चित्रकथा (नियम) - मराठी भाषा दिवस २०१४

Submitted by संयोजक on 12 February, 2014 - 05:21

मंडळी, गोष्ट हा आपणा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! आपल्याला सगळ्यांनाच गोष्टी ऐकायला, सांगायला फार आवडतं. बच्चेकंपनीला तर गोष्टी भारीच प्रिय! अनंत पै यांच्या अमर चित्र कथा असोत वा चाचा चौधरी, फँटमची कॉमिक्स असोत, लहान मुलं या चित्रगोष्टींत अगदी रमून जातात.

छोट्या दोस्तांची हीच आवड लक्षात घेउन यावर्षीच्या मराठी भाषा दिवस २०१४च्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक खास उपक्रम - 'चित्रकथा'!

तुम्हाला आम्ही काही चित्रे देणार आहोत आणि या चित्रांतून सुचलेली गोष्ट तुम्हाला तुमच्या शब्दांत मराठीतून लिहायची आहे. म्हणजे ती चित्रं तुम्ही मन लावून पहायची आणि मग गोष्ट लिहायची. आता चित्रं तीच असली तरी प्रत्येकाची गोष्ट वेगळीच आणि छानदार असू शकते की नाही? तेच हवंय आम्हाला!

तर पेन / पेन्सिल सरसावून आणि मन एकाग्र करून तयार व्हा बरं ही गोष्ट लिहायला! तुम्हाला लिहिताना मजा येणार आहे आणि आम्हांला वाचताना!

नियम :

१. ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.

२. हा उपक्रम फक्त मायबोली सदस्यांच्या पाल्यांसाठीच खुला आहे.

३. मायबोली सदस्यांच्या मित्रमंडळी / नातेवाईकांच्या पाल्यांना यात भाग घ्यायचा असल्यास त्यांच्या पालकांना मायबोली सभासद व्हावे लागेल.

४. उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१४' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.

५. या उपक्रमात चार चित्रे देत आहोत. आपल्या पाल्यांनी त्यातील कोणतेही चित्र निवडून त्याबद्दल लिहिणे अपेक्षित आहे.

६. एकापेक्षा जास्त चित्रांवर लिहिल्यास स्वागत आहे.

७. दिलेल्या चित्रावर पाच ते दहा ओळी मराठीतूनच स्वहस्ताक्षरात पाल्याने स्वत: लिहायच्या आहेत. अधिक लिहिल्यास उत्तम. शुद्धलेखनात पालकांच्या मदतीला हरकत नाही, तसेच पालकांनी मुलांकडून गिरवून घेतले तरी चालेल.

८. पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावे पण मुख्य विचार व शब्द मुलांचेच असावेत.

९. मायबोलीकरांच्या वय वर्षे ५ आणि त्याखालील पाल्यांसाठी कथेचे ध्वनीमुद्रण स्विकारले जाईल. मात्र ५ वर्षांपेक्षा मोठ्या पाल्यांकडून लिखित स्वरुपातील कथा अपेक्षित आहे.

१०. हा उपक्रम २६ ते २८ फेब्रुवारी २०१४ पर्यंतच खुला आहे.

****************************************************************************************************************

चित्र क्र. १ : क्रीडा-दिन / खेळांच्या स्पर्धेचा दिवस
चित्रसंकल्पना : मितान, चित्रकार : यशस्विनी

चित्र क्र. २ : गावाचा देखावा
चित्रसंकल्पना : मितान, चित्रकार : यशस्विनी

चित्र क्र. ३ : मंडई
चित्रसंकल्पना : मितान, चित्रकार : यशस्विनी

चित्र क्र. ४ : जत्रा
चित्रसंकल्पना : मितान, चित्रकार : सावली

****************************************************************************************************************
या उपक्रमांतर्गत लिहिण्यासाठी धागा कसा उघडावा याबद्दल काही सूचना :

१. या उपक्रमातील धागे २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या तीन दिवसांतच काढावेत.

२. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मराठी भाषा दिवस २०१४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मराठी भाषा दिवस २०१४' या ग्रूपचे सभासद झाला आहात.

३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल.

४. त्यात "शीर्षक" या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
चित्रकथा (क्रमांक) - - स्वतःचा मायबोली आयडी -- पाल्याचे नाव

५. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्यूमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

६. "शब्दखुणा" या बॉक्समध्ये 'चित्रकथा - मराठी भाषा दिवस २०१४' हे शब्द लिहा.

७. मजकूरात आपण निवडलेले चित्र व त्या चित्रावर लिहिलेले लेखन असे दोन्हीही अपलोड करावे
त्यासाठी दिलेल्या चित्राची प्रिंटआउट काढून घ्यावी. लिहून झाल्यावर scan करून दोन्हीही कागद इथे अपलोड करावेत.

८. नविन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर " ग्रूप" असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लीक करा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.

९. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन
सगळ्यांना दिसू लागेल.

आम्ही सर्व उत्सुक आहोत बच्चेकंपनीच्या गोष्टी वाचायला ......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

अजून मराठी शिकवलं नसेल लिहायला, पण नुसती चित्रं दाखवून गोष्ट सुचली पाल्याला तर ध्वनिमुद्रण केलेलं चालेलं का ? (जस्ट एक शंका, नसेल चालणार तरी कल्पनाशक्ती वाढावी म्हणून चित्रं दाखवेनचं Happy )

अरे वा!
पण यावर्षी आम्हाला भाग घेता येणार नाही.
आम्ही (म्हणजे मुलगा )फक्त झ पर्यंतच मूळाक्षरे शिकतोय अजून.
Wink

बाकी गोष्टी वाचायची आणि चित्रे पहायची मजा घेऊ मात्रं.

प्राजक्ता

चित्रकथा या उपक्रमात मुलांनी चित्रावर विचार करुन लिहिणे अपेक्षित आहे. त्यामुळे ध्वनीमुद्रण स्विकारले जाणार नाही.
मात्र नियमात म्हटल्याप्रमाणे तुम्ही पाल्याला लिखाणात मदत तसेच गिरवून घेऊ शकता
मात्र विचार आणि शब्द त्याचेच असावेत

अजून मराठी शिकवलं नसेल लिहायला, पण नुसती चित्रं दाखवून गोष्ट सुचली पाल्याला तर ध्वनिमुद्रण केलेलं चालेलं का ? (जस्ट एक शंका, नसेल चालणार तरी कल्पनाशक्ती वाढावी म्हणून चित्रं दाखवेनचं स्मित )>>>+१

पिटूकल्यांसाठी ध्वनिमुद्रणाची सवलत द्यायला हवी त्यानिमित्ताने खूप गमतीशीर गोष्टी ऐकण्याचा लाभ माबोकरांना घेता येईल.

हल्ली आमच्याकडे चित्र पाहून कथा रंगवून सांगणे सुरू असते. लिखाणात अजूनतरी सगळी बाराखडी लिहायला येत नाही त्यामुळे त्याची कथा आधी रेकॉर्ड करून मग जमले तर गिरवून घेण्याचा प्रयत्न करून पहायला हवा.

>>चित्रकथा या उपक्रमात मुलांनी चित्रावर विचार करुन लिहिणे अपेक्षित आहे. त्यामुळे ध्वनीमुद्रण स्विकारले जाणार नाही.
अपेक्षा बदलून याचे दोन वयोगट नाही का करता येणार? पाच वर्षांखालची मुलं कथा रचून 'सांगू' शकतील आणि ज्यांना लिहिता येतंय ती 'लिहू' शकतील.

अटीतल्या या शिथिलतेमुळे, भारताबाहेरची जी मुलं लिहू शकत नाहीत, पण बोलतात अशांनापण भाग घ्यायला मिळेल.

शेवटी काय, 'भाव चित्रातले, बोल मनातले' आहे ना, मग ते कसे व्यक्त होतील यापेक्षा मराठीत व्यक्त झाले हेच जास्तं महत्त्वाचं नाही का? कृपया विचार करावा.

मृण्मयी +१ ,

५ पेक्षा लहान मुलांकडून लिहून घेणं जरा कठिण आहे, उदा. जोडाक्षरं रोजच्या वापरात असलेली बोलता येतात पण लिहायला सांगितलं तर उत्साह टिकेल का शंका आहे.

आधी एकदा (२०१२ साली बहुदा) गोष्ट सांगणे - ध्वनिमुद्रण - उपक्रम होता तो रिपिट होऊ नये म्हणून असा नियम असेल तर ठिक आहे Happy

मायबोलीकरांकडून आलेल्या खास मागणीला मान देऊन आम्ही नियमांत थोडा बदल करत आहोत. (वर नियमांत देखिल त्याप्रमाणे बद्ल केला आहे याची कृपया नोंद घ्यावी.)

मायबोलीकरांच्या वय वर्षे ५ आणि त्याखालील पाल्यांसाठी कथेचे ध्वनीमुद्रण स्विकारले जाईल. मात्र ५ वर्षांपेक्षा मोठ्या पाल्यांकडून लिखित स्वरुपातील कथा अपेक्षित आहे.

समस्त मायबोलीकरहो

चित्रकथेच्या उपक्रमातील चित्रे आता इथे दिसत आहेत.

वा! वा! हा उपक्रमही छान.
सावलीचं जत्रेचं चित्र मस्तय...

पोरं एकसे एक कथा रचतील यात वादच नाही.

उपक्रम मस्त आहे. Happy

मुलांनो, आता चित्रावरुन गोष्टं लिहा बरं का लवकर लवकर.

थँक्यु ललिता. चित्रावरुन लिहायचे असल्याने बर्‍याच बारिक बारिक गोष्टी काढायचा प्रयत्न केला आहे.

चित्रं सुंदर आहेत. काय वाचायला आणि ऐकायला मिळेल याची उत्सुकता आहे.

जास्तीत जास्त मुलांना भाग घेता येईल असा बदल केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद!

जास्तीत जास्त मुलांना भाग घेता येईल असा बदल केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद >>> +१

सगळी चित्र आवडली. जत्रेचं खास.

किती सुंदर आहेत सगळीच चित्र... सगळ्याच चित्रकारांना शाबासकी!
चित्र बघून चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेची आठवण आली.

यंदा मभादिच्या जाहिराती का येत नाहीयेत गप्पापानांवर?
चित्र प्रकाशित झाल्याचं आज समजलं.

बेस्ट !
चित्रे सुद्धा मस्त आहेत सारीच .. काढलेली सुद्धा आणि कल्पना सुद्धा ..
ईथल्या लहान पोरांचे वाचणे नेहमीच टाईमपास उपक्रम असतो Happy

चित्र सुंदर आली आहेत. विशेषतः गावाचा देखावा आणि जत्रा खूपच छान !
चिमुकल्यांच्या गोष्टी वाचायला आता मजा येईल.

Pages