लिफ्ट

Submitted by कौतुक शिरोडकर on 11 June, 2014 - 05:29

माझं सेल्स डिपार्टमेंट आठव्या मजल्यावर. अकाउंटस मात्र दहाव्या मजल्यावर. दिवसातून एक दोन फेर्‍या व्हायच्याच. आजही झाल्या. पण नेहमीपेक्षा जास्त. याला कारण माने. आमचा सेल्स मॅनेजर. एकदाच सगळं सांगून मोकळा होईल तर शप्पथ. पण नाही. याचं सगळं तुकड्या तुकड्यात. सलग चार वेळा आठव्या मजल्यावरून दहाव्या मजल्यावर पदयात्रा झाली.

साधं कारण होतं. चंपानेरकर आजारी होता. त्याच्या ऐवजी मला आंबेगावात जायचं होतं. नेहमीचं सेल्स सर्विसचं काम. जाऊन मशिनरी कशा काम करताहेत ते पाहायचं आणि रिपोर्ट बनवायचा. कामात कष्ट नव्हतेच. होते ते प्रवासात. आंबेगाव तस अर्धमुर्ध शहरच. पण ह्या अर्ध्यामुर्ध्या गोष्टी जीव घेतात. धड इकडे ही नाही धड तिकडे ही नाही. प्रवासाच्या साधनांची फार मारामारी आहे तिथे. राहण्याच्या सोयींची पण. त्यात आंबेगाव एमआयडीसीला जायच होतं. एमआयडीसी मुख्य शहरगावापासून ४४ किलोमीटर अंतरावर. का ते त्या सरकारलाच ठाऊक. मी पहिल्यांदाच जाणार होतो आंबेगावात. वरची सगळी माहीती चंपानेरकरने पुरवली. आरामखुर्चीत डुलत. मानेने निघण्यापुर्वी चौकशी करायला सांगितलेलं. म्हणून गेलो. मानेने त्याला आधीच कळवलेलं. चंपानेरकरने साधा चहा विचारला नाही की बस म्हणाला नाही. लोकांना मॅनर्स नाहीत. घरात घेतलं ते नशीब. मी काय याच्याकडे कायमचा राहायला गेलो होतो का ? एक तर मी कधीच कोणाकडे जात नाही.

त्याच्याकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारेच कंपनीने प्रवासाच्या तिकीटांची आणि राहण्याची सोय केली होती. चार दिवसांचा दौरा होता. मी नेहमीच्या वातावरणातला बदल म्हणून तो स्वीकारला. रोजच आपलं ऑफिस आणि घर... घर आणि ऑफिस. दुसरीकडे कुठे जाणं येणं होत नाही.मलाही आवडत नाही. मानेला तयारी झाल्याचं सांगितलं.
"झोप झाली नाही का काल तुमची ? चेहरा फार ओढल्यासारखा वाटतोय." बोलणार काय यावर ? 'नाही झाली' असं म्हणालो तर ऑफिसात झोपायला देणार आहेत का ? 'झाली' म्हणालो तर मग 'चेहरा असा का ? आजारी आहात का ? ' सारखे आणखी प्रश्न. कशाला हवी यांना नस्ती माहीती ? उगाच सारखं इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसत राहायचं. मी उत्तर दिलच नाही. हसलो फक्त. पण तेही बहुतेक मानेला कळलं नाही.
"काम जमेल ना ?" माने मग इतकचं बोलला. मी होकारार्थी मान डोलावली. त्याचा माझ्यावर नेहमीच अविश्वास.
हे काय विचारणं झालं. न जमायला काय झालं ? ह्यांना जमतं ते मला जमणार नाही का ? मी काय इतका दुधखुळा आहे का ? वाटलं त्याला ताड ताड सुनवावं. मग म्हटलं जाऊ दे. कशाला उगाच ? करून दाखवावं. म्हणजे तो काही बोलूच शकणार नाही.

सगळी कागदपत्रे बॅगेत भरून, अकाउंटसमधून खर्चाला पैसे घेऊन निघालो. नेमक्या त्याच वेळेला बडगुजर आला. हा आमच्या कडे पर्चेसला आहे.
" कुठे ? आंबेगावला ?"
मी होकारार्थी मान डोलावली.
"ऑल द बेस्ट." इतकं म्हणून तो ह्सत निघून गेला. मला त्या हसण्यात खवचटपणा जाणवला. खरच खवचटपणा होता की माझा भास होता ? आता नीट आठवत नाही. असू शकतो. बडगुजर थोडा खवचट आहेच. असे ना का ? आपल्याला काय ? मी जिन्याकडे वळलो.

सध्या मी राहतो नायगावला. तसं मुंबईपासून लांबच. वस्तीपण स्टेशनपासून लांब. पण इथे शांतता आहे. कुणाला कुणाच्या अध्यातमध्यात पडायला वेळ नाही. इथल्या जुन्या कॉम्लेक्समधे सगळ्या तीन माळ्यांच्या इमारती. माझा फ्लॅट दुसर्‍या माळ्यावर. माझं आधीच घर एन्टॉप हिलला होतं. ते चौथ्या माळ्यावर. तिथेही कोणाचा त्रास नव्हता. जुनं घर सोडून आता सहा महिने झाले. पुर्वीच्या मानाने इथे प्रवासाचा त्रास सोडला तर बाकी सगळं निवांत आहे. सामान बांधून निघेपर्यंत नऊ वाजले. अकराची गाडी होती. दादरहून. मी पोहोचलो आणि पाचव्या मिनिटाला गाडी सुटली.

प्रवास ठिक होता. प्रवासात तसे बोलणारे कमीच.... रडणारे, ओरडणारे आणि आवाज देणारेच जास्त असतात. त्यात ते उगाचच हॉर्न्स. आधीच वाहनांचे स्वतःचे आवाज असतातच. मला आवाजांचा तिटकारा आहे. शांतता मला आवडते. स्मशान शांतता. लोकांनी गाडीत बसल्यावर फक्त 'झोपणे' ही एकच क्रिया करावी. एवढी काय दुसर्‍याशी बोलण्याची हौस ? तेही अनोळखी लोकांशी ? फालतू काहीतरी विचारतात आणि बडबड सुरु. पुन्हा त्या माणसाला कधी आयुष्यात भेटणार असतो का आपण ? नाही ना. मग उगाच एकमेकांची माहीती पुरवायची कशाला ? त्यापेक्षा गप्प झोपावं. मीही झोपलो. खरतर सोंग घेतलं. गेल्या कित्येक दिवसात मी नीट झोपलेलोच नाही. झोपलं की स्वप्नं पडतात. तिही विचित्र. डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी गोळ्या दिल्यात. गाढ झोप लागते त्याने. सहा-सात तास मेल्यासारखं पडून राहायचं. मग कुठेही काहीही होवा. पण प्रवासात गोळी कशी घेणार ? प्रवासात तशीही मला झोप लागत नाही. कुणीतरी अनोळखी माणूस गाडी चालवत असतो. अवतीभवती पण सगळे अनोळखीच असतात. कसा कुणावर विश्वास टाकायचा ? कोणी सामानातलं काही काढून घेतलं तर ? ड्रायव्हरला झोप आली तर ? मधेच गाडी लावून पळून गेला तर ? दरोडा पडला तर ? काहीही घडू शकतं ना. अपघात काय सांगून होतात का ? त्यामुळे जाग येत राहते. किंबहूना झोप नीट लागत नाही आणि मी जागाच असतो म्हणणे जास्त योग्य.

सकाळी ८ ला गाडी पोहोचली आंबेगावात. हातातला लॉजिंगबॉर्डींगचा पत्ता एकाला दाखवला. तो बोलला काहीच नाही. फक्त उजवा हात वर उचलला. बस. मग मुकाट त्याने दाखवलेल्या दिशेला चालू लागलो. त्या माणसाला बोलायला काहीच हरकत नव्हती. तोंडात त्याच्या कसलाच बकाणा नव्हता. पान नव्हतं की गुटका नव्हता. पण बोललाच नाही. असच असावं. गरज नसेल तर बोलूच नये. नुसती खूण. स्टँडच्या बाहेर आलो. फार लांब जावं लागणार नव्हतं. मी समोरच्या इमारतीच्या दिशेने झपझप पावलं टाकायला सुरुवात केली.

ती इमारत फारच जुनी होती. दगडी. बिटीशांच्या काळातली. तिला कुंपण नव्हतचं. पण ती इतर इमारतींपासून स्वतंत्र होती. पहाताना असं वाटत होतं की इतर इमारती स्वतःहून तिच्यापासून दोन हात लांब उभ्या होत्या. तिची सलगी बहुधा कुणालाच नको होती. इमारतीचा अवतारच तसा होता. फारच ऑड वाटत होती ती इतर इमारतींच्या घोळक्यात. तसा रंगरंगोटी करून तिला मॉडर्न बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण त्याने मुळचा कळकटपणा फार काही लपला नव्हता. काही ठिकाणी लावलेले टाईल्स ठिगळ लावल्यासारखे वाटत होते. मुख्य दरवाजा वगैरे काही प्रकारच नव्हता. इमारतीला आत शिरण्यासाठी एखादं भगदाडं पाडल्यासारखच होतं ते. आकाराने आयताकृती असलं तरी ते भगदाड वाटतं होतं. ती इमारत पाहताक्षणी माझ्या मनात फार काही चैतन्य निर्माण झालं नाही. माझ्याच काय कुणाच्याही मनात चैतन्य निर्माण करेल असं ते रुप नव्हतं. माणसांसारखच वास्तूंच पण असतं. एखादं माणूस उगाचच आवडतं तर एखादं आवडतच नाही. वास्तूंचं पण काही वेगळं नसतं. ती वास्तू तशातलीच होती. या जुनाट दगडी वास्तू एखाद्या वेड्यांच्या हॉस्पिटलसारख्या दिसतात किंवा तुरुंगासारख्या. अंगावर येतात त्या. कुणीतरी तिथे मरणकळा भोगतोय असच वाटत राहत सारखं. अशा जागी औदासिन्य भरून असतं. नकारात्कता. माणसांसारखा तिथे अंधार पण कोंडलेला असतो. तोही बिचारा तिथून चाचपडत बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय की काय ? असं सारखं वाटत राहतं.

भगदाडातून आत शिरलं की डाव्या हातालाच एका जुनाट टेबलामागे एक अगडबंब माणूस बसला होता. तोही उघडा बोडका. इतकं 'याक' वाटलं त्याला तसं पाहून. रिसेप्शनला कुणी असं बसतं का ? त्यात त्याच ते तोंडातल्या तोंडात काहीतरी चघळणं. आधीच इमारत पाहून आत शिरायची इच्छा होत नव्हती आणि त्यात आता हे असं. वाटलं की इथूनच पळून जावं पण जाणार कुठे ? माझ्यासाठी ते गाव नवीन होतं. गाव की शहर ? म्हणजे शहरीपणा ओढलेला असला तरी त्याचं गावपण लपलं नव्हतं. मी मागे नजर टाकली. माझ्यामागे कुणीही नव्हतं. म्हणजे कुणाला आत यायची इच्छा नसावी. कशाला कोण येईल ? भगदाडाच्या आतील बाजूने ग्रीलचा दरवाजा होता. आता लक्षात आला तो. मी पुन्हा त्या माणसाकडे पाहीलं. त्याच्या चेहर्‍यावरचे भाग तटस्थ होते. आपल्याकडे कुणी आलय, त्याच्याशी बोलावं किंवा विचारपूस करावी अस काही नव्हतचं त्या चेहर्‍यावर. बेफिकीरी होती का ? असावी. काही लक्षात येत नव्हतं हे मात्र खरं. मला पुन्हा पळून जावसं वाटल. त्या वास्तूत काहीतरी भयानक आहे हे जाणवायला लागलं. काय असावं या विचारातच मी मागे पाहील आणि तो ग्रीलचा दरवाजा माझी पुढची हालचाल व्हायच्या आतच स्वतःहून फरपटत बंद झाला.... तो दरवाजा स्वतःहून बंद झाला. मी दचकलो. दिवसाढवळ्या दचकलो. असा कसा तो दरवाजा बंद होऊ शकतो ? काचेचे स्वयंचलित दरवाजे पाहीलेत मी. पण अशा आडगावी असा दरवाजा ? मी त्या माणसाकडे पाहीलं. तो तसाच तटस्थ होता. मला कपाळावर घाम असल्याच जाणवलं. खिशातला रुमाल काढून घाम पुसला आणि पुन्हा एकदा मागे नजर टाकली. ग्रीलचा दरवाजा होता तिथेच होता. मग मी मघाशी पाहीलं ते काय होतं ? भास ? असा कसा भास होऊ शकतो ? रात्रभर झोपलो नाही म्हणून. पेंग होतीच. कधी एकदा झोपतो असही झालं होतं. बहुतेक माझ्यावर आता तिथल्या कोंदट वातावरणाचा फारच वाईट परिणाम होत होता. मी प्रचंड चिडलो. स्वतःवर. कंपनीवर. मला तिथे पाठवणार्‍या मानेवर. कंपनीतल्या सगळ्यांनी कट रचून मला तिथे पाठवलं होतं. त्याशिवाय त्या बडगुजरला कसं कळलं की मी आंबेगावला जातोय ते. सगळ्यांना मानेने सांगितलं असणार. चंपानेरकरने जाणून बुजून ही जागा सांगितली असणार. माझा काटा काढायचा डाव असणार त्या सगळ्यांचा. मी भयानक चिडलो. त्यात झोप डोळ्यावर.

"काय पायजेल ?" ते उघडं जनावरं खुणेने बोललं. नुसतेच हातवारे. तोंडाने बोलेल कसा ? चघळत बसला होता ना. मी कंपनीची बुकींग रिसिट पुढे केली.
एक मिनिट थांबायची खुण. डेस्कखाली हात घालून नंतर त्याने चावी पुढे केली आणि मागोमाग एक रजिस्टर. मी ते भरलं आणि चावी घेतली. तिथे नक्कीच कुणी फिरकत नसणार. त्या इमारतीत माझ्याशिवाय दुसरं कुणी नसणार. त्यामुळे त्याला माझी बुकींग लक्षात राहीली असणार. किंवा यालाही मानेने कटात सहभागी करून घेतलं असणार. असल्या या कळकट, मळकट,जुनाट इमारतीचं लॉजिंग बोर्डींग बनवण्यामागे मालकाचा काय हेतू होता देव जाणे. पण त्यातल्या त्यात शहराच्या मध्यवर्ती भागात आणि एस्टीस्टँडच्या जवळ असल्याने त्याला त्या इमारतीचं दुसरं काही करण्याचं सुचलच नसावं. कोण असेल इथला मालक ? तोही या इमारतीसारखचा असेल का ? चैतन्यहीन.

मागे जेव्हा मला फार स्वप्न पडायला लागली तेव्हा एका अशाच इमारतीमधे माने मला घेऊन गेला होता. तिथली ती माणसं फार विचित्र वागत होती. फिकट निळ्या, हिरव्या पायघोळ कफन्या घातलेली. काही पिंजर्‍यात बंद असलेली. काही बरळणारी, काही स्वतःमधे हरवलेली. भयानक होतं सगळच तिथे. त्या सगळ्या वातावरणात एक चिडचिड.. राग...असलं काहीसं होतं आणि त्यासोबत होतं असहायपण... निर्बलता... दुबळेपणा.... सहन होत नव्हतं ते. तिथले डॉक्टर पण जरा वेगळेच वाटत होते. चेक अपसाठी कपडे काढून कफनी घालायची होती. नकार दिला मी. मी त्यांच्यापैकी एक नव्हतोच. मग कशाला घालू कफनी ? मानेचा काहीतरी डाव असणार मला तिथे नेण्यात. हिप्नॉटीजमचा वापर करून स्वप्नांचं मुळ शोधणार म्हणत होता तो डॉक्टर. मी ठाम नकार दिला. यातही त्या मानेचा हात असणार. कायम माझ्या आयुष्यातल्या गोष्टी विचारत असतो तो. हिप्नोटाईज करून त्याला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं असणार. 'नको नको' म्हणत असताना मानेने मला तिथे ट्रिटमेंटसाठी भरती केलं. मी तरीही कफनी घातली नाही. इंजेक्शन देण्यासाठी शर्टाची बाही वर करा म्हणे. केलीच नाही. कॉलरच बटणसुद्धा उघडलं नाही. दोन दिवसात आलो पळून. अजून एखाद दिवस राहीलो असतो तर वेडा झालो असतो पार.

"परशाssss" रेड्यासारखा रेकलाच तो. दचकलोच मी. कुठूनतरी "आलो" असा आवाज आला आणि मागून एक मिसरुड फुटत असलेलं पोर आलं. रिसेप्शनच्या मागे एक बोळ होता. एक समोर होता आणि एक दारासमोर. पर्शाने आल्याआल्या माझं सामान उचललं आणि तो चालू लागला. मी त्याच्या मागे निघालो. त्या भयाण वास्तूतला तो माझा वाटाड्या होता. रिसेप्शनसमोरचा बोळ तसा अंधाराच होता. इमारतीच्या बाहेरची भिंत आणि ती आतली भिंत यात दोन माणसं जाऊ शकतील इतकाच हमरस्ता होता. वर एक मिणमिणता दिवा होता. बोळाच्या मध्यावर. तेवढाच काय तो प्रकाश. बाकी फक्त अंधार. त्या आतल्या भिंतीच्या मागे काय असेल ?

"इथे चांगला दिवा का नाही लावत तुम्ही ? " असं विचारावसं वाटलं त्याला. पण काय उपयोग ? त्याला तर दिव्याची गरजच नव्हती. त्याच्या सरावाचा रस्ता. माझ्यासारख्या क्वचित येणार्‍या प्रवाशाच्या सोयीचा विचार करणारी माणसं तिथे असतील असं मला वाटतही नाही. परशा मागे न बघताच चालत होता आणि पुढे एक वळण घेऊन थांबला. मला त्या बोळात काहीच दिसलं नव्हतं. भिंतींचा रंग सुद्धा. फक्त पुढे कुणी तरी चालतय इतकचं. बाकी कुणाची काहीच चाहूल नाही. तो थांबला त्या दिशेला मी पाहीलं. ती एक ग्रील होती. त्याने डावीकडचं बटण दाबलं. वरून एक प्रचंड खाकरल्याचा आवाज आला. काय असेल ते ? लिफ्ट ? मी मागे सरकलो. या इमारतीत ? मी ग्रीलपलिकडच्या अंधारात पाहू लागला. एक काळाभोर पाईप त्या काळोखात हलताना दिसला. खाली उतरताना. एखाद्या काळ्या अजगरासारखा. सुस्ताड. त्यात तो खाकरल्यासारखा की घरघरल्यासारखा आवाज.... समोर एक लोखंडी जाळ्यांपासून बनवलेला पिंजरा येऊन उभा ठाकला. परशाने ग्रीलचं दार उघडलं. मागोमाग आतल्या पिंजर्‍याच दार खेचलं. ते विचित्र आवाज करत एका बाजूला झालं. परशा सामानासकट पिंजर्‍यात शिरला.
"या" तो बोलला. पण मी जागचा हललो नाही.
"या" तो पुन्हा बोलला. पण मी हललो नाही. मी त्या पिंजर्‍यात कसा जाईन ? कशाला ? मी काय केलय ? मला पिंजरे आवडत नाहीत. मी लहानपणापासून कधीच घरात पिंजरा ठेवला नाही. पिंजर्‍यात पक्षी, प्राणी कोंडणं मला नाही आवडत. मग मी त्या पिंजर्‍यात का जाऊ ?
"मी नाही येणार पिंजर्‍यात." मी स्पष्ट बोललो. माझं मला ऐकू आलं ते.
"या." तो परत तेच बोलला.
"मी पिंजर्‍यात येणार नाही." मी मागे सरकलो. मागे भिंतीचा थंडगार स्पर्श झाला. भिंत कातळी होती. सिमेंटचा मुलामा नसलेली. काळ्या कातळाच्या भिंतीतला पिंजरा. मी त्यात शिरणारच नव्हतो.
"चवथ्या माळ्यावर जायचय. चला." मी त्याला स्पष्ट नाही म्हटलं ते त्याला ऐकू का येत नाही ? बहिरा आहे का तो ? मी नकारार्थी मान हलवली. माझ्या कपाळावर आलेला घाम मला जाणवला. पायातलं त्राण गेल्यासारखं झालं. मला किंचाळायचं होतं पण घशातून आवाज निघाला नाही. मी लिफ्टमधे शिरणारच नव्हतो.

ती परशाच्या मागे होती. तिचे ते कुरतडलेले पांढरे केस. लोंबकळल्यासारखी मान. खप्पड गाल. डोळ्यांची खोल खोबण. गळ्याभोवतीची हाड... सगळं स्पष्ट दिसलं मला. पण त्या मुर्ख परशाला त्याच्यामागे कोणी आहे याची जाणिवच नव्हती. त्यांने खांदे उडवून दरवाजा खेचला. पण पिंजरा हलला नाही. माझ्यासाठी थांबला असावा. पण मी त्याच्या जबड्यात शिरणारच नव्हतो. तिने महत्प्रयासाने मान उचलल्यासारखं केलं आणि माझ्याकडे पाहील. मी भिंतीला बिलगलो. अचानक तो पिंजरा हलला. मी त्याच्या तोंडात शिरत नाही हे त्याच्या लक्षात आलं. परशाला गिळून तो वर निघून गेला. शेवटी फक्त परशाचे हालणारे पाय तेवढे दिसले. पण मी पुढे सरकलो नाही. समोर तो काळा अजगर दिसत होता. तो त्या पिंजर्‍याला आपल्या डोक्यावर घेऊन चालला होता. मी क्षणभर थांबलो तिथेच. जिना... जिना शोधायला हवा. बिचारा पर्शा... काय होईल त्याचं ? माझा राग त्याच्यावर नाही ना काढणार ती ? काढलाच तर मी काय करू शकणार होतो. पण माणूसकी म्हणून बघायला तर हवच. जिना... ??? नॉर्मली लिफ्टच्या जवळपास असतो. पण ती लिफ्ट होती का ? असावी. नसेल ही. आपण जिना शोधावा. मी पुढे सरकलो. तिथे जिना होता. मी जिना चढायला सुरुवात केली. त्या मधल्या पिंजर्‍याला प्रदक्षिणा घालत जिना वर जात होता. मधे लोखंडी जाळीचे एक सरळसोट चौकोनी कडे होते. मी पुढे सरकत होतो. भिंतीला बिलगून. लोखंडी जाळ्यांपासून लांब. माझा त्या अजगराच्या पिंजर्‍यावर बिल्कूल विश्वास नव्हता. पहिला मजला आला. मी दोन्हीकडच्या बोळात पाहीलं. कुठेच हालचाल नव्हती. काहीच हालचाल नव्हती. बोळात तसेच दोन दिवे. साकळलेल्या अंधाराशी सलगी करणारे. मी दुसर्‍या मजल्याच्या दिशेने निघालो. माझ्या चपलांच्या आवाजाव्यतिरिक्त इतर कसलाच आवाज नव्हता. पण तो घरघरणारा, खाकरणारा आवाज येऊ लागला. तो पिंजरा नक्कीच खाली येत होता. माझ्यासाठी. मला गिळायला. मी जिन्यावर होतो. तो मधेच. कुठल्याही क्षणी कोणत्याही दिशेला तो झडप घालू शकत होता. त्याला अडवणारं होतच कोण ? त्या लोखंडी जाळीशिवाय. तीही फार तकलादू दिसत होती. मी पायांची गती वाढवली. तो दिसला. तो काळाकुट्ट अजगर आणि मागोमाग तो पिंजरा. खाली येत असताना. त्याची चाल मंदावली. मी वेग वाढवला. पण जाणार कुठे ? जिना तर त्याच्या भवतीच होता. तो माझ्याकडेच पहात होता. आशाळभूतपणे. मला लपायलासुद्धा जागा नव्हती. तो मान वळवून वळवून माझ्याकडे पहात होता आणि तीही. ती तिथेच होती. फक्त पर्शा नव्हता. मी भिंतीच्या आधारे धावायला सुरुवात केली. तेव्हाच मला जाणवलं की पिंजरा असहाय आहे. त्याला मी हवा असलो तरी तो स्वतःहून माझी शिकार करू शकत नाही. त्यासाठी मी त्याच्या आत शिरायला हवय. जे मी कधीच करणार नाही. ती त्या पिंजर्‍यात कैद. ती फक्त आत आलेल्या माणसांचीच शिकार करत असावी. मला त्यांची दया आली. त्यांच्या असहायतेची. परशासारखा मी त्याच्यात स्वतःहून शिरावं अशीच त्याची अपेक्षा असणार. पण मी सावध राहणार होतो. फार सावध. तो आवाज थांबला होता. मीही थांबलो. श्वास घेतला. दम लागला होता. घामाने निथळलो होता. घाबरून ??? छे.. छे... घाबरून नाही. धावून.. सवय नाही आताशा. धावायची. पुवी पेपर टाकताना धावायचो. आता नाही जमत.

"सायेब" मी दचकलो. परशाचा आवाज. तो जिवंत होता. कसं शक्य आहे ? पण आवाज तर त्याचाच होता. मी आजूबाजूला पाहीलं. डावीकडच्या बोळात कुणीतरी होतं. मी निरखून पाहीलं. तो परशा होता. तो वाचला होता.
"तू वाचलास ?" मी त्याला विचारणार होतो. पण नाही विचारलं. कदाचित तो त्या अजगराचाच चाकर असेल. त्याच्यासाठी शिकार आणणारा. तो त्याला कशाला गिळेल ? तिचाही असू शकतो. ती आत असून त्याने कुणीच आत नसल्यासारखा निर्विकार चेहरा ठेवला होता. तो माझ्याजवळ आला.
त्याने हात पुढे केला आणि माझ्या डाव्या हातातली चावी काढून घेतली. तो पुन्हा बोळात शिरला. थोड्यावेळात त्या अंधारात एक प्रकाशाची तिरीप आली. उघडलेल्या दारातून. मी लिफ्टकडे नजर टाकली आणि पुढे गेलो. त्याने सामान आत ठेवलं होतं.
"टॉवेल, साबण ठेवलाय. तिथे जगमधे पाणी हाय. टिव्ही बंद हाय. एक फेस गेलाय. संध्याकाळी लाईट येल. अजून काय पायजेल ? त्या फोनवर नव नंबर लावला की खाली फोन लागतो. काय पायजेल ते सांगायचं.." मी आत शिरताच सगळं धाड धाड बोलून तो बाहेर पडला आणि त्याने दार लावलं. मी त्या खोलीत बंदीस्त झालो. मी पटकन कडी लावून घेतली. आता मी सुरक्षित होतो.

मी समोर पाहीलं. खिडकीचा पडदा किंचित उघडा होता. प्रकाशाची एक तिरिप तिथूनच आत येत होती. मी पुढे जाऊन तो पडदा ओढला. आता खोलीत प्रकाश नव्हता. बोळातल्यासारखा काळाकुट्ट अंधारही नव्हता. खोलीत फार काही सामान नव्हतं. मी बुट काढले, त्यात सॉक्स ढकलले. बॅग कपाटात टाकली अणि अंग खोलीतल्या एकमेव पलंगावर झोकून दिलं. माने, चंपानेरकर, बडगुजर यांचा काहीही डाव असला तरी मी त्यांना पुरुन उरणार होतो. पण त्या लिफ्टच काय करायच ? आणि तिचं ? मी डोळे मिटून घेतले. रात्री झोप नीट झाली नव्हती.
घर बदलून मी लिफ्टपासून माझा पिच्छा सोडवून घेतलेला. पण आज पुन्हा ती आणि ती लिफ्ट दोघी परत आल्या होत्या. पळून जावं का ? खड्ड्यात गेलं काम. पण नोकरी जाऊ शकते. माने टपलेलाच आहे. बेकार झालो तर पुन्हा उपासमार. नको. काम संपवूनच जाऊ. पळून गेल्यावर 'का पळालो ?' याचं काय उत्तर देणार ? आपण ती आणि त्या लिफ्टच्या वाट्याला जायचच नाही. लांब राहायचं. मग काही होणार नाही.

आवाजाने जाग आली. पण कशाचा आवाज ते कळलं नाही. मी डोळे उघडले. समोर अंधाराशिवाय काहीच नव्हतं. अजून झोपेचा अंमल होताच डोळ्यांवर. मी मोबाईलसाठी साईड टेबल चाचपडलं. पण हाताला काही लागलचं नाही. मी पुन्हा चाचपडलं. जागा रिकामी होती. काल रात्री तर टेबल तिथेच होतं. आता कुठे गेलं ? मी वळून पाहीलं. टेबल तिथे नव्हतचं. मी दचकलो. कारण समोर कोणीतरी होतं. काळपट सावली. डोळे अंधाराला सरावू लागले. स्पष्ट दिसत नसलं तरी कुणी तरी होतं. मी धडपडत उठलो. समोर पाहीलं. आता फक्त शरीर दिसत होत. धड फक्त. डोकं नव्हतच. मग लक्षात आलं की तो आरसा होता. पण घरात या दिशेला आरसा ? नव्हताच. पण ते घर होतच कुठे ? आपण आंबेगावातल्या लॉजमधे आहोत. माझ्या लक्षात आलं. आता सगळं स्पष्ट होतं. पण तो आवाज ? तो कसला होता. मी दाराकडे पाहीलं. ते बंदच होतं. मी बाथरुमचा दरवाजा उघडून पाहीलं. आत कोणीच नव्हतं. मी तिथे एकटाच होतो. मग तो आवाज कसला ? मी परत एकदा संपुर्ण खोलीत नजर फिरवली. खोलीत आता अंधार साकळला होता. प्रकाशाच्या त्या तिरिपा केव्हाच नाहीश्या झाल्या होत्या. हे आधीच लक्षात यायला हवं होतं. मी खोलीवर सावकाश नजर फिरवी लागलो.

दहा बाय दहाची खोली. एक सिंगल पलंग. एक कपाट, एक खुर्ची, एक टेबल,त्यावर फोन, एक रिमोट, पाण्याचा जग, एक टिव्ही आणि एक आरसा. इतकचं होतं तिथे. आवाज कशाचा होता तो ? दिवा लावायला हवा. बटण कुठे आहे ? पण लाईट आहेच कुठे ? एव्हाना नजर अंधाराला सरावली. मी पलंगावर बसलो. समोरच्या आरशात मीच होतो. बसलेल्या अवस्थेत. मी स्वतःला पाहीलं आणि आरशातला 'मी' उठून उभा राहीलो. दचकलोच मी. आरशातला 'मी' चिडलेला होता. येरझारा घालायला लागलो. तो 'मी' माझ्याकडेच रागाने पहात होता. कशाला ? मी मात्र मुकाट बसून. त्याच्या रागाने काच तडकेल की काय असं वाटू लागलं. अंधारासोबत भीती साकळायला. आपलं प्रतिबिंब विचित्र वागतेय हे पहिल्यांदाच होत होतं. अचानक जांभईचा आवाज घुमला. मी दचकून वळलो. समोरच्या लाकडी खुर्चीने आळस दिला होता. तिचे दोन्ही हात पसरले होते. मागच्या आडव्या पट्ट्यांनी 'आ' वासला होता. तिने उठून कंबर मोडली आणि मागचा पाठ टेकायचा भाग आणि बसायचा भाग सरळ रेषेत आले. ती चालत माझ्या समोरच्या भिंतीसमोर येऊन, एक पाय दुमडून, टेकून, हाताची घडी घालून, माझ्याकडे पहात उभी राहीली. डोळे नव्हतेच तिला. पण ती माणसं ज्या पद्धतीने पहात उभी राहतात. त्या पद्धतीने ती उभी होती. मी आवंढा गिळला. हे काय होतय तेच कळत नव्हतं. त्याचवेळेस टेबलाने अंग झटकले. टेबलावरचा फोन, रिमोट आणि पाण्याचा जग खाली पडले. फोनचा रिसिव्हर बाजूला पडला. मधली वायर वळळू लागली. रिसिव्हर पुढे जाऊ पहात होता. पण ती वायर त्याला पुन्हा मागे खेचत होती. रिमोटच्या आतल्या बॅटर्‍या बाहेर पडल्याने त्याच्यातला जीवच गेला होता. जगातलं पाणी बाहेर पडता पडता थांबलं. ओघळलचं नाही. तेही झाकण द्सरीकडे पडलेलं असताना. मागचे दोन पाय लांब करून टेबलाने एक आळस दिला. मग पाय झटकले आणि माझ्याकडे वळले. माझ्या शरीरातील एकेक रक्ताचा थेंब आता थंडगार व्हायला लागला होता. समोर जे घडत होतं ते कल्पनेच्या पलिकडे होतं. तेवढ्यात कपाटाचे दरवाजे उघडले आणि आतून माझी बॅग बाहेर पडली. बॅगेची चैन उघडली गेली आणि त्यातून तिने मान बाहेर काढली. तिच्यामागोमाग वातावरणात थोडा प्रकाश येऊ लागला. आता सगळचं चित्र स्पष्ट होतं. आरशातला 'मी' वैतागून येरझारा घालत होतो. खुर्ची अजूनही भिंतीला टेकून मला पहात होती. टेबलाने पुढचे दोन्ही पाय कोपर्‍यात दुमडावे तसे दुमडून त्यावर चेहरा ठेवावा तसा टेबलाचा कोपरा ठेवला आणि दोन्ही हात पलंगावर ठेवले. कुणीतरी निरागसपणे पहावं तसं. पण त्यालाही डोळे होतेच कुठे ? ती मात्र शरीराचं मुटकुळं करून तशीच बॅगेत बसलेली. मानेच्या वरचा भाग बाहेर. तेच कुरतडलेले केस, खप्पड गाल वगैरे... फक्त ते खोबणीतले डोळे माझ्याकडे टक लावून होते. .... आणि टिव्ही सुरु झाला.

टिव्हीत एक मुलगा होता. खुर्चीला जखडून बांधलेला. दहा वर्षांचा. अर्ध्या चड्डीत. तोंडात बोळा. ती त्याच्या समोर होती. तरुण, लांबसडक केस, हातात ग्लास, तोंडात सिगरेट. तिने धूर त्या मुलाच्या तोंडावर फेकला.
"सांगशील परत लोकांना ? सांगशील ? " तिने सिग्रेट त्याच्या हातावर दाबली. तो किंचाळला असावा. पण आवाज फुटला नाही. बोळा होता ना तोंडात. वेदना त्याच्या डोळ्यात दिसत होती. त्या जखडलेल्या अवस्थेतही त्याने हात पाय झाडायचा प्रयत्न केला. त्वचा चरचरली होती. तिने पुन्हा सिग्रेट पेटवली. आता हातांवर नवीन डागासाठी जागाच नव्हती. तो कळवळत होता.
"तू आता माझा गुलाम आहेस. तुझं कुणीच नाही. मी सांगेन तेच तुला करावं लागेल." तिच्या या वाक्यावर त्याने पटकन होकारार्थी मान डोलावली. ती हसली. भेसूर हसली. संपत आलेली सिग्रेट त्याच्या मांडीवर विझवली. तो पुन्हा एकदा जिवाच्या आकांताने किंचाळला. आणि दार ठोठावलं गेलं. ती दाराकडे वळली. जोरजोरात थापा. फारच जोरात. कानात बसेपर्यंत.

मी खाडकन उठलो. समोर आरशात मीच होतो. झोपेतून उठलेला. आधी काही कळलच नाही. मग गोष्टी लक्षात यायला लागल्या. मी हॉटेलच्या रुममधे होतो. झोप लागली होती मला. अंधार वगैरे काहीच नव्हतं. खुर्ची, टेबल, कपाट आपापल्या जागी होते. टिव्ही बंद होता. पण दार वाजत होतं. मी उठून धडपडत दाराकडे गेलो. कडी काढली. समोर पर्शा होता.

"फोन उचलला नाय तुम्ही. तुम्हाला न्यायला गाडी आलीय खाली." पर्शा आल्यापावली निघून गेला. मी घड्याळात पाहीलं. एक वाजला होता दुपारचा. आंघोळ आटोपली, कपडे बदलले आणि निघालो. दाराला टाळ लावताना जाणवलं की शर्टाच्या बाह्यांची बटणं लावलीच नव्हती. ती लावली. जिन्याकडे वळलो. समोर फक्त ग्रील होते. पिंजरा नव्हताच तिथे. खाली असावा. मी खाली निघालो. भिंतीला बिलगत. पण तो आलाच तेवढ्यात. मी पाहीलच नाही त्याच्याकडे. खाली धावलो. रिसेप्शनला पोहोचेपर्यंत दम लागला. तो उघडाबोडका तिथेच होता. त्याने विचित्र नजरेने पाहीलं माझ्याकडे. मी लक्ष दिलं नाही. बाहेर पडलो. बाहेर जुनी मारुती ८०० होती. मी गाडीत बसून निघालो. जाता जाता जेवण उरकून घेतलं.

निघताना कंपनीच्या कॅन्टीनमधेच रात्रीचं जेवण घेतलं उरकून. त्या कळकट हॉटेलात खाण्याजोगं काही असेल अस मला बिल्कुल वाटत नव्हतं. आणि असलं तरी खाता येईल की नाही, ही शंका होतीच. पुन्हा ती जुनाट ८०० निघाली आणि मी बाहेरच्या अंधारात पाहू लागलो. दुरवर कुठे तरी दिवे चमकत होते.

वयाच्या दहाव्या वर्षी मी घर सोडून पळालो होतो. मजल दरमजल करत आयुष्याने मुंबईत आणून सोडलं. फुटपाथवर जगता जगता शेवटी एक दिवस स्वतःच घर झाल. एन्टॉप हिलला बर्‍याच जुनाट बिल्डींग्स होत्या. माझीही त्यातलीच. फारच जुनाट. आणि तशीच ती लिफ्ट. ग्रीलवाली. पिंजरा असलेली. माझ्या बजेटमधे बसलं ते घर. आधीच्या मालकाला कोणत्याही परिस्थितीत ते घर सोडायचं होतं. का ? कशासाठी ? माहीत नाही. मला स्वतःच घर हवं होतं. मी घेतलं. लिफ्ट दिसायला भयाण असली तरी पाचव्या माळ्यावरून खाली ये जा करणं वैताग होता. मग वापरण्याशिवाय पर्याय नव्हता. अधूनमधून ती बिघडत असे. तिथल्या शांततेला भंग नको म्हणून तिचा गळा आवळण्यात आला होता. चुकून उघडी राहीली तरी त्याचा कानात किरकिरणारा आवाज होत नसे. कधी कधी ती सुतासारखी सरळ असायची. पण कधी कधी तिला फेफरं यायचं. दरवाजा नीट बंद होत नसे. झालाच तर ती चालू होत नसे. कधी कधी दरवाजा अर्धवट बंद असला आणि वर कुणी बटण दाबलं तर ती चालू होत असे. एक दोन अपघात घडले होते. पण बिल्डींग इतकी जुनी होती की लोक या सगळ्या गोष्टींना सरावले होत. पण बाकी छान होतं. एक छोटीशी बेडरुम, एक किचन आणि छोटा हॉल. सर्वात शेवटची खोली. कुणाचा त्रास नाही की कुणाशी काही घेणं देणं नाही. मी सुखात होतो. पण सुख टोचत होतं. मी कधीच कुणाचं काही बाकी ठेवलं नव्हतं. एक बाकी अजून चुकवायची होती.

शेवटी मनाचा हिय्या करून एक दिवस माझ्या मुळ गावी गेलोच. माझ्या जुन्या घरी. मोडकळीस आलेलं ते पार. माझी सावत्र आई अजून तिथेच राहात होती. म्हातारी झालेली. ५० ओलांडलेली. पण होती धडधाकट. तिने मला ओळखलं नाही. पण मी तिला ओळखलं. तेच ते लांबसडक केस. पांढरे झालेले. पण होते तसेच. चेहर्‍यावर ती मग्रुरी. ती सगळ्यांना तुच्छ लेखण्याची सवय. ते सगळचं होतं. मी माझी ओळख दिली सगळ्यांना. शेजारी पाजार्‍यांनी माझी चौकशी केली. मग कुणीतरी म्हणालं की म्हातारीला सोबत घेऊन जा. तीही तयार झाली. मला अपेक्षा नव्हती. पण एकटेपणाला कंटाळली असावी. पण मी का न्याव तिला माझ्याबरोबर ? मी मनाची समजूत घातली. गावातलं सगळं काही विकून तिला घेऊन निघालो. दोन सुटकेस भरून सामान होतं हातात. मी घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. त्या दोन सुटकेस लिफ्टमधे टाकल्या आणि वर नेल्या. उचलून नेणं शक्यच नव्हतं.

करकचून ब्रेक मारत गाडी थांबली.

"तिच्याआयला या मांजरीच्या." ड्रायव्हर खेकसला. मांजर आडवी गेली होती. अपशकून झाला होता. पुढच्या दहाव्या मिनिटाला मी त्या भगदाडाच्या आत होतो. तो बोडका तसाच बसलेला अजून. तो बहुतेक तिथून हलतच नसावा. शरीरधर्मासाठी तरी उठत असेल का तो ? उगाच काहीही मनात आलं. मी चावी घेऊन वर निघालो. लिफ्टजवळ येताच मान वळवली. जिना गाठला. डोळे मिटून जिना चढायला सुरुवात केली.

"साहेब, तुमची खोली चौथ्या मजल्यावर हाय." पर्शाच्या आवाजाने माझी तंदी भंग केली. मी पाचव्या मजल्याच्या पायर्‍या चढत होतो बहुतेक. तो पलिकडे होता. चेहरा दिसत नव्हता. पण तो होता. मी माझ्या बोळात वळलो. खोली उघडून आत शिरलो. ट्युब लावली. पंखा ऑन केला. एक कर्कश आवाज करत तो फिरला. त्याच्या वाढत्या वेगाबरोबर वाढणारा कर्कश आवाज बंद झाला. सगळं काही आपापल्या जागी होतं. मी टिव्ही लावला. बातम्या पाहायला बसलो. इतक्यात झोप येणं शक्य नव्हतं.

बारा वाजत आले. मी मोबाईलवर अलार्म लावला. सकाळी सातचा. आठला गाडी येणार होती. खिशातून गोळी काढली. पाण्याच्या एका घोटाबरोबर गिळून टाकली. आता काहीही झालं तरी पुढे सहा तास मी उठणार नव्हतो. ती झोपेची गोळी सहा-सात तास मला सहज झोपवायची.

पुढचे दोन दिवस काम उरकण्यात गेले. रिपोर्ट तयार झाला. मी परतलो. दुसर्‍या दिवशीची माझं परतीचं तिकीट होतं. दोन दिवस बरीच दगदग झाली होती. रात्री गोळी घेऊन झोपायचं माझ ठरलं होतच. मी टिव्ही लावला. सिनेमा लागला होता एक जुना. बारा वाजले असावेत. पेंग यायला लागली होती. सिनेमा अजून थोडा बाकी होता. यावेळी चुकवायचा नाहीच असं ठरवलं. मी डोळे ताणून पहायला सुरुवात केली. थोडा वेळ असाच गेला. मग काहीतरी घडतय याची मला जाणिव होऊ लागली. मी बसलो होतो तो पलंग किंचीत हलत होता. किंचितच. खालून कोणी हलवत असल्यासारखा. मी उठणार तोच दोन्ही बाजूने गादी माझ्या पायांवर गुंडाळली गेली. खुर्ची परत आळसावून उभी राहीली. टेबल मागच्या दोन पायांवर उभं. कपाटातून पुन्हा बॅग बाहेर आणि बॅगेतून तीच. पांढर्‍या, कुरतडलेल्या केसांची म्हातारी. मी आरशाकडे पाहीलं. आरशातला मी निवांत पाय पसरून बसला होता. आरशातल्या पलंगावर. त्याने माझ्याकडे एकदा पाहिलं आणि तो पुन्हा टिव्ही पाहण्यात गुंग झाला. मला प्रचंड ओरडायची, हातपाय आपटायची इच्छा होत होती. पण मी जखडलो होतो त्या पलंगाशी. समोरच्या टिव्हीतलं दृष्य बदललं. तिथे एक सुटकेस होती. कुणीतरी ती सुटकेस उघडली. आत एक बाई होती. त्याने तिला उचलून खुर्चीत बसवलं. मग शांतपणे तिला साडीने खुर्चीत करकचून बांधलं. तिच्याच एका ब्लाऊजचा बोळा बनवून तिच्या तोंडात टाकला. तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणलं. तिला शुद्ध येताच तिने सुटकेचा निष्फळ प्रयत्न केला. तिच्या बाजुला उभ्या असलेल्या माणसाने माझ्याकडे पाहीलं. दात विचकले त्याने. मग तो तिच्याकडे वळला. त्याच्या उजव्या हातात कात्री होती. त्याने हळूहळू तिचे केस कापायला सुरुवात केली. त्याच्या मनाचं समाधान झाल्यावर त्याने तिच्याकडे एकदा पाहीलं. तिच्या डोळ्यात वेदना होती. अजीजी होती. विनवणी होती. पण तो फक्त हसला. त्याने आरसा उचलून आणला आणि तिला दाखवला. तिला किंचाळावसं वाटलं असेल कदाचित. पण कशी किंचाळणार बिचारी ? तिचे केस उंदराने कुरतडल्यासारखे दिसत होते. तो भेसूर हसला. खिशातून सिगरेटचं पाकीट काढून त्याने तिच्याकडे पाहीलं. भीती तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसली. तो काय करणार याचा तिला अंदाज आला होता. त्याने सिग्रेट शिलगावली. मग एकेक चटका. एकेका अंगावर. हातावर. मांड्यावर. ती वेदनेने किंचाळू पहात होती. पण शक्य नव्हतं. एकेका चटक्यासरशी ती खंगत होती. विझत होती. कोमेजत होती. तो निघून गेला आणि ती तशीच बंदीस्त अवस्थेत. तिच्या भोवती अंधार साकळला. तेवढ्यात त्या खोलीत दिवा लागला. तो परतला होता. पुन्हा त्याने सिग्रेट पेटवली. ते सगळं बघवत नव्हतं. पण बघण्याशिवाय पर्याय नव्हता. डोळ्यादेखत ती शरीराने धष्टपुष्ट असलेली बाई एका खंगलेल्या म्हातारीत परावर्तित झाली होती. कुरतडलेले केस, खप्पड गाल, डोळ्यांची खोबण.

माझ्या चारीबाजूला त्या सगळ्या गोठलेल्या किंकाळ्या होत्या, ज्यांना आता आवाज मिळाला होता. पण मला कान बंद करता येत नव्हते. किती दिवसाच्या त्या किंकाळ्या होत्या कोण जाणे ! अचानक त्याने तिला मोकळं करायला सुरुवात केली. ती मोकळी होती. पण खुर्चीत होती. त्याने खुर्चीला लाथ घालताच ती खाली कोसळली. त्याने जाऊन खोलीचा दरवाजा उघडला. ती खुरडत बाहेर निघाली. तिच्या चेहर्‍यावर सुटकेचा आनंद होता. तो ती लपवत नव्हती. तिच्या खुरडण्याला वेग आलेला. ती खोलीच्या बाहेर निघाली. जिन्याच्या दिशेने. तो झपाट्याने चालत तिच्या पुढे आला. त्याने लिफ्टचा दरवाजा उघडला. ती जिन्याकडे वळली, पण त्याने तिचा रस्ता अडवला. तिला लिफ्टकडे वळवलं. ती नाईलाजाने खुरडत लिफ्टमधे शिरली. त्याने तळमजल्याचं बटण दाबून दरवाजा बंद केला.

त्याच वेळी टिव्हीची काच तडकली. टिव्हीतून धुर येऊ लागला. संपुर्ण खोली आता भुकंपाच्या हादर्‍याने थरथरावी तशी थरथरू लागली. भिंतीचं प्लास्टर कोसळू लागलं. त्यांना चिरा पडू लागल्या आणि खोलीच्या भिंतीतून ग्रील बाहेर येऊ लागल्या. चारही बाजूने ग्रील बाहेर पडल्या. त्या खोलीची लिफ्ट होऊ लागलेली. ती खोली आता आक्रसू लागली. खोलीच्या पलिकडे फक्त अंधार होता. ग्रीलच्या मधून आरसा, टिव्ही, खुर्ची, टेबल, कपाट सगळ्यांनी अंग काढून घेतलं. मागच्या अंधारात ते दिसेनासे झाले. फक्त ती बॅग आणि बॅगेतली ती. ती बॅग तिच्यासकट आता पलंगावर होती. ग्रील आता पलंगाच्या चारी बाजूला. मी त्या पिंजर्‍यात बंदीस्त. मी विस्फारलेल्या डोळ्यांनी तिला पहात होतो. तिने मान वर उचलली. तिच्या खोबणीतले डोळे लकाकले. ती हसली. फारच भेसूर. ग्रील आक्रसायला लागले. पिंजरा छोटा होत होता. पलंगाच लाकुड तुटत होतं, मोडत होतं. बेडशीट टराटरा फाटू लागलं. त्याच्या पट्ट्या तयार होऊ लागल्या. तीच कथा तिथल्या चादरीची. गादीमधला कापूस आता बाहेर पडू लागलेला. त्याला पीळ पडायला सुरुवात झाली. आता ती बॅगेसकट बाहेर आणि मी त्या पिंजर्‍यात कैद. अधांतरी असलेली तिचं मुडकं आणि ते खोबणीतले डोळे मात्र त्या अंधारात दिसत होते. चादरीच्या पट्ट्यांनी मला गुंडाळायला सुरुवात केली. फक्त डोळे तेवढे उघडे ठेवले. त्या पलंगाची आता खुर्ची झालेली. त्यावर मी बसलेल्या अवस्थेत. कापसाच्या दोरखंडाने मला त्या खुर्चीत करकचून बांधलं. पण माझ्या डोळ्यात भीती नव्हती. अजिबात नव्हती. पिंजरा दाराकडे सरकायला लागला. दारातून आरपार गेला. बाहेर लख्ख दिवे लागलेले. दुपारच्या बाराला बाहेर असतो तेवढा प्रकाश त्या अंधार्‍या बोळात होता. त्या बोळातील दरवाजे उघडत गेले. आतून माणसं बाहेर यायला लागली. फिक्कट निळसर, हिरवट, पांढरे झगे घातलेली. डोळ्यात निव्वळ वेडेपणाची झाक असलेले. वेड्यांच्या हॉस्पिटलमधे असणार्‍या मनोरुग्णांसारखी. जिंवत प्रेतासारखी दिसणारी, पण हलणारी, हसणारी माणसे. पिंजरा पुढे सरकत सरकत लिफ्टपाशी आला. लिफ्टला बिलगला. लिफ्टचा दरवाजा ओढला गेला. पिंजर्‍याची लिफ्टला बिलगलेली ग्रील विरघळली. पिंजर्‍याने मला खुर्चीसकट आत फेकलं.

लिफ्टचा दरवाजा बंद झाला. त्यासरशी बाहेरचा उजेड मावळला. एक भयाण अंधार लिफ्ट आणि अवतीभवतीचं सगळा परिसर व्यापून होता. लिफ्ट हलली. पण ती खाली जात नव्हती. वरही जात नव्हती. हळूहळू डोळे त्या अंधाराला सरावले. म्हातारी समोर उभी होती. खोबणीतल्या डोळ्यातून माझ्याकडे बघत. भेसूर हसत. आता भीती माझ्या डोळ्यात साकळायला लागलेली. लिफ्टचा वेग वाढत होता. ती डाव्या उजव्या बाजूला फिरता फिरता अचानक वर गेली आणि दुसर्‍याच क्षणाला खाली जाऊ लागली. मी डोळे गच्च मिटून घेतले. लिफ्ट हवेत फेकली गेल्याचा मला भास झाला. मी डोळे उघडले. समोर निळ आकाश होतं. लिफ्ट हवेत होती. पण थोडावेळच. समोरचं चित्र बदलू लागलं. आधी इमारतीची गच्ची, मग इमारतीचे मजले, मग विजेच्या तारा. लिफ्ट खाली जात होती. मग एक भयाण आवाज आणि लिफ्ट रस्त्यावर कोसळली. लिफ्ट वेड्यासारखी आता रस्त्यातून धावत होती. रस्त्यातल्या गाड्या चुकवत. वेगाने. रस्त्यात एकच हलकल्लोळ होता. जो मला जाणवत होता. पण डोळ्यांना फक्त समोरचं दिसत होतं. पुढे एक चौक होता. लिफ्ट त्या दिशेला धावू लागली. सिग्नल लाल झाला. डाव्या बाजूने हॉर्नचा आवाज आला. तिथून एक चाळीसफुटाचा कंटेनर येत होता. हॉर्नचा आवाज वाढत होता आणि लिफ्टचा वेगही. पुढच्याच क्षणी लिफ्ट ट्रेलरवर आदळली. कंटेनर डचमळला. कलंडला. लिफ्टवर. लिफ्ट त्या खाली चेपली. आणि त्यात असलेली तीसुद्धा. खोबणीतले डोळे आता बाहेर आले होते.

मी गर्दीत उभा ते सगळं पहात होतो. गर्दी वाढली आणि मी बाहेर पडलो. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला वळलो. समोरच्या दुकानातून एक सिगरेट घेऊन शिलगावली. गर्दी आता पांगत होती. मागे अलार्म वाजला. कानाजवळ. मी ताडकन उठलो. मोबाईलचा अलार्म वाजत होता. मी खोलीवर नजर टाकली. सगळं काही जागच्याजागीच होतं. रात्री सिनेमा बघता बघताच पेंगलो वाटतं. आवरलं आणि बाहेर पडलो. तोच जिना. तीच भिंत. तेच बिलगणं. तोच बोडका माणूस. मी त्या भगदाडातून बाहेर पडलो. खांद्याची बॅग सावरताना उजव्या हाताच्या बाहीचं बटण निघालेलं जाणवलं. ते लावलं. स्टँडवर पोहोचलो. बस लागलेलीच होती. निघालो. फारच पुढची सीट होती. बाजूला एक पिकल्या केसांची म्हातारी बसलेली. फारच बोलत होती. मी कान कसे बंद करावे या विवंचनेत. मी डोळे मिटून घेतले.

अचानक बसमधे गलका वाढल्याचं जाणवलं. डोळे उघडून पाहीलं. जो तो पुढे पहात होता. ड्रायव्हरच्या मागच्या जाळीवर गर्दी होती लोकांची. मधल्या दरवाज्याच्या काचेवरही. काही जण खिडकीतून वाकून बाहेर पहात होते. मला कळेना की काय चाललयं. मी उठलो. गर्दीतून मान उंचावून पलिकडे पाहीलं. रस्त्यावर बसच्या पुढे लिफ्ट होती. अंतर राखून. तो उघडा बोडका त्या लिफ्टच्या टपावर बसलेला. लिफ्टची शेपटी असावा तसा तो काळा अजगर लिफ्टच्याभोवती रस्त्यावर वळवळत होता. लोकांचा गलका वाढत गेला. अचानक वळवळणार्‍या त्या शेपटीने कंडक्टरसमोरच्या काचेवर धडक दिली. कंडक्टर एका बाजुस कलंडला. त्याच्या मागचा दरवाजा फोडून शेपटी आत आली आणि तिने माझा गळा धरला. पुढच्याच क्षणी मी हवेत होतो. मी डोळे घट्ट मिटून घेतले. वळवळणार्‍या शेपटीने गरगरा फिरवत मला लिफ्टच्या आत आदळले. लिफ्टमधेच आदळला जाताच मी वेदनेने कळवललो. खाडकन डोळे उघडले. ती माझ्या समोर होती. माझ्याकडे बघत. मी तिचा गळा धरला. ती ओरडली. तिचे डोळे बाहेर येऊ लागले. कुणीतरी माझे हात धरुन सोडवायचा प्रयत्न करत होते. पण मी तिचा गळा सोडत नव्हतो. माझे हात खेचणार्‍याच्या हातात माझ्या शर्टाची बाही आली. बाही ओढली गेली. बटण तुटलं. बाही फाटली. माझ्या हातावरचे सिगरेटचे चटके स्पष्ट दिसले. हात ओढणार्‍याने दचकून माझा हात सोडला. माझ्या हातातला जोर वाढला. तेवढ्यात डोक्यावर काहीतरी जोरात बसलं. हाताची पकड सैल झाली. शुद्ध हरपत असल्याची जाणिव होत होती आणि कुणीतरी म्हणालं,"येड्याने जीवच घेतला होता म्हातारीचा."

किती काळ बेशुद्धीत गेला ते कळलच नाही. क्दाचित एखादा दिवस किंवा दोन... मधे शुद्ध आल्याचं अंधुक आठवतं. शुद्ध आली तेव्हा समोर माने होते. बहुतेक इन्स्पेक्टरशी बोलत होते.

"झोपेत तो विचित्र हातवारे करत होता. विचित्र आवाज काढत होता. त्याला काय होतय ते बघायला शेजारची म्हातारी वाकली आणि याने खाडकन डोळे उघडून तिचाच गळा धरला. सोडता सोडेना. कोण कुठची म्हातारी... तिचा जीव का घेत होता ?"
"काही कळत नाही साहेब. कंपनीच्या कामासाठी पाठवला होता. हे सगळं काय झालं ते कळलच नाही. तुम्ही बोलावलत म्हणून तातडीने आलो."
"याच्या संपुर्ण अंगावर हे सिग्रेटचे चटके कुणी दिलेत ?"
"माहीत नाही साहेब. पहिल्यांदाच बघतोय."
"तुम्ही गेली दोन वर्षे त्याच्याबरोबर काम करताय आणि हे पहिल्यांदाच पहाताय ? "
"साहेब तो लांब हाताचे शर्ट घालतो. गळा आणि हाताची बटणं कायम लावतो. त्याच्या अंगावर कसल्या खुणा आहेत ते कसं कळणार ?"
"हा माणूस वेडा आहे का ?"
"वेडा ? तसं म्हणतात सगळे. एकतर तो कुणाशी बोलत नाही. कुणाशी काहीच संबंध नाही. कुणी मित्र नाही. कुणाकडे जात नाही. कुणाला घरी नेत नाही."
"हं... असतो एखाद्याचा एकलकोंडा स्वभाव."
"पण एखादा माणूस लिफ्टला का घाबरत असेल ? "
"हा माणूस लिफ्टला घाबरतो ?"
"हो. आठव्या माळ्यावर ऑफिस आहे आमचं. लिफ्टच्या दिशेला जात सुद्धा नाही. जिन्याने येतो जातो. म्हणजे आधी जायचा. पण गेले सहा महिने तो त्या बाजूला फिरकत नाही."
"असतो एखाद्याला एखादा फोबिया. करायचं काय ते सांगा."
"साहेब, जमलं तर मिटवून टाका. तसा निरुपद्रवी माणूस आहे तो."
" ठिक आहे."

मी पुन्हा डोळे मिटले. निरुपद्रवी माणूस ! होतोच मी. पुन्हा माझ्या जन्मगावी जाईपर्यंत. त्या रात्री परतताना ट्रेनमधे तिला निवांत झोपलेलं पाहीलं आणि अंगावरचा एकेक सिगरेटचा चटका पुन्हा चरचरायला लागला. गाडीतच तिला बेशुद्ध केलं. एक सुटकेस रिकामी केली. कोंबली तिला त्यात. घरी आणली. बेडरुमच्या खिडक्यांपासून एकेक छिद्र बंद करून टाकलं. एकेका चटक्याचा हिशोब घेतला. मग दिलं सोडून. टाकली लिफ्टमधे. लिफ्ट खाली पोहोचली आणि जाणवलं की ती पोलिसात गेली तर ? मला पुन्हा बंदीस्त आयुष्य जगायचं नव्हतं. खाली ग्रीलचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. म्हातारी बहुतेक निसटत होती. मी बटणं दाबलं आणि लिफ्ट चालू झाली. पण वर आली नाही. खाली धावलो. म्हातारीची फक्त मान बाहेर आलेली. बाकी शरीर लिफ्टमधे. तिच्या बाहेर आलेल्या मानेने लिफ्ट अडकली होती.

म्हातारी मेली. ती कोण ? कुठून आलेली ? कशी अडकली ? कुणाला काहीच कळलं नाही. सगळं ठिक झालं. पण या लिफ्टचं काय करू ? ती आजही माझा शोध घेत आहे. माझा जरा डोळा लागला की ती येते. आता परत पेंग येतेय. गोळ्या कालच संपल्यात. पण मी झोपणार नाही. झोपलो तर ती लिफ्ट.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौतुक, धन्स.. कालच आपण बोललो आणि आज तुम्ही कथा टाकलीत पण.... आता वाचते आणि कथेवर प्रतिसाद देते सावकाश.... Happy

आपले नेहमीसारखेच लेखन... पण वेगळे..हॉलिवूड कथानक टाईप आहे.याचा ना त्याला संबंध...मग शेवटी जर कळतं,हे असं होतं होय.पण तरी पटत नाहीच..तो टिव्हीतला १० वर्षाचा मुलग म्हणजे तो पळून गेला तो... ती म्हातारी म्हणजे ती त्याची आई अशी लिंक आहे असे वाटत आहे.हे सगळी स्वप्नं म्हणजे त्याचे मधल्या काळातले अनुभव..सम्थिंग रुपक टाईप आहे..दोन-चार वेळा वाचावी लागणार सावकाश.. Happy

इल्लॉजिकल बर्‍याच गोष्टी आहेत...ती कथाही तशीच वाचायची आहे... हे तत्व समोर ठेऊनच... तरच त्या कथेची मजा येते... बरोबर ना शिरोडकरजी??

बाप्रे! Sad

पण ती म्हातारी कशी मेली ते कळालं नाही कारण लिफ्ट उघडी असताना पुन्हा वर येत नाही. कदाचित मला पुन्हा वाचावी लागणार पण हिंमत नाहीये Sad

कोणी तरी सांगा

नंदिनी... +१११११११!!
जब्बरदस्त कथा!

ग्रीलवाल्या लिफ्टमधुन जायला भिती वाटणार आता काही दिवस!

चांगली आहे कथा! "बटरफ्लाय इफेक्ट" आठवला!
रच्याकने बर्‍याच दिवसांनंतर आपली कथा वाचायला मिळाली.

म्हातारीच्या एंट्रील थोडी कल्पना आली होती काय होणार पुढे त्याची..

पण कथा चांगली जमलीये.. एखादा हॉलिवूड पट मस्त होईल.

रीया | 11 June, 2014 - 06:09
बाप्रे!

पण ती म्हातारी कशी मेली ते कळालं नाही कारण लिफ्ट उघडी असताना पुन्हा वर येत नाही. कदाचित मला पुन्हा वाचावी लागणार पण हिंमत नाहीये

कोणी तरी सांगा
>>>
अग रिया म्हातारीची मान अडकते ना म्हणुन ..

मस्त आहे कथा...लिफ्ट हवेत गेली अस वाचल्यावर पोटात गोळा आला..गोल पाळण्यातुन खाली येताना येतो ना तसाच...

सुरुवातीला विचित्र वाटली थोडी बर्याच वेळ वाचतेय अस वाटल, स्वप्नातल्या अनुभवांचा उल्लेख खरतर आधी काहीच कळाल नाही पण शेवटी राहत्या इमारतीची बंद लिफ्ट दरवाजा बंद नसेल तरी वर यायची आणि त्याच्यातच त्याच्या आईची मान अडकून ती मेली हे जेव्हा समजत तेव्हा पूर्ण कथेचा उलघडा झाला. छान लिहिलेली आहे आवडली ......

आणि हो मी सुरुवात केली तेव्हा एकही प्रतिसाद न्हवता वाचून झाल्यावर पाहते तर allready १५ प्रतिसाद सज्ज ......

हे भगवान !!! काहीच्या काही..

आणि हो मी सुरुवात केली तेव्हा एकही प्रतिसाद न्हवता वाचून झाल्यावर पाहते तर allready १५ प्रतिसाद सज्ज ......

>> अगदी अगदी.. सेम हिअर..

प्रितीच्या पोस्ट नंतर उलगडा झाला Happy

खरतर मी पळवत पळवत घाबरत घाबरत वाचली कथा त्यामुळे मिसलं होतं ते Happy

थँक्स प्रिती,

सीमा तुम्हाला पण थँक्स Happy

या वेळेला चक्क पहिल्या झटक्यात वाचल्या वाचल्या ही कथा समजली आहे. (माझं अभिनंदन कर आणि विशाल कुलकर्णीला पण बोलव Proud )

निम्म्यावर आल्यावर कथा थोडी प्रेडिक्टेबल झाली. पण स्वतःचं कृत्य आणि ती पिच्छा पुरवणारी स्वप्नातली लिफ्ट आणि वास्तवातलं आयुष्य यांची सरमिसळ करून तु योग्य तो 'कौतुक इफेक्ट' साधला आहेस. (नशिब त्या दे कॉल मी ईझेड इतका गुंतागुंतीचा नाही ते. :()

(स्वगतः मला समजली आहे तशीच असेल ना ही कथा Uhoh की गर्भितार्थ काही वेगळाच असेल? :फिदी:)

अशा कथांमध्ये लेखक लिहिताना एकही शब्द उणा-अधिक घालत नाही. तेवढी मेहनत त्याने घेतलेली असते. कथेचा पहिलाच पॅरा वाचताना लेखकाने मूड सेट केलेला आहे. मग वाचताना जरा तबीयतीत वाचून मग विचार करून कथा समजून घ्या. तरी समजलं नाही तर लेखकाला विपु करून विचारा ना.

भयकथा, गूढकथा या वाचून समजून घ्यायच्या असतात, त्यासाठी नवनीत मार्गदर्शक कशाला हवे??

Pages