खोडदची रेडिओ दुर्बीण

Submitted by श्रावण on 8 June, 2008 - 00:00

********************************************
......................................खोडदची रेडिओ दुर्बीण ........................
.................जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप - (जी. एम. आर. टी.)........
********************************************

जुन्नरचं एक वैज्ञानीक महत्व म्हणजे खोडदला असलेली महाकाय रेडिओ दुर्बीण! खगोलशास्त्रात भारताने जी काही आपली ओळख निर्माण केली आहे त्यामध्ये या शक्तीशाली रेडिओ दुर्बीणीचे महत्वपुर्ण योगदान आहे. जागतीक पातळीवर ही दुसर्‍या क्रमांकाची शक्तीशाली रेडिओ दुर्बीण मानली जाते.

या अफाट विश्वाबद्दल मानवाला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे आणी या अथांगतेचा शोध अखंडपणे सुरुच आहे. यातूनच खगोलशास्त्र विकास पावत गेले. प्रथमतः ऑप्टिकल दुर्बिणीचा (डोळ्यांनी निरिक्षण करता येणार्‍या) वापर याकामी केला जात असे मात्र पुढे रेडिओ दुर्बिणीचा शोध लागला. प्रत्येक ग्रह, तारा स्वतःमधून विविध तरंगलांबीच्या चुंबकीय लहरी सर्वत्र सोडतात हे काही शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. व या लहरींच्या अभ्यासावरुन त्या ग्रहाच्या वा तार्‍याच्या निरीक्षणाची अचुकता कित्येक पटीने वाढते हे लक्षात आल्यावर पुढे या लहरी पकडणार्‍या दुर्बिणीचा वापर अवकाश निरीक्षणासाठी वाढला. त्यामध्येही इतर तरंगलांबी पेक्षा रेडिओ तरंगलांबी (१ मीटर) असलेल्या लहरींचे संकलन व अभ्यास अधिक सोयीस्कर ठरला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी भारतातील डॉ. विक्रम साराभाई यांना अंतराळ संशोधनासाठी, डॉ. सिद्दिकींना मुलभूत संशोधनासाठी तर डॉ. गोविंद स्वरुप यांना रेडिओ एस्ट्रॉनॉमीसाठी योगदान देण्याविषयी आवाहान केले. डॉ. गोविंद स्वरुपांनी पुढे अतिशय महत्वकांक्षी अशा या शक्तिशाली दुर्बिणीची संकल्पना तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर मांडली व त्याला मान्यता मिळविली.

प्रकल्पासाठी खोडदची जागा निवडताना मुख्य बाबी महत्वपुर्ण ठरल्या त्या म्हणजे या भागामध्ये रेडिओ लहरींना प्रभावीत करु शकेल अशा इतर चुंबकीय लहरींचे अस्तित्व अतिशय नगण्य होते. म्हणजे चुंबकीय लहरींचे संकलन सोपे व अचूक होऊ शकणार होते. हा भाग भुकंपप्रवण क्षेत्राच्या बाहेर होता. तसेच पुण्यापासून दळणवळणासाठी सुलभ होता. व तांत्रीकदृष्ट्या पृथ्वीच्या ठराविक भागावर चुंबकीय लहरी विखुरण्याचे प्रमाण कमी असते हे लक्षात आले आहे. हा परिसर याच प्रकारामध्ये मोडतो.

प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष १९८२-८३ च्या सुमारास चालू झाले व १९९४ च्या सुमारास पुर्ण झाले. या प्रकल्पाअंतर्गत अवकाशातून येणार्‍या रेडिओ लहरी पकडण्यासाठी ४५ मीटर व्यास डिश असणार्‍या एकूण ३० अँटेना उभारल्या गेल्यात. लहरींचे संकलन समजावून घेणे अतिशय सोपे आहे. सर्व अँटेनाच्या डिशेस ज्या तार्‍याचे, ग्रहाचे वा लहरीच्या स्त्रोताचे निरिक्षण करायचे आहे त्या स्थानाकडे वळविल्या जातात. अँटेनाची मोठी डिश ही अवकाशातून येणार्‍या चुंबकीय लहरी परावर्तीत करुन डिशच्या वर जोडलेल्या रिसिव्हरकडे पाठवते. व या रिसिव्हरद्वारे त्या ग्रहण करुन फायबर ऑप्टिकल केबलद्वारे मुख्य प्रयोगशाळेत संगणकाकडे पुढील संशोधनासाठी पाठवल्या जातात.

एकूण ३० पैकी चौदा अँटेना खोडदमध्ये तर इतर १६ अँटेना इंग्रजी वाय शेपमध्ये आजूबाजूच्या २५ किमी च्या परिसरात उभारल्या आहेत. (पहा खालील आकृती क्रं. ०१). या सर्व डिश एकाच वेळी लहरी ग्रहण करण्यासाठी एकाच दिशेने वळविण्यात येतात. होते काय की त्यामुळे सुमारे २५ किमी. व्यासामध्ये त्या स्त्रोताकडून येणार्‍या लहरी एकाच वेळी पकडता येतात. म्हणजे अशा वेळी या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच अँटेना म्हणून अप्रत्यक्षरित्या वापरल्या जातात. लहरी पकडण्यासाठीची डिश जेवढी मोठी तेवढ्या जास्त लहरी पकडता येणार व संशोधनातली अचुकता वाढणार हे ओघाने आलेच. व त्यामुळे ही दुर्बीण जागतीक पातळीवर दुसर्‍या क्रमांकाची शक्तीशाली ठरली आहे.

या प्रकल्पातील एक वैशिष्ट्यं म्हणजे अँटेनाच्या डिशसाठी प्रथमच वापरले गेलेले मेश (जाळी) तंत्रज्ञान! यापुर्वी अशा प्रकारचे अँटेना उभारताना डिशमध्ये लहरी परावर्तीत व्हाव्यात म्हणून सलग धातूची शीट (पत्रा) वापरली जात असे. डॉ. स्वरुपांनी इथे त्याऐवजी धातूची जाळी वापरली आहे. या जाळीची घनता अशी आहे की जाळीच्या मोकळ्या भागातून रेडिओ तरंगलांबीच्या लहरी आरपार जावू शकणार नाहीत व पर्यायाने त्या परावर्तीत होतील. या तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी साध्य झाल्यात. जसे की डिशचे वजन कमी झाल्याने अर्थातच तो फिरवण्यासाठी कमी शक्ती लागते. वार्‍याचा अवरोध कमी होतो. एकंदरीतच उभारणीचा खर्चही खुप कमी होतो. या तंत्रज्ञानाचे पेटंट सध्या भारताकडे आहे.

या प्रकल्पाच्या उभारणी बरोबरच भारताने खगोलशास्त्रीय संशोधनामध्ये महत्वाचा टप्पा गाठला. डॉ. स्वरुपांच्या या अजोड कामगिरीमुळेच ते भारतातील खगोलशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जावू लागले. आजही ८० वर्षे वयाच्या आसपास असतानाही हा माणूस तेवढ्याच उत्साहाने मार्गदर्शकाची भुमिका बजावतो आहे. त्यांच्याबरोबरच डॉ.कपाही, प्रो. अनंथकृष्णन अशा इतर अनेक शास्त्रज्ञांनी पण या प्रकल्पामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे.

.........................................................................................

हा प्रकल्प दुसर्‍या व चौथ्या शनिवारी सगळ्यांना भेटीसाठी खुला असतो.

भेटीची वेळ घेण्यासाठी संपर्क : ०२१३२ - २५२११२, २५२११३, २५२११४.
स्थान : खोडद, ता.जुन्नर, जि.पुणे. पुणे नाशीक महामार्गावरील नारायणगावपासून ९ किमी पुर्वेकडे.
वाहन व्यवस्था : पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी.स्थानकावरुन नाशिककडे जाणार्‍या गाडीने नारायणगाव (७६ किमी) येथे उतरावे. तेथून खोडदला जाण्यासाठी दर तासाला एस.टी. ची सोय आहे.

जी.एम.आर.टी. च्या अँटेनांचा स्थलदर्शक नकाशा.
टिंबांनी जोडलेला गोल हा सगळ्या अँटेनांचा कसा एकच मोठी डिश म्हणून वापर होतो ते स्पष्ट करतो.
GMRT1.jpg

जी.एम.आर.टी. अँटेना.
डिशसाठी वापरलेली जाळी व डिशच्या वर चुंबकीय लहरी ग्रहण करण्यासाठी लावलेला रिसिव्हर स्पष्ट दिसत आहेत.
antenas_GMRT.jpg

प्रकल्पाचे संस्थापक जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप.
GSwarup.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद श्रावण आणि सुधीर.
दिनेशदा अलिकडे का मुक्काम ठोकला पलिकडे का नाही?? Proud
अमोल नाही रे एका दिवसात हे सगळ शक्य नाही.
शिवनेरीवर जास्त वेळ लागेल. शिवनेरी लेण्याद्री आणि ओझर एका दिवसात होइल.
आणि फारच उत्सुकता असेल तर लेण्याद्रीच्या आजुबाजुच्या बर्‍याच डोंगरात असलेली लेणी पहायला जाता येइल. Happy
जुन्नर हे शिवनेरीच्या पायथ्याशीच आहे आणि त्या गावात विशेष काही नसेल पाहण्याजोग. (मला वाटत की शिवाजी महाराजांचे जन्म स्थान असेल पहायला.)
खोडदला तो प्रकल्प पाहण्यासाठी साधारण दोन तास पुरेसे आहेत.

.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

झकास, शिवाजी महाराजांचा जन्म गडावरच झाला, त्यामुळे जुन्नरमधे पहाण्या सारख काहि नाहिये. पुर्वी ते बाजारपेठेच गाव होत. त्यामुळे गावातिल वेगवेगळ्या आळ्या (गल्ल्या) त्या पध्दतिने बांधण्यात आलेल्या आहेत. शिवाय जुन्या पध्दतिचे वाडे आहेतच.

दादोजी कोंडदेवांचा वाडा जीर्ण झाला आहे ना? नीलफलक आहे एवढे माहीत आहे. पण काही बघण्यासारखे आहे का?

जुन्नर हे माझे आजोळ. शिवनेरी हा राजांचा किल्ला नक्कीच बघण्यासारखा. लेण्याद्री हे अष्टविनायकांपैकि एक. रांजणी (खोडदजवळील एक गांव) येथे आमचे कुलदैवत आहे. त्यामुळे हा सर्व परिसर अगदी छान बघितला आहे. खोडद च्या एका दुर्बिणीजवळच आमचे शेत असल्याने जेव्हा - जेव्हा रांजणी ला जातो तेव्हा - तेव्हा हे सर्व काही बघणे होते. मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होऊन ... परतीच्या प्रवासाला सुरुवात करावी लागते! माझ्या गांवाबद्दल काहीसं http://shrinrusinha.blogspot.com/ नक्की वाचा ... श्रीहरि

अरे हो ... अजून एक ... जुन्नर आणि नारायणगांव या ठिकाणी रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उत्तम आहे.

अरे व्वा श्रीहरी छानच आहेत फोटो. रांजणी गावाबद्दल ऐकुन होते पण कधी जाण जमल नाही. जुन्नर बी बी वर येत जा आता.
नारायणगावात रहाण्याचा अनुभव तितकासा चांगला नाही आला. बर्‍याच ठिकाणी रात्रिच्या वेळी (साधारणपणे रात्री नऊ च्या सुमारास) जुगार, दारुच्या पार्ट्या चालु होत्या. कुटुंबासह राहण्यास अजिबात चांगले लॉजिंग सापडले नाही. शेवटि ओझरला मुक्कामास गेलो.

श्रीहरि , तुमच्या गावचे फोटो छान आहेत. सध्या कुठे असता तुम्हि?

श्रीहरी, छायाचित्रान्प्रमाने, लेखही अतिशय सुन्दर आहे. आता गावीगेल्यावर नक्किच जाणार रान्जनीला. जवळ असुंन जाने झाले नाही.

जय श्रीहरी. सुस्वागतम. भारीच आहे तुमचा ब्लॉग. माझे नेट गडगडले परंतु जे काही थोडेफार बघितले ते पाहुन मन अगदी भरुन आले.

अरेच्चा ! ईकडे पाहीलेच नाही कि राव !
श्रीहरी, मी देखिल ११वी-१२वी रांजणीला केली आहे.
नदीच्या किनारी असणारे मंदीर तर फारच छान,.
आणी हो मी दुध देखील रांजणीच्या डेअरीमध्ये दररोज घालायला यायचा नेमाने संध्याकाळी ४.०० वा.
आणी हो , जुन्न्ररकरांनो, एक गुलाबी आठ्वण देखील आहे रांजणीची..माझ्यासाठी...जाऊदे नको त्या आठ्वणी.. माझे ह्रुदयाचे ठोके वाढायला लागले.

झन्कार, जिवण हे अशा मौलीक आठवणीन्च्या ठेव्याने पुर्ण होते.जाउ दे म्हणुन कसे चालेल.

झंकार सांगा बरं तुमच्या गोड आठवणी.

झंकार, तरीच रोज संध्याकाळी स्वारी दुध घेऊन जायची. Happy
आणि हो, हृदयाचे ठोके नॉर्मल झाले की गुलाबी आठवणींचा सडाहि पडु दे जुन्नरच्या अंगणात. Happy

इथले प्रतिसाद शक्यतो खोडदच्या दुर्बीणीसंबंधात असु द्यात. बाकी लेखनासाठी जुन्नरच्या आठवणी कींवा नवीन धागा चालु करा.

जीएमारटी मध्ये २७ आणी २८ तारखेला विषेश प्रदर्शन आयोजीत करण्यात आलेले आहे व हे सर्वांसाठी खुले आहे तेंव्हा ईच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !!
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी ! एवढ्या जगात माय मानतो मराठी !!

याबद्दल जास्त माहिती एका छोट्या लेखात लिहून तो लेख मायबोलीच्या मुख्य पानावर टाकता येईल का ?

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता

Pages