घटित - अघटित

Submitted by शांकली on 27 December, 2011 - 05:19

घटित - अघटित

हॉस्पिटल मधला दिवस जसा असतो तसाच तोही एक दिवस होता. डॉक्टर्स, नर्सेस ची धावपळ, नवीन पेशंट्सची अ‍ॅडमिशन, काहींचा डिस्चार्ज तर काही पेशंट्स डॉक्टरांची प्रतीक्षा करत वेटिंग रूम मधे बसलेले.....
त्यातच 'तो' पेशंट दाखल झाला. उलट्या-जुलाबांनी त्याची हालत खूपच खराब झाली होती. अ‍ॅडमिट झाल्यावर डॉक्टरांनी त्याची तपासणी सुरु केली आणि सुरु झाली एक विलक्षण गुंता गुंतीची कहाणी.......
सकृत दर्शनी त्याला gasteroenteritis झाला आहे असे डॉ.ना वाटले, पण... त्याच्या हृदयाचे ठोके नॉर्मल पडत नव्हते. E C G सुद्धा abnormal आला होता. त्याच्यात conduction abnormality निर्माण झाली होती.
त्याला अर्थातच सी सी यु मधे दाखल करण्यात आलं.
सुरुवातीला एखाद्या व्हायरसमुळे हृदयावर परिणाम होऊन हृदयाचे ठोके मंदावले आहेत असं वाटलं. एखादे वेळेस मेंदूला सूज आल्यामुळे सुद्धा कवटीतील दाब वाढतो आणि हृदयाचे ठोके मंदावतात.
अ‍ॅडमिट व्हायच्या दिवशी सकाळीच त्याला मळमळू लागलं होतं. आणि नंतर त्याला उलट्या जुलाब सुरु झाले होते त्यामुळे डॉ. सुरेश शिंदेंना हा यलो ओलिएंडर पॉयझनचा प्रकार वाटला. यलो ओलिएंडर म्हणजे आपल्याकडे आपण ज्याला कण्हेर म्हणतो तसाच फुलझाडाचा एक प्रकार. या वनस्पतींमधे काही औषधी गुणधर्म आहेत आणि विशेषतः हृदय रोगावर हमखास गुणकारी! डिजिटॅलिस हे औषध या वनस्पतींपासून तयार करतात. परंतु याच वनस्पतींच्या कुठल्याही भागाचा अर्क प्रमाणाबाहेर जास्त झाला तर हीच वनस्पती हृदयाला मारक ठरते.
त्या वनस्पतीची नेटवरून माहिती घेत असताना डॉ. शिंदेंना एक गोष्ट समजली की श्रीलंकेत अशा केसेस कॉमन आहेत. तिकडे आत्महत्या करण्याकरता यलो ओलिएंडरच्या बिया उपयोगात आणतात. त्यावर संशोधन होऊन तिकडे डिजिटॅलिस अ‍ॅंटीबॉडीज तयार केल्या आहेत. या अँटीबॉडीज दिल्यावर पेशंट वाचतात. पण हे इंजेक्शन तिकडे उपलब्ध होते; भारतात नाही. ह्या पेशंटला हे द्यायचे तर श्रीलंकेतून मागवून त्याला देईपर्यंत वेळ गेला असता.
डॉ.सुरेश शिंदे यांनी त्या मुलाची हिस्टरी तपासायला सुरुवात केली.त्यात त्यांना असं कळालं की गेले काही महिने रोज सकाळी तो गुळवेलीचा काढा घेत होता. त्याही दिवशी त्याने काढा घेतला होता आणि त्यानंतर काही वेळातच त्याला मळमळायला लागलं होतं. इतर दिवसांपेक्षा त्या दिवशी घेतलेला काढा जरा रंगाने काळसर आणि चवीला कडू होता.काढा घेतल्यानंतर काही वेळातच त्रास सुरु झाल्यामुळे इतर काहीही पदार्थ त्याने खाल्ला नव्हता. त्यामुळे त्या काढ्यामुळेच त्रास झाला हे निश्चित झालं.
त्यातच आणखी एक धक्कादायक गोष्ट घडली - ती अशी की हा मुलगा अ‍ॅडमिट झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी आठच्या सुमारास त्याची आई पण ह्याच त्रासामुळे अ‍ॅडमिट झाली - उलट्या जुलाब आणि heart blockage! दुर्दैवाने त्या बाई कॅन्सर पेशंट होत्या......मुलाबरोबरच त्यांनीही गुळवेलीचा काढा घेतला होता. प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते म्हणून हा काढा त्या सुमारे ४-५ वर्षे घेत होत्या.
त्या बाईंना वाचवण्याची डॉ.नी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही यश आले नाही ...... अ‍ॅडमिट केल्यापासून अक्षरश: एका तासात त्या बाई मृत्युमुखी पडल्या..... पण कॅन्सरने नाही; तर कंप्लीट हार्ट ब्लॉक झाल्यामुळे. आई गेल्याचे अर्थातच मुलाला सांगितले नाही.
या सर्व घटना, डॉ.चे मुलाला वाचवण्याचे उपाय आणि त्याच बरोबर हे असं का घडलं असावं याचा शोध घेण्याची क्रिया या सर्वच गोष्टी प्रचंड वेगाने घडत होत्या. विशेष आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या मुलाची प्रकृती हळूहळू सुधारत होती आणि तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत होता. काही दिवसांतच त्याला बरं वाटू लागलं आणि त्याला घरी सोडण्यात आलं.
पण ही गोष्ट इथेच थांबली नाही........
त्या मुलावर उपचार करणार्‍या डॉ शिंदे यांना हे असं का झालं असावं याचा शोध घ्यायचं असं ठरवलं त्यामुळे त्यांनी तो मुलगा अ‍ॅडमिट झाल्यावर लगेचच त्या गुळवेलीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. वास्तविक गुळवेल ही वनस्पती विषारी नाही; तर औषधी आहे. मग तिच्याबरोबर दुसरं काही पोटात गेलं का? ह्या शंकेने डॉ. शिंदे शोध घेऊ लागले.
ह्या मुलाच्या वडिलांची जेजुरी जवळ थोडी जमीन आहे. तिथे त्यांनी पत्नीला उपयोग होईल या उद्देशाने गुळवेलीची लागवड केली होती आणि याच गुळवेलीच्या ताज्या काड्या आणून त्याचा काढा हा मुलगा आणि त्याची आई रोज घेत होते.
डॉ शिंदेंनी त्या काड्या आघारकर संशोधन संस्थेतील डायरेक्टर आणि मेडीसीनल प्लांट्स मधेच संशोधन करणार्‍या डॉ. उपाध्ये यांना दाखवल्या. गुळवेलीबरोबर आणखी दुसर्‍या कुठल्या तरी वनस्पतीच्या काड्या आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. पण नुसत्या छोट्या काड्यांवरून वनस्पती ओळखणं शक्य नाही तर ती वनस्पती प्रत्यक्षच बघायला पाहिजे असंही सांगितलं.
डॉ. शिंदेंनी प्रख्यात वनस्पती तज्ञ श्री श्रीकांत इंगळहळीकरांना ती वनस्पती ओळखायला मदत करण्याबद्दल विचारलं. श्री. इंगळहळीकर लगेच तयार झाले आणि एका सकाळी डॉ शिंदे, श्री. इंगळहळीकर, तो मुलगा व त्याचे वडील हे सगळे जेजुरीच्या त्यांच्या फार्मवर पोहोचले.
गुळवेलीचं निरिक्षण करताना ती दुसरी वेल त्यांना दिसली. त्या वेलीने गुळवेलीला वेढलं होतं. जणूकाही एखाद्या अजगराने भक्ष्याला विळखा घालावा तसं ते दिसत होतं.
ही एवढी मंडळी सकाळी सकाळी काय शोधताहेत हे बघण्यासाठी तेथील गावकरी मंडळीही जमा झाली होतीच. त्यांच्या बोलण्यातून त्या दुसर्‍या वेलीला 'कावळी' म्हणतात हे ही समजलं. या वेलीची फळं बैलाच्या शिंगांसारखी दिसतात. डॉ.शिंदे आणि श्री. इंगळहळीकर यांनी बघितलं की त्या भागात सगळीकडेच ही 'कावळी' वनस्पती माजली आहे.
त्या वनस्पतीचे फोटो आणि नमुने घेऊन ही मंडळी पुण्यात परतली. या वनस्पतीचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की या कुटुंबावर मृत्यूचं सावट याच 'कावळी' वनस्पतीमुळे पडलं होतं. या कावळीचं बोटॅनिकल नेम - Cryptolepis buchanani
गुळवेलीबरोबर ही वनस्पतीपण तोडली गेली आणि काढ्यात तिचा अर्क उतरला आणि पुढचं सगळं आक्रीत घडलं.
ऑस्ट्रेलियात या वनस्पतीने इतका हाहा:कार माजवला होता की राष्ट्रीय पातळीवर काही विशिष्ट धोरण आखून तिला नष्ट करण्याचे प्रयत्न करावे लागले.
डॉ. शिंदे यांनी ज्या संशोधक वृत्तीने या घटनेमागची कारण मीमांसा शोधून काढली त्याबद्दल त्यांना शतश: धन्यवाद द्यावेसे वाटतात. या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन असं का घडलं असावं ह्याचा शोध त्यांनी घेतला हे विशेष आहे. डॉ. शिंदे हे अतिशय ऋजू स्वभावाचे व अभ्यासूवृत्तीचे आहेत.
अशा अनेक विलक्षण वैद्यकीय घटना कोणा जिज्ञासू वाचकाला वाचायच्या असतील तर डॉ शिंदे यांच्या http://www.sushrutam.com या ब्लॉगवर वाचायला मिळतील.

डॉ. सुरेश शिंदे
dr suresh shinde.jpg

कावळी - Cryptolepis buchanani

cryptolepis buchanani 2.jpgkavali1.JPG

टीप : १) या लेखाचा उद्देश हा केवळ आपल्या आजूबाजूला काही विषारी वनस्पती असू शकतात; आणि त्यापासून योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे हे कळावे असा आहे; वरील घटनेत गुळवेलीचा प्राणावर बेतण्याशी काही संबंध नसून गुळवेल ही विषारी नाही - याची कृपया नोंद घ्यावी.

२) वरील घटना ही सत्य घटना असल्याने या घटनेशी संबंधीत कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वरील घटना अतिशय दुर्दैवी आहे. कुठलीही गोष्ट वापरताना काळजी घेणे आवश्यक.

डॉक्टरसाहेबही मायबोलीकर झाले! अभिनंदन!!! रुग्णाला नक्की कशामुळे त्रास झाला शोधणारे डॉक्टर हल्ली सापडत नाहीत. इथल्या डॉक्टरांना तर रुग्ण काय तक्रार सांगतोय तेही ऐकायला वेळ नसतो हा स्वानुभव Sad

मीही नव्हता वाचला. वर काढल्याबद्दल सिंडरेला, तुझे आभार. शांकली, खुपच माहितीपूर्ण लेख आहे.

ही वनस्पती पुर्णपणे नष्ट करण्यासाठी ऑस्ट्रेलियात प्रयत्न केले गेले का ?
पण अशी एखादी वनस्पती पुर्णपणे नष्ट करता येऊ शकते का ??
आणि असे करणे कितपत योग्य आहे ??

घटना दुर्दैवी तर आहेच मात्र सोबतच वैद्यकीय सल्ला न घेता तसेच योग्य पारख नसताना औषधी वनस्पती चे सेवन करणार्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
या लेखात एक मोठी चूक झाली असून ती मी नम्र पणे लेखकाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. संबंधित घटनेतील विषारी वेल कावळी किंवा कृष्णसारीवा Cryptolepis buchanani ही नसून
ती Cryptostegia grandiflora रबर वेल आहे. हा विदेशी विषारी वेल आहे.
कृष्णसारीवा विषारी नसून उलट रक्त शुद्ध करणारी आहे म्हणून उल्लेख सापडला.
विषारी रबर वेल Cryptostegia grandiflora
ची छायाचित्रे माझे कडे उपलब्ध आहेत ती मी हवी असल्यास स्वतंत्र प्रतिक्रियेतून पाठविल.

@मिलिंद गिरिधारी : आपला मुद्दा अगदी बरोबर आहे. आपली वनस्पतिशास्त्राविषयीची माहिती स्पृहणीय आहे. हाच लेख मी नंतर पुन्हाएकदा लिहिला होता. त्याचा दुवा येथे देत आहे
https://www.maayboli.com/node/48346
दुर्दैवाने असे विषबाधेचे पुन्हा पुन्हा घडताहेत. माझे एक सहकारी डॉ. सौ. अरुंधती दिवाण यांना ससून हॉस्पिटलमध्ये असेच एक कुटुंब सापडले जे ७ हिवस झगडल्यानंतर वाचले. JAPI या वैद्यकीय नियतकालिकात हि घटना नोंदलेली आहे.
गेल्याच महिन्यात मला सकाळी हॉस्पिटलमध्ये राऊंड घेत असताना कार्डियाक आयसीयू मधून कॉल आला म्हणून गेलो होतो. एका पेशंटची अँजिओप्लास्टी दोन महिन्यापूर्वी झाली होती. लूझ मोशन्स व नाडीचे ठोके कमी होऊन बीपी कमी झाल्यामुळे जुन्नर येथून पुण्याला पाठवले होते. येथे डॉक्टरांनी पुन्हा अँजिओग्राफि करून पाहिले तर ती व्यवस्थित होती. तेवढ्यात पेशंटच्या नवऱ्याला देखील असाच लूझ मोशन्स व मंद नाडीचा त्रास होत असल्याचा फोन आला. दोघांनी काही तरी देशी औषध घेतले होते असे कळले म्हणून मला सल्ला देण्यासाठी बोलावले होते. बरेच रुग्ण लिंग उत्तेजक औषधे घेतात त्यात नाडीचे ठोके वाढवणारी sympathomimetic द्रव्ये असतात. या उलट हृदयविकारासाठीच्या औषधामध्ये नाडीचे ठोके कमी करणारी parasympathomimetic द्रव्ये असतात. या पेशंटचे नाडीचे ठोके कमी झाले होते. मी नातेवाईकांशी बोलल्यानंतर त्या दोघांनी गुळवेलचा काढा घेतल्याचे कळले. आत्ता ‘निदान’ सोप्पे होते. पेशंटचा ECG देखील हेच सांगत होता. दुर्दैवाने उपचारांचा काही उपयोग न होताच पेशंट दगावला. कोणतेही योग्य निदान होण्यासाठी रुग्णाने दिलेली संपूर्ण व correct history आणि उपचारकर्त्या डॉक्टरचे ज्ञान यांची सांगड असणे महत्वाचे असते. ‘हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू’ असे निदान असलेल्या कितीतरी रुग्णांचे खरे निदान पोस्टमॉर्टेमच्या अभावी गुलदस्तातच राहते हेच खरे.

Pages