आनंदाचे डोही आनंद तरंग...

Submitted by अतुल ठाकुर on 9 June, 2014 - 03:33

IMG_0892.jpg

मुक्तांगण फॉलोअप म्हणजे भावनांचा कल्लोळ. ज्यांनी व्यसन सोडलं त्यांच्यासाठी अनुभव सांगताना जुन्या आठवणींनी भावुक होणे. घरी आइवडिलांना, कुटुंबाला, पत्नीला, मुलांना, बहिणीला किती त्रास दिला हे सांगताना सर्वच माणसे भावनावश होतात. व्यसन सोडल्यानंतर ज्या मनात आजवर दारुशिवाय काहीही नव्हतं तेथे आज आपल्या माणसांसाठी भावनेचा ओलावा निर्माण झालेला असतो. ती माणसं पटकन विश्वास ठेवायला तयार नसतात. पण आपण त्यांना इतकं छळलेलं असतं कि आता त्यांची मनस्थिती समजुन घेण्याची पाळी आपली असते. हळु हळु दमाने विश्वास मिळवायचा असतो. तो विश्वासही मिळतो. जुने माणुस परत मिळाल्याचा आनंद हा एखाद्याचा पुनर्जन्म व्हावा असाच चमत्कार असतो. माणसे भरभरुन बोलत असतात. ऐकणारे भान हरपुन ऐकत असतात. व्यसन सोडण्यासाठी दाखल व्हायला आलेले चकित होऊन पाहात असतात. त्यांच्या बरोबर आलेले आईवडिल, नातलग यांना एक दिलासा मिळुन जातो कारण व्यसनातुन बाहेर आलेलं उदाहरण मुर्तीमंत समोर असतं. त्यातच मुक्तांगणची एक सुंदर संकल्पना आहे. व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा करण्याची. ज्यांना व्यसन सोडुन वर्ष झाले त्यांचा पुनर्जन्म झाला असे समजुन त्यांचा वाढदिवस दर महिन्याच्या शेवटच्या शेनीवारी मुक्तांगणमध्ये साजरा केला जातो. या सुंदर प्रसंगाची चाहुल आजच्या फॉलोअपवर पडली होती. माधवसरांचा सातवा वाढदिवस, ज्येष्ठ अशा उदार सरांचा चोवीसावा वाढदिवस आणि नेहेमी शेअरिंगसाठी येणार्‍या पतीपत्नीमधील पती प्रकाश यांचा तिसरा वाढदिवस. नाशिकहुन आलेल्या अविनाश यांचा लगेच जुलैमध्ये चौथा वाढदिवस. सर्वजण आल्या आल्या एकमेकांचे अभिनंदन करीत होते. व्यसनाच्या विळख्यातुन हे वीर नुसते मुक्तच झाले नव्हते तर हे आता दुसर्‍यांना मुक्त करण्यासाठी झटत होते. या सार्‍यांनी आज आपले अनुभव सांगीतले. या यशोगाथा होत्या. त्यामुळे आज सर्वार्थाने फॉलोअप हा आनंदाचे डोही आनंद तरंग असाच झाला.

जुन महिना आमच्यासाठी फक्त पावसाळ्याचा पण मुक्तांगण मध्ये या महिन्यात पावसासोबतच आनंदाच्या सरीदेखिल कोसळत असतात. सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता मॅडम यांचा जन्मदिवस याच महिन्याच्या चौदा तारखेला असतो. त्याच दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो. या दोन्ही गोष्टींचं औचित्य साधुन अलिकडे मुक्तांगण मध्ये रक्तदान शिबीर भरवलं जातं. यावेळी ते तेरा तारखेला आहे. सव्वीस जुनला जागतिक अंमलीपदार्थविरोध दिन असतो. त्यानिमित्ताने काही कार्यक्रम असतात. याच महिन्यात मुक्तांगणच्या अनेक शिलेदारांचे व्यसनमुक्तीचे वाढदिवसही योगायोगाने आलेत. त्यामुळे शेवटचा शनिवार हाऊसफुल्ल असतो म्हणायला हरकत नाही. हा दिवस म्हणजे जणु काही छातीवर एका आणखि पदक लागण्याचाच असतो. एक आणखि वर्ष व्यसनमुक्त राहुन गेलेलं असतं. याचं महत्त्व काय याची सर्वसामान्यांना कल्पना येणे कठीण असते. जमलेल्या नातेवाईकांच्या अश्रु आणि हुंदक्यांमधुन, आनंदाने फुललेल्या चेहर्‍यामधुनच याची कल्पना येऊ शकते. माधवसरांनी सुरुवातीलाच या महिन्याचं मह्त्व सांगुन वातावरणात चैतन्य निर्माण केलं. त्यानंतर एकेक जण उठुन आपापले अनुभव शेअर करु लागले. आज इतर कुठेही पाहायला वेळ नव्हता इतके विविध प्रकारचे अनुभव सांगणारी मंडळी समोर येत होती. अधुनमधुन आमचे तेंडुलकर सर इतरांना बसवण्यासाठी खुर्ची घ्यायला येत असत त्यावरुन गर्दी वाढल्याचे जाणवत असे.

अजितदादांनी यावेळी शेअरींग करताना व्यसनाच्या काळात त्यांना होत असलेल्या मानसिक त्रासावर भर दिला. ते व्यसनाच्या काळात दु:ख अनावर होऊन रडत असत. त्यांना व्यसनातुन बाहेर पडायचे असे पण ते परत त्याकडे वळत. काय करावे हेच त्यांना कळेनासे झाले होते. डॉक्टरांना तर त्यांनी हे देखिल सांगुन झाले होते कि मी तुम्हाला एक लाख रुपये देतो. तुम्ही मला अशी गोळी द्या की माझ्या डोक्यातली दारु निघुन जाईल. पण तशी गोळी आजही बनलेली नाही. अजितदादा निश्चय करुन दारु बंद करीत मात्र काही दिवसांनी पुन्हा त्या निश्चयाला तडा जात असे. याला त्यांनी उठाबशा काढणे हा शब्द वापरला. अशा उठाबशा त्यांनी दोन वर्षे काढल्या. काही वेळा असंही व्हायचं की उद्यापासुन दारु सोडायची आहेच. मग शेवटची आज भरपुर पिउन घेऊ म्हणुन ते भरपुर दारु प्यायचे. त्याचा दुप्पट त्रास व्हायचा. मग तो त्रास कमी करण्यासाठी ते दुसर्‍या दिवशी देखिल दारु पित असत. पुढे ते मुक्तांगणमध्ये गेले आणि अजितदादांचे उठाबशा काढण्याचे दिवस संपले. त्यांना व्यसनावर हवे ते औषधही मिळाले. पाठपुरावा मिटिंग अटेंड करणे हेच औषध. रोज शक्य असेल तेथे एए च्या मिटींगला जाणे ह्याच गोळ्या. मुक्तांगणने शिकवलेले अंगी बाणवणे हेच आता अजितदादांचे पथ्य झाले आहे. आणि मुक्तांगणच्या दोस्तांच्या संपर्कात राहणे हेच टॉनिक. अजितदादा हा औषधोपचार करुन आज तब्बल अकरा वर्षे व्यसनापासुन दुर आहेत. मुक्तांगणने दिलेले माझे मित्र मला व्यसनापासुन दुर ठेवतात. हेच माझ्यासाठी माझे परमेश्वर आहेत असे भावुक उद्गार अजितदादांनी आपले अनुभव कथन संपवताना काढले.

यावेळी नाशिकची मंडळी आली होती. त्यांच्यापैकी अविनाश यांनी पतीपत्नीच्या नात्यावर व्यसनाच्या काळात कसा फरक पडतो आणि व्यसनातुन बाहेर पडल्यावर ते कसे हाताळावे यावर प्रकाश टाकला. व्यसनात असताना मी राक्षस होतो हे त्यांनी सर्वप्रथम सांगुन टाकले. बायको मुलांची फिकिर करीत नसे. ते मला घाबरत असत. मात्र व्यसनमुक्त झाल्यानंतर त्याच मार्गावर राहण्यासाठी कुटुंबाच्या आधाराची आवश्यकता असते असे प्रतिपादन त्यांनी केले. पत्नीच्या बाबतीत आपला दृष्टीकोन संपूर्णपणे बदलणारी घटना त्यांनी सांगितली. मुक्तांगणच्या प्रफुल्ला आत्यांचे अनुभव कथन ऐकण्याचा प्रसंग होता. आत्यांनी सुरुवातीलाच आपली ओळख करुन देताना सांगितले "मी एका बेवड्याची बायको". हे ऐकुन अविनाश यांचे डोळे खाडकन उघडले. आत्यांना अनेक कला अवगत होत्या. पण नवर्‍याच्या व्यसनाच्या काळात ते सारे मागे पडले आणि त्याव्यसनामुळे उरली ती एकच ओळख, बेवड्याची बायको. आपल्या व्यसनामुळे आपल्या पत्नीलाही हिच ओळख मिळणार. ही कल्पनाच अविनाश यांना सहन झाली नाही. त्यानंतर मात्र पतीपत्नीच्या नात्यात फरक पडत गेला. आताही इतर सर्वसामान्य पतीपत्नीप्रमाणे त्यांच्यात वादविवाद होतात. मात्र ते पाच मिनिटांपेक्षा जास्त टिकत नाहित. ते चिडले तर त्यांची पत्नी शांत राहते आणि त्या चिडल्या तर अविनाश शांत असतात. व्यसनी माणुस पक्का भामटा असुन तो "इमोशनल ब्लॅकमेल" करण्यात तरबेज असतो असे ते परखडपणे म्हणाले. व्यसनाच्या काळात आपल्याला घाबरणारा आपला मुलगा आता आपली वाट पाहात असतो असे ते म्ह्णाले. अविनाश यांच्याशी नंतर देखिल बोलणे झाले. या माणसाकडे माहितीचा खजिना आहे हे जाणवले. सांगण्याची शैली देखिल गावरान आणि आकर्षक. या माणसाला पुन्हा भेटायला हवे ही खुणगाठ मनाशी बांधली.

नाशिकहुनच आलेले विश्वास यांनी फॉलोअपचं महत्त्व विशद केलं. ते स्वतः पहिल्या शनिवारी नाशिकचा फॉलोअप अटेंड करतात आणि महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पुण्याला व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजर असतात. त्यांनी दोन गोष्टी स्वतःशी मान्य केल्या. व्यसन हा आजार आहे आणि मी व्यसनी आहे. आज इतक्या वर्षानंतरही मी या आजारावर उपचारच घेतो आहे असे मी समजतो. फॉलोअपला गेल्यावर अनेकांचे अनुभव ऐकायला मिळतात. त्यांनी व्यसनापासुन दुर राहण्यासाठी काय काय उपाय केले ते कळते. त्यातुन बरेच काही घेता येते असे त्यांनी सांगितले. यावेळी पाटीलकाकाही आले होते. त्यांनी त्यांच्या नेहेमीच्या हशा पिकवणार्‍या शैलीत आणि थोडक्यात फॉलोअपबद्दल सांगितले. आमच्यासारख्या उतार वयातल्या माणसांना दारु न पिण्याचा उतारा येथे येऊन मिळतो. आम्ही निसरड्या वाटेवरुन चालणारी माणसे आहोत. आम्हाला सावरण्याचे काम फॉलोअप मिटिंग करते असेही काका म्हणाले. नाशिकच्याच सतीश कुलकर्णींशी आधी गप्पा झाल्या होत्या. त्यानी अनुभव कथन केले नाही मात्र त्या गप्पांमधुन व्यसनाबद्दल आणि त्यामुळे होणार्‍या नातेसंबंधाच्या परिणामावर त्यांनी बराच विचार केला आहे हे जाणवले. व्यसनी माणसे व्यसनातुन बाहेर आल्यावर आमच्यावर घरचे विश्वास ठेवत नाहित असे म्हणतात. पण यावेळी व्यसनी माणसाने आपण इतकी वर्षे घरच्यांना किती त्रास दिला, त्यांचा किती छळ केला हे लक्षात घ्यायला हवे असे सतिशकाका म्हणाले. हे लगेच पूर्ववत होणार नाही. त्याला वेळ लागेल हे देखिल घ्यानात ठेवायला हवे. एकंदरीत नाशिकच्या मंडळींशी बोलताना हे जाणवले की यांचा सपोर्ट्ग्रुप अतिशय सकारात्मक तर्‍हेने चालला आहे. ही माणसे फॉलोअपच्या दिवसा व्यतिरिक्त देखिल एकमेकांच्या संपर्कात असतात. व्यसनमुक्त मित्रांची ढासळलेली कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी देखिल हे शिलेदार प्रयत्नशील असतात अशी अतिशय आशादायक माहिती मला मिळाली.

उदार सर अनुभव कथन करताना भावुक झाले होते. व्यसन सोडुन चोवीस वर्षे झाली होती. त्या दरम्यान पत्नीचा मृत्यु झाला, अनेक कौटुंबिक अडचणी आल्या मात्र उदार सर खचले नाहित. परत व्यसनाकडे वळले नाहित. पस्तीस वर्षे गोदरेज मध्ये काम केलेल्या उदार सरांना व्यसनापायी नोकरी सोडण्याची पाळी आली होती. मात्र मोठ्या मॅडमनी मार्ग दाखवला. उदारसरांच्या अनुभव कथनात हा एक आकर्षक भाग असतो. निदान ठाण्याच्या फॉलोअपमध्येतरी हेच एक असे मुक्तांगणमित्र आहेत ज्यांनी मोठ्या मॅडमच्या म्हाणजे डॉ.सुनंदा अवचट यांच्या हाता खाली उपचार घेतले आहेत. त्यावेळी आताचे मुक्तांगण नव्हते. मुक्तांगणचे काम ससुन हॉस्पिटलमधुन चालत असे. मोठ्या मॅडमनी दिलेली ताकद उदारसरांना आयुष्यभर पुरली आहे. ते आता एए चे काम करतात. त्यांच्या दादर ग्रुपची लायब्ररी सांभाळतात. २००९ मध्ये निवृत्त झाल्यापासुन ते एए तर्फे व्यसनमुक्तीसाठी गावोगाव प्रवास करत असतात. मुक्तांगणला त्यांचे सतत येणे जाणे असते. मुक्तांगणच्या रुग्ण मित्रांना ताकद देण्याचे काम मी करतो आणि नेहेमी करत राहिन अशी ग्वाही सरांनी दिली. उदार सरांनी ठाणे आणि मुंबईचा फॉलोअप क्वचितच चुकवला असेल. त्यांचे तेथे नुसते असणेच इतरांना दिलासा देत असते. उदारसर असले कि आधार असतो. एखाद्या कार्याला ज्येष्ठांच्या उपस्थितीने जशी शोभा येते तशी शोभा त्यांच्यामुळे फॉलोअप मिटिंगला येते.

प्रकाश तीन वर्षे पूर्ण झाल्याने खुपच आनंदात होते. व्यसनकाळात रक्तादाबाचा विकार जडलेल्या प्रकाश यांच्या बीपी च्या गोळ्या व्यसनातुन बाहेर पडल्यावर सुटल्या. व्यसनकाळात त्यांचा आत्मविश्वास हरवला होता. एकटे कुठेही जायला भीत असत. गाडी चालवणे होत नसे. आता कुठेही एकटे ड्रायव्हिंग करुन जातात. प्रकाश यांच्या अनुभवकथनात निश्चयाचं महत्त्व त्यांनी सतत अधोरेखित केलं. निश्चय करा, आत्मविश्वास डळमळु देऊ नका. सारे काही शक्य आहे. ते स्वतः सरकारदरबारी क्लास वन ऑफिसर आहेत. त्यांनी व्यसनाकडे नेणारे वाढदिवस, होळी, पार्टी हे कार्यक्रम निग्रहाने टाळायला सुरुवात केली. व्यसनाकडे ओढणारे मित्र प्रयत्नपूर्वक दुर केले. नेहेमीच्या दारु पिण्याच्या जागा, ते रस्ते, ती हॉटेले टाळली. फक्त आजचा दिवस मला प्यायची नाहीय असा "वन डे अ‍ॅट अ टाईम" हा निश्चय करुन आयुष्य घालवणारे प्रकाश आज तीन वर्षे व्यसनापासुन दुर आहेत. नोकरी आणि बायको दोन्ही गमवण्याची पाळी त्यांच्या वर आली होती पण पत्नीचे प्रेम त्यांनी पुन्हा मिळवलेले आहे. व्यसनाच्या काळात त्यांना घाबरणार्‍या आपल्या मुलिचे ते दोस्त झाले आहेत. दारुला औषधे नाहीत. प्रकाश मुक्तांगणला जाण्याआधी अनेक ठिकाणी जाऊन आले. काहीही उपयोग झाला नाही. मनाचा निग्रह असेल तर मरेपर्यंत माणुस सोबर राहु शकतो असे प्रकाश ठामपणे म्हणाले. ते पुढे म्हणाले कि व्यसनमुक्तीच्या काळात दु:खाचे प्रसंग खुप आले, तसेच आनंदाचे प्रसंगही खुप आले मात्र त्यामुळे व्यसनाकडे वळलो नाही. आयुष्य फार सुंदर आहे.

आजचे शेवटचे अनुभव कथन खुद्द माधवसरांचे होते. वयाच्या अठराव्या वर्षी व्यसनाला सुरुवात केलेले माधवसर तब्बल तीन वेळा मुक्तांगणमध्ये दाखल झाले होते. वडिलांनी पार आशा सोडुन दिली होती. सर्वात धाकटा मुलगा म्हणुन लाड झाले होते. कुठल्याही गोष्टीसाठी कष्ट घेण्याची सवय नव्हती. सारे काही आजवर बसल्याजागी मिळत होते. त्यामुळे खोटा अहंकार स्वभावात निर्माण झाला होता. ज्या वडिल बहिणीचा धाक होता ती अमेरीकेला निघुन गेली होती. या सार्‍या परिस्थितीमुळे व्यसनाला खतपाणी मिळाले. कसलाही निर्बंध उरला नाही. त्यातुन तुलना करण्याची सवय होती. माझे हात कापत नाहीत, मी कामावर वेळेवर जातो, रस्त्यात पडत नाही, कुणाशी भांडत नाही मग मी व्यसनी कसा? असा प्रश्न ते घरच्यांना करीत. शिक्षणात रस नव्हता, ते केव्हाच सुटले होते. त्यांच्या व्यसनामुळे घरात याची अशी परिस्थीती कुणामुळे झाली यावरुन भांडणे लागली होती. व्यसन वाढत गेले. वडिल स्वाभिमानी होते पण माधवसरांमुळे त्यांनी शेजारापाजार्‍यांचे टोमणे ऐकावे लागत. वडिलांनी नाव टाकले. बहिणीने मुक्तांगण किंवा घराबाहेर असे दोनच पर्याय समोर ठेवल्याने नाईलाजाने सर मुक्तांगणला आले. तेथे मनाने शरण जाणे घडले नव्हते त्यामुळे दोनवेळा स्लीप झाली. तिसर्‍यावेळा मात्र आता मी माझं डोकं न चालवता उपचार घेईन असा निश्चय केला आणि १२ जुन २००७ ला ते पुन्हा मुक्तांगणमध्ये दाखल झाले. इथुन माधसरांचे आयुष्यच बदलले. मात्र घरची परिस्थिती लगेच बदलली नाही. घरी खुप त्रास दिला होता. मने दुखवली होती. मनाविरुद्ध गोष्टी घडणार त्या स्विकारायला हव्यात याची कल्पना माधवसरांचे समुपदेशक प्रसाद ढवळे यांनी त्यांना आगोदरच दिली होती.

मात्र परिस्थीती खरोखरच बदलत गेली. नाव टाकलेल्या वडिलांनी पुढे त्यांना घरी येण्यास परवानगी दिली. हळुहळु इतर खोल्यांचे दरवाजे त्यांच्या साठी उघडले. पूढे वडिलांनी घरातील एक खोली त्यांना त्यांच्या स्वतःसाठी भेट म्हणुन दिली. त्यानंतर घरातली कपाटे त्यांच्यासाठी उघडी राहु लागली. त्यांच्या किल्ल्या माधवसरांना मिळु लागल्या. आता तर माधवसरांच्या पुण्याच्या घरी त्यांचे आईवडिल जाऊन आले. वडिलांचा इतका विश्वास सरांनी मिळवला आहे कि मोठी बहिण देखिल काही निर्णय घेताना वडिलांची परवानगी मागण्यासाठी माधवसरांना मध्ये घालते. माधवसरांचे नाव निघाले कि आईवडीलांचे चेहरे कौतुकाने आणि अभिमानाने चमकु लागतात. मुक्तांगणमध्येदेखिल सरांची घोडदौड सुरु होतीच. शाळेत सुमार कामगिरी करणारे सर डिस्टींक्शन मिळवुन समुपदेशनाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुक्तांगणमध्ये समुपदेशक म्ह्णुन काम करु लागले. मुक्तांगणने त्यांच्यावर नाशिक आणि ठाण्याच्या फॉलोअप मिटींग्जची जबाबदारी दिली आहे. ती ते उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. एके काळी नशेच्या अवस्थेत अंथरुणावर सिगारेट पडुन बिछाना जळु लागला तरी भान नसणारे माधवसर आता मुक्तांगणच्या रुग्णमित्रांसाठी सोबरायटीचा आदर्श बनले आहेत.

माधवसरांचे अनुभवकथन एक आदर्श अनुभव कथन होते. किंबहुना अनुभव कथन कसे असावे याचा तो एक वस्तुपाठच होता. अतिशय बारीक सारीक गोष्टी ते सांगत होते. त्यावरुन त्यांनी या गोष्टी किती परिपूर्णपणे स्वीकारल्या आहेत याची कल्पना येत होती. आपल्या हातात काय आहे? तर स्वतःला बदलणे. आपल्या हातात काय नाही? तर समोरच्याला बदलणे. हे ही दिवस जातील हे मुक्तांगणचे स्लोगन त्यांनी सतत मनाशी बाळगले. व्यसनाच्या काळात दारु हीच प्रेयसी असलेल्या माधवसरांच्या आयुष्यात व्यसनमुक्त झाल्यावर आता खर्‍याखुर्‍या प्रेयसीने प्रवेश केला आहे. आज माधवसर मुंबईला आले कि एए ची मिटींग अटेड करतात. पस्तीस वर्षे तुम्ही काय केलेत हे त्यांनी व्यसनाच्या काळात वडिलांना उलटुन विचारले होते. तो त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. वडिलांना हे विचारुन आपण व्यसनाचा रॉक बॉटम गाठला याची जाणीव त्यांना झाली. मुक्तांगणमध्ये स्वतःमधले स्वभावदोष ओळखुन त्यांनी शरणागती पत्करली आणि मग माधवसरांनी मागे वळुन पाहिलंच नाही. ते शेवटी म्ह्णाले "आय वोंट टु डु समथिंग इन माय लाईफ. दॅट ड्राईव्ह इज स्टील देअर". आयुष्यात काहीतरी करायचंय आणि ती उर्मी, ती तीव्र इच्छा अजुनही माझ्यात आहे. आज मी मुक्तांगणला गेलो नसतो तर माझा फोटो कुठल्यातरी भिंतीवर लटकलेला दिसला असता इतकी शरीराची आबाळ झाली होती. पण आज मी निरोगी आहे, आनंदी आहे.

अतुल ठाकुर

(मुक्तांगण फॉलोअप मिटिंग दि.८/६/२०१४ स्थानःआयपीएच)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या हातात काय आहे? तर स्वतःला बदलणे. >>>>> फार फार मोलाचे वाक्य ....

अतिशय उत्कृष्ठ लेख .....

चांगला लेख.. हे अनुभव या व्यसनांच्या आहारी जायची शक्यता आहे अशा सर्वांसमोर मांडले गेले पाहिजेत.

अगदी बरोबर. लिहिता लिहिता थकुन गेलो. बराच मोठा झालाय लेख. मलादेखिल काहितरी अपुर्ण वाटलं. सॉरी.

दिनेश....

"...हे अनुभव या व्यसनांच्या आहारी जायची शक्यता आहे अशा सर्वांसमोर मांडले गेले पाहिजेत..."

अशी आपली इच्छा असते. पण माझा अनुभव (इथला कोल्हापुरातील) असे सांगतो की जे व्यसनाधिन झाले आहेत वा वाटेवर आहेत, त्याना एकतर वाचनाची आवड बिलकुल नसते अथवा ज्याना असते त्यांच्या मेंदूपर्यंत यातील तर्क पोहोचतच नाहीत, इतक्या बधीर अवस्थेत ते पोचलेले असतात. शहाणे करून सोडायला पुढे जाणार्‍यांनी अस्सल शिव्याही खाल्ल्या आहेत अशा एकादोघांच्या.

अतुल ठाकुर याना आणि त्यांच्यासमवेत कार्य करणार्‍या अनेकाना हा अनुभव आला असेलच की यशाची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा व्यसनाधिन झालेली व्यक्ते विनाशेच्या गर्तेत गेल्यानंतर त्याला केव्हातरी सुचते की आपण यातून बाहेर पडणे गरजेचेच आहे सर्वांसाठी. प्राथमिक पातळीवर असलेल्या व्यक्तीच्या मेंदूपर्यंत समोरच्याची भावना पोचत नाही असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.

माधवसरांचे उदाहरण ठाकुरांनी प्रकर्षाने घेतले आहे....एक आदर्शवत म्हणून. "एके काळी नशेच्या अवस्थेत अंथरुणावर सिगारेट पडुन बिछाना जळु लागला तरी भान नसणारे माधवसर आता मुक्तांगणच्या रुग्णमित्रांसाठी सोबरायटीचा आदर्श बनले आहेत...." ~ जळका बिछाना ते आदर्श....हा प्रवास किती कालावधीचा असेल याचाही विचार केला गेल्यास व्यसन लागणे ते व्यसन सुटणे ही प्रक्रिया निश्चित्तच दीर्घ असते. छळवाद असतो सार्‍या कुटुंबासाठी...प्रत्येक व्यक्तीसाठी. माधवरावांचे कुटुंब सहनशील म्हणून हे सारे जमून आले. प्रत्येक व्यसनीकडे इतके चांगले नशीब नसते....कडेलोट होऊन गेलेलेही मी पाहिले आहेत.

त्यामुळे केव्हातरी त्यांच्या विवेकबुद्धीला पटेल की व्यसनामुळेच आपलीच नव्हे तर आपल्या परिवाराची कधीही भरून न येणारी हानी होत आहे, तेव्हा ते सुटले पाहिजे आणि ते सुटण्यासाठी पुढे येणार्‍या "गुड सॅमेरिटियन" ला आपण होकारार्थी साथ दिली पाहिजे.

अतुल ठाकुर करीत असलेले हे कार्य प्रशंसनीय असेच आहे.

पण भीष्मप्रतिज्ञा लिहिल्यावर आता कानाला खडा लावलाय. कधीही क्रमशः लिहायचं नाही. लेख कितीही मोठा होऊ देत. तसाच मोठा टाकायचा. क्रमशः म्हटलं कि बांधुन राहिल्यासारखं होतं. मालिका पुर्ण होइपर्यंत दुसरं काहीही करण्याकडे लक्ष लागत नाही.

अशोकराव अतिशय योग्य विचार. मुळात आपल्याला व्यसन आहे हेच व्यसनी माणुस स्विकारत नाही त्यामुळे मुक्तांगणच्या वाटेवर वळवणे हे एक अतिशय कठिण काम असते.

बाकी सर्व प्रतिसादकांचे आभार Happy

खरं छान लेख. इथे पालघर - डहाणुच्या बर्‍याच गावात अशी व्यसनाधीन माणसे भरपुर सापडतात, काही जण सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपेपर्यंत पीतच असतात, स्वतः दिवसभर पितात , काही कमवत नाही मग घरातल्या बायकांना कमवावे लागते, बाहेरुन मेहनत करुन यायचं आणी घरात आल्या आल्या नवर्‍याचा मार खायचा, उभा जन्म अश्या परीस्थीतीत राहीलेल्या बर्‍याच बायका इथे दिसतील. दारुड्या लोकांना मुलांच्या शिक्षणाची काहीच चिंता नसते, इथे तर मुक्तांगण प्रमाणे कुठलीही संस्था नाहीये, सायकॅट्रीस्टकडे काउंसलींग चा सल्ला दिला तर लोकांना वाटतं की हा माणुस वेडा नाहीये तर तिथे का जावं, काही गावात तर जवळ जवळ सर्वांची परीस्थीती सारखीच असल्याने दारुड्या माणसाचे कुणाला काही वाटतही नाही, काही मुले ही मोठी होउन वडीलांचाच वारसा चालवताना दिसतात.

मुक्तांगण मधील अनुभव वाचुन नेहमीच पोटात तुटत. बरेच मित्र त्यातून व्यस्नातुन बाहेर येतात हे वाचुन बरं वाटत. ते नेहमीच सुखरूप राहोत यासाठी शुभेच्छा!

लेख फार परिणामकारक झालाय. पण हे सगळे अनुभव वाचताना एक विषण्ण भावना मनात सतत जागी रहाते Sad
लोकांनी आयुष्याचे मोलाचे क्षण, वर्षे व्यसनापायी कशी मातीमोल केली असं वाटत रहातं, जरी लेखातले अनुभव ते त्यातून बाहेर कसे यशस्वीपणे आले आणि आता कसे आनंदाचं आयुष्य जगत आहेत याबद्दल असले तरी.

पण हे सगळे अनुभव वाचताना एक विषण्ण भावना मनात सतत जागी रहाते

हे दृष्टीकोणावर अवलंबुन आहे. अनेक वर्षे वाया गेलेली असतात. अनेक माणसे दुरावलेली असतात. अनेक जखमा झालेल्या असतात. अनेक जखमा दिलेल्या असतात. मात्र त्यातुन बाहेर यायचे असेल तर हे मागे टाकावेच लागते. ते धरुन बसल्यास रिकव्हरी अशक्यच. तो दु:खद काळ विसरणे शक्य असते असे मात्र मला वाटत नाही. विसरुही नये. पाय जमिनीवर राहण्यासाठी ते बरं असतं. काळ परत आणणं शक्य नसलं तरी क्षमा शक्य आहे. ती मागण्याची नम्रता मात्र असायला हवी.

अनेकदा असं वाटतं की बरे झाल्यावर आपल्या माणसांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहिला कि मधला काळ पुसुन गेल्यासारखाच वाटत असेल त्यांना.

पुर्णपणे सहमत आहे तुमच्याशी.

जेव्हा जेव्हा मी मुक्तांगणसंबंधी किंवा व्यसनाधीनतेबद्दलचे लेख वाचते, तेव्हाची ही कायमचीच भावना आहे, असंही प्रकर्षाने वाटतं की नकारात्मक व्यसने अस्तित्वातच नसावीत. अत्यंत हास्यास्पद भाबडी कल्पना आहे ही, पण आहे. मुद्दाम लावून घ्यावीत अशी अगणित व्यसने अस्तित्वात आहेतच. पुन्हा, व्यसन या शब्दातच एक नकारात्मकता आहे ती टाळता येत नाही. पण असो.