लेकीच्या पायदुखीची समस्या. उपाय व कारणे?

Submitted by निल्सन on 27 March, 2014 - 08:20

माझी लेक वय वर्षे ३.५, ती २ वर्षाची होती तेव्हापासुन तिचे तळपाय दुखण्याचे सुरु झाले तिचे तळपाय रोज दुखतात दिवसा / रात्री तिचे पाय दाबल्याशिवाय ती झोपतच नाही. सुरवातीला आम्ही लगेचच तिच्या डॉक्टरांना भेटलो त्यांनी कॅल्शियम कमी आहे असे सांगुन कॅल्शियमचे औषध सुरु केले. तरीही तिचे दुखणे सुरुच होते म्हणुन आम्ही त्यांना परत भेटलो पण सहा महीने तरी औषध द्या असे त्यांनी सांगितले. औषध देउन काहीच फायदा होत नव्हता म्हणुन आम्ही तिला एका हाडांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो त्यांनीही सेम कारण सांगितले आणि दुसरे कॅल्शियमचे औषध सुरु केले आणि जास्त दुखल तर पेनकिलर दिलं. तरीही रात्री तिचे पाय दाबणे सुरुच होते.

त्यानंतर एका रात्री लेक पाय दुखतात म्हणुन झोपेतुन रडत उठली. कसतरी तिला शांत करुन पेनकिलर दिलं आणि सकाळी पुन्हा डॉ.कडे गेलो. सकाळी आमच्या मॅडम मस्त मजेत दवाखान्याच्या पायरया चढुन धावत डॉ.समोर हजर :हास्यः डॉ.समोर तिने धावुन दाखवले, नाचुन दाखविले तर डॉ. म्हणतात काही त्रास नाही दुर्लक्ष करा Sad तसेही आमचे कन्यारत्न जरा नाटकीच आहे त्यामुळे नवर्याने डॉ.चे बोलणे मनावर घेऊन दुर्लक्ष करायला सुरवात केली. ती जर पाय दुखतय म्हणुन रडत असेल तर तिला फसवुन धावायला लावणे आणि बघ कशी नाटक करतेय म्हणुन सांगणे.

या सगळ्यामुळे मलाही कळत नव्हते की तिला खरच त्रास होतोय की ती ओवरअ‍ॅ़टींग करतेय. तरीही आम्ही नेहमी डॉ.ला तिच्या दुखण्याबद्दल सांगत होतो. तिला अजुन दोन डॉ.ला दाखविले तरी काही ठाम असं कोणी सांगतच नाही. काल रात्री ती पुन्हा झोपेतुन रडत उठली' मम्मा किती दुखतय बघ ना'. तिला होणारा त्रास मी फक्त बघु शकत होती याचा खुप त्रास होतोय मला. पाय चेपुन, पेनकिलर देऊन तिला कसेबसे झोपवले. आज ती एकदम ठिक आहे पण तरीही त्या हाडाच्या डॉक्टरला सकाळी फोन केला तर आज अपॉइंट्मेंट फुल्ल आहेत उद्या या असे उत्तर मिळाले.:अरेरे:

मी सगळ्या डॉक्टर जमातीला दोष लावत नाही पण का नाही डॉक्टर पेशंटला नीट समजावुन घेत? माझ्या पिल्लासोबत काही वाईट घडु नये एव्हढीच माझी इच्छा आहे म्हणुन मी त्यांच्याकडे जाते. एक्सरे काढण्यासाठी मी सांगितले तरी ते मनावर घेत नाहीत. जर तिचे दुखणे काळजी करण्यासारखे नसेल तर आज १.५ वर्षे झाली तरी तिला हा त्रास का आहे? मला खुप भिती वाटते कधी कधी.

इथे कुणाला असा त्रास झाला आहे का? असल्यास काय केले? यात माझ्याकडुनही काही चुकी होत असेल तर प्लीज मला सांगा. तसेच कुणी माहीतीतील चांगले डॉक्टर असतील तरी मला सांगा. मी ठाण्यात राहते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाढीच्या वयात हाडे वाढत असताना मसल्स त्यावेगाने किंवा त्याप्रमाणात वाढत नाहीत म्हणून असा त्रास होऊ शकतो (मला वैद्यकिय भाषेत सांगता येत नाही.पण तुम्हाला कळाले असेल बहुतेक)असे एका पेडिट्रीशनने सांगितले होते. असं काही आहे का विचारुन बघा.

माझा मुलगा १७ वर्षाचा आहे त्याचे लहानपणी गुडग्यापासून तळपायापर्यंत पाय कायम दुखायचे...
डॉक्टर म्हणाले वाढीच्या वयात दुखतात, नंतर कमी होत जाईल, तसे होत गेले.
पण आपण अॅलर्ट असणे चांगले.
सर्व तपासणीनंतर ठीक असेल पण पाय दुखत असतील तर तात्पुरते उपाय करून दुर्लक्ष केलेले चालेल

पेनकिलर घेतल्यानंतर तिला बरे वाटत असेल आणि त्याच वेळी तुम्ही तिला डॉक्टर कड़े नेत असाल. बाकी तज्ञ मंडली सांगतीलच.

मी अजिबात तज्ञ नाही. पण हो, अशी एक केस माहिती आहे. खूप जवळची. चांगल्या डॉक्टरला दाखवा. लवकरात लवकर प्लीज. किंवा माय्बोलीवर वर तज्ञ आहेत डॉ.ईब्लिस आणि डॉ. साती. त्यांची मदत घ्या.

वाढीच्या वयात हाडे वाढत असताना मसल्स त्यावेगाने किंवा त्याप्रमाणात वाढत नाहीत म्हणून असा त्रास होऊ शकतो (मला वैद्यकिय भाषेत सांगता येत नाही.पण तुम्हाला कळाले असेल बहुतेक)असे एका पेडिट्रीशनने सांगितले होते >>> +१

काही लोकांची तशी प्रकृती पण असते. आता वय सोडल्यास इतर काही वाढ होत नसतानाही (;)) बरेचदा माझे तळपाय प्रचंड दुखतात. माझ्या लेकाची पण तशीच प्रकृती असावी असं वाटतंय कारण त्याची पण बरेचदा तक्रार असते पायदुखीची.

नुसते पाय चेपून देण्यापेक्षा मॉइश्चरायझर अथवा तेलाने मसाज करून देत जा. त्याने जास्त आराम पडतो. तिला दिवसभरातून खाली बसलेली असेल तेव्हा मांडी घालून बसायची सवय लावा.

मृण्मयी, खुप खुप धन्यवाद लिंकसाठी. किती मणाचं ओझं उतरलं असेल मनावरुन मी सांगु नाही शकत. आय होप, तिच दुखणं वाढीच असु दे. बाकी जे वाईट विचार मनात येतात तस काही नसावे. तरीही मी योग्य डॉ. ला दाखवेनच कारण जेव्हा डॉक्टर व्यवस्थित सांगतील तेव्हाच टेन्शन जाईल.

सिंडरेला, हो माझेही तळपाय नेहमी दुखतात त्यामुळे मीही आधी जेनरेटिक प्रॉब्लेम आहे म्हणुन गंमत करायचे.
मी तिचे पाय तेलानेच मालिश करते.

माझ्या थोरलीला ग्रोइंग पेन्स नाही झाल्या विषेश पण धाकटीला मात्र दीड-दोन वर्षाची असल्यापासून पाय दुखण्याचा त्रास आहे. रोज दुखत नाही पण पाय दुखीची तक्रार वरचेवर असतेच. तिचे तळपाय नाही दुखत पण कधी शिन्स, कधी गुडघ्याजवळ तर कधी मांडी दुखते. ती पण झोपेतून जागी होउन कळवळून रडते कधीकधी. तुमची काळजी मला समजते. मी पण पेडीकडे गेले होते. तिला डी व्हायटॅमिन ची डेफिशियन्सी होती असं ब्लड टेस्ट मधून कळलं तेव्हा कोवळ्या किंवा सरत्या उन्हात खेळायला आवर्जून न्यायला लागले आणी सप्लिमेंट्स पण सुरू केलेच डॉ. च्या सल्ल्याने. खूप जस्ती दुखत असेल तर पेन किलर पण देतो तिला.
अजून एक उपाय ज्याने तात्पुरता आराम पडतो(मालिश सोडून) तो म्हणजे शेक. फार्मसी मध्ये एक हॉट पॅड मिळतं ते माय्क्रोवेव्ह मध्ये गरम करता येतं ते ती पायावर घेउन बसते त्याने तिला बरं वाटतं. ते पण तुम्ही ट्राय करू शकता.
तुम्ही डॉ. कडे जातच आहत हे उत्तम आहे तेव्हा ते जर सांगत असतील की काळजी करू नका तर खरच काळजी करू नका.

सर्वांनी चांगले सांगितले आहे. मला हे काही माहीत नव्हते.
शेकण्यासाठी इकडे मी एक उपाय वाचला होता. एका मोज्यामध्ये तांदूळ भरून , मोज्याला गाठ मारून मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचा एखद मिनिट. आणि मग त्याने शेकायचे. बराच काळ गरम राहतो मोजा.
तसेच मिठाच्या पाण्यात सिट्झ बाथ वगैरे पण उपयोगी पडेल.

निल्सन,
माझ्या मुलाचे पायही असेच दुखतात- तळ्पाय नाही, पण गुडघ्याजवळ, खाली खोबणीत दुखते, तोही झोपेतून उठतो कधी कधी. आमच्या पेडि. ने पण वाढीचेच कारण सांगितले आहे. रोज एक केळं आणि लिंबू सरबत द्या असे म्हणाले आहेत ते.

सर्वांचे खुप आभार.

अश्विनी, माझ्या लेकीला केळं खुप आवडते पण तिला नेहमी सर्दी खोकला असतो म्हणन मी तिला केळं देण
टाळते. लहान मुलांना रोज केळं दिलेले चांगले का?

निल्सन, तुम्ही ठाण्याला राहता असे तुमच्या प्रोफाईलवरून समजले. ठाण्याला गोखले रोडवर स्टेट बॅंकेच्या मागच्या बाजूला नेस्ट हॉस्पिटल आहे तिथे डॉ. वाकडे म्हणून एक उत्तम पेडी आहेत. तुमच्या मुलीच्या बाबतीत त्यांचा सल्ला जरूर घ्या.

तिला नेहमी सर्दी खोकला असतो म्हणन मी तिला केळं देण
टाळते. लहान मुलांना रोज केळं दिलेले चांगले का?>> रोज एक वेलची केळं द्यायला काहीच हरकत नाही. तसाही लहान मुलांना सर्दी खोकला इतर अनेक कारणांनी होतच असतो.

लहान मुलांना रोज केळं दिलेले चांगले का?>> रोज एक वेलची केळं द्यायला काहीच हरकत नाही. + १
कफ होत असेल तर रात्रीच्या जेवणात केळं देऊ नका आणि भरपेट जेवणावरही देऊ नका. भुकेच्या वेळी सकाळच्या किंवा दुपारी चार-पाचच्या नाश्त्यात द्या.

केळ्याबद्दल अनुमोदन..माझ्या मुलाला पण रोज एक केळं खायला सांगितले आहे.तसेच भरपूर पाणी पिणे आणि पाय दुखायला लागला तर स्ट्रेचिंग करणे हे उपाय सांगितले आहेत.

स्टेट बॅंकेच्या मागच्या बाजूला नेस्ट हॉस्पिटल आहे तिथे डॉ. वाकडे म्हणून एक उत्तम पेडी आहेत. >> डॉ. वाकडे नेस्ट हॉस्पीटल मधे नसतात आता. त्यांनी त्यांचे नविन हॉस्पिटल / क्लिनिक सुरु केले आहे. मल्हार टॉकिजच्या पुढच्या सिग्नलला टायटन शोरुम्स आहेत दोन. त्यातल्या टॉकिजकडुन येतानाच्या रस्त्यावर उजव्याबाजुच्या शोरुमच्या वर पहिल्या मजल्यावर. साईगणेश हॉस्पिटल म्हणुन आहे.
रोज एक केळे ब्रेकफास्टला किंवा ९/१० च्या भुकेच्या वेळेस देता येईल.

बरेचदा पायाचे क्षेत्रफळ वा सरफेस एरीया नॉर्मल पेक्षा कमी असतो ,थोडक्यात तळपाय बारीक असतात .अशा वेळी कमी क्षेत्रफळावर शरीराचा जास्त भार पडतो(per unit area) व त्यामुळे तळपाय दूखतात.डॉक्टरांना हे विचारुन बघा ,कॅल्शियमची कमतरता अजिबात पडू देऊ नका .त्याच बरोबर सॉफ्ट सोलचे फुटवेअर मिळते, त्या स्लिपर बाहेर आणि घरात दोन्ही ठिकाणी वापरावयास द्या. बघा फरक पडतो का .अपडेट्स देत रहा, तुमच्या कन्येला या आजोबाकडून शुभेच्छा आणि आशिर्वाद.

मला हा त्रास होता लहानपणी पाच वर्षे पर्यंत. आता हि कधी कधी होतो.
कारणे हि होती मला कॅल्शियम व डी ची कमतरता होती कारण दाताचा पण प्रॉबलेम होता. बरेच डॉक केल्यानंतर एका वैद्य आजोबांनी सुचवले की रक्तात कमी असेल. व तेच कारण निघाले.
माझ्या आईने केलेला हा उपाय - मला सोसेल इतके गरम पाणी घेवून त्यात जाडं मीठ(पुर्वी गाडीवर विकत ते) टाकून मी पाय बुडवून रहायचे. मग तीळाचे तेलाने रगडून पाय गरम टॉवेलने बांधून ठेवायचे.
रोज नाचणीची खीर. इतकी खीर रोज खावून मला उलटी सारखं व्हायच बघून सुद्धा. तुमच्या मुलीला सहन होत असेल तर करा, मला तरी अपाय झाला नाही.

एक जेल मिळतो. तो गरम पाण्यात विरगळून त्यात पाय सोडून ठेवायचे. मग बाहेर काढून तो जेल सुकला की काढून फेकायचा. बराच आराम मिळतो. मी अजूनही करते हा उपाय. मुलीला फ्लॅट पायाचा त्रास नाही ना हे हि चेक करून घ्या.
आता तुम्ही डॉक कडे जाताच आहात तर समजलेच कारण.

एव्हढ्या कळकळीने प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार.--^--

काल लेकीला ऑर्थो. कडे नेले होते त्यांनीही ग्रोईंग पेन हेच कारण सांगितले. कॅल्शियमचे औषध लिहुन दिले आणि काळजी न करण्यास सांगितले. मी एक्सरे साठी त्यांना विचारले असता त्यांनी मनाई केली. व ती व्यवस्थित असल्याचे सांगितले.

काल डॉक्टरकडे जाताना मला तेव्हढे टेन्शन नव्हते जेव्हढे माबोवर ही समस्या लिहण्याआधी होते. तुम्हा सर्वांनी माझ्या समस्येच कारणच नाही तर त्यावर उपायही सुचवलेत. माझ्या लेकीबद्दलची काळजी मला तुमच्या शब्दांतुन जाणवली. डॉक्टरांनी जे उपाय नाही सांगितले ते तुम्ही काहीच हातच न राखता सांगितले त्यामुळे मला एक मानसिक आधार मिळाला. कसे ना इथले लोक एका अनोळखी व्यक्तीला जिला कधी पाहीले / ऐकले नाही अशा व्यक्तीला मनापासुन योग्य सल्ला देतात. खुप अप्रुप वाटत मला या सा-याचं.

पुन्हा एकदा सर्व प्रतिसाददात्यांचे व्यक्तिशः खुप खुप आभार.

<<मी एक्सरे साठी त्यांना विचारले असता त्यांनी मनाई केली. व ती व्यवस्थित असल्याचे सांगितले.>> खूप छान Happy

माझी मुलगी देखिल अशी कळवळून रडते रात्री. पण तीची ताई पण यातून गेलिये आणि growing pains नंतर
गायब झाल्याचे पहिलेत त्यामुळे अम्हि शांत पणे पाय दाबुन देतो.पण दाबल्या नंतर पायाखाली २ उशा देते मी.
एलेव्हेटेड ठेवले की तिला बरं वाटत (placibo effect) असेल कदचित पण फरक पडतो खरा.