घनतमी शुक्र बघ राज्य करी...

Submitted by अतुल ठाकुर on 14 February, 2014 - 02:01

"अरे तुझ्यासारख्या विद्यार्थ्याचा हा विषय नाही" हे वाक्य प्रोफेसर महाशय इंग्रजीत म्हणाले आणि निराश व्हायला तयार असलेला मी त्यांच्या केबीनमधुन बाहेर पडलो. पीएचडीसाठी गाईड मिळणं दुरापस्त झालं होतं. बाकी सर्वांना गाईड मिळाले होते. माझ्या बाबतीत माझी अवस्था मीच अवघड करुन ठेवली होती. मला ज्या विषयात संशोधन करायचं होतं तो विषय बदलण्याची तर सोडाच पण त्यात कसलीच तडजोड करण्याची इच्छा नव्हती. इथे तर गाईडच आपल्या आवडीची विषय सुचवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. आधी एकदा अतिशय नावजलेल्या प्रोफेसरच्या हाताखाली काम करायला मिळावे म्हणुन आवडत्या विषयाला काहीशी मुरड घालण्याचा गाढवपणा हातुन घडला होता. त्यानंतरचे तीन चार महिने अत्यंत वाईट गेले. माझे त्याचे कशावरच जमेना. दोन वर्षे एमए ला असताना मला शिकवलेल्या आणि मला चांगले ओळखत असलेल्या या प्रोफेसरला आता माझ्या इंग्रजीपासुन ते आकलनापर्यंत सर्वच गोष्टीत दोष दिसु लागले होते. आता सुदैवानेच म्हटलं पाहिजे पण ते प्रोफेसर जे एन यु ला निघुन गेले आणि आम्ही पुन्हा उघड्यावर पडलो. मात्र आतापावेतो गांधींच्या भाषेत सांगायचं झालं तर मी जागृत झालो होतो. प्रोफेसर्सच्या सल्ल्यांना मी बधणार नव्हतो. "फर्स्ट यु जॉईन द (पीएचडी) ग्रुप, नंतर तुला हव्या त्या विषयात पुढे संशोधन करता येईल" हा एक प्रोफेसरचा प्रेमळ सल्ला होता. एका जेष्ठ स्नेह्याने वाह्यातपणे दिलेला ,"अरे तुला पीएचडी करायचंय? मग जर तुझा गाईड म्हणाला की माझी पँट फाटलीय तर कुठे फाटलीय साहेब? आत्ता शिवुन देतो असं जर तु लगेच सुई दोरा घेऊन म्ह्णालास तरच तुला पीएचडी करता येईल" असा सल्ला ही आठवला. बरोबर एम ए झालेल्या आणि शंकराचार्यांचे अद्वैत आणि सामाजिक परिस्थीती यांची सांगड घालुन संशोधन करण्याची उमेद बाळगुन असलेला विद्यार्थी प्रोफेसरने थोडेसे घाबरवताच मुंबई लोकल ट्रेन आणि कल्चर असा विषय घेऊन मु़काटपणे कामाला लागल्याचे उदाहरणही समोर होते.मला स्वतःला तीन विषयांची खुल्ली ऑफर होती. "डेथ प्रॅक्टीसेस इन मुंबई", "मुंबई टेक्सीमेन", आणि " रेल्वे रुळाभोवती भाज्या उगवणारी कम्युनिटी". या तिन्ही विषयात मला काडीचाही रस नव्हता. मुळातच प्रोफेसर विषय सुचवतो आहे ही परिस्थीतीच मला भयावह वाटत होती.

एम ए ला अ‍ॅडमिशन उशीराने घेतली, सर्वसामान्य वयात परिस्थीतीमुळे शिक्षण घेता आले नव्हते. एक बर्‍यापैकी विद्यार्थी म्हणुन शाळेत माहित होतो. शिक्षण न घेता आल्याचा भयानक न्युनगंड आला होता आणि त्याचा परिणाम शरिर, मन, सार्‍या व्यक्तीमत्वावर झाला होता. पुढे थोडेसे स्थिरस्थावर होताच रेग्युलर एम ए ला अ‍ॅडमिशन घेतली. पण सारे सुरळित व्हायचे नव्हतेच. शिक्षणाला सुरुवात केली आणि वडील आजारी पडु लागले. पुढे पार्ट वनला ऐन परीक्षेच्या दरम्यानच वडीलांचे निधन झाले. एक पेपर देता आला नाही. नंतर द्यावा लागला. त्यानंतर मात्र पार्ट टु ला मी समाजशास्त्र विभागात पहिला आलो. त्यामुळे प्राध्यापकांच्या माझ्याकडुन अपेक्षा वाढल्या होत्या. मास्टर्समध्ये मला समाजशास्त्राच्या मुख्य विषयांची नीट ओळख करुन घ्यायची होती आणि भारतात जात हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा मानला गेला होता. त्यामुळे मी जातीचा अभ्यास सपाट्याने सुरु केला. आंबेडकारांचे लिखाण वाचले. एमए चा माझा प्रोजेक्ट आंबेडकरांच्या धर्मांतरावर होता. या सर्वांचा चमत्कारीक परिणाम हा झाला की काही प्राध्यापक मी पीएचडी ला जात हाच विषय घेणार हे धरुनच चालले होते. आणि मी आरोग्य विषय घेतल्याने त्यांच्यावर चाट पडण्याची वेळ आली. मला योगाचा सामाजिक अंगाने अभ्यास करायचा होता पण माझ्यासमोर स्पष्ट अशी कल्पना नव्हती मात्र तो विषय न मिळाल्यास आरोग्य हा विषय घेण्यास माझी तयारी होती. कुठेतरी आपल्याला पुढे जे काही संशोधन करायचंय त्याच्याशी निगडीत मला सुरुवात करायची होती. मात्र माझे सर्व विषय डावलले गेले आणि मी तडजोड स्विकारण्याचा गाढवपणा केला आणि वर सांगितलेले रामायण घडले. पण आता पुनश्च हरि ओम होता आणि मी सावध होतो. मी विभागाचा आणि तेथील प्राध्यपकांचा थोडासा अभ्यास केला. आणि ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या फारशा उत्साहवर्धक नव्हत्या.

राजकारण आपल्याकडे पाचवीलाच पुजलेले आहे. शैक्षणिक क्षेत्र त्याला अपवाद नाहीच. मात्र समाजशास्त्रात एक दुसरीच मेख होती. विज्ञानाप्रमाणे या शास्त्राचे नियम, थियरी या "युनिव्हर्सल" नव्हत्या. त्यामुळे मार्क्सवादाचे समर्थक जितके होते तितकेच विरोधकही होते. आणि दोन्ही गोष्टी सिद्ध करण्याजोगा पुरावा दोघांकडे होता. हे सर्व थेयरीं बाबत होतं. विज्ञानातील कुठलाही नियम जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन सिद्ध करता येत होता मात्र समाज शास्त्रात विशिष्ठ समाजागणिक नियम बदलत होते. जात पात, रेस, फेमीनिझम, मार्क्सवाद, अ‍ॅन्थ्रोपोलॉजी, पॉझीटीव्हीझम, पोस्टमॉडर्निझम, निओ मार्क्सवाद, स्ट्रकचरल फन्कशनलीझम अशा अनेक क्षेत्रातील थियरीज वेगवेगळ्या होत्या. देशागणिक, समाजागणिक, जाती गणिक बदलत होत्या. त्याचप्रमाणे प्राध्यापकांचेही विशिष्ठ कल होते. दलित विषयाला वाहिलेले प्राध्यापक, मार्क्सवादी प्राध्यापक, उच्चवर्णियांची कड घेणारे प्राध्यापक, फेमिनिस्ट प्राध्यापक असे कितीतरी. त्यातुन विशिष्ठ विषयाला वाहुन घेतलेली माणसे. इन्फॉर्मल सेक्टर, स्कॅव्हेजर्स, गार्बेज, जात पात, दलित विषय, इंडॉलॉजी, धर्म, आदिवासी, शहरे, गाव, विशिष्ठ कम्युनिटीज, सेक्शुअलिटी, होमे, गे चळवळ, संस्कृती...विषयांना अंत नाही. मात्र यात आरोग्याला वाहुन घेतलेला प्रोफेसर मला सापडला नाही. त्यातुन मार्क्सवाद्यांच्या ज्ञानाबद्दलच्या गर्वाचा अनुभव अनेक सेमिनार्समध्ये आला. त्यांची आत्मसंतुष्ट वृत्ती, एका पुस्तकात सार्‍या ज्ञानाचं मुळ साठवलं आहे अशा थाटात बोलणे. दुसर्‍याचा अपमान करत त्याचे बोलणे खोडुन काढणे. मार्क्सचे भाकित किमान भारताच्या बाबतीत चुकले हेही अमान्य करणे, गरज नसताना आंबेडकर आणि मार्क्सवादाची सोयीसाठी मोट बांधणे यासारख्या अनेक गोष्टींमुळे मार्क्सबद्दल जरी अपार आदर असला तरी मार्क्सवाद्यांवद्दल अतिशय तिटकारा वाटु लागला आणि तो आजतागायत कमी झालेला नाही. एका सेमिनारमध्ये माझा पेपर वाचुन झाल्यावर सार्‍यांनी नावाजला पण जे एन यु मधील एका मार्क्सवाद्याने जोरजोरात आरडाओरडा करुन खिल्ली उडवली तेव्हा या मार्क्सवाद्यांवरच्या रागामुळे त्याच्याच भाषेत त्याची सर्वांसमोर त्याच्याच तर्‍हेने ओरडुन खिल्ली उडवुन मी त्याला गप्प बसवले होते. फक्त सामाजिक आणि आर्थिक कारणे सार्‍या सामाजिक घटनांचे मुळ आहे हे सांगणार्‍या आणि माणसाला जवळजवळ परिस्थीतीचे बाहुले बनवणार्‍या मार्क्सवादाला माझ्या संशोधनात जागा नव्हती. आणि समस्येला सुरुवात इथुनच झाली.

जगभरात जरी मार्क्सवाद नाहिसा होत असला तरी शेक्षणिक क्षेत्रात ते चलनी नाणं आहे. मार्क्सवाद मला टाळायचा नव्हता मात्र माझ्या आरोग्यविषयक संशोधनाला त्यात जागा नाही हे सिद्ध करायचं होतं. मार्क्सवादी प्राध्यापक तर मार्क्सवादाविरुद्ध पुरावे दिले की एकदम कुंकु पुसल्यासारखे हळवे होतात. त्यामुळे प्रबंधाला मार्गदर्शक निवडताना असला कडवा मार्क्सवादी प्राध्यापक मला चालणार नव्हता. आणि त्यांचा तर भरणा जास्तीत जास्त होता. त्यातही अनेक अंतर्विरोध घेऊन जगणारी माणसे मी पाहिली होती. ख्रिश्चन धर्मगुरु असुनही मार्क्सवादी असलेला प्राध्यापक मला माहित होता, एका पीएचडी करणार्‍या बाईने तर येशु हा मला मार्क्सवादीच वाटतो म्हणुन गार केले होते. माझ्या संशोधनाचा माझ्या आयुष्यातील निगडीत काही महत्त्वाच्या प्रश्नांशी संबंध होता. त्याची उत्तरे प्रबंध पूर्ण झाल्यावर मिळतील वा न मिळतील मात्र मी ठरवलेली मुल्ये पुर्वेला आणि माझ्या संशोधनाची दिशा पश्चिमेला असा प्रकार मला होउ द्यायचा नव्हता. त्यामुळे मी सावधपणे माझ्याबद्दल सहानुभुती असलेल्या एका प्राध्यापकांना गाठले. त्यांचे विषय अर्थातच वेगळे होते. मला फक्त त्यांच्याकडुन तांत्रिक मार्गदर्शन हवे होते. बाकी काही गोष्टींसाठी इतर तज्ञ प्राध्यापकांची मदत घेण्यास त्यांची हरकत नव्हती. यांच्या स्वतःच्या ओळखि प्रचंड होत्या. त्याचा वापर करु देण्यास ते तयार होते. मुळात म्हणजे त्यांचा विषय सोडला तर इतर बाबतीत फारसा कडवेपणा त्यांच्याकडे नव्हता. अर्थातच त्यांनी देखिल आपले विषय सुचवण्याचा प्रयत्न केलाच पण मी चेहरा कोरडा ठणठणीत ठेवला आणि माझ्याच विषयाला चिकटुन राहिलो. शेवटी प्रत्येक प्राध्यापकाला सर्व विषयाचे ज्ञान नसतेच. थियरी संबंधी नीट मार्गदर्शन मला हवे होते ते मला यांच्याकडुन मिळणार होते. त्यामुळे या प्राध्यापकांनी मला विद्यार्थी म्हणुन घेण्याचे मान्य केले आणि गंगेत घोडे न्हाले.

आजवरच्या आयुष्यात एका चमत्कारीक परिस्थीतीला तोंड देत आलो होतो. वातावरण सतत नकारात्मक राहिले होते. सामाजिक संबंधांचा, नातेसंबंधांचा शरिरावर आणि मनावर होणारा परिणाम अगदी जवळुन पाहिला होता. त्यापायी माणसांची आयुष्य वाया गेलेली पाहिली होती. नवरा गेल्यावर धार्मिक विधी करता येणार नाही म्हणुन हाय खाल्लेल्या बायका माहित होत्या. आता आपण सवाष्ण उरलो नाही याचे सततचे दु:ख उरी बाळगणार्‍या त्या माऊली. आयुष्यभर ज्या भाच्याचा प्रतिपाळ केला त्याने वृद्धपकाळात वृद्धाश्रमात टाकल्यावर त्या धक्क्याने मृत्यु झालेल्या बाई तर माझ्या ओळखितल्याच. धोतर कुडता घालुन रुबाबात फिरणारे मात्र पाय मोडल्याने केविलवाणी अवस्था झालेले आणि मुलांची बोलणी ऐकत खंगत गेलेले आजोबा बाजुचेच. उठताही न येणार्‍या वडीलांवर हात उचलुन त्यांना मारणारी मुलगीही माहितीचीच. मंदबुद्धी असणारी पण लोकांची अवहेलना जाणणारी आणि त्यामुळे रॉकेल ओतुन स्वतःला जाळुन घेणारी तरुणीही परिचितच. एक ना दोन अनेक भयानक प्रसंग. हे सारे मला माझ्या प्रबंधांचा भाग बनवायचे होते. पण मला येथेच थांबायचे नव्हते. पुढे जसजसे जग पाहायला लागलो तेव्हा अशा प्रसंगातुनही मार्ग काढुन पुढे जाणारी माणसे दिसु लागली. ही सकारात्मकता मला माझ्या संशोधनात आणायची होती. समाज शास्त्रातल्या चौकटीप्रमाणे फक्त कशामुळे काय घडते ही कारणमिमांसा देऊन मला थांबायचे नव्हते. तर सामाजिक संबंधांचा वाईट परिणाम होतो हे मी पाहिले होतेच. पण एकमेकांना मदत करुन माणसे त्यातुनही बाहेर पडतात आणि आश्चर्यकारक प्रगती करतात हे देखिल मला संशोधनात आणायचे होते. समाजशास्त्रातील दिग्गजांना जर त्यात रस नसेल तर त्याची मला पर्वा नव्हती आणि शास्त्राच्या पारंपरिक चौकटी त्यासाठी मोडाव्या लागल्या तरीही मी तयार होतो. त्यामुळे माझा फोकस मी मुक्तांगणकडे वळवला. तेथे तर रोजच चमत्कार घडत होते. समाजशास्त्राच्या दृष्टीकोनातुन तेथील काही गोष्टींचा अभ्यास करण्याची परवानगी मुक्तांगणकडुन लगेचच मिळाली. आणि एका आनंददायक प्रवासाला सुरुवात झाली. माझ्या गाईडला भीती वाटते की माझे संशोधन बाजुला पडणार आणि मी पूर्णपणे या कामात झोकुन देणार. तसे काही होणार नाही हे मला माहित आहे. पण शास्त्राची राबवणुक माणसासाठी करावी या मताचा मी आहे. त्यामुळे मी फक्त सेमिनारमध्ये बोलणारा संशोधक होणार नाही हे नक्की.

आता मजा आहे. कुठेतरी चौथीत दारु प्यायला सुरुवात केलेले आणि आता एम ए ची परिक्षा देणारे आणि पीचडी करण्याची उमेद बाळगणारे मुक्तांगणचे दत्ता श्रीखंडे दिसतात. बिछान्यावर सिगारेत पडुन तो जळु लागला तरी त्याचे भान नसलेले इतके दारुच्या आहारी गेलेले आणि आता समुपदेशनाचा कोर्स करुन मुक्तांगणमध्ये समुपदेशन करणारे अत्यंत लोकप्रिय असे माधवसर दिसतात. पतीला पार्कीन्सनच्या आजारात नुसती साथ देऊनच न थांबलेल्या आणि आता त्या कार्यात सर्वार्थाने झोकुन दिलेल्या शोभनाताई दिसतात. आता पुर्वीसारखं वातावरण नकारात्मक वाटत नाही. परिस्थीतीमुळे कधी आभाळ झाकोळुन आलंच तर भा. रा. तांब्यांचे लताने गायिलेले गाणे कानात रुंजी घालु लागते..घनतमी, शुक्र बघ राज्य करी..रे खिन्न मना बघ जरा तरी...आता माझे संशोधनच माझ्यासाठी आनंदाचा झरा झाले आहे.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सम्पुर्ण लेखात बरच काही खुपणार्/बोचणारे अस पुर्वानुभुतिनुसार जाणवले!
मात्र सार्‍या लेखात पुढील हे एक वाक्य अतिशय थोडक्यात पराकोटीचा आशय समाविष्ट करणारे वाटले (अर्थातच आधीपासूनच हे पटलेले आहे तो भाग वेगळा)
>>>>> फक्त सामाजिक आणि आर्थिक कारणे सार्‍या सामाजिक घटनांचे मुळ आहे हे सांगणार्‍या आणि माणसाला जवळजवळ परिस्थीतीचे बाहुले बनवणार्‍या मार्क्सवादाला <<<<<

अन एकुण लेखात हे एक महत्वाचे वाटलेले वाक्य, ही धारणा फारच महत्वाची वाटली
>>>> पुढे जसजसे जग पाहायला लागलो तेव्हा अशा प्रसंगातुनही मार्ग काढुन पुढे जाणारी माणसे दिसु लागली. ही सकारात्मकता मला माझ्या संशोधनात आणायची होती.<<<<<<
दुर्दैवाने ही सकारात्मकता शिकविण्याची कुठलिही योजना ना शिक्षण क्षेत्रात आहे, ना मिडिया वगैरे सकारात्मक काही प्रक्षेपित करीत असतात..... आजुबाजुला केवळ अन केवळ नन्नाचाच पाढा , अन तोच आम्हीही गिरवतो.

तुम्ही मुक्तांगणचा उल्लेख केला आहे तो फार महत्वाचा आहे. मुक्ताम्गणचे कार्य अतिशय महत्वाचे आहे व वाट चुकलेल्यान्ना हाताला धरुन पुन्हा नीट वाटेवर आणण्याचे अतिशय महत्वाचे कार्य ते करताहेत जेव्हा सामाजिक परिस्थिती त्या कार्यास कुठेही पोषक/प्रोत्साहनपर नाहीये.

पण याच वेळेस एक मुद्दा असाही की वरील अभ्यासात शेवटी शेवटी साक्षात्कारही होऊ लागेल की मुक्तान्गण वा तत्सम, वा अन्य कोणत्याही प्रकारात वेळेत मार्गदर्शनाचा हात उपलब्ध होणे/उपलब्ध झाला तरी व्यक्तिने तो स्विकारणे/ स्विकारला तरी यशस्विपणे नेटाने त्याचा अंमल करणे या बाबी सर्वांचेच बाबतीत घडत नाहीत, व ज्यान्चे बाबतीत घडतात ते केवळ सन्ख्यात्मक योगायोगावर सोडून देता येत नाही. अन इथेच माझे मते "दैववादाची/नशिबाच्या कल्पनेची" सुरुवात होत असावी. किमान माझा "स्वानुभव" तरी "नशिबाकडेच" इशारा करतो. असो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

तुमच्या संशोधनास शुभेच्छा Happy

शास्त्राची राबवणुक माणसासाठी करावी या मताचा मी आहे>> सुरेख विचार आहे. सगळ्याच विद्वतजनांनी हा दृष्टिकोन बाळगला तर?
शीर्षकापासून शेवटच्या परिच्छेदापर्यंत लेख आवडला. अलिकडेच दोन दिग्गजांच्या पी. एच्. डी. याच विषयाच्या चर्चेची श्रोती होते, ते तपशील आठवले. अनेक धक्कादायक बाबी कानावर पडल्या. एकंदरीत डॉक्टरेट करणे म्हणजे संशोधन कमी आणि मगजमारीच जास्त असं वाटलं.

तुमच्या संशोधनास शुभेच्छा, इतक्या सा-या अडीअडचणींनंतर शेवटी योग्य स्थानी पोचलायत, कष्टांचे आणि कळकळीचे सार्थक होणार यात शंका नाही. ह्या प्रवासाबद्दल पुढेही नियमीतपणे वाचायला आवडेल.

अतुल ठाकूर,

अगदी वास्तवदर्शी लेख आहे. समाजशास्त्रीय शिक्षणक्षेत्राची जी अवस्था आहे त्यामुळे नको ती अधिकृत पदवी असं होऊन जातं. मात्र तरीही तुम्ही जी चिकाटी दाखवली आहे त्यास तोड नाही. तुमच्या चिकाटीचं मूळ या वाक्यात आहे काय?

>> शिक्षण न घेता आल्याचा भयानक न्युनगंड आला होता आणि त्याचा परिणाम शरिर, मन, सार्‍या व्यक्तीमत्वावर
>> झाला होता.

जाणून घ्यावयास आवडेल. कारण मीही थोडीफार अशीच अवस्था होण्याच्या बेतात होतो. बुद्धी असूनही प्रगतीपुस्तकावर का दिसत नाही असा सर्वांचा प्रश्न होता. सुदैवाने तो योग्य वेळी वेगळ्या प्रकारे सुटला.

आ.न.,
-गा.पै.

सुरेख लिहिलं आहे. पण पुढचे लेखही लवकर येऊद्यात. तुम्हाला संशोधनाचे निष्कर्ष मांडता येणार नाहीत माहित आहे. पण संशोधनविषयाची नेमकी व्याप्ती आणि संशोधनपद्धतीवर थोडंसं लिहिलं तर जास्त आवडेल Happy

तुमच्या संशोधनाला मनःपूर्वक शुभेच्छा! Happy

समाजशास्त्रातल्या राजकारणाबद्दल अनुमोदनच. पण आख्ख्या सिस्टीममधेच लोचे झालेत.

प्रोफेसर पीएचडीचा विषय सुचवतो हे तुम्हाला, मला भयाण वाटते. पण मेजॉरिटी विद्यार्थीगणाला तेच हवे असते. आपल्या शिक्षणात स्वतंत्र विचार करायला, मूलग्राही विश्लेषण करायला, मुळात प्रश्न विचारायला शिकवलेच जात नाही. त्यामुळे पीएचडीलाही विद्यार्थ्यांना स्पूनफीडींग हवं असतं. जे हुशार असतात त्यांच्यातही अनेक जण 'स्मार्ट' असतात - म्हणजे कुठल्या विषयाचं नाणं येत्या काही वर्षांमधे चलनात असणार आहे ते जाणून त्या विषयांकडे वळतात. स्वतःला आतपासून वाटतं म्हणून एखाद्या विषयाची निवड करणारे फार क्वचित असतात आणि म्हणूनच शिक्षकांसाठीही ते थोडे अनपेक्षित आणि थोडे नकोसेच असतात. कारण भारतीय समाजशास्त्रांमधे काही उल्लेखनीय अपवाद वगळता बहुतेक सगळे मीडिऑकर आहेत, सुमार दर्जाचे संशोधक आहेत हे अगदी ढळढळीत सत्य आहे. जेएनयूचं सोशिऑलॉजी डिपार्टमेन्ट अगदी जवळून बघितलं आहे. नो कमेन्ट!! सुमार, संधीसाधू शिक्षकगण आणि त्यांनी तयार केलेले विद्यार्थी हे दुष्टचक्र कधी भेदलंच जाणार नाहीये असं निराशेने वाटावं अशीच परिस्थिती भारतात आहे. यातून जे खरंच शहाणे, स्वतंत्र प्रज्ञेचे असतात, ते बरेचदा बाहेरच निघून जातात.

पीएचडीच्या गाईडने खरं तर तांत्रिक आणि सैद्धांतिक मार्गदर्शन करणे एवढेच अपेक्षित असते. किंवा एखादा विषय, स्वतःच्या क्षेत्राबाहेरचा असला तरी, पीएचडीयोग्य आहे का? का मर्यादित वेळेचे बंधन असल्याने त्यात काही बदल, काटछाट करावी लागेल? विद्यार्थ्याच्या क्षमता त्या विषयासाठी कितपत पुरेशा आहेत हे बघून त्या विद्यार्थ्याला त्या विषयसाठी सक्षम कसे करता येईल? इत्यादि मुद्यांसाठीच खरं तर गाईडची आवश्यकता असते. त्याच विषयातला असला तर खरं तर बोनस असावा, कारण मग आणखी चांगले मुद्दे, चांगल्या शोधवाटा सुचवू शकतो. दुर्दैवाने आपल्याकडे हे फार क्वचित होते.
माझ्या एमफिलच्या गाईडने सुरुवातीलाच एकदा मला सांगितलं होतं ते आठवलं - "माझी री ओढायची गरजच नाही. तुला पटेल, वाटेल ते तू लिही. मला खोडून काढावंसं वाटलं तरी बिनदिक्कत खोड. शेवटी तिथे उभं राहून तुला स्वत:ला डिफेन्ड करायचं आहे. तेव्हाही आणि नंतरही पुढे कधीच मी किंवा आणखी कुणीच तुला डिफेन्ड करणार नाहीयोत. तेव्हा तुला जे पुराव्यानिशी, बायस टाळून मांडता येईल तेच तू लिहि. सध्याची चलनी मतं, फॅशनमधे असलेले ट्रेन्ड्स, असली भरताड भरायची गरज नाही. जिथे जी मेथडॉलॉजी, मतं वापरशील ती तिथली गरज म्हणून आली पाहिजेत....."
मी अजून तिने आखून दिलेल्या या वाटेवरूनच चालते आहे Happy

लेख, विचार खूप आवडलं.

भावलेली नेमकी वाक्य कोट करायची म्हंटली तर अर्धाअधिक लेख द्यावा लागेल.

पुढल्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

खुपच सुरेख लेख. मी मास्टर्स केले आहे पण पीएचडी नाही. पण बर्याच प्रोफेसर्सनी बहुतेक वेळा एखाद्या विषयाला वाहुन घेतले असते त्यामुळे अशी ठाम मते असताना, नविन काही करणे किती कठीण जात असावे
हे तुम्ही खुपच छान लिहिले आहेत.
आपल्याला हव्या त्या विषयात पुढील संशोधनासाठी शुभेच्छा.

"..."अरे तुझ्यासारख्या विद्यार्थ्याचा हा विषय नाही...."

या जवळपास तुच्छतादर्शक वाक्याने सुरू झालेल्या या लेखाने मला माझ्या भूतकाळाकडे खेचले आणि २५-३० वर्षापूर्वीही पीएच.डी. गाईड आणि रेफरी यांच्यासंदर्भात जी स्थिती होती तीच आजही...किंबहुना मोठ्या स्थितीत... जशीच्यातशी आहे हे पटले. आपण ज्यावेळी पोस्टग्रॅज्युएट होतो त्यावेळी मनी नक्कीच भावना उदयाला येत असते की "आता आपण प्रौढ झालो....शिक्षणामुळे...या शिक्षणाला आता पीएच.डी. ची झालर लागली की समाजात आपल्याला ज्ञानी, सुजाण समजतील...विशिष्ट मान मिळेल..." इ. स्वप्नाच्या दुनियेत विहार चालू होतो. या विहारातून जमिनीवर आणायला गाईड नामक गीध आधाशासारखे वाट पाहात असते. ज्याना त्यांचे नखरे पीएच.डी. पुढे काहीच वाटत नाही ते कचरत नाही....पण तो नाद सोडून आपण वेळीच बाजूला गेलो तर हरकत नाही असे म्हणणारेही बरेच असतात. हे चूक की बरोबर हा इथल्या वादाचा प्रश्न नाही....प्रश्न आहे तो सिस्टिमचा.

विद्यापीठात संशोधन संदर्भासाठी 'रीसर्च रेकग्निशन कमिटी' असते. ही कमिटी पीएच.डी. चे प्रपोजल्स तपासून त्यावर निर्णय [मान्य/अमान्य] देण्याचे काम करते असे विद्यापीठाच्या गाईडलाईन्स सांगतात....रेफरी नियुक्तीही यांच्याकडेच असते. वरवर ही प्रक्रिया चटदिशी होत असावी असे दिसून येते. पण नेमकी हीच प्रक्रिया विद्यार्थ्याचा अंत पाहते...तो जवळपास कोलमडून पडतो. "गाईड" मिळता मिळत नाही...ज्याची गाईड म्हणून नियुक्ती होते [तो मूळ विषय बदलायला लावतो, त्याच्या लहरीप्रमाणे] त्याने एकदा होकार भरला म्हणजे ते फायनल नव्हे....तो केव्हाही आपले नाव रद्द करून घेतो [कला शाखेत याचे प्रमाण लक्षणीय आहे]...मग परत आर.आर.सी. ची नव्याने मीटिंग....परत रेफरींची नियुक्ती...."ये रे जा रे" च्या घंटानादात त्या विद्यार्थ्याला वेड लागायचे राहते....नोकरीवर नसला तर निदान विद्यापीठावर याच्या मागे त्याच्या मागे करीत बसायला वेळ असतो. पण काही पीएच.डी. उत्सुक इकडेतिकडे पार्टटाईम नोकरी करीत असतात. त्यांचे हाल कुत्रादेखील खात नाही.

सायन्सकडे जरा बर्‍यापैकी स्थिती आहे....गाईड मिळतात...लॅबोरेटरीज उपलब्ध असतात....रीडिंग मटेरिअल रेडी रेफरन्सेससाठी चटदिशी मिळते...पण आर्टस आणि कॉमर्स...? गॉड....डेव्हिल टेक देम.

तरीही अतुल....तुमच्या सहनशीलतेला आणि कसोटीला दाद दिलीच पाहिजे. वर्णनावरून तुम्ही कोणत्याकोणत्या प्रसंगातून गेला आहात हे तर स्पष्टपणे समजलेच आणि आता जवळपास पीएच.डी. च्या अंगणात आला आहात याचा तुम्हाला जितका आनंद होत असेल तितका मलाही होत आहे....ज्यावेळी तो मान जाहीर होईल त्यावेळी आम्हाला होणारा आनंद अवर्णनीय असाच असणार आहे.

फारच सुन्दर लेख. विचारान्चि दिशा आवडली. माझेही विचार याला समान्तर आहेत.

सुरेख लिहिलय !! खूप आवडला लेख.
बर्‍याच दिवसांनी ह्या ग्रुपात कोणीतरी लिहिलं. Happy

पुढचे लेखही लवकर येऊदेत..

@limbutimbu

अन एकुण लेखात हे एक महत्वाचे वाटलेले वाक्य, ही धारणा फारच महत्वाची वाटली
>>>> पुढे जसजसे जग पाहायला लागलो तेव्हा अशा प्रसंगातुनही मार्ग काढुन पुढे जाणारी माणसे दिसु लागली. ही सकारात्मकता मला माझ्या संशोधनात आणायची होती.<<<<<<

खरं तर अशी धारणा किती गाईड मान्य करत असतील सांगता येत नाही. कारण "सोशॉलॉजी इज अ सायन्स ऑफ डिबगींग" अशी एक व्याख्या मला एका प्राध्यापकांनी सांगितली. याचा दुसरा मी घेतलेला अर्थ हा की जेथे काही चांगले चालले असेल तेथे समाजशास्त्रज्ञांना रसच नसणार. हे टोकाचं होतं आहे हे मान्य आहे. पण कुठलाही विषय "पॉवर" आणि "पॉलिटिक्स" या आपल्या आवडत्या संकल्पनांच्या दृष्टीकोनातुनच मांडायचा आणि तशीच अपेक्षा सर्वांकडुन ठेवायची हे निदान मला तरी मान्य नाही. बायस ठेवायचा नाही हे सतत कानी कपाळी ओरडायचं स्वतः मात्र सगळी कडे फक्त आणि फक्त नकारात्मक दृष्टीकोण ठेवायचा हेच मला तरी सगळीकडे दिसुन आलं. स्ट्रक्चर आणि एजन्सी मध्ये फक्त स्ट्र्क्चरचा विचार करणे आणि माणसाला कठपुतळीसारखे मानणे याइतकी नैराश्यपुर्ण गोष्ट दुसरी नसेल.

@गापै

तुमच्या चिकाटीचं मूळ या वाक्यात आहे काय?

>> शिक्षण न घेता आल्याचा भयानक न्युनगंड आला होता आणि त्याचा परिणाम शरिर, मन, सार्‍या व्यक्तीमत्वावर
>> झाला होता.

अनेक कारणांपकी ते एक अतिशय महत्त्वाचे कारण आहे. मी खरोखर खचुनच गेलो होतो आणि दुर्दैवाने ती अवस्था काही वर्षे तशीच राहिली होती.

अतुल ठाकूर,

१.
>> बायस ठेवायचा नाही हे सतत कानी कपाळी ओरडायचं स्वतः मात्र सगळी कडे फक्त आणि फक्त नकारात्मक
>> दृष्टीकोण ठेवायचा हेच मला तरी सगळीकडे दिसुन आलं.

अगदी समर्पक निरीक्षण! या वृत्तीचा अतिरेक झाला की प्रत्येक समस्येला 'समाजा'स जबाबदार ठरवलं जातं. भारतीय समाजात काही त्रुटी सापडली की लगेच 'धर्मा'ला नावं ठेवण्यात येतात.

२.
>> स्ट्रक्चर आणि एजन्सी मध्ये फक्त स्ट्र्क्चरचा विचार करणे आणि माणसाला कठपुतळीसारखे मानणे याइतकी
>> नैराश्यपुर्ण गोष्ट दुसरी नसेल.

अगदी अगदी! शिक्षण न घेतल्याचा भयानक न्यूनगंड येणे हा तुम्हाला आलेला अनुभव वरील कारणामुळेच आहे. Angry Sad वैताग असा आहे की, शिक्षण घेतल्यावरही फारसा फरक पडत नाही असं सतत वाटंत राहतं! Uhoh

आ.न.,
-गा.पै.

अतुल ठाकुर - इंडियन सोशिऑलॉजीत एजन्सी स्टडीज खरंच कितपत गांभीर्याने झालेत? मला खरंच माहित नाही म्हणून विचारते आहे, उपरोधाने नव्हे.. पण तरीही मार्क्सिस्ट, मॉडर्निस्ट, पोस्ट-कलोनियल, दलित, फेमिनिस्ट वगैरे चष्मे काढून किंवा निदान त्या विचारचौकटीतही कुणी एजन्सीचा विचार (फॅशनेबल ट्रेन्ड म्हणून वापर सोडून) केला आहे का?

@वरदा

प्रामाणिकपणे सांगायचं तर या दिशेने फारसा अभ्यास झाला नसावा असे माझे मत आहे. फार तर सोशल मुव्हमेंट हे जे क्षेत्र आहे तेथे थोडेफार या तर्‍हेचे काम आढळते. मात्र आता तुम्ही विषय छेडलाच आहे तर माझे मत सविस्तर लिहितो.

बरेचदा समस्या ही शिकवणार्‍यांच्या बाबतीत असते. समाजशास्त्र म्हणजे समाजाचे शास्त्र, तेथे एका माणसाला वाव नाही. अशी काहीतरी धारणा आहे. फक्त एजन्सीचा विचार करणारं शास्त्र म्हणुन बरेच समाजशास्त्राचे प्राध्यापक मानसशास्त्राविषयी तुच्छातापूर्वक बोलत असतात. किमान मला शिकवणार्‍या तीन प्राध्यापकांची मानसशास्त्राबद्दलची मते मला माहित आहेत. एका प्राध्यापकाने तर मान्यच करुन टाकलं की इंडीव्हिजुअलच्या बाबतीत सोशॉलॉजी इज स्टील स्ट्रगलिंग. मला हे कधीही पटले नाही. तुम्ही सिद्धान्त कसे शिकवता, तुमचा कल कुठे आहे? तुमचा दृष्टीकोण काय आहे? त्यावर बरंच काही अवलंबुन आहे. गंमत म्हणुन काही उदाहरणे देतो. खरं तर आमच्यासाठी ही उदाहरणे भीतीदायक आहेत. खैर.

आमचे एक मार्क्सवादी दलित प्राध्यापक आहेत. त्यांचा हिंदु आणि त्यातही उच्चवर्णिय यांच्यावर एकंदरीत दात. त्यामुळे हिंदुंच्या जाती व्यवस्थेवर कडाडुन टिका करणारे बाबासाहेबांचे "अ‍ॅनहिलिएशन ऑफ कास्ट" म्हणुन जे सुप्रसिद्ध (आणि न केलेलं, फक्त प्रकाशित झालेलं) भाषण आहे ते आमचे प्रोफेसर आवर्जुन आणि झोकात शिकवतात. पण त्याचवेळी "बुद्ध कि मार्क्स" हा त्यांचा मार्क्सवरचा टिकात्मक निबंध? त्याचा उल्लेखदेखिल नाही. कारण मग त्यांच्या पोथीतल्या देवाचे कपडे फेडावे लागणार. मार्क्सची पुस्तके बाबासाहेबांच्या वेळी उपलब्ध नव्हती अन्यथा तेही मार्क्सचे भक्त झाले असते असे वाटावे अशातर्‍हेचे बोलणे चालु ठेवतात. यांच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने बाबासाहेबांची मते ही छापली गेलेली आहेत. आणि बाबासाहेब हे अगदी अलिकडे होऊन गेले नाही तर यांच्या सारख्यांनी त्यांच्या नावावर काय काय खपवलं असतं सांगता येत नाही. एक मासलेवाईक उदाहरण म्हणजे हिन्दु मुस्लिम संबंध. बाबासाहेबांची मुस्लिमांबद्दलचे मते जगजाहिर आहेत. आता ती यांना कशी मानवणार? कारण यांना हिंदुंविरुद्ध भारतात अखिल जनतेची फळी उभारायची आहे. त्यामुळे असा कुणी प्रश्न बाबासाहेबांच्या मताबद्दल उपस्थित केला कि गुळमुळीत उत्तर द्यायचे पण गंमत पुढे आहे. ते असे म्हणत की आपणा सर्वांचा हा गैरसमज आहे कि इस्लाम हा भारतात तलवारीच्या जोरावर पसरला. खरं म्हणजे जेव्हा इथल्या जनतेने त्यांना एका थाळीत जेवताना पाहिले तेव्हा त्यांना जाणवले की या धर्मात अस्पृश्यता नाही, उच्चनीच नाही म्हणुन येथिल जनतेने आपणहुन हा धर्म स्विकारला. आता एवढे गहिवरल्यावर आपण काय बोलणार?

तर हा जो यांचा छुपा अजेंडा असतो त्यानुसार ही माणसे सिलेक्टीव ट्रेनिंग देतात असा माझा स्पष्ट आरोपच आहे आणि ही परिस्थिती भयावह आहे.

दुसरे एक आम्हाला संशोधकाने "बायस" असु नये असे सांगत होते. त्यानंतर त्यांनी जाती प्रथेवर बोलायला सुरुवात केली. साहजिकच बोलणे बाबासाहेब त्यानंतर गांधी आणि शेवटी गाडी पुणे कराराच्या रुळावर आली आणि प्राध्यापक महाशय पटकन "गांधी वॉज हिप्पोक्रॅट" असे म्हणुन गेले. सुदैवाने एका गांधीवादी विद्यार्थीनीने चटकन आक्षेप घेतला. बाकी विभक्त मतदार संघाला गांधींचा असलेला विरोध हा त्यांच्यासमोरच्या मुस्लिम लीगच्या उदाहरणामुळे होता. मुस्लिम लीग ला विभक्त मतदार संघ दिल्याने पुढे ती पाकिस्तानची मागणी करण्याइतकी बळकट झाली असे मत कट्टर मार्क्सवादी असलेल्या नरहर कुरुंदकरांनी मांडले आहे. अर्थात हे यांना माहित असण्याची गरज नव्हती. कींवा माहित असले तरी त्यांना ते पटले नसावे. मग ते सांगण्याची तोषिस कोण घेणार?

एका सेमिनार मध्ये हैदराबादच्या समलिंगी कोथी कम्युनिटीच्या पेपरचे वाचन सुरु होते. त्या संशोधकाने कुठल्याही स्ट्रक्चरचे सहाय्य न घेता अअपले म्हणणे मांडले. त्याचा नाईलाज होता. त्याला अशी माणसे गरीब, श्रीमंत, आणि उच्च नीच जातीत सगळीकडेच आढळली. आता आमच्या प्राध्यापकांनी आक्षेप घेतला. कुठेतरी स्ट्रक्चरशी संबंध असणारच. ती कम्युनिटी काय निर्वात पोकळीत थोडीच उभी आहे..वगैरे वगैरे. मग आता आपण काय म्हणायचं? ते गरीब होते म्हणुन समलिंगी झाले कि श्रीमंत होते म्हणुन? कि महार होते किंवा ब्राह्मण होते म्हणुन समलिंगी झाले? त्यांच्या समलिंगी असण्याचा स्ट्रक्चरशी संबंध कसा काय लावणार? या गोष्टी या विद्वान असलेल्या प्राध्यापकांना कळत नाही असे मुळीच नाही. पण स्ट्रक्चरविरुद्ध काहीही ऐकण्याची इच्छाच नाही.

वेळ मिळाल्यास आणखिही लिहेन.

बरेचदा समस्या ही शिकवणार्‍यांच्या बाबतीत असते....तर हा जो यांचा छुपा अजेंडा असतो त्यानुसार ही माणसे सिलेक्टीव ट्रेनिंग देतात असा माझा स्पष्ट आरोपच आहे आणि ही परिस्थिती भयावह आहे.>> शंभर टक्के मान्यच आहे Happy

अ‍ॅक्चुअली, स्ट्रक्चर आणि एजन्सी कितपत एकत्र करता येईल मला शंका आहे. नाहीच येणार. कारण स्ट्रक्चर हे मॉडर्निस्ट विचारसरणींमधून बहुतांश प्रमाणात वापरलं गेलं आहे/त्याचा भाग आहे. आणि एजन्सी ही पोस्टमॉडर्निस्ट विचारसरणींमधला एक परिप्रेक्ष्य आहे. एजन्सी डजन्ट प्रीझ्यूम एक्झिस्टन्स ऑफ एनी स्पेसिफिक स्ट्रक्चर!
सर्व वर्ण्यविषयांमधले सर्व मुद्दे हे काही ठराविक संरचनांमधे (स्ट्रक्चर्स) बसवता आले पाहिजेत आणि या संरचना वैश्विक पातळीवर समान असतात हा परिप्रेक्ष्यच मुळात मॉडर्निस्ट आहे, मेटानॅरेटिव्ह मानणारा आहे.

तेव्हा आपले समाजशास्त्रज्ञ आधुनिकोत्तर जगात प्रवेशकर्ते झाल्याशिवाय (फॅशनपुरते किंवा नावापुरते नव्हेत किंवा जेन्डर, फेमिनिझम, सेक्शुअ‍ॅलिटी, आयडेन्टिटी, एथ्निसिटी वगैरे लेबलं तोंडावर फेकण्यापुरते नव्हेत तर खरेखुरे) तुम्ही म्हणताहात ती भयावह परिस्थिती बदलेल की नाही शंका आहे.

कुरुंदकर, कोसंबी इ. मार्क्सिस्ट बहुदा त्यांच्या जातीमुळे बाद ठरवले असतील त्या प्राध्यापकांनी Proud

अतुल,
>>सामाजिक संबंधांचा, नातेसंबंधांचा शरिरावर आणि मनावर होणारा परिणाम अगदी जवळुन पाहिला होता. त्यापायी माणसांची आयुष्य वाया गेलेली पाहिली होती. ----------एक ना दोन अनेक भयानक प्रसंग. हे सारे मला माझ्या प्रबंधांचा भाग बनवायचे होते >>

..आपलं आयुष्य , आपल्या भोवतीचा समाज , परिस्थिती या सर्वातले दमन,अभाव, अंतर्विरोध यांचा अभ्यास तोही ही परिस्थिती सकारात्मक रित्या बदलण्यासाठी करणारी तुमच्यासारखी माणसं आहेत हेच आमच्यासाठी 'घन तमी शुक्र बघ राज्य करी !'

शुभेच्छा.

आवडला लेख.....
अतुलभाऊ, तुम्हाला अजुन काही वेगळे सांगणे नलगे. मी, अशोककाका, निपो, अमेयदा, मंदार आम्हाला तुमच्याबद्दल काय वाटते ते तुम्हाला ठाऊक आहेच. तरीही पुन्हा एकदा सांगतो तुमच्याबद्दलचे प्रेम , आदर अजुनच वाढलेला आहे. पुढील संशोधनासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा !

सर्व प्रतिसादकांचे आभार Happy आपल्या शुभेच्छांची आणि त्याहिपेक्षा आशिर्वादांची गरज माझ्यासारख्याला तर नेहेमीच भासते. त्यामुळे असाच लोभ राहु द्यावा Happy

@वरदा
कुरुंदकर, कोसंबी इ. मार्क्सिस्ट बहुदा त्यांच्या जातीमुळे बाद ठरवले असतील त्या प्राध्यापकांनी

अतिशय मार्मिक आणि अचुक निरिक्षण Happy

स्ट्रक्चरबद्दल माझी मते ठाम आहेत. मला सोशॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे तो स्ट्रक्चर सुक्ष्मातिसुक्ष्म पातळीवर जाणण्यासाठीच. त्याने येणारे अडथळे ओळखण्यासाठी. आणि त्यातुन उपाय शोधण्यासाठी. नुसतं स्ट्रक्चर किती महत्त्वाचं आहे आणि माणसे त्यापुढे किती हतबल आहेत हे सांगण्यासाठी नाही.

अशोकमामा, अगदी बरोबर म्हटलय. सायन्समध्ये अनेक पुस्तकं आणि जर्नल्स सहजतेने उपलब्ध होतात. अगदि विद्यापिठेही याच जर्नल्सचे वर्गणीदार असतात. सोशल सायन्स, मॅनेजमेंट वगैरेना फारसं महत्त्वच दिल्या जात नाही. आणि झालही पीएचडी तरी, ४ पुस्तके गोळा करायची आणि इकडच तिकडचं मिळुन लिहायचं, अशी हेटाळनीही Sad वाईट वाटतं.
अतुल ठाकुर शुभेच्छा.

हे अतुलराव हिमनग आहेत.
एकेक पैलु हळुहळु कळत आहेत.

विष्लेषण, विषय मांडण्याची हातोटी सर्वच दर्जेदार. Happy

गेल्या वर्षभरात तुमच्याशी झालेली नेटओळख ही एक मौल्यवान गोष्ट आहे असे मी मानतो. प्रत्येक लेखातून, त्यामधील विश्लेषक टिपणांमधून कधी हळवे कधी विचारप्रवण करणारे ठोस तत्त्व नेहेमीच हाती लागले आहे.
स्वतःची बुद्धी आणि वेळ खर्चून करायच्या असलेल्या संशोधनामागेही इतकी रामकहाणी असते याची माहिती नव्हती. अनेक वाक्ये भिडून गेली. मात्र शीर्षक आणि शेवटी आलेला आशावाद यांनी फार कातरता येऊ दिली नाही.
संशोधनातून अपेक्षित मूल्याभ्यास होवो आणि तुमचे तसेच समाजाचेही भले करणारे काही निष्कर्ष निघोत ही शुभेच्छा.

>>>>> मला सोशॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे तो स्ट्रक्चर सुक्ष्मातिसुक्ष्म पातळीवर जाणण्यासाठीच. त्याने येणारे अडथळे ओळखण्यासाठी. आणि त्यातुन उपाय शोधण्यासाठी. नुसतं स्ट्रक्चर किती महत्त्वाचं आहे आणि माणसे त्यापुढे किती हतबल आहेत हे सांगण्यासाठी नाही <<<<<
त्यासाठी ये देशी आधी अस्तित्वात असलेली "जीवनप्रणाली' जी एका विशिष्ट कोणतेही नामाभिधान नसलेल्या "धर्मावर" आधारित होती किम्बहुना "धर्म" म्हणजे जगण्याची नियमावली असे मानणार्‍यान्ची ती नियमप्रणाली अभ्यासुन त्याचबरोबर एखाददोन दशके नव्हे तर कित्येक शतके या जीवनप्रणालीवर/नियमावलीवर बाह्य आक्रमणे कशी होत गेली व त्यानुसार येथे कसे बदल आपसूक/सक्तिने/मजबुरीने स्विकारले गेले त्याचा अभ्यास करावा लागेल. अन हा अभ्यास करता करता कदाचित वर्तमानातील "स्ट्रक्चर" काय आहे व असेच का आहे हे कळून येईल.