जीवावर बेतले पण निभावले …'ब्लॅक लेबल'वर ! - एक निदानचातुर्य कथा !

Submitted by SureshShinde on 24 February, 2014 - 11:29

जीवावर बेतले पण निभावले …'ब्लॅक लेबल'वर ! - एक निदानचातुर्य कथा !

blacklebal.jpg

मी ससून हॉस्पिटलमध्ये एमडी करीत असतांनाची म्हणजे सुमारे चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही …
बुधवारची संध्याकाळ. आमच्या युनिटचा इमर्जन्सीचा दिवस होता. चोवीस तास अव्याहत काम करणाऱ्या सीएमओ विभागात एक पेशंट आल्याचा निरोप आल्यामुळे मी आणि माझा ज्युनियर सहकारी डॉक्टर तिकडे निघालो. आमच्या युनिटचे प्रमुख तज्ञ डॉक्टर श्री सुळे यांची चिठ्ठी घेवून श्री मोहन भट नावाचे एक पेशंट आमची वाट पाहत थांबले होते. पन्नाशी ओलांडलेले आणि सुखवस्तू दिसणारे भट हे एक वकील असल्याचे त्यांनी पहिल्याच वाक्यात स्पष्ट केले. आधीच सरांचे खाजगी पेशंट आणि शिवाय वकील म्हटल्यामुळे आम्ही थोडे जास्तच सावधगिरीने ऐकू लागलो.
"आज सकाळपासून माझी तब्बेत बिघडली आहे. थोडा तापही वाटतो आहे, सारे अंग दुखते आहे. अंगावर तांबडे पुरळ उठले आहे. तोंडात देखील लाल काळे चट्टे दिसत आहेत. नाक शिंकरले तर रक्ताच्या गाठी पडताहेत."
त्यांना तपासल्यानंतर त्यांच्या पायावर पावलांपासून ते दोन्ही मांड्यांपर्यंत साधारणतः एक ते दोन मिलीमीटर आकाराचे हजारो लाल ठिपके दिसत होते. त्यातील काही ठिपके एकमेकांत मिसळल्यामुळे लालकाळसर असे मोठे धब्बे तयार झाले होते.

230px-Purpura.jpg

"सर, परप्युरा दिसतोय !" ज्युनियर माझी कानात पुटपुटला.
तोंडाच्या आतल्या भागात असेच लाल काळे चट्टे दिसत होते. नाकातून आत्तातरी रक्त येत नव्हते. पोटामध्ये लिव्हर आणि स्प्लीन वाढलेली हाताला जाणवत होती. शंभरपर्यंत ताप होता पण बीपी उत्तम होते. ते कोठलेही औषध घेत नव्हते. पण रोज रात्री तीनचार पेग व्हिस्की मात्र नित्यनेमाने अनेक वर्षे घेत आले होते.
"भटसाहेब, आपल्या शरीरातील प्लेटलेटस नावाच्या पेशी कमी झाल्या असाव्यात असे वाटते. ह्या पेशी आपल्या शरीरामध्ये रक्तस्त्राव झाल्यास तो थांबवितात. पण या पेशी प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्यास असा रॅश येतो. तुमच्या तोंडातील चट्टे अथवा नाकातून येणारे रक्तदेखील हेच दर्शवतात. आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल होवून पुढील तपासण्या करून त्याप्रमाणे ईलाज करावे लागतील."

भटसाहेब खाजगी वार्डमध्ये ॲडमिट झाल्यानंतर थोड्याच वेळात सर्व प्राथमिक रिपोर्ट उपलब्ध झाले. भटांचा प्लेटलेट काऊंट जो नेहमी असतो पाच लाख तो केवळ दहा हजार होता ! त्यामुळेच त्यांना आपोआप त्वचा,नाक आणि तोंड येथे कोठलेही कारण नसताना देखील आपोआप रक्तस्त्राव होत होता ! ह्या प्लेटलेट बोनम्यारो म्हणजे अस्थिमज्जा किंवा हाडांच्या पोकळ भागात तयार होतात. प्लेटलेटच्या मूळपेशी तेथेच असतात व त्या आपण ज्याप्रमाणे सांडगे करताना तुकडे करतो त्याप्रमाणे स्वताच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे रक्तामध्ये सोडत असतात, ते तुकडे म्हणजे या 'प्लेटलेट' ! यांचे आयुष्य सुमारे दहा दिवस असते. रक्तामधील वृध्द झालेल्या सर्व प्रकारच्या पेशी 'स्प्लीन' म्हणजे पाणथरीमध्ये जावून मरतात. प्लेटलेट कमी होण्याची दोन कारणे असतात. एक म्हणजे मूळपेशी कमी झाल्याने त्यांचे उत्पादन कमी होते. कधीकधी काही कारणांमुळे प्लेटलेटच्या शरीरामधील प्रथिनांमध्ये बदल झाल्यामुळे त्यांची ओळख बदलते, त्यामुळे शरीरातील संरक्षण व्यवस्था, इम्यून सिस्टीम, त्यांचा मारून टाकते. भटांच्या बाबतीमध्ये बहुतेक असेच होत असावे कारण त्यांचे इतर सर्व रिपोर्ट नॉर्मल होते आणि, लिव्हर आणि मुत्रपिंड यांचे कार्य उत्तम चालले होते. आम्ही त्यांचे सर्व रिपोर्ट सुळे सरांना कळविले.
"सुरेश, श्री भट हे केवळ आपले पेशन्त्च नव्हे तर माझे मित्र आहेत. त्यांना डेंगीचा ताप असण्याची शक्यता आहे. त्यांना स्टेरॉइडचे इंजेक्शन सुरु करा आणि रात्रीतून एक फ्रेश ब्लडही द्या. उद्या सकाळी पुन्हा प्लेटलेट काऊंट पाठवा. मी त्यांना सकाळी पाहीन."

दुसर्या दिवशी सकाळी भट अगदी फ्रेश दिसत होते. रात्रभरच्या उपचारांनी चांगला परिणाम दिसत होता. नाकातील ब्लीडींग पूर्ण थांबले होते व अंगावरील पुरळ मावळताना दिसत होते. ताप निवला होता आणि आजचा ताजा प्लेटलेट काऊंट होता पन्नास हजार !
"अब आप खतरेसे बाहर है" मी आनंदाने ही बातमी भटांना सांगितली.
पुढील दोन दिवसांत त्यांची तब्बेत आणखीनच सुधारली, प्लेटलेट काऊंट झाला तीन लाख आणि पुढील दहा दिवसांत स्टेरॉइडच्या गोळ्या हळूहळू कमी करायला सांगून आम्ही भटांना घरी पाठवले.

सुमारे पंधरा दिवसांनंतर श्री भट पुन्हा त्याच तक्रारींसह पुन्हा ॲडमिट झाले. यावेळीस पुन्हा तीच औषधे सुरु केली पण त्यांच्या प्लेटलेट्स काही वाढेनात, त्या वीसतीस हजारापर्यंत स्थिरावल्या होत्या. बोनम्यारो टेस्टमध्ये प्लेटलेट्सच्या मूळपेशी तर चारपट वाढलेल्या दिसत होत्या. म्हणजे भटांच्या प्लेटलेट्स स्प्लीनमध्ये जावून मरत होत्या, त्यांना अँन्टीबॉडीज तयार झाल्या होत्या. त्यावेळी अशा अँन्टीबॉडीज मोजण्याची सोय नव्हती.
"सुरेश, भटांना आयटीपी दिसतोय आणि बरेच दिवस स्टेरॉइडस घ्यावी लागतील . भटांच्या प्लेटलेट्स का कमी होताहेत हे शोधले पाहिजे नाहीतर त्यांची स्प्लीन काढून टाकण्याखेरीज गत्यंतर दिसत नाही."
अँन्टीबॉडीजमुळे प्लेटलेट्स कमी होण्याच्या आजाराला आयटीपी असे म्हणतात. जंतुसंसर्गामुळे झालेला आयटीपी काही दिवसांत आपोआप बारा होतो पण इतर कारणांमुळे अँन्टीबॉडीजचे उत्पादन सतत चालूच राहिले तर स्टेरॉइडस किंवा सर्जरी शिवाय पर्याय नसतो. कधीकधी कांही औषधांची ॲलर्जी निर्माण झाल्यामुळे अशा अँन्टीबॉडीजचे उत्पादन सतत चालूच राहते आणि ते औषध बंद करणे हा त्यावर उत्तम उपाय असतो. आम्ही भटांची खूप चौकशी केली पण काही क्लू मिळेना.
एके दिवशी वार्डच्या मुख्य सिस्टरांनी मला बाजूला बोलावून सांगितले,
"सर, हा पेशंट रोज दारू घेत असतो. रोज सकाळी दाढी करायला येणाऱ्या न्हाव्याशी त्याने संधान जुळवले आहे. तो न्हावी त्याच्या फवार्याच्या बाटलीत दारू आणून त्यांना देतो असा मला दाट संशय आहे."
मी ही गोष्ट सुळे सरांच्या कानावर घातली. सरांचा चेहरा हसरा झाला.
"अरे मोहन, तू हॉस्पिटलमध्ये देखील तुझा कार्यक्रम चालू ठेवला आहे असे कळते. काय पितोस ?"
मोहन भट चांगलेच चपापले.
"डॉक्टर, मला त्याशिवाय जमतच नाही. बायको गेल्यापासून 'ब्लॅक लेबल'नेच मला सोबत केली आहे."
क्षणभर मला भटांची कींव आली.
पण सरांच्या मनात काही तरी वेगळेच विचार घोळत होते. सुळे सर हे उत्तम निदान करण्यासाठी प्रसिद्ध होते. सरांच्या टोपीमध्ये अनेक तुरे खोचलेले होते, 'पूना सिंड्रोम' हा त्यापैकी एक ! जुन्नरजवळच्या एका कुटुंबामधील सर्वांना प्रमाणापेक्षा खूपच लघवी होवू लागली. रोज पंधरावीस लिटर्स ! आपल्या अगस्ती मुनींना झाली होती त्याची आठवण करून देणारा आजार ! याला आम्ही डायबीटीस इंसीपिडीस म्हणतो. सरांनी शोधले की ह्या लोकांनी खाल्लेल्या बाजरीवर एक प्रकारची बुरशीचा रोग पसरला होता आणि त्यामुळे हा आजार झाला होता. अचूक निदान ही सरांची खासियत होती. एखाद्या पेशंटविषयी चौकशी करून झाली की सर डोळे मिटून दोन मिनिटे शांत विचार करीत थांबत आणि आम्ही आता सर काय बोलतात याची वाट पाहत थांबत असू. भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी बघून ज्ञानकोश शोधत असत त्याची आठवण व्हावी ! आजही सर थोडा वेळ भटांच्या शेजारी अशाच ध्यानमग्न अवस्थेत उभे होते.
"भट, व्हिस्किमध्ये काय घालता, सोडा, पाणी की स्ट्रेट, 'ऑन द रॉक्स !"
भट जरा खुशीत आले,
"माझे काही मित्र ब्रिटीश काळातील आर्मीमधून रिटायर झालेले. त्यांना व्हिस्किमध्ये लागते एक स्पेशल पाणी, 'टॉनिक वॉटर'. हे जरा कडू असते पण त्याची मजा काही औरच !"
"मला दाखवता का ते तुमचे 'टॉनिक वॉटर' !"

tonicwater.jpg

भटांनी तातडीने कपाट उघडून एक बाटली काढून सरांच्या हातात दिली आणि स्मितहास्य करीत उभे राहिले.
"अगदी बरोबर ! या मुळेच, या पाण्यामुळेच तुमच्या प्लेटलेट्स कमी होत आहेत."
सर काय बोलताहेत यावर क्षणभर भटांचा आणि इतर कोणाचाही विश्वास बसेना.
"डॉक्टर, मी दारू सोडावी म्हणून तुम्ही असे सांगत असाल तर त्याचा काही उपयोग नाही." भट.
"दारू पिणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पण तुमच्या तक्रारी ह्या टॉनिक वॉटरमुळेच आहेत याची मला खात्री आहे." सर.
"माफ करा, सर पण तुम्ही म्हणता याला पुरावा काय ?" भटांमधल्या वकीलाने प्रश्न केला.
सुळे सर थोडेसे गंभीर झाले आणि मला म्हणाले,
"सुरेश, पटकन दोन काचेचे ग्लास मागवून घ्या."
भटांनीच लगेच कपाटातून दोन ग्लास काढून दिले. सर आता काय करणार असा विचार करीत आम्ही सर्वजण उभे होतो.
सरांनी एका ग्लासमध्ये काठोकाठ 'टॉनिक वॉटर' भरले आणि दुसर्यात साधे पाणी. ते दोनही ग्लास न सांड्वता खिडकीमध्ये भर उन्हात ठेवले.
"आपण दुसरे पेशंट पाहून येईपर्यंत हे ग्लास असेच राहू द्या. आम्ही पंधरा वीस मिनिटात परत येतो असे सिस्टरना सांगून आम्ही बाहेर पडलो. पुन्हा परत येईपर्यंत आता काय जादू दिसणार याचाच आम्ही सर्वजण विचार करीत होतो.
परत येवून पहिले तर ते दोन्ही ग्लासेस तसेच दिसत होते, काहीच फरक दिसत नव्हता.
"सुरेश, सर्वजण जवळ येवून पाळीपाळीने असे बाजूने दोन्ही ग्लासमधील पाण्याच्या पृष्ठभागाकडे नीट पहा."
मी सर्वप्रथम पहिले. 'टॉनिक वॉटर' च्या ग्लासातील पृष्ठभागाच वरील पाव इंच जाडीचा थर निळसर होवून चमकत होता. आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो, अगदी भटदेखील !
"आता या टॉनिक वॉटरच्या बाटलीवरचे लेबल वाचा." सर.
"इंडियन टॉनिक वॉटर - कंटेन्स 'क्विनाईन' " वाचतावाचताच माझी ट्यूब पेटली. भटांना क्विनाईनची ॲलर्जी होती आणि त्यामुळेच त्यांच्या प्लेटलेट्स कमी होत होत्या.
टॉनिक वॉटरमधील क्विनाईनच्या रेणुंवर दुपारच्या कडक उन्हातील सुर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरण पडल्यामुळे चमकणारे 'फोटॉन्स' तयार होतात व त्यामुळेच तो नीळा रंग दिसला होता.
ते टॉनिक वॉटर पिणे बंद केल्यानंतर काही दिवसांतच भटांच्या प्लेटलेट्स वाढून पूर्ववत नॉर्मलला आल्या. सुळे सरांनी सज्जड पुरावा दिला होता. भटांनी मात्र या प्रसंगाचा एव्हडा धसका घेतला की ब्लॅक लेबल ऑन-द-रॉक्स घ्यायला सुरवात केली !

-----------------------------------------

सूर्याच्या प्रकाशामध्ये, विशेषतः दुपारच्या रखरखीत उन्हामध्ये भरपूर अल्ट्राव्हायोलेट किरण असतात जे आपल्या त्वचेला घातक असतात. त्वचेमधील डीएनए ला इजा पोहोचवितात. हा डयमेज रिपेअर करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. काही व्यक्तींमध्ये असलेल्या जनुकीय दोषामुळे त्यांना हा डीएनए रिपेअर करता येत नाही त्यामुळे त्यांच्या त्वचेला खूप ईजा होवून काळे धब्बे पडतात, कालांतराने डोळे आंधळे होतात आणि शेवटी त्वचेचा कर्करोग होतो. अशा genetic DNA repair disorder चे नाव आहे 'xeroderma pigmentosa'. काही दिवसांपूर्वी अशी एक फ्यामिलीचे मी निदान केले होते.
सनस्क्रीन आणि काही औषधांमुळे त्याचे आयुष्य सुखकर करता येते. त्या फ्यामिलीमधील एकच हा फोटो ….

xeroderma.jpg

सूर्यकिरण वातावरणामध्ये प्रवेशताना वातावरणातील ओझोन वायूचा थर हे अल्ट्राव्हायोलेट किरण नष्ट करतो. पण दुपारच्या वेळी सुर्यकिरणे सरळरेषेमध्ये पृथ्वीवर आल्यामुळे त्यात अल्ट्राव्हायोलेट किरण जास्त प्रमाणात असतात. या उलट सूर्याची कोवळी किरणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात. असो !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे !!!

अल्ट्रावायोलेट किरणामुळे केवढ गंभीर प्रकरण उदभवल !!!

मायबोली प्रशासनाने डॉक्टरांच्या सर्व लेखाची लेखमाला बनवावी

सर्व लेखांप्रमाणेच यातूनही अदभूत माहिती मिळाली. धन्यवाद तुम्ही ही सगळी माहिती /केस इथे शेअर करता याबद्दल.

@जाई <<<अल्ट्रावायोलेट किरणामुळे केवढ गंभीर प्रकरण उदभवल !!!>>>श्री भटांना झालेला त्रास हा quinine या औषधामुळे झाला होता. अल्ट्राव्हायोलेट किरण वापरून फक्त त्या पाण्यात quinine आहे हे दाखवले होते. गोष्टी नंतरची पुरवणी मध्ये दिलेली अल्ट्राव्हायोलेट किरणांची माहिती ही आपल्या सर्वसामान्य ज्ञानासाठी आहे.

फार मस्त लिहिता तुम्ही! डॉ.सुळेंसारखे अचूक निदान करणारे डॉक्टर मिळणे हे त्या पेशंट चे भाग्य! नाहीतर आधी भरमसाठ डायग्नोस्टिक टेस्ट करून घ्यायच्या, मग ही नाही तर ती अशी ट्रीटमेन्ट 'ट्राय' करणे हे सर्रास बघायला मिळते.

मै,
ट्रीटमेंट ट्राय करणे याला 'थेरप्युटिक ट्रायल' असे म्हणतात. लेखात सुरुवातीस दिलेले स्टिरॉईड्स थेरप्युटिक ट्रायल याच सदरात येतात Happy
भरमसाठ टेस्ट न केल्याने एकादा रेअर आजार नजरेतून सुटलाच, तर अँब्युलन्स चेसिंग लॉयर्स वा रुग्णांचे हुशार नातेवाईक व 'कंझ्युमर प्रोटेक्शन कोर्ट' आमचा गळा धरायला आतुर असतात. प्लीज नोट Happy

अँब्युलन्स चेसिंग लॉयर्स वा रुग्णांचे हुशार नातेवाईक व 'कंझ्युमर प्रोटेक्शन कोर्ट' आमचा गळा धरायला आतुर असतात >>>> हो अगदी बरोबर. त्यामुळेच असं वाटतं की बर्‍याचदा डॉक्टर्स त्यांचं जजमेन्ट न वापरता (वापरण्याची रिस्क न घेता) वेब एमडी टाइप निदाने करतात ते वाईट वाटते. स्केअरी वाटते अ‍ॅक्चुअली. इथे काही काही केसेस मधे तर डॉक्टर्स नी आम्हलाच विचारलेय व्हॉट डु यू वॉन्ट टू डू ? हे ट्राय करायल आवडेल की ते ?? म्हटल्यावर टेन्शन च येतं?!! म्हणजे काय , तुम्ही डॉकटर आहात तुम्ही सांगा ना काय करू असं विचारावं वाटतं!! त्यामुळे काश ... डॉक्टर्स ठाम सांगत असते अन त्यावर डोळे झाकून आपल्याला विश्वास ठेवता येत असता तर !! अशी काहीतरी हळहळ वाटते!
बहुतेक हे एक दुष्टचक्रच आहे, यावर उपाय काय - माहित नाही!

हाही लेख आवडला.
डॉ. हाऊसची आठवण झाली.

पण वकीलसाहेब अनेक वर्षं टॉनिक वॉटर व्हिस्कीत मिसळून घेत होते ना? मग हा प्रॉब्लेम अचानक का उद्भवला?

@इब्लीस <<<<एक करेक्शन. नवीन Long form ITP = Immune Thrombocytopenic Purpura असे आहे.
अवांतर : Idiopathic condition is idiotic from doctor's view but is pathetic from patient's view. Happy
प्रतिसादाबद्दल आभार, डॉक्टर !

भरमसाठ टेस्ट न केल्याने एकादा रेअर आजार नजरेतून सुटलाच, तर अँब्युलन्स चेसिंग लॉयर्स वा रुग्णांचे हुशार नातेवाईक व 'कंझ्युमर प्रोटेक्शन कोर्ट' आमचा गळा धरायला आतुर असतात.>>>>१००% अनुमोदन !

हा पण लेख आवडला. अचूक निदान करणारे डॉक्टर मिळणं खरंच भाग्याची गोष्ट आहे. मला स्वतःला या बाबतीत इथे अतिशय वाईट अनुभव आलेला आहे २ डॉक्टरांचा Sad

इथे काही काही केसेस मधे तर डॉक्टर्स नी आम्हलाच विचारलेय व्हॉट डु यू वॉन्ट टू डू ? हे ट्राय करायल आवडेल की ते ?? >>> +१

कन्सेंट फॉर्म भरून घेण्याआधी दिलेल्या दोन ऑप्शन्सपैकी एक ट्रीटमेंट निवडायला लावतात तेव्हा भयंकर चिडचिड होते. ती ट्रीटमेंट पूर्ण होउन काही साइड इफेक्ट न दिसेपर्यंत जिवाला घोर असतो ते वेगळंच.

नवीन Long form ITP = Immune Thrombocytopenic Purpura असे आहे.
<<
माहितीबद्दल धन्यवाद, सर.
Its quite difficult keeping current in All branches of medicine. One should keep trying, in whatever way possible. Happy

अवांतर : ससूनच्या त्या व्हीआयपी वॉर्डाचा नंबर विसरलो. थर्ड फ्लोअरवरचा पाठीमागचा वॉर्ड. बरोबर ना? बॉसने ऑपरेट केलेल्या व्हीआयपीज चे ड्रेसिंग करायला जावे लागे तिथपर्यंत. जिवावर यायची, पण प्रायव्हेट पेशंटशी थोडे वेगळे वागावे/बोलावे लागते, ते कसे, याची थोडी कल्पना येत असे.

स्वाती : पण वकीलसाहेब अनेक वर्षं टॉनिक वॉटर व्हिस्कीत मिसळून घेत होते ना? मग हा प्रॉब्लेम अचानक का उद्भवला?>>>>छान प्रश्न ! एखाद्या औषधाची ॲलर्जी केंव्हाही उद्भवू शकते. ती antibody च्या रक्तातील पातळीवर अवलंबून असते. एकदा antibodies तयार झाल्यानंतर त्या जरी कमी झाल्या तरी त्या तयार करणाऱ्या मेमरी 'B lymphocytes' या पेशी अनेक वर्षे राहतात आणि ड्रग आल्यास लगेचच antibody तयार करतात. आपण दैनंदिन वापरात असलेल्या vaccine चे हेच शास्त्रीय कारण आहे. फरक एव्हडाच की ॲलर्जी फक्त काही लोकांनाच होते तर vaccination चा प्रतिसाद जवळजवळ सर्वांनाच होतो. धन्यवाद !

ससूनच्या त्या व्हीआयपी वॉर्डाचा नंबर विसरलो. >>>वॉर्ड नंबर सोळा ! तिसरा मजला, शेवटचा कोपरा !

स्कॉच (ब्लेंडेड या सिंगल माल्ट) मे मिलावट करना ये उसकी तौहिन है... Happy

डॉक्टरसाहेब, नेहेमीप्रमाणे उत्कृष्ट लेख!

स्कॉच (ब्लेंडेड या सिंगल माल्ट) मे मिलावट करना ये उसकी तौहिन है... >>>>
Please read this quotation :
My Grandmother is over eighty and still doesn't need glasses. Drinks right out of the bottle: Henny Youngman Happy
Love thy 'Black Label' !!!

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख. क्विनाईन अगदी सर्रास घेतले जाणारे औषध आहे ना ? असा काही त्रास झाल्याशिवाय अ‍ॅलर्जी लक्षातच येणार नाही का ?

इतकं तात्काळ आणि परफेक्ट निदान , हॅट्स ऑफ टु डॉ. सुळे अँड यु.
डॉक्टर तुमच्या पोतडीत अमुल्य खजिना भरलाय , खुप खुप धन्यवाद इथे शेअर करण्याठी.

तुम्ही भारी लिहिता डॉक्टर.. कृपया पुस्तकाचे मनावर घ्याच..

मी मागे एकदा एका डॉक्टरांकडून विचित्र रक्तगटांबद्दल ऐकले होते. A, AB, B, O आणि RH +/- ह्या व्यतिरिक्त काही दुर्मिळ रक्तगट असतात. त्यांच्याकडून बॉम्बे निगेटिव्ह असा रक्तगट ऐकला होता. आणि तो रक्तगट असलेल्या एका माणसाच्या शस्त्रक्रियेसाठी कशी तयारी करायला लागली होती वगैरे (म्हणजे त्याचेच रक्त काही महिने आधी काढून तयार ठेवणे वगैरे). अश्या काही केसबद्दल माहिती असल्यास लिहाल का?

Pages