तिसरी घंटा (नियम) - मराठी भाषा दिवस २०१४

Submitted by संयोजक on 12 February, 2014 - 05:20

नाटक म्हणजे मराठी संस्कृतीचं एक देदीप्यमान दालन! उज्ज्वल परंपरा लाभलेली मराठी रंगभूमी अनेक वर्षांपासून मराठी मनाला भुरळ घालत आली आहे. ऐतिहासिक, सामाजिक, अनुवादित, प्रायोगिक, बालनाट्य अशा अनेक प्रकारच्या नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध आहे. या अथांग सागरातून काही मोती वेचून आपण पुढच्या पिढीची ओंजळ त्या मोत्यांनी भरून देऊया.

मराठी भाषा दिवस २०१४च्या निमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत 'तिसरी घंटा'!

नियम :

१. केवळ मायबोलीकर आणि त्यांचे पाल्य (आणि या पाल्यांची मित्रमंडळी) यांना या श्राव्य कार्यक्रमात एकत्र भाग घेता येईल.

२. या उपक्रमासाठी प्रवेशिका पाठवताना मायबोलीचा आयडी आवश्यक आहे.

३. या उपक्रमांतर्गत मराठी नाटकातील एखादा प्रसंग, त्यातील संवाद दोन किंवा अधिक जणांनी बोलून तो जिवंत करायचा आहे आणि त्या संवादांचं ध्वनिमुद्रण आम्हांला पाठवायचं आहे.

४. या उपक्रमासाठी निवडलेले नाटक व उतारा यांची माहिती संयोजकांना दिनांक २० फेब्रुवारी, २०१४पर्यंत कृपया द्यावी.

५. ध्वनिमुद्रित केलेले संवाद संयोजकांकडे सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०१४पर्यंत पोहोचले पाहिजेत.

६. ध्वनिमुद्रणाच्या कालावधीसाठी किमान मर्यादा नाही, पण कमाल मर्यादा ५ मिनिटे आहे. या मर्यादेपेक्षा थोड्या जास्त कालावधीचे ध्वनिमुद्रण पाठवण्यास हरकत नाही.

७. ध्वनिमुद्रण पाठवताना सोबत नाटकाचे नाव, नाटककाराचे नाव, स्वतःचा मायबोली आयडी, भाग घेणार्‍या पाल्यांची नावे आणि वय व ध्वनिमुद्रणाचा कालावधी हे तपशील नमूद करावेत.

८. प्रवेशिका मराठी भाषा दिवस २०१४च्या तीन दिवसांच्या सत्रात संयोजकांतर्फे प्रकाशित केल्या जातील.

९. एक आयडी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवू शकतो.

प्रवेशिका कशी पाठवाल?

१. प्रवेशिका संयोजकांना sanyojak@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करणे अपेक्षित आहे.

२. ई-मेल पाठवताना 'तिसरी घंटा' असा विषय लिहावा.

विशेष सूचना :

ध्वनिमुद्रण पाठवताना प्रताधिकारांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी नाटकाच्या सादरीकरणाचे हक्क ज्यांच्याकडे आहेत, त्या व्यक्तीची (नाटककार किंवा प्रकाशक किंवा नाट्यसंस्था) आणि ते नाटक छापील स्वरूपात उपलब्ध असल्यास प्रकाशकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.

मायबोलीकरांच्यी सोयीसाठी मायबोली प्रशासनाने काही नाटकांच्या (किंवा नाटकाप्रमाणे सादरीकरण होऊ शकेल, अशा लेखनाच्या) सादरीकरणाची परवानगी अगोदरच घेऊन ठेवली आहे.

हे नाटककार व त्यांची नाटके पुढीलप्रमाणे -

१. श्री. कुसुमाग्रज - प्रेम आणि मांजर, वीज म्हणाली धरतीला

२. श्री. रत्नाकर मतकरी - निम्मा शिम्मा राक्षस, अलबत्या गलबत्या

३. श्री. दिलीप प्रभावळकर - बोक्या सातबंडे (दहा भाग)

("'बोक्या सातबंडे'चा जन्म मुळात रेडिओसाठी झाला. त्यानंतर पुस्तकं आली, टीव्हीसाठी मालिका तयार केली,
मग चित्रपट आणि आता पुन्हा जगभरातली मुलं एकत्र येऊन ध्वनिमुद्रण करत आहेत. एका अर्थी चक्र पूर्ण झालं, याचा मला आनंद आहे. 'बोक्या'चं ध्वनिमुद्रण करताना पालकांनी आपला सहभाग कमीत कमी ठेवला आणि मुलांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी एकत्र येऊन जास्तीत जास्त पात्रं उभी केली, तर मला जास्त आनंद होईल", असं परवानगी देताना श्री. प्रभावळकर म्हणाले.)

४. श्री. पु. ल देशपांडे यांच्या नाटकांच्या, एकपात्री प्रयोगांच्या सादरीकरणासाठी परवानगीची आवश्यकता नाही.

पुलंच्या नाटकांची यादी -

एकपात्री प्रयोग - बटाट्याची चाळ

नाटक - तुका म्हणे आता
अंमलदार (मूळ लेखक - निकोलाय गोगोल)
भाग्यवान
तुझे आहे तुजपाशी
सुंदर मी होणार
तीन पैशाचा तमाशा (मूळ लेखक -बेर्टोल्ट ब्रेश्ट्)
राजा ओयदिपौस (मूळ लेखक -सोफोक्लीझ)
ती फुलराणी (मूळ लेखक - जॉर्ज
बर्नार्ड शॉ)
एक झुंज वाऱ्याशी
वटवट

एकांकिकासंग्रह -
मोठे मासे आणि छोटे मासे
विठ्ठल तो आला आला
आम्ही लटिके ना बोलू

लोकनाट्य -
पुढारी पाहिजे
वाऱ्यावरची वरात

या यादीतील कोणतेही नाटक निवडून तुम्ही त्यातील निवडक भागाचे ध्वनिमुद्रण करू शकता.

मात्र ध्वनिमुद्रण करताना नाटकात कोणताही बदल करण्याची परवानगी लेखकांनी आणि प्रताधिकारधारकांनी दिलेली नाही. त्यामुळे नाटकातील संवादांमध्ये काटछाट, उतारे पुढेमागे करणे, प्रसंगांचा क्रम किंवा शब्द बदलणे अशा कुठल्याही संपादनास परवानगी नाही.

तसंच, या ध्वनिमुद्रणांसाठी असलेली परवानगी ही 'मराठी भाषा दिवस २०१४' व मायबोली.कॉम यांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे ही ध्वनिमुद्रणं इतरत्र प्रकाशित करण्यास परवानगी नाही.

या यादीतील नाटकांव्यतिरिक्त इतर नाटकातील संवाद सादर करायचे असतील, तर कृपया तशी लेखी परवानगी घेऊन संयोजकांना पाठवावी. परवानगी मिळवण्यासाठी मायबोली प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. त्यासाठी कृपया १७ फेब्रुवारीपर्यंत संयोजकांना कळवावे.

प्रताधिकारधारकाची परवानगी नसलेली ध्वनिमुद्रणं स्वीकारली जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

आम्ही वाट पाहतोय हं तुमच्या संवादांची!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे हा उपक्रम... Happy

(ध्वनिमुद्रणाला कमाल मर्यादाही हवी असं वाटलं... अर्थात कुणी तास-दीड तासाचं ध्वनिमुद्रण पाठवेल ही शक्यता तशी कमीच आहे, म्हणा.)

@ संयोजक - काही शंका आहेत.
१) बोक्या सातबंडे (दहा भाग) >>> म्हणजे १ ते १० भागापैकी कोणताही भाग का फक्त भाग क्रमांक १०?

२) "बोक्या सातबंडे" गोष्टीरुपात संवाद आहेत. म्हणजे त्यात नाटकासारखे फक्त संवाद नाहीत.
उदा: "संदीप जोरात ओरडला" किंवा "आजी एका वाटीतुन आमसुलाचं पाणी घेऊन आली" अशी काही वाक्य संवादांपुढे आहेत. अश्या वाक्यांसकट संवाद म्हणणं अपेक्षित आहे ना?
कारण मात्र ध्वनिमुद्रण करताना नाटकात कोणताही बदल करण्याची परवानगी लेखकांनी आणि प्रताधिकारधारकांनी दिलेली नाही. त्यामुळे नाटकातील संवादांमध्ये काटछाट, उतारे पुढेमागे करणे, प्रसंगांचा क्रम किंवा शब्द बदलणे अशा कुठल्याही संपादनास परवानगी नाही.
ह्या नियमाप्रमाणे "बोक्या सातबंडे"ची निवड केल्यास त्यात फक्त संवाद नसणार. गोष्टीरुपात ध्वनीमुद्रण होईल. तसं चालेल ना?

संयोजक,
<या उपक्रमासाठी निवडलेले नाटक व उतारा यांची माहिती संयोजकांना दिनांक २० फेब्रुवारी, २०१४पर्यंत कृपया द्यावी<>
यात कृपाया मुदत वाढ द्यावी.

मंजिरी,

१. सर्व दहा भाग. म्हणजे १ ते १०.

२. "संदीप जोरात ओरडला" किंवा "आजी एका वाटीतुन आमसुलाचं पाणी घेऊन आली" ही वाक्य वाचली तरी चालतील. मात्र त्यासाठी दुसरा आवाज वापरला तर अधिक योग्य वाटेल.

Pages