कोकणातील शिमगा

Submitted by Mandar Katre on 17 March, 2013 - 01:12

कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !

कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे . सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी .
त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.

त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे .हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे 50-70 फूट उंचीचे, 15 वर्षे वयाचे , आणि सुमारे 1200-1500 किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात ।

हे सगळे होईपर्यंत सकाळचे 4.00 वाजतात . मग होम केला जातो ,ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो ,तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात ,व त्याभोवति गवत रचून मग पालखी प्रदक्षणा होते,आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात .तो एक महत्त्वाचा विधी असतो.

होम झाल्यावर रात्रभर दमलेले सगळे गावकरी,चाकरमानी घरी जातात ॰ मग थोडेसे झोपून/आंघोळ -देवपूजा उरकून परत सहाणेवर जमतात .आणि होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ~गार्‍हाणे ~ नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते ,ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.

त्यानंतर तिसर्‍या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो ,यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो .

त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.

तर असा आहे कोकणचा शिमगोत्सव ! मंडळी , गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच !

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< एकदा तरी शिमग्याला कोकणात याच >> खरंय."पालखी"च्या प्रथेने सर्व गांव भारावून गेलेला मी तरी प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात पाहिला ! चिपळूणला तर प्रत्येक गांव-पालखीचा मार्ग , वेळ तपशीलवार प्रसिद्ध केला जातो व त्या मार्गावर आपापल्या घराजवळ रांगोळ्या घालून लोक श्रद्धेने ओवाळण्यासाठी घरचा सोहळा असल्यासारखे उभे असतात. << पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो >> चिपळूणात तर हा कार्यक्रम नदीकांठच्या एका मोठ्या मैदानात होतो व त्यासाठी तुफान गर्दी लोटते.
'पालखी नाचवणं' हेंही एक तंत्र आहे व व ज्या बेभानपणे पण लयीत ती नाचवली जाते तें पहाणं हाही एक आगळा अनुभव आहे.

चिपळूणला तर प्रत्येक गांव-पालखीचा मार्ग , वेळ तपशीलवार प्रसिद्ध केला जातो व त्या मार्गावर आपापल्या घराजवळ रांगोळ्या घालून लोक श्रद्धेने ओवाळण्यासाठी घरचा सोहळा असल्यासारखे उभे असतात. >>> Happy

रत्नागिरीला आमच्या घरासमोर पोमेंडीच्या महालक्ष्मीची पालखी दरवर्षी येते. पालखी फिरत फिरत येत असल्याने कधी रात्री अपरात्री पण येते.

यंदा सतिशच्या गावाची - खोपीमधल्या देवीची जत्रा आहे (ही जत्रा तीन वर्षांनी असते) त्याला यायचे मनात आहे. बघू या!!!

सासर चिपळुन असल्याने गेली २ वर्षे पालखीचा उत्सव बघायला मिळतो.. सासरी घरी पालखी येते तेव्हाची गडबड, गोंधळ, माणसांची उठबस अगदी दिवस संपुन जातो....

<< एकदा तरी शिमग्याला कोकणात याच >> खरंय."पालखी"च्या प्रथेने सर्व गांव भारावून गेलेला मी तरी प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात पाहिला ! > भाऊ खरयं.. चिपळूण, दापोली तालुक्यात पालखी घरोघरी फिरवली जाते. त्यावेळी घरातील प्रत्येक जण हजर असतोच. सोबतीला पाहुणे देखिल असतात. ओवाळणी, ओटी भरणे, नवस फेडणे आणि करणे, पालखी खालून लोटांगण घालणे हे सगळे सोपस्कर करता करता एकेका घरात पालखी अर्धा एक तास ठाण मांडते.
ज्या गावात जास्त वाड्या / उंबरठे आहेत त्या गावचा पालखि सोहळा पंधरा दिवस सुरु राहतो. रात्री सहाणे वर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम बघायला मजा येते.

मला १२ तारखेलाच आठवण झाली होती. आम्ही कोकणात असताना, आजूबाजूच्या गावातील ३-४ पालख्या यायच्या.ठरलेल्या घरी त्यांची पूजा असे. आम्ही ज्या घरात रहात होतो, तिथेही पालख्या यायच्या. मग आमची शाळा त्या दिवशी लवकर सोडली जायची. आणि मग घरी जाऊन पालखीच्या स्वागताची, पूजेची तयारी केली जायची. ते ढोल आणि घंटांचा नाद अजूनही कानात घुमत असतो. पालखी तर अशी नाचवायचे की पार उलटी सुलटी व्हायची. पण एक फुल सुद्धा खाली पडायचे नाही. तसेच पालखी घेणार्‍याने जर मद्यप्राशन किंवा अनुचित प्रकर केला असेल तर पालखी खाली ठेवताच येत नसे. ती सारखी नाचत राहिलेली आम्ही पाहिली आहे. पण ते वातावरण खूप छान होतं. आता हे फक्त आठवायच. १२ तारखेला हेच सगळ आठवत होते. परत कधी हे अनुभवायला मिळणार देव जाणे. Uhoh

त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते. >>>>>>>>>>हे होळीच्या आधी होते ना? आमच्या कडे खेळे पण यायचे. खूप धमाल असायची या दिवसात. Happy

त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे .हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे 50-70 फूट उंचीचे, 15 वर्षे वयाचे , आणि सुमारे 1200-1500 किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात । >>>>>>>>>>>होळीच्या शेंड्याकडे बघताना मान दुखून यायची. Happy

३०/३१ तारखेला बहुतेक पालखी साठी गावी जायचा प्लॅन आहे. घरी पालखी येते तेव्हा तर खूप मस्त वाटते. पालखी कधी येणार याच्या तारखा नक्कि नसतात.
1.jpg2_0.jpg

पालखीचे वरचे छान फोटो ! निसर्गाच्या पार्श्वभूमिमुळे खुलून दिसणारे !!
'पालखी'चा स्थानिकांच्या मनावर किती प्रभाव असतो, याची कल्पना मीं वाचलेल्या एका बातमीमुळें मला आली होती. एका कुटुंबाचा जमीनीसंबंधातला वाद अनेक वर्षं कोर्टात चालला होता. शेवटीं उच्च न्यायालयाने एका दावेदाराच्या बाजूने निकाल दिला. पण दुसर्‍या दावेदाराने 'गांवकी'कडे दाद मागून पहिल्याच्या घरीं पालखी थांबणार नाही, असा निवाडा करून घेतला. पहिल्याने तात्काळ 'गांवकी'च्या पांया पडून व कित्येक वर्षं भांडून मिळालेल्या कोर्टाच्या निकालातील सर्व अधिकारांवर पाणी सोडून पालखीसंबंधातला तो निवाडा बदलून घेतला !!

शोभा, खरं ग! हा लेख वाचत असताना माझ्या मनात पण हेच विचार येत होते.
मंदार कात्रे, खूप छान लिहिलंय! असेच लिहित रहा! आणि आम्हाला पुनःप्रत्ययाचा अनुभव द्या.

हे काही व्हिडीओ आंतरजालावरून मिळालेले Happy
१. http://www.youtube.com/watch?v=2NUep-odz9c

२. http://www.youtube.com/watch?v=Xi9hoh_sKP8

आमच्या कडे अशी पालखी (आकार) असायची.
३. http://www.youtube.com/watch?v=8ytFrNoTnuA

मी तर चालली आहे गावाला २६ ते ३०
धमाल येणार आहे त्यात आमच्या घरी बाल्या डांस पण आहे
हुर्रेर्रेरे..... स्मित>>>>>>>>>>>>..ए, जळवू नको ग. Angry सगळ्याचे व्हिडीओ घेऊन ये. Happy

शिमगा म्हणजे होळी सणाच्या अगोदर १० दिवस छोट्या शेवरीच्या होळ्या जाळण्याची प्रथा आहे . फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजेच फाक-पंचमी पासून चतुर्दशी पर्यंत रोज वाडीतील मुले संध्याकाळी होळी उभी करतात ,मग रात्री ११ च्या दरम्याने गवत /लाकडे चोरून आणायची आणि रात्री १ च्या दरम्याने होळी जाळायची ,असा हा कार्यक्रम असतो … यावेळी "डीन्गा पाणी " नावाचा खेळ रात्रीच्या चांदण्यात खेळला जातो, तसेच कोणाची उन्हाळी शेती असेल तर तिथून काकड्या/ कलिंगड आणि आंबे/काजू फणस चोरून आणले जातात आणि ते खाउन मग होळी जाळतात

आमच्या गावच गार्‍हाण ....

व्हssssssय म्हाराजा !

जय देवा धोपेश्वरा, लक्ष्मीनारायणा, महापुरुषा, बारा गावच्या, बारा वाडीच्या, बारा वहिवाटीच्या म्हाराजा,
व्हय म्हाराजा .....
मी जे काय कार्य योजलेलो असा, जो काय खेळ मांडलेलो असा म्हाराजा
व्हय म्हाराजा .....
तो नीटपणे तडीस जाऊ दे रे म्हाराजा .....
व्हय म्हाराजा ......
जर काय कोणी वाईट मनाने चालगत, चेटूक बिटूक, करणी बिरणी केली असेल म्हाराजा
व्हय म्हाराजा .....
तर त्याचे दात त्याच्या घशात घाल रे म्हाराजा
व्हय म्हाराजा ......
वडाची साल पिंपळाक कर, पिंपळाची साल वडाक कर, ह्ये बारा पाचाचा गणित येक कर रे म्हाराजा
व्हssssssssय म्हाराजा

व्हsssssssssssssssय म्हाराजा !!!!!!!!

खूप आठवण येतेय कोकणातल्या शिमग्याची. ती पालखी त्याबरोबरचा वाद्यवॄंद, सगळं सगळं आठवून डोळे भरून आले. Uhoh

खूप छान वर्णन. शिमगा म्हणजे घर उघड पाहिजेच. हा एकच दिवस असतो की जेंव्हा देव आपल्या घरी येतात. म्हणून घरं बंद नाही ठेवत.

मंदार
चोरवणे म्हणजे वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल गाव का???

वासोटा ट्रेक करताना आमच्या खूप हृदयस्पर्शी आठवणी आहेत या गावातल्या गावकऱ्याच्या. डांगवाडीतले दुकानदार विलास जाधव वगैरे मंडळीनी भरपूर मदत केली होती. नदीच्या पलीकडे एका कोंबडी विक्रेत्याने (मधुकर) तर कोणतीही ओळखदेख नसताना आपली मोटर सायकल आम्हाला वापरायला देवू केली होती.
शाळेजवळच्या काकुनी तर आईच्या मायेने भाकऱ्या भाजून दिल्या होत्या ते हि कोणताही मोबदला न घेता. मला आता त्याचं नाव आठवत नाही. पण आमच्या डायरी मध्ये नोंदवून ठेवलय.

परत चोरवणे गावी जायला आवडेल आम्हाला.

Pages