युद्धस्य कथा : १. एक काडी जी कधी पेटलीच नाही!

Submitted by ललिता-प्रीति on 25 June, 2009 - 05:47

(माझे सासरे श्री. सदाशिव छत्रे हे भारतीय वायूसेनेत होते. १९६२ सालचं चीन युद्ध आणि १९७१ सालचं बांग्लादेश युद्ध या दोन्हींत त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यावेळचे अनेक प्रसंग, थरारक आठवणी आम्ही त्यांच्याकडून ऐकत आलेलो आहोत. त्यांपैकी काही आठवणी त्यांनी लिहून काढल्या आहेत. त्यांनी केलेल्या लेखनात किरकोळ बदल करून त्या मी इथे देत आहे. या प्रसंगांना कुठलाही विशिष्ट कालानुक्रम नाही. त्यांना जेव्हा, जसं आठवेल तसतसे ते लिहीत गेले. त्यातला हा पहिला किस्सा.)

एक काडी जी कधी पेटलीच नाही!

"छत्रे, तुमच्याकडे माचिस आहे का हो? "
आमचे ऍडज्युटंट फ्लाईट लेफ्टनंट भाकेलाल यांच्या या प्रश्नाने मी चकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. वास्तविक ते स्वतः सिगारेट न ओढणारे; मी ओढत नाही हे ही त्यांना ठाऊक होतं. तरीही त्यांनी माझ्याकडे काडेपेटीची मागणी का केली?
"... मला ती लागेल... वेळप्रसंगी विमानाला आग लावून द्यायला... पेट्रोल टाकीचे ड्रेन कॉक्स उघडून पेटती काडी आत टाकली तर विमान लगेच पेट घेईल ना? "
... काडेपेटीची मागणी, ती ही कसल्या भलत्याच कारणासाठी!!
कुठल्याही पायलटचं आपल्या विमानावर किती जिवापाड प्रेम असतं!... त्यालाच आग लावून देण्याचा विचार यांच्या मनात का यावा??
पण माझ्या चेहेर्‍यावरची प्रश्नचिन्हं वाचायला त्यांना सवडच नव्हती. नजर विमानाकडे पण मनात मात्र वेगळेच विचार चालू असणार त्यांच्या... मी अंदाज बांधला. त्यांना काय उत्तर द्यावं ते मला कळेना. पण त्यांचा चिंताग्रस्त चेहेरा पाहून मी गप्पच बसलो. त्यांनाही माझ्याकडून त्वरित उत्तराची अपेक्षा नसावी बहुतेक.

हा प्रसंग होता १९६२ सालच्या चिनी आक्रमणाच्या वेळचा. माझी नेमणूक त्यावेळी आसाममध्ये जोहराटला झालेली होती. आमच्या ५९-एल. ए. एस. (लॉजिस्टिक एअर सपोर्ट) स्क्वॉड्रनकडे ‘ऑटर’ जातीची विमानं होती. वजनाला हलकी, अगदी फुटबॉलच्या मैदानावरही उतरू शकतील अशी, पायलटसकट दहा जवान घेऊन जाण्याची क्षमता, वेळप्रसंगी आतल्या खुर्च्या दुमडून १ टनापर्यंत सामान नेण्याची किंवा जवानांना पॅराशूटच्या साहाय्यानं खाली उतरवण्याची सोय, गरज पडल्यास आमोरासमोर ‘३ टियर’ पद्धतीनं ६ स्ट्रेचर्स लावून अँब्युलन्ससारखाही उपयोग होणारी अशी ही बहुउद्देशीय विमानं! ‘एअर टॅक्सी’ हे त्या विमानांचं आम्ही ठेवलेलं टोपणनाव सार्थ ठरवणारी.

otter1956-1991.jpg

आमचा बेस-कँप जरी जोहराटला असला तरी एकूण १६ पैकी २-३ विमानंच तिथे असत. बाकीची सगळी २-२ किंवा ३-३ च्या गटांत पुढच्या सेकंड लेव्हल हवाई तळांवर कार्यरत असायची. डाकोटा, पॅकेट, ए एन-१२ सारख्या मोठ्या विमानांतून जोहराटला आलेले जवान आणि त्यांचं सामान त्या पुढच्या हवाई तळांवर नेऊन ठेवणे हे आमचं काम आम्ही त्या ऑटर विमानांच्या मदतीनं पार पाडायचो. तेवढंच नाही तर अगदी पुढे सीमारेषेजवळ फर्स्ट लेव्हल कँपवरही जवान आणि सामान पोहोचवायचं काम असायचं. सेकंड लेव्हल कँपला रस्त्यांमार्गे किंवा विमानांमार्गे जाण्याचा पर्याय उपलब्ध असतो. पण फर्स्ट लेव्हल कँपला मात्र फक्त विमानांनीच जावं लागतं. हे काम जास्त अवघड होतं. कारण हा सर्व मार्ग हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यांतून जाणारा आहे. ऑटर विमानं बहुउद्देशीय असली तरी त्यांच्या काही मर्यादाही होत्या. त्यामुळे एखाद्या अगदी अरुंद गल्लीतून मोठी कार चालवणं जितकं कठीण तितकंच हिमालयाच्या शिखरांवरून या विमानांमधून प्रवास अवघड होता. पहाटे अगदी सूर्योदयाबरोबरच उड्डाणांना सुरूवात करावी लागे. कारण नंतर हवा जसजशी तापायला लागायची तसे दर्‍यांतून उलटसुलट जोराचे वारे वाहायला लागायचे (एअर टर्ब्युलन्स) आणि विमानं चालवणं अधिकाधिक कठीण होत जायचं. पण आमचे सगळेच पायलट अतिशय कुशल होते. त्यांना सगळ्या मार्गांची अगदी चांगली ओळख होती. त्यामुळे ना कधी कुणी वाट चुकला, ना कुठला अपघात झाला!

त्यादिवशीही आम्ही होतो सेकंड लेव्हल बेस कँपवर. नेहेमीप्रमाणे पहाटेच आम्ही सर्व विमानं उड्डाणांसाठी तयार ठेवली होती. आम्हाला त्या ‘पी बेस’वरून सीमेलगतच्या ‘टी बेस’वर जवानांना पोहोचवायचं होतं. सर्व तयारी होऊनही विमानं उडण्याची चिन्हं दिसेनात... कारण त्या बेसवरच्या आर्मी युनिटचा आमच्याशी असलेला संपर्क तुटला होता. सीमेलगत चिनी आक्रमक पुढेपुढे सरकत होते. आपले जवान तीव्र प्रतिकार करत असूनही त्यांना एक-एक ठाणे सोडून माघार घ्यावी लागत होती...
त्या ‘टी बेस’पासून सीमारेषा तर अवघी ६-७ कि. मी. वर!... काय झालं असेल तिथे?... संपर्क का होत नाहीये?... चिन्यांनी तिथे ताबा तर मिळवला नसेल? देव न करो, पण तसं जर असेल तर मग आपल्या तिथल्या जवानांचं काय?... सगळेच चिंताग्रस्त!
आमच्या कॅप्टननं तर आमच्या बेसचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं २५ कि. मी. वर मोर्चेबांधणीचा निर्णय घेऊन उपलब्ध रस्त्यांमार्गे हालचाल सुरूही केली होती कारण आमचा बेसही सीमारेषेपासून फार काही लांब नव्हता... जेमतेम पन्नास-पंचावन्न कि. मी. अंतर होतं! त्यामुळे पुढच्या ‘टी बेस’वरच्या घडामोडी आम्हाला कळणं अतिशय निकडीचं होतं. संदेशवहनयंत्रणा कोलमडलेली असताना हे कसं काय जमवायचं?
मग आमचे फ्लाईट लेफ्टनंट भाकेलाल यांनी एक धाडसी निर्णय घेतला. आमच्या ‘ऑटर’ विमानांमधली संदेशयंत्रणा फक्त सरळ रेषेतच संदेश पोहोचवू शकत असे. त्यांनी ठरवलं की ५-५ मिनिटांच्या अंतरानं तळावर असलेल्या सर्व विमानांनी उड्डाणं करून तिथल्या दर्‍यांतून एक साखळी तयार करायची. प्रत्येक पुढच्या विमानानं मागच्या विमानाला माहिती द्यायची. सर्वात पुढे अर्थातच स्वतः भाकेलाल जाणार होते. पण, ‘टी बेस’ जर दुर्दैवानं चिन्यांच्या ताब्यात असता तर मात्र ते आयतेच त्यांच्या तावडीत सापडले असते. अश्यावेळी एक सुस्थितीतलं विमान तरी शत्रूच्या हाती लागू नये म्हणून वेळ पडल्यास त्याला आग लावून देण्याचा धाडसी विचार त्यांनी केला आणि माझ्याकडे काडेपेटीची मागणी केली...

सर्व पायलट तणावग्रस्त पण निश्चयी मनानं विमानांत चढले. एकापाठोपाठ एक हवेत भरार्‍या घेऊन दिसेनासे झाले. मागे बेसवर आम्ही सर्वजण निःस्तब्ध! आता पुढे काय होणार याची चिंता! साधारण पंधरा मिनिटांनी काहीतरी बातमी कळेल अशी अपेक्षा होती. ती पंधरा मिनिटं आम्हाला पंधरा तासांप्रमाणे वाटली. सगळेजण परत परत घड्याळ्यांकडे पाहत होतो. १५-२० मिनिटे उलटून गेल्यावर तर एकेकाचा धीरच खचायला लागला होता. आणि इतक्यात... भाकेलाल त्या बेसवर सुखरूप पोहोचल्याचा संदेश विमानांच्या साखळीमार्गे आमच्यापर्यंत येऊन पोहोचला! सगळ्यांनी रोखून धरलेले श्वास सोडले!

तिथे सर्वकाही ठीकठाक असल्याची खात्री करून भाकेलाल काही तासांत परतले. आमची त्यादिवशीची पूर्वनियोजित कामं नंतर - २४ तास उशिरानं - पार पडली. तोपर्यंत दोन्ही बेसदरम्यानची संदेशवहनयंत्रणाही सुरळीत झाली होती. नंतर ४-५ दिवसांनी बातमी आली की ‘टी बेस’वर चिन्यांचा हल्ला झाला पण आपल्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. आम्ही वेळेत पाठवलेली कुमक उपयोगी पडली होती... जी आम्ही पाठवू शकलो होतो केवळ भाकेलाल यांनी धोका पत्करून त्वरित हालचाल केल्यामुळेच!!
त्यादिवशी ‘घेणार्‍यांनी’ दोन पेग जरा जास्तच घेतले!

जवानांच्या आयुष्यात असे प्रसंग वारंवार येतात. भराभर निर्णय घेऊन चालू क्षणातून मार्ग काढायचा आणि पुढच्या क्षणाला तोंड द्यायला पुन्हा सर्व ताकदीनिशी सज्ज व्हायचं ही सवयच होऊन जाते!
... किंवा करून घ्यावी लागते असं म्हणा हवं तर!

गुलमोहर: 

सुरेख! लिही अजून.

समर्पक शीर्षक....
अजून असे खूप किस्से वाचायला आवडतील.
वाचतानाही खूप अभिमान वाटला.

मस्त लेख. पुढच्या लेखांची वाट बघतेय. Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

छान्!!!अजुन येउ द्या!!
~~~~~~~~~~~~~~~~~~
जब जब जगने कर फ़ैलाए
मैने कोष लुटाया
रंक हुआ मै नीज निधी खो कर
जगतीं ने क्या पाया!
भेंट न जिससे में कुछ खोऊं
पर तुम सब कुछ पाओ
तुम ले लो मेरा दान अमर हो जाए।
तुम गा लो मेरा गान अमर हो जाए।

जबरदस्त ! आणखी लिहा नक्की.

    ***
    I get mail, therefore I am.

    आमच्या पर्यंत हे लिखाण पोहचवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. अजुन वाचायला खुप आवडेल.

    शरद तुमचे अनुभव पण नक्कि लिहा, वाचायला खुप आवडेल.
    ********************####**************************
    माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

    थोडं उशीरा वाचलं. इतक्या छान वर्णनशैलीकडे याआधी माझं लक्ष गेलं नाही याचा खेद वाटतोय. क्रमशः पण नियमितपणे पुढले भाग वाचायला लवकर द्या.
    मुकुंद कर्णिक
    मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
    भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com

    छान लीहीलय. आणखीन काही अनुभव असतील तर वचायला आवडेल.

    आपल्या जवानांना मानाचा मुजरा.
    भारत माता की जय..

    लले, मस्त लिहीलयस.

    ग्रेट!!

    -----------------------------------------------
    I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

    अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आणखी वाचायला आवडेल Happy

    फारच छान. आवडले. अजून वाचायला नक्की आवडेल. Happy

    खुप मस्त लिहीलंय ,

    *******************
    सुमेधा पुनकर Happy
    *******************

    छान! Happy

    ---
    असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

    जय जवान!!
    काय धाडसी निर्णय घेतलाय भाकेलाल ह्यांनी!! त्यांना सलाम!!

    प्रीती, अजुन येउ दे. Happy

    जय जवान!!
    काय धाडसी निर्णय घेतलाय भाकेलाल ह्यांनी!! त्यांना सलाम!! >>>>+१११११११

    सुरेख लेखनशैली .... Happy

    माझा साक्षात् दंडवत तुमच्या श्वशुरांना सुद्धा अन एयर रिले सिस्टम इम्प्लीमेंट करणाऱ्या भाकेलाल सरांना

    ____/\_____

    छान.

    Pages