यात उतरेल अशा भाषेत लिहीले आहे. धन्यवाद! हॅट्स ऑफ!

छान

मस्त च

तसेच काहीतरी बारिक सारिक विषयावर गजल लिहू नये असे मला वाटते. काहीतरी मिनिमम खोली हवी त्यातल्या विचारांना.

तसेच जे शेर स्वताला उद्देशुन प्रथम पुरषी असे लिहिले जातात माबोवर ते लिहिणार्‍यांना खरोखरच लागू असतील तर त्यांनी लिहावे. गालिबने स्वताबद्दल /स्वताचे जे वर्णन त्याच्या शेरांमधे केले ते आयुष्य तो खरे जगला होता.

इथे टिपिकल मध्यमवर्गीय जीवन जगुन गजलाकार स्वताबद्दल, प्रेयसी बद्दल, दिलेल्या वचना बद्दल, कोणी फसवल्याबद्दल लिहित असतात.

गजल्/कविता ही Performing Art नाही. तुम्ही जे स्वता जगले आहे त्याबद्दल लिहावे, तर त्यात मजा येइल.

बेफि, राग नसावा, पण लेख एका ठिकाणी सुरू होऊन, दुसरीकडेच संपलाय असं वाटलं...

'जमिनी'पासून सुरू होऊन
व्हाया
"एक वेगळी माहिती म्हणून, गझलकार खरे तर गझल न रचणार्‍या कवींना कधीच कमी मानत नसतात, पण ते तसे मानतात असे बाकीचे मात्र मानतात. पण असे का मानले जाते?"

'अदब'पर्यंत पोचलाय.

बाकी, काटेकोर नियम पाळून लिहिले गेलेले शेर कमी होत चाल्लेत आणि तांत्रिक चुका असलेल्या शेरांना ढीगाने लाईक्स देणार्‍या फेसबुकीय प्रवृत्तीबद्दल (आणि त्यालाच महत्त्व देणार्‍या शायरांबद्दल) वाईट वाटतंय...

धन्यवाद!

लेख गंभीरपणे विचारात घेऊन त्यावर दिलखुलास मतप्रदर्शन करणार्‍या सर्वांचे आभार मानतो. लेखाचे स्ट्रक्चर अधिक अचूक व्हायला हवे होते हे आनंदयात्रींचे मत पटले. थोडी घाई झाली बहुधा लिहिताना! Happy

बेफिकीर , लेख आवडलाच. गझलवरच्या प्रेमातून तिचा प्रसार करण्याचं एक अनौपचारिक मिशन तुम्ही पार पाडत असता ज्यामुळे गझलेच्या वाटेला जावंस अनेकांना वाटत असेल.मलाही तुमच्यामुळेच ते कधीमधी वाटलं !
चांगली गझल वाचायचं थ्रिल वेगळंच असतं कारण गझलची अदाकारी , नखरा हे खरं आहे , पण शक्तीस्थाने याच मर्यादा असतात ! चांगली कविता ही एक समग्रता आहे, जिच्यात चांगल्या गझलचा अंतर्भाव होतो.

बेफिकीर, लेख 'जमीन' छान समजावतो. पण तुम्ही म्हणता तसं
'हा उर्दूचा थाट मराठीने नाहीच स्वीकारला. आपण धन्यता मानतो 'जमीनीवर कोनाची मालकी थोडीच असते' असे ठणकावून म्हणण्यात!' >> हे असं मराठी गझलेत जनरली होतं का? का अपवाद म्हणून? का हल्लीच होतंय? खरच माहित नाही म्हणून विचारतोय.

हे असं मराठी गझलेत जनरली होतं का? का अपवाद म्हणून? का हल्लीच होतंय? खरच माहित नाही म्हणून विचारतोय<<<

माझी जी काही माहिती आहे त्यानुसार हे हल्लीच किंवा अपवाद म्हणून होत नाही, तर हे खूप आधीपासून होत आहे. सविस्तर प्रतिसाद थोड्या उशीराने देतो. Happy

कितीही बेफिकिर असुनी गझलची काळजी केली
तुला केलेच इतिहासात संस्मरणीय आयुष्या

~बेफिकीर

टाईप करताना काही चुकले असल्यास क्षमस्व (बहुतेक शेर कितीही ने सुरू होत नसावाही पुरेसा ने होत असावा नक्की आठवत नाहीये )

बाकी जितू ..तू म्हणतोय्स तसा विरोधाभास वगैरे नाहीयेय तिथे
अनावश्यक गन्रसमज नकोत Happy

कितीही बेफिकिर असुनी गझलची काळजी केली
तुला केलेच इतिहासात संस्मरणीय आयुष्या

~बेफिकीर

टाईप करताना काही चुकले असल्यास क्षमस्व (बहुतेक शेर कितीही ने सुरू होत नसावाही पुरेसा ने होत असावा नक्की आठवत नाहीये )

बाकी जितू ..तू म्हणतोय्स तसा विरोधाभास वगैरे नाहीयेय तिथे
अनावश्यक गैरसमज नकोत Happy

बेफिकीर,

ओघावता लेख आहे! माहीती चांगली मिळतेय. माझ्यासारख्या दुरून गझलेकडे पाहणाऱ्यांना दृष्टीकोन विकसित करायला मूलभूत स्वरूपाची मदत होते आहे. त्याबद्दल धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

बेफिजी खूप चांगला आणि माहितीपूर्ण लेख आहे.… धन्यवाद….!
तुमच्या लिखाणाबद्दल, गझलेबद्दल बोलायला मी खूप नवखा आहे.…
पण तरी हे गझलेचं प्रकरण जरा अवघडंच वाटतं बाबा…

खूप सुंदर सोदाहरण माहिती भूषण जी...

खूप शिकायला मिळाले...

सर्वांनी '' अदब '' राखण्याची सवय मनाला लावली तर किती छान होईल !

ह्या धाग्यावर प्रोफेसर श्री सतीश देवपूरकर ह्यांनी दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे:

>>> profspd | 10 July, 2014 - 11:30

माझ्या तमाम गझला व त्यावरील मायबोलीकरांचे साहित्यिक प्रतिसाद यांचे ग्रंथ लवकरच समाजात येतील!
कळू द्या तरी गझलेची अभिरुची जगाला!
जनताजनार्धनच फैसला करेल काय तो!

दुसरा ग्रंथ मी दिलेल्या पर्यायी गझलांचा, सोबत मूळ रचना शायराच्या नावासकट मायबोलीवरच्या असाही येत आहे

जनता जनार्धनच काय ते तय करेल
वेट अॅंड वॅाच!

.................प्राचार्य सतीश प्रभाकर देवपूरकर
<<<

ह्या प्रतिसादातील 'दुसरा ग्रंथ......असाही येत आहे' हे विधान अतिशय व्यथित करणारे आहे. मायबोली किंवा इतर कोणत्याही फोरमवर कितीही वाद झाले तरीही अगदी नवशिका गझलकारही स्वतःचा गझलसंग्रह छापताना खरे तर सर्वांचे आभारच नोंदवतो. ते तर बाजूलाच राहो, येथे मायबोलीकर व इतर गझलकारांचा स्वतःच्या मते असलेला सामान्य वकूब सिद्ध करण्यासाठी प्रोफेसर साहेब तुलनात्मक गझल रचना पुस्तक स्वरुपात प्रकाशित करणार असे म्हणत आहेत. मायबोलीवरील सामंजस्याची अलिखित रेघ ही टर्मिनॉलॉजी उत्पन्न करणार्‍या जाणते सदस्य पेशवा ह्यांनीही हे वाचावे अशी विनंती! ही परनिंदा कायमस्वरुपी पुस्तकात छापण्याचा आसूरी आनंद मिळवणे ही बाब उद्वेगजनक आहे. येथील धागे प्रशासन नष्ट करू शकते. सौजन्यपूर्व भरीव चर्चा करून स्वतःत किंवा इतरांमध्ये काव्यगुण व काव्यजाणिवा वृद्धींगत करणे हे एका चांगल्या कवीचे लक्षण मानावे लागेल. प्रोफेसर साहेबांच्या अगदी सुरुवातीच्या गझलांवर ह्या स्थळावरील सदस्यांनी दिलेले कौतुकाचे प्रतिसादही तेच दर्शवतात. मात्र गझलांचा अविश्वसनीय व अतार्किक भडिमार, गझलतंत्रावर असलेल्या हुकुमतीमुळे इराणी इतिहासापासून एकाही शायराने रचल्या नसतील इतक्या संख्येने सातत्याने गझला रचणे आणि नंतर वितुष्ट येईल असे पर्याय सुचवून वादोत्पादक विधाने करणे हे सर्व काही प्रोफेसर साहेबांनी केले. पण ते आंतरजालावर केले. त्या सर्वाचा सूड ते 'स्वतःची प्रत्येक शायराशी तुलना करून ती पुस्तकात छापणे' ह्या माध्यमातून करणार असे दिसत आहे.

मी ह्या विचारांचा निषेध करत आहे.

येथे व इतरत्र गझलतंत्रावर हुकुमत असलेले एका मराठी भाषेतच आजमितीला किमान दोनशे कवी कार्यरत आहेत. मात्र ते एकमेकांना दिलखुलास दाद देत आपला प्रवास करताना दिसत आहेत. प्रोफेसर साहेबांनी स्वतंत्र व व्यक्तिगत रोख असलेला निंदनीय रस्ता चोखाळावा हे दुर्दैवी आहे.

-'बेफिकीर'!

>>>दुसरा ग्रंथ मी दिलेल्या पर्यायी गझलांचा, सोबत मूळ रचना शायराच्या नावासकट मायबोलीवरच्या असाही येत आहे

जनता जनार्धनच काय ते तय करेल
वेट अॅंड वॅाच! <<<<

अतिशय हीन, संकुचित प्रवृत्तीच प्रदर्शन मांडण्यात येत आहे.

जावूदे ! पुढे काही बोलायला सुचतच नाहीय ....( मान टाकलेली बाहुली)

-सुप्रिया.

लेख छान आहे बेफिकीरजी !!

दुसरा ग्रंथ मी दिलेल्या पर्यायी गझलांचा, सोबत मूळ रचना शायराच्या नावासकट मायबोलीवरच्या असाही येत आहे>> निषेध

एखादी दंभ व्यक्तीच अस करु शकते....कॉपीराईट्स चे कूढले नियम लागू होत असतील तर बघायला हवं

मी ह्या विचारांचा निषेध करत आहे.<<<<

जगाला आज समजलं ..... मी ह्या विषयावर प्रा. साहेबांशी प्रत्यक्ष बोलताना जाणले अगदी त्यांच्याशी पहिल्यांदा बोललो होतो तेव्हापासून मी ही बाब ताडली होती म्हणूनच तर मी त्यांचा आजवर विरोध करत आलो आहे

ते जे करू पाहत आहेत ते अत्यंत निष्ठूर क्रूर व घृणास्पद आहे
ह्या माणसाला गझलकार म्हणायाला माझा स्पष्ट नकार आहे

मी अश्या विचारांवर थुंकतो !!!!! मी अश्या माणसांवर थुंकतो !!

बेफी,

नेहमी सारखीच फटकेबाजी केली आहे तुम्ही ह्या लेखातून. खूप सुंदर माहिती.
गा. पै. वर म्हणतात त्या प्रमाणेच आमच्या सारख्या दुरून गझलेकडे पाहणाऱ्यांना दृष्टीकोन विकसित करायला मूलभूत स्वरूपाची मदत होते आहे. त्याबद्दल असंख्य धन्यवाद!
खुप सुरेख माहिती. पहिल्यांदा वाचल्या वर माझ्या थोडे डोक्यावरुन गेले Wink पण मग दोन, तीन दा वाचल्यावर झेपेश हळु-हळु Lol

(गझलेच्या)जमिनीची मालकी, हक्क वगैरे खरं तर कुणी सांगू नये...
एकाच रागातल्या अनेक चाली पूर्वीपासून आजतागायत रचल्या जाताहेत...एखादा राग म्हणजे त्या चालीची जमीन असे आपण समजू...पण त्याबाबत कधीच कुणी आक्षेप घेतल्याचे किंवा त्यावर चर्चा केल्याचे मला तरी आठवत नाही....हं, आता दोन चाली अगदी हुबेहूब असतील...काना,मात्रा, वेलांटीसह(संगीताच्या भाषेत...स्वरलिपी) तरच अस्सल कोण नक्कल कोण ह्याबाबत चर्चा/वाद होतात..एरवी कुणीही अमूक एका रागावर हक्क सांगत नाही...त्याप्रमाणे गझलेत किंवा काव्यातही असायला काय हरकत आहे?
तसं पाहिलं तर स्वयंभू असे कुणीच नसतं...एकाच विषयावर प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार लिहीत असतो, बोलत असतो....ह्यात त्याचे शिक्षण, अनुभव, निरीक्षण, वाचन, मनन, अनुकरण इत्यादि अनेक पैलू समाविष्ट असतात...त्यामुळे त्यात आधीच्या काही गोष्टींचं प्रतिबिंब दिसण्याची दाट शक्यता असते...अगदी ते जाणीवपूर्वक केलेलं नसलं तरी...त्यामुळे त्यावर व्यर्थ चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही...

एखादा राग म्हणजे त्या चालीची जमीन असे आपण समजू<<<

सपशेल चुकीची तुलना!

रागाला तुम्ही गझलतंत्र समजू शकता तुलनेसाठी! चालीला जमीन समजा आणि त्या चालीत दुसर्‍या कोणी स्वतःच्या शब्दातील गीत लिहिले, मूळ गीतकाराला ढुंकून विचारले नाही आणि त्या गीताची जगभर जाहिरात केली की कसे वाटते ते येथे लिहा.

एकाच जमिनीत जशी विविध पिके घेता येतात...तसेच एकाच रागात विविध चाली लागू शकतात...ह्या अर्थाने मी रागाला जमीन असे संबोधले आहे...
पण तुम्ही चालीलाच जमीन म्हणताय...ठीक आहे...क्षणभर आपण तसेच मानूया....
एक लक्षात घ्या त्याच (तंतोतंत)चालीवर जर कुणी वेगळं गीत लिहिलं तर तो संगीतकाराचा अधिक्षेप होऊ शकतो...गीतकाराचा नव्हे...गीतकाराची मालकी फक्त त्याच्या गीतावर असू शकते...चालीवर नव्हे...

खरे तर काव्याच्या/गझलेच्या बाबतीत जमीन म्हणून काही मानायचे असेल तर ते वृत्ताला मानायला हवे....आणि एकाच वृत्तात लक्षावधी रचना सापडतील...त्यातही बरेच समान शब्द, विषय आणि अगदी आशयही तसाच असू शकेल...पण जोवर पहिल्या शब्दापासून अगदी शेवटच्या शब्दापर्यंत..काना,मात्रा वगैरेसह सगळं सारखं नाही तोवर ती नक्कल ठरत नाही...तरीही म्हणायचा मोह झालाच तर भ्रष्ट नक्कल असे म्हणू शकता.

Pages