आमची अष्टविनायक दर्शन सहल (०९ ते १३ डिसेंबर २०१३)

Submitted by प्रमोद् ताम्बे on 1 April, 2014 - 09:16

आमची अष्टविनायक दर्शन सहल (०९ ते १३ डिसेंबर २०१३)
अष्टविनायकाची नांवे व ठिकाणे
१. श्री मयुरेश्वर, मोरगाव
२. श्री बल्लाळेश्वर, पाली
३. श्री वरद विनायक, महड
४. श्री चिंतामणि, थेऊर
५. श्री गिरिजात्मज, लेण्याद्री
६. श्री सिद्धीविनायक, सिद्धटेक
७. श्री विघ्नेश्वर, ओझर
८. श्री महागणपति, रांजणगाव

विदर्भातील अष्टविनायक मंदिरे
१. टेकडीचा गणपती, नागपूर शहर.
२. शमी विघ्नेश, अदासा, जिल्हा नागपूर
३. अष्टदशभुज, रामटेक, जिल्हा. नागपूर
४. भृशुंड, मेंढा, जिल्हा भंडारा
५. सर्वतोभद्र, पवनी, जिल्हा भंडारा
६. सिद्धिविनायक, केळझर, जिल्हा वर्धा
७. चिंतामणी, कळंब, जिल्हा यवतमाळ
८. वरदविनायक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर.

प्रास्ताविक : २०१० साली आम्ही व डोळे पतिपत्नी अतुलकडे दुबईस गेलो होतो त्यावेळी माझा मामेभाऊ श्रीधर नानल केवळ आम्हाला भेटायला म्हणून त्याच्याकडे आला होता व अतुलला वेळ नसल्याचे समजल्यावर त्याने तेथे संपूर्ण एक दिवस आम्हाला त्याच्या गाडीतून दुबई व परिसरातील प्रेक्षणीय स्थळे दाखवायला नेले होते. त्यावेळी गप्पा मारतांना त्याने त्याला अष्टविनायकची सहल करायची फार इच्छा असल्याचे सांगितले व त्यावर मीही अद्याप अष्टविनायक बघितले नाहीत व मलाही त्या सहलीस येणे आवडेल असे म्हटले होते.
त्यांनातर श्रीधर व त्याची पत्नी ह्यांचे आग्रहावरून आम्ही दोघे त्यांच्याकडे १२ ते १६ मार्च २०१३ असे चार ५ दिवस सांगलीस त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो. त्यानंतर पुन्हा त्यांच्या सोबत ऑक्टोबर २०१३ मध्ये आम्ही केरळच्या ट्रीपला जाऊन आलो. त्या दोन्ही वेळी पुन्हा एकदा आमचे अष्टविनाकाच्या दर्शनास जाण्याचे बोलणे झाले. नंतर दिवाळीत फोनवर बोलत असताना आम्ही दोघांनी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात अष्टविनायक सहलीस जाण्याचे नक्की केले.
शास्त्रानुसार सर्वप्रथम तुम्हाला मोरगावच्या मयूरेश्वराचे दर्शन घेऊन यात्रेस सुरुवात करायची असते,व त्यांनंतर सिद्धटेक,पाली,महड,थेऊर,लेण्याद्री,ओझर,रांजणगाव या क्रमाने आठ गणेशांची दर्शने घेऊन झाल्यावर पुन्हा परत मोरगावच्या गणेशाचे दर्शन घेतल्यावरच ही अष्टविनायकाची यात्रा समाप्त झाली असे मानले जाते.
आम्ही मात्र शास्त्र प्रमाण न मानता श्रीधरने आखलेल्या प्रोग्राम नुसारच ही अष्टविनायक यात्रा पूर्ण केली.
सहलीचा तपशीलवार प्रोग्राम नक्की करतेवेळी असे ठरले की कोणत्याही खासगी कंपनीबरोबर सहलीस जायचे नाही. तसेच घाई गडबड न करता व दगदग न घेता आरामात सहल करायची. भले त्यासाठी रोज दोनच गणपती ह्या हिशोबाने आठ दिवस लागले तरी चालेल.तसेच वेळ पडली तर संध्याकाळी जो गणपती बघू त्याच गावात किंवा मंदिराच्या पुजार्याकडे मुक्काम करायचा.
नंतर आमचे असे ठरले की सांगलीहून श्रीधर त्याची स्वत:ची गाडी (ड्रायव्हरसह) घेऊन पुण्यास मुक्कामाला येईल व दुसर्या दिवसापासून आम्ही अष्टविनायक दर्शनास निघायचे.स्वत:ची गाडी असल्याचा फायदा म्हणजे जाताना वाटेत लागणारी जवळपासची इतर काही मंदिरे / प्रेक्षणीय स्थळे सुद्धा पाहता येतील.
त्याप्रमाणे रविवार ८ डिसेंबरला श्रीधर,त्याची पत्नी सौ.रेखा व त्यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन सायंकाळी ७ वाजताच रात्रीच्या जेवणास व मुक्कामास आमच्या घरी आले.
दुसरे दिवशी म्हणजे सोमवार ९ डिसेंबरला सकाळी चहा-नाश्ता व आंघोळी उरकून ठीक ७.३ वाजता आम्ही सहलीसाठी प्रस्थान ठेवले.
पुण्याहून निघाल्यावर भोर फाट्याच्या आगोदर हॉटेल नटराजवर पुन्हा एकदा नाष्टा,चहा उरकून आम्ही सोमवार असल्याने पहिल्यांदा श्री क्षेत्र बनेश्वर येथे गेलो. तेथील पेशवेकालीन बनेश्वर मंदिरातील पाण्यात असलेल्या पांच शिलिंगांचे दर्शन व तेथील नयनरम्य उपवन बघून जांभळे , पेरु, अंजीर अशी फळे घेऊन निघालो. त्यानंतर आम्ही केतकावळे येथील तिरूपती बालाजीचे मंदिर ( ह्याला प्रती तिरुपति बालाजी मानतात) पाहायला गेलो. येथे प्रत्येक प्रतिकृती ही तंतोतंत मूळच्या बालाजी मंदिराप्रमाणे असलेली पाहायला मिळते व त्यामुळेच आपण तिरूपतीच्या बालाजीसच आल्याचा आभास होतो.
बालाजीचे दर्शन व प्रसाद गेऊन पुढे आम्ही सासवड रस्त्यावरील श्री क्षेत्र नारायपूर येथील जागृत दत्तात्रेय व पेशवेकालीन शिवमंदिरातील महादेव ह्यांचे दर्शन घेऊन सासवडमार्गे जेजूरीच्या मल्हारी मार्तंड खंडोबाचे दर्शनास गेलो. गडवार असलेल्या मंदिरास १५० पायर्या चढून जावे लागते.
‘अष्टविनायक यात्रा ’
अष्टविनायक ही श्री गणेशाची जागृत अशी आठ ठिकाणे असून ह्यातील पांच गणेश (मोरगाव,रांजणगाव,ठेऊर,ओझर व लेण्याद्री) हे पुणे जिल्ह्यात , सिद्धटेक गणह हा एकाच अहमदनगर जिल्ह्यात तर उर्वरित दोन गणेश (पाली व महड) रायगड जिल्हयांत आहेत. सर्वच्या सर्व आठही ठिकाणचे गणपती हे ‘स्वयंभू ’ आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार जरी अष्टविनायकांची यात्रा करतेवेळी पहिला मानाचा गणपती म्हणून मोरगावच्या ‘मयूरेशराचे’ दर्शन घेऊन तेथील पुजार्याकडून गणेशाला श्रीफळ म्हणजेच नारळ दाखवून परत घेऊन घेऊन यात्रेस सुरुवात करून त्यानंतर ‘सिद्धटेकचा सिद्धेश्वर ’, ’ पालीचा बल्लाळेश्वर ’ , ’ महडचा वरदविनायक ’ , ’ थेउरचा चिंतामणी ’ , ‘ लेण्याद्रीचा गिरिजात्मक ’ , ‘ ओझरचा विघ्नेश्वर ’ , ‘ रांजणगावचा महागणपती ’ ह्याच क्रमाने दर्शन घेत घेत व प्रत्येक ठिकाणी तेथील गणेशास श्रीफळ (नारळ) दाखवून परत घेत शेवटी पुन्हा परत मोरगावला येऊन ‘मयूरेश्वराचे ‘ दर्शन घेतल्यावरच यात्रा पूर्ण झाली असे मानले जाते.
मोरगावचा “ मयूरेश्वर “

अष्टविनायकातील पहिला मानाचा गणपती म्हणजे मोरगावचा ‘मयूरेश्वर’ हा होय. कऱ्हा नदीच्या किनार्यायवर सासवड बारामती रस्त्यावर जेजूरीपासून १७ किलोमीटरवर मोरगाव आहे.
असे म्हणतात की प्रत्येक घराघरातून कोणत्याही धार्मिक कार्याचेवेळी म्हटली जाणारी श्री गणेशाची ‘ सुखकर्ता दुःखहारता , ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे तर श्री मयूरेश्वराचे डोळ्यात व नाभीमध्ये हिरे बसवलेले आहेत . प्राचीन काळापासून या मंदिराच्या भोवती तट सदृश गाडदी बांधकाम केलेले आहे.
ह्या गणेश क्षेत्रासंबंधी अशी एक आख्याहिका सांगितली जाते की त्याकाळी मोरगाव परिसरात मोरांची संख्या मोठी होती व सिंदूरासूर ह्या दैत्याचा वध करण्यासाठी श्रीगणेशाने मयुराची वाहन म्हणून निवड केली व मोरावर स्वार होऊन दैत्याचा वध केला त्यामुळे ह्या गणेशास ‘मयूरेश्वर’हे नांव पडले व गावाचे नांव मोरगाव असे झाले. गाणपत्य पंथीयांचे आद्यक्षेत्र होय. मंदिरातील मूर्ती बैठ्या स्वरुपात सिंदूरचर्चित आहे.मंदिर देवस्थानचे पुजारी गजानन बाळकृष्ण धारक यांच्याकडे अधिक चौकाशी केल्यावर असे समजले की सध्याच्या मंदिराची उभारणी इसवी सनाच्या सोळाव्या शतकात करण्यात आली. मंदिराच्या चहुबाजूस दगडी तटबंदी असून पूर्वेकडील महाद्वारासमोर एक मोठा दगडी नंदी आहे. गणेशासमोर नंदी फक्त येथेच पाहावयास मिळतो. भाद्रपद व माघ महिन्यात येथे द्वारयात्रा असते,त्यावेळी मोठ्या संख्येने दुरदूरहून भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.चिंचवडच्या मोरया गोसावींनी ह्या गणेशाची आयुष्यभर अखंड निस्स;म भक्ति व सेवाअर्चा केली,म्हणूनच आजही वर्षातून दोनदा द्वारयात्रेच्यावेळी मोरयागोसावींची पालखी चिचवडहून येथे मोरगावला येत असते. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच मोरगावचा संपूर्ण परिसर हा “मयूरेश्वर अभयारण्य” म्हणून घोषित केला असून ह्या मयूरेश्वर अभयारण्यात ‘चिंकारा’ जातीच्या हरणांची तसेच मोरांचीही संख्या मोठी आहे.
मोरगाव येथील मोरेश्वराचे दर्शन घेऊन व पुजार्यााकडून गणेशाला श्रीफळ (नारळ) दाखवून घेऊन आम्ही आमच्या यात्रेतील दुसर्या गणेशाच्या दर्शनासाठी ६० किलोमीटर अंतरावरील सिद्धटेकला निघालो.
सिद्धटेकचा ‘सिद्धेश्वर ‘
शास्त्रानुसार हा दुसरा असलेला हा गणेश म्हणजेच सिद्धटेकचा ‘सिद्धेश्वर‘ होय. सिद्धटेक हे एक बेट असून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या उत्तर किनार्यावर आहे. परंतु भीमा नदी ओलांडल्यावर दुसर्या बाजूस पुणे जिल्हा सुरु होतो. आम्ही मोरगावहून पुणे जिल्ह्यातील दौंड मार्गे ‘सिद्धेश्वर’ला जाण्यास निघालो. तेथे आम्ही ५.३० वाजता पोहोचलो.
ह्या सिद्धेश्वराच्या मंदिरास भीमा नदीच्या दक्षिणेकडून बोटीने अथवा नवीन झालेल्या पुलावरून जाता येते.
भगवान विष्णुंना येथ सिद्धि प्राप्त झाली होती म्हणून ह्या स्थानाला सिद्धटेक असे नांव पडले असे समजले.भगवान विष्णुंना ह्या गजाननाकडून अस्त्र प्राप्त झाले व नंतरच त्यांनी मधु आणि कैतन ह्या दोन राक्षसांचा वध केला अशीही एक आख्यायिका आहे. मोरगावचे श्री मोरया गोसावी व केडगावचे नारायण महाराज ह्यांनासुद्धा येथे सिद्धि प्राप्त झाली होती. मंदिराच्या वाटेवर मंदिराजवळच महर्षि व्यासमुनी ह्यांनी यज्ञ केलेली जागा आहे.हा गणपती नवसाला पावतो व इच्छित मनोकामना व काम पूर्ण होते. असे सांगितले जाते की पेशव्यांचे पदच्युत सरसेनापती हरिपंत फडके ह्यांना ह्या जागृत गणपतीचे २१ दिवस दिवस अनुष्ठान केल्यावर त्याच्याच कृपा प्रसादाने त्यांचे हे सरसेनापतीपद पुन्हा प्राप्त झाले होते.हरिपंत फडके ह्यांनीच ह्या मंदिरास जाण्यासाठी सध्या असलेला रस्ता केला.
सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही शासनाने देवस्थानास बांधून दिलेल्या भक्तनिवासात रात्रीचा मुक्काम केला व भक्तनिवासातच असलेल्या कॅंटिनमध्ये रात्रीचे जेवन्ही गेऊन पुन्हा मंदिरात जाऊन शेजारतीस उपस्थित राहिलो.
दुसरे दिवशी आन्हिके आटोपल्यावर त्याच कॅंटिनमध्ये सकाळचा चहा घेऊन पुन्हा एकवेळ श्री गजाननाचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या म्हणजेच यात्रेतील तिसर्याच रांजणगावच्या महागणपतीकडे कूच केले.
रांजणगावचा “ महागणपती ”
शास्त्रानुसार हा आठवा असलेला रांजणगावचा ‘ महागणपती ‘ पुणे जिल्हयाच्या शिरूर तालुक्यात पुणे-अहमनगर ह्या राज्य महामार्गावर असून,पुण्यापासून ५५ किलोमीटर अंतरावरील “महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ रांजणगाव “ ह्या अत्यंत प्रगत अशा औद्योगिक वसाहतीच्या सुरूवातीस आहे. आम्ही दर्शनास गेलेला हा चवथा गणेश होता.
ह्या गणेशाबद्दल अशी एक आख्याकिका सांगितली जाते की महर्षी गृत्समद ह्यांचा उत्श्वासातून निर्माण झालेल्या ‘ त्रिपुरासुर ‘ नामक राक्षसाने आपल्या वडिलांकडून ‘गणेश मंत्र’ शिकून घेतला व त्याचा जप करून गणेशास प्रसन्न करून घेतले व त्यांचे कडून भगवान शंकराखेरीज कोणाकडूनही तुला मरण येणार नाही असा वर दिला,त्यामुळे अल्पावधीत अतिशय उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने देवाचा छळ करून त्यांना त्राही भगवान करून सोडले,त्यामुळे सर्व देव भगवान शंकरास शरण गेले व त्यांनी भगवान शंकरांची प्रार्थना करून त्यांना ह्या भयंकर उन्मत्त झालेल्या दैत्याचे पारिपत्य करण्याची विनवणी केली.देवांसाठी ह्या उन्मत्त दैत्याचा वध भगवान शंकरांनी केला व त्यासाठी भगवान शंकराच्या मदतीसाथी हाच ‘महागणपती ‘ धाऊन आला होता व श्री गणेशांनी दिलेल्या अस्त्रानेच भगवान शंकरांनी त्या आसुराचा नाश केला. असेही सांगतात की मुळात ह्या गणपतीला दहा शरीरे व वीस हात होते.
इतिहासानुसार इसवी सनाच्या ९ व्या व १० व्या शतकात ह्या मंदिराचे बांधकाम झाले.मंदिर पूर्वाभिमुख असून महाद्वाराचेवर नगारखाना आहे.माधवराव पेशव्यांनी येथे श्री गणेशाची मूर्ती ठेवण्यासाठी मंदिराच्या तळघरात एक खोली तयार केली.नंतर पुढे इंदोरच्या सरदार कीबे ह्यांनी ह्या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
रांजण येथील महागणपतीचे दर्शन व श्रीफळ प्रसाद दाखवून घेऊन आम्ही आमच्या अष्टविनायक यात्रेतील चवथ्या गणपतीस थेउरला निघालो.
“ थेउरचा चिंतामणी “
धर्मशास्त्रानुसार जरी हा पांचवा गणपती असला तरी आमही आमच्या सोयीनुसार ही अष्टविनायकाची यात्रा केल्याने चवथ्या क्रमांकावर येथे आलो.
पुणे- सोलापूर महामार्गावर हवेली तालुक्यात पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर मुळा-मुठा ह्या जोड नद्या व भीमा ह्या तिन्ही नद्या जेथे मिळतात त्या थेउर ह्या ठिकाणी ह्या स्वयंभू ‘चिंतामणी ‘ गणेशाचे मंदिर आहे.
ह्या मंदिराबद्दल मंगला पुराणात अशी कथा आहे की : राका अभिजीत व त्याची पत्नी राणी गुणावती ह्यांना गणा,गुणा किंवा गुणसारा ह्या नांवाचा एक महापराक्रमी पुत्र होता. पण तो अतिशय गर्विष्ठ व तापत डोक्याचा होता.
गणाने कडक तपश्चर्या करून गणेशपिता भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरांनी प्रसन्न होऊन गणाला स्वर्ग,पृथ्वी व पाताळ ह्या तिन्ही लोकांचे राज्य बहाल करून असा वर दिला की ह्या तिन्ही लोकात त्याला कोणीही मारू शकणार नाही.भगवान शंकरांनी दिलेल्या ‘वरा’ने उन्मत्त झालेला गणा एकदा आपल्या सैन्यासह कपिल मुनींच्या आश्रमात आला.कपिल मुनींकडे इच्छा-प्राप्त करून देणारा दैवी शक्ती असलेले ‘चिंतामणी’ नांवाचे अलौकैक व अद्भुत असे रत्न होते,त्याचा वापर करून कपिलमुनींनी राजा व त्याच्या सर्व सैनिकांना अत्यंत सुग्रास असे पंचक्वांनांचे पोटभर जेवण खाऊ घातले. ते पाहून राजाच्या मनांत ते “चिंतामणी ‘रत्न्न आपल्या जवळ असावे असा लोभ उत्पन्न झाला व त्याने कपिल मुनींकडे त्या ‘ चिंतामणी ‘ रत्नाची मागणी केली,पण कपिल मुनींनी राजाची ती मागणी धुडकावून लावली.त्यामुळे चिडून जाऊन बळाचा वापर करून गणा राजाने ते अद्भुत असे ‘ चिंतामणी ‘ रत्न जबरदस्तीने कपिलमुनिंकडून हिसकावून घेतले. त्यामुळे दु:ख्खी झालेल्या कपिलमुनींनी गणेशाची प्रार्थना करून त्यांचे ते रत्न परत मिळवून द्यावे अशी विनवणी केली. भगवान गणेश व त्याचे सैन्य गाणाच्या स्वप्नात आले व एका सैनिकाने गणाचा शिरच्छेद केला.झोपेतून जागा झालेला गणा आपले सैन्य घेऊन कपिलमुनींना धडा शिकवणच्या उद्देशाने त्याच्या आश्रमाकडे निघाला.परंतु त्याचा पिता अभिजीत राजाने गणाला त्यापासून परावृत्त करण्याखा खूप आटोकाट प्रयत्न केला व कपिलमुनींची क्षमा मागून ते ‘ चिंतामणी ‘ रात्न्न त्यांना परत देऊन टाक असा सल्लाही दिला,पण तो निष्फळ झाला व गणाने कपिलमुनींच्या आश्रमाचा मोडतोड करून विध्वांस केला. तेव्हाड्यात तेथे गणेशाची ‘ शक्ती ‘ असे भगवान शंकर तेथे प्रकटले व त्यांनी ‘शक्ती’ चा वापर करून क्षणार्धात तेथे लाख्खो योध्ये निर्माण केले ज्यांनी गणाच्या सर्व सैन्याचा संहार केला,त्याच वेळी भगवान गणेशाने उन्मत्त राजा गणाचा शिरच्छेद करून ‘ चिंतामणी ‘ हस्तगत करून कपिलमुनींना परत केला,परंतु कपिलमुनींनी तो न स्वीकारता त्यांचे आराध्य दैवत असलेल्या गणेशालाच त्यांचेजवळ रहाण्याची प्रार्थना केली,त्यांची विनंती मान्य करून भगवान गणेशांनी तेथेच वास्तव्यास केले,तेच हे थेउर ! त्या रत्नावरून ह्या गणेशाचे नांव ‘ चिंतामणी ‘ असे पडले.
ओझरचा ‘ विघ्नेश्वर ‘ गणेश
आम्ही दर्शन घेतलेला पांचवा गणपती होता ओझरचा ‘ विघ्नेश्वर ‘ मात्र शास्त्रानुसार ह्याचा क्रमांक आहे सातवा गणेश.
ओझरचे ‘ विघ्नेश्वराचे ‘ स्वयंभू व जागृत असे गणेश मंदिर हे पुण्यापासून ८५ किलोमीटरवर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० वर जुन्नर तालुक्यात कुकडी नदीवर बांधण्यात आलेया येडगाव धरणाजवळ आहे. अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
मुद्गल पुराण,स्कंद पुराण व तामीळ विनायक पुराणात असलेल्या पुराव्यानुसार अशी कथा आहे की : अभिनंदन राजाने एकदा यज्ञाचेवेळी प्रत्येक देवतेला भेट म्हणून काही ना काही वस्तु अर्पण केल्या,परंतु त्यावेळी तो इंद्राला दक्षिणा अर्पण करायला विसरला ,त्यामुळे नाराज झालेल्या इंद्राने चार काळांना (काळ व मृत्यु) यज्ञ उधळून द्यायची आज्ञा दिली.काळाने विघ्नासूराचे रूप घेऊन यज्ञात अडथळे आणून तो नष्ट केला.पृथ्वीतलावर धुमाकूळ घालून ऋषि मुनींच्या सत्कृत्यांमध्ये व यागात अडथळे आणून त्यांना त्राही भगवान करून सोडले.त्यमुळे सर्र्व ऋषींनी ब्रह्म व शिव ह्यांना त्यांची मदत करायची याचना केली. ब्रह्म व शिव ह्यांनी ऋषींनागणेशास शरण जाण्याचा सल्ला दिला.ऋषींनी केलेली प्रार्थेना ऐकून गणेशाने त्या दैत्याबरोबर युद्ध सुरू केले व थोड्याच वेळात त्या दैत्याच्या लक्षात आले की हे युद्ध जिंकणे अशक्य आहे,त्यामुळे तो गणेशाला शरण आला व त्याने गणेशाला यापुढे ऋषींच्या यज्ञात विघ्ने व अडथळे न आणण्याचे वचन दिले.त्याने असेही सांगितले की जे भक्त गणेशाची भक्ति करणार नाहीत त्यांनाच विघनाकडून त्रास होईल.ह्या प्रसंगाची आठवण म्हणून विघ्नेश्वराने गणेशाला त्याचे नांव धारण करायची विनंती केली व गणेशाने टी मानी केली व गणेशाला ‘विघ्नेश्वर ‘ असे नांव पडले.दैत्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या ऋषींनी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून त्यास ‘ विघ्नेश्वर’ असे नांव दिले.

लेण्याद्रीचा ‘ गिरिजात्मज ‘ गणेश
शास्त्रानुसार सहावा गणेश म्हणजेच हा लेण्याद्रीचा ‘ गिरिजात्मज ’ गणेश होय. मात्र आम्ही भेट दिलेला हा सहावा गणपती.
कुकडी नदीच्या दक्षिण-पश्चिम तीरावर जुन्नर पासून ४.८ किलोमीटरवर मनुष्य वस्तीपासून दूर व अतिशय निर्जन असे हे ठिकाण आहे. पुण्यापासून ७५ किलोमीटर दूर आहे.
जुन्नरजवळ डोंगरात बौद्धांच्या ध्यानधारणेसाठी विहार म्हणून डोंगरात खोदलेल्या गुहांतील ७ व्या गुहेत सपाट जमिनी पायथ्यापासून १०० फुट उंचीवर एक ५७ फुट लांब x ५१ फुट रुंद व ११.१ फुट उंच अशा बिनखांबांच्या विस्तीर्ण सभागृह आहे. सभागृहात वीस दालने आहेत.दोन्ही बाजूस सात व मागील भिंतीकडे सहा.सभागृहात प्रवेश करण्यासाठी समोरचा बाजूस एक मध्यवर्ती दरवाजा असून त्याच्या दोन्ही बाजूस खिडक्या आहेत.गणेश मंदिराचा सभामंडप म्हणून सध्या ह्या सभागृहाचा वापर केला जातो.मंदिरात येण्यासाठी भक्तांनी डोंगरात २८३ दगडी पायर्याू बांधलेल्या आहेत. त्या चढून आल्यावर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी ८ वेगळ्या पायर्याा आहेत.
पालीचा ‘ बल्लाळेश्वर ‘गणेश
शास्त्रानुसार तिसरा गणेश म्हणजे पालीचा ‘ बल्लाळेश्वर’ होय. ‘बल्लाळेश्वर हे जागृत व स्वयंभू देवस्थान रायगड जिल्ह्यातील कर्जत पासून तीस किलोमीटरवरील पाली ह्या खेड्यात सारसगड किल्ला अंबा नदी ह्याचे मध्ये आहे. पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. बल्लाळेश्वर ‘ ह्याचा अर्थ ‘बल्लाळ ‘ चा ईश्वर अष्टविनायकातील हे एकमेव गणेशाचे वैशिष्ट्य असे आहे की ज्याची ओळख त्याच्या एका भक्ताचे नावावरून होते.

पाली खेड्यात कल्याण नांवाचा एक यशस्वी उद्योगपती आपल्या इंदुमती नामक पत्नीबरोबर रहात होता.त्याचा पुत्र बल्लाळ व खेड्यातील इतर मुले मूर्तीच्या ऐवजी दगड घेऊन पूजेचा खेळ खेळायची. एकदा ही मुले गावाबाहेर गेली असता त्यांना एक मोठ्ठा दगड दिसला. तो पाहून बल्लाळने त्या दगडाचे ‘गणेश ‘ असे नामकरण केले. त्या दिवसापासून बल्लाळ बरोबर इतर मुलेही तहान-भूक विसरून जाऊन रात्रंदिवस त्या “ गणेशाची ‘ (दगडाची) पूजा-अर्चा करू लागली.
दरम्यान एके दिवशी रानात गेलेली मुले वेळेवर न परत आल्याने काळजीत पडलेले त्यांचे पालक बराच वेळ वाट पाहूनही मुले घरी परत न आल्याने सगळेजण कल्याणच्या घरी जाऊन त्याचा पुत्र बल्लाळला दूषणे देऊ लागली,त्यामुळे क्रुद्ध झालेला कल्याण एक छडी घेऊन मुच्या शोधत रानात गेला. इतक्यात त्याचे लक्ष बल्लाळ सांगत असलेल्या गणेश पुराण ऐकण्यात तल्लीन झालेल्या मुलाकडे गेले. रागाच्या भरात कल्याणने मुलांनी बांधलेले ते छोटे मंदिर मोडून नष्ट करून टाकले .ते पाहून भेदरलेली बाकीची मुले बल्लाळला एकट्याला तेथेच रानात सोडून पळून गेली.गणेशाच्या ध्यानात बुडून जाऊन शुद्ध हरपलेल्या बल्लाळचे बखोटे पकडून त्याला बाजूला घेऊन कल्याणने त्याला रक्त येईपर्यन्त मारले व झाडाला बांधले आणि सर्व पूजा साहिती उधळून टाकले. मुलांनी गणेश म्हणून स्थापन केलेला मोठ्ठा दगड उचलून त्याने लांब जमिनीवर भिराकावून दिल्यामुले त्याचे लहान लहान तुकडे झाले.बल्लाळला झाडालाच बांधलेला ठेऊन 'बघू या आता कोणता देव तुला वाचवायला येतोय ते ' 'असे उपरोधाने म्हणत व 'मर आता येथेच ' अशी धमकी देत घरी निघून गेला.
अद्यापही झाडाला बांधून ठेवलेला बल्लाळने, वडिलांनी केलेल्या त्याच्या देवाच्या (गणेशाचा) अपमानाने व्यथित होऊन पित्याची निर्भत्सना करत होता व पार्वती पुत्राचा त्यांनी केलेल्या उपमर्दासाठी त्यांना ‘ते आंधळा,मुक-बधिर व लुळा पांगळा व्हावेत असा शाप देत होता.
जरी तो (बल्लाळ)तहान,भूकेने व्याकुल झाला होता व असह्य वेदनांमुळे क्लांत झाला होता तरीही त्याने मुखाने गणेशाचे नामस्मरण चालूच ठेवले होते.अखेरीस अंगातील त्राण जाऊन त्याची शुद्धच हरपली. थोड्यावेळाने शुद्धीवर आल्यावर त्याने मदतीसाठी आपला देव गणेशाचा धावा सुरू केला. भगवान गणेशही बालकाची आपल्यावरील भक्ती पाहून हेलावले व एका साधूच्या वेषात बल्लाळ समोर प्रकटले आणि त्यांनी बल्लाळची झाडाच्या बंधांनातून मुक्तता केली. गणेशाला समोर पाहून बल्लाळळा तहान-भुकेचा विसर पडला,त्याच्या जखमा भरून आल्या व साधू वेशातील गणेशाला ओळखून भारावलेल्या बल्लाळने गणेशाच्या चरणावर लोटांगण घातले व मुखाने गणेशाची स्तुती करत त्याचाकडून अनुग्रहाची मागणी केली.बल्लाळवर प्रसन्न झालेल्या गणेशाने बल्लाळला हवे ते माग असे म्हटल्यावर बल्लाळ गणेशास म्हणाला “ कायम मी तुझा निस्सीम भक्त राहावा व गणेशाने याच ठिकाणी कायमची वास्तव्य करून राहावे व जे भक्त गणेशास शरण होऊन आश्रयास येतील त्यांची सर्व दु;ख्खे दूर व्हावीत व संकटे निवारण व्हावीत.
तथास्तु म्हणत गणेशाने बल्लाळला असे वचन दिले की आजपासून मी येथे कायमचा वास्तव्य करेन व तुझे नांव मीमाझ्या नांवापुढे धारण करेन.
तेंव्हापासून येथी गणेशाचे नांव : बल्लाळचा ईश्वर म्हणजेच ‘ बल्लाळेश्वर ‘ असे पडले.
महडचा ‘ वरदविनायक ‘
शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेतील हा जरी चवथ्या क्रमांकाचा गणपती असला तरी आम्ही आमच्या सोयीनुसार यात्रा केल्याने आमचा हा शेवटचा म्हणजेच आठवा गणपती होता.
याला वरदाविनायक असेही संबोधले जाते. हा गणपती रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात खोपोली आणि कर्जत ह्याच्या मध्यावर असून पुण्यापासून xxx किलोमीटर दूर आहे.
ह्या गणपतीच्या नांवामागची एक कथा अशी आहे की : कौंन्डिण्यपुर नगरचा भीमा नांवाचा एक निपुत्रिक राजा होता.राज्याला वारस म्हणून पुत्र नसल्याने राजा व राणी दोघेही खूपच दु:ख्खी होते. एकदा राजा व त्याच्या पत्नीची अरण्यांत तपश्चर्येसाठी आलेल्या विश्वामित्र ऋषींची भेट झाली.विश्वामित्र ऋषींनी दिलेल्या ‘गजानन ‘ ह्या एकाक्षरी मंत्राचा जप केल्यामुळे राजाला वारस म्हणून ‘रुखमांगद’ नांवाचा पुत्र प्राप्त होतो. वाढता वाढता रुखमांगद एक तरणाबांड देखणा राजकुमार होतो.
एक दिवस मृगयेसाठी अरण्यांत गेलेला राजकुमार रुखमांगद फिरत फिरत वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात येतो. ऋषींची पत्नी मुक्ता प्रथमदर्शनातच देखण्या रुखमांगद राजकुमाराच्या प्रेमात पडते व त्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्याची गळ घालते.पण राजकुमार त्यास स्पष्टपणे नकार देउन आश्रमातून निघून जातो.मुक्ता प्रेमज्वराने व्याकुळ झालेली असते.तिची ती अवस्था ओळखून इंद्र रूख्मांगदाचे सोंग घेऊन तेथे येतो व मुक्ताची इच्छा पूर्ण करतो व त्यातून मुक्ता गरोदर राहते व गृत्समद नांवाच्या मुलाला जन्म देते.
कालांतराने जेंव्हा गृत्समदला आपल्या जन्माचे रहस्य समजते तेंव्हा तो क्रोधित होऊन आपली आई मुक्ता हिला शाप देतो की तू एक अतिविद्रूप व काटेरी फळे असलेले बोरीचे झाड बनून रहाशील. त्यावर मुकताही गृत्समदला उलट शाप देते की तुझ्यापोटी एक दुष्ट राक्षस जन्माला येईल.इतक्यात अचानकपणे दोघांनाही एक आकाशवाणी ऐकू येते की “ गृत्समद हा इंद्राचा पुत्र “ आहे.हे ऐकून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो पण आता ख्पच उशीर झालेला असतो, शाप परत घेण्याची वेळ निघून गेलेली असते व त्यामुळे मुक्ताचे रूपांतर एका विद्रूप काटेरी बोरीच्या झाडात झालेले असते तर शरमित होऊन पश्चातापाने द:ग्ध झालेला गृत्समद तपश्चर्येने गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी पुष्पक अरण्यात निघून जातो.
गृत्समदाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणेश त्याला असा वर देतो की तुला एक असा पुत्र होईल की ज्याला शकराखेरीज कोणीही पराजित करू शकणार नाही. गृत्समद गणेशाला अशी विनंती-याचना करतो की या पुष्पक वनाला असा वर द्या की जो भक्त या वनात तपश्चर्येला येईल त्याची इच्छा पुन व्हावी व गणेशास अशीही गळ घालतो की त्यांनी येथेच कायमचे वास्तव्य करावे व गृत्समदला ब्रह्मज्ञान द्यावे.
गृत्समदाने येथे देऊळ बांधले व त्यात “ वरदविनायक “ नांवाच्या गणेश मूर्तीची स्थापना केली.तेच हे महडचे ‘वरदविनायक’ मंदिर. हल्ली या मंदिराच्या सभोवतालच्या अरण्याला ‘भद्रक’ असे नांव आहे.
असे म्हटले जाते की जो भक्त माघी चतुर्थीस येथे प्रसाद म्हणून मिळालेला नारळ खाऊन संपवेल त्याला पुत्रप्राप्ती होईल. त्यामुळे नेहमीच माघातील उत्सवाला येथे भक्तांची अलोट गर्दी असते.
श्रीधरच्या कारमधून गेल्याने अष्टविनायकांखेरीज आम्ही वाटेत लागणारी इतरही बरीच देवस्थाने बघितली त्याबद्दल आता थोडीशी माहिती खाली देत आहे.
बनेश्वर मंदिर (नसरापुर)
पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर पुण्याहून जातेवेळी नसरापुर फाटा लागतो तेथून उजव्या बाजूला ५-६ किलोमीटर आत गेल्यावर थोडेसे आतील बाजूस हे प्राचीन (पेशवेकालीन ) श्री-बनेश्वराचे (शंकराचे)अत्यंत देखणे मंदिर आहे. आजूबाजूला गर्द वनराईने वेढलेले असून जवळच एक सरकारी उपवन वाटिकासुद्धा आहे. हे पेशवेकालीन मंदिर ऐतिहासिक तर आहेच पण तेव्हढेच प्रेक्षणीयसुद्धा आहे. येथील शिवलिंग बाजूला केल्यावर आंतिल बाजूस खोलवर हात घातला की झर्याकचे वाहते जिवंत पाणी लागते व त्या पाण्यातच पांच छोटी छोटी स्वतंत्र शिवलिंगे हाताला लागतात. मंदिर व परिसर स्वच्छ व शांत असून वातावरण प्रसन्न व पवित्र वाटे. येथे दर्शन बाजार झाले नसून विनामूल्य व विनात्रास घडते. मंदिराच्या पुढील दर्शनी भागात पाण्याचे एक मोठ्ठे कुंड (हौद)असून त्यात मासे व कासवे सोडलेली आहेत.
हिरवे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी डोंगरकुशीतील एखाद्या शांत परिसराच्या शोधात असाल तर, पुण्याजवळच्या बनेश्वरला जा. डोंगरटेकड्यांनी वेढलेल्या गर्द वृक्षराजीत, पुण्याजवळील नसरापूर गावाजवळ हे शिवालय वसले आहे. एक दिवसाच्या सहकुटुंब सहलीसोबतच टेकर्ससाठीही हे ठिकाण खूपच सोयीचे आहे. मंदिराभोवती दाट बन, म्हणजेच जंगल-झाडी आहे. त्यामुळेच या शिवालयाला 'बनेश्वर' नाव मिळाले आहे. १७व्या शतकात पहिल्या बाजीरावाने हे दगडी शिवमंदिर उभारले. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभल्यामुळे, शिवभक्तांसोबतच पर्यटकही बनेश्वरकडे आकर्षित होऊ लागले आहेत. .
प्रती बालाजी मंदिर – केतकावळे (पुणे)
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून ३५ किलोमिटर अंतरावर खेड शिवापूर नंतरचा पहिला टोल नाका ओलांडल्यानंतर कापुरहोळ येथे डावीकडे वळून सासवडकडे जाऊ लागल्यावर सुमारे ४ किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र नारायणपूरच्या आगोदर ८ किलोमीटर हे प्रती-बालाजीचे मंदिर आहे.मंदिर हुबेहूब आंध्र प्रदेशातील तिरुमाला येथील मूळच्या वेंकटेश्वराची (बालाजीची) तंतोतंत प्रतिकृती असून आपल्याला मूळ बालाजीचेच दर्शन घेत असल्यासारखे वाटते.
हे मंदिर आंध्र प्रदेशचे थोर सुपुत्र ,वेंकटेश्वरा हॅचरीज् व उत्तरा फूडस् चे निर्माते सुप्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री कै. बी.व्ही. राव ह्यांनी स्वत:च्या मालकीच्या जागेत स्वखर्चाने बांधून भक्तासाठी दर्शनास खुले करून मंदिर त्याच्या संपूर्ण परिसराची सर्व देखभाल व व्यवस्थापनही आज त्यांच्या पाशच्यातही त्यांच्या कन्या अनुराधा देसाई ह्या त्यांच्याच उद्योगांमार्फत पहात असतात हे विशेष ! आणि माझ्यामते हे नक्कीच अतिशय कौतुकास्पद आहे यात काही शंका नाही.
मंदिर व मंदिराचा संपूर्ण परिसर हा अतिशय शांत,स्वच्छ व पवित्र ठेवण्यात आला आहे,त्यामुळेच भक्ताचे मन एव्हढे प्रसन्न होते की मला स्वत:ला तरी मूळच्या वेंकटेश्वर मंदिरा(जे अति श्रीमंत झाल्याने पैशाची सूज आल्याने व जेथे दर्शनाचा एव्हढा किळसवाणा बाजार झाला आहे) पेक्षा या मंदिरातच जास्त प्रसन्न व पवित्र वाटले व मनाला शांती मिळाली.
येथे आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली व भावलीसुद्धा व ती ही की येथे येणार्याि व दर्शन घेऊन बाहेर जाण्यापूर्वी प्रत्येक भक्ताला देवाचा प्रसाद म्हणून एकेक मोठा लाडू मोफत दिला जातो,तसेच येथील अन्नछत्रात जेवणाही मोफत दिले जाते.आजकाल ही गोष्ट अत्यंत दुर्मिळच झाली आहे.कारण आजकाल कुठल्याही मंदिरात गेल्यावर सर्वत्र फक्त दर्शनाचा ‘बाजार’च पाहायला मिळतो.भक्त जसा खिसा सैल सोडेल तसे त्याला दर्शन घडते व पैसे मोजून त्यानुसार प्रसाद मिळतो.सर्वत्र बोकाळलेला हा ओंगळ दरशा-प्रसादाचा बाजार थाटलेला पाहून व देवाचे सेवक असलेल्या बडवे-पुजार्यां ची मग्रुरी,मुजोरी व उन्मत्तपणा पाहून मन उद्विग्न होऊन उबगले जाऊन देवावरचा विश्वास व श्रद्धा यांना तडा जाऊ लागतो.त्यामुळेच असे मंदिर पाहिल्यावर खरोखरच मनाला शांती लाभते,मनाला उभारी येते प्रसन्नता वाटते व उर भक्तीभावाने भरून येतो.

शिव मंदिर नारायणपूर – पुणे
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून ३५ किलोमिटर अंतरावर खेड शिवापूर नंतरचा पहिला टोल नाका ओलांडल्यानंतर कापुरहोळ येथे डावीकडे वळून सासवडकडे जाऊ लागल्यावर सुमारे १०किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र नारायणपूर आहे.हे संत चाङ्ग्देव्महाराजांचे मूळ गांव असून येथे सुप्रसिद्ध एकमुखी दत्त मंदीरा शेजारीच हे अत्यंत सुंदर असे ऐतिहासिक व प्राचीन यादवकालीन असे शिव मंदिर आहे. यालाच ‘नारायणेश्वर’ या नांवानेही ओळखतात. याच्या गाभार्याशत गुप्त शिवलिंग असून ते शिवाजीमहाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी या शिव मंदिराला भेट म्हणून दिलेल्या सोन्याच्या शिवलिंगाने ते आच्छादले (झाकले)आहे. या मंदिराचे कोरीवकाम यादव युगाची साक्ष देते.
एकमुखी दत्त श्रीक्षेत्र नारायणपूर – पुणे
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून ३५ किलोमिटर अंतरावर खेड शिवापूर नंतरचा पहिला टोल नाका ओलांडल्यानंतर कापुरहोळ येथे डावीकडे वळून सासवडकडे जाऊ लागल्यावर सुमारे १०किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र नारायणपूर आहे. येथे सुप्रसिद्ध असे श्रीदत्तात्रेयाचे जागृत मंदिर आहे. सर्वसाधारणपणे दत्तात्रेयास ब्रह्मा,विष्णु व महेश(शिव) अशी तीन मुखे (तोंडे) असतात. पण येथे उभ्या स्थितीत असलेल्या पांढर्याे शुभ्र संगमरवरातील सुबक अशा दत्ताच्या मूर्तीस फक्त एकाच मुख (वादन,तोंड) असल्याने हा ‘एकमुखी दत्त’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याखेरीज भक्तांना येथे भगवान दत्तात्रेयाच्या पादुकांचेही दर्शन घेता येते.
येथील मंदिराशेजारी दत्तात्रेयांना अतिशय प्रिय असा पवित्र औदुंबर वृक्ष असून असे म्हणतात की जो कोणी भक्त या पवित्र औदुंबर वृक्षाचे दर्शन घेईल,त्याला स्पर्श करेल, त्याचे भोवती प्रदक्षिणा घालेल,त्याचे पूजन करेल अथवा त्याच्या खाली / सान्निध्यात बसून ध्यान-धारणा करेल त्याच्या सर्व समस्यांचे निराकरण होऊन त्याच्या मनोकामना पूर्ण होतात.
टेकडीवरील भव्य गणेश थेरगांव – पुणे
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहुरोडजवळच्या थेरगांव हद्दीतील एका छोट्याश टेकडीच्या माथ्यावरील सपाट जागेवर पुण्यातील सर्वात जास्त ५४ फुट उंचीची भव्य गणेशाची मूर्ती रिंफोर्सड कॉंक्रिट मध्ये बनवली असून त्यावर तांब्याचा मुलामा दिलेला आहे. ही गणेशाची मूर्ती १८ फुट उंचीच्या चौथार्यायवर बसवली आहे. एकूण ७४ फुट उंचीचे हे देखणे अ अतिभव्य शिल्प मुंबईहून पुण्यास भेटीसाठी येणार्याी परदेशी पर्यटकांना तीन किलोमीटर दुरवरूनच जणू काही पुण्याचे प्रवेशद्वार बनून स्वागत करते.
वसंतकुमार बिर्ला व सरला बिर्ला ह्यांचे स्वप्न असलेला हा भावी प्रकल्प पूर्ण होऊन १७ जानेवारी २००९ रोजी त्याचे दिमाखदार उद्घाटन झाले.
प्रती शिर्डी साई मंदिर शिरगांव – पुणे
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय हमरस्त्यावर पुण्यापासून ३२ किलोमीटर अंतरावर थोड्याशा आतल्या बाजूला असलेल्या शिरगांव येथे हे मंदिर असून साई भक्त याला शिरगांवची प्रती शिर्डी म्हणूनच ओळखतात. श्री.प्रकाश केशवराव देवळे ह्यांनी त्यांचे स्प्वप्न म्हणून व साईंच्या आशीर्वादाने केवळ ९ महिन्यात हे साई मंदिर बांधून पूर्ण केले हा एक चमत्कारच मानला जातो. मंदिराचे बांधकाम करणार्या् बर्याशच कामगारांनासुद्धा ह्या ९ महिन्यात चमत्कारांचा अनुभव आला होता.
हे साई मंदिर ११ जून २००३ रोजी विधिवत व समारंभपुर्वक भाविक साई भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
या मंदिरात व शिर्डीच्या मंदिरात बर्या च प्रमाणात साधर्म्य दिसून येते. मंदिराच्या प्रवेश्द्वाराजवळच मंदिराचे गुरुस्थान असून त्याच्या मध्यभागी कडूलिंबाचे झाड असणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. येथील मंदिराची रचना, गाभारा,समाधि,साईंची मूर्ती ह्यामध्ये व शिर्डी येतथी रचनेण कमालीचे साधर्म्य असल्याचे साई भक्तांना जाणवते व त्यामुळे आपण शिर्डीतच असल्याचा भास होतो. हीच गोष्ट द्वारकामाईमधील साई धुनीची. ही साई धुनी बारा महीने अहोरात्र सतत अखंड तेवत असते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्यांदा श्री क्षेत्र बनेश्वर येथे गेलो. तेथील पेशवेकालीन बनेश्वर मंदिरातील पाण्यात असलेल्या पांच शिलिंगांचे दर्शन व तेथील नयनरम्य उपवन बघून जांभळे , पेरु, अंजीर अशी फळे घेऊन >>>>

शिलिंग का ठेवलेत त्या तळ्यात?
कुठल्यातरी देशाचे चलन आहे ना ते?

विदर्भातील
भृशुंड, मेंढा, जिल्हा भंडारा(माझं गाव)
भृशुंड ऋषींनी हजार वर्ष तप केल्यावर गणपती प्रसन्न झाले आणि भृशुंड ऋषींना सोंड फुटून गणपती चं रूप प्राप्त झालं. सहा फूट उंच मिशा असलेली एकमेव मुर्ती आहे.