" घड्याळ "

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 10 February, 2014 - 11:53

अवसेला ये...फिकिर न चंद्रहि कडमडण्याची
भिती विजेच्या फक्त अवेळी लखलखण्याची

हृदयामधले घड्याळ असते सुरु निरंतर
तू दिसल्यावर जाणिव होते टिकटिकण्याची

जातच नाही तोल कधी जाणारच नाही
हुरहुर आहे तरी मला तू सावरण्याची

ज्ञान पाजळत बाल्य हरपते...यौवन सरते
ओढ लागते वृद्ध जाहल्यावर शिकण्याची

दुखणे तू अपुले "कैलास" मिरवण्याआधी
खातरजमा तरी कर जखमा भळभळण्याची

-- डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह किती छान शेर आहेत !
मतला फार छान दुसर्‍या ओळीतून खुबीने फिरवलात (कलाटणी) अख्खा शेर (मलातरी ती दिसली .ती तशीच आहे का नाही हे प्रत्यक्ष चर्चेतून विचारीन म्हणतो )
दुसरा आणि चौथा आवडलेच पण तिसरा जास्त आवडला वाचल्या वाचल्या वाह निघाले मनातून [मनातल्या मनात वाचत होतो ना आणि मनापासूनही म्हणून मनातून वाह निघाले Happy पण असो..(सॉरी सर जरा गम्मत केली :)]
तरीही मला जडलेली वाईट खोड आणि तिची लागलेली लत म्हणून मी शेरात जरा जास्त चीरफाड करायचा प्रयत्न केलाच मला दुसर्‍या ओळीतील शब्दक्रम आणि हुरहुर ह्या शब्दाच्या प्रयोजनातील नेमकेपणाबाबत प्रश्न पडले
असो

मक्ता फार म्हणजे फारच आवडला
धन्यवाद डॉ.साहेब
उणे अधिक बोललो असेन तर क्षमस्व

अवसेला ये...फिकिर न चंद्रहि कडमडण्याची
भिती विजेच्या फक्त अवेळी लखलखण्याची

हृदयामधले घड्याळ असते सुरु निरंतर
तू दिसल्यावर जाणिव होते टिकटिकण्याची

>>खूप खूप खूप सुंदर <<

अवसेला ये...फिकिर न चंद्रहि कडमडण्याची
>> लय अडखळते आहे. प्रयत्नांनी जमली अखेर. पण ओळ बदलल्यास अधिक सुलभ होईल वाचायला.

जातच नाही तोल कधी जाणारच नाही
हुरहुर आहे तरी मला तू सावरण्याची

ज्ञान पाजळत बाल्य हरपते...यौवन सरते
ओढ लागते वृद्ध जाहल्यावर शिकण्याची<<< व्वा

आभार सर्वांचे...

वैभवशेठ....विशेष आभार.