मी जसा जात आहे तुम्ही जा तसे!

Submitted by profspd on 22 May, 2014 - 13:02

मी जसा जात आहे तुम्ही जा तसे!
जागजागीच माझे उमटले ठसे!!

मी न कुरबूर केली न तक्रारही......
वादळासारखे का जिणे हे असे?

हासले ना दरिद्री विनोदा कुणी....
हासवायास गेले नि झाले हसे!

ठीक आहे, बरे चालले सांगतो....
जाणतो मी जरी ठीक ना फारसे!

पानगळ लाजली, खूप ओशाळली....
लागले झाड माझेच डवरू जसे!

कोवळी कोवळी प्रीत माझी-तुझी....
धीर धर तू, धरू दे तिला बाळसे!

हात काळे कशाला करू सांग मी?
हात द्याया मला लागले कोळसे!

मी घसरतो कधी थांबले पाहण्या....
मी घसरलो तसे वाटले हायसे!

नाद मी आरशांचा दिला सोडुनी....
बाटलेलेलच मी पाहिले आरसे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users