प्लिज ???

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 April, 2014 - 08:16

जशीच्या-तशी आजही आठवतेय रे ती दोन वर्षांपूर्वीची १५ एप्रिलची संध्याकाळ, मी नेहमीप्रमाणे स्वैंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते. रविवारची सुट्टी घरी घालवून, नि तू त्याच्यासाठीच खास साता-याहून आणलेल्या कंधी पेढ्यावर ताव मारुन हॉस्टेलला परत निघालेल्या अक्षयला कधी नव्हे ते तुझ्या शेजारी बसवून तू त्याच्या नकळत त्याच बौध्दीक घेत होतास. ( स्वतःचे विचार समोरच्याच्या गळी कसे उतरवायचे हे बाकी कुणी शिकावं तर तुझ्याकडूनच ! )

माझं शरीर स्वैपाकघरात नि सगळ लक्ष बाप-लेकांच्या चर्चेत रेंगाळल होत, तसा चिंटू मुळातच समजुतदार रे आपला ! तू त्याला तुझ्या अनुभवावरुन सोदाहरण पटवून देत होतास की अ‍ॅकॅडेमिक्सवर आत्ताच पूर्ण लक्ष केंद्रीत करणं किती आवश्यक आहे ते. कँम्पस ईंटर्व्हूज, पोस्ट ग्रॅज्यूएशन, त्याची फोटोग्राफी, त्याच्या ईच्छा, तुझ्या अपेक्षा... तो ही कधी नव्हत मनमोकळे प्रश्न विचारुन आपल शंका निरसन करुन घेत होता. माझा शेवटचा फुलका फुलायला नि तुमच बोलण संपायला एकच गाठ पडली होती बघ !

रविवारची सिरीयल्स नसल्याने आईही बाहेर आलेली गप्पा मारण्यासाठी. तुझ नि तिच सुत फार छान जमायच गप्पा मारताना, तिला तेच तेच प्रश्न पडायचे नि तू तितक्याच शांततेने, आपुलकीने तिच्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर न कंटाळता तत्परतेने द्यायचास बाबा ! व्हायच काय त्यामुळे माझी सुटका व्हायची बघ वाचन-लिखाणासाठी !!

पण त्यादिवशी माझा हा मनोदय तू सपशेल हाणून पाडलास, मी तिथून सटकायच्या आधी बी पी च मशिन आतल्या बेडरुममधून आणून द्यायच फर्मान सोडलस. झालं ताडल मी, की आज काही आपली सुटका नाही. आत जाता जाता घड्याळाकडे पाहिल तर सात वाजलेले म्हंटल आता नऊ पर्यंतची निश्चिती ! पण खर सांगू मनातून खोलवर कुठेतरी हे सगळ किंवा हेच सगळ हव असायच रे मलाही.

तू तिच्या बी पी च रीडींग घेत होतास आणि तिला पटवून देत होतास की बी पी, डायबेटीस, किडनी फंक्शन्स व्यवस्थित राहण्यासाठी चालायचा व्यायाम आणि पाणी पिण्याच प्रमाण सुयोग्य असण किती गरजेच आहे ते, तिचेही नेहमीचे प्रश्न अन तक्रारी सुरूच होत्या.

कुणाला कस नि कितपत बोलतं करावं ? ते ही चर्चेची सूत्र पूर्णतः आपल्या हातात ठेवून ते तुला अगदीच जमायच रे ! आताही मला चर्चेत सक्रीय सहभागी करुन घेण्यासाठी तू तुझ्या ठेवणीतले खास विषय हाताळायला सुरवात केलीस, तुला पक्कं माहीती होत की, तू भविष्य विषयक-पत्रिका, ग्रह, त्यांच स्थान, त्यांची परस्परांवर पडणारी वक्र-शुभ दॄष्टी, दशा, महादशा, युती यंव नि त्यंव यावर सविस्तर बोलायला लागलास की माझं पित्त खवळतं नि तुझे मुद्दे खोडून काढण्यासाठी का होईना मी हिरीरीने चर्चेत भाग घेतेच !

पण मिंटू तू फार फार उत्तेजित झाला होतास रे हे सारं काही बोलताना, लहान मुलांनी स्वतःच्या वाढदिवसाची अगदी हरखुन वाट पहावी नं तशी तू तुझ्या या वर्षीच्या वाढदिवसाची पहात होतास बघ, तुझ्यामते ४ मे ला तुला शुक्राची महादशा प्राप्त होणार होती . किती भरभरुन बोलत होतास रे , शुक्र, त्याच पत्रिकेतल स्थान, ती अंशात्मक की काय ती स्थिती, परिणाम- दुषःपरिणाम, बाल्य-युवा-वृध्द-मॄत अवस्था .........! चिडलेच मी शेवटी नि घेतल तुला फैलावर नेहमीप्रमाणे वर्तमानात जगण्याचे सल्ले देत !! लग्गेच विषयांतर केलस ( हे ही तुझ नेहमीचच म्हणा ! )

मग आईच्या जिव्हाळ्याचे विषय काढलेस, तिचं-बाबांचं भरभरुन कौतुक केलस. त्यांच्या यशस्वी सहजिवनाचा आढावा घेताना कबुलीजवाबही दिलास की 'बांबासारखा सरळमार्गी पुरुष नवरा म्हणून मिळाला तुम्हाला हे तुमच भाग्य , नाहीतर बहुतेक सगळे माझ्यासारखेच ! ' काय नि किती बोलू अस झाल होत बघ तुला.

सरतेशेवटी पुन्हा गाडं माझ्यावर घसरलेल तुझं पण यावेळेसचा तू वेगळाच होतास रे, चक्क माझं कौतुक करत होतास तू, 'प्रियामुळे हे झालं तिच्यामुळेच ते झालं, अक्षयबद्दल पूर्ण खात्रीय माझी तो कधीही रस्ता सोडून भरकटणार नाही आयुष्यात, त्याला त्याच्या आईचे संस्कार लाभलेत' वैगरे वैगरे अन मी स्तिमित ! गेल्या वीस वर्षात कधीही सवय नव्हती रे मला तुझ्या तोंडून हे अस सारं काही ऐकण्याची . मी उठले होते तडक नि पानं घेतली होती वाढायला....

जेवणानंतर आईच्या खोलीपर्यंत तिला हाताला धरुन घेवून गेलास, तिचीही झोप कुठे पळाली होती देव जाणे ! माझ मागच आवरुन झाल तरी तुमच्या गप्पा रंगलेल्याच तिच्या बेडरुममधे ! शेवटी मीच हस्तक्षेप केला नि अक्षरशः तुझ्या दंडाला धरून आपल्या बेडपर्यंत नेलं . म्हंटलही 'उद्या उजाडणार नाहीय का ? आजच सगळ बोलून टाकतोयस ते !'

हम्न !!

ती सकाळ उजाडलीच नाही तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी माझ उरलेल संपूर्ण आयुष्य अंधारात लोटून गेली बघ !

मिंटू ,

माझी जिभ काळी नाहीय रे, माहीतेय हे तुलाही .... पण मग हे अस कस झालं ? मी चेष्टेत म्हंटलेल इतकं तंतोतंत खरं कस रे ठरलं ?

फक्त एकदाच येवून सांगून जाशिल ?

प्लिज ???

( फक्त तुझीच),
- प्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रिया,

हे मगाशीच फेसबूकवर वाचले. अर्थातच 'लाईक' करवले नाही. जे तेथे म्हणालो तेच येथे म्हणतो की हृदय गलबलून गेले, शब्द सुचत नाहीत.

आपल्याला कितीही मन गुंतवण्यास सहाय्यकारक ठरणारी कारणे, छंद व निमित्ते असली तरी जोडीदार नसण्याचे दु:ख प्रत्येक क्षणाला एका वेदनेसारखे वर येत राहते. तुम्हाला दैवाने अश्या वळणावर आणले आहे की कोणतेही सांत्वन, धीर किंवा उपाय उपयोगी पडू नये. तरीसुद्धा, कविता, गझल ह्यात अधिकाधिक व्यक्त होत राहा अशी मैत्रीवजा सूचना!

विचार करा, तुम्हाला व्यक्त होण्यासाठी कवितेचा मार्ग आहे, आंतरजालासारखे माध्यम आहे, रसिक वाचकांचा पाठिंबा आहे. कित्येक असे लोक असतात ज्यांना दु:ख सांगताही येत नाही आणि ते कुढत बसतात.

आपल्या पतीच्या द्वितीय स्मरणदिनी आपल्या चिरंजिवांसोबत भरपूर वेळ घालवा. चांगल्या आठवणी काढायचा प्रयत्न करा, ह्यापेक्षा वेगळे काही लिहू शकत नाही.

तुम्हाला काही धीरादाखल बोलावं इतकं दु:ख पाहिलेलं नाही मी. या वेदनेला विसरण्याची नसली तरी सहन करत जपण्याइतके धैर्य कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्याप्रत येवो इतकीच इच्छा व्यक्त करतो.

सुप्रिया ताई,
वाचून एक क्षण काय बोलू तेच कळलं नाही. आपण सहज कधी कधी काहीतरी बोलून जातो आणी ते असं वास्तव होऊन समोर ठाकतं. कल्पना नसताना सुद्धा. तुमच्या मनाला काय वाटत असेल याची फक्त कल्पनाच करू शकते.

तुम्ही काळजी घ्या स्वत:ची.

आयुष्याला आपण पुरेपूर न्याय द्याल, देत असाल, याची खात्री पटते आपल्या लिखाणातून. कोणी तुमचे सांत्वन करावे या फेजला तुम्ही बरेच मागे सोडून आला आहात हे जाणवते, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा मात्र मनापासून देऊ इच्छितो.

सुप्रिया....

"...फक्त एकदाच येवून सांगून जाशिल ?..."

~ या एका वाक्यात तू सिद्ध करतेस की ईश्वराने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे "आशा"....जी कधीही काळवंडून जात नाहीच उलट जे काळाच्या पडद्याआड गेले आहेत त्यांच्या येण्याच्या मार्गावर मेणबत्ती लावून वाट पाहावी अशी उर्मी मनी पैदा करते. नियतीने तुझ्या ललाटी जे लिहिले ते अटळ होते असे मानले गेले तरी आशा ही अमर असते म्हणून स्थिती सत्य असूनही ती जशीच्यातशी स्वीकारणे साहजिकच जड जाते. त्यातून तू शब्दभावनांशी जवळीक असलेली एक अभ्यासू स्त्री, कवयित्री असल्याने त्या कायमपणे हरविलेल्या सहभावनांचे कंगोरे रोखठोकपणे स्वीकारणे तुला निश्चित जड असणार यात दुमत होणार नाही. तरीही ज्या ईश्वराने तुझ्या जीवनात वजा चिन्ह निर्माण केले त्यानेच तुला त्याच्याशिवायही जगायला बळ दिले आहे. त्या शक्तीच्या आधारे येणार्‍या दिवसाला सामोरे जाण्यासाठी पुन्हा तोच सामर्थ्य देईल.

खूप लिहावेसे वाटते पण ते वाचताना तुझ्या डोळ्यात अश्रू येणे चुकीचे ठरेल म्हणून इतकेच लिहून थांबतो की आपले संस्थळ हे असे एक उपयुक्त व्यासपीठ आहे तुझ्यासाठी जिथे तू तुझ्या शब्दसामर्थ्याचा वापर करून आप्तांशी मित्रमैत्रीणीशी संवाद साधून तुझे दु:ख शीतल करू शकशील.

[मी वयाने, अनुभवाने तुझ्यापेक्षा ज्येष्ठ असल्याने एका घरगुती नात्यापोटी मी तुझा एकेरी उल्लेख केला आहे, हे समजून घे.]

आधी वाटले साधी कथा असावी, वाचत गेल्यावर आतुनच दाटुन आले.:अरेरे:

तुम्हाला आणी तुमच्या मुलाला ह्यातुन वर येण्याचे बळ लाभो.

सुप्रिया हे अक्षरश: अनुभवलेलं आहे मीही एका वेगळ्या नात्यात, पक्कं कळलं की नियती अशा वेळी कोणाच्या तरी तोंडून पूर्वसूचना देत असते. आयुष्य गूढ आहे.

सुप्रियाताई,

हे उडतउडत ऐकून होतो. पण इतकं नुकतंच घडलेलं आहे याची कल्पना नव्हती. खूप धीराच्या आहात तुम्ही. तुमचं सांत्वन करायची माझी ऐपत नाही.

माझ्या मित्राच्या बहिणीची कथा आठवली. २५+ वर्षं झाली त्याला. लग्नानंतर दीडेक वर्षांत तिच्यावर तशी परिस्थिती आली. आणि पोटात त्याचं बाळ! तरीपण इतकी धीराची बाई म्हणायची तिला की तिने पोराला वाढवलंच. शिवाय वृद्ध सासूसासऱ्यांची सेवा करत उरलेलं आयुष्य काढलं. सासूसासरे दुसरं लग्न करून द्यायला तयार होते. पण हीच नको म्हणाली. सेवाभाव म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण आहे ते. तिच्याकडे पाहिलं की एकंदरीत आयुष्य नामक प्रकारच मुळातून निरर्थक वाटू लागतो.

मात्र तुमच्या कविता वाचल्या की आयुष्याचाच एक वेगळाच पैलू उलगडतो. या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणाव्यात का? मला उत्तर शोधण्यात रस नाही. स्वत: हलाहल पचवून जगाला अमृत देणारा तो जो होता ना, त्याच्याशी तुमची तुलना करावीशी वाटतेय. तूर्तास एव्हढं पुरे आहे मला.

आ.न.,
-गा.पै.