कपाळी गंध, गळा माळ, मुखी राम घेउन भडक निळीच्या नी कडक इस्त्रीच्या कापडात वावरणारा बुवा बोलला की नाही म्हटलं तरी माणसाचा लवकर विश्वास बसतो. शब्दाची किंमत बोलणार्याच्या ऐपतीवर ठरते. दाढी वाढवुन पायी चालत सोनं मोडायला जा... पावतीशिवाय मोड? अशक्य! फोर व्हिलर पार्किंगला जागा नाही का? बस्स एवढं विचारा नी आत घुसा... चालायचच हो साहेब... असली तर नंतर द्या पावती...
दिसण्याची, दाखवण्याची, नसताना असण्याची कला असावी. परोपकाराचा अभंग सोडवून झाल्यावर बिदागीसाठी भांडणार्यानी 'शहाणे करुनी सोडावे सकळ जन' चे व्रत कशासाठी घेतले आहे याची जाणिव होते. तोडणार्याला आणि लावणार्याला समान सावली देण्याची वृत्ती ज्ञानेश्वरांच्या काव्यातल्या झाडाजवळ आहे... बाकी कुणा संताजवळ ती असली तर त्याना किंवा परमेश्वरालाच माहिती.
'संसाराचा भार पेलत, उन, वारा, पाऊस झेलत जगायच, आपली माणसं निवडून त्याना जगवायचं नी भोवतालच्याना त्यांच्याहून वेगळं जगून दाखवायचं... याचे नाव जीवन!' पण सगळ्यांच्याच मेंदुला ही परंपरागत झापडं बांधता येत नाहीत. एखादं शिंगरू खट्याळ निघतं. कुरणाबाहेर ओढ घेतं. माझी माझी म्हणताना त्याला माणसं निवडावी लागत नाहीत. भेटेल तो त्याचा असतो. सगळेच आपले झाले की मग आपले सगळे काळजीत पडतात. लगाम लावतात, बेडी घालतात, आखुड दोरी खुंटीला बांधुन आपल्याच जागेत ओढुन घेतात. पण पथ्य-पाणी-बंधनानी पिण्याचं व्यसन सुटू शकतं... देण्याचं नाही.
असाच एक देणारा... बेड्या ओढत, खुंट्या उपटत, खुप खुप माणसांचा आपला आणि आपल्या माणसांचा परधार्जिना होऊन जगलेल्या आणि परक्यांसाठी आपल्याच माणसांनी मारलेल्या कृष्णाशेठची ही विसरता न येणारी आठवण...
कृष्णत सदाशिवराव यादव
सहा फूटाचा ठासून भरलेला गोलाकार देह, घार्या रंगाचे रगेल डोळे, वरचा ओठ झाकूण आत वळलेळी घनदाट मिशी, कडांना धार लावलेली कडक इस्त्रीचा लख्ख पांढरा पेहराव, पायात करकरीत कोल्हापुरी... असे जय्यत तयारीत कृष्णाशेठ घराबाहेर पडला की देवळापर्यंत पन्नासेक नमस्कार पडायचे. आम्ही पोरं घाबरून घरात पळायचो. महादेवाचं दर्शन झालं की सोसायटीच्या कट्ट्यावर बसून लोकांच्या कामाची तोंडी यादी व्हायची. आश्याबापुच्या पानपट्टीवर कुणीतरी मावा सांगितला की एक पुडी तोंडात आणि दोन खिशात टाकून कृष्णाशेठ गावाबाहेर पडायचे. दिवसभरात सगळ्यांची कामं आठवणीनं केली जायची. कराडात एखादा पुढारी भेटायचा मग त्याच्यासोबत खाणे आणि पिणेही करून त्याच्याच गाडीतुन स्वारी गावात यायची.
लोक म्हणतात कृष्णाशेठच्या बापाचा भयंकर वट होता. तालुक्याच्या राजकारणात त्याला खूप किंमत होती. गावात पहिली चारचाकी त्याची, पहिला दगडी वाडा त्याचा होता. हिरावहिनीच्या कमरेचा छल्लासुधा सोन्याचा... आमदार का खाजदार कोणतरी जेवायला घरी यायचा. गावातल्या निम्म्या जमिनी सदाण्णाच्या वहित नोंद होत्या. कृष्णतराव लहान असताना आण्णा आजारपणात वारले आणि लक्ष्मीचं प्रेम आटत गेलं. कृष्णा मोठा होईल, बापाची वळ चालविल, झिजल्या पात्रात भर पडलं या आशेवर हिरावहिनी संसार रेटत राहिली पण ज्या हाताना वसुलीची खाज सुटायला हवी होती त्या हातानी कृष्णा लोकांचे डोळे पुसू लागला आणि अडल्या नडल्यांच्या डोळ्यातलं पाणी हिराबाईंच्या स्वप्नांवर सांडू लागलं. आवाज, नजर, रुबाब बापाचा होता पण काळीज कुणा संताचं घेऊन आलेला.
"किस्ना त्या शंकर्याला भेटला का?"
"कशाला?"
"बारा वर्स झाली रानाला. धा वर्साचा कागद हाय. पैसं दे नायतर रान सोड म्हणावं"
"आय ते तुजं तू बोल मला जमनार नाय"
"बायामाणसानी यवार करायचा?"
"मग मी काय करू? पुना म्होरनं गेलं तरी माणुस तोंडाकडं बगत नाय"
"कशाला बगाय पायजे? पैशे घे नी रान सोड नायतर कराडला जावन कागद करून ये"
"बगतो"
आणि पाय आपटत कृष्णा घराबाहेर जायचा. मग रात्री त्या माणसाची भेट घ्यायचा. पैशाची सोय होईल का विचारायचा. नसेल होणार तर कशी करता येईल ते सांगायचा. त्यात त्याला मदत करायचा आणि त्याचं शेत सोडवून द्यायचा.
बापाच्या कर्तुकीवर पुढच्या दोन पिढ्या आरामात लोळल्या असत्या पण त्यासाठी नेमकी ही पिढी अप्पलपोटी निघायला हवी होती. 'वाईट म्हणायला गाव तयारच असतं पण चांगल वागुन उपाशी झोपताना चतकोर भाकरी द्यायला कुणीसुदा येत न्हाय' हे आईचं तत्वज्ञान कृष्णाच्या मेंदूत रुजत नव्हतं. दहाच्या व्याजानं हजार रुपयाचं तीन वर्षाचं पैसं आणि पाच गुंठ्याच्या पट्टीची किंमत ह्याचा मेळ कसा घालायचा? कश्यातनं काय वजा करायचं? काहिच कळत नव्हतं... मुळात त्याला बेरीज करायची होती ती माणसांची. नमस्कार शेठ! कसकाय कृष्णातराव? चहाला या की भावजी, बाळा एवडं बघतो का? बरं झालं बाबा तू केलस म्हणून.... या नी अशा वाक्यांनी त्याला आयुष्याची प्रत्येक ओळ भरून टाकायची होती. पण, अनेक उन्हाळ्यानी तापलेल्या आईच्या मेंदूला गावाची नेमकी ओळ्ख होती. 'कामं करंल त्यो शेठ, दाम मागिल त्यो किस्न्या' हेच माणसाचं खरं रुप यावर ती ठाम होती.
वाट बघण्यात अर्थ नव्हता. लोढणा गळ्यात अडकवायलाच पाहिजे. सदाण्णाच्या अंगणाला साजेसा सोहळा संपन्न झाला नी सुवर्णा घरात आली. सासर्याच्या पुण्याईवर घराचा गाडा ढकलला जातोय नी नवर्याच्या पापाचा घुणा त्याला थांबवणार हे तिच्या लक्षात यायला चार वर्ष गेली. खात्या पित्या घरची नी पैसा हा काळजीचा विषय असू शकतो हे माहितीच नसणारी सुवर्णा हळूहळु खर्या रंगात चमकू लागली आणि ती चमक कृष्णाशेठच्या डोळ्यांना न सोसणारी होती. एक मुलगी, एक मुलगा, आई आणि बायको.....
"आवं त्या वह्या बगुन जावा की यगदा गावात चक्कर टाका"
"तू नको त्या भानगडीत पडू नको"
"मग काय भिकला लागस्तवर वाट बगू का?"
"पाच यक्कर पानस्थळ हाय आणि बँकेत कारणापुरता पैसा हाय. तू पोरांच बग आणि घरातलं कर बाकी मी बगतो"
"मला कार पायजे आमच्यात दोन हुत्या"
"बगू जमलं तर घिवया"
"तुमी जमीवलं तर..."
गरजेपुरता पैसा आणि समाजात मान. एकुणात कृष्णतशेठच्या दिसत्या घराला गोकुळच म्हणायला पाहिजे... पण दिसत्या गोकुळात वाहणारी यमुना प्रेमाची नसून विषाची आहे हे समजायला सतरा वर्ष जावी लागली...
आप्पा पोरिच्या लग्नात भांडी माज्याकडं बरका... मामे पोराची धाव्वीची फी मी भरणार बरका... सन्या सलुनच सामान बगुन ये मी देतो भांडवल... कोयना बँकेत कर्ज टाक मी हुतो जामिनदार... कुटली पतसंस्था हाय?... मी घालिवतो गाडी मागं....
बापाचा रुबाब होता त्यानं खोरं लाऊन पैसा घरात आणला... घर माणुसघाणं केलं... पोराचा रुबाब आहे त्यानं जीव लाऊन घर माणसात नेलं...
'यकदा जिबला रगात लागलं की कुत्र्याची जात लय वंगाळ, पैसा रक्तापरीस वंगाळ... माणसाचं तसलच कुत्र हुतं' घेण्याची तलफ असलेली सुवर्णा धुमसत राहिली... आहे ते स्विकारून कर्माचं भोग म्हणत हिरावहिणी कृष्णाला सांभाळुन घेत राहिली...
मागच्या महिन्यात गावात गेलो.
"शेठचं कळालं का?" जोडिदारानं हळुच विचारलं
"कृष्णाशेठ?"
"हं... उराकलं की"
"कधी?"
"दिड म्हयना झाला"
"आजारी?"
"गळफास"
कृष्णाशेठनं गळफास घेतला? ज्याला बघितलं की आम्ही पोरं घाबरून पळायचो त्या कृष्णाशेठला जगण्यानं अशी काय भिती घातली की तो असं भ्याडाचं मरण मेला? त्या रात्री मी बारा वाजेपर्यंत मित्राशी बोलत बसलो. शेठची वाताहत सांगताना त्याला नी ऐकताना मला शेठचा भयंकर राग येत होता....
चारेक वर्षाचा संसार झाला नी सुवर्णानं ताळा सोडला. आहे त्या उत्पन्नात घर चालवायला ती कुणा बिगार्याची न खपणारी ब्याद नव्हती. तालेवार बापाची रुपवान पोर होती. नवर्याची समाजसेवा थांबवण्याचा हरप्रयत्न झाला आणि शेवटी ह्यो बिनकामाचा लोढणाच आहे असं ठरवून तिनं शेठला बासणात बांधला. जुनी देणी वसूल करायला ती स्वतः घराबाहेर पडू लागली. लोकाना शिव्या देऊन पैसे वसूल केले. वसुली झाली... पैसा संपला... येणं थांबलं. मग दहा गुंठे, विस गुंठे करत रान विकलं... घरातनं निघताना शेठ मान खाली घालायचा ते गावाबाहेर पडल्यावरच वर काढायचा. गावात अजून कुणी आवाज चढवायचं धाडस करत नव्हता पण पहिल्यासारखा जिव्हाळा शेठच्याच बोलण्यात उरला नव्हता.
"सुवर्णे जरा शुध्दीत र्हा" हिरावहिनी रागात दरडावायची
"नका टेंबडा दाकवू... माज्या बाच्या दारात धा माणसं राबत्याती आजबी. पयल्यापसनं ल्योक वळणाचा ठेवला आसता तर र्हायले आसते सुदीत..."
"किस्ना, तू बोल की जरा..."
"त्यासनी मावा दारू जेवान मिळालं की झालं त्ये काय बोलणार"
महादेवाच्या देवळापर्यंत पोहोचेस्तोवर पन्नासभर नमस्कार घेणार्या शेठला. पदोपदी होणारा अपमान घायाळ करीत राहिला. दारूचा शौक होता त्याचं व्यसन झालं. रोज संध्याकाळी सोडायला येणार्या गाड्या बंद झाल्या. मग गावातल्या गुत्त्यावर शेठचं खातं पडलं. मग रामराम घालणारे लोक पाठीवर थाप टाकू लागले. ज्यानी मायबाप म्हणून हात जोडले ते शेजारी बसून मस्करी करू लागले... दारूसोबत अपमान रिचवत शेठ दिवस ढकलत होता आणि चवताळलेल्या सुवर्णाची अस्वस्थता वाढतच चाललेली. पोरीचं लग्न झालं. पोरगा मोठा झाला आणि मागच्या पिढीत जन्मायला हवी तशी अप्पलपोटी औलाद शेठच्या पोटाला आली....
"हान की त्येज्या कानाखाली दोन..."
"बाप हाय म्हणून गप बसतुया आय नायतर... ह्येज्या आयला...."
"कसला बाप... दारूत घर फुकल, ना मला सुक ना पोरस्नी... मरना बी झालया..."
कृष्णाशेठ नशेत हातवारे करायचा. हिरावहिनी तोंडाला पदर लाऊन हुंदके द्यायची. सुवर्णा पोरासमोर बडवून घ्यायची आणि पोरगं बापाच्या अंगावर धावून जायचं.
दुसर्याच्या दुखण्यात स्वता:ची परवड बाजुला ठेवणारा शेठ पोराच्या पाया पडायचा...
"सत्या लका मारू नको... ऐ नको... पोटात नको मारू... सत्या"
"हान त्येज्या तोंडावर हान... मूत पीवन घर नाशिवलं...."
"सुवर्णे... मारू नगो... आयं... आयं लागतय..."
"सत्या, भाड्या बाप हाय तुजा... ए कुत्रे नवरा मेल्याव बश्शील की काळ्या कपाळानं... माग सर सत्या..."
रोज रात्री कृष्णतशेठ ओरडायचे... रोज रात्री शेजारी हळहळायचे... ज्यांचे हात उपकाराच्या ओझ्याखाली होते ते दारुला पाच पन्नास रुपये द्यायचे. चार आठ दिवस शेजार्यानी सत्याला समजावलं. मारहान सुरूच राहिली मग सगळ्यांना सवय झाली... कृष्णातशेठलाही... एका रात्री अशीच मारहान झाली... शेठ नेहमीप्रमाणं पोराच्या पाया पडत राहिले... बायको तोंडावर लाथा हाणत होती. आई सत्याला मागं सरायला सांगत होती... थोड्या वेळानं दंगा थांबला... दुसर्या दिवशी सकाळी सुवर्णानं बोंब ठोकली. पोरानं हंबरडा फोडला आणि हिरावहिनी शांतपणे कोपर्यात बसून राहिली.
शेजारी आले. मढ्याचे पाय जमिनीला टेकून दुमडलेले पण वर गळ्याला फास होता. तोंडावर जखमा होत्या पण त्या दारू पिउन पडल्यामुळं झालेल्या... गाडीतुन येणारे पुढारी आले... गळफासच होता हे सिध्द झाले... मग शेठच्या अंगावर पांढरी कपडे टाकून महादेवाच्या देवळासमोरून त्याला स्मशानात नेला... मी पाहिलं नाही पण बरेच नमस्कार पडले असणार एवढ नक्की....
*************************************************
http://www.maayboli.com/node/18213
http://www.maayboli.com/node/18794
http://www.maayboli.com/node/21061
http://www.maayboli.com/node/18401
http://www.maayboli.com/node/23260
छानच !
छानच !
ह. बा. खुप दिवसांनी! शेवट
ह. बा.
खुप दिवसांनी!
शेवट वाचुन वाईट वाटले.
<शेवट वाचुन वाईट वाटले.> +1
<शेवट वाचुन वाईट वाटले.> +1
स्टाईल जबरदस्त आहे तुमची .
स्टाईल जबरदस्त आहे तुमची . डोळ्यात पाणी उभं करता न चुकता
सुरेख लिहिलंय. सगळेच लेख
सुरेख लिहिलंय. सगळेच लेख हेलाउन सोड्णारे आहेत.
(No subject)
@ बर्याच दिवसानी>>> अधुन
@ बर्याच दिवसानी>>> अधुन मधुन वाचत असतो. काल लिहीण्याची हुक्की आली. लिहीले.
सर्वांचे मनापासुन आभार!
सुन्न झाले हे वाचुन! निव्वळ
सुन्न झाले हे वाचुन!
निव्वळ हबा स्टाईल!
धन्यवाद आर्या!
धन्यवाद आर्या!
हबा बर्याच दिवसांनी.. लेख
हबा बर्याच दिवसांनी..
लेख उत्तम...
(No subject)
येस हिमस्कूल बर्याच दिवसानी
येस हिमस्कूल बर्याच दिवसानी पेक्षा वर्षानी आपण बोललो.
धन्यवाद रावी!
हबा च्या लेखणीत गावाकडच्या
हबा च्या लेखणीत गावाकडच्या मातीचा अस्सल वास आहे.
कराड आणि कोल्हापुर जवळ असल्याकारणाने बहुतेक लेखणाशी रिलेट करु शकतोय.
पण हबा हल्ली लिहित नाही ही तक्रार आहे.
ह.बा. अप्रतिम वर्णन…. मला
ह.बा.

अप्रतिम वर्णन….
मला तुमचा हेवा वाटतो….
खरेच नशीबवान आहात तुम्ही की एवढी सुपाएवढ्या काळजाची साधी भोळी माणसं तुमच्या आयुष्यात आली…।
शेवट वाचून मात्र डोळ्यात पाणी आले….
सर्द!
सर्द!
झकासराव, रविकांत,
झकासराव, रविकांत, इंद्रा
आभारी आहे!!!!
दारू पिणार्या आणि घराची जबाबदारी समर्थपणे न पेलणार्या नवरोजिंचे आजकाल बरेच वाईट हाल होताना दिसताहेत. दोन महिन्यापुर्वी आमच्या लागणीला तोड आलेली म्हणून गावात चार दिवस मुक्काम होता. गावातली उसतोड टोळी होती. त्यातही एकाची अशीच आवस्था होती. पोराला हाताशी धरून बायको रोज मारहान करते. प्रश्न गंभीर आहे. असो.
पण हबा हल्ली लिहित नाही ही तक्रार आहे. > आता शक्य तेवढे लिहीणारच आहे. फार लिहीत बसले की दुसर्यांचे वाचता येत नाही.
खुप छान लिहिलय. पण हबा हल्ली
खुप छान लिहिलय.
पण हबा हल्ली लिहित नाही ही तक्रार आहे. >>>> +१
सुन्न.
सुन्न.
शेवट सुन्न करून गेला.
शेवट सुन्न करून गेला.
आबासाहेब, भारती,
आबासाहेब, भारती, देवकी
सर्वांचे आभार!!!
@पण हबा हल्ली लिहित नाही >> आता लिहीणार आहे.
लिहा हबा स्टाईल!
लिहा हबा स्टाईल!
शेवट सुन्न करून गेला.>>>> +1
शेवट सुन्न करून गेला.>>>> +1
आवडली. उत्तम लिहिले आहे. कोण
आवडली. उत्तम लिहिले आहे.
कोण बरोबर आणि कोण चूक, आपण ठरवणारे कोण? ह.बा. नी लिहिले आहे आपण फक्त वाचायचे.
हे पण वाचावे नविन माबोकरांनी
हे पण वाचावे नविन माबोकरांनी म्हणून वर काढतेय.
सुंदरच !!!
सुंदरच !!!
त्यांची अजून एक सुंदर कथा
https://www.maayboli.com/node/25019