लिहिताना र्‍हस्व-दीर्घचे नियम

Submitted by हर्ट on 20 February, 2014 - 23:34

माझे लेखी मराठी बर्‍यापैकी चांगले आहे अशा प्रतिक्रिया सतत मिळत असतात पण सोबत एक सल्लाही दिला जातो की माझ्या लिखाणात व्याकरणाच्या खास करुन र्‍हस्व दीर्घच्या खूप खूप चुका असतात. मी विदर्भात वाढलेला आहे. आमच्या भागात पाण्याला पानी आणि आणिला आनि म्हणणारेच अधिक भेटतील. बालपणापासून अशा वातावरणात माझी वाढ झाली आणि शाळेत शिकताना कधी बाईंनी वा गुरुजींनी र्‍हस्व दीर्घचे दोन धडे शिकवले नाहीत. त्यामुळे लिहिताना होते असे की मला कळत नाही की अमुक शब्दात कुठले अक्षर र्‍हस्व आणि कुठले दीर्घ आहे.

मला कुणी मार्गदर्शन वा शिकवू शकेल का? धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयेकर,
धन्यवाद!
बी,
वाचत रहा. डोळ्यांवर शब्दप्रतिमा येणे आवश्यक असते. उच्चार,हे प्रयत्नपूर्वक सुधरावे.काहीवेळा चुका होतील पण
नंतर निघूनही जातील.

मराठीसाठी (देवनागरी वापरणार्‍या सगळ्याच भाषांसाठी) जसे लिहिले आहे तसे उच्चार करणे (र्‍हस्व , दीर्घाचे काटेकोर; , म्हणजे दीर्घ हे 'दिर्घ' असे न वाचता 'दीssर्घ' असे वाचणे आणि जसे उच्चार करतो तसे लिहिणे या दोन सवयी लावून घेणे पुरेसे ठरावे. (जे वाचतो ते मात्र नियमाला धरून लिहिलेले असायला हवे.)
बोली भाषा आणि प्रमाण भाषेतले भेद लक्षात घ्यायला हवेत. (आजकाल, आमच्यात असेच बोलतात, लिहितात असे ठोकल्या ( Wink ) जाते.
मी आता कर्तरी प्रयोगातही ल्याSन्त शब्दच वापरायचा प्रयत्न करून पाहणार आहे.

तुमच्यासारखाच माझाही अनुभव आहे.आम्ही बेळगाव म्हणजे बॉर्डरवर कानडी हेल असलेले उच्चार. पुण्यात राहून बोली भाषा बदलली पण शुद्धलेखनाची रड राहीलिच.पुण्यातील शाळेत शिकणार्‍या ४/५वी पर्यंत शिक्षण झालेल्यांचेही शुद्धलेखन चांगले असते अस मला आढळल.

लिहिताना हे बरोबर आहे.
शोभनाताई,
तुम्ही बेळगावच्या म्हणून तरी ठोस कारण आहे.इथे मुंबईत 'हे भेटलं ,ते भेटलं (मिळाले) असं ऐकलं तरी वैताग येतो.अ‍ॅक्सेंट तर आणखी वेगळीच बाब!

शोभनाताई.....

शुद्धलेखनाच्या रडीबाबत राज्यशासनाचे पाठ्यपुस्तक मंडळही तितकेच जबाबदार आहे. अगदी प्राथमिक पातळीपासूनची क्रमिक पुस्तके पाहिली तरी त्यावर संस्करण करणारे वा मुद्रणदोष शोधणार्‍यांनी किती कष्ट घेतले असतील वा घेतले नसेल याची प्रचिती येतेच. उदा. "महत्त्व" शब्द वापरात इतका प्रचलित असूनही आजही कित्येक ठिकाणी छपाई स्वरुपात तो येताना त्यातील 'त' चे द्वित्व नाही असे दिसून येते. "उज्ज्वला" नावाचे मी स्वतः "उज्वला" असे रुप पाहिले आहे. अशा गोष्टी - ते बरोबर आहेत या अर्थी - सहजी खपून जातात आणि शिक्षकांनाही त्यात काही गम्य नसते. प्रकाशकही असे शब्द वापरून वापरुन रुढ झाले की मग त्याच्या मूळ स्वरुपाविषयी कधीच जागरुक राहताना दिसत नाहीत. व्यावसायिक व सार्वजनिक क्षेत्रांत, त्यातही कार्पोरेट वर्ल्ड, सर्वत्र आता परवलीचा एकच शब्द ऐकू येतो....तो म्हणजे संवादकौशल्य...आणि लिहिण्यामधील अचूकता. ही दोन्ही महत्त्वाची भाषिक कौशल्ये आहेत. याच्या साहाय्याने जग जिंकू असा विश्वास छात्रात पैदा करावा लागतो. पण या दोन्ही भाषिक कौशल्यांचा विचार महाविद्यायलीन पातळीवरील अभ्यासात झालेला नाही... "धडे शिकविणे" = शुद्धलेखनाला प्रथम प्राधान्य देणे हे कुठेच मानले जात नाही असेच चित्र दिसते....ते तुमच्यासारख्या विद्यापीठीय पातळीवरील प्रोफेसर व्यक्तीला जास्त माहीत असेल.

तुम्ही बेळगावच्या म्हणून तरी ठोस कारण आहे.इथे मुंबईत 'हे भेटलं ,ते भेटलं (मिळाले) असं ऐकलं तरी वैताग येतो.अ‍ॅक्सेंट तर आणखी वेगळीच बाब!>> जर मराठी टिकवायची असेल तर ती ज्या वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते तशीच स्विकारली पाहिजे. सगळ्यांनी पुणे / मुंबई स्टाईल ची मराठी बोलली पाहिजे हे चुकीचे आहे. माझ पण गल्ली चुकल वाटत. Happy

>>>> उदा. "महत्त्व" शब्द वापरात इतका प्रचलित असूनही आजही कित्येक ठिकाणी छपाई स्वरुपात तो येताना त्यातील 'त' चे द्वित्व नाही असे दिसून येते. "उज्ज्वला" नावाचे मी स्वतः "उज्वला" असे रुप पाहिले आहे. <<<<
अरेच्च्या? महत्व..... एकेरीच लिहीतोय हो मी इतके दिवस Sad डबल त घ्यायला हवा का? महत्त्व असा? शब्दाची फोड काये?
अन उज्वला तर अस्सेच लिहीतो आम्ही....... उज्ज्वल..... अरे हो की अर्थाकडून बघत गेले की पटतय, पण फोड करता येत नाहीये.
जरा सान्गा पाहू समजावुन. Happy (अगदीच "ढ" विद्यार्थी बसले आहेत समोर असे समजा..... )

बोली भाषा जपणं, बोलणं हे हवंच. आणि त्या एक फार मोठया सांस्कृतिक ठेव्याचा भाग आहेत. पण म्हणून प्रमाण भाषा येऊ नये, अभ्यासू नये, त्याचा आग्रह (दुराग्रह नव्हे!) होऊ नये, असं का? महाराष्ट्रातील सर्वच भागांमधील मराठी जनांना एकत्र संवाद साधायचा तर एक "कॉमन" "बोली"च ना ती? बरेचदा मायबोलीवर प्रमाणभाषेला 'मुंबई/पुण्याची' भाषा म्हटले जाते, ते कदाचित हिणवण्यासाठी आहे की काय असंही कधी कधी वाटतं. असो.

बरेच जण नामास्/सर्वनामास विभक्तीचे प्रत्यय (?) लावतांना "आ" लावत नाहीत. आणि ते फार खटकतं मला तरी.
उदा. दहीचं भांडं (दह्याचं च्या ऐवजी), गणितचं पुस्तक ई.
याचप्रमाणे, धाग्याचे शीर्षकही "र्‍ह्स्व-दीर्घाचे नियम" असं हवं, नाही का??

एल.टी.....

"द्वित्व" उपयोग त्या शब्दामध्ये जोर येण्यासाठी केला जातो. अर्थात हे तुम्ही 'महत्व' आणि 'महत्त्व' किंवा 'उज्वल' आणि 'उज्ज्वल' मोठ्याने उच्चारून पाहिले की तुम्हालाच त्यातील गुणांचा फरक समजू शकेल. "मला काहीतरी सांगायचे आहे...." हे वाक्य तसे निरुपद्रवी आहे, पण यात 'महत्त्वाचे' परिणामाची शीर "सांगायचे" पूर्वी देऊन बघा...मग त्या ऐकणार्‍यावर होणारा परिणाम टिपता येतो. याच वाक्यात "महत्त्वाचे" ऐवजी 'महत्वाचे' म्हटले तर कदाचित परिणाम तोच होऊ शकेल....पण 'महत्वाचे' मध्ये आग्रह दिसून येत नाही..."महत्त्वाचे" मध्ये स्पष्ट दिसतो. 'उज्वल' सौम्य आहे तर "उज्ज्वला' नाम आपली भावना प्रकट करते.

आणखीन् एक : विद्यार्थी तल्लख किंवा ढ असा फरक कुणी शंका निरसन कराणारा करत नाही....त्याला विचारले आणि त्याने खुलासा केला, इतपतच पुरेसे असते.

मला अजून आणि अजुन असे उच्चारताना जू आणि जु चा उच्चार अगदी सारखाच वाटतो. शास्त्रिय संगीत गाताना जसे आपण स्वर लांबवतो तसे बोलताना करता येत नाही. त्यामुळे मी जू चा उच्चार करताना उ उ उ उ उ असे बोलणार नाही. त्यामुळे, माझा नेमका प्रश्न निर्माण होतो. मला सगळे काही र्‍हस्व वाटते. दीर्घ वाटतच नाही!!!!

अजून एक उदाहरण देतो. तुम्ही 'गणित' असे म्हणता ना तेंव्हा 'णि' चा उच्चार ऐकायला दीर्घ वाटतो. गणीत असा उच्चार केला सारखे वाटते. नाही म्हणताना 'ही' चा उच्चार 'हि' केला आहे की 'ही' केला आहे कानाला कळत नाही माझ्या Sad

<पाण्याला पानी आणि आणिला आनि म्हणणारेच अधिक भेटतील> मला हे अजिबात खटकणार नाही; खटकत नाही. पण मायबोलीवर तूम्हाला, वैगरे हे आणि असलेच काय काय वाचायला मिळते ते डोक्यात जाते.

अनेकजण सहस्र(स्+र)बुद्धे हे सहस्त्र(स्+त्+र)बुद्धे असे लिहितात आणि उच्चारतात.

बी, लोक कसे बोलतात ते ऐकून लिहायला मी सुचवत नाही. नियमानुसार लिहिलेले नीट उच्चार करून वाचायची सवय लावायची. त्या उच्चारांची सवय लागली की त्याप्रमाणेच लिहिणे कठीण नाही.
( तरीही लोक तूम्हाला असे टाइप करतीलच. तु टाइप करण्यापेक्षा तू टाइप करताना एक कळ अधिक दाबावी लागते तरीही असे कसे होते हे कोडे मला पडले आहे.)

गजानन, (जोडाक्षराआधीचे इकार - उकार र्‍हस्व असतात या) नियमाप्रमाणे दिर्घ असायला हवे. दीर्घ हाच नियमाला अपवाद. त्यामुळे त्याचे सामान्यरूप दीर्घा असेच राहणार.

>> दीर्घ हाच नियमाला अपवाद.
गजाभाऊ, 'सूर्य' असाच चालवतो ना आपण? (म्हणजे शब्द. :P)
पूर्व, तीव्र हेही प्रत्यय लागले तरी दीर्घच राहतात.

स्वाती, हो हो. आणि खरेतर दीर्घातली 'दी' ही उपांत्य नाहीच. अर्धा र उपांत्य आहे. त्यामुळे दीर्घाचा अपवाद नसता तरीही दी वर काही बदल अपेक्षीत नाही. हेच तू दिलेल्या इतर उदाहरणांतही.

बरोबर. Happy

काही सोप्या क्लुप्त्या ज्या मी माझ्या पुरत्या वापरते.

अ, उ, इ, ए, ओ ही अक्षरे -हस्व तर आ, ई, ऊ, ऐ, औ ही अक्षरे दीर्घ . हे लक्षात ठेवले की खालचे काही नियम बहुतांशी उपयोगी पडतात. अर्थात हा अतिशय ढोबळ मार्ग आहे. कारण तत्सम ( संस्कृत मधून आलेले ) आणि तत्भव ( मराठी भाषेतील ); दोन शब्दांच समास, प्रत्यय, यात पुन्हा नियम बदलतात. पण निदान ८० % शुद्धलेखन तरी सुधारू शकेल असे हे नियम. ( चूक भूक द्यावी-घ्यावी )

१. ९९ % शेवटचे ई/ ऊ दीर्घ असते. नेहमीचे अपवाद : आणि, नि, परंतु

२. जर शेवटचे ई/ऊ असेल तर ८० % उपान्त ( मागून दुसरे) इ/ उ हे -हस्व असते ... उदा. माहिती यातील ती दीर्घ म्हणून हि -ह्स्व

३. याच पद्धतीने उलटे मागे येत जावे. म्हणजे शेवटचे अक्षर दीर्घ, त्या आधीचे -हस्व, त्या आधीचे पुन्हा -ह्स्व, ... उपजिवीका

४. पहिल्या अक्षराचे इ/उ सहसा -हस्व : पिवळा

५. काही प्रत्यय लक्षातच ठेवावे.
उदा. ईय प्रत्यक दीर्घच लिहायचा : भारतीय;
इक प्रत्यय -हस्वच लिहायचा : सामाजिक

६ जोडाक्षर असेल तर त्याचे इ/उ -हस्व लिहायचे. तसेच त्याच्या आजुबाजूचे पण -हस्व लिहायचे ( अपवाद शेवटचे अक्षर ) परिस्थिती, स्वाभिमान

(अजून आठवेल तसे लिहिते )

जरा अवान्तर

मी तिच्या मिठीत विसावलो होतो. मग वाटले की तिचे
मराठीचे व्याकरण तपासावे.
म्हणून मी विचारले..... मिठीतला 'मि' पहिला की दूसरा?
.
.
ती म्हणाली - सातवा

अवल, तुम्ही शुद्धलेखनाचे नियमच सोप्या शब्दांत लिहिले आहेत.
नियमाला अपवाद असणारे बहुतेक तत्सम शब्द आहेत.
उदा: नियम दोन : अपवाद : प्रीती, कीर्ती, नीती. भीती(हा तत्सम शब्द आहे का माहीत नाही)

असाच सोपा नियम : शअकारान्त शब्दाचे उपान्त्य उकार, इकार दीर्घ असतात. : गरीब , सून, फूल.
यालाही काही अपवाद आहेत.

आणखी एक नियम : जोडाक्षराआधीचे(विस्तव, भिस्त) तसेच अनुस्वार(सुंठ) असलेले अक्षर र्‍हस्व असते. यालाही बरेच अपवाद आहेत. वर सूर्य, दीर्घ, पूर्व, तीव्र हे शब्द आलेच आहेत.

Pages