विश्वव्यापकतेचा हव्यास

Submitted by अतुल ठाकुर on 9 May, 2014 - 08:05

संशोधन करीत असताना अनेक प्रश्न पडत गेले. जे संशोधनाशी आणि समाजातील काही विशिष्ठ प्रवृत्तीशी निगडीत होते. ते प्रत्यक्ष जीवनाच्या तर फारच जवळचे आहेत. संशोधन सुरु आहे. ते सुरुच राहिल. पण प्रश्नही निर्माण होतच राहतील. समोर येणार्‍या अनेक महत्त्वाच्या प्रश्नामधला एक प्रश्न म्हणजे माणसाला अवघं जग कवेत घेण्याचा हव्यास, अट्टाहास कशासाठी असतो? या प्रश्नाची चर्चा करताना माझ्यासमोर फक्त समाजशास्त्र आहे. इतर विषयांमध्ये हा प्रश्न चर्चिला जातो कि नाही ते माहित नाही. समाजशास्त्रामध्ये काही संकल्पना प्रमुख मानल्या जातात. पॉवर ही एक अशीच संकल्पना. त्यानंतर शोषण, जातपातीवर आधारित राजकारण, त्यात उतरंडीवरील सर्वात खाली असलेल्या जमतीचे शोषण, शहरीकरण, जागतीकीकरण, त्यात माणसाचे होणारे शोषण, निरनिराळ्या चळवळी, धर्म, तदनुषंगाने येणारे आयडेन्टीटी क्रायसेस, स्त्रीयांच्या समस्या, त्यांचे शोषण वगैरे. समाजशास्त्रामधले विषय अनंत आहेत. मात्र ते काही ठरावीक संकल्पनांभोवती फीरत असतात. शोषण, पॉवर, असमानता, समाजापासुन वेगळे टाकणे(सोशल एक्सक्लुजन), आर्थिक प्रश्न या काही संकल्पना आहेत. थोडक्यात सांगायचं तर पॉवर आणि शोषण या महत्त्वाच्या मूलभूत संकल्पना मानल्या जातात. सारे विषय यांच्या अवती भोवती फिरत असतात. किंबहुना संशोधनासाठी विषय निवडताना तो विषय या संकल्पनांभोवती गुंफलेला असावा अशीच अपेक्षा केली जाते. आणि माझा प्रश्न येथुनच सुरु होतो. विषय कितीही सीमित, छोटा आणि मायक्रो लेव्हलचा निवडला तरी तो जोडलेला असतो पॉवर आणि शोषणाशी. त्यामुळे "आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम" प्रमाणे शेवटी सारेकाही पॉवर आणि शोषणाशी निगडीत असते, कुठेतरी शोषण होत असते. पॉवर सर्वव्यापक आहे. बहुसंख्य प्रश्न हे पॉवर आणि शोषणाशी संबंधीत असतात असा निष्कर्ष निघुन तुमचा कॅनवास एकदम जागतिक आणि सर्वसमावेशक होऊन जातो. संशोधक, मार्गदर्शक, विभागातील विद्वज्जन सर्वांच्या चेहर्‍यावर या कानापासुन त्या कानापर्यंत शाहणे हास्य दिसु लागते. सर्वांचे रांजण समाधानाने भरतात. समाजाप्रति कर्तव्य पार पडलेले असते.

प्रामाणिकपणे सांगायचं तर मला या सार्‍यांबद्दल आदर आहे. बहुसंख्य प्रश्न हे शोषण आणि पॉवरशी निगडीत आहेत हे मला मान्य आहे. त्यामुळे त्याबाबत संशोधनकरुन समाजातील असमानता, शोषण, अन्याय चव्हाट्यावर आणणार्‍या संशोधकांबद्दल कौतुक कुणाला वाटणार नाही? ज्यांना वाटणार नाही ती माणसे करंटीच म्हटली पाहिजेत. त्या रांगेत मला माझी वर्णी लावायची नाहीय. या सार्‍या कार्याबद्दल अतिशय आदर बाळगुन मला काहीएक प्रश्न येथे विचारावासे वाटतात कि समाजात काही चांगली कामे देखिल होतच असतात. ही कामे देखिल समाजाचा आणि म्हणुन समाजशास्त्राचा भाग नसतो काय? ही चांगली कामे जास्तीत जास्त निर्दोष व्हावीत यासाठी समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याने संशोधन करु नये काय? त्यामुळे समाजात फायदा होणार नाही काय? घाण उकरणे हे एकमेव कामच संशोधकाने करावे काय? अनेक त्यागी निस्वार्थी माणसे चांगल्या, लोकोपयोगी कामात गुंतलेली असतात. आपल्या संशोधनाचा कदाचित त्यांना उपयोग होऊ शकतो. सकारात्मक संधोशन हे समाजशास्त्रात अस्पृश्य का मानले जाते असा स्पष्ट प्रश्न येथे मला विचारावासा वाटतो. याचं कारण हे आहे कि साधारणपणे ही प्रवृत्ती मला समाजशास्त्रात आढळली आहे. जे प्रश्न कुठल्याही तर्‍हेने शोषण, अन्याय, पॉवरशी निगडीत नाहीत ते खरेखुरे प्रश्नच नव्हेत अशी मनोवृत्ती मला अनेकदा आढळते. काहींना हे अतिरेकी, टोकाचं विधान वाटण्याची शक्यता आहे. पण मला आलेला अनुभव हा आहे. पुढे जाण्याआधी हे ही सांगावेसे वाटते कि समाजशास्त्रात मार्क्सवाद हे चलनी नाणे असण्याचं हे देखिल महत्त्वाचं कारण आहे कि येथील बहुतेक प्रश्न हे पॉवर आणि शोषण आणि सरतेशेवटी अर्थकारणाशी जोडले जातात. मार्क्सवादात त्यावर ठरावीक, ठाशीव उत्तरे तयार असतात. या सार्‍या वावटळीत माझ्यासारख्या माणसाची अवस्था वाईट असते. सकारात्मक विषयांची फारशी माहिती कुणाला नसते. त्यांची माहिती करुन घेण्याची गरज त्यांना वाटत नाही. ते विषय महत्त्वाचे वाटत नाहीत. कदाचित संशोधनाच्या योग्यतेचेदेखिल वाटत नसावेत. "सोशियॉलॉजी इज अ सायन्स ऑफ डीबगींग" अशी टिमकी अनेक जण वाजवत असतात. आणि ते मान्य नसलेले माझ्यासारखे भेटले की संघर्ष सुरु होतो. याचाही अनुभव मिळाला.

अलिकडे पीएचडी करण्याआधी कोर्सवर्क करावं लागतं. साधारणपणे मुलभुत संकल्पना पक्क्या व्हाव्यात, मेथडॉलॉजी, मेथडस संदर्भात जास्त माहिती मिळावी आणि एकुणच संशोधनाच्या दिशेने विद्यार्थ्याचा फोकस स्पष्ट व्हावा असा याचा उद्देश असतो. यात शिकवणार्‍या काही प्राध्यापकांचा आवडता टाईमपास म्हणजे तुम्ही संशोधन का करता आहात हा प्रश्न प्रत्येकाला विचारणे. इंक्रीमेंट मिळतं म्हणुन पीएचडी करणारे बरेच असतात. त्यामुळे मग सर्वांना एक छोटेखानी अध्यात्मिक व्याख्यान दिले जाते. जे आस्था, संस्कार अशा चॅनलवरदेखिल खपुन जाईल असे असते. फिल्डला तुम्ही काय देता यावर प्रवचन दिले जाते. दुसरा प्रश्न प्रत्येकाच्या विषयानुरुप संशोधनाच्या निगडीत असतो. तर मला एका प्राध्यापक महाशयांनी संशोधनाविषयी प्रश्न विचारला. मी असाध्य आजार, त्याबद्दलची सपोर्ट सिस्टीम वगैरे बद्दल सांगण्याचा प्रयत्न करु लागलो. ते थोडेसे ऐकुन त्यांनी अचानक किडनी संबंधी आजार, त्याला लागणारा अफाट खर्च, त्याबद्दल होणारे शोषण, त्याचे अर्थकारण यावर आपला घोडा दौडवायला सुरुवात केली. त्यांचा अश्वमेध एकदम भरधाव निघाला होता. आणि मी पाहातच राहिलो होतो. ते सांगत होते त्यातली कुठलिही गोष्ट माझ्या संशोधनाचा प्रमुख भाग नव्हती. पण एका विशिष्ठ साच्यात माणसे विचार कसा करतात ते मात्र कळुन आले. शेवटी माझ्या संशोधनाबद्दल मी स्वतःच फारसा "क्लियर" नाही असा निष्कर्ष निघाला आणि मला त्याबद्दल काडीइतकेही वाईट वाटले नाही. कारण अनेक सहाध्यायी मी माझ्या संशोधनासंबंधी खुप फोकस्ड आहे असेही सर्टीफिकेट देत असतात. त्यामुळे मला आता माझ्यावर केलेल्या शेर्‍यांबद्दल काही वाटतच नाही. मात्र मला अजुनही अनेक नविन नविन गोष्टी सुचत असतात हे खरे. आणि त्यांचा समावेश मी शक्य झाल्यास करीतही राहतो. माझ्यानंतर माझ्या मित्राला त्याच्या विषयाविषयी विचारले गेले. त्याचे संशोधन कम्युनिटीसंबंधी आहे. प्राध्यापक खुशच होऊन गेले. एकदम एक्साईटेड. तलवारींचा खणखणाट होऊ लागला. कम्युनिटी स्टडीज म्हणजे, शोषण, असमानता, पॉवर, अन्याय, संस्कृती, आयडेन्टीटी सार्‍यांनी खचाखच भरलेले कुरणच. कम्युनिटी स्टडीजच्या ऐसपैस घोंगड्यात अनेकांना आरामशीर पाय पसरता येतात हे पुन्हा एकदा लक्षात आले. मी निवडलेल्या थियरीबद्दलदेखिल त्यांना फरशी माहिती नव्हतीच. मलाही चर्चा करण्यात फारसा रस उरला नव्हता. मात्र एकंदरीत यामुळे काही प्रश्न मला पडले ते अजुनही मुलभुत महत्त्वाचे वाटतात.

खरोखरच जगातले सर्व प्रश्न पॉवर आणि शोषणाशीच निगडीत असतात काय? सार्‍या प्रश्नांची उकल त्यामागचे अर्थकारण समजल्याने करता येते काय? समजा पार्किन्सन्ससारखा अजुनही असाध्य आणि प्रोग्रेसिव्ह स्वरुपाचा आजार आहे. तो साधारणपणे उतार वयात होतो. स्त्रीपुरुष, गरीब श्रीमंत कुणालाही होऊ शकतो. त्याला जातीपातीचे धर्माचे बंधन नाही. त्यामुळे क्लास, कास्ट, जेंडर या अनुषंगाने यावर फारसे काम करता येईल असे वाटत नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे ते यावरची एक महागडी शस्त्रक्रिया करतात पण त्यामूळेदेखिल तो पूर्णपणे बरा होत नाही. काही लक्षणे कमी होतात असे म्हटले जाते. या आजाराने ग्रस्त असलेली माणसे समाजापासुन दुर राहु लागतात. शरिराच्या कंप पावण्यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास हरवतो. ती माणसे डिप्रेशनमध्ये जातात. त्यांना पुन्हा समाजत परत आणणं, त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवुन देणं हे काम आधारगट करतो. हा आधार गट विनामुल्य काम करतो. त्यात जातपात, आर्थिक स्टेटस विचारात घेतले जात नाही. ती माणसे निरनिराळे उपक्रम राबवतात. त्यातल्या डान्सथेरेपीमुळे एका पार्किन्सन्सग्रस्त गृहस्थांची पुन्हा कार चालवु लागण्याइतपत प्रगती झाली. या आधारगटाच्या उपक्रमांमुळे अनेकांना आपला आत्मविश्वास परत मिळाला. अनेकजण पुन्हा उत्साहाने समाजात वावरु लागले. या सार्‍यात शोषण कुठे येतं? पॉवर कुठे येते? अर्थकारण कूठे येतं? असे असाध्य आजार अनेक आहेत. त्यामुळे स्वतःला समाजापासुन दुर ठेवणारी मंडळी आहेत. नैराश्यात जाणारी माणसे आहेत. कूठल्याही व्यसनात हेच होत असतं आणि मुक्तांगण मध्ये फॉलोअप ग्रुप्स हे त्या माणसांनी आता समाजाशी एकरुप होऊन वागावं यासाठीदेखिल चालवले जातात. यात कुठेही, कास्ट, क्लास, पॉवर, शोषण येत नाही म्हणुन हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत काय? समाजशास्त्रज्ञांनी, संशोधकांनी हे प्रश्न अस्पृश्य मानावेत काय? आता अशी कामे करणार्‍या काही संघटनांमध्ये राजकारणदेखिल असणार, त्यात काही ठिकाणी पॉवरचा खेळ सुरु असणार. ठीक आहे ज्यांना तेच महत्त्वाचं वाटतं त्यानी ते करावं. पण माझ्यासारख्यांना त्यांच्या उपक्रमांमुळे जो समाजाचा एकुण फायदा होतो त्यावर लक्ष केंद्रित करावंसं वाटलं तर त्यात गैर काय आहे?

विश्वव्यापक होऊ इच्छीणार्‍यांना सारे काही ग्रँड थेयरीशी संबंधीत असावे असे वाटते. एक विषय घ्यावा. त्यावर संशोधन करावे. त्याचा सांगोपांग अभ्यास करावा. हे चांगलेच आहे. पण माझ्यासारखी माणसे समाजाच्या, अतिविस्तृत आणि गुंतागुंतीच्या पटावरचा एक छोटासा तुकडा घेतात आणि तो सुक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेऊन न्याहाळण्याचा प्रयत्न करतात. येथे लोकांची अक्कल काढण्याचा प्रयत्न केला जातो. कदाचित ग्रँड थियरीला भिडण्याची, संशोधन सर्वसमावेशक करण्याची (ओव्हर आर्चिंग हा इथला आवडता शब्द) आमची योग्यताच नसेल. जास्त रंगीत भाषेत सांगायचं तर लायकी नसेल. नसु देत. माझा आवाका माझ्यापाशी. पण आम्ही हाताळतो ते प्रश्न आम्हाला बिनमहत्वाचे वाटत नाहीत हीच खरी गोष्ट आहे. शोषण आणि अर्थकारण यांच्याशी प्रश्न जोडला म्हणजे बहुतेकांची ब्रह्मानंदी टाळी लागते. माझ्यासाऱख्याला दुसरी वाट धरावीशी वाटते. समोर मृत्यु दिसत असुन किंवा अनेक वर्षे निरनिराळ्या मन खचवणार्‍या लक्षणांशी तोड देण्याचे आव्हान आयुष्याने समोर ठेवलेले असुन सुद्धा माणसे ते आव्हान पेलतात. खंबीरपणे उभी राहतात. समाजाची ही बाजुदेखिल लोकांपुढे यायला हवी. आता मला इतर कुठल्याही संशोधकासमोर कधीही कमीपणा वाटत नाही. जगातले सारे प्रश्न अर्थकारणाशी, पॉवरशी आणि शोषणाशी जोडणार्‍यांना आता "और भी गम है जमानेमें" असं अगदी वेगळ्या अर्थाने सांगावंसं मात्र वाटतं.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समाजात काही चांगली कामे देखिल होतच .........समाजात फायदा होणार नाही काय?
उत्तम विचार.
पण पैसे कोण देणार? जसे वर्तमानपत्रे फक्त वाईट गोष्टींबद्दलच लिहीतात कारण त्या सनसनाटी असतात, त्याने खप वाढतो व विक्री होऊन नफा मिळतो, तसेच जास्त करून लोकपण, फक्त वाईट गोष्टींबाबत संशोधन करण्यासाठीच पैसे देतात. कारण त्या सनसनाटी असतात, त्यातून प्रसिद्धी लाभते. एकदा का संशोधन प्रसिद्ध होऊन संशोधकाची नि त्याला पैसे देणार्‍यांची वाहवा झाली की पुढे तो प्रश्न सुटला आहे का, कमी झाला आहे का वगैरे कोणीच बघत नाहीत, मग दुसर्‍या कुणाला तरी तोच विषय मिळतो.

अतुल ठाकूर,

समस्येवर अगदी अचूक बोट ठेवलंत तुम्ही. या तथाकथित संशोधनाचं आजून एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे समाजास तुच्छ लेखणे. बऱ्यावाईट गोष्टी प्रत्येक समाजात चालतात. म्हणून सरसकट नावे ठेवणे बरोबर नाही. या अंगुलीनिर्देशामागे छुपा अजेंडा असावा अशी शंका आहे. या शंकेचं कारण फॅबियन सोसायटीच्या कार्यपद्धती आहे. त्यात सुधारणावाद आणि क्रमवाद या दोन अंगांचा समावेश होतो.

बाकी, लेखाशी व झक्कींच्या मीमांसेशी पूर्णपणे सहमत. Happy

आ.न.,
-गा.पै.

<< सकारात्मक संधोशन हे समाजशास्त्रात अस्पृश्य का मानले जाते असा स्पष्ट प्रश्न येथे मला विचारावासा वाटतो. >> अशा सकारात्मक संशोधनाच्या निष्कर्षांचा वैद्यकीय, औद्योगिक इ. क्षेत्रांत वापर सुरूं झाल्यावर जर त्याचे व्यापक परिणाम समाजजीवनावर झाले, तरच ते परिणाम समाजशास्त्राचा विषय होणार, असं नाही वाटत ? जगात अनेक क्षेत्रांत महत्वाचीं कामं अगणित लोक मन लावून, पूर्ण आयुष्य त्यासाठी वाहून घेवून करतच असतात; समाजशास्त्राने त्या प्रत्येक कार्याची दखल न घेणं म्हणजे त्या क्षेत्रातल्या कामाना अस्पृश्य मानणं किंवा त्यांचं महत्व लक्षात न घेणं, असं खरंच म्हणता येईल ?

कोणत्याही विषयातील संशोधनाबद्दल कुणालाही रस वाटायला त्या विषयाचं किमान ज्ञान, आवड व संशोधनाकडे असलेला मानसिक कल हे घटक आवश्यक असावेत. समाजशास्त्राचे विषय हे त्या तुलनेत खूपच अधिक सामान्यज्ञानाकडे झुकणारे व जीवनस्पर्शी असल्याने ते अधिक चर्चेत असणं स्वाभाविक असावं.
विश्वनाथन आनंद हा कधीही सचिन तेंडूलकर तर सोडाच पण आयपीएलमधल्या नवोदित खेळाडू एवढाही चर्चिला जाणार नाही; पण त्यामुळे आनंदचं महत्व तर कमी होत नाहीच पण तोही त्यामुळे बुद्धीबळ सोडून क्रिकेटच्या मागे धांवणारही नाही किंवा क्रिकेट समीक्षक त्याचं कौतुक कां नाही करत म्हणून तक्रारही करणार नाही. प्रत्येकाची बौद्धिक, मानसिक ठेवण वेगळी असते व त्याच्याशीं प्रामाणिक राहूनच काम करणं महत्वाचं; इतर जण त्याला किती महत्व देतात, हें अगदींच दुय्यम !

अतुल ठाकूर,

सत्ता आणि शोषणास भारतीय शिक्षणक्षेत्रात इतकी मागणी का हा तुमचा प्रश्न मनात रेंगाळत होताच. भाऊ तोरसेकरांचा एक लेख वाचनात आला आणि खटका जुळल्यासारखा वाटला.

त्यांचा लेख इथे आहे : निवडणूकीचे खरे प्रतिस्पर्धी.........अपेक्षा आणि आकांक्षा

लेखातले दोन उतारे विशेष महत्त्वाचे वाटले :

>> पन्नास साठ वर्षापुर्वी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने जी वाटचाल केली, तिथून आपण खुप
>> पुढे निघून आलेलो आहोत. आज जपानला मागे टाकून भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे.
>> अशावेळी अनेक वास्तविक मापदंड बदलून गेलेले आहेत. १९६०-७० च्या युगातले आर्थिक वा व्यवहारी मापदंड
>> आज कालबाह्य झालेले आहेत. गरीब, दलित, शोषित. पिछडा, शहरी, ग्रामीण या शब्दांच्या तीनचार दशके
>> मागच्या व्याख्या, आता कालबाह्य होऊन गेल्या आहेत. जातीपाती उपजाती व भाषिक, सामाजिक, धार्मिक
>> घटकांमधल्या भिंती गेल्या दोन दशकात बर्‍याच ढासळून पडलेल्या आहेत. त्या विस्कळीतपणाने नवे सामाजिक
>> आर्थिक घटक उदयास येत आहेत. सामाजिक आर्थिक घुसळणीतून हे नवे गट-घटक आपले भवितव्य नव्या
>> नजरेने पाहू लागले आहेत. पण त्यांच्या व्याख्या नव्याने निर्माण करण्याचे ज्यांचे काम होते; अशा राजकीय
>> सामाजिक अभ्यासकांनी आळशीपणानेच जुन्या व्याख्यांनुसार कामकाज चालविले आहे.

२.
>> प्रत्येक पक्षाची वा नेत्याची भूमिका काय आहे? गरीब बिचारी जनता, तिला अमूक मिळत नाही, तमूक गोष्टीसाठी
>> लोक वंचित आहेत. त्यांना असे काहीतरी फ़ुकटात दिले पाहिजे. गरीबांच्या अपेक्षा आहेत, अशी राजकीय भूमिका
>> दोनतीन दशकापासून आहे. सर्वसाधारण जनता म्हणजे कफ़ल्लक, भिकारी आणि राज्यकर्ता म्हणजे उदार
>> होऊन तिच्या अंगावर तुकडे फ़ेकणारा अशीच एक समजूत आहे.

तर हे दोन विचार तुमच्या लेखाच्या संदर्भात लावून पहिले तर काय दिसतं?

१. पहिला विचार : आजचे बुद्धीजीवी प्राध्यापक वगैरे आळशी आहेत. ते आपापल्या कालबाह्य समजुतींच्या आधारे नव्या घडामोडी मापू इच्छितात.

२. दुसरा विचार : हा जास्ती रोचक आहे. यात जनतेच्या जागी विद्यार्थी हा शब्द टाका आणि नेत्याच्या जागी प्राध्यापक टाका. बघा परिस्थिती अगदी ठिक्क जुळून येईल!

या दोन्ही विचारांचं मूळ शोधायचा प्रयत्न करतो आहे. लवकरच पुढचा संदेश टाकेन. जमल्यास भाऊंचा लेख पूर्ण वाचवा असं सुचवेन. Happy

आ.न.,
-गा.पै.

गापैजी. भाऊ तोरसकरांचा लेख आवडला. त्यातील मते बहुतांश मला मान्य आहेत. त्यातल्या राजकारणी लोकांबद्दल त्यांनी जे काही म्हटले आहे त्याबद्दल मला काही बोलता येणार नाही. कारण त्याचा माझा अभ्यास नाही. मात्र समाजशास्त्राच्या पंडितांविषयी त्यांनी जे काही म्हटले आहे त्यावर चर्चा करता येईल. जुन्या व्याख्या तशाच ठेऊन त्यांनी बदललेया जगात काम चालु ठेवले आहे हे खरेच. पण त्याची कारणमिमांसा करताना "आळशीपणा" हा शब्द माझ्यासारख्या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याला वापरता येणार नाही. या पंडितांच्या एकुण दैनंदिन जीवनाचा आढावा घेतलात तर कळुन येईल कि पुढे जाण्यासाठी ही माणसे अनेक उद्योग करीत असतात. नवीन भरपुर पगाराच्या नोकर्‍या, नवनवी सेमिनार्स, परदेश दौरे, तेथे पेपर वाचन, सेमिनार्सचं उदघाटन, संधोशन, निरनिराळे प्रोजेक्टस अशी रेलचेल असते. कुणीही गप्प बसलेला नसतो. त्यामुळे ही माणसे आळशी आहेत म्हणुन नवीन गोष्टींकडे लक्ष देत नाहीत असा निष्कर्ष काढणे कठीण आहे.

हि माणसे विद्वान आहेत. काही जण त्यानुसार कामही करीत असतात. त्याबद्दल मला आदर आहे. मात्र आमच्यासारखा कुणीतरी चाकोरीबाहेर काम करु लागता तर त्यांना चालत नाही. ही पोथीनिष्ठा मला असह्य होते. एक उदाहरण द्यायचं झालं तर, जेव्हा पॉवर हा विषय छेडला जातो तेव्हा हटकुन मायकल फुको याचं नाव घेतलं जातं. या माणसाने पॉवर आणि त्यासंबंधी क्रांतीकारक संशोधन करुन त्या संकल्पना समाजशास्त्रात रुजवल्या. नेहेमी "पॉवर" ही संकल्पना शोषणासाठी समाजशास्त्रात राबवली जाते. मात्र स्वतः फुको पॉवर बद्दल काय म्हणतो?

खुद्द फुको "पॉवर ही संकल्पना ही नेहेमी नकारात्मक पद्ध्ह्तीने वापरणे आपण थांबवले पाहिजे" असे "डिसिप्लिन अँड पनिशमेंट" या आपल्या पुस्तकात (पान १९४) वर म्हणतो.

‘We must cease once and for all to describe the effects of power in negative terms: it ‘excludes’, it ‘represses’, it ‘censors’, it ‘abstracts’, it ‘masks’, it ‘conceals’. In fact power produces; it produces reality; it produces domains of objects and rituals of truth. The individual and the knowledge that may be gained of him belong to this production’ (Foucault 1991: 194).

मात्र अशी उदाहरणे दिल्यास शिक्षकगणाकडुन एकतर दुर्लक्ष केलं जातं किंवा मग वादावादी. आता त्या फंदात मी पडतच नाही.

अतुल ठाकूर,

तुमचं सुगम विवेचन आवडलं. तुम्ही ज्याला पोथीनिष्ठा म्हणता त्याला वैचारिक आळशीपणा म्हणता येईल काय? उत्तर बहुधा हो असं आहे. Proud

विनोदाचा भाग सोडला तर या पोथीनिष्ठेमागे बदलाचं भय असावं अशीही एक शंका आहे. आपलं विलासगृह (comfort zone) सोडून नवीन प्रांतात मुशाफिरी करायला जे धाडस लागतं ते या पोथीनिष्ठावंतांत नाही. याला कारण म्हणजे त्यांचे राजकारण्यांशी लागेबांधे जुळलेले आहेत. असं धाडस कोणी दाखवलं तर त्याची गच्छंती अटळ आहे. दिल्लीत जनेविची का चलती आहे हे सर्वांना माहितीये.

हा वैचारिक आळशीपणा आता दिल्लीतल्या सत्तावर्तुळाला भोवत आहे. भाऊंच्या लेखावर आर्थिक नियोजनाच्या अंगाने माझा प्रतिसाद दिला आहे : http://bhautorsekar.blogspot.com/2014/05/blog-post_10.html?showComment=1...

या प्रतिसादात महालनवीस व नेहरू यांच्यावर टीका करण्याचा उद्देश नाही. त्यांची नावे केवळ पुकारार्थ (=लेबल म्हणून) वापरली आहेत. जमल्यास पुढे चर्चा करूया. Happy

आ.न.,
-गा.पै.

तुम्ही ज्याला पोथीनिष्ठा म्हणता त्याला वैचारिक आळशीपणा म्हणता येईल काय? उत्तर बहुधा हो असं आहे.

गापैजी आपल्या या उत्तराशी सहमत होणं कठीण आहे. मला वाटतं यात यापेक्षा काहीतरी जास्त असते. निव्वळ वैचारिक आळस असेल तर दहा दहा पुस्तकं कशी प्रसिद्ध होतील? निरनिराळ्या सेमिनार्सना कसं जाता येईल? त्यासाठीसुद्धा वाचावं लागतंच. थोडाफार अभ्यास करावा लागतोच. ही माणसं विद्वान आहेत. मात्र हा आळस नसुन अतिशय कौशल्याने त्यांनी हा डाव रचलेला आहे असे माझे नम्र मत आहे.

यातील काही अतिशय आदरणिय असे अपवाद वगळले तर काय आढळतं?

आपण उदाहरणादाखल मार्क्सवाद घेऊ. या तत्त्वज्ञानाशी तुमची नाळ जोडलेली दाखवली की तुम्ही आपोआपच गरीबांचे कैवारी होऊन जाता. फारसं काही करावं लागत नाही. काही करण्याची जबाबदारी तुमच्यावर नसतेच. तुम्ही विचार देत असता. तुम्ही ज्यांचे कैवारी असता त्या गरीबांना मार्क्सवाद सांगावा लागणार नसतो. लागला तरी त्यांना कळणार नसतो. मार्क्सवादाची पोपटपंची करावी लागते ती सेमिनार मध्ये, किंवा पार्ट्यांमध्ये दुसर्‍याच्या खर्चाने दारु पिताना. त्यात प्रामाणिकपणे पैसा मिळवणार्‍याला कॅपिटालिस्ट म्हणुन हिणवुन, आजुबाजुच्यांना इंप्रेस करता येतं. आदिवासी भागात चाललेल्या चळवळींवर यथेच्छ बोलावे आणि मग आपल्या वातानुकुलित कार मधुन घरी जावे. करायचं काही नाही फक्त बोलायचं. गीता चुक, गांधी चुक, मार्क्स? त्याच्या तत्वज्ञानाचा सतत विकास होत आहे त्यामुळे ते तत्त्वज्ञान सर्वसमावेशक. या सार्‍याचे फायदे कल्पनातीत असतात. विद्यार्थ्यांचे तुम्ही हिरो असता. उच्चभ्रु वर्तुळात तुम्ही इंटलेक्चुअल असता. शोषितांबद्दल सगळीकडे घसाफोड भाषणे करायला मो़कळे असता.

या सार्‍याला मला एकदा सणसणीत अपवाद दिसला होता. खैरलांजीच्या दलित अत्याचार प्रकरणी त्यात काम केलेली अगदी ग्रासरुट लेव्हलची म्हणता येतील अशी गावरान माणसे, कार्यकर्ते त्यादिवशी सेमिनारला बोलावले होते. त्यांचं बोलण ऐकताना मात्र फार फार वेगळं वाटत होतं. त्याच्याकडे फर्ड इंग्रजी नव्हतं. पल्लेदार वाक्यरचना नव्ह्ती. पण ते हृदयाला भिडणारं होतं. परीटघडीचे विद्वान त्यादिवशी ओशाळले असतील.

गंमत म्हणुन सांगतो, देव आनंदच्या देस परदेस मध्ये "नजराना भेजा किसीने प्यार का" म्हणुन एक गाणं आहे. त्यात देव आनंद आपल्या दुर देशी गेलेल्या भावाच्या पत्नीला रिझवत असतो. त्याची भेट आलीय म्हणुन एक मोठं खोकं तिला देतो. आनंदुन ती खोकं उघडते. त्यात चार खोकी असतात. ती उघडत जाते आणि खोक्यामागुन खोकी निघत राहतात. शेवटी उरलेल्या एका छोट्याशा खोक्यात एक लॉलीपॉप असते.

तिला लॉलीपॉप तरी मिळते. सेमिनार मधील विद्वत्तापूर्ण चर्चांमध्ये खोकी उघडणंच संपत नाही. सरळ प्रश्न केल्यास माणसं तुम्हाला टाळतात. त्यांची भिंत चिरेबंदी असते. त्यावर डोके आपटणार्‍यांचा कपाळमोक्ष ठरलेला असतो. असो. यावर मला खुप काही लिहिता येईल पण या विशिष्ठ वर्गाबद्दल मला इतकी घृणा आहे कि लिहिता लिहिता देखिल मला चीड आवरेनाशी होते.

आपलं विलासगृह (comfort zone) सोडून नवीन प्रांतात मुशाफिरी करायला जे धाडस लागतं ते या पोथीनिष्ठावंतांत नाही.

Happy

पैलवाना, तुमचं विलासगृह कोणतं ? लंडन ?

फार विचार करायला लावणारा लेख आहे. लेखाची मांडणीही खुप चांगली झालीये. प्रतिसादांतले मधले काही मुद्दे समजले नाहीत. तुमचा शेवटचा प्रतिसाद मात्र पटण्यासारखा आहे.

लगो,

>> पैलवाना, तुमचं विलासगृह कोणतं ? लंडन ?

नाही हो. माझं विलासगृह मुंबई आहे. ते सोडून मी ब्रायटनला मुशाफिरी करायला आलो. Happy

आ.न.,
-गा.पै.

अतुल ठाकूर,

>> निव्वळ वैचारिक आळस असेल तर दहा दहा पुस्तकं कशी प्रसिद्ध होतील?

तुम्ही समाजशास्त्राचे विद्यार्थी आहात तसा मी नाही. त्यामुळे वैचारिक आळस म्हणजे काय ते तुम्हीच यथोचित रीतीने जाणून आहात! Happy

मला वाटतं आपण एकाच आकृतीबंधास वेगवेगळ्या नावाने पुकारत आहोत. वस्तुस्थितीची दखल न घेता केलेलं कार्य हे या पोटभरू पंडितांचं व्यवच्छेदक लक्षण आहे.

हा जो विशिष्ट वर्ग आहे त्याच्या एका प्रतीकात्मक प्रतिनिधीने गेल्या २४ एप्रिलला एक संपत्र पाठवलं होतं. त्या अनुषंगाने इथे एक निरीक्षण नोंदवलं आहे : http://www.maayboli.com/node/48349?page=9#comment-3104782

आ.न.,
-गा.पै.

लेख आणि त्यावरील चर्चाही छान
>.>>यावर मला खुप काही लिहिता येईल पण या विशिष्ठ वर्गाबद्दल मला इतकी घृणा आहे कि लिहिता लिहिता देखिल मला चीड आवरेनाशी होते.
मलाही अशीच चीड यायची.पण आता त्यांची दखल घ्यावी अशी वाटत नाही.निवृत्त झाल्याने हे सोपही आहे.पाण्यात राहून कधी कधी माशाशी वैर करता येत नाही.