माझे धावणाख्यान २ - शिकवणी

Submitted by हर्पेन on 8 June, 2014 - 12:40

माझे धावणाख्यान १ - पुर्वरंग - http://www.maayboli.com/node/49304

शिकवणी

पहिल्याच दिवसापासून माझी शिकवणी चालू झाली. माझी यत्ता बिगरीची असल्याने अगदी पहिला धडा, 'बूट कसे बांधावे?' हा होता. एका बूटाची लेस तर रामनेच बांधून दिली. मी थोडा अवघडलो होतो पण नवीनच बूट घालायला शिकल्यागत घेतली बांधून. बूट किती घट्ट / सैल बांधावे इथपासून सुरु केल्यामुळे पळण्याची सुरुवात झकास झाली. बूट नीट घट्ट बांधले असता चालताना / पळताना किती चांगले वाटते ही गोष्ट वर्णन करून सांगण्यापेक्षा, एकदा तरी प्रत्येकाने स्वत: अनुभवायची गोष्ट आहे.

मग पुढचे धडे पळता पळताच चालू झाले. पावले सरळ रेषेतच पडू द्यावी, कॅट्वॉक सारखी आत वळलेली नको आणि फताडं चालल्यागत बाहेर वळलेली नको. दोन पावलातले धावतानाचे अंतर कमी असावे, धावताना पावले समांतर टाकावी असे अनेक धडे घेई घेई तोपर्यंत ३ किमीची एक फेरी झाली देखील. मग मला रामने विचारले कसा आहेस? पाय दुखताहेत का?, दमलायस का?, अजून एक फेरी मारणारेस का? त्याला मी अनुक्रमे, ठीक आहे, नाही, नाही, हो अशी उत्तरे देउन झाली आणि पाणी पिउन आम्ही परत निघालो. माझा पहिलाच दिवस असल्याने मला एकटे पळायला लागू नये म्हणून सगळ्यांनीच दुसरी फेरीपण ३ किमीचीच करावी असे ठरले.

दुसर्‍या फेरीच्या वेळचा छोटा धडा होता धावकाच्या जीवनात जीवनाचे अर्थात पाणी पिण्याचे महत्व. आणि नंतर मात्र पूर्ण वेळ आम्ही एकमेकांची ओळख करून घेत होतो. हा राम मुळचा दिल्लीचा सध्या पुण्यात वास्तव्य आणि त्याचा भाउ लक्ष्मण नव्हे पण लक्ष्मणासारखाच सिद्धू.... हे दोघे खराडी वरून केवळ पोहोणे शिकायचे म्हणून टिळक तलावावर येत होते. हे ऐकताच मला इतकी लाज वाटली की मला रेसकोर्सवर जायचे झाले तर ते अंतर नक्कीच यापेक्षा कमी होते. आणि अशा गप्पा मारता मारता मी दोन फेऱ्या पूर्ण केल्या की म्हणजे चक्क ६ किमी. अगदी पहिल्याच दिवशी. सगळे माझे कौतुक करू लागले. खरेतर आम्ही इतके आरामात गप्पा मारत मारत धावत होतो की मला तरी मी काही फार भारी / कौतुकास्पद केलेय असे वाटतच नव्हते. आणि त्याआधी कौतुक करवून घ्यायची सवय नव्हती त्यामुळे जरा जडच गेले. (आता सवय झाल्ये म्हणावे लागेल इतकी कौतुकं होताहेत ) मला आपले वाटले की माझा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी असे सगळ्यांचेच कौतुक करत असतील त्यामुळे मी काही ते फार मनावर घेतले नाही. अरुण तर मला वेडाच म्हणायला लागला. उगाच सांगत होतास की धावता येत नाही, याआधीच का नाही आलास म्हणून भांडायचेच बाकी ठेवले होते त्यानेन्.

त्याचे असे झाले होते की मी एकदा आमच्या पळायला सुरुवात करायच्या आधीच्या भेटीत नेहेमीप्रमाणे ‘मला पळता येत नाही’, ‘पळायला लागले की पाय दुखतात’ वगैरे रडगाणी गायली होती. आणि अर्थात जे अगदी खरे होते. शाळा सोडल्यानंतर मी कधी पळलोच नव्हतो. पण आता मात्र प्रत्यक्षात मला रामने सांगितल्या प्रमाणे धाव्लो तर एक्दम ६ किमी. पण अर्थात आम्ही अगदी सावकाश धावलो. त्याने सांगितले होते, वाटेत कधीही तुला दमल्यासारखे वाटले, कुठे दुखू-खुपू लागले तर आपण थांबू. पण झाले असे की आम्ही गप्पा मारत मारत इतके आरामात पळत होतो की मला दम लागलाच नाही.

सर्वसाधारणपणे आमचे नेहेमी पळायचे मार्ग दोन आहेत. दोन्ही चालू होतात पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यावरील टिळक तलावापासून.

पहिला मार्ग टिळक तलावापासून चालू होउन प्रभात रस्त्यावरून विधी महाविद्यालयाकडे जाउन मग उजवीकडे वळून भांडारकर रस्त्याने ‘हॉटेल रविराज’ पाशी उजवीकडे वळून परत प्रभात रस्त्याला लागून टिळक तलावापाशी यायचे. हे अंतर ३ किमी भरते.

दुसरा मार्ग म्हणजे उलटे चालू करून सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेवरून पुढे खंडूजीबाबा चौकातून डावीकडे वळून फर्ग्युसन महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागताच डावीकडे पुणे विद्यापीठाचा परकी भाषाभ्यास विभाग आणि वृत्तपत्र विद्या विभागाची इमारत आहे (रानडे संस्था) त्याला लागून असलेल्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यानी पुढे जाउन, डावीकडे वळून परत विधी महाविद्यालय रस्त्याला लागून प्रभात रस्त्याने सरळ परत टिळक तलावापाशी यायचे. हे अंतर ४ किमी भरते.

मग आमच्या वेळापत्रकानुसार ३ किमी, ४ किमी, ६ किमी, ७ किमी, ८ किमी, १० किमी अशी वेगवेगळी अंतरे धावताना ह्या दोन मार्गांच्या बेरजा करून एक ही फेरी-एक ती फेरी, एक ही फेरी-दोन त्या फेऱ्या अशा जुळण्या करून अंतर पूर्ण करतो.

मग दुसऱ्या दिवशी देखील तोच प्रयोग तीच पात्रे, त्याच मार्गाने तेच ६ किमी धावलो. त्या दिवशी पाय थोडेसे दुखले पण मग दुसर्‍या दिवशी, शनिवारी सुट्टी होती आणि रविवारी पुणे मॅरॅथॉनर्स क्लबच्या बाकीच्या सदस्यांसोबत रेसकोर्स वर धावायचे होते व तिथे पुणे मॅरॅथॉनर्स क्लबचा कोच मायकेल फ्रान्सिस असणार होता. तो त्या वेळी पुण्याबाहेर असल्याने फक्त रवीवारीच पुण्यात असायचा. राम, अरू, राजस त्याला भेटायला खूपच उत्सुक होते आणि त्यांच्यामुळे मी देखिल....

मग रविवारी (सुद्धा) सकाळी ६ वाजता रेसकोर्सवर पोचलो. मी, माझी ती मैत्रीण, सुनिल, राजस असे सगळे आसपासच पोचलो. मी रेसकोर्स वर पहिल्यांदाच धावणार होतो. रेसकोर्सवर गोल पळण्याच्या एका फेरीचे साधारण २ किमी होतात असे कळले होते. सगळ्यांनीच रस्त्यावरून धावायला सुरु केले. राम, राजस बाकीच्या सदस्यांना आठवड्यानंतर भेटत असल्याने त्यांच्यासोबत बोलत बोलत आणि त्यांच्या नेहेमीच्या वेगाने (जो एरवी आमच्यासारख्या नवख्यासोबत राहायसाठी म्हणून त्यांना पकडता येत नसे) पुढे निघून गेले. आमच्या पुणे मॅरॅथॉनर्स क्लबच्या सदस्यांचा एक अलिखित नियमच आहे की नवीन आलेल्या माणसांना आणि आमच्यासोबत पळणाऱ्या (नवीन असो की जुन्याही) महिला / मुलीबाळींना एकटे पळू द्यायचे नाही. मी आणि माझी मैत्रीणही रेसकोर्सवर पहिल्यांदाच धावत होती त्यामुळे मायकेलने आमच्या सोबत धावायला सुरुवात केली. पण एम्प्रेस गार्डनच्या दिशेने जरा काही मीटर अंतर गेलो असू नसू तर माझ्या मैत्रिणीला पायातून कळा आल्याने व पुढे जमेलसे न वाटल्याने ती मागे फिरली. तोवर मायकेल तिला कुठे दुखतंय काय होतंय जमणार आहे का नाही ह्याची विचारपूस करत होता आणि तिला जमत / जमणार नाहीये असे नक्की झाल्यावर तिला थांबवून मागे फिरवून मग तो माझ्याबरोबर धावू लागला.
पहिली फेरी संपत आली असताना आधी पुढे गेलेल्या पण आता मागे पडलेल्या काही लोकांपैकी दोघा –तिघांबरोबर (ज्यात राम राजस ई. कोणीच नव्हते) मला सोडून, त्यांना सांगुन तो पुढे गेला. त्यांच्यासोबत ओळख परेड धावता धावताच झाली. ती मंडळी होती, किरण आणि फरीदा. बोलता बोलता किती अंतर काटले जातेय ते कळलेच नाही. पळणे चालूच होते पण नवीन ओळख असल्याने बोलणेही हळूहळू बंद झाले. त्या मधल्या काही काळात तर अचानक असे वाटू लागले की माझे गतीशील धावणारे पाय हे माझे नसून दुसऱ्याच कोणाचे आहेत आणि मी म्हणजे माझे हृदय / मेंदू / धड हा जणू दुसऱ्या कोणाचा तरी आहे आणि मला काही प्रयत्न करावे न लागता ते पळाताहेत आपोआप आणि मी ते तटस्थपणे त्रयस्थासारखा बघतोय. जणू पळता पळता लागलेले ध्यानच! अगदी वेगळीच अनुभूती होती ती...

पळताना माझे आपले विचार चालू होते, कालपरवा ६ किमी धावलोय तर आज अंतर वाढवूया, ४ तरी फेऱ्या मारूया म्हणजे आज ८ किमी धावणे होईल. अंतर जरा वाढेल. मग रेसकोर्सला बाहेरून ३ फेऱ्या होत आल्या होत्या तेव्हा मी किरण फरीदाला विचारले तुम्ही ५ फेऱ्या मारणार असाल ना मी अजून एक फेरी झाली की थांबतो. तर किरणने सांगितले की आज १० किमी पळायचे होते आणि आता ते अंतर, ही तिसरी फेरी मारल्यावर होईल त्यामुळे ही फेरी शेवटची... माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्याने अधिक स्पष्टीकरण दिले त्यावेळी कळले की ४ फेऱ्या म्हणजे ८ किमी हे माझे गृहीतक साफ चुकीचे होते. रेसकोर्सच्या एका फेरीत २ नाही तर २.२ किमी होतात आणि ते पण आतून चक्कर मारली तर... आणि आज रेसकोर्सच्या आत सोडत नसल्याने आपण बाहेरून ज्या फेऱ्या मारतोय अशा बाहेरून मारलेल्या एका फेरीचे अंतर भरते ३.३ किमी. म्हणजेच आत्ताच्या ३ फेऱ्या म्हणजेच आता ही फेरी संपवतानाच आपले ९.९ किमी होणार आहे. मी म्हटले अरे बापरे मग आता बास करतो उरलेले अंतर चालू का मी? किरण म्हणाला अरे निदान ही फेरी तर पूर्ण कर. मीही म्हटले बर... मग जरा वेळाने तो म्हणे मित्रा आतापर्यंत तू अजून एक फेरी मारायच्या तयारीत होतास तर मार ना अजून एक फेरी. मी म्हणे नको आता बास, तो म्हणे थोड्यावेळापुर्वी तर अजून एक फेरी मारायची म्हणत होतास, मग आताच काय झाले. असे आमचे बोलणे होईतो ती फेरी संपलीच आणि आम्ही पाणी प्यायला थांबलो असता पाहिले तर बरीच मंडळी थांबली होती. पण किरण म्हणाला तुला काही त्रास होतोय का, ठीक तर वाटते आहे ना मग चल मी पण अजून एक फेरी मारतो तुझ्याबरोबर. फरीदा पण तयार झाली आणि मग काय, आम्ही अजून एक फेरी मारली आणि अशा रितीने मी माझ्या आयुष्यातील पहिले दोन आकडी अंतर धावलो. ते ही पळायला सुरुवात केल्यानंतर एका आठवड्याच्या आत.

सगळेजण माझे कौतुक करत होते, किती मस्त वाटत होते....

पहिल्याच आठवड्यात दोन महत्वाचे धडे शिकायला मिळाले ते म्हणजे अंतरांविषयी भीती ही खूपशी मानसिक असते. (मला जेव्हा माहित नव्हते मी किती अंतर धावलो तोवर मला अजून पाळायचा हुरूप होता, आणि ज्या क्षणी मला कळले की मी ८ ऐवजी ९ किमी पळालो त्याच वेळेला मला आता पुरे करावं वाटू लागले) आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या भीती वर मात करायला सोबत प्रोत्साहन देणारे, धावणारे कोणी असतील तर खूप फरक पडू शकतो.

माझ्या पुढच्या वाटचालीची नव्हे वाटधावांची सुरुवात ह्या दोन गोष्टींच्या आधारे जोरात, जोमाने आणि झोकात झाली...

क्षमस्व पण क्रमशः
Happy

माझे धावणाख्यान ३ - सराव आणि पहिली स्पर्धा
http://www.maayboli.com/node/49416

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
शाळा सुटल्यावर पळणे थांबतेच... लोकल पकडण्यासाठी जी पळापळ होते तीच उरली

ढगाला आग लागली पळा पळा - असा काहीसा खेळ आठवतोय

मस्तच रे.. १० किमी पहिल्या आठवड्यात हे ग्रेटच. तू इतरांबरोबर पळलास त्याचा फायदा झालेला दिसतोय. मी आजवर फक्त दोनदाच ग्रुपमध्ये पळलोय आणि दोन्ही वेळेस आरामात ४५ मिनिटे पळालो. पण तेच एकटे धावताना मात्र ४५ मिनिटे ही वेळ मला बरीच जास्त वाटते.
तू नेमाने लिहून ही ललितलेखमाला पूर्ण कर म्हणजे सध्या पळणार्‍या व पळणे सुरु करावेसे वाटणार्‍यांना हुरुप येईल.

टण्या, तू वारी (लिहून) पुर्ण कर मी 'ही' मालीका पुर्ण करतो, हाऊज दॅट>>>>>> क्लीन बोल्डच एकदम Wink ही मालिका अर्धवट सोडायचा विचार दिसतोयपण तुझा Sad वारी पुर्ण होण्याची गेले २ वर्षं वाट बघतेय मी (तेव्हाच पहिल्यांदा वाचली म्हणुन २च वर्षं)... एकमेकांवर अवलंबुन न राहता आपापले लिखाण पुर्ण करत जा रे प्लीजच.. :दिवे घ्या लागले तरः

चिमुरी ते क्षमस्व तुझ्याच निळ्या बाहुलीला घाबरून लिहिलंय हो Wink

आणि अगं टण्याला लिहिण्यास उद्युक्त करावं म्हणून म्हटले अगं, माझे अजून २-३ भाग असतील जे पुढच्या विकांतापर्यंत संपवायचा विचार आहे....

त्या मधल्या काही काळात तर अचानक असे वाटू लागले की माझे गतीशील धावणारे पाय हे माझे नसून दुसऱ्याच कोणाचे आहेत आणि मी म्हणजे माझे हृदय / मेंदू / धड हा जणू दुसऱ्या कोणाचा तरी आहे आणि मला काही प्रयत्न करावे न लागता ते पळाताहेत आपोआप आणि मी ते तटस्थपणे त्रयस्थासारखा बघतोय. जणू पळता पळता लागलेले ध्यानच! अगदी वेगळीच अनुभूती होती ती... >>>>>> हे वाचून फारच भारी वाटले रे ......

लगे रहो आय मीन दौडते रहो ...... Happy

निळ्या बाहुलीला पण घाबरतात हे आताच कळालं.. मस्त वाटलं Wink

टण्या उद्युक्त झाला तर बरेच.. पण तु त्याच्याकडुन प्रेरणा घेउ नयेस इतकंच म्हणणं होतं Wink

काय भारी लिहीलय हर्पेन. कधी नव्हे ते मनापासून करुन पहावेसे वाटले
आय विश मला धावायला कोणीतरी मदत करेल. Happy

हर्पेन,

फार सही लिहितो आहेस, माझ्याकडून एक मोठा प्रतिसाद ड्यू आहे पण तो मालिकेतल्या शेवटच्या प्रकरणावरच लिहिन. तू लिहित रहा. अगदी सगळं डीटेलमध्ये लिही.

एकेक शारिरिक बॅरिअर तोडतांना मानसिक कुंपणांची एकेक खुंटी कशी गळून पडते हे वाचायला खूप आवडेल.

मस्त वाटतंय वाचायला.. चमनला अनुमोदन!.. मला अजूनही पहिले २ किमी. त्रास देतात. नंतर लयीत आल्यावर ब्रह्मानंद!!

फारच छान लिहिताय हर्पेन तुम्ही!! वाचूनच इन्स्पायर झाल्यासारखे होत आहे.
मी अलिकडेच पळायला शिकत आहे. स्टॅमिना अगदीच नाहीये त्यामुळे इतकी अंतरं वाचूनच दम लागला.

वाचताना असं वाटतंय की अगदी विनासायास जमलंय तुम्हाला. तुमच्या आधीपासूनच्या फिटनेसलाही त्यातलं खुपसं श्रेय असल्यामुळे आमच्यासारख्या नवख्यांना खुप मागेपासून सुरुवात करावी लागणारे. हरकत नाही.

नीटच लिहिताय. वाचताना स्फुरण चढतंय, सध्या त्याचीही नितांत आवश्यकता आहे! शेवटी सुरुवात तिथूनच होते.

मग आम्हाला बूट बांधायला कधी शिकवणार? Happy

मस्त लिहिलय.
पोहणे आणि ट्रेकींगचा सराव असल्यामुळे एका आठवड्यात १० किमीचा पल्ला पूर्ण करता आला असावा.

भारी !!
मी डबल डिजिट पळण्यासाठी इन्स्पिरेश्न घेउन टाकते. Happy
केव्हापासून चा ब्लॉक आहे जातच नाही.
पण अबकीबार दहा पळाणार Happy

मंडळी, हे आता इकडे टाकण्याचे कारण हेच आहे की सगळ्यांनी आपापले जोडे आणि ते पायात चढवून स्वतःला बाहेर काढावे आणि धावायला लागावे.

हाच तो महिना, हीच ती वेळ, जेव्हा पळायचा सराव चालू केला असता टप्प्या टप्प्याने कोणालाही, अगदी कोणालाही डिसेंबरपर्यंत अर्ध-मॅरॅथॉन तरी नक्की पळता येऊ शकेल. Happy

Pages